Saturday, 2 February 2019

पाऊस कोसळताना

….. पाऊस कोसळताना …..



कॉलेजच्या पहिल्याच दिवशी इतका धुवांधार पाऊस येईल असे जय ला अजिबात वाटले नव्हते. त्याने छत्री, रेनकोट काहीच आणले नव्हते. हातातली नवी कोरी वही भिजू नये यासाठी प्रयत्नशील होता. कॉलेजपासून स्टेशन जरी ५ मिनिटांवर असले तरी कुठेही थांबण्यासारखी जागा नसल्याने तो पुढे जाऊही शकत नव्हता.
वेगाने कोसळणारा पाऊस कधी संपेल असे त्याला झालं होतं…
पहिल्या पावसाचा सुगंध त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करत होत्या, पण तरीही त्याला घरी जायची ओढ होती.

त्याच्या कॉलेजच्या मागच्याच बाजूला थोडे चालले की मुंबईचा प्रसिद्ध असा मरीन ड्राईव्ह होता. कॉलेज सुटल्यावर कधी कधी तो एकटाच जाऊन समुद्राकडे बघत बसलेला असायचा. समुद्राच्या अथांगपणाचे त्याला नेहमी कौतुक असायचे.

पावसाची सर जरा कमी झाली म्हणून त्याने समोर दूरवर दिसणाऱ्या चहाच्या टपरीचा आधार घ्यायचे ठरवले.
धावत धावत हातातली वही वाचवत तो त्या शेड मध्ये घुसणार तोच समोरून त्याच्याच वयाची तरुणी तितक्याच वेगाने पावसापासून वाचण्यासाठी येताना दिसली.
ती आली आणि त्याला पाठमोरी उभी राहीली. चेहरा बघायला ही नाही मिळाला.. ती पूर्ण भिजली होती. अंगावरचा फिक्कट गुलाबी पंजाबी ड्रेस तिच्या अंगाला पूर्ण चिकटला होता.
त्या शेडमध्ये चहावाला, तो आणि ती असे तिघेच होते.
जय तिच्याकडे बघतोय हे बघून चहावाल्याने पळी पातेल्यावर घासली.

“ बोलो भाय.. चाय दुं? कटिंग सिर्फ तीन रुपये की है. “ आयते चालून आलेले गिऱ्हाईक तो सोडणार नव्हता.

“ दो कटिंग..
और भैया... रेडिओ लगाओ ना” आपला भिजलेला दुपट्टा पिळून कोरडा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या तरुणीच्या पाठीवरची नजर न हटवता तो बोलून गेला.
रेडिओ वर गाणे सुरू होते.

“ बादल युं गरजता है..
डर कुछ ऐसा लगता है…”

जयचे डोळे चमकले. इतके रोमँटिक गाणे .. व्वा...

तिने तिच्या केसांची क्लिप काढली आणि केस मोकळे सोडले. तिच्या केसांवरून ओघळणारे पाणी तिच्या पाठीवरच सुळकन घसरून तिच्या ड्रेसला अधिकच पारदर्शक करत होते.

“ लो भैया .. आपकी दो कटिंग.. “ दोन ग्लास समोर ठेवत चहावाल्याने रेडिओचा आवाज अजून थोडा वाढवला.

“ अरे दोन कटिंग कोणाला? “ जय त्रासून बोलला.

“ आप ही तो बोले ना दो कटिंग? मॅडमजी आपके साथ ही है ना? “ चहावाल्याने स्टोव्ह ची चावी उघडली.

“अरे मैने कटिंग दो ऐसे बोला. दो कटिंग का मतलब कटिंग दो. “ कप्पाळाला हात लावत त्याने मान हलवली.

“ भैया एक कटिंग देना… “ तिकडून त्या तरुणीचा आवाज आला.  तो आवाज त्याने कधीतरी ऐकल्यासारखा वाटला म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं.

तो बघतच राहिला….

“ तू? खरंच तू आहेस? माझा विश्वासच बसत नाहीये. काय योगायोग आहे हा.” जयचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना.

“अरे…. जय … तू? तू इथे काय करतोय? “ माधुरीलाही तो धक्काच होता.

दोघेही एकमेकांकडे बघून गोड हसले.

“ मी मित्रांसोबत आलेलो इकडे.”  त्याने तिच्या डोळ्यात बघत सांगितले.

“ आणि मैत्रिणी? “ किंचितशी आठी तिच्या कपाळावर दिसली.

“ त्या कुठे असतात आमच्यासोबत? आमच्या ग्रुपमध्ये मुलींना एंट्रीच नाही. “ तिच्या कपाळावरची आठी हळूहळू नाहीशी होताना बघणे त्याच्यासाठी खुप छान होते.

