Tuesday, 20 December 2016

कटींग चहा

.... कटींग चहा ....


"हो...  तीच ती...
नक्कीच ती..  "
रस्त्याच्या पलीकडून डोळ्यांना चष्मा लावून हातात भाजीची कापडी पिशवी, ज्यात पांढराशुभ्र मुळा लांबूनही दिसत होता,  एकंदरीत गबाळ्या साडीत चालत जाणाऱ्या तिला बघितल्या बघितल्या त्याला शाळेतले शेवटचे दिवस आठवले. दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण होते.  पण स्टोरी कधी बनलीच नाही.  आता इतक्या वर्षांनी ती पुन्हा दिसतेय.

रस्ता ओलांडून तो तिच्या समोर जाऊन उभा राहीला.  तिने बाजूने रस्ता काढला तसा तो बोलला..

" सुगंधा...  तू सुगंधाच ना?  "

पुढे गेलेली ती क्षणभर चपापली.
तीने मान वळवून त्याच्याकडे पाहीलं.  चेहरा आठवेना...

"हो मी सुगंधाच,  पण मी आपल्याला ओळखलं नाही?  "

" हुश्श..  म्हणजे मी बरोबर होतो.  सुगंधा...  अग मी संजीव..  दहावी अ..  आर्यन.. ओळखलंस का आत्ता तरी..  " त्याने गालावर त्याचे सर्वांना आवडणारे हास्य आणलं.

" अय्या...  संजीव..  किती बदललास तू?  कसं रे ओळखणार?  सेंडऑफ नंतर आता दिसतो आहेस.  " तिचीही कळी खुलली.

" बघ की... पण मी तुला ओळखलं की नाही?  आपण चेहरे विसरत नाही लवकर.  आणि त्यातही आवडत्या लोकांचे तर नाहीच नाही. "
त्याच्या डोळ्यासमोर ती दहावीतली सोळा वर्षीय लाल रिबीनीत दोन शेंड्या बांधून गालाला हलकासा पावडरचा हात लावून, नेहमी नीटनेटकी राहणारी सुगंधा होती.

" काय म्हणतोस कसा आहेस? बाकी काय म्हणतोस? " क्षणभरापुर्वी तिचा खुललेला चेहरा अचानक हिरमुसला.  तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव एक सायक्रॅटीस्ट म्हणून त्याने पटकन ओळखले.

" मी मस्त आहे,  तू सुद्धा छानच दिसतेयस की.  जरा सुटली आहेस एवढीच, पण ते जनरल आहे.  लग्न झालं की गृहीणींमध्ये तो फरक होतोच. " त्याची नजर तिच्या मानेच्या बाजूला दिसणाऱ्या काळ्या मण्यांवर गेली.

" हो रे.  तू काय करतोस सध्या? " ती कोणत्यातरी अनामिक दडपणाखाली बोलत होती हे नक्की.

" मी डॉक्टर आहे.. सायक्रॅटीस्ट..  ते काय समोर माझे क्लिनीक आहे.  घाईत नसलीस तर एक एक कटींग घेऊया ?  "
त्याने तिच्या चष्म्यापलीकडे असणाऱ्या परंतू अत्यंत अस्वस्थ डोळ्यात पाहून विचारलं.

" नको...  बरं दिसत नाही ते.  तू माझा वर्गमित्र आहेस हे कोणाला कळले तर, लोक काय विचार करतील?
नको चहा वगैरे,  चल मी निघते भेटू पुन्हा कधीतरी. " ती द्विधा मनस्थितीत होती नक्की, कारण तोंडाने जरी ती बोलत असली तरी ती एकाच जागी स्तब्ध उभी होती.

" ते बघ,  नाक्यावरच चहाचे हॉटेल आहे दहा मिनीटे तर लागतील आणि पैसे मी देईन म्हणजे तर झालं " तो मोठ्याने हसला.
खरोखरच तिथे हॉटेल दिसत होते.

" अरे पण हे भाजी आणि हे सामान?  " तिने पिशव्या वर करुन दाखवल्या.

" आपल्याला कुठे फाईव्ह स्टारला जायचंय? " पुन्हा गालातल्या गालात हसत तो म्हणाला.

"ओके,  चल आता मला उशीर होतोय. " तीने पाय हॉटेलच्या दिशेने हलवले.

दुसऱ्या मिनीटाला ते हॉटेल मध्ये बसले होते.

