Wednesday, 28 September 2016

खेकडा कसा खावा

खेकडा कसा खावा...

आता तुम्ही म्हणाल.. हा काय प्रकार? पण खरी गोष्ट ही आहे की अनेक लोकांना खेकडा कसा खातात हेच माहीत नाही. बरं त्याची माहीती घ्यायला गुगल वगैरेवर गेलात तर तिथेही तुम्हाला नुसत्या रेसीपीच दिसतील.
म्हणून शेवटी आज ठरवलं की " खेकडा कसा खावा? " या विषयावर लिहूया काहीतरी जेणेकरुन ज्यांना इच्छा आहे ते तरी खातील.

असे म्हणतात की..
" पृथ्वीवर जर स्वर्ग सुखाचा अनुभवायचा असेल तर खेकडा जरूर खावा ".

तर...माझ्यामते खेकडा दोन प्रकारे चांगला लागतो.
एक म्हणजे त्याचे कवच काढून आतल्या पेंद्याचे दोन तुकडे करुन आणि आंगडे ( मोठे) आणि आंगड्या ( बारीक) कालवणात शिजवून.. आणि दुसरा प्रकार म्हणजे बेसन,आले, कढीपत्ता, तिखट, गरम मसाला, कांदा-लसूण पेस्ट चे सारण कवचात भरुन वरुन पुन्हा पेंदा वर घट्ट बसवून रस्सा करुन केला जाणारा "भरलेला खेकडा ". यातही आंगडे असतात.
पण आपण तो कसा बनवायचा यावर जास्त चर्चा न करता, तो कसा खायचा यावर लक्ष केंद्रित करणार आहोत.
तर समोर भरलेल्या खेकड्याची डिश आहे असे डोळ्यासमोर आणा. ताट आहे. ताटात दोन भाकऱ्या, खेकड्याच्या बारीक आंगड्या वाटून त्याचे बनवलेले तवंगयुक्त कालवण, आणि मोठी डिश भरुन मसालेदार एक संपुर्ण भरलेला खेकडा, त्याचे दोन भरीव आंगडे सुद्धा सोबतीला आहेत, सोबतीला चकतीचा कांदा आणि गरमागरम पांढरा शुभ्र भात.
आलं का तोंडाला पाणी. जरा पुसून घ्या..
खेकडा खाणे हे सोप्पे काम नाही हे जरी खरे असले तरी काही टिप आहेत ज्यांनी ते सुखकर होते. ते मी लेखाच्या शेवटी सांगेन.
तर...
सुरुवात करताना एकदमच खेकड्याला हात घालू नका. भाकरीचा एक तुकडा मोडून त्या डिशमधल्या मसाल्या सोबत सुरुवात करा. दोन तीन तुकडे झाले की मग खेकड्याला हात घातला तरी चालेल.
एक लक्षात असू द्या... एका हाताने खेकडा खाता येत नाही. किंबहुना खाण्याचा प्रयत्न केलात तर हवी तशी चव घेताही येत नाही.
मसाल्याने पुरेपुर भरलेला तो खेकडा डिशमध्येच उघडावा.... म्हणजे पेंदा बाजूला करावा, आतमध्ये जे सारण ( मसाला) भरलेले असेल ते तुम्हाला दिसू लागेल. लगेच त्यावर तुटून पडू नका. कारण ती गोष्ट चवीने खायची आहे. काढलेल्या पेंद्याचे दोन भाग करा..
तत्पुर्वी त्यावर जे राखाडी मातकट रंगाचे सहा - सहा असे दोन भागात कल्ले ( वेगवेगळे शब्द आहेत त्याला) असतात ते काढावे. काही लोक खातात, पण आई म्हणते त्यात माती असते म्हणून ते खाऊ नये. दोन भाग केल्यावर तुम्हाला कवचाच्या ( हे कवच खेकड्याच्या पोटाखाली असते, साधारण नरम म्हणता येईल असेच असते) आतला सफेद नरम भाग दिसायला लागेल. तंतूयुक्त हा भाग काढून तो डिशमधल्या मसाल्यासोबत ठेवावा, हे करताना दोन्ही हात वापरावेच लागतात. पेंदा काढून झाला की पुन्हा भाकरी कडे मोर्चा वळवावा. मसाल्यात काढलेला पेंदा आणि भाकरी यांचा चवीचवीने आस्वाद घ्यावा. अर्ध्या पेंद्यासोबत अर्धी - पाऊण भाकरी संपतेच. संपूर्ण भाकरी त्या डिशमधल्या खेकड्यावर न संपवता, मध्येच एखादा तुकडा त्या आंगड्यांच्या कालवणाशी " बोलून " ( बुडवून) खावा म्हणजे आणखीन चव येते.
एक भाकरी संपली की उपलब्ध असलेल्या दोन आंगड्यांपैकी मोठा आंगडा उचलावा. आंगड्याला अनेक ठिकाणी काटे असतात त्यामूळे धसमुसळेपणा करु नये. नाहीतर जेवण होई पर्यंत खेकड्याने केलेल्या जखमेत मसाला जाऊन जाऊन ' हा.. हूं.. ' करावे लागेल. तर.. हे काटे सांभाळून आंगड्याचा मागचा भाग... जो कवचाला चिकटलेला असतो तो. अलगद उजव्या दाढेखाली धरावा. हळूहळू जोर वाढवत गेल्यावर " कड कड " आवाजानिशी तो तुटेल. तुटताच क्षणी आतून पाणी बाहेर येईल ते एकतर मसाल्यात जाऊ द्यावे किंवा स्ट्रॉ प्रमाणे ओढून घ्यावे. खेकड्याच्या आकारानुसार हा दाब किती द्यायचा हे प्रत्येकाने ठरवावे. अगदी अक्रोड फोडल्याप्रमाणे.
