Sunday, 25 September 2016

प्रवास

प्रवास


शेवटचा श्वास...
मन भरुन घेतला...
कानावर टीं..ssss असा आवाज आला मात्र आणि गात्र शिथील झाले.. हलकं हलकं वाटू लागलं. पुढच्या क्षणी डॉक्टरचा आवाज आला...
ही इज नो मोर.. टेल हीज रिलेटिव..
हा आवाज नेहमी सारखा नव्हता.... गेले २२ दिवस मी डॉक्टरांचा आवाज ऐकला होता. आता मात्र आमच्यात काच उभी असावी असा येत होता..
नर्स यस सर.. बोलून मान डोलावून गेली.
जरा अचंभित झालो पण मग क्षणात लक्षात आलं की..
" आय ऍम नो मोर.. "
वयाच्या ७८ व्या वर्षी मी मेलो होतो. नर्सने दरवाजा उघडला आणि ती बाहेर जाऊ लागली तसा मी सुद्धा तिच्या मागून गेलो दरवाजा बंद होण्याच्या मार्गावरच होता. मला वाटलं की मी धडकतोय की काय. पण नाही मी चक्क दरवाज्याच्या आरपार गेलो. चित्रपटात जशी भुतं आरपार जातात तसंच अगदी..
म्हणजे मी भूत झालो की काय??
छे.. छे... मी कसा भूत होऊ शकतो? इतके सरळ आयुष्य जगलंय मी. पण तुर्तास तो विचार बाजूला ठेवत मी बाहेर निघालो.
नर्सने माधव ला सांगितले होते बहुतेक कारण तो रडायला लागला होता. स्वाती सुद्धा रडू लागली होती. सुमन धीर धरुन असली तरी दुःख तिच्या चेहऱ्यावरचे ही लपत नव्हते. तीने मोबाईल काढला आणि बहुतेक श्रीधर ला फोन लावला...
" बाबा गेले... लवकर या...
हो आत्ताच.. तुम्ही या "
नर्स चेहरा पाडून माझ्यासमोरुनच गेली. गेले २२ दिवस ही माझी सेवा करत होती. भले तिला त्याचा पगार मिळत असेल तरी तिने जे जे केलंय ते सांगणं ही कठीण आहे. माधव धावतच माझ्या समोरुन गेला. मी सुद्धा त्याच्या मागून गेलो.. आता दरवाजाचा अडथळा मला नव्हताच. आता माझे लक्ष त्या "माझ्या " कडे गेले. सुरकुतलेला चेहरा. पण तरीही.. समाधानी होता. जीव नसला तरी मी तसाच दिसत होतो जसा पुर्वी दिसत होतो. माधवाने माझा हात हातात घेतला आणि कोसळला माझ्यावर. बाबा... असा हंबरडा फोडला. माधवा.. तो दिवस आठवला रे ज्या दिवशी पहिल्यांदा तू मला " बाबा " म्हणून हाक मारली होतीस. तुझ्या तोंडचे ते बोबडे शब्द समजायला जरा वेळच गेला मला. पण मग मालती ने जेव्हा सांगितले की " अहो तो बाबा बोलला, कायतरी बाबांचं लाडकं.. मुलं आई बोलतात आणि हा बाबा बोलतोय. "
मालती... अरे इतका वेळ आपण कसे विसरलो तिला. अख्खा जन्म साथ दिली तिने आपल्याला. आता आपण साथ सोडून आलो. काय होईल तिचे आता.. हा धक्का कसा सहन करेल ती?
प्रश्न खुप होते पण उत्तरं माझी मलाच शोधायची होती. कारण तिथे तरी माझं ऐकणारं कोणी नव्हते. सुमन, स्वाती दोघीही आल्या आत मध्ये. स्वाती मोठी ना तू??
बघ की सावर माधवाला... पण हे काय तूच रडतेस?? बाबा... बाबा.. सायकल चालवताना मागचा हात सोडून जेव्हा मी उभा राहीलोय हे जेव्हा तुझ्या लक्षात आलं तेव्हा तू अशीच ओरडली होतीस.. मी पटकन धावून आलेलो तुला सावरायला.. पण आता नाही गं ते शक्य.
आणि सुमन तू तर मधली म्हणून तू नेहमी तक्रार करायचीस की तुमचं माझ्यावर प्रेमच नाही.. असं नव्हतं कधी बाळा. मला सर्वच सारखे. पण.. मी कोणाशी बोलतोय??
कोण ऐकतंय माझं??
मी तर मेलोय.