" भाऊ..  दोन कटींग पटकन आणा मॅडम खुप घाईत आहेत " पुन्हा तसंच गोंडस हसला. पुढे बोलला...
" मी सांगितलं आता तू सांग काय चाललंय तुझे?  कोणासोबत लग्न केलंस? आणि हा असा अवतार का?  शाळेत तर एकदम नीटनेटकी रहायचीस तू?  "

" काय सांगू शाळा संपली आणि दुसर्‍याच वर्षी बाबांनी लग्न लावून दिले...  अनोळखी माणूस,  नवीन घर यांना समजून घेता घेता..  पदरात मुलं पडली सुद्धा.  दिवसभर घरातच काही नवीन करायला जायचं तर सतत नकार,  नवरा चांगला आहे पण जुन्या विचारांचा. परक्या कोणाशी बोललेले आवडत नाही.  वयात सुद्धा दहा वर्षाचा फरक,  संसार आहे म्हणून चाललंय सर्व " ती बोलताना सारखी चष्म्याला हात लावत होती,  सारखं त्याच्या डोक्यापलीकडून रस्त्यावरच्या लोकांकडे पाहत होती. तो तिला वाचत होता.
तेवढ्या संभाषणावरुन त्याला तिचा नेमका काय प्रॉब्लेम आहे ते समजून चुकलं.

" साब..  दो कटींग " असं बोलून चहावाला समोर वाफाळते काचेचे ग्लास ठेवून गेला सुद्धा.

" घे कटींग चहा..  आमच्या इथला स्पेशल.  पण त्यासोबत तुला माझी मैत्रीही स्विकारावी लागेल.  बोल आहे मंजूर?  " एका हातात चहा आणि दुसरा हात त्याने तिच्या समोर केला.

ती चपापली..  तिने पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात पाहीले..  ते अजूनही तसेच होते शाळेत असताना पाहीले होते तसेच..  मिश्किल आणि आव्हान देणारे.  ती क्षणभर मोहरली तिचे ओठ विलग झाले आणि बोलली..

" नाही अरे,  लग्न झालंय आता माझे,  मुलं सुद्धा मोठी झालीत की संसार आहे माझा, नवरा आहे,  प्रेमही करतो तो माझ्यावर.. " तिने चहाच्या ग्लासाकडे पाहत बोलणे सुरु केलेलं.

" अगं मी मैत्री म्हणतोय तुला.. " तो हसत हसत बोलला.

ती जणू त्याचे ऐकतंच नव्हती

" आणि हे असं बरोबर नाहीच. मी, माझे घर संसार हेच माझे आयुष्य,  अशा गोष्टींसाठी खरंच माझ्याकडे वेळही नाही आणि इच्छाही नाही. "

आता ती त्याच्या समोर असलेल्या ग्लासातून येणाऱ्या वाफेकडे बघत होती.

" अगं मी मैत्री म्हणतोय तुला.. " त्याच्या चेहऱ्यावरचे हसू अजूनच फुलत होते.

" अरे घरची कामं,  मुलांचा अभ्यास,  स्वयंपाक,  सासूची सेवा यातच दिवस कसा संपतो तेच कळत नाही आणि त्यातून हे सर्व करायचं म्हणजे...   लोकांच्या नजरेतून लपवायचं,  कोणी पाहीलं तर उगाच गावभर बोंबाबोंब, भांडणं,  लोक सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतात... "

आता ती त्याच्या शर्टाच्या दुसर्‍या बटणाकडे बघत होती.
" अगं... मी मैत्री म्हणतोय तुला.. " त्याने हात किंचीत पुढे सरकवला.  चेहरा हसरा ठेवूनच.

" मधल्या वर्षात ही भावना मेलीच होती रे माझी.  मी तुला लांबूनच ओळखले होते तीन दिवसांपुर्वी..  पण टाळलं.. म्हटलं नको उगाच तो मोह..  " तिने क्षणभरच त्याच्या डोळ्यात पाहीले आणि पुन्हा तिची नजर ग्लासावर स्थिरावली..

" अगं मी मैत्री म्हणतोय तुला.. " आता तो जरा जोरानेच हसला.

तिच्या डोळ्यातून एक थेंब खाली टेबलावर पडला.. श्वास गरम होऊ लागले..  कानशीलं तापू लागली..