वरील कवच्या बाजूला काढून आतील तंतूयुक्त मांस खावे. जे मांस बोटाने निघत नसेल ते आंगड्यांच्या पुढच्या भागाने कोरुन काढावा. दोन्ही आंगड्यांचा मागचा भाग या प्रकारेच सफाचट करुन टाकावा
अर्थात ही क्रिया ज्यांचे दात, हिरड्या आणि दाढा मजबूत आहेत त्यांनीच करावी. बाकीच्यांनी सांडशी, खलबत्ता अगदी काहीच नाही मिळाले तर हातोडा अशी शस्त्रे वापरुन हे युद्ध खेळावे. मागचा भाग संपल्यावर पुन्हा राहीलेली भाकरी आणि कवचातला मसाला बोटाने कोरुन खावा. खेकडा जर " मांदाललेला " असेल तर सोन्याहुन पिवळं..
एव्हाना आपली भाकरी संपली असे गृहीत धरुया.
आता राहीलेला पेंदा उघडावा. तो पुन्हा मसाल्यात मिक्स करावा किंवा तो असाही खाल्ला तरी चालतो.
भात फोडावा. त्यावर ते वाटलेल्या आंगड्यांचे कालवण ओतावे. एक घास भात घेतल्यावर तो मसालायुक्त पेंदा आणि कवचातले सारण असे एकत्र करुन खावे.
अर्धा भात संपेपर्यंत उरलेल्या "आ" वासून असलेल्या आंगड्याकडे बघू ही नये. त्याचे कारण असे की, जर तुम्ही आंगड्यात गुंतलात तर भात एकदम गारेगार होऊन जातो.
भात अर्ध्यावर आला की मग आंगड्यांच्या पुढच्या भागाकडे लक्ष केंद्रित करावे. या भागात जरा जास्तच काटे असतात. तेव्हा जरा सांभाळूनच शक्य असल्यास ते काटे तोडून घ्यावे ( उपलब्ध हत्यारांनी, खलबत्ता, सांडशी वगैरे) .
ज्यांना आपल्या दातांवर पुर्ण भरवसा आहे अशांनीच पुन्हा तो आंगड्याचा पुढचा भाग ज्याने खेकडा चावतो तो उजव्या दाढेखाली धरुन त्याचे कवच फोडावे. याला जरा जास्तच जोर काढावा लागतो, त्यामुळे जरा जीभ सांभाळावी. नसेल जमत तर आपल्याकडे हत्यारे आहेतच.
कवच फुटले की कवचाच्याच आकाराचे तंतूयुक्त मांस तुम्हाला दिसेल. हातामध्ये चावरा भाग धरुन वरील कवच काढून टाकावे.
थांबा....
थेट खायला जाऊ नका, कसंही चावायला ते चिकन नाही. या भागात एक अभ्रकाप्रमाणे पापुद्रा असतो त्याच्या भोवती हे मांस असते त्यामुळे शेवग्याची शेंग जशी ओढून खातात तसा हा आंगडा खायचा. एकदा या बाजूने.. एकदा त्याबाजूने. पापुद्र्यावरचे मांस संपले की चावऱ्या भागाचे दोन्ही भाग वेगळे करायचे. त्यामध्ये सुद्धा मांस असते ते खावे. दोन्ही आंगडे खाईपर्यंत तुमचा भात हमखास गार होतोच होतो. मग राहीलेला मसाला, कवचातले सारण भातासोबत एकत्र कालवून खावे.
नेहमीच्या जेवणापेक्षा खेकड्याच्या जेवणाला दहा ते पंधरा मिनिटे अधिक लागतात. दोन्ही हात भरत असल्याने पाण्याच्या ग्लासालाही खरकटे होते हे लक्षात असुद्या.
अशाप्रकारे आपण आज खेकडा कसा खावा हे शिकलो. कालवणातला खेकडासुद्धा याच प्रकारे खातात. पण त्यात कवचात मसाला नसल्याने तेवढी मजा नसते हे माझे स्वतःचे म्हणजे बिझ सं जयचे मत आहे.
( हॉटेल आणि रेस्टोरेंट मध्ये आंगडे हे सहसा थोडेसे फोडूनच दिले जातात, त्यामुळे तिथे सांडशी आणि खलबत्ता कसा न्यायचा हा प्रश्न विचारु नये.)
टिप :- खेकडा साफ करताना आंगड्यांवर असलेले काट्यांची टोके मोडल्यास, खायला सुखकर होते.
मसाला खेकड्यात मसाला भरल्यावर साध्या दोऱ्याने घट्ट बांधल्यास चव आणखीन वाढते आणि सारण सुद्धा मसाल्यात येत नाही.
खेकडा जास्तच मोठा असेल तर एक फटका शिजवण्यापुर्वीच आंगड्यांवर मारावा. म्हणजे पुढे ते फोडायला आणि खायला सोप्पे जाईल)
आपलाच खेकडा... आय मीन मित्र
-बिझ सं जय
( खास तळटीप - ज्यांना कोणाला खायचे शिकायचे आहे त्यांनी एखाद्या रविवारी आम्हाला बोलवून प्रात्यक्षिकासाठी आमंत्रण दिल्यास आम्ही निश्चित येऊ  ।)

