Saturday, 14 January 2017

वाऱ्यावरची स्वारी

... वाऱ्यावरची स्वारी ...



कालच संक्रात होऊन गेलीय.  खरंतर हा लेख जरा आधी लिहायचा होता.  पण असो...  आज सकाळी म्हणजे १४ जानेवारी च्या सकाळी उठलो..
ही सकाळ आज जरा कंटाळवाणी वाटली.  हातात चहा चा कप घेऊन घरासमोरच्या गॅलरीत येऊन उभा राहीलो तर अचानक वर आकाशात नजर गेली.  वरती एक लाल रंगाची " ढेप " उडत होती.
 ढेप म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला नंतर,  पण ती दिसल्यावर मी लगेच घड्याळात पाहीले..  पावणे आठ झाले होते.
अचानक काही वर्ष डोळ्यासमोरुन सरसरत मागे गेली..

मी थेट पोहचलो तो मी शाळेत इयत्ता चौथीत असतानाची १४ जानेवारीची सकाळ.
त्यावेळी आम्ही नळबाजारात राहत होतो आणि गिरगावातले नविन घर घेतले होते,  पण तिथे फर्निचर वगैरेचे काम चालू होतं.  नळबाजारच्या खोलीत आकाश दिसायचेच नाही.  त्यामुळे पतंग आणि मांजा हा नुसताच बघून माहीती होता.  पैसे असायचे पण घेऊन करणार काय?  उडवता कोणाला यायची.  नविन घराच्या वरती गच्ची आहे हे एव्हाना आम्हाला...  म्हणजे मला आणि मोठ्या भावाला समजले होते.  आम्ही दोघं नळबाजारच्या घरुन निघालो..  रस्त्यात दर पाच मिनीटात पाच सहा पतंग असे पकडत पकडत गिरगावात पोहचे पर्यंत ३० - ४० पतंग जमवले होते आम्ही दोघांनी.  आयडीया सोप्पी असायची आमची एकाने पतंगाकडे जायचं आणि दुसर्‍याने मांजा पकडायचा प्रयत्न करायचा. बाकी मुलं असत पण या हुशारी मुळे त्यांना मिळतच नसे पतंग एवढ्या सर्व पतंग नेऊन आम्ही नविन घराच्या गच्चीत गेलो.  जमवलेले मांजे गाठी मारुन मारुन पुठ्ठ्याला गुंडाळून झटपट फिरकी बनवली आणि पतंग उडवायचा नाहक प्रयत्न केला.  परंतू ती कशी उडवायची हेच माहीत नसल्याने..  बोट कापून,  दहा बारा पतंग फाडण्यापलीकडे काहीच करु शकलो नाही आम्ही.  परंतू गच्चीवर कापून आलेले पतंग इतक्या संख्येत येत होते की नंतर नंतर आम्ही दोघेही पतंग पकडूच लागलो. आईने संध्याकाळी पाच पर्यंत पुन्हा घरी यायला सांगितलेलं.
आम्ही घरी गेलो तेव्हा दोघांच्या हातात मिळून २०० पतंग तरी असतील.... काय करणार होतो त्या पतंगांचे हे तेव्हा ठरवलंच नव्हते.

पुढल्या वर्षी त्या गच्चीच्या खाली रहायला होतो म्हणजे नविन घरात..  पुर्ण गच्ची आपलीच या थाटात.  मग पुढील दोन तीन वर्ष गठ्ठेच्या गठ्ठे जमू लागले.  एकही पतंग विकत न घेता सकाळी बरोबर ७ वाजता अगोदरच्या आठ दिवस पकडलेले पतंग घेऊन गच्चीवर जायचो आम्ही.  त्यावेळी सकाळी ७ वाजता सुद्धा आकाशात ३० - ४० पतंग असायचे.
शाळेतून लवकर येऊन एकटा एकटाच पंतग उडवायची प्रॅक्टीस करुन करुन शेवटी एकदाचा पतंग आकाशात उडायला लागला.
भावाचा एक मित्र होता. निलेश नावाचा...  त्याला फार आवड.  तो गिरगावात असेपर्यंत नेहमी यायचा.  त्यानेच शिकवले कसं घसीटायचं,  कशी ढिल द्यायची.  डोक्यावर ठेवून थाप कशी मोडायची पतंगाची.  कन्नी कशी बांधायची ती सुद्धा टेक्नीक असते.  तो बारीक मांजा वापरायचा.  म्हणून त्याला घसीटायला लागायचं. भाऊ नेहमी जाडा मांजा वापरायचा.  मी मिडीयम आवश्यकते नुसार घसीटायचं किंवा ढिल द्यायचा.
जरी पतंग एकत्र उडवत असू तरी खरेदी मात्र वेगळी वेगळी व्हायची.  बाबा पैसे द्यायचे दोघांना.  भाऊ त्याच्या मित्रांसोबत जायचा,  मी माझ्या मित्रांसोबत.
माझे वर्गमित्र गोट्या, रवी, सौरभ अजून एक दोघे असे मिळून एकत्र जायचो.  गोट्या जबरदस्त ढापूचंद होता.  आम्ही २-३ रीळ मांजा विकत घेता घेता फिरकी दाखवण्याच्या- बघण्याच्या नादात हा सुमडीत २-३ फिरक्या आमच्या पिशवीत टाकायचा. खरेदी करुन झाली दुकानाबाहेर आलो की समजायचं,  याला तर बिन पैशाचे आठ - दहा रीळ मिळालेत.
मांजा आणि पतंगांची खरेदी म्हणजे एक आवडती गोष्ट होती...
मांजा चा खर तपासून घ्यायचा,  जाड,  मिडीयम, बारीक,  सुरती,  काळा,  सफेद,  अश्या वरायटीज मधून आपल्या खिशाला परवडेल असा मांजा घेणे म्हणजे कसरतच असायची.  मला आठवत नाही की माझं कधी मन मी घेतलेल्या मांजाने भरलंय.
" तो दुसरा होता ना तोच जबरदस्त होता " हीच भावना नेहमी असायची..   आणि सकाळी पहीलीच पतंग "बोहनी" न करता कापली गेली तर ती भावना जास्तच जोर धरायची.
आमच्या गच्चीत दोन जुन्या  फिरक्या नेहमी असत.  पकडलेल्या पतंगांचे धागे त्या फिरक्यांना गुंडाळून ठेवले जात असत.  दोन यासाठी की जाड आणि बारीक दोरा एकत्र केला की मांजाची गिटार व्हायची.  सारखं तुणतुणं वाजत रहायची.
पतंगांची खरेदी फार कमी करायला लागायची आम्हाला.  कारण आमच्या आजूबाजूला राहणारे लोक फार कमी वारा आमच्या दिशेने वाहत असल्याने.  गुल झालेली पतंग सकाळ - संध्याकाळ आमच्या गच्चीवरुनच जायच्या.  काही लांबून सटकू नये म्हणून फांद्या -झाडू लावलेले बांबू गच्चीत वर्षानूवर्ष असायचे.
प्रत्येकाची आवडती पतंग असायची मला संपुर्ण चौकोनी पतंग आवडायची तर भावाला रोबोट पतंग..  कारण ती स्थिर निघायची अनेकदा.  मला शांतपणे पतंग उडवणे कधीच आवडायचे नाही.
आजूबाजूला पतंग आली की ती पटकन कशी कापून ती वरच्यावरच  लटकवून खाली उतरवायची हा प्रयत्न चालायचा माझा.

