….. सखे शेजारीणी …..
अगदी दुसऱ्या रिंगला त्याने फोन उचलला.
“ ऐक ना….
शेजारी जे कुटुंब होते ते आठ दिवसांनी सोडून जाणार आहे.
नवीन भाडेकरू पण मिळालाय मालकाला. कोण आहे, काय आहे काही माहीत नाही
पण कुटुंब नाही हे नक्की. “ तिला कधी एकदा ही बातमी त्याला सांगेन असे झालेलं.
“ शी यार… एकटा भाडेकरू तोही तुझ्या घरासमोर.. मला इनसिक्युरिटी फीलिंग यायला लागलीय. तो तुझ्याकडे बघत राहणार. नाही म्हटलं तरी तुझेही लक्ष त्याच्याकडे जाणारच ना? जुने शेजारी होते तेच बरे होते. “ त्याच्या आवाजात हिरमुसलेपणा होता.
“ गप रे… तुला माहीत आहे, मी फक्त तुझाच विचार करते बाकी कोणी सलमान येऊ दे की मग हृतिक मला कोणाचाही काही फरक पडत नाही. “ थोड्या रागाने ती बोलली.
“ हो माहीत आहे गं मला.. पण तरीही.. मला वाटतं की तुला तो आवडला तर? भीती वाटतेच ना मला.
एकतर आपण किती प्रयत्नानंतर एकत्र आलोय पुन्हा.
आता पुन्हा दुरावा नकोय मला. “ तो थोडा गंभीर झाला.
“ हे बघ..
मी तुझ्यावर प्रेम करते..आणि मरेपर्यंत असेच करत राहणार आहे. आपल्यात दुरावा अशक्य आहे. कळलं तुला?” ती रागात बोलली.
“ हो गं राणू.. पण मला सांग नवीन शेजाऱ्याशी बोलशील की नाही ? तुझ्याशी लोक बोलले की तुझ्या प्रेमातच पडतात. मग हा नवीन शेजारी त्याला अपवाद असणार आहे का? “ आता तो मिश्किल बोलत होता.
“ मला कळतंय…. छळतोय ना तू मला?
बघ आता तो जो कोणी असेल त्याच्याकडे मी बघणार पण नाही. “ तिने ठामपणे सांगितलं.
“ काय माहीत ? उद्या त्याने तुला प्रेमात पाडलं म्हणजे? आणि तू प्रेमात पडलीस तर?
हाय राम….मैं तो बरबाद हो जाऊंगा… “ आता तो नाटकी झाला होता.
“ फालतूगिरी करणार असशील तर मी नाही बोलणार जा. बाय ठेवते मी.” असे लटक्या रागाने बोलून तिने फोन कट केला.
त्याने हसत हसत फोन खिशात ठेवला.
चार दिवसांनी जुने शेजारी गेले. नवीन पत्ता तिला देऊन पूजेचे निमंत्रण ही दिले.
अगदी दुसऱ्याच दिवशी घराचे काम सुरू झाले.
या दोघांचा रोज फोन होत होता.
आज काय चाललंय समोरच्या घरात हे ती नित्यनियमाने त्याला सांगत होती. आज रंग पूर्ण झाला, आज फर्निचर आले वगैरे बातम्या ती त्याला देत होती.
“ असं नाही वाटत तुला तुझ्या नवीन शेजाऱ्यात जरा जास्तच इंटरेस्ट आहे? तरी अजून तो तिथे आलाही नाही.आल्यावर काय काय ऐकावे लागेल काय माहीत. “ तो हसत होता.
“ हे बघ ..तो काळा आहे की गोरा हेही मला माहीत नाही. आणि ते करून घ्यायची इच्छा ही नाही. यापुढे मी त्याचा विषय काढणारच नाही. तू उगाच काहीही तर्क लावत बसतोस. “ ती आता खरोखरच चिडली होती.
“ चिडू नको गं राणू.. उद्या येतोयच ना? बघ कसा आहे तो. शेजारीण म्हणून थोडीफार मदत करायला हरकत नाही. नवीन जागेत गरज पडते. फक्त जास्त लक्ष देऊ नकोस … नाहीतर तो वेडा होईल. “ त्याचा मस्करीचा मूड होता.
“ तुला दुसरं काही सुचत नाही का? मला सांग उद्या रविवार आहे तर तू येशील घरी? खुप दिवस आपण भेटलो ही नाही. एकत्र कॉफी पण घेऊन महिना झाला असेल.” आता ती थोडी नरमली होती.