“ हो का? छान हं.
चहा घेऊया? झाली असावी आता थंड. तू पण माझ्यासारखी साधारण थंड झाली की मगच चहा पितोस ना? “ एक कप उचलत तिने दुसरा कप त्याच्या हातात दिला.

हलकासा स्पर्श झाला बोटांचा... एक गोड शिरशिरी दोघांच्याही अंगात आली.

चहावाल्याच्या रेडिओवर गाणे सुरूच होते..

तौबा हुस्न-ए-यार, बदले रंग हज़ार
शर्म कभी आती है और कभी आता है प्यार
देखें कौन ठहरता है….

माधुरीने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडेच बघत होता…. तिच्या डोळ्यातच.

“ आता तू काय करणार ?”  माधुरीने विचारलं.

“ मी खरंतर घरी जाणार होतो.
पण आता मला ना मरीन ड्राईव्ह च्या कट्टयावरून चालावेसे वाटतंय.
आणि त्यातही कोणी सोबत येणार असेल तर वेल अँड गुड. “ त्याचे सूचक बोलणे तिला समजणे तसं कठीण नव्हतंच.

“अरे हां…
ती बघ... तिला विचार.. ती येईल तुझ्यासोबत चालायला.” त्याच्या मागे बोट दाखवून ती पटकन बोलली.

त्यानेही वेड्यासारखं मागे वळून पाहिलं.
तिथे कोणीच नव्हतं.
जीभ चावून त्याने पुन्हा पुढे बघितलं.
माधुरी हसत होती.

“ तू ना...
जाऊया ना? “ त्याचे आर्जवयुक्त डोळे बघून ती नाही म्हणूच शकत नव्हती आणि ती नाही म्हणणारच नव्हती.

“ जाऊया….
पण…. “ ती अचानक थांबली.

“ आता काय पण बिण? त्याच्या कपाळावर आठी आली.

“ आधी ती आठी घालव. ऐकून घेण्याआधीच रिऍक्ट होणे खूप वाईट जय. “ एक बोट वर करून ती सांगत होती.

“ हम्म … बोला काय आहे पण?
हा पण ही जिंकतो मी म्हणजे झालं?” आता तो ही शब्दांशी खेळू लागला.

“ व्हेरी स्मार्ट हं… मी म्हणत होते जाऊया...पण
 हे चहाचे कप या चहावाल्याला रिटर्न देऊया ना? उगाच त्याचे नुकसान कशाला?” बोलताच क्षणी ती खळखळून हसली.

चहाचा रिकामा कप आणि पैसे देत त्याने लटक्या रागाने तिच्याकडे पाहिलं.

“ चला… आज पाऊस कोसळणार आहे बहुतेक माझ्यावर ?” तो गालातल्या गालात हसत बोलला.

“ पाऊस कोसळेलच पण तो कोसळताना मी तुझ्यासोबत नेहमी असावे असे तुला वाटतं का रे? “ तिचा प्रश्न खूप सरळ होता.

“ मला वाटून काय होणार आहे? निर्णय घेणे तुझ्याच हातात आहे नेहमी. तुला वाटलं तरच आपण आयुष्यातले सर्व पावसाळे एकत्र भिजू...कळतंय ना तुला? “ त्याच्या डोळ्यात प्रश्न होते.

“ तुझी वही भिजेल. “ प्रश्नांना बगल देत ती चालू लागली.

“ भिजू दे...या वहीत अजून काहीच लिहिलेले नाही. एकदम कोरी आहे ती. “ त्याने वही शर्टाच्या आत टाकली.

“ बापरे.. ती लाट बघ ना किती मोठी आहे. मला अशा लाटांची खूप भीती वाटते. “ तिने डोळे मोठे करत सांगितलं.

“ अशी भीती वाटली की मग कशाचा तरी, कोणाचा तरी आधार घ्यायचा. एखादा हात असेल तर तो पकडायचा, म्हणजे भीती वाटत नाही. “ मिश्किल बोलत तो मंद मंद हसला.

“ असं आहे का? पुन्हा भीती वाटली की शोधेन कोणी सापडते का. “ ती हसू लागली.

“ चल आता. “ त्याने पुढे केलेला हात मागे घेतला.

पाऊस वाढतच होता. दुपार असूनही संध्याकाळ असावी असा काळोख झाला होता. पावसाळा आणि चालू दिवस असल्याने मरीन ड्राईव्ह सुनसान होते. कठड्यावर एक दोन प्रेमी युगुलं दिसत होती. पण ती एकमेकांत गुंग होती.

“ नरीमन पॉईंट पर्यंत जाऊया ना? “ जय ने विचारलं.

“ चलो दिलदार चलो.. चांद के पार चलो… हे गाणं ऐकलं आहेस तू? “ पुन्हा हसू फुटलं.

“ हो.. पण चंद्र आकाशात असतो..आणि आपल्याला उडता येत नाही त्यामुळे आपण नरिमन पॉईंट पर्यंतच विचार करुया का सध्या? “ तो ही हसत होता.

