Wednesday, 25 January 2017

क्षणिक

.... क्षणिक....



रुफ टॉपच्या ब्लोअर मधून थंडगार वारा मनाला सुखावत होता...
आमच्या अत्यंत महागड्या गाडीत बसून हातातल्या लेटेस्ट आय फोन मध्ये शॉपिंगचे पर्याय पाहत पाहत.. मनात विचार सुरु होते..

सिग्नल लागला म्हणून बहुतेक गाडी थांबली होती..
विरेंद्रने हॉर्न वाजवायला सुरुवात केली.
गाडीपुढे एका स्कुटरवर जोडपे होते..
स्कुटरवाल्याने जागा करुन दिली.
विरेंद्रने ओव्हरटेक करुन त्यांच्या बरोबरीने गाडी उभी केली.
सिग्नलवर ७९ सेकंद दिसत होते
जोडपे असल्याने सहजच दोघांवर नजर गेली.
छान होती जोडप्यातली बायको..  चेहऱ्यावर किंचीत लज्जेचा भाव होता. पण अत्यंत समाधानी चेहरा होता..
पुर्वी मी सुद्धा तशीच होती......

तिच्या नवऱ्याने हेल्मेट घातले होते.  समोरच्या काळ्या काचेमुळे त्याचा चेहरा दिसत नव्हते.... अचानक त्याने ती काच वर केली...

तेच डोळे...

अगदी हाताच्या अंतरावर होते ते दोघे  त्यामुळे मला जास्त वेळ नाही लागला त्याला ओळखायला.

काही वर्षांपुर्वी मी त्याच्या स्कुटरवर अशीच मागे बसायची..

कॉलेजला एकत्र होतो आम्ही. मी कॉलेजसुंदरी आणि तो एक सामान्य घरातला तरुण पण दिसायला अगदी स्मार्ट होता.  कॉलेजची मुलं माझ्या मागे... आणि माझी नजर याच्यावर...

महत्प्रयासाने तो मला भेटला. त्याच्या सहवासात धुंद धुंद व्हायचे मी..  तो मात्र एका शिस्तीने वागायचा. एवढी रुपसुंदरी समोर असताना माणूस थंड कसा राहू शकतो याची मला खरंच कमाल वाटायची...
पण तो तसाच होता शेवटपर्यंत...

सगळे लेक्चर अटेंड केल्यानंतरच तो कट्ट्यावर यायचा. मी त्याला ज्युनियर होते... आमचा ग्रुप कॉलेज बाहेरच असायचा जास्त वेळ.

त्याची शिस्त आणि माझा अवखळपणा यात एका प्रकारचे द्वंद्व चालू होते.

मी घातलेल्या हाकेला त्याने साद तर दिली होती, पण शरीराच्या हाकेला मात्र तो कधीही ओ..  देत नव्हता.

" हे सगळं फक्त लग्नानंतर..  मला नाही आवडत प्रेमाचं असं प्रदर्शन करायला.  प्रेम ही मनाची अवस्था आहे. त्याला मनातच ठेवायचं.  मी तुझ्यावर प्रेम करतो..  आणि तू माझ्यावर... ही भावना सगळ्यात मोठी आहे.  त्यासाठी शारीरिक होण्याची काय गरज आहे? "

" अरे पण, हे चालतं...  किस, स्पर्श.. यांनी प्रेमभावना वाढतेच.. आणि मी मुलगी असून तुला आव्हान देते तरी तू स्वीकारत नाहीस "

" हे बघ...
किस, स्पर्श ही शारीरिक जवळीक दर्शवतात..
प्रेमाला शारीरिक जवळीकीची गरज नसते.  माझ्या माहीतीत अशी लग्नाची जोडपी आहेत जी वर्षभरात फक्त तीन ते चार दिवसच भेटतात.  त्यांच्यात प्रेम आहेच..  वर्षानूवर्ष..
लग्नाआधी शारीरिक होणे हा  आततायीपणा आहे.... आणि मी तो कधीही करणार नाही.. "

त्याला बोलण्यात हरवणे मला कठिण होतं.  मी दरवेळी माघार घ्यायची.

पण मनात ठरवलेलं की...
कधीतरी याची तपस्या मोडणार मी...  माझ्या सौंदर्याने.

कॉलेजची पाच वर्ष झाल्यावर तो सरकारी नोकरीला लागला..
मी त्याला अनेक प्रायवेट कंपन्यांच्या ऑफर आणल्या.  मला सौंदर्याच्या जोरावर हवाईसुंदरी ची नोकरी मिळाली.  वेगवेगळ्या ऑफर यायच्या..  हो तसल्याच..  पण मी टाळत गेले.

शनिवार..  रविवार आमची भेट व्हायची..

एखाद्या रेस्टोरेंटमध्ये..  नंतर मग त्याच्या स्कुटरवरुन तो मला माझ्या घरी सोडायचा.  स्कुटरवर सुद्धा खांद्यावर हात ठेवण्याची परवानगी होती.

 त्याची तपस्या भंग करण्याची मला संधी हवी होती..
ती मिळाली माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने..

मित्रमैत्रिणींसोबत संध्याकाळी पार्टी करुन,  संध्याकाळी उशीरा आम्ही दोघे माझ्या घरी गेलो. आई बाबा नेमके बाहेर गेले होते दोन दिवसाकरीता...   घरात आम्ही दोघेच.

घेतलेल्या ड्रिंक्सचा असर हळूहळू दोघांवर होत होता.
मी चेंज करुन येते म्हणाले आणि मुद्दाम दरवाजा बंद न करता कपडे बदलू लागले.

तपस्या...  भंग झाली नशेत..

सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तो डोके धरुन खुर्चीत बसला होता...

मी उठल्याचे जाणवल्यावर माझ्याकडे न बघताच म्हणाला...

" तू कोल्ड्रिंक मध्ये काय टाकलं होतंस?
मला फसवलंस तू..  तुला प्रेमाची नाही..  तर शरीराची गरज आहे.  जे मी इतकी वर्ष टाळलं ते तू फसवून घेतलंस..."