नर्स पुन्हा आली, तिने माधवाला बोलावले. बहुतेक हॉस्पिटलच्या फॉरमॅलिटीज् पुर्ण करायच्या असाव्यात. नर्स बोलली तास दिड तास लागेलच. हॉस्पिटलची रुग्णवाहिकाच तुम्हाला घरी नेऊन सोडेल. माधव रुमालाने डोळे पुसत ते सर्व ऐकत मान डोलवत होता. नर्स गेल्यावर त्याने फोन काढला..
" हॅलो .. मामा .. मामा कुठे आहेत??
हो मी माधवच बोलतोय कधी निघालेत.. हो येऊ दे. "

सुरेश..
मालतीचा भाऊ. मित्रच खरा तर वयाने १० वर्षांचा फरक तरीही मित्र, मैत्रीतरी कधी मालतीशी लग्न झाल्यावर. सगळ्या सुख दुःखात नेहमी हजर. सर्व काही माहीती याच्याकडे. माधवला योग्य मार्ग दाखवणारा सुद्धा हाच. आज त्याचीच आठवण पहीली माधवला झाली होती..

दोन वॉर्डबॉय आले. बॉडी बांधायला न्यावी लागेल. इथल्या सर्व वस्तू घ्या भरुन. माधवकडे वळून त्याला सांगितले.. " डॉक्टरांनी बोलावलंय तुम्हाला "
माधव डोळे पुसत गेला. सोबत मी सुद्धा गेलो. बाहेर निघतोय तोच बाजूच्या आय सी यू रुम मधून कसलासा आवाज आला...
मी डोकावलं.. तरुणच मुलगा.. अपघात होता बहुतेक डोक्यावरचा मार स्पष्ट दिसत होता. .. मॉनिटरवर १०..९...७...५..आणि मग बीप.. आवाजासोबत शुन्य आणि सरळ रेष...
दुसरे डॉक्टर तिथे होते. त्यांनी मान हलवली. त्याक्षणी मला दिसलं ते मी पहिल्यांदा पाहत होतो. त्या शरीरातून एक दुसरं शरीर.. शरीर नाही.. आकृती बाहेर आली. क्षण भरच स्वतःच्या शरीराकडे पाहीलं आणि पुढच्या क्षणी उघड्या खिडकीतून कोणीतरी खेचल्यासारखं त्याला घेऊन गेले. मी खरंतर घाबरुनच मागे वळलो... समोर स्ट्रेचर वर मीच दिसलो मला. चेहऱ्यावर कापड असलं तरी त्यातूनही मी मला पाहू शकत होतो. दोघेही मघाचेच वॉर्डबॉय मला नेत होते.. माधवा कुठे दिसेना म्हणून मी त्यांच्या मागेच निघालो. ते छान हसत खेळत होते. नेहमीचंच त्यांना ते.. भावना बोथट होतात म्हणे त्यांच्या मृत्यु पाहून पाहून.
एका खोलीत नेलं माझ्या शरीराला. पटापट कापड लावून शिवूनही टाकलं. पाय आणि तोंड तेवढं मोकळं ठेवलं. मी तिथून बाहेर आलो पुन्हा ज्या खोलीत मी २२ दिवस काढले त्या खोलीत गेलो. स्वाती आणि सुमन सर्व सामान हुंदके देत देत पिशव्यांमध्ये भरत होत्या. माधव मागून कधी आला ते कळलंच नाही. तो चक्क माझ्यातूनच आरपार गेला. क्षणभर त्याने मागे वळून पाहीलं सुद्धा.
" ताई.. घरी फोन केलेलास ना? पंधरा मिनीटात निघू आपण घरी.
सर्व सोपस्कार झालेत. मामा सुद्धा आलाय. ड्रायव्हरसोबत बोलायला गेलाय "

सुमन सावरली होती बहुतेक. " हो घरी कळवले. सुजित ला सुद्धा सर्व नातेवाईकांना सांगायला सांगितलं. त्याच्याकडे आहेत सर्व कॉन्टॅक्ट.
श्रीधर सुद्धा कळवतोय त्याला घरीच यायला सांगितलंय डायरेक्ट. "
माधव पुन्हा फिरला. बहुतेक तो सुरेश कडेच जाईल म्हणून त्याच्या मागोमाग निघालो. सुरेश ड्रायव्हरसोबतच बोलत होता. परळ ते ताडदेव हा रस्ता तसा सोप्पाच पण संध्याकाळची वेळ बघता कीती उशीर होईल याची काळजी सुरेशला लागली होती. ड्रायव्हर त्याला सांगत होता की, आपण सायरन लावून गेलो तर लवकर जाऊ.
सुरेश ने घड्याळ्यात बघत फोनवर सांगितले... " साडे सात पर्यंत पोहचू. सुरेंद्र आला की त्याला सुजितसोबत स्मशानभुमीत जायला सांगा.. हो झेरॉक्स घेऊनच निघालाय तो... इलेक्ट्रिक नको म्हणाला माधव. हो हो.. नाना चौकात पोचलो की फोन करेन बाकी तयारी करुन ठेवा... "

