गोड मॉर्निंग.... मुंबई
या लिखाणाद्वारे मी मुंबईची एक सकाळ मांडणार आहे. माझी मुंबई फार मर्यादित आहे.. कुलाबा,नरीमन पॉइंट पासून मरीन ड्राइव आणि इकडे वरळी सी फेस पासून हाजीअली, ताडदेव, गिरगाव ठाकुरद्वार ते भुलेश्वर काळबादेवी.... ही माझी सकाळची मुंबई.
सध्या मला सायकलिंग ची आवड अचानक उमाळून आल्याय. त्यातही जास्तीत जास्त किलोमीटर पुर्ण करायची हौस निर्माण झालीय. त्यामुळे सकाळी जितके लवकर निघता येईल तितके निघतो.
मरीन ड्राइव्ह वरुन जाताना मी नुसतेच सायकलिंग करत नाही सोबत " न्याहाळींग " सुद्धा करतो हे मी मागे एकदा लिहिले होते..
तर.....
आजूबाजूला अंधाराचे साम्राज्य असताना लवकर उठलो तरच दिवसाचे काम पुर्ण होईल असा विचार करुन अंधारातच पाण्याच्या टँकर मागचा नळ उघडून फक्त चड्डी घालून, आजूबाजूला असणाऱ्या अंधारातून मला कोण बघणार आहे अशा धुंदीत १८-१९ सेल्सियस तापमानात थेट डोक्यावर धार घेऊन, मिळेल त्या साबणाने अंग घासणारा एक मनुष्य...
टाकीतून ओवरफ्लो होतंय तोपर्यंत जवळ असलेले सर्व भांडी कुंडी, ड्रम भरुन घेण्यासाठी मुलांवर ओरडणारी एक कळकट साडी घातलेली जिच्या पदराचा काही ठिकाणा नाही.. तसेही या अंधारात "कोण बघतंय या म्हातारीला " या धुंदीत भराभरा पाण्याची भांडी नऊ दहा वर्षांच्या मुलांकडे सोपवणारी ती पांढऱ्या केसांची म्हातारी....
डोळ्यावरची झोप उडतेय न उडतेय तोच " स्टोव्ह निकाल " असा शेठ चा दरडावल्याचा आवाज ऐकून, घाईघाईने खोक्यावरचा स्टोव्ह काढून घाईघाईने पंप मारणारा.. पेटलेल्या जाळाकडे बघत .. आपले आयुष्य जाळत, गावाकडच्या घरच्या लोकांना दोन घास पोटात जाताहेत या सुखात, भविष्याची स्वप्न बघणारा चायवाला पोऱ्या....
रस्त्याच्या कडेला तोंडावर दिवसभर घामटलेला तरीही त्याचा अजिबात त्रास न होता.. उलट संपूर्ण तोंड चौकटीचा निळ्या रुमालाने झाकून, त्याची रोजीरोटी असलेल्या पाटीत थंडीने गारठून बाकी शरीराचे मुळकुटे करुन सुखनैव झोपलेला तो पाटीवाला....
जरा जरी उशीर झाला तर पैसे कट होतील म्हणून जोर काढत पँडल मारत रस्त्यावरचे खड्डे चुकवत, त्या झाडांच्या सावलीमुळे झालेल्या काळ्याकुट्ट अंधारातून मोबाईल वर.. कम से कम इतना कहा होता.. हे गाणं जोराने लावून, हँडल पासून पार कॅरीअर पर्यंत चहाचे छोटे ग्लास रस्त्यातल्या एक एक टपरीवर पोहचवत त्याच सायकलीच्या खडखडाटात रस्ता कापणारा तो सायकलवाला.....
टॅक्सीच्या बाजूला..खाकी पँटीत खोचलेली आणि भोके पडलेल्या बनीयन घालून तोंडात दातून ठेवून दुसर्या हाताने काल दुपारी चहाच्या टपरीवर भरलेली पाण्याच्या बाटलीने टॅक्सीच्या पुढच्या काचेवर हबके मारुन ती काच स्वच्छ पुसत सकाळच्या पहिल्या गिऱ्हाईकाची वाट बघायची तयारी करणारा टॅक्सी ड्रायव्हर.....
कानावर रस्त्यावरुन घेतलेले तरीही ओरीजीनल सारखे दिसणारे हेडफोन लावून हातात मोबाईल वरची गाणी सतत बदलत मला कोण कोण पाहतंय हे डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहणारी. नवीनच घेतलेले जॉगींग शुज आणि जॉगींग ट्रॅक सुट कम्फर्टेबल नसल्याने काहीशी अस्वस्थ झालेली, तरीही मी बारीक होऊन दाखवणारच असा मनाशी निग्रह करुन शरीराची कमीत कमी हालचाल होईल याची काळजी घेत हळू हळू धावणारी एक मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन गृहीणी...
वेळेची पक्की, ग्रुप करुन धावणारी, अर्ध्या किलोमीटरवरही जिच्या महागड्या सुगंधी परफ्युम चा सुगंध पोहचेल, वय जास्त असले तरी रोजच्या जॉगींग आणि वर्कआउट मुळे प्रमाणबद्ध शरीर, सोबत अतीश्रीमंतीचा माज चेहऱ्यावर स्पष्ट ठेवून आजूबाजूला चालणारे, धावणारे कीस झाड की पत्ती है या अभिर्भावात दुर्लक्ष करुन हाताला बांधलेल्या मोबाईलवर आणि मनगटावरच्या फिटनेस वॉच वर सेशन सुरु करणारी ती तोकड्या कपड्यातली पन्नाशीची महीला...
