Monday, 26 March 2018

चॉकलेट


तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.
ट्रेन निघायला आता फक्त दहा मिनिटेच उरली होती.
तो अजून आला नव्हता…

तिने स्वतःला हजारो वेळा विचारलेला प्रश्न अजून एकदा विचारला.

“ मी चूक तर करत नाही ना ?”

या प्रश्नाचे उत्तर दरवेळी तिला दुःख भोगून झाल्यावर “ हो “ असेच मिळाले होते.

आणि याच्यावर तर विश्वास ठेवावा की न ठेवावा? याच प्रश्नात ती गेले दहा वर्ष अडकली होती. तिचे मन आणि मेंदू परस्पर विरोधी निकाल देत होते.
कुटुंब … दोघांनाही होती. दोघांचेही जोडीदार आता या जगात नव्हते. होती ती फक्त जबाबदारी.. ती ही मुलांप्रती.... जी मुलं आता स्वतःच्या पायावर उभी होती.

काल जे ठरले त्याप्रमाणे कोणतीही आठवण, कोणतीही वस्तू अगदी मोबाईल सुध्दा सोबत न घेता यायचे होते. त्यामुळे संपर्क करायला काहीच वाव नव्हता. तो येईलच असे तिचे मन तिला आतून सांगत होते. पण शेवटी त्याची परिस्थिती बघता तो सर्व सोडून कसा येईल हा मोठा प्रश्न तिला पडला होता. मोठा बंगला, नोकर चाकर, एवढी संपत्ती, त्याच्यावर प्रेम करणारी त्याची माणसे या सर्वांना सोडून तो येईल या बद्दल तिचे मन साशंक होतेच ..अगदी पूर्वीपासूनच.

आपण एकत्र संसार करु शकलो नाही, एकत्र जगू शकलो नाही… पण मरताना तरी एकत्र मरायचे … हे त्याचे शब्द तिला त्याच्या अजूनच प्रेमात पाडत होते.

पहिल्यांदा जेव्हा तो तिला भेटला तेव्हा तिचे लग्न ठरले होते. खूप वाटत होते तिला, की जगाला ओरडून सांगावे की मला याच्याशी लग्न करायचंय, याच्या सोबत संसार करायचाय, हाच माझ्यासाठी योग्य आहे.
पण लोक काय म्हणतील? घरचे तयार होतील का? होणारा नवरा काय करेल ? या आणि अशा असंख्य प्रश्नांनी तिला जखडून ठेवले आणि मग तिची अडचण त्यानेच घालवली. स्वतः दूर होऊन.

तो दूर होताना इतका वाईट झाला की तिला त्याचा विसरच पडला. तो मात्र तिच्या आठवणी जगत राहिला.
तिचा संसार… नवऱ्याचा स्वभाव, मुलं, सांसारिक अडचणी यातून स्थिर होता होता पंधरा वीस वर्ष गेली.

सर्व काही जवळ असताना काहीतरी बाकी राहिलंय ही भावना तिला सतत जाणवत होती. आयुष्य सुरेख होते पण अपूर्ण होते. ज्या अपेक्षा नवऱ्याकडून होत्या त्या त्याच्या विक्षिप्त स्वभावाने भंग पावल्या होत्या. ती जी कमी होती मानसिक आधाराची ती मात्र नेहमीच तिला जाणवत होती.

अशावेळी तो नेमका पुन्हा आला. खळखळणाऱ्या झऱ्यासारखा, पूर्वी होता त्यापेक्षा अगदी वेगळा. त्यावेळी तो काहीसा अबोल आणि स्वतःच्या विश्वात राहणारा होता. आता मात्र तो अधिक मोकळा. सर्वांशी भरभरून बोलणारा होता. फरक होतो माणसात पण एवढा?
अर्थात त्यामुळे ती साशंक झाली.
प्रेम तिचेही होते आणि त्याचेही. फक्त ते सुप्तावस्थेत गेले होते. पुनर्भेटीने तेच प्रेम अधिक प्रकर्षाने जागृत झाले आणि व्यक्त ही झाले.
ती भेटल्यावर मात्र तो स्वतःला बदलू लागला. त्याने इतकी वर्षे चढवलेला हसरा मुखवटा आपोआप गळून पडला. अश्रूंच्या पावसात दोघेही न्हाऊन निघाले.
दोघेही समजूतदार होते. दोघांची कुटुंब होती, जबाबदाऱ्या होत्या.
त्या पूर्ण करूनच एकत्र यायचे हे त्याचे म्हणणे तिलाही मान्य झाले.

