Thursday, 2 February 2017

उठतोयस्तू

.... उठतोयस्तू ....


सकाळी उठलो तेव्हा रात्री पडलेले स्वप्न चक्क आठवत होते. सहसा रात्री पडलेली स्वप्न सकाळी सकाळी मला तरी आठवत नाहीत.
पण आज मात्र ते सुस्पष्ट आठवत होते..
मी ध्यानस्थ बसलो होतो किती वर्ष कोणास ठावूक.. कारण आजूबाजूला मुंग्यांची वारुळं जमा झाली होती. माझ्या मांडीवर सुद्धा वारुळं होती. दाढी मिश्या पार त्या वारुळात घुसल्या होत्या. मुंग्यांची एक रांग तोंडावरुन केसावरुन पार मागच्या वारुळात जात होती.
माझ्या पाठीमागे एक चमकदार चक्र... प्रभा की काय म्हणतात ते फिरत होतं. बहुतेक मी खुप घनदाट जंगलात तपश्चर्येला बसलो होतो.
समोरच एक तुटलेली पैंजण पडलेली होती...
...म्हणजे अप्सरा वगैरे येऊन गेल्या असाव्यात. त्यांचे नाचकाम, कामुक इशारे स्पर्श वगैरे सर्व झाले असावेत, पण माझी तपश्चर्या मोडणे बहुतेक त्यांना ही जमले नसावे. एकंदरीत माझी तपश्चर्या फलीत होण्याच्या मार्गावर होती.
इतक्यात समोरुन एक प्रकाशाचा ठिपका मोठा मोठा होत जातो.
त्या ठिपक्याचा मोठा सुर्य झाल्यावर आतून आवाज येतो...
" वत्सा... उठ मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे... "
मी मात्र अजिबात हलत नाही. शेवटी दोन चार वेळा " वत्सा वत्सा " केल्यानंतर तो प्रकाशाचा गोळा लुप्त होऊन त्यातून एक दिव्य पुरुष निर्माण होतो.
देवच बहुतेक.. कारण त्याच्याही मागे फिरणारे चक्र... प्रभा की काय म्हणतात ते असतं.
तो देव माझ्या जवळ येतो आणि म्हणतो.
" बिझ बुवा... उठा आता. तुमची तपश्चर्या पुर्ण झाली आहे. देवांकडून मला पाठवण्यात आलेले आहे. तुमचे म्हणणे ऐकून घ्यायला आणि तुम्हाला हवा तो वर द्यायला. . "
हे ऐकून मी हळूहळू डोळे उघडतो.
अचानक प्रकाश डोळ्यात जाऊन आंधळेपणा येतो हे मी चित्रपटात पाहीले असल्याचे आठवते म्हणून हळूहळू डोळे फडफडवत प्रकाशाला डोळे सरावेपर्यंत उघडझाप करतो आणि मग सताड उघडल्यावर समोरच्या दिव्य पुरुषाला नमस्कार करतो.
तो देव आपल्या हातातील फुलातली एक पाकळी माझ्या दिशेने टाकतो आणि माझ्या भोवतीची वारुळं क्षणार्धात गायब होऊन जातात.
मी उठून त्या देवाच्या पायावर लोटांगण घालतो..
" हे देवा .. मी तुझी कीती वेळ वाट पाहीली आज दर्शन झाले. माझी तपश्चर्या सफल झाली.. "
देवाने माझ्याकडे बघत स्मितहास्य केले आणि म्हणाला.
" हो वत्सा... तुला वर द्यायलाच मी आलोय..
बोल काय हवंय तूला. वरती स्वर्गात सर्व देवगण तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत. गेल्या अनेक वर्षात अशी तपश्चर्या करणारा तू एकटाच आहेस. काही लोक उपोषणाच्या नावाखाली बसायचे पण कोणी नसले की गुपचूप खायचे हे आम्ही वरुन पाहत होतो.
बोल तू, काय हवंय तुला...? "
प्रत्यक्ष देवांचा प्रतिनिधि समोरुन मला विचारतोय हे पाहून मला सुचेना की नेमकं काय मागायचं?
मला तपश्चर्येला बसण्यापुर्वी नेहमीच मरणाबद्दल भिती वाटायची म्हणून नेहमी वाटायचं की आपल्याला जर एखाद्याच्या किंवा आपल्याच मरणाची तारीख कळली तर, आपण सर्व तयारी करुन जाऊ शकू आणि इतरांनाही त्याचा फायदा होईल..
म्हणून पटकन तोंडी आलं
" देवा मला मरणाची तारीख अगोदर समजू दे.. "
