Monday, 12 November 2018

नाद ध्वनी

..... नाद ध्वनी ......



संध्याकाळी नेहमीप्रमाणे मंदिरात बसून त्या पवित्र वातावरणात येणारी वेगवेगळी माणसे न्याहाळण्याचे काम मी नेहमीप्रमाणे करत होती. कापसाच्या वाती वळत हे काम माझे नित्यनियमाचे होतं.


वयाची साठी उलटून गेली होती. भरपूर निरोगी आयुष्य मिळालं होतं.

नवरा, दोन मुलं त्यांच्या बायका, त्यांची मुलं. यांच्यातच आयुष्य कधी उतरणीला लागलं ते समजलंच नाही. सगळ्या जबाबदाऱ्या पेलता पेलता आयुष्य जगता आलं नाही याची खंत मनाला राहिलीच.


या मंदिरात आले की खूप शांत वाटायचे.

शंकराचे मंदिर ते…….

मंदिरात येणारा जाणारा प्रत्येक जण घंटा वाजवायचा. तो नाद ध्वनी मला अगदीच सवयीचा झाला होता. त्या आवाजात एक जादू होती.


मी आणि तो …….


आम्ही दोघे गावच्या शंकराच्या देवळात भेटायचो तेव्हा आत येताना मी आधी घंटा वाजवायची.. मग त्याचा ध्वनी थांबण्याआधीच तो पुन्हा वाजवायचा. लागोपाठ येणारा तो आवाज कित्येक दिवसात ऐकला नव्हता. प्रत्येक घंटेचा आवाज वेगळा असतो. पण गावच्या शंकराच्या देवळातल्या त्या घंटेचा नाद ध्वनी आणि या मंदिराच्या घंटेचा नाद ध्वनी हा हुबेहूब असल्यानेच कदाचीत मला या मंदिराची ओढ लागली होती.

देवळात एकत्र दर्शन घेऊन झाले की मग मागच्या नदीच्या तीरावर पाण्यात पाय सोडून बसणे हे नेहमीचेच होते.


मला तो आवडायचा आणि त्यालाही मी आवडायची.

ही आवड मात्र अव्यक्तच राहिली. डोळ्यांची भाषा समजत होती. पण ओठ नेहमीच अव्यक्त राहिले..


त्याचेही आणि माझेही…..

मंदिरातली घंटा वाजली…..अगदी तशीच…  जशी मी वाजवायची…

तो ध्वनी थांबण्याआधीच पुन्हा घंटा वाजली… जसा तो वाजवायचा….

क्षणभर हृदयाचा ठोका थांबला

हातातली वात अलगद निसटली..

एक जोडपे होते… नवरा बायकोच होते.


“ किती वर्षांनी येतोय ना आपण या मंदिरात?” ती बोलली.


‘ तुला आठवतं ...आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्या आजी बसल्यात ना तिथे बसलो होतो “ माझ्याकडे बोट दाखवत तो बोलला. मला उगाचच असहजपणा आला.

त्याच्या हातात नारळ, फुलपुडी होती.


“ मला एवढं लख्ख आठवत नाहीये. पण आपण मंदिरात आलेलो हे आठवतेय. “ तिने त्याचा हात धरला आणि गाभाऱ्याच्या बाहेर असलेल्या हनुमानाच्या मूर्तीकडे ओढले. दोघेही मूर्तीसमोर जाऊन उभे राहीले. भक्तिभावाने हात जोडले… अगदी आम्ही जोडायचो तसेच.


“ देवा ही साथ अशीच राहू दे… तूच एकत्र आणलंस.. तूच एकत्र ठेव आम्हाला…” तो मोठ्याने बोलला.

त्याच्या हातावर चापटी मारत ती बोलली..

“ देवाला मनातलं कळतं… त्यासाठी शब्दांची गरज नसते… “

“ हो बाई बरोबरच आहे… शब्दांची गरज तर तुझ्या-माझ्या सारख्या माणसांना लागते… तुला माझ्या मनातले कुठे ऐकू येतं? तू ही माझ्या प्रेमाची देवता आहेस. मग तुला का शब्दांची गरज लागते? “ तो गालातल्या गालात हसत हसत प्रश्न विचारत होता.


“ चल आता गाभाऱ्यात … तू आणि तुझे न संपणारे प्रश्न…! “ तिची नजर अचानक माझ्याकडे गेली. माझ्या गालावर असणारे मंद हसू तिच्या नजरेने टिपलं होतं.

ते दोघेही गाभाऱ्यात गेले.

गाभाऱ्यातून त्यांचे आवाज येत होते.

“ नारळ कुठे ठेऊ? आणि हा हार तू वाहतेस की मी वाहू? की आपण  दोघांनी एकत्र वाहायचा? “ त्याचे खट्याळ प्रश्न सुरूच होते

दर्शन घेऊन ते दोघे गाभाऱ्यातून बाहेर आले.

मला तिच्या ठिकाणी मीच दिसत होते.

तिची नजर पुन्हा माझ्याकडे गेलीच. तिने लगेच त्याला खुणावले. त्याने माझ्याकडे हसून पाहिले आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावर नजर खिळवली. मंदिराच्या आतच समोर असलेल्या कठड्यावर दोघे बसले.


त्यांना त्यांचे या मंदिरातले जुने दिवस आठवत होते.. आणि मला गावाच्या देवळातले आमचे दिवस….. ते दिवस आठवून माझ्या चेहऱ्यावर आपोआपच हसू फुलत होते. आणि माझा फुलणारा चेहरा बघून तिच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडत होता.

त्यांची बहुतेक जाण्याची वेळ झाली होती.

ती उठली..

“ चल आता.. झाले ना तुझे समाधान?

मला ही इथे एक वेगळे समाधान मिळालंय…

बाहेर जाऊन सांगते तुला….

चल ना आता…” त्याचा हात धरून तिने त्याला उठवलं.

ती त्याला माझ्याबद्दलच सांगणार हे मला कळलं.


त्याचा मात्र पाय तिथून निघत नव्हता. जसा नदीच्या पाय सोडून बसलेला तो  मी निघाले तरी तिथून उठत नसे.

मी थोडी लांब आल्यावर तो उठत असे. त्याला मागे वळून वळून बघताना रस्ता कधी संपून जायचा तेच कळायचं नाही…


घंटा वाजली….


मी पुन्हा भानावर आली. घंटेजवळ हे उभे..

“ राणीसरकार तुम्ही अजून इथेच? “ यांनी मंद मंद हसत विचारले.


“ अहो ते जोडपे बघा ना..  “ बोट दाखवले मात्र … पण ते दोघे नव्हते तिथे.

यांनी चंद्रेश्वराला नमस्कार केला आणि बोलले

“ चला… नातवाला शिकवणीवरून घरी न्यायचे आहे ना? “


मी उठले… गाभाऱ्याकडे हात जोडून नमस्कार केला आणि सवयीप्रमाणे घंटा वाजवली. तो नाद ध्वनी थांबण्याआधीच पुन्हा घंटा वाजली…

अगदी तशीच….

जशी काही वेळापूर्वी जोडप्यातल्या त्याने वाजवली होती…. आणि गावच्या देवळात तो वाजवायचा….

मी मागे वळून पाहिलं…हे होते… मंद मंद हसत…


“ चला आता….

उशीर होत होता ना? “

- बिझ सं जय *sm*  ( १२ नोव्हेंबर, २०१८ )

No comments:

Post a Comment