त्यांचे एकत्र येणे हे समाज, कुटूंब कधीच स्विकारणार नाही हे दोघांनाही माहीत होते. मग एकत्र येण्यासाठी हा समाज आणि हे कुटुंबच सोडून दूर कुठेतरी जाऊ आणि नवीन आयुष्य जगू असं दोघांनी मिळून ठरवलं…

त्या आयुष्याची सुरुवात करतानाचा आज पहिला दिवस.
ती अगदी वेळेत पोहचली होती.
त्याचा पत्ता नव्हता.
ट्रेनमध्ये तुरळक माणसे होती.
हळूहळू पैसे साठवून दोघांनी लांबवर एक घर, थोडी जमीन घेतली होती.  तिथेच जाण्यासाठी ती त्याची वाट बघत होती.

तिने मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. गाडी सुटायला फक्त तीन मिनिटेच राहिली होती.

“ मी पुन्हा चूक केली… हा नाही येणार बहुतेक. माझ्या मनाचे ऐकलं तेच चुकीचं. माझा मेंदू नेहमीच सांगत होता की याचे काही खरं नाही. पहिल्यावेळी याने कच खाल्ली. दुसऱ्यावेळी आता नाही... नंतर असे बोलून ही वीस वर्ष वाया घालवली. आता काय करायचंय सोबत जगून? नुसत मरायला ? अरे मला तुझ्यासोबत जगायचे होते. त्यासाठी मी जगले. तू मात्र नुसत्या आशेवर ठेवलंस मला. तुझ्यावरच्या प्रेमासाठी मनात दुःख ठेऊन सुखाचा संसार गाडा हाकला. एकच आशा की कधी ना कधी तू माझा होशील. देव गाठी वर स्वर्गात बांधत असतो. आपली गाठ नव्हतीच म्हणून सारखी सुटत राहीली.. गाठ ही आणि तुझी साथ ही….
आता मी कुठे जाणार हे कोणालाच माहीत नाही. ते शोधाशोध करतील. कोणत्या तोंडाने घरी जाऊ पुन्हा?
तू फसवलंस मला….
नाही करत मी तुझ्यावर प्रेम अजिबात.. आय हेट यू… “
.
.
.
.
.
.
तिची विचारांची तंद्री अचानक तुटली ..
तिच्या खांद्यावर हात पडला….
.
.
“बट... आय लव्ह यू… डार्लिंग…”

तो उभा होता हातात एक भले मोठे चॉकलेट घेऊन…त्याच्या गोड हास्यासोबत .

“ अरे… काय तू? किती उशीर? मला वाटलं यावेळीही तू येत नाहीस..” त्याच्याकडे रागाने बघत ती बोलली.

“ राणी.. अरे. अगदी प्लॅटफॉर्मवर आलो आणि लक्षात आले की चॉकलेट घेतलेच नाही आपल्यासाठी. तुला आणि मला चॉकलेट भरपूर आवडतात. आता नवीन आयुष्याची सुरुवात करायची म्हणजे तोंड गोड करायलाच हवे ना? “ त्याने हातातली छोटी बॅग सीटखाली सरकवली.

“ अरे पण चॉकलेट साठी कशाला धावपळ केलीस? गाडी सुटली असती म्हणजे? “ ती चिडून बोलली.

“गाडी एकदा सुटते… दोनदा सुटते.. नेहमी नाही… आता आलोय ना? रागावू नको ना.. हस की आता “ तिच्या रागाने फुगलेल्या नाकावर अलगद टिचकी मारत तो तिच्या बाजूला बसला…..

इतका वेळ तिच्या मनात चाललेले द्वंद्व एका क्षणात संपले होते.

“ चल पळूया… आता… नव्या आयुष्याकडे.. जिथे तुला आणि मला कोणीच दूर करु शकणार नाही. “ मिश्किलपणे हसत त्याने चॉकलेट उघडले.
तिने त्याचा हात हातात घेऊन बोटं गुंफली आणि म्हणाली …

“चल… आता हा हात माझ्या हातातून कधीच सुटणार नाही…”

एक हलकासा झटका लागला……

आणि गाडी सुटली….

Friday, 16 March 2018

राक्षस

….. राक्षस …..

आज रात्री जेवून खाऊन मिटिंग असल्याची तीन वेळा वाजणारी घंटा झाली. गावात एकच चर्चा होती…..