त्या देवाच्या हातून दिव्य प्रकाश निघाला आणि मुखाद्वारे आवाज आला...
"मी तुला एक मंत्र देतो तो म्हणालास की तूला समोरच्या माणसाची मरणाची तारीख समजेल...
मंत्र आहे...
" उठतोयस्तू... "
क्षणार्धात तो देव गायब झाला आणि समोर पत्निश्री उभी होती...
" अरे घड्याळात बघ की जरा.. ९ वाजलेत..
उठतोयस तू?? की पाणी टाकू आता? "
थंडीत अंगावर पाणी पडणार या भितीने ताडकन उठून उभा राहीलो.
रात्रीच्या स्वप्नावर विचार करत करत सगळं आटपून पत्निश्रीने कोंबडी आणायला बाजारात पाठवले.
कोंबडीवाल्याकडे तुरळक गर्दी होती. खुराड्यात दहा बारा कोंबड्या होत्या.
मनातल्या मनात विचार केला...
" स्वप्न खरं असलं तर? खरोखरच वर मिळाला की माझेच स्वप्न?
मंत्र तर चांगला आठवतोय... बघू का प्रयोग करुन?
करायचा तर या कोंबड्यांवरच करुन बघूया की. "
क्षणभर डोळे बंद केले.. आणि उघडून एका कोंबडीवर लक्ष केंद्रीत केलं.
आणि मंत्र म्हणालो...
" उठतोयस्तू "
अचानक त्या कोंबडीवर एक टॅग दिसायला लागला ज्यावर आजची तारीख होती.
बापरे खरंच की.. मंत्र काम करत होता.
पुढच्या क्षणी खाटीकाने त्या कोंबडीचे वजन केलं आणि सुरी मानेवरुन फिरली...
त्या कोंबडी ची मरणाची तारीख आजचीच होती.
मला घाम फुटला. कसे बसे स्वतःला सावरले आणि मिळेल ती कोंबडी घेऊन घरी परतलो.
" अहो.. यात एक लेगपीसच नाही... तुमचे लक्ष कुठे असतं ओ? "
या आवाजाने माझी तंद्री तुटली. मला खरोखरच वर मिळाला होता.
अजून एकदा प्रयोग करुन पहावा म्हणून मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो. समोरच्या बिल्डींगमधली शकू दिसत होती. बाहेर वऱ्हांड्यात चकरा मारत होती. शकू विशीतली तरुणी.....
आमच्या मजल्यावरच्या शंतूनू सोबत तिचे चक्कर सुरु होते हे आमच्या अर्ध्या बिल्डींगला माहीत होते. म्हटलं बघूया हिच्या  नशीबात काय आहे ते...
डोळे मिटून पुन्हा उघडले आणि मंत्र म्हटला..
" उठतोयस्तू "
बघून हैराण झालो ...
शकूच्या हातात एक कागद होता ज्यावर तारीख लिहिलेली.
२० जानेवारी, २०२०
म्हणजे अजून साधारण ३ वर्षांनी तिचे मरण लिहिले होते. खुप वाईट वाटलं..
ही एवढी सुंदर तरुणी ऐन तारुण्यात जाणार. बिच्चारा शंतनू तो हा धक्का सहनच करु शकणार नाही.
" खिडकीतून कोणाला बघताय ओ साहेब ? या जरा इकडे जरा कांदा - निंबू कापून ठेवा. "
पत्निश्रीचा आदेश आल्यावर धावत जाणे गरजेचे होते. नाहीतर नको ती गडबड व्हायची. खिडकी कायमची बंद होण्यापेक्षा कांदा कापणे कधीही चांगले.
कांद्यांनी येणाऱ्या अश्रुंनी शकूच्या येणाऱ्या मृत्युचे दुःख वाहू दिलं. तरीही पत्निश्रीचं लक्ष गेलंच. तिने विचारलं...
" काही झालंय का? सकाळपासून कसल्यातरी विचारात दिसतोय तू . "
मी नॅपकीनला डोळे पुसत म्हणालो..
" नाही गं.. काहीच नाही.. काही असलं तर सांगतो ना तुला मी नेहमीच "
मी सावधपणे उत्तर दिलं.
" बरं शुऱ्याला फोन करुन बघा. सकाळी लवकर क्रिकेट खेळायला गेलाय. नवीन मोबाइल सुद्धा घेऊन गेलाय सोबत. कुठेतरी पाडून वगैरे घ्यायचा. " तिने पातेल्यात पळी फिरवत डोक्याला हात लावत सांगितलं.
" असा काय तो?
नवीन फोन आहे ना? मैदानावर नेईल का कोणी? आता फोडला बिडला तर मी नाही देणार रिपेयरला पैसे " मी चिडून बोललो.