" अरे असा काय तू... आपण इतकी वर्ष सोबत आहोत..  मी इतकी सुंदर आहे लोक माझ्याजवळ बोलण्यासाठी,  माझ्या सोबत जरा वेळ व्यतीत करण्यासाठी प्रयत्नशील असतात..  आणि तू मात्र षंढासारखा तुझी शिस्त, संस्कार पाळत बसलास...
शरीराचीही काही गरज असते मना प्रमाणे..  कधी समजणार तूला..  रात्रीचा एकएक क्षण आठव..  "

" मला नाही आठवायचंय काही..  तू मला ओळखू शकली नाहीस हीच एक खंत...  तूला दूसरा कोणीही मिळेल... तुझ्या सौंदर्याच्या जोरावर.
एक नक्की...  तू माझ्यासाठी नाहीस..
विसर मला. "

असं म्हणुन तो निघून गेला.

मला कळलंच नाही की माझ्या या एवढ्याश्या चुकीची शिक्षा एवढी मोठी का?

बहुतेक त्याची तपस्या तोडताना मी त्याचा विश्वास ही तोडला होता.

त्या नंतर तो मला टाळू लागला.  मी खुप प्रयत्न केले पण तो भेटलाच नाही...

शेवटी त्याला धडा शिकवण्यासाठी..  बाबांनी आणलेल्या विरेंद्रच्या प्रस्तावाला होकार दिला.

विरेंद्र करोडपती बाबांचा एकूलता एक मुलगा. याच्या बरोबर वेगळा...
पैसा म्हणजे सर्व काही..  भाव भावना..  प्रेम... मन या सर्वांना त्याच्या जागी शुन्य..

मला काही कमी पडून देत नव्हता.  पण जे मला कमी होतं ते त्याच्यात नव्हते...

संसार चालला होता..  सर्व सुख पायाशी लोळण घेत होती..
पण काहीतरी अपुर्णता होती.....

आमच्या गाडीच्या काळ्या काचेतून मी त्याला दिसत नसले तरी तो मला दिसत होता...

त्याच्या बायकोने त्याच्या कंबरेत हात घातला....

मला वाटलं...  तो झिडकारेल....

पण नाही...  त्याने मागे पाहीलं...  आणि गोड हसला...  पुर्वी हसायचा तसाच..

तो बदलला होता...?  की...  लग्नानंतर येणारी सहजता त्याच्यात आली होती...

सिग्नल सुटला...
तो क्षणात आमच्या पुढे निघूनही गेला...
बायकोने त्याला मागून घट्ट पकडले होते...

त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद माझा होता...
जो मी " क्षणिक"  सुखासाठी कायमचा हरवला होता...


Thursday, 19 January 2017

बेल

.... बेल ....




ऑफिसची बेल वाजली.
धनराज साहेबांच्या आठवणीत रमलो असताना ती बेल मला जरा जास्तच कर्णकर्कश्य वाटली.
साहेबांना जाऊन दोन महिने झाले होते. मला आठवतंय तिथपासून मी धनराज साहेबांसोबत होतो.  बाबांसोबत यायचो मी धनराज फार्मा मध्ये..
साहेबांचे बाबा दलीचंद शेठ तेव्हा खुर्चीवर बसायचे.  धनराज शेठ कॉलेजला असायचे.  मी जेमतेम चौथी पास झालेलो. दलीचंद शेठने सांगितलं की

" पंढरी ला ठेव इथेच "

चहा पाणी करायला, ऑफिसची साफसफाई वगैरे करायला. त्यांचे उपकार म्हणून मला लहान वयातच नोकरी मिळाली होती.  माझं आयुष्य पुर्ण याच ऑफिसमध्ये गेलंय.
कॉलेज संपल्यावर धनराज शेठ ऑफिसात येऊ लागले.

दलीचंद शेठ वारल्यानंतर संपुर्ण जबाबदारी धनराज शेठ वर आली.  त्यांचे लग्न, मुलं  कंपनीची भरभराट,  विदेशी झालेल्या शाखा.... मी सर्व या डोळ्यांनी पाहील्यात.

धनराज शेठ माणुसकी म्हणजे काय हे दाखवणारा जिवंत पुतळा होता..
माझ्या घराच्या वेळी केलेली संपुर्ण मदत, सुरेखाच्या लग्नाचा संपुर्ण खर्च,  रुक्मिणीच्या ऑपरेशनचा खर्च,  काय काय नाही दिलं मला त्या देव माणसानं?
मी सुद्धा माझ्या रक्ताचं पाणी केलंय या कंपनीसाठी.

 कंपनीवर मोर्चा आला होता,  तेव्हा धनराज शेठ वर मारलेला दगड मी अंगावर घेतला होता.  एवढे लोक कंपनीत होते तरी शेठने फक्त माझाच 'साठी' चा समारंभ आयोजला होता.
मी नक्कीच कंपनीसाठी महत्त्वाचा होतो..  निदान धनराज शेठने तसं बोलूनही दाखवलेलं त्या कार्यक्रमात.


पुन्हा बेल वाजली....

कर्णकर्कश्य...

मी तंद्रीतून बाहेर आलो..

ऑफिसचा दरवाजा उघडून आत गेलो. खुर्चीत बसलेल्या युवराज शेठ ना पाहून माझ्या कपाळावरची आठी वाढली.

" पंढरी...
दोन कॉफी सांग.. एक वेज ग्रिल्ड सँडवीच.
आणि जरा बिसलेरीच्या दोन बॉटल सुद्धा आण..  नंदिनी येतेय. बिल्डिंग खालीच आहे. ती आली की प्लिज..  कोणाला आत पाठवू नकोस."
डोळ्यावरचा चष्मा अलगद खाली ठेवत काहीश्या मुजोरपणे युवराजने मला ऑर्डर सोडली.