“ मोऱ्याच्या पोरीला, नंदीला शांतारामने मिठी मारली”

ज्याला कळत होते तोही बोलत होता आणि ज्याला कळत नव्हते असे शेंबडे पोर ही हेच बोलत होते.

किस्सा असा होता की, शांताराम हा गावी राहून मिळेल ते काम करणारा एका पक्षाचा कार्यकर्ता. घरात बायको दोन मुलं, आई बाप यांना पोसणारा हा तगडा गडी. सकाळी तालुक्याला जात असताना पाण्यावरून दोन हंडे पाणी घेऊन येणाऱ्या मोऱ्याच्या नंदीला त्याने पाहिलं. तिच्या सौंदर्याने अगोदरच घायाळ असलेल्या शांतारामचे ते ओलेते सौंदर्य पाहून भान सुटले आणि तिला समोरुन जाऊन मिठी मारली. भांबावलेली नंदी मात्र कशीबशी त्याची मिठी सोडवून ,दोन्ही हंडे तिथेच टाकून रडत रडत घरी गेली. दोन तीन बायकांसमोर हा प्रकार झाल्याने बातमी गावात पसरायला वेळ लागला नाही.

दोन दिवस तालुक्यात राहून शांताराम आज घरी आला होता. तास दिड तास यथेच्छ शिव्या शाप ऐकून शेवटी शांतारामने लक्ष्मीसमोर हात जोडले.

“आता चूक तर झाली . काय करू ते सांग आता ? “ खालमानेने शांताराम बोलला.

“मी काय सांगू? भावकीच्या दोन आणि गावकीच्या तीन मिटींगी झाल्या. तुम्ही लपून बसलात तालुक्याला. दोन दिवस काय भोगलंय ते तुम्हाला काय माहीत?

आता पंचात विषय गेलाय. सगळ्या गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीत. मुलांनाही घराबाहेर जाता येत नाही.

आता जे काही होईल ते पंचातच होईल आणि त्यात तुम्ही जास्त बोलू नका . पंच देतील तो निर्णय मान्य करा. जो काय दंड असेल तो भरून टाका. मी समजावेन नंदीला नंतर हवे तर तिचे पायही पकडेन.” कसाही असला तरी नवरा आहे हे लक्ष्मीला माहीत होतेच.

रात्रीचे साडे नऊ झाले. मिटिंग पंचांची असल्याने पंचक्रोशीतील पाच गावातील लोक होतेच शिवाय गावातील सर्व स्त्री पुरुष असलेच पाहिजे अशी अण्णा पाटलांनी ताकीद देऊन ठेवली होती. त्यामुळे दिडशे दोनशे लोक चावडीत दाटीवाटीने बसले होते. ज्यांना बसायला जागा नव्हती ते बाहेरून खिडकीत डोकावत होते. असा भानगडीचा विषय असला की नेहमीच गर्दी जास्त असते.

शांताराम ,लक्ष्मी, शांताराम चा बाप हे तिघे मध्ये बसले होते.

एका भिंतीला पाच खुर्च्या टेकून ठेवल्या होत्या. त्यात पंच म्हणून गावातले अण्णा पाटील बसले होते. इतर चौघे वाडीतले शंकर भोजने, माळगावचे विश्वासराव कदम, चोरगावचे मुकुंदराव चोरे आणि आंबेगावचे दिपकशेठ चव्हाण असे होते.

श्रीधर मोरे नंदीला घेऊन आले. चावडीतल्या सर्वांची नजर नंदीवर रोखल्या.

जणू काही चूक नंदीनेच केलीय. नंदी ही मान खाली करूनच होती.

मिटींगला सुरुवात झाली.

जेष्ठ म्हणून अण्णा पाटलांना पंच प्रमुख बनवले गेले.

कदम बोलायला उभे राहिले.

“ हे बघा गावकऱ्यांनो. झाला प्रसंग सर्वांना माहीत आहेच तरी मी नंदी मोरे हिला त्यादिवशी काय झाले हे सांगायची पंचांकडून विनंती करतो, म्हणजे पंचानाही सर्व माहीती मिळेल.

बोल नंदी बेटा.. काही घाबरू नको. सर्व तपशीलवार सांग. “

दोन दिवस तेच तेच सांगून या गोष्टीचा नंदीला उबग आला होता. तिने नजर वर न करताच पुन्हा सांगायला सुरुवात केली.

सर्व पुरुष मंडळी मिटक्या मारत ऐकू लागले.

