Wednesday, 14 February 2018

शिक्षा

आज जवळ जवळ वीस बावीस वर्षांनी पुन्हा त्याचा फोन आला होता. भेटायला बोलवत होता.... त्याच बार मध्ये ....

मला तसा थोडा उशीरच झाला होता... बारच्या दारातून आत जाताना त्या टेबलाकडे नजर गेलीच..

त्याचा अर्धा पेग संपलाच होता. …

“ झालास सुरू? कधीतरी थांबत जा रे मित्रासाठी.. कितवा पेग सुरू आहे?”  मी उगाचच काहीतरी बोलायचे म्हणून बोललो..

“ तुला मी साडे सातला ये असं सांगितले होते बहुतेक.. साडे आठ वाजले असतील ना आता?” हातातला ग्लास अलगद टेबलावर ठेवत त्याने घड्याळात पाहिले.

या माणसाला फक्त पिण्याच्या वेळीच माझी आठवण यायची , याची मला नेहमीच कमाल वाटायची …  कदाचित मी पीत नाही त्यामुळे मी शांतपणे त्याचे सर्व ऐकून घेतो हा माझा प्लस पॉईंट असावा..

गेल्यावेळी जेव्हा त्याने फोन केला तेव्हा त्याने लग्न करायचे ठरवले होते..

त्याचे लग्न….

नॉर्मल नव्हते..

एका अगोदरच गर्भवती असलेल्या मुलीशी तो लग्न करत होता. ती गर्भवती कशी हे तिलाही माहीत नव्हते. अगदी साधी मुलगी ...कोणीतरी गुंगीचे औषध वगैरे देऊन तिला भ्रष्ट केले होते. हे सर्व कळेपर्यंत ती गर्भवती राहिली होती.

याच्या समोरच्या चाळीत ती राहायची. याला ती आवडायची… वयात दहा वर्षांचा फरक.

घरातला विरोध स्विकारुन त्याने तिच्या घरी जाऊन लग्नाचा प्रस्ताव ठेवला…….

देवदूत ठरला तो… लोकांसाठी….तिच्यासाठी ….. तिच्या घरातल्यांसाठी… आणि माझ्यासाठीही..

त्या काळात हा निर्णय खरंच खूप मोठा होता.

याचे घर मात्र कायमचे तुटले…..

देवळात पाच दहा लोकांच्या हजेरीत लग्न लागले. वेगळा संसार सुरू झाला. लग्नानंतर आठ दिवसांनी मला तो याच टेबलावर भेटला होता.

“ माझा निर्णय बरोबर आहे ना रे?... मला ती मनापासून आवडते,... जे झाले त्यात तिचा काहीच दोष नव्हता. लोक तिच्या पोटात वाढणाऱ्या जीवाला पाप म्हणतात.. मी त्याला माझे नाव देईन..” मला त्याच्या जागी देवदूतच दिसत होता.

तो दिवस आणि आजचा दिवस….

“ काय रे कुठे हरवलास ? “ डोळ्यासमोर टिचकी मारत त्याने विचारले..

“ कुठे नाही .. बोल आज काय खास? खूप वर्षांनी माझी आठवण तुला टेबलावर होतेय म्हणजे नक्कीच काहीतरी खास आहे. “ मी भानावर येत बोललो.

“ हो … आज दिवस खासच आहे. आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे… “त्याने ग्लास तोंडाला लावला..

“ अरे मग घरी जा… वहिनी वाट बघत असतील..” मी डोळे मोठे करत बोललो.

“ नाहीये ती आता? “ त्याने पुन्हा ग्लास टेबलावर ठेवला.

“ नाहीये म्हणजे? कुठे गेल्या वहिनी? “ मी काळजीयुक्त स्वरात विचारले..

“ अगदी बरोबर विचार केलास तू.. सोडून गेली ती कायमची.. मला...आमच्या संसाराला… या जगाला… “ त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

“ काय सांगतोस काय? मला कळवले ही नाहीस? मी दचकून विचारले.

“ कोणालाच नाही….गेले वीस बावीस वर्ष जेवडी लोक संपर्कात होती तितकीच ठेवली. स्मशानातही तेवढेच होते जेवढे लग्नात होते. “ तो शांतपणे बोलत होता.

“ अचानक की आजारी होत्या? “ मी न राहवून विचारलेच.

“ आजारी होती. हातातून वाळू कशी निसटून जाते ?? तसे आयुष्य निसटून गेले तिचे.. “ त्याचा डोळ्यात नशेसोवत दुःख ही दिसत होतं.

मी शांत राहिलेला पाहून पुन्हा तोच बोलू लागला.

“ तुला प्रश्न पडलाय ना की मी हे सांगायला तुला इथे बोलावले म्हणून? “ अगदी मनातले वाचता यावे असा तो प्रश्न..