“ अच्छा…. असं सांग ना की तुला तुझा नवीन शेजारी मला दाखवायचा आहे..” तो जोराने हसला.
“ जा तू…. नको येऊ जा.. मी त्या नवीन शेजाऱ्यासोबतच कॉफी पिते की नाही बघच. आणि सेल्फी काढून तुला मुद्दाम पाठवेन. रहा मग तिकडे जळत. “ तिने फोन ठेवला.
सकाळी नऊ वाजता तिच्या घराची बेल वाजली.
तिने दरवाजा उघडला.
समोर नवीनच कोणीतरी माणूस होता.
“ एक बकेट पानी मिलेगा मॅडम?. क्या है ..अभी साहब आये नही तब तक साफसफाई कर लेता हुं. “ त्याच्या अवताराकडे बघून ती आधी घाबरलीच होती.
हा शेजारी येतोय की काय? असा विचार करून ती घाबरलीच.
तिने काही न बोलता बादली भर पाणी दिले.
काम पूर्ण झाल्यानंतर तिनेही ते घर पाहिलं नव्हतं.
तो माणूस लादी पुसत होता. हे बघून तिने त्या उघड्या दरवाजातून डोकावले.
खुप सुंदर घर सजवले होते.
अगदी नीटनेटके आणि सुटसुटीत.
तिने त्या काम करणाऱ्या माणसाला विचारले.
“ कौन हे साहब तुम्हारे? नाम क्या हैं उनका? “ तिला नाही म्हटलं तरी कुतूहल होतेच.
“ मॅडम जी हम तो काँन्ट्रॅक्टर के पास काम करनेवाले आदमी हमे कहां साहब का नाम पता? “ फडके बादलीत पिळत त्याने सांगितलं.
इतक्यात मागे चाहूल झाली.
तो तिच्या घराच्या दरवाजात उभा होता.
तिला त्या समोरच्या घरात उभे बघून त्याने भुवई वर केली.
“ आले… “ म्हणून ती लगेच घरात गेली . तिच्या पाठोपाठ तो ही गेला.
“ काय म्हणत होतीस तू? नवीन शेजारी कसा आहे हे जाणून घ्यायची ही इच्छा नव्हती ना? पण तू तर त्याच्या चक्क घरातच होतीस. “ त्याने भुवई अजून उंचावली.
“ अरे तो साफसफाई करणारा माणूस होता. राहायला येणारा माणूस अजून आलाच नाहीये. “ तिने लागलीच स्पष्टीकरण देऊन टाकले.
“ बरं कॉफी आता प्यायचीय की नवीन शेजारी आल्यावर? “ त्याने कपाळावर आठ्या आणत विचारले.
“ हो त्याला येऊ दे
मी जेवण पण करणार आहे त्याच्यासाठी. एकटा बिचारा पहिल्या दिवशी कुठे जेवण करेल ना? शेजारधर्म पाळायला हवा ना? “ ती गालातल्या गालात हसत बोलली.
“ याला .जले पर नमक छिडकना म्हणतात. “ तो वैतागला.
“ बरं मला सांग तुला कॉफीत किती चमचे मीठ टाकू? “ ती अजूनच जोराने हसली.
“ टाक बरणी भर..
आणि शेजाऱ्याची कॉफी गोड कर हां…” त्याचा चढणारा राग बघून तिला हसायला येत होतं.
पुन्हा बेल वाजली.
त्याने दरवाजा उघडला
“ साहब मॅडम से यह बकेट लेके गया था.. चाबी आपके घर मे रखने को बोला हैं “ बादली आणि चावी सोपवून तो निघून गेला.
“ घ्या तुमच्या शेजाऱ्याने चावी पण दिलीय स्वतःच्या घराची. तीही ओळख नसताना.. ग्रेट आहे शेजारी. “ त्याच्या कपाळावरच्या आठ्या अजूनच वाढत होत्या.
“ अरे इकडे करतात तसे . त्यात काय एवढं?
घे तुझी कॉफी ...म्हणजे जरा त्या आठ्या कमी होतील.” कॉफीचा मग समोर ठेऊन ती त्याच्या चेहऱ्याकडे हसून बघत होती.
कॉफी पिताना तो अचानक बोलला.
“ ऐक ना...चावी आपल्याकडे आहे तर चल ना घर बघून घेऊ त्याचे.” त्याच्या चेहऱ्यावर खट्याळपणा होता.