“ चालेल.. तू ना गुंडू आहेस..” ती आता छान खुलली होती.

“ गुंडू? हे काय असतं ? “ तो बुचकळ्यात पडला.

“ असतं काहीतरी.. जो खूप गोड असतो, हवाहवासा वाटतो तो गुंडू असतो.. कळलं? “ हे बोलत असताना अचानक तिने घाबरून त्याचे मनगट पकडले. काही समजण्या आतच त्यांच्यावर कठड्यावरून उडालेल्या लाटेचे पाणी येऊन पडले.
दोघेही चिंब भिजले.
तिचा गुलाबी ड्रेस त्याला अजूनच गुलाबी दिसू लागला. तिने त्याचे मनगट अजूनही धरले होते.

“मिळाला आधार? “ गोड हसत त्याने विचारलं.

तिचे गाल आरक्त झाले.
पाऊस जोरात सुरू झाला.
त्याने तिचा हात मनगटावरुन सोडवला आणि बोटात बोटं गुंफली.
एक अनामिक थरथर तिच्या हातात होती.

“ हा हात असा माझ्या हातात नेहमी देशील? “ त्याने तिच्या भुवयांवरून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या पडद्याआड असणाऱ्या त्याच्यासाठी जगातील सर्वात सुंदर डोळ्यांवर नजर खिळवत विचारलं.

“ इच्छा तीच आहे रे…
पण तुला माझी अडचण माहीत आहे ना? सगळंच माझ्या हातात नाही राहिलंय रे “ तिची बोटं काहीशी सैल झाली.
त्याने पुन्हा हात घट्ट केला.
तितक्यात जोरदार वीज कडाडली….

“ जय… आय लव यु… “ म्हणत तिने त्याला मिठी मारली.
तो ही स्तब्ध झाला.
अगदीच अनपेक्षित अशी गोष्ट घडली होती.
दोघांनाही हे असे काही होईल याची अपेक्षाही नव्हती.

“ मधू… आय लव यु टू..” तिची मिठी हळूहळू सैल झाली.

ती भानावर आली. ते नरीमन पॉईंटच्या टोकावर उभे होते.
समुद्रला उधाण आले होते. वरून पाऊस तुफान कोसळत होता.
दोन्ही मनात काहूर माजले होतं.
जयने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि घट्ट पकडले.

“ मला तू कायमची हवीस…” त्याच्या डोळ्यात अश्रू होते हे तिलाही कळलं.

“ मलाही … पण…” तिने हात सोडवला.

“ जाऊया आपण आता घरी? “ तिने नजर चोरत विचारले.

“ चल...मी हात पकडू पुन्हा? “ त्याने अपेक्षेने विचारलं.

“ नको.. कोणी पाहिले तर प्रॉब्लेम होईल आपल्याला. आता चालतानाही आपण पुढे मागे चालू. एकत्र नको.. “ तिचा चेहरा हिरमुसला होता.

“ मला जन्मभर तुझ्या सोबतीने चालायचे आहे.
पुढे मागे नाही. “ तो काकुळतीने बोलला.

“ बघू… “ तिने नजर समुद्राच्या दिशेने वळवली.

तो ही मग गप्प झाला.

“ आईला काय सांगशील घरी जाऊन? “ उगाच केलेला प्रश्न होता तो.

“ सांगेन आज पाऊस खूप कोसळला… ढगातून आणि डोळ्यातुनही..” ती पुढे चालू लागली.

त्यांच्यात दोन पावलांचे अंतर होते

“ ऐक ना… हे दोन पावलांचे अंतर तुलाच कमी करता येईल. हो ना? “ त्याच्या या बोलण्यावर ती क्षणभर थांबली.

“ कधी ना कधी हे होईलच… आपल्या प्रेमाचे आभाळ दाटून आलंय रे… पाऊसही कोसळेल.. फक्त त्याला काही वेळ हवाय.. “ ती पुन्हा चालू लागली.
बघता बघता त्याचे घर दिसू लागले.
ती थांबली..

“ मी सकाळी फोनची वाट बघेन तुझ्या… रोज सारखी ...करशील ना? “ आता तिच्या चेहऱ्यावर मघाचे हसू होते.

तो ही मग खिन्न हसला…
“ नक्की नेहमीप्रमाणे आपले बोलणे कधी संपेल का? “

“ मी जाते … “ त्याच्याकडे न बघता ती झपझप चालत गेली..

“ जाते नाही येते बोलायचे असते…. “ पण ती त्याच्या आवाज ऐकण्याच्या पलीकडे गेली होती.

पाऊस अजुनही कोसळत होता..
आभाळातून आणि त्याच्या डोळ्यातूनही.
- बिझ सं जय ( SM )