" हो शेठ..  " म्हणून मी बाहेर पडलो.  बाहेरच्या फोनवरुन हॉटेलला फोन केला आणि ऑर्डर दिली.
फोन ठेवतच होतो तेव्हा नेमकं टाक.. टाक.. टाक.. असे बुट वाजवत नंदिनी आली.
माझ्याकडे तुच्छतेने बघत एका फणकाऱ्याने दरवाजा उघडून आत गेली.

नंदिनी की युवराजची कॉलेज पासुनची मैत्रीण.  दोघांचं चांगलं जमलंही होतं. धनराज शेठला ते मंजूर नव्हतं. त्यांच्या मते नंदिनी युवराजसाठी योग्य मुलगी नव्हती.
तिचे कपडे,  राहणीमान,  खर्च हे सर्व घराण्याला शोभणारं नाही असं धनराज शेठ ना वाटत होतं.  या गोष्टीवरुन बाप बेट्यांमध्ये वाद ही झाले होते.
ज्या दिवशी धनराज शेठ वारले त्यादिवशी सुद्धा ऑफिसातच दोघांत याच नंदिनीवरुन भांडण झालेलं.
कदाचित त्याचाच धसका साहेबांनी घेतला होता..  ज्याचा परीणाम हृदयविकाराचा झटका येऊन शेठ वारले होते.

वेटर दोन कॉफी, सँडवीच, बिसलेरी घेऊन आला.

ऑफिसच्या कपामध्ये कॉफी समसमान करुन ट्रे मध्ये व्यवस्थित घेऊन,  दरवाजावर टक टक केलं.

पुर्वी त्याची गरज नसायची. दलीचंद, धनराज असताना कधीही टक टक करुन जायची गरज लागली नव्हती.
पण युवराज आल्यापासून त्याने मला हा नियम सुरु केला.
एकदा चुकून दार न वाजवता आत गेलो तर नंदिनी त्याच्या मांडीवर बसून होती.
दोघेही खूप चिडले होते.  खुप उलट सुलट बोललेले. चुक कोणाची होती यापेक्षा कामाच्या ठिकाणी काम करणे अपेक्षित असतं, पण जे चाललेलं ते काम नव्हतं.

मी खालमानेने सर्व ऐकून घेतलं आणि बाहेर गेलो. बाहेर खुर्चीत बसलो आणि खुप रडलो.  नंदिनी जाताना माझ्याकडे तुच्छतेने बघून गेली.

आता हे नेहमीचेच झालेलं. नंदिनी आली की तासभर दरवाजा बंद व्हायचा.  त्यामुळे मग भरपुर कामं रेंगाळायची. मिनीटामिनीटाला ऑर्डर असल्या की उशीर झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सुद्धा झालं होतं. असं अकाउंटच्या शुक्लाने मला सांगितले होतं.

शुक्ला मला म्हणाला होता की,  कशाला करत बसतो आता नोकरी वगैरे?  रिटायरमेंट घे आणि बस की घरी.  शेठ देईन पाच सहा लाख.  नाही दिले तर आहे की आपली युनियन, भाऊंना सांगून मोर्चा आणतो की नाही बघ.
मला ही या सर्व गोष्टींचा तिटकारा यायला लागलेला.
युवराज शेठ समोर मी प्रस्ताव तोंडी मांडला होता..  एकेदिवशी..

मला म्हणाला..
" पंढरी..  काय करणार तू घरी बसून?  आणि कशाबद्दल एवढे पैसे देऊ तुला मी?  बाबांनी काय काय केलंय तुझ्यासाठी हे पाहीलंय मी. तुला जायचं असेल तर जा..  पण जास्त अपेक्षा ठेवू नकोस.  मी देईन तेवढे शांतपणे घे.  "

मी शुक्ला सोबत चर्चा केली.  त्याने सांगितलं की युनियन ऑफिस मध्ये एक लेटर लिहून आपली तक्रार दिली आणि अकरा हजार भरले की पुढे त्यांची जबाबदारी.  शेठ आपोआपच पायाजवळ येतात आपल्या.
परवा संध्याकाळी तो आणि मी मिळून तक्रार लिहिणार होतो.

पुन्हा बेल वाजली..

दरवाजा उघडून आत गेलो.

" पंढरी..  कप घेऊन जा..  आणि आता नंदिनी असे पर्यंत कोणीही आत येता कामा नये..  समजलं?  "

" हो शेठ "
दोघांच्याही नजरेला नजर न मिळवता मी प्लेट घेऊन बाहेर गेलो.
कप, प्लेट धुवून ठेवून पुन्हा खुर्चीत येऊन बसणार तोच काहीतरी ऐकू आलं..

दरवाजा पुर्ण बंद झाला नव्हता..

नंदिनीचा आवाज येत होता..

" युवी... कशाला या म्हाताऱ्याला ठेवलंय कामाला?  बिनकामाचा नुसता..
काढून टाक आणि नवीन कोणीतरी ठेव की... "

म्हणजे हीच युवराजला माझ्याबद्दल भडकवते...

आता युवराज काय बोलतोय हे मी लक्षपुर्वक ऐकू लागलो.

" हे बघ नंदू..
पंढरी हा आमच्यासाठी नुसता नोकर नाही.  तुला वाटत असेल की काय या दिडदमडीच्या माणसात आहे? या पंढरीने मला अंगाखांद्यावर खेळवलंय.  बाबा मला वेळ देऊ शकत नव्हते तेव्हा माझ्यासोबत हा पंढरीच खेळायला असायचा..  आजोबांपासून पंढरीने आम्हाला सेवा दिलीय.  चार दिवसापुर्वी त्याने रिटायरमेंट मागितली...  मी नाकारली.
कारण मला या ऑफिसला तो हवाय..  बाबांनंतर या ऑफिसची माहीती असलेला तोच आहे.  मला सुद्धा सापडणार नाहीत अशा फाईली तो काही सेकंदात आणून देतोय.
पंढरी..  नुसताच नोकर नाही..  तो कणा आहे धनराज फार्माचा...
जो पर्यंत तो धडधाकट आहे तोवर तो इथेच राहणार.  "

माझ्या डोळ्यातून पाणी सुरु झालं...
बाजूला असलेला फोनचा रिसीव्हर उचलला... अकाउंट चा नंबर दाबला.
" हॅलो शुक्ला...
मला कोणतीही तक्रार करायची नाही... हा पंढरी धनराज शेठ सोबत होता...  आणि आता त्यांच्या रक्तासोबत...  म्हणजे युवराज सोबतही असणार आहे... "

" अहो पण..  ऐका... " बोलत असताना मी फोन कट केला.