Sunday, 25 September 2016

प्रवास

प्रवास


शेवटचा श्वास...
मन भरुन घेतला...
कानावर टीं..ssss असा आवाज आला मात्र आणि गात्र शिथील झाले.. हलकं हलकं वाटू लागलं. पुढच्या क्षणी डॉक्टरचा आवाज आला...
ही इज नो मोर.. टेल हीज रिलेटिव..
हा आवाज नेहमी सारखा नव्हता.... गेले २२ दिवस मी डॉक्टरांचा आवाज ऐकला होता. आता मात्र आमच्यात काच उभी असावी असा येत होता..
नर्स यस सर.. बोलून मान डोलावून गेली.
जरा अचंभित झालो पण मग क्षणात लक्षात आलं की..
" आय ऍम नो मोर.. "
वयाच्या ७८ व्या वर्षी मी मेलो होतो. नर्सने दरवाजा उघडला आणि ती बाहेर जाऊ लागली तसा मी सुद्धा तिच्या मागून गेलो दरवाजा बंद होण्याच्या मार्गावरच होता. मला वाटलं की मी धडकतोय की काय. पण नाही मी चक्क दरवाज्याच्या आरपार गेलो. चित्रपटात जशी भुतं आरपार जातात तसंच अगदी..
म्हणजे मी भूत झालो की काय??
छे.. छे... मी कसा भूत होऊ शकतो? इतके सरळ आयुष्य जगलंय मी. पण तुर्तास तो विचार बाजूला ठेवत मी बाहेर निघालो.
नर्सने माधव ला सांगितले होते बहुतेक कारण तो रडायला लागला होता. स्वाती सुद्धा रडू लागली होती. सुमन धीर धरुन असली तरी दुःख तिच्या चेहऱ्यावरचे ही लपत नव्हते. तीने मोबाईल काढला आणि बहुतेक श्रीधर ला फोन लावला...
" बाबा गेले... लवकर या...
हो आत्ताच.. तुम्ही या "
नर्स चेहरा पाडून माझ्यासमोरुनच गेली. गेले २२ दिवस ही माझी सेवा करत होती. भले तिला त्याचा पगार मिळत असेल तरी तिने जे जे केलंय ते सांगणं ही कठीण आहे. माधव धावतच माझ्या समोरुन गेला. मी सुद्धा त्याच्या मागून गेलो.. आता दरवाजाचा अडथळा मला नव्हताच. आता माझे लक्ष त्या "माझ्या " कडे गेले. सुरकुतलेला चेहरा. पण तरीही.. समाधानी होता. जीव नसला तरी मी तसाच दिसत होतो जसा पुर्वी दिसत होतो. माधवाने माझा हात हातात घेतला आणि कोसळला माझ्यावर. बाबा... असा हंबरडा फोडला. माधवा.. तो दिवस आठवला रे ज्या दिवशी पहिल्यांदा तू मला " बाबा " म्हणून हाक मारली होतीस. तुझ्या तोंडचे ते बोबडे शब्द समजायला जरा वेळच गेला मला. पण मग मालती ने जेव्हा सांगितले की " अहो तो बाबा बोलला, कायतरी बाबांचं लाडकं.. मुलं आई बोलतात आणि हा बाबा बोलतोय. "
मालती... अरे इतका वेळ आपण कसे विसरलो तिला. अख्खा जन्म साथ दिली तिने आपल्याला. आता आपण साथ सोडून आलो. काय होईल तिचे आता.. हा धक्का कसा सहन करेल ती?
प्रश्न खुप होते पण उत्तरं माझी मलाच शोधायची होती. कारण तिथे तरी माझं ऐकणारं कोणी नव्हते. सुमन, स्वाती दोघीही आल्या आत मध्ये. स्वाती मोठी ना तू??
बघ की सावर माधवाला... पण हे काय तूच रडतेस?? बाबा... बाबा.. सायकल चालवताना मागचा हात सोडून जेव्हा मी उभा राहीलोय हे जेव्हा तुझ्या लक्षात आलं तेव्हा तू अशीच ओरडली होतीस.. मी पटकन धावून आलेलो तुला सावरायला.. पण आता नाही गं ते शक्य.
आणि सुमन तू तर मधली म्हणून तू नेहमी तक्रार करायचीस की तुमचं माझ्यावर प्रेमच नाही.. असं नव्हतं कधी बाळा. मला सर्वच सारखे. पण.. मी कोणाशी बोलतोय??
कोण ऐकतंय माझं??
मी तर मेलोय.

नर्स पुन्हा आली, तिने माधवाला बोलावले. बहुतेक हॉस्पिटलच्या फॉरमॅलिटीज् पुर्ण करायच्या असाव्यात. नर्स बोलली तास दिड तास लागेलच. हॉस्पिटलची रुग्णवाहिकाच तुम्हाला घरी नेऊन सोडेल. माधव रुमालाने डोळे पुसत ते सर्व ऐकत मान डोलवत होता. नर्स गेल्यावर त्याने फोन काढला..
" हॅलो .. मामा .. मामा कुठे आहेत??
हो मी माधवच बोलतोय कधी निघालेत.. हो येऊ दे. "

सुरेश..
मालतीचा भाऊ. मित्रच खरा तर वयाने १० वर्षांचा फरक तरीही मित्र, मैत्रीतरी कधी मालतीशी लग्न झाल्यावर. सगळ्या सुख दुःखात नेहमी हजर. सर्व काही माहीती याच्याकडे. माधवला योग्य मार्ग दाखवणारा सुद्धा हाच. आज त्याचीच आठवण पहीली माधवला झाली होती..

दोन वॉर्डबॉय आले. बॉडी बांधायला न्यावी लागेल. इथल्या सर्व वस्तू घ्या भरुन. माधवकडे वळून त्याला सांगितले.. " डॉक्टरांनी बोलावलंय तुम्हाला "
माधव डोळे पुसत गेला. सोबत मी सुद्धा गेलो. बाहेर निघतोय तोच बाजूच्या आय सी यू रुम मधून कसलासा आवाज आला...
मी डोकावलं.. तरुणच मुलगा.. अपघात होता बहुतेक डोक्यावरचा मार स्पष्ट दिसत होता. .. मॉनिटरवर १०..९...७...५..आणि मग बीप.. आवाजासोबत शुन्य आणि सरळ रेष...
दुसरे डॉक्टर तिथे होते. त्यांनी मान हलवली. त्याक्षणी मला दिसलं ते मी पहिल्यांदा पाहत होतो. त्या शरीरातून एक दुसरं शरीर.. शरीर नाही.. आकृती बाहेर आली. क्षण भरच स्वतःच्या शरीराकडे पाहीलं आणि पुढच्या क्षणी उघड्या खिडकीतून कोणीतरी खेचल्यासारखं त्याला घेऊन गेले. मी खरंतर घाबरुनच मागे वळलो... समोर स्ट्रेचर वर मीच दिसलो मला. चेहऱ्यावर कापड असलं तरी त्यातूनही मी मला पाहू शकत होतो. दोघेही मघाचेच वॉर्डबॉय मला नेत होते.. माधवा कुठे दिसेना म्हणून मी त्यांच्या मागेच निघालो. ते छान हसत खेळत होते. नेहमीचंच त्यांना ते.. भावना बोथट होतात म्हणे त्यांच्या मृत्यु पाहून पाहून.
एका खोलीत नेलं माझ्या शरीराला. पटापट कापड लावून शिवूनही टाकलं. पाय आणि तोंड तेवढं मोकळं ठेवलं. मी तिथून बाहेर आलो पुन्हा ज्या खोलीत मी २२ दिवस काढले त्या खोलीत गेलो. स्वाती आणि सुमन सर्व सामान हुंदके देत देत पिशव्यांमध्ये भरत होत्या. माधव मागून कधी आला ते कळलंच नाही. तो चक्क माझ्यातूनच आरपार गेला. क्षणभर त्याने मागे वळून पाहीलं सुद्धा.
" ताई.. घरी फोन केलेलास ना? पंधरा मिनीटात निघू आपण घरी.
सर्व सोपस्कार झालेत. मामा सुद्धा आलाय. ड्रायव्हरसोबत बोलायला गेलाय "