“ नक्कीच… ही गोष्ट तू फोनवरही सांगू शकत होतास. सांग काय सांगायचंय ते..” मी त्याचा हात हाताने दाबून त्याला विश्वास दिला.

“ मला एक प्रश्न पडलाय … त्याचे उत्तर मला सापडत नाहीये.. तुझ्याकडे आजवर मला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीत म्हणून तुझी आठवण झाली आज. “ माझ्या हातावर हात ठेवत तो बोलला.

“ काय झालंय सांग.. उत्तर असेल तर नक्की देईन.. “ मी आश्वासकपणे बोललो.

त्याने उरलेला पेग घशाखाली रिता केला आणि बोलू लागला…

“ डॉक्टरांनी मला तिला शेवटचं भेटून घ्या सांगितल्यावर मी तिचा हात हातात घेऊन बसलो. ती नुसती डोळ्यांनी मला बघत होती. बोलण्याचीही ताकद नव्हती तिच्याकडे.

मी बोलायला सुरुवात केली…

या क्षणी मला तुला काहीतरी सांगायचे आहे.. एक असे सत्य जे मी इतकी वर्ष लपवून ठेवलंय.. सांगू ना?

तिने डोळ्यांनीच स्विकृती दिली.

मला तिच्या डोळ्यांची अचानक भीती वाटू लागली. मी माझे डोळे बंद केले. तिचा हात घट्ट धरला.. आणि बोलायला सुरुवात केली..

मी तुझा गुन्हेगार आहे… मला तू खूप आवडतं होतीस. पण आपल्यातले वयाचे अंतर आणि मी दिसायला अजिबात छान वगैरे नाही त्यामुळे आपली काहीच बरोबरी नव्हती. मला काही करून तू हवी होतीस. माझ्यातला हिंस्त्र पुरुष जागा झाला आणि मग एक दिवस तुला तुझ्या नकळत गुंगीच औषध दिले. आठवतंय ? त्या दिवशी घरी कोणी नव्हते तुमच्या. तू मैत्रिणीच्या घरी गेलेलीस. शेजारच्या काकूंनी डबा भरून दरवाजाजवळ ठेवला होता. त्यात मी ते औषध मिसळले. तू उशिरा आलीस आणि जेवायला बसलीस. दरवाजा बंद केलास पण कडी लावली नाहीस. सगळी चाळ झोपली होती. मी गुपचूप आलो.

तू जेवतानाच गुंगीत गेली होतीस.

माझा कार्यभाग आवरून मी पुन्हा जैसे थे करुन गुपचूप पुन्हा घरी गेलो.

नंतर जेव्हा तुझ्या गर्भारपणाची बातमी समजली तेव्हा मला राहवेना. परंतू सत्य सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी तुला मागणी घातली, मला तुम्ही सर्वांनी देवदूत केलंत, पण मनात काय होते हे कोणाला सांगता येत नव्हते. ते मूल दगावले तेव्हा तुला दुःख झाले नव्हते … पण मला झाले होते. त्यांनतर आपल्याला मुल झाले नाही हा त्या देवाचा मला शाप असावा…

हे बोलत असताना… तिचा हात थंड जाणवला म्हणून मी डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं…

तिच्या निष्प्राण डोळ्यातून एक अश्रू ओघळून गेल्याची रेघ दिसत होती…..

तिने माझे बोलणे ऐकले की नाही?

माझे गुपीत तिला कळले की न कळताच तिने जीव सोडला.. की मग??
माझ्यावरचा विश्वास आणि तिच्या श्वासांचा प्रवास एकाचवेळी तुटला या प्रश्नांनी मी हैराण झालोय… तुला तरी या प्रश्नांची उत्तरे देता येतील का?” त्याने खालमानेने प्रश्न विचारला…

मी त्याच्या समोरचा रिकामा ग्लास वेटरला भरायला सांगितला…

भरलेला ग्लास त्याच्या समोर सरकवला…. आणि त्याच्या हातातला हात सोडवला…

“ तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी काहीही देऊ शकतो.  कारण ते सिध्द करायला वहिनी नाहीत आता. …..

पण तुझी शिक्षा हिच आहे की या प्रश्नाला कवटाळूनच तू तुझे उर्वरित आयुष्य घालवावेस.. “

मी टेबलवरून उठलो.. त्याचा आरडाओरडा दुर्लक्षीत करून…

गुपीत

आज जवळ जवळ वीस बावीस वर्षांनी पुन्हा त्याचा फोन आला होता. भेटायला बोलवत होता.... त्याच बार मध्ये ....

मला तसा थोडा उशीरच झाला होता... बारच्या दारातून आत जाताना त्या टेबलाकडे नजर गेलीच..