" खरंच रे..  माझे नाही जमणार आता तुझ्यासोबत... पण एक सांगू...  हे असं फक्त मला तू विचारले होतेस..  वीस वर्षांपुर्वी..  आता पुन्हा तूच विचारतो आहेस. " तिच्या डोळ्यातून अश्रू टपटप खाली टेबलावर पडू लागले.

त्याने पुढे केलेला हात खिशात नेऊन, रुमाल काढला आणि तिच्या समोर धरला..  आणि म्हणाला..

" डोळ्यात बघ माझ्या..
याचसाठी
मी मैत्री म्हणतोय तुला..  कळतंय का??
फक्त मैत्री."

तिने डबडबल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहीले..  रुमाल तसाच होता त्याच्या हातात.    पदराने डोळे पुसले तसा त्याने रुमाल खिशात ठेवला आणि हात समोर केला.

आता ती त्याच्या हाताकडे पाहू लागली..  तोच हात...  जो तिने वीस वर्षांपुर्वी स्पर्श करता करता निव्वळ भितीमुळे अस्पर्शित ठेवला होता.
तिचा हात त्याच्या हातावर अलगद विसावला.  शरीरातून एक वीज गेल्यासारखी थरारली ती.

तो एकदम खुशीत बोलला...

" भाऊ...  दोन कटींग पुन्हा येऊद्या.  या जुन्या थंड झालेल्या घेऊन जा.  नविन आणा चांगल्या वाफाळत्या..."
- बिझ सं जय (२० डिसेंबर, २०१६ ) 

Friday, 16 December 2016

साखर

.... साखर ...


" तुम्हाला साखर किती? " तिने विचारलं...
"नाही मी अजूनही साखर नाही खात, नका टाकू..."
तो पटकन बोलून गेला.
" अजूनही? "
तिच्या कपाळावर सुक्ष्मशी आठी आली.
" नाही काही नाही.. मी बिनसाखरेचाच चहा पितो. साखर नका टाकू "
त्याने सारवासारव केली.
हातातल्या चहाच्या कपात बघत असताना तो भूतकाळात गेला.......
..........................
त्याला हळू हळू समजत होतं की तो तिच्यासाठी आणि ती त्याच्यासाठी नाही..
एकमेकांना प्रेमाची कबूली देऊन मोकळे झालेले ते दोघे. ..
कुठेतरी काहीतरी चुकतंय हे दोघांनाही कळून चुकलेलं.. पण मन मात्र तयार होत नव्हतं.
शेवटचं लाडीक बोलणे कॅफे मध्ये असताना झालेलं.. त्याला आठवत होते.
समोर दोन चहा चे कप होते.
कपाळावर रुळणाऱ्या बटांमधून बोटं फिरवीत ती म्हणाली..
" साखर किती? "
डोळ्यात चमक आणत तो म्हणाला..
" तुझे बोट बुडव आत.. साखरेची काय गरज मग? "
" अच्छा? मग घे... हे बुडवलं बोट आत.. आणि पी बघू आता हा गोड चहा... "
तिच्या गालावर दोन बारीक खळ्या पडायच्या, हनुवटीवर असलेला लहानसा तीळ.. याकडे बघूनच तर तो वेडा झाला होता.
त्या सुंदर हास्याकडे बघत
त्याने चहाचा कप तोंडाला लावला..
कडू चहा सुद्धा त्याक्षणी अमृतासारखा लागत होता.
" काय रे तू?
किती कडू असेल तो चहा?
तू पण ना दे बघू इकडे.. टाकते साखर त्यात. "
