मला आठवतंय तेव्हा पासून मला दोन रुपये पॉकेटमनी मिळत होता. दर शनिवारी पप्पा सकाळी शाळेत जाताना हातावर दोन रुपये ठेवायचे. ' पॉकेटमनी ' हे नाव तेव्हा आम्हाला माहीतच नव्हते. शनिवारी मिळणारे पैसे आणि त्यात शनिवारी सकाळी एक बाई...
" शनिवार वाढा... शनिवार.. "
अशी ओरडत जायची म्हणून
त्या पैशांना आम्ही तिघं भाऊ बहिण " शनिवार " म्हणायचो.. आणि म्हणत आहोत.
शाळेत असताना आमचा खर्च तो काय शाळेच्या कॅन्टीन मधला " चटणीपाव " किंवा फार फार तर " चुरा पाव " कारण तो फक्त पंचवीस पैशांना मिळायचा. रुपयाचा वडापाव किंवा दिड रुपयांचा उसळपाव दहा वर्षात दहा वेळातरी विकत घेऊन खाल्लेला मला तरी आठवत नाही.
आमच्या कडे " बचतपेटी " असायची जिच्यात राहीलेले पैसे एकमेकांना वाढदिवसाला गिफ्ट द्यायला वाचवले जायचे. नळबाजारमध्ये राहत असताना पाच जणांचे कुटूंब, त्यातही एका बाजूला कारखाना दुसर्या बाजूला घर असं घर असल्याने मित्र मंडळी फार नव्हती.
रोज सकाळी चहा पाव असायचा. मम्मी सकाळी पाच पावांचे पैसे द्यायची त्यामुळे काझी स्ट्रीट च्या आतल्या नाक्यावरच्या पाववाल्याकडून कडक नरम पाव घेताना पैशांचा रोज संबंध यायचा..
८७-८८ मध्ये मी एकटा शाळेत जायला लागलो. तिसरी चौथीतच असेन. आर्यन शाळा लांब असली तरी मध्ये कुठेही सिग्नल नसल्याने जाणे - येणे फार कठिण नव्हते.
एव्हाना पॉकेटमनी पाच रुपये झाला होता.
हे पॉकेटमनी वाढवायचे काम बहुतेक मम्मीच करत होती. महागाई दर वाढला की आमचा पॉकेटमनी वाढायचा.
एकटा ये जा करु लागल्याने आणि खिशात पाच रुपये एवढी घसघशीत रक्कम असताना माझी ओळख झाली ती
" कॅडबरी " नामक चॉकलेटशी
तेव्हा ती दोन रुपये आणि पाच रुपये अशा दोनच स्वरुपात मला माहीत होती.. आठवड्यातून दोनदा खायचो मी.
राहिलेल्या रुपयातून चुरापाव आणि पेपरमिंट, लिमलेट.. झालंच तर किसमी असा खर्च व्हायचा. बचत पेटी आता रिकामी राहू लागली.
कॅडबरीने मात्र मला पार वेड लावलेलं.
ते वेड इतकं झालं की मी रोज दोन रुपयाची कॅडबरी खाऊच लागलो. अर्थात हे गणित जुळणारे नव्हतेच..
त्यासाठी आईचे पाकीट हा आसरा होता.. पण ती रोज रोज देणार हे शक्यच नव्हते..
मग सुरु झाली तिला मोठ्यांच्यात चोरी म्हणतात हे पकडले गेल्यावर कळले.
आईच्या पाकीटातून तिच्या नकळत दहा वीस रुपये चोरुन " कॅडबरी " वर खर्च होत होता.
ही चोरी पकडली जाईपर्यंत मी सहजच तीनशे चारशे रुपये चोरले असतीलच.
आमच्याकडे सर्व खरेदी पुरुषच करतात. दुध, भाजी, वाणसामानाची खरेदी पुरुषांतर्फेच केली जाते. त्यामुळे पाकीटातून जाणारे पैसे मम्मीच्या वेळीच लक्षात आले.
त्यानंतर झालेली लोखंडी पट्टीने धुलाई अजूनही आठवते.