पुन्हा बेल वाजली...

यावेळी ती कर्णकर्कश्य नव्हती...

Tuesday, 17 January 2017

एक दिवस

.... एक दिवस ....


रात्रीच्या धसमुसळ्या शृंगारानंतर कधी झोप आली ते कळलेच नाही.  वरच्या झाडावरुन दवाचा थेंब पापणीवर पडला आणि एकदम जाग आली. शिवूचा हात अजूनही तसाच पोलक्यामध्ये घुसलेला होता.  एवढ्या थंडीतही तो शर्ट न घालता झोपला होता.  त्याला थंडीची काही चिंताच नव्हती म्हणा तो तिशीचा तरुण..  सळसळत्या रक्ताचा गावावरुन पळून आलेला.  पण मग काहीच काम मिळाले नाही म्हणून पाकीटमार, चोरी, हातचलाखी वगैरे करुन या फुटपाथवरच येऊन झोपणारा. 
नाही म्हटलं तरी मी चाळीशीची असेनच. नवरा मेला त्यानंतर कुटूंबाला मोहताज झालेली सर्वांनी टाकलेली...  मी सुद्धा सहारा शोधत शोधत इथे आलेली. कधी जवळ आलो ते कळलं नाही..  पण त्याला माझे शरीर हवे होते आणि मला त्याचे.  दोघेही एकाच कारणासाठी जवळ आलेलो. 
लग्न, कुटूंब वगैरे सर्व छूट या विचारावर आम्ही पक्के होतो. आमच्या संभोगातून एक पोर सुद्धा जन्माला घातलं आम्ही... 
अरे मीनू कुठे गेला?
मी शिवूचा हात अलगद पोलक्यातून बाहेर काढला.  माझ्या अंगावर असलेला त्याचा डावा पाय सुद्धा अलगद खाली सरकवला.  त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून मी जास्तच शहारली..  पण मीनू कुठे गेला हे शोधणे जास्त महत्वाचं होतं.  मी उठून साडी ठिक केली काळ्या साडीवर ते सफेद डाग पटकन दिसत होते.  फुटपाथच्या या टोकापासून त्या टोकावर पाहीले.  मिनू दिसेना.. 
मग हाक मारली...
" मीनू...  मीनू...  कहाँ है रे तू..  मीनू... "
ओरडताना डोळ्यात एक कळ आली.  काल पाकीट चोरताना त्या जाड्या बाईने पकडले आणि तिघी चौघींनी मिळून मारले त्यात एक ठोसा डोळ्यावर लागला होता.  त्याची जखम आता टरटरून सुजली होती. 
" शिवू...  उठ शिवू...  मीनू कही दिख नहीं रहा...  उठ.. "
लाथेनेच शिवूला उठवू लागले. नजर मात्र फुटपाथच्या त्या टोकापासून या टोकापर्यंत फिरत होती. 
" क्या है सुबे सुबे? 
होएंगा यही कही..  संडास को बैठा होगा देख गाडी के पिछे."
त्याला काळजी नव्हती असं नाही... पण तो तसाच होता.
भिती अशी नसायचीच त्याला.  अजून एकदाही पकडला गेला नव्हता तो.  त्यामुळे त्याला भयंकर आत्मविश्वास होता.
मागे एकदा रात्री संभोग करत असताना हवालदाराने दम दिला होता..  तेव्हा सुद्धा हा त्याला उलटून बोलला.. 
" साब तुमको करना है आव?  हमारा यही घर है..  हम यही करेंगे ये सब कुछ. "
हवालदाराने क्षणभर माझ्या उघड्या शरीराकडे पाहीलं आणि....
शिव्या देत निघून गेला.
मी जास्तच ओरडायला लागली तसा तो उठला.  अंगात उशाला असलेला शर्ट घातला.  मानेपर्यंत रुळणारे केस झाडले आणि फुटपाथच्या बाहेरुन एक चक्कर मारुन आला. मध्येच " मीनू..  मीनू...  " अशा हाका सुद्धा मारत होता..
" उसकी माँ का...  कहाँ गया बे तू?  सुबे सुबे क्या नाटक कर रहा है तू ? "
आमच्या आवाजाने फुटपाथवरची बाकीची माणसं पण उठली होती. ती सुद्धा काळजीने मीनूला शोधू लागली.
तो तिथे नाही हे समजताच मी मटकन खाली बसले... 
डोळ्यात पुन्हा कळ गेली.
" अबे अब तू रो मत..  मिल जाएगा..  इधर उधर कही गया होएंगा.  " त्याने बिडी पेटवत मला समजूत घालायचा प्रयत्न केला.
इतक्यात पार्कींगवाला आला..
" चलो हो गया तुम्हारा टाईम खतम..  फुटपाथ साफ करके जाने का.. हाँ? " त्याला झालेल्या गोष्टीची कल्पना नव्हती... 
आणि असती तरी काय फरक पडला असता म्हणा?
त्याच्या दृष्टीने मी एक 'छिनाल' होती.  मी झाडाला टांगलेला झाडू घेऊन पटापट फुटपाथ साफ केला.
मागच्यावर्षी एका शेठने फुटपाथवरच्या सर्वांना चादरी दिल्या होत्या त्या गुंडाळून पिशवीत भरल्या आणि ती पिशवी घेऊन फुटपाथ रिकामा केला. तो अलिखित नियमच होता.  आता दिवसभर तिथे फेरीवाल्यांचे राज्य.. 
मी सगळीकडे पाहत होते... 
कुठे मीनू दिसतोय का...  फुटपाथ संपला तसा माझ्या संयमाचा बांध फुटला...