लटक्या रागाने बघत ती बोलली.
" सिरीयसली.. खरंच छान लागतोय.. तुझ्या प्रेमाचा गोडवा त्यात उतरलाय. मी जन्मभर अशीच चहा घेईन यापुढे.. " त्याने एकदम निर्धारपुर्वक सांगितलं.
" दे बघू प्रॉमिस.. " तीने मिश्किलपणे गालातल्या गालात हसून हात पुढे केला.
" प्रॉमिस म्हणजे प्रॉमिस.. जन्मभर तुटणार नाही हे.. " तिच्या हातावर हात ठेवत त्याने तिचा हात हळूवार दाबला.
" ओ रे माझ्या सोनूल्या" म्हणत तिने त्याचा एक गाल पकडला.
त्याला तिचे हे असे लाडीक बोलणे भरपूर आवडायचं..
पण एक असाही कोन त्यांच्या आयुष्यात होता की ती याच्या आयुष्यात येण्यापुर्वी दुसर्‍याच्या आयुष्यात होती.
दुसरा जरी काही बोलत नसला तरी कुठेतरी मनात तीच होती. नाही बोलूनही तिच्याबद्दल त्याला फिलींग्ज होत्याच.
नाही बोललास ना?
बघ तुझ्या डोळ्यासमोर दुसर्‍या बरोबर कशी आनंदात राहते ती.. या निर्धाराने ती याच्या आयुष्यात आली होती.
त्याला ही गोष्ट समजली तेव्हा त्याच्याही लक्षात यायला लागलं की आपण वापरले जातोय.
प्रेमाचा दिखावा म्हणून आपला वापर होतोय.
पण त्याने तिच्यावर प्रेम केलं होतं की...
मनापासून..
अनेक चहा झाल्या त्यानंतर बिनसाखरेच्याच.
एके दिवशी ती म्हणाली...
" सॉरी... मला विसरु जा. "
भर पावसात भिजत तो समुद्र किनाऱ्यावर गेला. तोंडात जाणारे खारट थेंब हे अश्रूंचे होते की समुद्राच्या पाण्याचे हे तो सुद्धा सांगू शकला नसता.
" साब.... चाय...? " सायकल वरच्या चहावाल्याने त्याला विचारले
" नहीं... " मावळणाऱ्या सुर्याकडे बघत त्याने उत्तर दिले.
" साब.. गरमागरम है.. लो ना.. कुछ धंधा नही हुवा है आज " त्याच्या डोळ्यात अगतिकता होती..
" दे फिर... " सुर्यावरची नजर न हटवता तो बोलला.
" शक्कर कितनी डालू?? " नेहमीचा प्रश्न त्याचा.
" नहीं.. शक्कर बिल्कुल नही...
तिने मोडलं म्हणून मी वचन मोडणार नाही.. "
हातात आलेला चहा पीत पीत रात्र कधी झाली ते त्याला कळाले नाही....
.........................
आज तो आईने सांगितलेल्या मुलीच्या घरी चहा प्यायला गेला होता..
खुप साम्य होते हिच्यात आणि तिच्यात...
" चहा घ्या की.. थंड होईल.. "
गालावर आलेल्या बटांशी ती खेळत होती.
" असा चहा कडू नाही का लागत तुम्हाला? "
" नाही.. कडू गोष्टींची सवय झालीय मला... " चहा चा कप संपवत समोरच्या टिपॉय वर ठेवला..
" निघतो मी.. आई फोन करेल तुम्हाला... " त्याने नजर चोरुन तिला सांगितलं...
त्याच्या आयुष्यातली साखर हरवली होती... कायमची...
- बिझ सं जय ( १६-१२-२०१६)