सुमन सावरली होती बहुतेक. " हो घरी कळवले. सुजित ला सुद्धा सर्व नातेवाईकांना सांगायला सांगितलं. त्याच्याकडे आहेत सर्व कॉन्टॅक्ट.
श्रीधर सुद्धा कळवतोय त्याला घरीच यायला सांगितलंय डायरेक्ट. "
माधव पुन्हा फिरला. बहुतेक तो सुरेश कडेच जाईल म्हणून त्याच्या मागोमाग निघालो. सुरेश ड्रायव्हरसोबतच बोलत होता. परळ ते ताडदेव हा रस्ता तसा सोप्पाच पण संध्याकाळची वेळ बघता कीती उशीर होईल याची काळजी सुरेशला लागली होती. ड्रायव्हर त्याला सांगत होता की, आपण सायरन लावून गेलो तर लवकर जाऊ.
सुरेश ने घड्याळ्यात बघत फोनवर सांगितले... " साडे सात पर्यंत पोहचू. सुरेंद्र आला की त्याला सुजितसोबत स्मशानभुमीत जायला सांगा.. हो झेरॉक्स घेऊनच निघालाय तो... इलेक्ट्रिक नको म्हणाला माधव. हो हो.. नाना चौकात पोचलो की फोन करेन बाकी तयारी करुन ठेवा... "

सुरेश नेहमीच्या आविर्भावातच होता. कदाचित दुःख लपवण्याचा तोच एक मार्ग होता त्याच्याकडे.
स्वाती, सुमन वरुन आल्या, त्यांच्या मागोमाग स्ट्रेचर वर मी येत होतो. खाड खाड आवाज करत स्ट्रेचर रुग्णवाहिकेत ठेवलं गेलं. माधव, सुमन, स्वाती सोबत बसले. सुरेश ड्रायव्हरसोबतच पुढे बसला. त्याने अजूनही माझा चेहरा पाहायचं टाळलं होतं. रुग्णवाहिका निघाली. मी सुद्धा बंद दरवाज्यातून आत जायचा प्रयत्न करु लागलो परंतू मला आत जाताच एक झटका बसला. काही कळलंच नाही. मग समजलं शरीराजवळ जाण्यासाठी मज्जाव होता या क्षणी मला. मला मग तसाच पुढे सुरेशच्या बाजूला गेलो..
तो डोळे पुसत होता. सुरेश रडत होता... मोठी गोष्ट होती ही माझ्यासाठी. स्वतःचे वडील वारले तेव्हा सुद्धा याला रडताना मी पाहीलं नव्हते. त्याच्या चेहऱ्याकडे बघत बघत कधी नानाचौक आलं ते कळालंच नाही. सुरेश ने फोन केला." हॅलो.. हां सिद्धेश.. ऐक.. नानाचौकात आलोय म्हणून सांग "
रुग्णवाहिका वाडीमध्ये शिरली तसा मी बाहेर आलो. संपुर्ण बालपण गेलंय या वाडीत. एक एक करुन गोळा व्हायचो आणि खुप मस्ती करायचो. हळू हळू एक एक मित्र कमी होत गेला. आणि आता तर मी सुद्धा कमी झालो होतो. रुग्णवाहिका चाळीच्या दरवाजासमोरच थांबली होती. नेहमी चाळीमध्ये यायचं म्हणजे एक दिव्य असायचं. पुर्ण फुटपाथ भर गाड्या असायच्या. जिवंत असताना कधीही कोणी हा विचार केला नव्हता की वयस्कर माणसाला किती त्रास होत असेल. आणि आता... निष्प्राण देहासाठी पुर्ण फुटपाथच नव्हे तर समोरचा रस्ता सुद्धा रिकामा करुन ठेवलेला होता. एक एक चेहरे बघत पुढे पुढे जात होतो. माधवचे मित्र, सुमन- स्वातीच्या सासरची माणसं, काही ओळखीची तर काही अनोळखी. १०० लोकं तरी असतीलच बाहेर, शिवाय चाळीत बसलेले, घरात असलेले.
एव्हाना "बॉडी" ला घरात नेलं होतं. मी घरात जायचा प्रयत्न केला पण नाही शक्य झाले. काहीतरी होतं जे मला आत जाऊनच देत नव्हते. मग तिथूनच ऐकू लागलो. सर्वजण रडत होते.
एका कोपऱ्यात मालती दिसली....

मालती...
आपलं लग्न फारच लवकर झालं होतं ना गं..
तू शाळेतून दहावी पास झालीस आणि मी तुला पाहायला आलेलो. नकार देण्यासारखं काहीच नव्हते तुझ्यात.. मग संसार, मध्यंतरी... बाबांच्या जाण्याने फरक पडला होता.. पण मग चांगली नोकरी मिळाली आणि दिवस पुन्हा पुर्वीसारखे झाले. तिन्ही मुलांचा जन्म. त्यानंतर त्यांची काळजी घेणे. मला फुफ्फुसाचा त्रास सुरु झालाय हे सुद्धा तुलाच लक्षात आलेलं. काय आणि कीती आठवू? वयाची पंच्चावन वर्ष एकत्र घालवली आपण. सर्वसामान्य संसार असला तरी तू सोन्याचा केलास तो. अगदी शेवटी शेवटी सुद्धा तूच होतीस माझ्यासोबत. माधवकडे आलो काय आणि अचानक त्रास सुरु झाला काय. अचानक हे सर्व झाले आणि आता तर मी तुझ्या समोर असूनही तूला पारखा झालोय.
एक एक चेहरे ओळखीचे आणि अनोळखी सुद्धा. पण सर्वांच्या चेहऱ्यावर कमालीचं दुःख. ते ही माझ्यासाठी...
बाहेर तिरडी बांधत होते पहिल्या मजल्यावरचा सुर्वे आणि सुरेश घाई घाई करत होते. संध्याकाळचे साडे आठ झाले होते.
रडे ऐकत ऐकतच सर्वांकडे पाहत होतो एका कोपऱ्यातून. सुरेश आत आला.." चला, दोघांनी वर डोक्याकडे पकडा आणि दोघांनी पायाकडे एकाने मधे हात द्या. "
पुढच्या मिनीटात माझा देह बाहेर होता तिरडीवर....
बांबूची तिरडी... माधवा, तू मला कधीही खाली झोपून दिले नाहीस. शेवटी शेवटी तर डनलोपची गादी आणलीस, खोलीला एसी लावून घेतलास. खुप केलंस रे माझ्यासाठी पोरा तू...