" मीनू....  मीनू... कहाँ है तू?" मी दुखणाऱ्या डोळ्यावरुन हात फिरवला... 
" चुप अभी...मील जाएगा मीनू,  काम कर पैले..  वो देख सामने से वो औरत आ रहीं हैं,  उसका ध्यान मोबाईल पर है..पर्स मार उसकी...  जा जल्दी..  "
शिवूला पोराची काळजी नव्हतीच की काय असं वाटू लागलं मला.  त्याचंही काही चुकत नव्हत..  मीनू झाला म्हणून झाला...  औषध खावूनही जगला म्हणून झाला.  नाहीतर नकोच होता तो त्याला.
काळजावर दगड ठेवून पिशवी शिवूच्या हातात देऊन त्या बाईकडे गेले. 
खरंच तिचं लक्ष नव्हते..  ती मोबाईलमध्ये पुर्ण घूसली होती.
ब्लाऊजच्या कप्प्यात लपवून ठेवलेले ब्लेड  अलगद बाहेर काढले, आणि त्या बाईच्या बाजूला जाऊन अलगद पर्सला ब्लेड मारला.  आतून पाकीट आणि एक लिपस्टिक पडली ती वरच्यावरच झेलली. 
त्या बाईला कळलेही नाही की तिची पर्स मारली गेली.
पाकीट शिवूच्या हातात देऊन त्याला विचारलं ...
" शिवू..  चल ना पुलिस में जाते है.  मीनू चाहीये मुझे.  जाने कौनसी हालत में होगा? मेरा खून है वो..  चल ना.. "
शिवू चिडलाच एकदम..
" तुझे जाना है तो जा..  में नहीं जाऊंगा पुलिस के सामने. एकबार नजर में आ गया तो सब खतम.. "
आता मात्र मी चिडली... तशीच तणतणत पोलिस स्टेशनकडे निघाले.
पोलिस स्टेशनच्या गेटवरच्या हवालदाराने थांबवलंच. 
" कहाँ जा रही है तू?  क्या काम है?  "
माझ्या अवताराकडे बघून नक्कीच मला आत सोडलं नसतं, पण त्याने माझ्या डोळ्यात पाहीलं..
आत जाऊ दिलं. 
सायबाकडे गेले..  विचारलं काय झालं... 
मी सांगितले की..
" साब मेरा लडका गुम गया..  रात को साथ में सोया था सुबह गायब हो गया.  धुंडो ना जरा.  "
सायबाने विचारलं..
" नाम क्या है , उमर कितनी है?  "
मी पटदिशी नाव सांगितले..  वय सांगितले. 
साहेबाने हवालदाराला बोलावून घेतले आणि सांगितलं...
" माने तो मुलगा या बाईचा दिसतोय.  जा घेऊन बघू या बाईला.  ओळख पटवा आणि सुपुर्द करा तिला. "
माझ्याकडे वळून म्हणाले.
" एक दो साल का लडका सुबह मिला है.  लेकीन बेहोश है.  शायद उसे अफू सुंघाई है.
तुम्हारे पास कोई प्रुफ है,? उसका फोटो वगैरा?  "
मी घाबरुनच म्हटलं..
" नहीं साब..  हम फुटपाथ पर रहने वाले आदमी कहाँ से फोटू निकाले?  "
" कोई प्रुफ नही?  तो मुश्किल है "

मला त्याक्षणी खुप एकेकटं वाटू लागलं..
शिवू असूनही काही कामाचा नाही...

समोर मिनू आहे..  पण तो माझा आहे हे सिद्ध करायला माझ्याकडे पुरावाच नव्हता.  त्याचा जन्म सुद्धा फुटपाथवर झालेला.  राणी मौसीने केलेलं सर्व. सायबाला दाखवायला पुरावा काहीच नव्हता.

मिनू थोडासा हलला.  बहुतेक त्याला शुद्ध येत होती.  मी ओरडले...

" मिनू...  "

माझा आवाज ऐकून...  तो आजूबाजूला पाहायला लागला.  सायबाने फाईल मधून डोकं वर काढलं.
मिनू माझ्याकडे बघून रडू लागला.  मी उभी राहीली तशी हात उंचावून माझ्याकडे झेपावला.

सायबाला खात्री पटली होती.
" देखो...  तुम्हारा नाम और जहाँ रहते हो..  वहाँ का पत्ता सिपाही के पास लिखवाके जाओ.  गवाही के लिए आना पडेगा.  समझ गयी ना? जाव अभी..  "
मी मिनूला छातीशी धरलं. लक्ष समोरच्या घड्याळात गेलं चार वाजले होते....
दिवस संपायला आला होता.  मी सायबाला नमस्कार करायला गेले तर...
फोन वाजला..
हवालदार माने बोलू लागले...

" बोला... पोलिस स्टेशन..
काय झालंय? ....

कुठे??

अच्छा..  नाव काय आहे?

अच्छा..  शिवेन्द्र.  चर्चगेट समोरच्या फुटपाथवरचा पाकीटमार ना??

कुठे जखम आहे..?

मानेवर?

हां ठिक आहे..  तुम्ही पंचनामा करुन घ्या..  मी येतो सायबांना घेऊन.  "


हे ऐकून मी स्तब्ध झाले..

माझा दिवस मावळला होता..
कायमचा...

Saturday, 14 January 2017

वाऱ्यावरची स्वारी

... वाऱ्यावरची स्वारी ...