Friday, 9 December 2016

कुटूंब

..... कुटूंब.....


"हॅलो..  मला सहाशे तेवीस नंबर मधल्या शंतनू सोबत बोलायचंय... हो हो.. तोच.. त्याची आई बोलतेय.. हो थांबते "
दोन मिनीटांनी शंतनू समोर आला..
" हॅलो... हां आई बोल.. मोबाईल वर फोन का नाही केलास? "
" शंतनू तुम्ही दोघे लवकर या, बाबांना कसंतरी होतंय, आम्ही हॉस्पिटलला नेतोय, तुमचे दोघांचे फोन बंद आहेत म्हणून इथे केला."
आईने रडत रडत सांगितले.
" काय झालंय नक्की? त्यांना अॅसिडीटीचा त्रास आहे ते माहीत आहे.. उगाच घाबरु नको तू.. हॉस्पिटलला जा डॉक्टर काय सांगताहेत ते बघ त्यानूसार आम्हाला कळव. मी मोबाईल चालू करतो. चार्जिंगला लावलेला. " शंतनू समजावणीच्या सुरात बोलत होता..
" शंतनू... नाही रे...."आईचा आवाज कमी होत गेला... अरुण मामाने तिच्या हातून फोन घेतला...
" शंतनू.. मामा बोलतोय.. अरुण मामा.. लगेच बसा..
कंडीशन क्रिटिकल आहे नेहमीसारखं अॅसीडीटी चे नाही हे... बाकी चर्चा नको.. निघा तसेच... "
" अरे पण... " शंतनू जरा त्रासलाच.
" अरे बिरे.. काही नाही.. मी म्हटलं ना निघा म्हणजे निघा याक्षणी.. " अरुण मामाने फोन ठेवून दिला.
शंतनू धावतच खोलीत गेला..
देवेंद्र त्याच्या फोनवर गाणी ऐकत आडवा पडला होता..
" तू पुन्हा फोन एअरप्लेन मोड ला ठेवून गाणी ऐकतोयस?
चल उठ तयारी कर.. बाबांना हॉस्पिटलला नेलंय अरुण मामांनी आत्ताच्या आत्ता यायला सांगितलंय. " वैतागून चार्जिंगला लावलेला फोन उचलून त्याची पीन काढली.
मामाचे नाव ऐकून देवेंद्र सुद्धा ताडकन उठून बसला...
" खरंच काही सिरीयस आहे का? नाहीतर गेल्यावेळी सारखा उगाच हेलपाटा व्हायचा " देवेंद्रच्या डोक्यावर सुद्धा आठी आली..
" मामा बोलले म्हणजे नक्कीच काहीतरी सिरीयस असणार.. चल तू लवकर.. " शंतनू ने कपाटावरुन सॅक काढली. एक जोडी कपडे भरले, कपाटातून काही पैसे टाकले, तोवर देवेंद्रने सुद्धा त्याचे कपडे दिले.
घड्याळात बघत शंतनू म्हणाला " आता दहा ची गाडी आहे सकाळी चार पाच पर्यंत पोहचू.. "
दोघेही तयार होऊन दहा मिनिटातच रुम ची चावी हॉस्टेल च्या काउंटरवर देऊन निघाले.
गाडी लागलीच होती...
तिकीट काढून बसणार तोच देवेंद्रचा फोन वाजला..
" हॅलो मामा.. हां बोला.. हो निघालो.. गाडीतच बसलोय. हो नऊ वाजताच जेवलो... हो तो सुद्धा आहे... कुठल्या हॉस्पिटलला नेलंय?... का?? घरी का??
हो... चालेल. आम्ही घरी पोहचून फ्रेश होऊनच येतो.. हो... ठेवा " देवेंद्रने फोन कट केला..
" काय म्हणाले? आहेत ना बरे? " शंतनू ने विचारले.
" अरे त्यांच्याबद्दल बोललेच नाही मामा.. ते म्हणाले हॉस्पिटलला डायरेक्ट येऊ नका आधी घरी जा. असं का बोलले असतील? " देवेंद्र प्रश्नार्थक चेहऱ्याने शंतनूच्या उत्तराची वाट पाहत होता.
" काही नसेल रे.. तब्येत बरी असेल. उगाच सकाळी सकाळी हॉस्पिटलला गर्दी नको म्हणून बोलले असतील. झोप तू.. " शंतनूने डोळे बंद केले
................................