दर्शनाची रांग लागली. अंगावर हार पडू लागले. आणि मग शेवटी तिरडी उचलली गेली..

जय राम.. श्री राम... जय राम.. श्री... राम...
मागून मालतीचा क्षीण आवाज " नका रे नेऊ.. त्यांना ".
नाही ऐकणार तुझे कोणी.. मालती काय राहीलंय त्या देहात??
हे बघ मी देहमुक्त झालोय आता. एकदम रुग्णवाहिकेचा आवाज सुरु झाला. चंदनवाडी स्मशानभुमीत न्यायचे असल्याने रुग्णवाहिकेला पर्याय नव्हता.. रुग्णवाहिका???
आता ती शववाहीनी झाली होती.

थोड्याच वेळात चंदनवाडी स्मशानभुमीत पोहचली गाडी. यावेळी मला माधवच्या बाजूला बसायला मिळाले. हातात मडके धरलेला माधव. सारखे डोळे पुसत होता, चष्मा काढून काढून..
आठवतंय का रे??
पाचवीला असताना असाच डोळे पुसत आला होतास.. बाईंनी मारलं म्हणून. फळ्यावरचं लिहीताना चुकत होतं सारखं. तेव्हा लक्षात आलं आम्हाला की तुला सुद्धा चष्मा लागला ते. पहिल्या चष्म्याचे पहिले काही दिवस काय ऐट होती तुझी.. आठवतेय रे मला.
जय राम... श्री राम... जय राम.. श्री... राम.
सरण अगोदरच रचले होते. गुरुजी सुद्धा आले होते. निकम वारले तेव्हाही हेच गुरुजी होते. तिरडीवरुन उचलून माझ्या देहाला...
माझ्या?? तो तरी आता कुठे माझा राहीला होता? जवळ जाऊ शकत नव्हतो की स्पर्श करु शकत नव्हतो.
सर्व बंध सुटले होते आता......

पाणी पाजायची तयारी सुरु झाली. पाणी नुसतंच तोंडात पडत होतं. एक एक जण नमस्कार करुन बाजूला उभा राहत होता.

संस्कार सुरु केले.. गुरुजींनी...
संपुर्ण देहावर लाकडं रचली, त्यावर घी ओतले. आणि अग्नि लागला...

गुरुजी बोलले.
" प्रदक्षिणा घाल आणि मडके या कोपऱ्यात सोडून दे... "

एकवार माधवच्या चेहऱ्याकडे लक्ष गेले. पेटणाऱ्या लाकडात त्याचा चेहरा स्पष्ट दिसला.
" धडाम् " असा आवाज झाला.. मडकं जमीनीवर पडून फुटलंच मात्र,

मला अचानक झटका बसला... मी त्या सरणावरच्या चिमणीकडे खेचला जाऊ लागलो. हॉस्पिटलमधले ते दृश्य डोळ्यासमोर आले. मग त्याला का असे तात्काळ नेलं? मला हे सर्व दुःख दाखवण्याचे कारण काय... ?

मी पुर्ण वेगाने खेचला गेलो त्या चिमणीकडे. ....

प्रकाश प्रकाश आणि फक्त प्रकाश..

माझा प्रवास सुरु झाला होता.. त्या प्रश्नासोबतच

Thursday, 15 September 2016

विसर्जन

.... विसर्जन ....