सांगता सांगता नंदीची नजर एका कोपऱ्यात बसलेल्या चंदूकडे गेली. तो उदास चेहऱ्याने ऐकत होता. नंदीची नजर आपल्याकडे खिळली हे पाहून त्याने नजर चोरली.

चंदूने नजर चोरली हे पाहून ती स्तब्ध झाली. तिला रडू फुटले.

न राहवून अण्णा पाटील उठले.

“आपण पंच म्हणून एक गोष्टीचा विचार करायला हवा. चूक नंदीची नसून शांतारामची आहे. तिला सारखं सारखं विचारून आपण तिला त्रास देत आहोत. शांताराम तू उभा रहा आणि सांग .. का केलंस हे सर्व ? तूझं लग्न झालंय दोन मुलं आहेत, लक्ष्मी सारखी बायको आहे. समाजात नाव आहे तुझे. कुठून ही दुर्बुद्धी सुचली तुला? “

शांताराम खालमानेने उभा राहिला.

“माझी चूक झाली, भावनेच्या भरात मी नको ते करुन बसलोय. त्याबद्दल मी नंदीची मोरे कुटुंबाची आणि संपूर्ण गावाची माफी मागतो. पंच जो काही निर्णय देतील, जो काही दंड भरायला सांगतील तो मला मान्य असेल. “

चोरे शांतारामला रोखत म्हणाले….

“ वा…! हे चांगलं आहे. मनाला हवे तसे वागायचे आणि पैसे भरुन मोकळे व्हायचे.

लोकांनो लक्षात घ्या, उद्या ज्याच्याकडे पैसा आहे तो कुठल्याही पोरीबाळीवर हात टाकेल आणि दंड भरून उजळ माथ्याने वावरेल.

खरं तर हा पोलिसांच्या नियमानुसार विनयभंगाचा गुन्हा आहे. या शांताराम ला पोलिसातच द्यायला पाहिजे. “

पोलिसांचे नाव आल्यावर मंडळींमध्ये चुळबूळ सुरू झाली. अण्णा पाटील सर्वांना थांबवत म्हणाले.

“ थांबा ...थांबा… गडबड करू नका. अहो मुकुंदराव ...पोलिसात जायचे असते तर मोरे कुटुंब कधीच गेले असते की, पण त्यात पोरीची बदनामी, कुटुंबाची बदनामी आणि मुख्य म्हणजे गावाची बदनामी होईल. त्यामुळे तो विषय बाजूलाच ठेवा. दंड आणि जेवणी तर घेतली जाणारच आहे. पण नंदीचा विचारही केला पाहिजे. “

दिपकशेठ उभे राहिले.

“ अण्णांचं अगदी बरोबर आहे. हे प्रकरण कोर्टात वगैरे न्यायचा विचार सोडा. पंच मंडळी जमवली तर कोर्टात जायचा विषयच काढायला नको होता. कोर्टाची केस चालेल दहा बारा वर्ष. वकिलाचा खर्च होईल तो वेगळाच. ही पोरगी आता लग्नाची झालीय. कोर्टात केसला जातेय म्हणजे सगळीकडे बभ्रा होईल. आता जे जे काय आहे ते या पाच गावातच आहे. मी काय म्हणतो शांतारामला वाळीती द्या आणि दंड भरायला सांगा आणि या पोरीचं लग्न लांबच्या गावात मिळेल त्या पोराशी लावून टाका.”

हे ऐकल्यावर मोरे तणतणत उठले.

“कसे बोलताय तुम्ही दिपकशेठ? आमच्या मुली काय अशा रस्त्यावर पडल्यात काय? मिळेल त्या पोराशी लग्न लावून द्यायला? कोर्टात जायची ऐपत नाही आमची हे सर्वच जाणता तुम्ही मंडळी. या नराधमाने काही कारण नसताना पोरीला हात लावलाय. नुसत्या दंडाने समाधान होणार नाही. माझ्या मुलीच्या लग्नाची सर्व जबाबदारी आता याने घेतली पाहिजे. जो काही खर्च होईल तो ही यानेच करायला पाहिजे. “

आता वाडीतले पंच भोजने उभे न राहताच बोलायला लागले.

“ मी आता सर्वांचे बोलणे ऐकून घेतले आहे.