संध्याकाळचे आठ वाजले..
हळूहळू मयताला आलेले लोक परतायला लागले..
आई रडून रडून आता दमली होती. काकांनी काकूंना " नंतर ये.. " सांगून काढता पाय घेतला होता. मामी आईजवळ बसून होती आणि मामा वऱ्हांड्यातल्या लोकांना कार्याबद्दल माहीती देत होते.
मामा घरात आले तसा शंतनू उठला.. एक वेळ देवेंद्रकडे बघत मामांना बोलला..
" मामा.. आम्ही आता थांबून काय करु? लोक तर गेले सर्व.. माझा डे बुडेल.. देवेंद्रचा सुद्धा पगार कटेल.. मल्टीनेशनल कंपनीला याचे काही पडलेले नसते हे तुम्हाला माहीतच आहे. मी पैसे आणलेत ते कपाटात ठेवलेत."
काहीसा अडखळत होता तो.
ते ऐकून आईने रडून रडून लाल झालेले डोळे उघडले.. तिला तिच्या कानावर विश्वासच बसेना.
" अरे तुमच्या जिभेला काही हाड?? तुमचा बाप मरुन अजून चोवीस तास नाही झाले आणि तुम्ही परतायच्या गोष्टी करताय? कोणासाठी कमावताय रे? या.. या कुटूंबासाठीच ना? " अरुण मामा चिडला होता..
त्याच्या आवाजावर आवाज चढवत तिकडून देवेंद्र उठला..
" मामा आम्ही काम करतोय म्हणूनच हे घर चाललंय. नाही केलं ना तर तुमच्यासारखं गॅरेज खोलावं लागेल. आम्हाला काय माहीत नाही का? आई तुला पैसे देते ती... "
मामा त्याच्याकडे बघतच राहीला. अख्ख्या जन्मात दोन्ही भाचे त्याच्यासमोर या आवाजात कधीही बोलले नव्हते.
" ओ.. तुम्ही चला घरी.. " मामीने मामांचा हात धरुन ओढला..
" ताई.. बघ गं तू. मी जातो." मामा पायात चप्पल चढवत बोलला.
शेजारचे नाना बोलणार तोच त्यांना शंतनू बोलला..
" बाहेरच्यांनी आता अक्कल शिकवू नका.. आम्ही जातोय म्हणजे जातोय.. कार्याला एक दिवस येऊ.. "
आई कडे बघत शंतनू बोलला " आई कपाटात पैसे ठेवलेत.. जे काही सामान वगैरे आणायचंय ते आणून घे. मामा आहेच रिकामा. आम्ही स्टँडवरच जेवू.. "
आईच्या डोळ्यातले अश्रू कोरडे झाले होते...
एका दोघांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण मग त्यांच्या बोलण्याला ऐकून ते सुद्धा शांत बसले.
" आई येतो... आम्ही १७ तारखेला येऊ कार्याला. सकाळी येऊ आणि रात्री जाऊ... " चप्पल घालत शंतनू बोलला..
आई काही न बोलता भिंतीवरच्या चौघांच्या कुटूंबाच्या फोटोकडे एकटक बघत होती.
दरवाजा बंद झाल्याचा आवाज झाला.. आणि तो फोटो हळूहळू धुसर होऊ लागला.

