तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.
ट्रेन निघायला आता फक्त दहा मिनिटेच उरली होती.
तो अजून आला नव्हता…
तिने स्वतःला हजारो वेळा विचारलेला प्रश्न अजून एकदा विचारला.
“ मी चूक तर करत नाही ना ?”
या प्रश्नाचे उत्तर दरवेळी तिला दुःख भोगून झाल्यावर “ हो “ असेच मिळाले होते.
आणि याच्यावर तर विश्वास ठेवावा की न ठेवावा? याच प्रश्नात ती गेले दहा वर्ष अडकली होती. तिचे मन आणि मेंदू परस्पर विरोधी निकाल देत होते.
कुटुंब … दोघांनाही होती. दोघांचेही जोडीदार आता या जगात नव्हते. होती ती फक्त जबाबदारी.. ती ही मुलांप्रती.... जी मुलं आता स्वतःच्या पायावर उभी होती.
काल जे ठरले त्याप्रमाणे कोणतीही आठवण, कोणतीही वस्तू अगदी मोबाईल सुध्दा सोबत न घेता यायचे होते. त्यामुळे संपर्क करायला काहीच वाव नव्हता. तो येईलच असे तिचे मन तिला आतून सांगत होते. पण शेवटी त्याची परिस्थिती बघता तो सर्व सोडून कसा येईल हा मोठा प्रश्न तिला पडला होता. मोठा बंगला, नोकर चाकर, एवढी संपत्ती, त्याच्यावर प्रेम करणारी त्याची माणसे या सर्वांना सोडून तो येईल या बद्दल तिचे मन साशंक होतेच ..अगदी पूर्वीपासूनच.
आपण एकत्र संसार करु शकलो नाही, एकत्र जगू शकलो नाही… पण मरताना तरी एकत्र मरायचे … हे त्याचे शब्द तिला त्याच्या अजूनच प्रेमात पाडत होते.
पहिल्यांदा जेव्हा तो तिला भेटला तेव्हा तिचे लग्न ठरले होते. खूप वाटत होते तिला, की जगाला ओरडून सांगावे की मला याच्याशी लग्न करायचंय, याच्या सोबत संसार करायचाय, हाच माझ्यासाठी योग्य आहे.
पण लोक काय म्हणतील? घरचे तयार होतील का? होणारा नवरा काय करेल ? या आणि अशा असंख्य प्रश्नांनी तिला जखडून ठेवले आणि मग तिची अडचण त्यानेच घालवली. स्वतः दूर होऊन.
तो दूर होताना इतका वाईट झाला की तिला त्याचा विसरच पडला. तो मात्र तिच्या आठवणी जगत राहिला.
तिचा संसार… नवऱ्याचा स्वभाव, मुलं, सांसारिक अडचणी यातून स्थिर होता होता पंधरा वीस वर्ष गेली.
सर्व काही जवळ असताना काहीतरी बाकी राहिलंय ही भावना तिला सतत जाणवत होती. आयुष्य सुरेख होते पण अपूर्ण होते. ज्या अपेक्षा नवऱ्याकडून होत्या त्या त्याच्या विक्षिप्त स्वभावाने भंग पावल्या होत्या. ती जी कमी होती मानसिक आधाराची ती मात्र नेहमीच तिला जाणवत होती.
अशावेळी तो नेमका पुन्हा आला. खळखळणाऱ्या झऱ्यासारखा, पूर्वी होता त्यापेक्षा अगदी वेगळा. त्यावेळी तो काहीसा अबोल आणि स्वतःच्या विश्वात राहणारा होता. आता मात्र तो अधिक मोकळा. सर्वांशी भरभरून बोलणारा होता. फरक होतो माणसात पण एवढा?
अर्थात त्यामुळे ती साशंक झाली.
प्रेम तिचेही होते आणि त्याचेही. फक्त ते सुप्तावस्थेत गेले होते. पुनर्भेटीने तेच प्रेम अधिक प्रकर्षाने जागृत झाले आणि व्यक्त ही झाले.
ती भेटल्यावर मात्र तो स्वतःला बदलू लागला. त्याने इतकी वर्षे चढवलेला हसरा मुखवटा आपोआप गळून पडला. अश्रूंच्या पावसात दोघेही न्हाऊन निघाले.
दोघेही समजूतदार होते. दोघांची कुटुंब होती, जबाबदाऱ्या होत्या.