त्याचा अर्धा पेग संपलाच होता. …

“ झालास सुरू? कधीतरी थांबत जा रे मित्रासाठी.. कितवा पेग सुरू आहे?”  मी उगाचच काहीतरी बोलायचे म्हणून बोललो..

“ तुला मी साडे सातला ये असं सांगितले होते बहुतेक.. साडे आठ वाजले असतील ना आता?” हातातला ग्लास अलगद टेबलावर ठेवत त्याने घड्याळात पाहिले.

या माणसाला फक्त पिण्याच्या वेळीच माझी आठवण यायची , याची मला नेहमीच कमाल वाटायची …  कदाचित मी पीत नाही त्यामुळे मी शांतपणे त्याचे सर्व ऐकून घेतो हा माझा प्लस पॉईंट असावा..

गेल्यावेळी जेव्हा त्याने फोन केला तेव्हा त्याने लग्न करायचे ठरवले होते..

त्याचे लग्न….

नॉर्मल नव्हते..

एका अगोदरच गर्भवती असलेल्या मुलीशी तो लग्न करत होता. ती गर्भवती कशी हे तिलाही माहीत नव्हते. अगदी साधी मुलगी ...कोणीतरी गुंगीचे औषध वगैरे देऊन तिला भ्रष्ट केले होते. हे सर्व कळेपर्यंत ती गर्भवती राहिली होती.

याच्या समोरच्या चाळीत ती राहायची. याला ती आवडायची… वयात दहा वर्षांचा फरक.

घरातला विरोध स्विकारुन त्याने तिच्या घरी जाऊन लग्नाचा प्रस्ताव ठेवला…….

देवदूत ठरला तो… लोकांसाठी….तिच्यासाठी ….. तिच्या घरातल्यांसाठी… आणि माझ्यासाठीही..

त्या काळात हा निर्णय खरंच खूप मोठा होता.

याचे घर मात्र कायमचे तुटले…..

देवळात पाच दहा लोकांच्या हजेरीत लग्न लागले. वेगळा संसार सुरू झाला. लग्नानंतर आठ दिवसांनी मला तो याच टेबलावर भेटला होता.

“ माझा निर्णय बरोबर आहे ना रे?... मला ती मनापासून आवडते,... जे झाले त्यात तिचा काहीच दोष नव्हता. लोक तिच्या पोटात वाढणाऱ्या जीवाला पाप म्हणतात.. मी त्याला माझे नाव देईन..” मला त्याच्या जागी देवदूतच दिसत होता.

तो दिवस आणि आजचा दिवस….

“ काय रे कुठे हरवलास ? “ डोळ्यासमोर टिचकी मारत त्याने विचारले..

“ कुठे नाही .. बोल आज काय खास? खूप वर्षांनी माझी आठवण तुला टेबलावर होतेय म्हणजे नक्कीच काहीतरी खास आहे. “ मी भानावर येत बोललो.

“ हो … आज दिवस खासच आहे. आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे… “त्याने ग्लास तोंडाला लावला..

“ अरे मग घरी जा… वहिनी वाट बघत असतील..” मी डोळे मोठे करत बोललो.

“ नाहीये ती आता? “ त्याने पुन्हा ग्लास टेबलावर ठेवला.

“ नाहीये म्हणजे? कुठे गेल्या वहिनी? “ मी काळजीयुक्त स्वरात विचारले..

“ अगदी बरोबर विचार केलास तू.. सोडून गेली ती कायमची.. मला...आमच्या संसाराला… या जगाला… “ त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

“ काय सांगतोस काय? मला कळवले ही नाहीस? मी दचकून विचारले.

“ कोणालाच नाही….गेले वीस बावीस वर्ष जेवडी लोक संपर्कात होती तितकीच ठेवली. स्मशानातही तेवढेच होते जेवढे लग्नात होते. “ तो शांतपणे बोलत होता.

“ अचानक की आजारी होत्या? “ मी न राहवून विचारलेच.

“ आजारी होती. हातातून वाळू कशी निसटून जाते ?? तसे आयुष्य निसटून गेले तिचे.. “ त्याचा डोळ्यात नशेसोवत दुःख ही दिसत होतं.

मी शांत राहिलेला पाहून पुन्हा तोच बोलू लागला.

“ तुला प्रश्न पडलाय ना की मी हे सांगायला तुला इथे बोलावले म्हणून? “ अगदी मनातले वाचता यावे असा तो प्रश्न..

“ नक्कीच… ही गोष्ट तू फोनवरही सांगू शकत होतास. सांग काय सांगायचंय ते..” मी त्याचा हात हाताने दाबून त्याला विश्वास दिला.