Sunday, 4 December 2016

गोड मॉर्निंग... मुंबई

गोड मॉर्निंग.... मुंबई

या लिखाणाद्वारे मी मुंबईची एक सकाळ मांडणार आहे. माझी मुंबई फार मर्यादित आहे.. कुलाबा,नरीमन पॉइंट पासून मरीन ड्राइव आणि इकडे वरळी सी फेस पासून हाजीअली, ताडदेव, गिरगाव ठाकुरद्वार ते भुलेश्वर काळबादेवी.... ही माझी सकाळची मुंबई. 
सध्या मला सायकलिंग ची आवड अचानक उमाळून आल्याय. त्यातही जास्तीत जास्त किलोमीटर पुर्ण करायची हौस निर्माण झालीय. त्यामुळे सकाळी जितके लवकर निघता येईल तितके निघतो.
मरीन ड्राइव्ह वरुन जाताना मी नुसतेच सायकलिंग करत नाही सोबत " न्याहाळींग " सुद्धा करतो हे मी मागे एकदा लिहिले होते.. 
तर.....
आजूबाजूला अंधाराचे साम्राज्य असताना लवकर उठलो तरच दिवसाचे काम पुर्ण होईल असा विचार करुन अंधारातच पाण्याच्या टँकर मागचा नळ उघडून फक्त चड्डी घालून, आजूबाजूला असणाऱ्या अंधारातून मला कोण बघणार आहे अशा धुंदीत १८-१९ सेल्सियस तापमानात थेट डोक्यावर धार घेऊन, मिळेल त्या साबणाने अंग घासणारा एक मनुष्य...
टाकीतून ओवरफ्लो होतंय तोपर्यंत जवळ असलेले सर्व भांडी कुंडी, ड्रम भरुन घेण्यासाठी मुलांवर ओरडणारी एक कळकट साडी घातलेली जिच्या पदराचा काही ठिकाणा नाही.. तसेही या अंधारात "कोण बघतंय या म्हातारीला " या धुंदीत भराभरा पाण्याची भांडी नऊ दहा वर्षांच्या मुलांकडे सोपवणारी ती पांढऱ्या केसांची म्हातारी....
डोळ्यावरची झोप उडतेय न उडतेय तोच " स्टोव्ह निकाल " असा शेठ चा दरडावल्याचा आवाज ऐकून, घाईघाईने खोक्यावरचा स्टोव्ह काढून घाईघाईने पंप मारणारा.. पेटलेल्या जाळाकडे बघत .. आपले आयुष्य जाळत, गावाकडच्या घरच्या लोकांना दोन घास पोटात जाताहेत या सुखात, भविष्याची स्वप्न बघणारा चायवाला पोऱ्या....
रस्त्याच्या कडेला तोंडावर दिवसभर घामटलेला तरीही त्याचा अजिबात त्रास न होता.. उलट संपूर्ण तोंड चौकटीचा निळ्या रुमालाने झाकून, त्याची रोजीरोटी असलेल्या पाटीत थंडीने गारठून बाकी शरीराचे मुळकुटे करुन सुखनैव झोपलेला तो पाटीवाला....
जरा जरी उशीर झाला तर पैसे कट होतील म्हणून जोर काढत पँडल मारत रस्त्यावरचे खड्डे चुकवत, त्या झाडांच्या सावलीमुळे झालेल्या काळ्याकुट्ट अंधारातून मोबाईल वर.. कम से कम इतना कहा होता.. हे गाणं जोराने लावून, हँडल पासून पार कॅरीअर पर्यंत चहाचे छोटे ग्लास रस्त्यातल्या एक एक टपरीवर पोहचवत त्याच सायकलीच्या खडखडाटात रस्ता कापणारा तो सायकलवाला.....
टॅक्सीच्या बाजूला..खाकी पँटीत खोचलेली आणि भोके पडलेल्या बनीयन घालून तोंडात दातून ठेवून दुसर्‍या हाताने काल दुपारी चहाच्या टपरीवर भरलेली पाण्याच्या बाटलीने टॅक्सीच्या पुढच्या काचेवर हबके मारुन ती काच स्वच्छ पुसत सकाळच्या पहिल्या गिऱ्हाईकाची वाट बघायची तयारी करणारा टॅक्सी ड्रायव्हर.....
कानावर रस्त्यावरुन घेतलेले तरीही ओरीजीनल सारखे दिसणारे हेडफोन लावून हातात मोबाईल वरची गाणी सतत बदलत मला कोण कोण पाहतंय हे डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहणारी. नवीनच घेतलेले जॉगींग शुज आणि जॉगींग ट्रॅक सुट कम्फर्टेबल नसल्याने काहीशी अस्वस्थ झालेली, तरीही मी बारीक होऊन दाखवणारच असा मनाशी निग्रह करुन शरीराची कमीत कमी हालचाल होईल याची काळजी घेत हळू हळू धावणारी एक मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन गृहीणी...
वेळेची पक्की, ग्रुप करुन धावणारी, अर्ध्या किलोमीटरवरही जिच्या महागड्या सुगंधी परफ्युम चा सुगंध पोहचेल, वय जास्त असले तरी रोजच्या जॉगींग आणि वर्कआउट मुळे प्रमाणबद्ध शरीर, सोबत अतीश्रीमंतीचा माज चेहऱ्यावर स्पष्ट ठेवून आजूबाजूला चालणारे, धावणारे कीस झाड की पत्ती है या अभिर्भावात दुर्लक्ष करुन हाताला बांधलेल्या मोबाईलवर आणि मनगटावरच्या फिटनेस वॉच वर सेशन सुरु करणारी ती तोकड्या कपड्यातली पन्नाशीची महीला...