त्या पूर्ण करूनच एकत्र यायचे हे त्याचे म्हणणे तिलाही मान्य झाले.
त्यांचे एकत्र येणे हे समाज, कुटूंब कधीच स्विकारणार नाही हे दोघांनाही माहीत होते. मग एकत्र येण्यासाठी हा समाज आणि हे कुटुंबच सोडून दूर कुठेतरी जाऊ आणि नवीन आयुष्य जगू असं दोघांनी मिळून ठरवलं…
त्या आयुष्याची सुरुवात करतानाचा आज पहिला दिवस.
ती अगदी वेळेत पोहचली होती.
त्याचा पत्ता नव्हता.
ट्रेनमध्ये तुरळक माणसे होती.
हळूहळू पैसे साठवून दोघांनी लांबवर एक घर, थोडी जमीन घेतली होती. तिथेच जाण्यासाठी ती त्याची वाट बघत होती.
तिने मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. गाडी सुटायला फक्त तीन मिनिटेच राहिली होती.
“ मी पुन्हा चूक केली… हा नाही येणार बहुतेक. माझ्या मनाचे ऐकलं तेच चुकीचं. माझा मेंदू नेहमीच सांगत होता की याचे काही खरं नाही. पहिल्यावेळी याने कच खाल्ली. दुसऱ्यावेळी आता नाही... नंतर असे बोलून ही वीस वर्ष वाया घालवली. आता काय करायचंय सोबत जगून? नुसत मरायला ? अरे मला तुझ्यासोबत जगायचे होते. त्यासाठी मी जगले. तू मात्र नुसत्या आशेवर ठेवलंस मला. तुझ्यावरच्या प्रेमासाठी मनात दुःख ठेऊन सुखाचा संसार गाडा हाकला. एकच आशा की कधी ना कधी तू माझा होशील. देव गाठी वर स्वर्गात बांधत असतो. आपली गाठ नव्हतीच म्हणून सारखी सुटत राहीली.. गाठ ही आणि तुझी साथ ही….
आता मी कुठे जाणार हे कोणालाच माहीत नाही. ते शोधाशोध करतील. कोणत्या तोंडाने घरी जाऊ पुन्हा?
तू फसवलंस मला….
नाही करत मी तुझ्यावर प्रेम अजिबात.. आय हेट यू… “
.
.
.
.
.
.
तिची विचारांची तंद्री अचानक तुटली ..
तिच्या खांद्यावर हात पडला….
.
.
“बट... आय लव्ह यू… डार्लिंग…”
तो उभा होता हातात एक भले मोठे चॉकलेट घेऊन…त्याच्या गोड हास्यासोबत .
“ अरे… काय तू? किती उशीर? मला वाटलं यावेळीही तू येत नाहीस..” त्याच्याकडे रागाने बघत ती बोलली.
“ राणी.. अरे. अगदी प्लॅटफॉर्मवर आलो आणि लक्षात आले की चॉकलेट घेतलेच नाही आपल्यासाठी. तुला आणि मला चॉकलेट भरपूर आवडतात. आता नवीन आयुष्याची सुरुवात करायची म्हणजे तोंड गोड करायलाच हवे ना? “ त्याने हातातली छोटी बॅग सीटखाली सरकवली.
“ अरे पण चॉकलेट साठी कशाला धावपळ केलीस? गाडी सुटली असती म्हणजे? “ ती चिडून बोलली.
“गाडी एकदा सुटते… दोनदा सुटते.. नेहमी नाही… आता आलोय ना? रागावू नको ना.. हस की आता “ तिच्या रागाने फुगलेल्या नाकावर अलगद टिचकी मारत तो तिच्या बाजूला बसला…..
इतका वेळ तिच्या मनात चाललेले द्वंद्व एका क्षणात संपले होते.
“ चल पळूया… आता… नव्या आयुष्याकडे.. जिथे तुला आणि मला कोणीच दूर करु शकणार नाही. “ मिश्किलपणे हसत त्याने चॉकलेट उघडले.
तिने त्याचा हात हातात घेऊन बोटं गुंफली आणि म्हणाली …
“चल… आता हा हात माझ्या हातातून कधीच सुटणार नाही…”
एक हलकासा झटका लागला……
आणि गाडी सुटली….
No comments:
Post a Comment