श्रावण संपत आला की गणेशोत्सवाचे वेध लागायचे. आम्ही शाळेत असताना कांदेवाडीतून जाताना गणपतीचे कारखाना दिसायचा. त्यातल्या गणपतीची विविध रंग आणि रुपे बघून आपल्याही घरी गणपती का आणत नाही असे प्रश्न घरी आई बाबांना आम्ही भावंडे टाकत असू. पण त्यांची समर्पक उत्तरं आम्हाला कधीच मिळाली नाही. गावच्या मुख्य घरात काकांकडे गणपती असतो म्हणून आपण आणत नाही. हे उत्तर तेव्हा आम्हाला पटायचंच नाही. नंतर नंतर कळलं की गणपतीची पुजा त्याची स्थापना वगैरे जरा कठीण काम आहे. शिवाय वडील सामाजिक कार्यात असल्याने तेवढा वेळ ते देऊ शकत नव्हते. म्हणून गणपती आमच्याकडे आलाच नाही.
आर्यन शाळेत असताना आम्हाला गणपतीची मोठी सुट्टी असायची. म्हणजे गणेश चतुर्थी ते गौरी पुजनापर्यंत, नंतर पुन्हा अनंत चतुर्दशीला.
या सुट्टीत अभ्यास सुद्धा असायचा. वहीत पेपर मधे आलेले गणपती, रंगीत काळे पांढरे, जाहीरातीतले असे ३० -४० गणपती चिकटवायचे, दिलेला अभ्यास उजव्या पानावर आणि गणपती डाव्या पानावर. सुट्टी गणपती शोधण्यातच संपून जायची. तेव्हा सार्वजनिक म्हणावा तर गिरगावचा राजा ( निकदवरी लेन) हा एकच प्रसिद्ध. त्यावेळी नळबाजारात राहत असल्याने केशवजी नाईकांच्या चाळीच्या बाजूने येत असू, गौरी पुजनानंतर शाळा सुरु झाली की रोज सकाळ दुपार मिळेल त्या गणपतीच्या मंडपात जाऊन साखरफुटाणे जमवत फिरणे हा गणपतीतला आवडता छंद.
गिरगावचा राजा तर दिवसातून दोनदा पाहीलाच जायचा. शिवाय पैसे जमवून त्या मंडळाची लॉटरी सुद्धा काढायचो आम्ही तिन्ही भावंडे. काही मिळालं तर ठिक नाहीतर देवाला पैसे हा सरळ साधा हिशोब. माझी नजर तर त्या बक्षिसातल्या सायकल वरच असायची. आता हा प्रकार बंद झालाय पण शेवटचे तिकीट जेव्हा काढले होते तेव्हा नजर पल्सर बाईक वर होती माझी.
गणपतीतले ९ दिवस संपल्यावर अनंतचतुर्दशीच्या आदल्या रात्री दरवर्षी आम्ही गावी जायचो.....
विसर्जनाला.
वडील तालुक्यातील समाजसंस्थेचे मुंबईचे अध्यक्ष असल्याने दरवर्षी सहकुटूंब सहपरिवार गावी जातच असत. समाजाची एक भव्य वास्तू आहे मंडणगड शहरात, तिथे सार्वजनिक गणपती असतो. त्याच्या विसर्जनाला आम्ही जायचो.
हा गणपती तालुक्यातल्या सर्व लोकांना एकत्र आणण्याचे काम करणारा गणपती आहे.
आम्ही तेव्हा लहानच. एक मारुती ओम्नी आम्हाला पुरायची. गाडीच्या डिकीत गुलालाच्या दोन गोणी, फटाक्यांची एक पिशवी आणि साखरफुटाण्यांची एक पिशवी असायची. रात्री गावी पोहचलो की सकाळीच तालुक्याला यावे लागायचे. विसर्जन मिरवणूक दहा वाजता सुरु व्हायची. मुंबईवरुन निघतानाच गाडीत गणपतीच्या गाण्यांच्या कॅसेट जमवून न्यायचो आम्ही. नसली तर नविन विकत सुद्धा घ्यायला लावायचो बाबांना. गाडीत गणपतीची गाणी वाजलीच पाहीजे हा अट्टाहास तेव्हा असायचाच. आमचे ड्रायवरकाकासुद्धा हरहुन्नरी होते. मंगेश काका... ते वरती गाडीच्या कॅरिअर वर मोठाले भोंगे आणून लावत कुठूनतरी. गाण्याचा आवाज गाडीतच नाही तर.. पार दोन चार गावापर्यंत जायचा.
बरोबर नऊ वाजता आम्ही गणपतीसमोर असू. अध्यक्षांची मुलं म्हणून आमच्या वर सर्वच लाड करत. आमचीही कॉलर ताठ असे.
आरती झाली की गणपती उचलला जाई. कुणबी भवनातून टेंपोमध्ये आणायलाच वीस मिनटं लागत. तेव्हा गणपती पुर्ण मातीचा असल्याने जड असायचा. एकदा का टेंपोत गणपती चढवला की हजारची माळ लावण्याची ऑर्डर बाबांकडून यायची. मग एका हातात अगरबत्ती आणि दुसऱ्या हातात माळेचा बॉक्स घेऊन आम्ही दोघं भाऊ थेट रस्त्यावर जायचो. मध्ये मध्ये ऍटम बॉम्ब पेरुन ती माळ पेटवली की अख्ख्या मंडणगडला कळायचं की " कुणबी भवनचा राजा " निघाला. दोन ट्रक भरतील एवढी पुरुष मंडळी आणि एक ट्रक महिला मंडळ एवढी लोक असायची आमच्या गाडीतही दहा बारा लोक असायची. गुलालाची एक गोणी गणपतीच्या टेंपोत दिलेली असायची. गणपती रस्त्यावर येईपर्यंतच सर्व लोक गुलालाने माखले जायचे.
" अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं " हे उत्तरा केळकरांच्या आवाजातलं गाणं तर त्यावेळी सर्वच गणपती असलेल्या घरांत, मंडपात वाजायचे. पुर्ण कॅसेटच अप्रतिम अशी होती. मंडणगड शहरातून ही विसर्जन मिरवणूक थेट वीस किलोमीटर असलेल्या नदीवर संपन्न व्हायची.
वाटेत लागणाऱ्या महत्वाच्या गावांमध्ये गणेशाचे पुजन केले जायचे. गाववाल्यांकडून लोकांना फराळ, चहा वगैरेची व्यवस्था असायची. सर्वात पुढे आमची गाडी असायची..
कारण फटाके आम्हीच लावत असल्याने.. आम्हीच पुढे. फटाक्यांचा आवाज आला की गावातली सर्व लोकं गणपतीदर्शनाला येत असत. गणपती मिरवणूकीत सनई, ढोल, टिमकी अशी पारंपारिक वाद्य असत सोबतच बुलबुल तरंग मिरवणूकीची शोभा वाढवे. गावाजवळ मिरवणूक थांबली की एका क्षणात तिन्ही टेंपो रिकामे होत आणि सर्व नाचायला येत. सोबत त्या त्या गावातली लोकं सुद्धा. पहीला स्टॉप पाच किलोमीटर वर तुळशी गावातच असे. मंडणगडचा घाट उतरला की तुळशी गाव. गावातून जोडरस्ता असल्याने मिरवणूक थेट गावातल्या रस्त्यानेच जाते. तिथे सुद्धा एक हजारची माळ लावण्याची ऑर्डर यायची सोबत ऍटम बॉम्ब सुद्धा सुरुच असायचे. गुलालाने माखलेले सर्व लोक खुप नाचायचे. काकड्या, केळी, मोसंबी, सफरचंद असा पोटभर प्रसाद खाऊन झाला की मिरवणूक पुढे निघे.
पुढचे गाव पाले. पाले गावात सुद्धा भरपूर प्रसाद मिळे. तिथेही नाचून लोक दमत. लोकांना सांगावे लागे की चला आता पुढे.. आपल्याला पुढे खुप जायचंय.
गणपती बाप्पा मोरया..
कुणबी भवनच्या राजाचा विजय असो..
अशा दणादणून सोडणाऱ्या घोषणांसोबतच आणि फटाकांच्या आवाजासोबत मिरवणूक देव्हारे गावात पोहोचे. देव्हारे हे या रस्त्यावरचे सर्वात जास्त गावं असलेले पोस्ट आहे. तिथे बाजारपेठही आहे. शिवेवरच हजाराची माळ आणि ऍटम बॉम्ब चा दणका आम्ही दोघं भाऊ उडवून देत असू.
" बंधू येईल माहेरी न्यायला.. गौरी गणपतीच्या सणाला "
या गाण्यासोबतच आमची ओम्नी सर्वात पहिली गावात घूसे. मुख्य बाजारपेठेत धडामधूम केल्यावर संपूर्ण देव्हारे आणि आजूबाजूच्या परिसरातील गावातले लोक राजाच्या दर्शनाला येत. इथे येई पर्यंत गुलालाची एक गोणी संपलेली असे मग अर्धी गोणी पुन्हा टेंपोत जायची आमच्या गाडीतून.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांवर गुलालाची बरसात व्हायची. सर्व आनंदाने यात सहभागी व्हायचे. तरुण- तरुणी, लहान - म्हातारे सर्व समरसून विसर्जन सोहळा जगायचे. कित्येक लग्न या विसर्जन सोहळ्यातच जुळली असतील. देव्हारे गावात दोन तास तरी जायचे. खाणं पिणं खुप व्हायचे इथं.
पुढे मालेगांव, नायणे, गोकूळगाव, अशी छोटी मोठी गावं करत मिरवणूक सहा साडेसहा पर्यंत चिंचघरच्या नदीवर पोहचायची. राहीलेले फटाके आणि गुलाल या नदिवरच संपायचा.
गणपतीची आरती झाली की गावातले तरुण गणपतीला विसर्जनाला न्यायचे. इतर कोणाला परवानगी नसायची. नदि खोल आणि वेगवान वाहणारी आहे. ...
" आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची... स्वारी निघाली निघाली गणपती रायाची "
या गाण्याचे सुर आमच्या ओम्नी वरच्या भोंग्यावरुन येत असताना......हळू हळू डोळ्यातुन अश्रू कधी वाहायला लागत ते कळायचे नाहीत.
- बिझ सं जय ( १५ सप्टेंबर, २०१६)