कालच संक्रात होऊन गेलीय.  खरंतर हा लेख जरा आधी लिहायचा होता.  पण असो...  आज सकाळी म्हणजे १४ जानेवारी च्या सकाळी उठलो..
ही सकाळ आज जरा कंटाळवाणी वाटली.  हातात चहा चा कप घेऊन घरासमोरच्या गॅलरीत येऊन उभा राहीलो तर अचानक वर आकाशात नजर गेली.  वरती एक लाल रंगाची " ढेप " उडत होती.
 ढेप म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला नंतर,  पण ती दिसल्यावर मी लगेच घड्याळात पाहीले..  पावणे आठ झाले होते.
अचानक काही वर्ष डोळ्यासमोरुन सरसरत मागे गेली..

मी थेट पोहचलो तो मी शाळेत इयत्ता चौथीत असतानाची १४ जानेवारीची सकाळ.
त्यावेळी आम्ही नळबाजारात राहत होतो आणि गिरगावातले नविन घर घेतले होते,  पण तिथे फर्निचर वगैरेचे काम चालू होतं.  नळबाजारच्या खोलीत आकाश दिसायचेच नाही.  त्यामुळे पतंग आणि मांजा हा नुसताच बघून माहीती होता.  पैसे असायचे पण घेऊन करणार काय?  उडवता कोणाला यायची.  नविन घराच्या वरती गच्ची आहे हे एव्हाना आम्हाला...  म्हणजे मला आणि मोठ्या भावाला समजले होते.  आम्ही दोघं नळबाजारच्या घरुन निघालो..  रस्त्यात दर पाच मिनीटात पाच सहा पतंग असे पकडत पकडत गिरगावात पोहचे पर्यंत ३० - ४० पतंग जमवले होते आम्ही दोघांनी.  आयडीया सोप्पी असायची आमची एकाने पतंगाकडे जायचं आणि दुसर्‍याने मांजा पकडायचा प्रयत्न करायचा. बाकी मुलं असत पण या हुशारी मुळे त्यांना मिळतच नसे पतंग एवढ्या सर्व पतंग नेऊन आम्ही नविन घराच्या गच्चीत गेलो.  जमवलेले मांजे गाठी मारुन मारुन पुठ्ठ्याला गुंडाळून झटपट फिरकी बनवली आणि पतंग उडवायचा नाहक प्रयत्न केला.  परंतू ती कशी उडवायची हेच माहीत नसल्याने..  बोट कापून,  दहा बारा पतंग फाडण्यापलीकडे काहीच करु शकलो नाही आम्ही.  परंतू गच्चीवर कापून आलेले पतंग इतक्या संख्येत येत होते की नंतर नंतर आम्ही दोघेही पतंग पकडूच लागलो. आईने संध्याकाळी पाच पर्यंत पुन्हा घरी यायला सांगितलेलं.
आम्ही घरी गेलो तेव्हा दोघांच्या हातात मिळून २०० पतंग तरी असतील.... काय करणार होतो त्या पतंगांचे हे तेव्हा ठरवलंच नव्हते.

पुढल्या वर्षी त्या गच्चीच्या खाली रहायला होतो म्हणजे नविन घरात..  पुर्ण गच्ची आपलीच या थाटात.  मग पुढील दोन तीन वर्ष गठ्ठेच्या गठ्ठे जमू लागले.  एकही पतंग विकत न घेता सकाळी बरोबर ७ वाजता अगोदरच्या आठ दिवस पकडलेले पतंग घेऊन गच्चीवर जायचो आम्ही.  त्यावेळी सकाळी ७ वाजता सुद्धा आकाशात ३० - ४० पतंग असायचे.
शाळेतून लवकर येऊन एकटा एकटाच पंतग उडवायची प्रॅक्टीस करुन करुन शेवटी एकदाचा पतंग आकाशात उडायला लागला.
भावाचा एक मित्र होता. निलेश नावाचा...  त्याला फार आवड.  तो गिरगावात असेपर्यंत नेहमी यायचा.  त्यानेच शिकवले कसं घसीटायचं,  कशी ढिल द्यायची.  डोक्यावर ठेवून थाप कशी मोडायची पतंगाची.  कन्नी कशी बांधायची ती सुद्धा टेक्नीक असते.  तो बारीक मांजा वापरायचा.  म्हणून त्याला घसीटायला लागायचं. भाऊ नेहमी जाडा मांजा वापरायचा.  मी मिडीयम आवश्यकते नुसार घसीटायचं किंवा ढिल द्यायचा.
जरी पतंग एकत्र उडवत असू तरी खरेदी मात्र वेगळी वेगळी व्हायची.  बाबा पैसे द्यायचे दोघांना.  भाऊ त्याच्या मित्रांसोबत जायचा,  मी माझ्या मित्रांसोबत.
माझे वर्गमित्र गोट्या, रवी, सौरभ अजून एक दोघे असे मिळून एकत्र जायचो.  गोट्या जबरदस्त ढापूचंद होता.  आम्ही २-३ रीळ मांजा विकत घेता घेता फिरकी दाखवण्याच्या- बघण्याच्या नादात हा सुमडीत २-३ फिरक्या आमच्या पिशवीत टाकायचा. खरेदी करुन झाली दुकानाबाहेर आलो की समजायचं,  याला तर बिन पैशाचे आठ - दहा रीळ मिळालेत.
मांजा आणि पतंगांची खरेदी म्हणजे एक आवडती गोष्ट होती...
मांजा चा खर तपासून घ्यायचा,  जाड,  मिडीयम, बारीक,  सुरती,  काळा,  सफेद,  अश्या वरायटीज मधून आपल्या खिशाला परवडेल असा मांजा घेणे म्हणजे कसरतच असायची.  मला आठवत नाही की माझं कधी मन मी घेतलेल्या मांजाने भरलंय.
" तो दुसरा होता ना तोच जबरदस्त होता " हीच भावना नेहमी असायची..   आणि सकाळी पहीलीच पतंग "बोहनी" न करता कापली गेली तर ती भावना जास्तच जोर धरायची.
आमच्या गच्चीत दोन जुन्या  फिरक्या नेहमी असत.  पकडलेल्या पतंगांचे धागे त्या फिरक्यांना गुंडाळून ठेवले जात असत.  दोन यासाठी की जाड आणि बारीक दोरा एकत्र केला की मांजाची गिटार व्हायची.  सारखं तुणतुणं वाजत रहायची.
पतंगांची खरेदी फार कमी करायला लागायची आम्हाला.  कारण आमच्या आजूबाजूला राहणारे लोक फार कमी वारा आमच्या दिशेने वाहत असल्याने.  गुल झालेली पतंग सकाळ - संध्याकाळ आमच्या गच्चीवरुनच जायच्या.  काही लांबून सटकू नये म्हणून फांद्या -झाडू लावलेले बांबू गच्चीत वर्षानूवर्ष असायचे.
प्रत्येकाची आवडती पतंग असायची मला संपुर्ण चौकोनी पतंग आवडायची तर भावाला रोबोट पतंग..  कारण ती स्थिर निघायची अनेकदा.  मला शांतपणे पतंग उडवणे कधीच आवडायचे नाही.
आजूबाजूला पतंग आली की ती पटकन कशी कापून ती वरच्यावरच  लटकवून खाली उतरवायची हा प्रयत्न चालायचा माझा.