सुरेश नेहमीच्या आविर्भावातच होता. कदाचित दुःख लपवण्याचा तोच एक मार्ग होता त्याच्याकडे.
स्वाती, सुमन वरुन आल्या, त्यांच्या मागोमाग स्ट्रेचर वर मी येत होतो. खाड खाड आवाज करत स्ट्रेचर रुग्णवाहिकेत ठेवलं गेलं. माधव, सुमन, स्वाती सोबत बसले. सुरेश ड्रायव्हरसोबतच पुढे बसला. त्याने अजूनही माझा चेहरा पाहायचं टाळलं होतं. रुग्णवाहिका निघाली. मी सुद्धा बंद दरवाज्यातून आत जायचा प्रयत्न करु लागलो परंतू मला आत जाताच एक झटका बसला. काही कळलंच नाही. मग समजलं शरीराजवळ जाण्यासाठी मज्जाव होता या क्षणी मला. मला मग तसाच पुढे सुरेशच्या बाजूला गेलो..
तो डोळे पुसत होता. सुरेश रडत होता... मोठी गोष्ट होती ही माझ्यासाठी. स्वतःचे वडील वारले तेव्हा सुद्धा याला रडताना मी पाहीलं नव्हते. त्याच्या चेहऱ्याकडे बघत बघत कधी नानाचौक आलं ते कळालंच नाही. सुरेश ने फोन केला." हॅलो.. हां सिद्धेश.. ऐक.. नानाचौकात आलोय म्हणून सांग "
रुग्णवाहिका वाडीमध्ये शिरली तसा मी बाहेर आलो. संपुर्ण बालपण गेलंय या वाडीत. एक एक करुन गोळा व्हायचो आणि खुप मस्ती करायचो. हळू हळू एक एक मित्र कमी होत गेला. आणि आता तर मी सुद्धा कमी झालो होतो. रुग्णवाहिका चाळीच्या दरवाजासमोरच थांबली होती. नेहमी चाळीमध्ये यायचं म्हणजे एक दिव्य असायचं. पुर्ण फुटपाथ भर गाड्या असायच्या. जिवंत असताना कधीही कोणी हा विचार केला नव्हता की वयस्कर माणसाला किती त्रास होत असेल. आणि आता... निष्प्राण देहासाठी पुर्ण फुटपाथच नव्हे तर समोरचा रस्ता सुद्धा रिकामा करुन ठेवलेला होता. एक एक चेहरे बघत पुढे पुढे जात होतो. माधवचे मित्र, सुमन- स्वातीच्या सासरची माणसं, काही ओळखीची तर काही अनोळखी. १०० लोकं तरी असतीलच बाहेर, शिवाय चाळीत बसलेले, घरात असलेले.
एव्हाना "बॉडी" ला घरात नेलं होतं. मी घरात जायचा प्रयत्न केला पण नाही शक्य झाले. काहीतरी होतं जे मला आत जाऊनच देत नव्हते. मग तिथूनच ऐकू लागलो. सर्वजण रडत होते.
एका कोपऱ्यात मालती दिसली....