१९९० मध्ये गिरगाव - ठाकूरद्वार विभागात गेलो. मोठे प्रशस्त घर.. राहणीमान उंचावली त्यामुळे साहजिकच पॉकेटमनी वाढली. दहा रुपये हे पाचवी सहावीतल्या मुलासाठी पुरेसे होते. ही पॉकेटमनी फक्त खाण्यासाठीच असायची. बाकी खर्च पप्पा स्वतः करायचे, काही हवे असले तर स्वतः आम्हाला घेऊन जायचे. मला प्रकर्षाने आठवते ती दादर वरुन दाऊद दुकानातून घेतलेली ७०० रुपयांची चप्पल सातवी आठवीतच असेन मी.
" आवडली तूला??
घेऊन टाक.. "
असं बोलून आतल्या खिशात हात घातला की आम्ही खुश व्हायचो.
हळूहळू कॅडबरी मी एकटाच न खाता जोडीने खायचे गुलाबी दिवस आले 😍
पॉकेटमनी ५० रुपये झाली होती..
खिशात पाकीट आले होते.
मला आठवतंय पहिलं पाकीट मी ९० रुपयाचे घेतलेले, माझ्याकडे खिशात तेव्हा १०५ रुपये होते. रस्त्यावरच्या दुकानदाराने परत दिलेले दहा रुपये आणि पाच रुपयाची चिल्लर पाकीटात ठेवून मी मिरवत होतो.
५० रुपये पॉकेटमनी असणाऱ्या तरुणाकडे खर्चिक मुली बघायच्या खऱ्या पण सायकलला टांग मारली की बिचाऱ्या हिरमुसून जायच्या.
काही घरगूती मैत्रिणी होत्या त्या मात्र दर शनिवारी हक्काने ३२ रुपयांचा चिकू मिल्कशेक कॉलेज समोरच्या आशा कॅफेत बसून कोपऱ्यात एका स्ट्रॉ ने जोडीने प्यायच्या.. 😂
पण त्यासुद्धा नंतर कंटाळल्या..
डोक्यावर खर्चिक जोडीदार बसला नाही याचे मोठे कारण पॉकेटमनी हे असणारच.
कॉलेज संपता संपता पॉकेटमनीने तीन आकडा गाठला. मित्र मैत्रिणींचा वावर आयुष्यात वाढला. पण मी आहे तसाच राहीलो..
पिकनीक, पार्टी, नाईट आऊट्स वगैरे सर्व अनुभवल्यावरही व्यसनां-प्रलोभनांपासून दुर राहण्याची शिकवण या पॉकेटमनीतूनच मिळाली. आर्थिक सुबत्ता असताना खर्चांवर निर्बंध स्वयंस्फुर्तीने घालण्याची शिकवण या पॉकेटमनीनेच दिली.
आताही एकत्र कुटूंब असताना त्यातही माझे चौकोनी कुटूंब पप्पा पाचशेचा शनिवार आम्हा दोघांना देतात आणि मुलांना १० चा पॉकेटमनी सुरु झालाय.
अर्थात आता " दिवाळी " ही नवीन संकल्पना त्यात वाढलीय जी.. मौज मजा - पिकनिक यासाठी खर्च करावा यासाठी दिली जाते.
कधी कधी वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य हवे होते...
पण आरशात पाहताना वाटते...
की आपण स्वच्छ आणि आनंदी आहोत ते या " पॉकेटमनी " मुळेच.
कोणावर आपले कर्ज नाही आणि आपल्यावर कोणाचे कर्ज नाही.
पैसा येतोय जातोय... तो आधार बनला नाही किंवा फुकटही गेला नाही यातच आनंद..
एकंदरीत या " पॉकेटमनी " ने जगणं सुसह्य नक्कीच केलंय...
माझ्या मुलांवरही हाच प्रयोग सुरु आहे.
" बाबा मला खाऊ आणा " हे सांगताना परीने किंवा
" बाबा पोलिसगाडी आणा " म्हणताना शौर्यने पुढे केलेले त्यांच्या पॉकेटमनीतले दहा रुपये खिशात ठेवताना आणि पुन्हा ते त्यांच्या पिगी बँक मध्ये टाकताना " पप्पा " झाल्याचा भास होतो.
- बिझ सं जय