मला काय वाटते. या पोरीची बदनामी या शांताराम मुळे झालेली आहे. या अख्ख्या पंचक्रोशीत असा प्रकार अजूनपर्यंत घडलेला आमच्यातरी ऐकिवात नाही. माझ्यामते हिची जबाबदारी आता शांतारामनेच घ्यायला हवी. मोरेंच्या घरची परिस्थिती बघता त्यांनाही जास्त त्रास होणार नाही. “

अण्णा उभे राहिले…

“ काय म्हणायचंय तुम्हाला भोजने?

नंदी आणि शांतारामचा पाट लावून द्यायचा की काय? “

भोजने होकारार्थी मान हलवत बोलले.

“ हो अगदी.. माझ्यामते शांतारामला शिक्षा म्हणून हाच पर्याय योग्य आहे.

विचारा इथे पाच गावचे लोक आहेत. ही दहा बारा तरुण मंडळीही आहेत. कोण करेल का लग्न हिच्या जवळ? एक तरी हात वर आला तर त्याच्याशी लग्न लावून देण्याचा खर्च शांताराम वर टाकू..

बोला आहे का कोणी तयार?” जमलेल्या लोकांनी माना खाली केल्या.

नंदीने चंदू कडे पाहिले. त्यानेही नजर खाली केली.

गेली दोन वर्ष घेतलेल्या प्रेमाच्या आणाभाका एका परपुरुषाच्या नुसत्या स्पर्शाने तुटल्या होत्या.

“ बघा मंडळी हो…. कोणीही तयार नाही. इज्जत ही गोष्टच अशी आहे ,एकदा तडा गेला की गेला. बाहेर कुठे लग्न लावून दिले आणि मागाहून ही गोष्ट समजली तर अजून मोठी अडचण होईल. त्यापेक्षा गावात राहिली तर इथेच असल्याने आई बापाकडे बघता येईल. नाहीतर त्यांचीही एकुलती एकच मुलगी आहे ही. “

भोजनेंचा मुद्दा अगदीच चुकीचा नव्हता.

“अहो पण शांताराम ची बायको या सर्वाला तयार होईल का?

म्हणजे सवत करून घ्यायला तीही तयार व्हायला पाहिजे.

आधी तिला विचारा.” कदम बोलले.

“ तुम्ही जो निर्णय द्याल तो मान्य करेन मी. आता चूक झालीय यांच्या हातून तर सर्वांना शिक्षा भोगावीच लागणार. “ नाईलाजाने लक्ष्मी कबूल झाली होती.

“ आता शेवटचा प्रश्न राहिला तो मोरे आणि नंदीच्या मर्जीचा.

बोल पोरी तुला हे कसं वाटते? दंड वगैरे भरून तो सुटेल पण तू आयुष्यभर अशीच राहशील किंवा कोणाच्या तरी गळ्यात बांधली जाशील. शांताराम तसा व्यवस्थित आहे लग्न झालंय तरी तुमच्यात दहा बारा वर्षांचाच फरक असेल…..पैसा आहे…... समाजात नाव आहे. मोरे तुम्हीही शांतपणे विचार करा आणि हवं तर घरी जाऊन ठरवून या. तोवर आम्ही थांबतो. पण जो काय निर्णय व्हायचा तो आजच होऊ दे… बरोबर ना मंडळी?  बोलू दे तिघांना तोवर चहा पाणी करू आपण सर्व मंडळी. “ दिपकशेठ बोलले.

श्रीधर मोरेंनी नंदीचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन घराकडे निघाले. निघताना नंदीने चंदूकडे पाहिले. त्याची नजर अजूनही खालीच होती. सुस्कारा सोडून नंदी गेली. नंदीची आई ही त्यांच्या मागून निघाली.

चहा पाणी आटपल्यावर अण्णांनी मोरेंना बोलवायला पाठवले.

तिघे आल्यावर अण्णांनी विचारले.

“ काय झाला तुमचा निर्णय तो सांगा इथे सर्वांना ?”

श्रीधर मोरे उभे राहणार होतेच तोच नंदीने त्यांचा हात धरून थांबवले आणि स्वतः उभी राहिली.

“ मला या माणसाशी लग्न करायला लागेल असे तुम्हा पंच आणि इतर मंडळींचे म्हणणे आहे. माझ्या आई बाबांनीही सर्व विचार करून तोच निर्णय घेतला. परंतु माझ्याही काही अटी असतील.