आज तरी कमोडीटी मार्केट चढेल का? सोन्यात जरा जास्त इन्वेस्टमेंट केली असते तर बरे झाले असते अशी चर्चा करत एका हाताने डोक्यावरची हॅट सारखी व्यवस्थित करत दुसऱ्या हातात असलेली शिसवी लाकडाची चमचमणारी काठी जमीनीवर टेकत शांत पणे एका वेगाने हळूवार पणे चालणारे दोन पांढऱ्या केसांचे वयस्कर आजोबा....
मागच्या महिन्यात ज्युस चे तीस हजार मिळाले, या महिन्यात आताच बावीस हजार झालेत म्हणजे मुलाच्या घराचा हफ्ता आरामात पुर्ण होईल शिवाय महिन्याच्या शेवटी यांच्यासाठी एक जोडी कपडे सुद्धा घेता येतील म्हणजे ते सुद्धा आनंदी राहतील.. आपली बायको रोज सकाळी पिशवी भरुन वेगवेगळे ज्युस बनवून विकते आणि घरी चांगलीच शिल्लक पाडते याचाही त्यांना अभिमान होईल अशा विचारात समोर उभ्या असलेल्या पंचेचाळीशीच्या गृहस्थाला गाजराच्या रसाचा ग्लास देऊन कमरेला बांधलेल्या पिशवीत त्याने दिलेली वीस रुपयाची नोट सारत हसतमुख ज्युसवाली मावशी....
ड्युटी संपायला अजून किती वेळ आहे हे वारंवार घड्याळात बघत, ज्यांच्या पाठीमागे तुकाराम ओंबळेंचा पुतळा त्यांना कर्तव्याची जाणीव करुन देतोय. प्रत्येक गाडीवर करडी नजर ठेवून नाकाबंदीवर हातात चहाचा प्लॅस्टीकचा ग्लास घेऊन नेहमी नमस्कार करणाऱ्या एका जॉगींग करणाऱ्या मध्यमवर्गीय पुरुषासोबत हस्तांदोलन करणारे पोलिस कॉन्स्टेबल...
निव्वळ बायकोने भूण भूण लावली म्हणून अॅक्टीवा घेऊन चौपाटीला येऊन थोडीशी जॉगींग करुन टिशर्ट घामाने भिजला की सिगरेटचे पाकीट काढून तिथेच पार्क केलेल्या एका दुसर्या अॅक्टीवावर बसून सिगरेटचा धूर सोडत, हातात असलेल्या आय फोन ४ मधून यावेळी जाग्या असलेल्या एका क्लोज मैत्रिणीसोबत चॅटींग करणारा तो जाड जूड माणूस....
आपल्या आजोबांचा हात धरुन, त्यांना... "लवकर लवकर चला ना आजोबा... " म्हणणारी, रात्रीचा नाईट ड्रेस तसाच अंगावर घेऊन बॉबकट केलेली, चेहऱ्यावर सुंदर हसू असलेली, दुडूूदूडू चालीने चालणारी.. एक पाच सहा वर्षाची चिमुरडी मुलगी......
पाठीवर कळकट पांढऱ्या रंगाची अनेक ठिकाणी शिवलेली गोणी मारुन, रस्त्याच्या कडेला पडलेल्या चुरडून टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या जमवत.. तोंडाने रेडीओवर ऐकलेले.. स्कुल चले हम... स्कुल चले हम गाणे जोराजोरात गात बाकी जगाची पर्वा न करता शोधक नजरेने बाटल्या शोधणारा तेरा चौदा वर्षाचा मुलगा .......
जॉगिंग तर नावापुरते, सोबत डोळ्याचा फुकट व्यायाम.. धावणाऱ्या स्त्रिया आणि तरुणींच्या शरीराची होणारी लयबद्ध हालचाल उघड्या डोळ्यांनी व्यवस्थित टिपून पार दृष्टिआड होईपर्यंत नजरेने त्यांची सोबत करणारा, मनातल्या मनात, प्रत्येकी स्त्री - तरुणी आपल्यासोबत " ही " असती तर किती मजा करता आली असती असा विचार करणारा.. तो चाळीशीतला हिरवा तरुण.......
थंडीमुळे कुडकूडून अंगाचं मुळकुटे करुन झोपलेले एक दिड वर्षाचं पोर.. त्याच्या उजवीकडे झोपलेला डोक्यापर्यंत चादर ओढून झोपलेला त्याचा बाप आणि पोराच्या डावीकडे झोपलेली त्याची आई जिचा डावा स्तन रात्री दुध पिता पिता झोपल्याने तसाच सताड उघडा.. तिच्या अंगावर अर्धवट चादर.. थंडी तर नेहमीचीच तिला काय घाबरायचे. तिच्या चेहऱ्यावर झोपेतही दिसणारे समाधान......
त्या उघड्या स्तनाकडे पाहून.. क्षणभर पावले मंदावून, रस्त्यावरुन फुटपाथ वरुन चढून अधिक जवळून बघायला जाणारा..पांढरा शुभ्र टि-शर्ट आणि तशीच शुभ्र कडक इस्त्रीची पँट घातलेला...
मनातल्या मनात " वॉव.. सुपर हॉट.. व्हॉट अ ब्रेस्ट " बोलून, बलात्कारी नजरेने त्या झोपलेल्या आई कडे बघणारा तो पांढरपेशी सो कॉल्ड श्रीमंत " पुरुष "...
आणि हे सर्व बघत...यातल्या एकाही व्यक्तीच्या भावविश्वातही नसलेला परंतू माझ्या भावविश्वात या प्रत्येक आणि अशा शेकडो मुंबईतल्या माणसांना जागा ठेवून रमत गमत गिअर बदलत सायकल हाकणारा... तुमचाच
- बिझ सं जय
No comments:
Post a Comment