मालती...
आपलं लग्न फारच लवकर झालं होतं ना गं..
तू शाळेतून दहावी पास झालीस आणि मी तुला पाहायला आलेलो. नकार देण्यासारखं काहीच नव्हते तुझ्यात.. मग संसार, मध्यंतरी... बाबांच्या जाण्याने फरक पडला होता.. पण मग चांगली नोकरी मिळाली आणि दिवस पुन्हा पुर्वीसारखे झाले. तिन्ही मुलांचा जन्म. त्यानंतर त्यांची काळजी घेणे. मला फुफ्फुसाचा त्रास सुरु झालाय हे सुद्धा तुलाच लक्षात आलेलं. काय आणि कीती आठवू? वयाची पंच्चावन वर्ष एकत्र घालवली आपण. सर्वसामान्य संसार असला तरी तू सोन्याचा केलास तो. अगदी शेवटी शेवटी सुद्धा तूच होतीस माझ्यासोबत. माधवकडे आलो काय आणि अचानक त्रास सुरु झाला काय. अचानक हे सर्व झाले आणि आता तर मी तुझ्या समोर असूनही तूला पारखा झालोय.
एक एक चेहरे ओळखीचे आणि अनोळखी सुद्धा. पण सर्वांच्या चेहऱ्यावर कमालीचं दुःख. ते ही माझ्यासाठी...
बाहेर तिरडी बांधत होते पहिल्या मजल्यावरचा सुर्वे आणि सुरेश घाई घाई करत होते. संध्याकाळचे साडे आठ झाले होते.
रडे ऐकत ऐकतच सर्वांकडे पाहत होतो एका कोपऱ्यातून. सुरेश आत आला.." चला, दोघांनी वर डोक्याकडे पकडा आणि दोघांनी पायाकडे एकाने मधे हात द्या. "
पुढच्या मिनीटात माझा देह बाहेर होता तिरडीवर....
बांबूची तिरडी... माधवा, तू मला कधीही खाली झोपून दिले नाहीस. शेवटी शेवटी तर डनलोपची गादी आणलीस, खोलीला एसी लावून घेतलास. खुप केलंस रे माझ्यासाठी पोरा तू...

दर्शनाची रांग लागली. अंगावर हार पडू लागले. आणि मग शेवटी तिरडी उचलली गेली..

जय राम.. श्री राम... जय राम.. श्री... राम...
मागून मालतीचा क्षीण आवाज " नका रे नेऊ.. त्यांना ".
नाही ऐकणार तुझे कोणी.. मालती काय राहीलंय त्या देहात??
हे बघ मी देहमुक्त झालोय आता. एकदम रुग्णवाहिकेचा आवाज सुरु झाला. चंदनवाडी स्मशानभुमीत न्यायचे असल्याने रुग्णवाहिकेला पर्याय नव्हता.. रुग्णवाहिका???
आता ती शववाहीनी झाली होती.

थोड्याच वेळात चंदनवाडी स्मशानभुमीत पोहचली गाडी. यावेळी मला माधवच्या बाजूला बसायला मिळाले. हातात मडके धरलेला माधव. सारखे डोळे पुसत होता, चष्मा काढून काढून..
आठवतंय का रे??
पाचवीला असताना असाच डोळे पुसत आला होतास.. बाईंनी मारलं म्हणून. फळ्यावरचं लिहीताना चुकत होतं सारखं. तेव्हा लक्षात आलं आम्हाला की तुला सुद्धा चष्मा लागला ते. पहिल्या चष्म्याचे पहिले काही दिवस काय ऐट होती तुझी.. आठवतेय रे मला.
जय राम... श्री राम... जय राम.. श्री... राम.
सरण अगोदरच रचले होते. गुरुजी सुद्धा आले होते. निकम वारले तेव्हाही हेच गुरुजी होते. तिरडीवरुन उचलून माझ्या देहाला...
माझ्या?? तो तरी आता कुठे माझा राहीला होता? जवळ जाऊ शकत नव्हतो की स्पर्श करु शकत नव्हतो.
सर्व बंध सुटले होते आता......

पाणी पाजायची तयारी सुरु झाली. पाणी नुसतंच तोंडात पडत होतं. एक एक जण नमस्कार करुन बाजूला उभा राहत होता.

संस्कार सुरु केले.. गुरुजींनी...
संपुर्ण देहावर लाकडं रचली, त्यावर घी ओतले. आणि अग्नि लागला...

गुरुजी बोलले.
" प्रदक्षिणा घाल आणि मडके या कोपऱ्यात सोडून दे... "

एकवार माधवच्या चेहऱ्याकडे लक्ष गेले. पेटणाऱ्या लाकडात त्याचा चेहरा स्पष्ट दिसला.
" धडाम् " असा आवाज झाला.. मडकं जमीनीवर पडून फुटलंच मात्र,

मला अचानक झटका बसला... मी त्या सरणावरच्या चिमणीकडे खेचला जाऊ लागलो. हॉस्पिटलमधले ते दृश्य डोळ्यासमोर आले. मग त्याला का असे तात्काळ नेलं? मला हे सर्व दुःख दाखवण्याचे कारण काय... ?

मी पुर्ण वेगाने खेचला गेलो त्या चिमणीकडे. ....

प्रकाश प्रकाश आणि फक्त प्रकाश..

माझा प्रवास सुरु झाला होता.. त्या प्रश्नासोबतच

No comments:

Post a Comment