मला यांच्या घरात जायचे नाही.. यांनी लवकरात लवकर नवीन घर घ्यावे ज्यात आमचा संसार सुरू होईल. लक्ष्मी वहिनींच्या संसारात मला वाटेकरी व्हायचे नाही. माझ्या आई वडिलांच्या पुढच्या खर्चाची तजवीज यांनी करून द्यावी. हे सर्व मान्य असेल तर मी लग्नाला तयार आहे. “ हे बोलताना तिची नजर एकटक चंदूकडे होती. त्याची नजर मात्र वर येत नव्हती.

“ शांताराम… कबूल आहे का? असेल तर पंचाचा एकत्रीत निर्णय आम्ही पंच मिळून सांगून टाकतो. “ कदम बोलले.

“ हो कबूल आहे. परंतू दंड जरा कमी करावा ही पंचांना विनंती आहे. “ शांतारामने हात जोडत विनंती केली.

पाचही पंच एकमेकांत चर्चा करू लागले. दोन मिनिटे चर्चा केल्यावर अण्णा पाटील उभे राहिले.

“ पंच मंडळींचा निर्णय झाला आहे. येत्या सहा महिन्यात शांतारामने श्रीधर मोरेंच्या मुलीशी लग्न करावे. लग्नानंतर शांतारामचे दोन वेगळे संसार असतील आणि मोरेंच्या कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी ही शांतारामचीच राहील. दंड म्हणून चाळीस हजार शांतारामने पंचासमोर जमा करावेत. सर्वांना निकाल मान्य आहे असे मानून कागद बनवा आणि त्यावर सर्वांच्या सह्या घ्या , दोन्ही कुटुंब आणि पाच ही गावचे प्रमुख यांच्या सह्या घ्या. हा निवाडा पूर्ण झाला असे आम्ही जाहीर करतो. “

हळूहळू चावडी खाली झाली. सगळे आपापल्या घरी गेले.

दुसऱ्या दिवशी तालुक्याला बियर बार मध्ये…

एका टेबलावर जंगी पार्टी सुरू होती.

चव्हाण, चोरे, कदम आणि भोजने मनसोक्त तंगडी वर ताव मारत होते.

“ काय पण बोला.. साली पोरगी असली उफाड्याची होती की.. मला पण वाटत होते की जाऊन मिठी मारावी.” भोजने ची दारू बोलत होती.

“ अरे काय बोलतो तू? तुला नशा झाली बहुतेक. तुझ्या पोरीच्या वयाची आहे ती. “ थोडाफार शुद्धीत असलेला चव्हाण बडबडला.

“ शांताराम ला लाख रुपयांचाच दंड झाला असता खरं तर. पण मग तो गावात वाटला गेला असता. त्यापेक्षा हे बरं आपल्याला दहा दहा हजार. हवा तसा निर्णय आणि दंड ही कमी. वर आठ दिवसाची सोय ...च्यायला हा धंदा बरा आहे. “ कदम हातातली तंगडी नाचवत बोलला.

“ शुश्श… त्याने काय सांगितलंय? या बद्दल कुठे काही बोलायचे नाही ना? मग प्या की गपगुमान. येईल तो आता…. हा बघा आला………

.

.

.

.

.

.

शांताराम

अरे इकडे बसलोय. ये इकडे… “ चोरे पाचव्या ग्लासात दारू भरु लागला.

शांताराम खुर्ची सरकवून बसला..

“ काय पण बोल शांताराम… तू साला राक्षस आहेस. सगळं प्लॅन करून घडवलंस. जवान पोरगी पण भेटली. बायकोला विरोध ही करता आला नाही की गावाची काही अडचण आली नाही. पैसा फेकला की सर्व काही मिळत हे तू पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंस” कदम ने नव्याने भरलेला ग्लास शांताराम समोर सरकवला.

शांतारामने ग्लास उचलला आणि बोलला.

“ धन्यवाद दोस्तांनो…

तुमच्यामुळे माझा प्लॅन यशस्वी झाला.

नंदी मला काही करुन हवी होती. सरळ मार्गाने गेलो असतो तर काही चान्सच नव्हता. आता तिची बदनामी झाल्यावर तिच्याशी कोण लग्न करणार? तिथे तिचा तो हिरो चंदू होता की.. मान वरती येत नव्हती त्याची.

अडचण होती ती आमच्या गावंढळ बायकोची . पंचायतच्या समोर ती गप्प राहणार हे मला माहीत होते. चार पाच महिने जातील नंदीचे रागात.

नंतर ती माझीच आहे की..दिवसाही आणि रात्रीही….. चियर्स..”

शांतारामच्या मनातला राक्षस जिंकला होता.. पैशाच्या जोरावर..

- बिझ सं जय