Sunday, 11 September 2016

रोग

...... रोग .....


कुर्रकुटूक..ssss
टोक्यातून कोंबड्याचा आवाज आला आणि जाग आली. कोंबडा दोन दिवस आरवलाच नव्हता.
परवा ह्यांनी फोन केलेला...
" गनपतीत काय मना ईयाला भेटत नाय, शेठ च्या घरी गनपती हाय दिड दिसाचा. तवा तो आटपला की मंगच ईन. बाबूला पन सुट्टी नाय भेटली तो पन दोन दिसाचा खाडा टाकून यल. गौरीला यवू दोन दिस, तिकीटा भेटलीत. कोंबडा हाय नं? "
आता त्यांना तरी कसं सांगायचं की इकडे कोंबड्यांचा रोग आलाय तो.
अंजूम च्या पोल्ट्रीमधल्या कोंबड्यांपासून पसरलेला हा रोग परिसरातल्या चारही गावात पसरला होता.
सकाळी चांगली असणारी कोंबडी दुपारी टुक टुक मान हलवत घरी यायची. रात्री टोक्यात झाकून ठेवली की सकाळी मान टाकलेली. एक एक करत प्रत्येक घरातली सगळी कोंबडी मेली.
मला सुगावा लागला तसा मोठा कोंबडा, वर माळ्यावर नेऊन ठेवला टोक्यासकट. चार कोंबड्या, दोन कोंबडे आणि सहा पिल्लं बघता बघता मेली.
घरातला सगळा किलकिलाटच बंद झाला. बाबू होता तोवर घरात घरपण होतं. त्याच्यामागे दिवस कसा जायचा तेच कळायचं नाही. तो मुंबईला गेला आणि मग घर खायला उठलं. बाबू आणि हे एकाच शेठकडे कामाला होते. हे शेठच्या घरी घरकामाला आणि बाबू शेठच्या कंपनीत. सणांमध्येच सुट्टी मिळायची. शिमग्याला दहा दिवस, गणपतीत पाच दिवस, आणि अधीमधी कधी दोन दोन दिवस. दोघेही कामाला असले तरी जुने कर्ज इतकं होतं कशी बशी हातातोंडाची गाठ पडत होती.
गावाला येताना दोन तीन हजार रुपये आणणार त्याच्यातच सण साजरा करायचा.
उसनवारी करुन सण साजरा करायला मलाही आवडायचं नाही. पण नाईलाज होता. एक वेळ गोडधोडासाठी लोकांकडे मागून मिळायचं, पण तिखट्या सणाला कोण देणार उसनवारीत?
जाग आली तशी जावून दरवाजा उघडला. रात्री साडेबाराची गाडी म्हणजे सकाळी सहा पर्यंत यायला हवे होते. घरासमोरची आकाबाय तांदूळ पाखडत होती. तिला विचारलं.
" काय गो आका..?
गाडी आंजून कशी नाय आली गो?"
आकाबाय म्हणाली.
" अगो.. रस्ता जाम खराब हाय. परत गेलंल्या यसट्या उशीरा जातात.. मंग तिकडून पन उशीर व्हतो.
यतील उशीरानं.. सुऱ्याचा फोन आलंला धा मिन्टांपुर्वी की मंदंनगडला पोचली यसटी म्हणून. "
" अस्सा काय? " मी आश्वासक पणे सुस्कारा सोडला. सुर्या आणि हे दोघं एकाच एसटीत होते.
मी भराभरा आटपायला घेतलं. पाऊण तासात पोचते एसटी गावात मंडणगडवरुन. चुल पेटवली. चुलीवर चहाची पितळी चढवली. आंधण येईस्तोवर आंघोळ वगैरे आटपली.
ह्यांच्या जुन्या घरात गौरी-गणपती. मोठे दिर पैसा राखून होते. त्यांनीच घर बांधून दिले. लहान भाऊ दारुडा असला तरी त्याला कधीही लांब केलं नव्हते. ही नोकरी पण त्याला त्यांनीच लावून दिली होती.
फक्त रविवारीच दारु प्यायची, ती सुद्धा थोडीशी.. उतरल्यावरच पुन्हा शेठच्या घरी तोवर गाववाल्यांच्या खोलीत राहायचे. अशी सक्त ताकीद देऊनच नोकरी दिली होती. बाबूची शाळा संपली तशी त्याला पण कंपनीत चिकटवलं.
पण गेल्यावर्षी जमीनीवरुन भांडणे झाली. मोठ्यांनी परस्पर एक जमीन विकली, यांची सही पण नाही घेतली. त्यावरुन भांडणे झाली. अजूनपर्यंत सर्व गोष्टीत सांभाळुन घेणारे दिर पुर्ण दुर्लक्ष करु लागले. एका तुकड्यावरुन ह्यांनी तरी दारु पिऊन नको तसं त्यांना बोलले. मी त्यांना समजवायला गेली तर मलाही मुस्कटात मारली सर्वांसमोर. शेवटी दिरांनी पाच हजार तोंडावर मारले तसे हे गप्प बसले. एकदा नात्यांना तडा गेला की पुन्हा तो भरुन निघत नाही हेच खरं.
" कुर्रकुटूक..ssss" माळ्यावरुन आवाज आला. तसे लक्ष त्या कोपर्‍यातल्या टोक्यांकडे गेले. सहा पिल्लांची कोंबडी पिल्लांसकट दोन दिवसात गेली. पहिल्या दिवशी संध्याकाळी आली तीच मान हलवत आली.. दोन पिल्लं रात्रीच दगावली. रात्री कोंबडीसुद्धा शांत झाली. उरलेली चार पिल्लं सकाळी पाय वर करुन मेलेली. दोन दिवसांत गावातली अर्धी अधिक कोंबडी मेली.
अशोक भावोजी सांगत होते की हा रोग अंजूम च्या पोल्ट्रीमधूनच आला. गावात कोणीतरी तिकडून आजारी कोंबडी जिवंत आणली असणार आणि किरकिंड्यात ठेवली असणार. तिच्यामुळे इतर कोंबड्या आणि त्यांच्यामुळे गावातल्या सगळ्या कोंबड्यांना लागण झाली.
परवा अंजूमच्या पोल्ट्रीवरुन गेली तेव्हा त्याच्या पोल्ट्रीत पण दहा बाराच कोंबड्या त्यासुद्धा मान डुलवणाऱ्या.
त्याला बोलताना ऐकलं
" यह बाकी मुर्गी मर जाएगी तो एक बार पावडर मारके पुरी पोल्ट्री साफ करवा लुंगा. दो हजार मुर्गियां दो दिन में मर गयी. बडा नुसकान हुवा. "
या रोगाने भरपूरच नुकसानी करुन ठेवली होती. रोगाचा अंदाज आला तसाच तो लाल तांबड्या पिसांचा मोठा कोंबडा पकडून माळ्यावर नेऊन टोक्यात बंद करुन ठेवला. उचलताना त्याचे वजन जाणवले. सहज चार साडेचार असेल. म्हणजे पिसं कमी केली तर तीन किलो कुठंच जात नाही. पण हा रोग त्याला लागायला नको. टोक्यात पण राखांडी टाकून ठेवली. टोक्याच्या आजूबाजूला पण पसरवून ठेवली. जेणे करुन रोग त्याच्याजवळ येऊ नये. सगळा दाणापाणी त्याला टोक्यातच.
घर कालच सारवलं होतं.
वाकणात एसटी आल्याचा आवाज आला. तसा चहाचा विस्तव कमी केला. पुढच्या दहा मिनीटात एसटी थांब्यावर पोचेल म्हणून भरभर दरवाजा बंद करुन थांब्यावर पोचले.
आकाबाय आलीच होती अगोदरच. एसटी थांबली. सुर्या उतरला त्याच्या मागून हे बॅग घेऊन. मागून बाबू खांद्यावर बोजा आणि हातात एक मोठी थैली घेऊन. मी झटकन पुढे जाऊन यांच्या हातातली बॅग घेतली यांनी परत जाऊन अजून एक बोजा गाडीतून काढला तो माझ्या डोक्यावर चढवला. हातातली बॅग पुन्हा स्वतःकडे घेतली.
" लय टाईम लागला. काय रस्ता खराब हाय म्हनून. हे डायवर लोक तरी काय करनार? एक एक हा हा खरडा. #तमारीच्या सरकारला गनपतीत तरी रस्त्या चांगला करायला काय होतं काय म्हाईत. सगल्या कडन्या दुखायला लागल्या. "
तोंडातून दारुचा भपकारा आला. बाबू पण दमल्यासारखाच दिसत होता.
" काय बाबू? बरा हास ना बावा? " मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलले.
" हो बरा हाय. " तुटकपणे बाबू बोलला.
" यवडा काय आनलाव ओ? दोन बोजे, बेगा ही पिसवी? " त्यांना विचारलं.
" शेठ च्या घरातलाच जुना सामान तो. शेटानी बोल्ली. हयता जुना सामान तू घेऊन जा. " हसत हसत ते म्हणाले.
यांनीच दरवाजाची कडी काढली, बाबूने ओटीवर चढून माझ्या डोक्यावरचा बोजा उतरवला.
...तोच
"होर.. होर.. हाट तिच्यामायला.. हाड... ssss तिच्यप.. "
यांचा आरडाओरडा.
" काय ओ... काय झाला. " मी घाबरुन विचारलं...
" अगो हा बघ काय.. बाऊल हाय वाटतं. " हे ओरडलेच.
" बाय गं... आपला कोंबडा वर होता माल्यावर. " धावतच दरवाजात आत गेली. वरुन लाल तांबडी पिसं पडत होती. फळीच्या फटीतून दोन चमकणारे डोळे क्षणभर दिसले.
कोंबड्यांच्या रोगापासून कोंबडयाला वाचवलं होतं पण गरीबीच्या रोगाने आम्हाला या परिस्थितीजनक उदमांजराने तिखट्या सणाला पार उपाशी करुन ठेवलं होतं.