 आमची गच्ची म्हणजे राजा गच्ची असायची. स्पीकर्सवर दणदणीत गाणी..  नाश्ता,  थंडे याची रेलचेल असायची.  कोणीतरी स्पॉन्सर मिळायचेच.  नाही मिळाले तर आमच्यापैकीच कोणीतरी पैसे काढून आणायला सांगायचा.

संध्याकाळी आजूबाजूच्या गच्चींवर हिरवळ यायची.  मग आमचे डोळे पतंगांपेक्षा तिकडेच जास्त गिरक्या घालायचे.  आम्ही दुर्बिणी सुद्धा वापरल्यात त्यासाठी...  आता हसू येतेय.
पण त्या वयात धमाल होती.

पतंग उडवायला एकटाच शिकल्याने मला फिरकी धरायला कोणाची मदत लागत नसे.  बहीण भरपूर चिडायची यावर कारण तिला फिरकी पकडायला मिळायची नाही.  ( लग्नानंतर पत्निश्री सुद्धा चिडली होती.. )

पुढे शाळा संपली आणि मग कॉलेज सुरु झालं.  मग जरा जास्तीचा उनाडपणा.  पॉकेटमनी सुद्धा जास्त त्यामुळे सुरती मांजे तिकडूनच मागवणे सुरु झालं.  शेजारच्या बिल्डिंगच्या गच्च्या सुद्धा तरुण होत होत्या.  चौथी पासून चष्मा लावणारे आम्ही..  दिसत नसले तरी गॉगल लावून स्टाईल बाजी करायचो..

कधी कधी वारा आम्हाला अनुकुल नसायचा तेव्हा तर तास तास पतंग यायचेच नाहीत..
उडवून पतंगही संपून जायचे.  मग निलेश खाली जाऊन रस्त्यावरच्या मुलांकडून एक  रुपयाला एक अशा पन्नास - साठ पतंग आणायचा. तेही संपले की मग " लंगर " चा खेळ सुरु व्हायचा. आजूबाजूच्या बिल्डिंगवर अडकलेले पतंग.. मांज्याला दगड किंवा तत्सम काहीतरी बांधून ते आपल्या जवळ खेचून आणण्यातही धमाल यायची.  बरं हे अडकलेले पतंग थोडेफार फाटलेले ही असायचे.  मग त्यांचे " ऑपरेशन " करायचे.  मी पक्का सर्जन होतो.
सेलोटेप,  फेविकोल,  काट्या अशी साधनांनी मी नेहमीच तत्पर असायचो.
अगदी थाप मोडताना मधोमध  तुटलेले पतंगांचे कणे देखील एका हाडवैद्याप्रमाणे प्लास्टर करुन ठणठणीत उडायला लागायची ती पतंग.

कॉलेजचे दिवस संपले आणि मग दुकानात जाणे सुरु झालं.
मन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच आकाशात उडायला लागायचे.  पण १४ जानेवारीला दुकान सुरु असायचं त्यामुळे आजूबाजूचा आरडाओरडा ऐकत मन मारुन काम करायला लागायचे.
 पुर्वी आदल्या रात्री पतंगाचे मांजे झोपेत दिसायचे. एका पतंगाने वीस वीस पतंग एका वेळी कापल्याची स्वप्न पडायची. पुढे पुढे गिरगावात पतंग उडायचेच कमी झाले.  एकतर मराठी वस्ती कमी होत गेली त्यातही चाळी कमी होऊन उंच टॉवर होऊ लागले.  छपरांवरची लोकं गच्च्यांवर येऊन पतंगबाजी पेक्षा दारुकाम आणि बाकी सर्व करायला सुरुवात झाली.
त्यामुळे हळूहळू आकाशात पतंग कमी होऊ लागले.

चार पाच वर्षापुर्वी मी शेवटचा पतंग उडवला असेन.
रविवार वगैरे होता त्या दिवशी.  तास दोन तास उडवला पतंग.  फार कोणी नव्हते. पुर्वीची गंमतही नव्हती.  बोटही कापले नाही.

एव्हाना माझा चहा थंड झाला होता..
माझ्या जुन्या पतंगांच्या आठवणींसारखा.

आता.....  आकाशात दोन पतंग वाढले होते आणि ते दोन्ही वाऱ्यावर स्वारी करायला तयार होते.
मीच फक्त त्यापासून दुर होत गेलो होतो...
लहानपण सरल्याने.

Tuesday, 3 January 2017

प्लॅटोनीक

.... प्लॅटोनीक ....


तिने मोबाईलच्या ड्रापडाऊन सेटींग मधून वायफाय ऑन केला आणि पटकन फेसबुकवर जाऊन चॅट ओपन केला.

हात अजूनही ओले होते तिचे.
जेवण करुन उठली आणि मॅक्सीला हात पुसुनच तिने मोबाईल हातात घेतला होता.

तो अॅक्टीव दिसत होता..
नोटिफिकेशन वर दहाचा आकडा दिसत होता.  चेक केले तर सर्व नोटिफिकेशनला त्याचीच अॅक्टीवीटी होती.