शुऱ्या तसा हुशार.. अगदी आईवर गेलेला. सातवीतच कॉलेजएवढे ज्ञान होते त्याच्याकडे. अत्यंत टेक्नोसॅव्ही म्हणावा तसा. बिल्डींगमधले सगळे कॉम्प्युटर मोबाइल मध्ये काही गडबड झाली की यालाच येऊन विचारायचे.
कालच... फक्त घरी वापरेन या अटीवर नवीन मोबाईल घेऊन दिला होता त्याला.
फोन करणार तोच महाशय दरवाजातून आत आले..
" बाबा.. कसले सुस्साट फोटो येतात ओ या मोबाईलने. मी बॅटींग करताना विराज ला काढायला सांगितले तर कसले कडक फोटो आलेत, हे बघा " माझ्या हातात मोबाईल देऊन स्वारी आंघोळीला गेली.
खरंच छान फोटो आले होते. दोन चार सेल्फी सुद्धा काढले होते. बसल्या बसल्या कॅमेरा सुरु केला आणि सेल्फी मोड सुरु केला.
स्क्रिनवर दिसत असणाऱ्या स्वतःच्या चेहऱ्याकडे बघून मनात अचानक विचार आला की,
" माझी तारीख बघू का? "
आता विचार आलाय तर बघूच या..
मनाचा ठिय्या करुन डोळे बंद केले आणि उघडले..
आणि मंत्र म्हणालो
" उठतोयस्तू "
मोबाईलच्या स्क्रिनवर माझ्या डोक्यावर आकडा आला " ३०"
बापरे फक्त पाच दिवस आहेत ३० तारखेला.
अंगातून घाम ओघळू लागला, म्हणजे देवाने शक्ती तर दिली पण ती फक्त पाच दिवसच दिली होती. मीच पाच दिवसाने मरणार म्हटल्यावर ती शक्ती मातीमोल होणार. नॅपकीनने चेहरा पुसत असताना.. पत्निश्रीचे लक्ष गेलं. ती धावत जवळ आली...
" काय होतंय तुम्हाला? चेहरा का घाबराघुबरा झालाय? एवढा घाम का फुटलाय? " तिने घाबरुन विचारलं.
आता मला सांगणे गरजेचे होते. कारण मला माझी स्वतःचीच तारीख समजली होती.
मी हळूहळू आवंढे घेत घेत सर्व सांगू लागलो. शुऱ्या सुद्धा बाहेर येऊन ऐकत होता.
स्वप्न सांगितलं, कोंबडी ची गोष्ट, शकूची गोष्ट आणि मग माझी स्वतःची सांगितल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं.
आणि पत्निश्री तोंडाला पदर लावून.....
हसू लागली...
शौर्य सुद्धा वेड्या सारखा हसू लागला माझ्याकडे बोट दाखवून.
मी चिडलो..
" गप्प बसा... तुम्हाला काय माहीत माझ्यावर काय प्रसंग ओढावलाय तो? ..
हसू नका... "
पत्निश्री हसू आवरुन म्हणाली..
" अहो, पोल्ट्रीत काहीतरी नवीन नियम वगैरे आलाय ज्या दिवशी कोंबड्या नेणार त्या दिवशीचा टॅग त्या त्या कोंबडीच्या गळ्यात टाकायचा आहे. आणि ती कोंबडी त्याच दिवशी कापली जाते ज्या दिवशी दुकानात येते. काय तुम्ही? "
" मग शकूचे काय? ती कसली तारीख दिसली मला? "
आता शौर्य पुन्हा खिदळला.
" बाबा.. शंतनू ने तिला विचारलेलं आपण लग्न कधी करायचंय... तीच तारीख दाखवली असेल तिने. विराज सांगत होता मला की दादाने तिला लग्नाबद्दल विचारलंय आणि ती आज त्याला तारीख सांगणार आहे. काय तुम्ही? "
आता मात्र मी पार खजील झालो...
तरीही उसने अवसान आणून म्हटलं.
" मग मोबाइल मध्ये ३० आकडा कसला आला रे? "
शौर्य हसत हसत म्हणाला..
" बाबा ते वय सांगतं सेल्फी मोड मध्ये.. हे बघा... "
असं म्हणुन त्याने मोबाइल समोर धरला..
त्याच्या डोक्यावर १३ चा आकडा होता आणि माझ्या डोक्यावर ४०..
" अहो बाबा जरा हसा.. मग बघा. ३० होईल " तो हसतच होता.
तिकडून पत्निश्री म्हणाली..
" काय होतं ते? हां
उठतोयस्तू "
आणि खरंच मी हसल्यावर ३० आकडा डोक्यावर आला......

No comments:

Post a Comment