“ मला एक प्रश्न पडलाय … त्याचे उत्तर मला सापडत नाहीये.. तुझ्याकडे आजवर मला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीत म्हणून तुझी आठवण झाली आज. “ माझ्या हातावर हात ठेवत तो बोलला.

“ काय झालंय सांग.. उत्तर असेल तर नक्की देईन.. “ मी आश्वासकपणे बोललो.

त्याने उरलेला पेग घशाखाली रिता केला आणि बोलू लागला…

“ डॉक्टरांनी मला तिला शेवटचं भेटून घ्या सांगितल्यावर मी तिचा हात हातात घेऊन बसलो. ती नुसती डोळ्यांनी मला बघत होती. बोलण्याचीही ताकद नव्हती तिच्याकडे.

मी बोलायला सुरुवात केली…

या क्षणी मला तुला काहीतरी सांगायचे आहे.. एक असे सत्य जे मी इतकी वर्ष लपवून ठेवलंय.. सांगू ना?

तिने डोळ्यांनीच स्विकृती दिली.

मला तिच्या डोळ्यांची अचानक भीती वाटू लागली. मी माझे डोळे बंद केले. तिचा हात घट्ट धरला.. आणि बोलायला सुरुवात केली..

मी तुझा गुन्हेगार आहे… मला तू खूप आवडतं होतीस. पण आपल्यातले वयाचे अंतर आणि मी दिसायला अजिबात छान वगैरे नाही त्यामुळे आपली काहीच बरोबरी नव्हती. मला काही करून तू हवी होतीस. माझ्यातला हिंस्त्र पुरुष जागा झाला आणि मग एक दिवस तुला तुझ्या नकळत गुंगीच औषध दिले. आठवतंय ? त्या दिवशी घरी कोणी नव्हते तुमच्या. तू मैत्रिणीच्या घरी गेलेलीस. शेजारच्या काकूंनी डबा भरून दरवाजाजवळ ठेवला होता. त्यात मी ते औषध मिसळले. तू उशिरा आलीस आणि जेवायला बसलीस. दरवाजा बंद केलास पण कडी लावली नाहीस. सगळी चाळ झोपली होती. मी गुपचूप आलो.

तू जेवतानाच गुंगीत गेली होतीस.

माझा कार्यभाग आवरून मी पुन्हा जैसे थे करुन गुपचूप पुन्हा घरी गेलो.

नंतर जेव्हा तुझ्या गर्भारपणाची बातमी समजली तेव्हा मला राहवेना. परंतू सत्य सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी तुला मागणी घातली, मला तुम्ही सर्वांनी देवदूत केलंत, पण मनात काय होते हे कोणाला सांगता येत नव्हते. ते मूल दगावले तेव्हा तुला दुःख झाले नव्हते … पण मला झाले होते. त्यांनतर आपल्याला मुल झाले नाही हा त्या देवाचा मला शाप असावा…

एवढं बोलून मी तिच्याकडे पाहिलं.. ती कष्टप्रदपणे मंद हसली… तिने मला नजरेनेच जवळ यायची खूण केली. मी जवळ गेल्यावर तिने कानात काही सांगितले…”

तो क्षणभर थांबला हे पाहून मीच विचारले..

“ काय सांगितले? “

तो बोलु लागला…

“ ती पुटपुटली… तुम्ही चूक केलीतच… पण त्या रात्री मी मैत्रिणीकडे नव्हती गेली… ते पाप तुमचे नव्हते…. एवढे बोलून ती शांत झाली..कायमची ..”

मी सर्द झालो..काही मिनिटे स्तब्धतेत गेल्यावर कसाबसा बोललो

“ तुला मला काय विचारायचंय ? “

“ नेमकी शिक्षा कोणाला आहे या सर्वात?” त्याने ग्लास टेबलावर आपटत विचारले.

“ बघ नियतीचा हा क्रुर खेळ आहे.

तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तुला नियतीनेच दिलीय… वहिनींनाही कमी आयुष्य मिळाले हे त्यांची शिक्षा .. तुम्हा दोघांना मूल बाळ नाही ही एकत्रीत शिक्षा… आणि… “ मी बोलायचा थांबलो आणि तसाच तडक उठलो.

“ आणि…??  आणि काय? “ तो तारवटलेल्या डोळ्यांनी मला विचारत होता.

“ आणि काही नाही … तू भोग ती शिक्षा आता जन्मभर.. “ मी तिथून निघून बाहेर आलो…

माझी शिक्षा भोगायला…

गेले बावीस वर्ष गुपित ठेवलेली गोष्ट तिने याला का सांगितली याचा विचार करणे ही सुद्धा एक शिक्षाच होती. तिचा शाप मलाही लागला होताच. मी ही तिने म्हटल्याप्रमाणे अविवाहीत राहिलो होतो. तिला फसवल्याची शिक्षा मी भोगत होतोच.