आज तरी कमोडीटी मार्केट चढेल का? सोन्यात जरा जास्त इन्वेस्टमेंट केली असते तर बरे झाले असते अशी चर्चा करत एका हाताने डोक्यावरची हॅट सारखी व्यवस्थित करत दुसऱ्या हातात असलेली शिसवी लाकडाची चमचमणारी काठी जमीनीवर टेकत शांत पणे एका वेगाने हळूवार पणे चालणारे दोन पांढऱ्या केसांचे वयस्कर आजोबा....
मागच्या महिन्यात ज्युस चे तीस हजार मिळाले, या महिन्यात आताच बावीस हजार झालेत म्हणजे मुलाच्या घराचा हफ्ता आरामात पुर्ण होईल शिवाय महिन्याच्या शेवटी यांच्यासाठी एक जोडी कपडे सुद्धा घेता येतील म्हणजे ते सुद्धा आनंदी राहतील.. आपली बायको रोज सकाळी पिशवी भरुन वेगवेगळे ज्युस बनवून विकते आणि घरी चांगलीच शिल्लक पाडते याचाही त्यांना अभिमान होईल अशा विचारात समोर उभ्या असलेल्या पंचेचाळीशीच्या गृहस्थाला गाजराच्या रसाचा ग्लास देऊन कमरेला बांधलेल्या पिशवीत त्याने दिलेली वीस रुपयाची नोट सारत हसतमुख ज्युसवाली मावशी....
ड्युटी संपायला अजून किती वेळ आहे हे वारंवार घड्याळात बघत, ज्यांच्या पाठीमागे तुकाराम ओंबळेंचा पुतळा त्यांना कर्तव्याची जाणीव करुन देतोय. प्रत्येक गाडीवर करडी नजर ठेवून नाकाबंदीवर हातात चहाचा प्लॅस्टीकचा ग्लास घेऊन नेहमी नमस्कार करणाऱ्या एका जॉगींग करणाऱ्या मध्यमवर्गीय पुरुषासोबत हस्तांदोलन करणारे पोलिस कॉन्स्टेबल...
निव्वळ बायकोने भूण भूण लावली म्हणून अॅक्टीवा घेऊन चौपाटीला येऊन थोडीशी जॉगींग करुन टिशर्ट घामाने भिजला की सिगरेटचे पाकीट काढून तिथेच पार्क केलेल्या एका दुसर्‍या अॅक्टीवावर बसून सिगरेटचा धूर सोडत, हातात असलेल्या आय फोन ४ मधून यावेळी जाग्या असलेल्या एका क्लोज मैत्रिणीसोबत चॅटींग करणारा तो जाड जूड माणूस....
आपल्या आजोबांचा हात धरुन, त्यांना... "लवकर लवकर चला ना आजोबा... " म्हणणारी, रात्रीचा नाईट ड्रेस तसाच अंगावर घेऊन बॉबकट केलेली, चेहऱ्यावर सुंदर हसू असलेली, दुडूूदूडू चालीने चालणारी.. एक पाच सहा वर्षाची चिमुरडी मुलगी......
पाठीवर कळकट पांढऱ्या रंगाची अनेक ठिकाणी शिवलेली गोणी मारुन, रस्त्याच्या कडेला पडलेल्या चुरडून टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या जमवत.. तोंडाने रेडीओवर ऐकलेले.. स्कुल चले हम... स्कुल चले हम गाणे जोराजोरात गात बाकी जगाची पर्वा न करता शोधक नजरेने बाटल्या शोधणारा तेरा चौदा वर्षाचा मुलगा .......
जॉगिंग तर नावापुरते, सोबत डोळ्याचा फुकट व्यायाम.. धावणाऱ्या स्त्रिया आणि तरुणींच्या शरीराची होणारी लयबद्ध हालचाल उघड्या डोळ्यांनी व्यवस्थित टिपून पार दृष्टिआड होईपर्यंत नजरेने त्यांची सोबत करणारा, मनातल्या मनात, प्रत्येकी स्त्री - तरुणी आपल्यासोबत " ही " असती तर किती मजा करता आली असती असा विचार करणारा.. तो चाळीशीतला हिरवा तरुण.......
थंडीमुळे कुडकूडून अंगाचं मुळकुटे करुन झोपलेले एक दिड वर्षाचं पोर.. त्याच्या उजवीकडे झोपलेला डोक्यापर्यंत चादर ओढून झोपलेला त्याचा बाप आणि पोराच्या डावीकडे झोपलेली त्याची आई जिचा डावा स्तन रात्री दुध पिता पिता झोपल्याने तसाच सताड उघडा.. तिच्या अंगावर अर्धवट चादर.. थंडी तर नेहमीचीच तिला काय घाबरायचे. तिच्या चेहऱ्यावर झोपेतही दिसणारे समाधान......
त्या उघड्या स्तनाकडे पाहून.. क्षणभर पावले मंदावून, रस्त्यावरुन फुटपाथ वरुन चढून अधिक जवळून बघायला जाणारा..पांढरा शुभ्र टि-शर्ट आणि तशीच शुभ्र कडक इस्त्रीची पँट घातलेला... 
मनातल्या मनात " वॉव.. सुपर हॉट.. व्हॉट अ ब्रेस्ट " बोलून, बलात्कारी नजरेने त्या झोपलेल्या आई कडे बघणारा तो पांढरपेशी सो कॉल्ड श्रीमंत " पुरुष "...
आणि हे सर्व बघत...यातल्या एकाही व्यक्तीच्या भावविश्वातही नसलेला परंतू माझ्या भावविश्वात या प्रत्येक आणि अशा शेकडो मुंबईतल्या माणसांना जागा ठेवून रमत गमत गिअर बदलत सायकल हाकणारा... तुमचाच 
- बिझ सं जय