“ काहीतरी काय? आणि आपण आत असताना नेमका तो आला तर? कसे वाटेल ते? नको.. तो आला की जाऊ आपण विथ हिज परमिशन. “ तिचे ही बरोबर होते.
“ नाही येणार कोणी.
चल ना नुसतं बघून तर यायचं आहे. आपल्याला कुठे वस्तुंना हात लावायचा आहे. चल चल…” असे म्हणत त्याने तिचा हात धरून तिला बाहेर नेले.
दरवाजा उघडला ती नको नको बोलत होती.
पण त्याने ऐकलं नाही.
“ व्वा काय सुंदर ना… असं वाटतंय मी इथेच रहावे. रंग काय सुंदर निवडलाय...आणि फर्निचर पण बघ ना किती सुरेख आहे.” तो घराची तारीफ करत होता. तिचे लक्ष मात्र दरवाज्याकडे.
“ हे असे झाकून का ठेवलंय? “ सोफ्यावर ठेवलेले प्लॅस्टिक हटवत तो बोलला.
“ अरे ...काय करतोयस तू? कशाला ते प्लॅस्टिक काढलं?” तिला भीती वाटत होती.
“ चल बेडरूम बघुया कशी आहे ती. “ त्याने डोळा मारला.
“ जा तूच .. मी चालली घरी.. काय मूर्खपणा चालवला आहेस? “ ती दरवाज्यापर्यंत पोहचली पण.
तो बेडरूममध्ये गेला होता.
“ ये ना लवकर… हे बघ काय आहे इथे.. मस्तच आहे ये लवकर. “ तो मोठ्याने हाक मारत होता.
“ ऐक मी जातेय. तू पुढच्या दोन मिनिटात नाही आलास तर मी माझ्या घराचाही दरवाजा लावून घेईन. कळलं? “ ती दरवाज्यातून बाहेर पडली.
“ आणि मी तरीही नाही आलो तर? “ तो हसत बोलला.
“ मग काय इथेच राहणार आहेस ? “ मागे वळून चिडून ती बोलली.
“ इफ यु विश टु…. मी म्हटलं ना तू तुझ्या नवीन शेजाऱ्यावर प्रेम करशील… चल मी तुला परवानगी देतो.. करच त्याच्यावर प्रेम… “ त्याला खूपच हसायला येत होते.
“ डोकं ठिकाणावर आहे का?
की कॉफी चढलीय तुला? काय संबंध त्या अजूनही न पाहिलेल्या माणसाचा आणि माझा? आणि मी त्याच्यावर प्रेम करू असे तुला वाटतं? हेच का तुझे माझ्यावरचं प्रेम? “ आता आठ्या तिच्या कपाळावर होत्या.
“ अगं माझे सखे शेजारीणी.. कशी आहेस ना तू…
स्लो मोशन माझी ती… अजून नाही कळलं? “ त्याला हसू आवरता आवरत नव्हते.
“ काय कळायचं आहे?
एक मिनिट….एक मिनिट.....
यु मिन..
म्हणजे….?
डोन्ट टेल मी…
म्हणजे तो तू आहेस?
माझा नवीन शेजारी? “ तिला आता जाऊन कोडे सुटलं होतं.
“ लवकर कळलं तुला.. “ त्याने हात पुढे केला.
“ तू खरंच इथे राहणार? बरा आहेस ना? “ तिच्या चेहऱ्यावर हळूहळू हसू येत होते.
“ आता तुला करारनामा दाखवू का? “ त्याने तिचा हात हातात गुंफला.
“ अरे पण इतके सिक्रेट का ठेवलंस? “ तिला विश्वास बसतच नव्हता.
“ तुला सरप्राईज द्यायचे होते… चल आता बेडरूममध्ये…” त्याने तिच्या कमरेत हात घातला.
“ बेडरूममध्ये कशाला? “ तिच्याही चेहऱ्यावर मिश्किल भाव होते.
“ करारनामा वाचून दाखवतो चल…” गालातल्या गालात हसत बोलला.
“ थांब माझ्या घराचे दार तर लावून येऊ दे आधी. “ म्हणून ती घराबाहेर गेली आणि लगेच आली दरवाजा बंद करून.
तिचा हसणारा चेहरा बघून तो गाऊ लागला….
“ सखे शेजारीणी…
तू हसत रहा… हसत रहा….”
- बिझ सं जय ( २३ मार्च २०१९ )