तिने
" हाय, मी आले...  😀" असं सेंड केलं.

पंधरा सेकंदाने सीन असं आलं..

" लवकर लवकर जेवलीस की काय?  दहा मिनीटे पण झाली नसतील जावून तूला "
समोरुन रिप्लाय आला.

" आले की जेवून...  कसं जेवले ते माझं मला माहीत..  सोड ना ते.  पुढे सांग ना,  काय झालं?  "
ती जरा सावरुन बसली.

" एक मिनीट...  मला सांग तूझं नेमकं काय चाललंय?
मी बघतोय गेले काही दिवस.  तुझ्या मॅसेजची संख्या आणि तुझे ऑनलाईन राहाणे वाढत चाललंय. पुर्वी नसायचीस एवढी ऍक्टीव तू? "

" हो...  मग? त्यात काय झालं?  तू सुद्धा असतोस की भरपूर वेळ ऑनलाईन,  माझ्याबरोबर गप्पा मारत. "

बराच वेळ मॅसेज सीन येईना. म्हणून तिने वायफाय राऊटर च्या लाईट्स कडे लक्ष दिलं..  चारही लाईट्स व्यवस्थित चालू होत्या...
इतक्यात टायपिंग सुरु झालं.

" 😂😂
काय गं तू? "

त्याने हसण्यावारी नेलं याचा तिला राग आलेला पण तिने ठरवलेले की आज सांगायचंच त्याला.

" ऐ...  एक सांगू तूला?
मला ना कधी कधी कमाल वाटते तूझी. म्हणजे एखादा माणूस अगदी आपल्यासारखाच कसा असू शकतो?
एकाच्या मनात असलेली हुरहुर दुसर्‍याच्या मनात तशीच कशी असू शकते?
जेव्हा वाटत की तुझा मॅसेज आता यावा तेव्हा नेमका तू मॅसेज पाठवतोस?
कधी एकटी बसलेली असते, आणि वाटतं की तू फोन केलास तर छान गप्पा माराव्या,  नेमका पुढच्या मिनीटाला तुझा फोन येतो...
रस्त्याने जात असताना तुझा विचार मनात यायला आणि तू समोर दिसायला परवा एकच झालं..  आठवतंय ना?  "

तीने सेंड केलेलं पटकन सीन झालं...

" प्रेमात पडलीस माझ्या? "

" अगदी तसंच नाही रे पण ते प्लॅटोनीक लव्ह म्हणतात तसंच काहीसं झालंय.  शरीराबद्दल ओढ नाही किंवा तशी कुठली वासना ही नाही..  फक्त तुला भेटण्याची आणि पाहण्याची ओढ,  तासन् तास तुझ्या सोबत बोलण्याची ओढ.. एक आसुसलेपणा आहे रे.  "

" अगं ए... वेडी झालीस का?
इतकं इमोशनल नाही व्हायचं या ऑनलाइन जगात?
तू ना खरंच माझ्या प्रेमात पडलीस.  मी कुठल्या बंधनात राहणारा नाही.  तु जेवायला गेलेलीस तेव्हा मी दुसर्‍या मैत्रिणीसोबतच बोलत होतो की.  मी एक हवा का झोंका आहे..  आज इथे तर उद्या तिथे. माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना माहीत आहे मी कसा आहे तो. माझ्या प्रेमात कोणी पडत नाही,  प्रत्येकाला मी हवा असतो..  मित्र म्हणून.  प्रत्येकाला माझ्या सोबत बोलायचं असतं, माझा सहवास हवा असतो.  पण प्रेम..??
ते माझ्यासाठी नाहीच गं.
मी आहे ना एक झाड आहे...  उजाड माळरानावरचं.  लोक उन्हात तापले की सावलीला,  गार वारा खायला माझ्या जवळ येतात. त्यांना आराम वाटला की ते आपल्या पुढच्या मार्गाला जातात.  देवाने मला अभिशापच दिलाय...

 स्थितप्रज्ञतेचा...

कुणी प्रेमात पडलं तरी आपण निर्विकार राहायचं...
कितीही भावना दाटून आल्या तरी भावनाशुन्य रहायचे..

जगात खुप प्रेम आहे की ते बघत बघत आपण खुश होतो की..  अजून काय पाहीजे. "


" असा कसा रे तू?  तुला काहीच कसं कळत नाही? "

तिचा मॅसेज सीन झाला...

" काही गोष्टी आहेत ना त्या ना कळलेल्याच बऱ्या.. मी या पृथ्वीवर एक अभिशाप घेऊन आलोय.  तो भोगणे हे माझे कर्तव्य आहे.  मला नाही माहीत की तू मागचा जन्म मानतेस की नाही...  पण मी ना हे मागच्या जन्मीचे भोग भोगतोय. या भोगात प्रेमाला जागाच नाही गं अजिबात.
तुला मदत पाहीजे मानसिक, वैचारिक कधीही द्यायला मी तयार आहे.
पण प्रेम....  नाही जमणार मला. मघाशी वर काहीतरी प्लॅटोनीक वगैरे म्हणालीस...  पण तसं नसतं काही.
प्रेम हे फक्त शारीरिक होण्यापुर्वीची मानसिक तयारी असते.  म्हणजे माझं तरी तेच मत आहे.
आणि जर मला शारिरीक व्हायचे नाही तर मानसिक होण्यात काय शहाणपणा आहे ना?
समजतंय ना मी काय बोलतोय ते?  "

ती हे सर्व वाचून सुन्न झाली होती...
डोळ्यातून धारा वाहत होत्या.

" मला नाही काही समजत हे...
मला तू हवा आहेस...  माझे प्रेम म्हणून. "

मॅसेज सीन यायची वाट बघत राहीली ती....

अजूनही बघतेय....

रोज....
कारण त्यानंतर तो पुन्हा कधीच दिसला नाही...  बोलला नाही...  भेटला नाही..