 आमची गच्ची म्हणजे राजा गच्ची असायची. स्पीकर्सवर दणदणीत गाणी..  नाश्ता,  थंडे याची रेलचेल असायची.  कोणीतरी स्पॉन्सर मिळायचेच.  नाही मिळाले तर आमच्यापैकीच कोणीतरी पैसे काढून आणायला सांगायचा.

संध्याकाळी आजूबाजूच्या गच्चींवर हिरवळ यायची.  मग आमचे डोळे पतंगांपेक्षा तिकडेच जास्त गिरक्या घालायचे.  आम्ही दुर्बिणी सुद्धा वापरल्यात त्यासाठी...  आता हसू येतेय.
पण त्या वयात धमाल होती.

पतंग उडवायला एकटाच शिकल्याने मला फिरकी धरायला कोणाची मदत लागत नसे.  बहीण भरपूर चिडायची यावर कारण तिला फिरकी पकडायला मिळायची नाही.  ( लग्नानंतर पत्निश्री सुद्धा चिडली होती.. )

पुढे शाळा संपली आणि मग कॉलेज सुरु झालं.  मग जरा जास्तीचा उनाडपणा.  पॉकेटमनी सुद्धा जास्त त्यामुळे सुरती मांजे तिकडूनच मागवणे सुरु झालं.  शेजारच्या बिल्डिंगच्या गच्च्या सुद्धा तरुण होत होत्या.  चौथी पासून चष्मा लावणारे आम्ही..  दिसत नसले तरी गॉगल लावून स्टाईल बाजी करायचो..

कधी कधी वारा आम्हाला अनुकुल नसायचा तेव्हा तर तास तास पतंग यायचेच नाहीत..
उडवून पतंगही संपून जायचे.  मग निलेश खाली जाऊन रस्त्यावरच्या मुलांकडून एक  रुपयाला एक अशा पन्नास - साठ पतंग आणायचा. तेही संपले की मग " लंगर " चा खेळ सुरु व्हायचा. आजूबाजूच्या बिल्डिंगवर अडकलेले पतंग.. मांज्याला दगड किंवा तत्सम काहीतरी बांधून ते आपल्या जवळ खेचून आणण्यातही धमाल यायची.  बरं हे अडकलेले पतंग थोडेफार फाटलेले ही असायचे.  मग त्यांचे " ऑपरेशन " करायचे.  मी पक्का सर्जन होतो.
सेलोटेप,  फेविकोल,  काट्या अशी साधनांनी मी नेहमीच तत्पर असायचो.
अगदी थाप मोडताना मधोमध  तुटलेले पतंगांचे कणे देखील एका हाडवैद्याप्रमाणे प्लास्टर करुन ठणठणीत उडायला लागायची ती पतंग.

कॉलेजचे दिवस संपले आणि मग दुकानात जाणे सुरु झालं.
मन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच आकाशात उडायला लागायचे.  पण १४ जानेवारीला दुकान सुरु असायचं त्यामुळे आजूबाजूचा आरडाओरडा ऐकत मन मारुन काम करायला लागायचे.
 पुर्वी आदल्या रात्री पतंगाचे मांजे झोपेत दिसायचे. एका पतंगाने वीस वीस पतंग एका वेळी कापल्याची स्वप्न पडायची. पुढे पुढे गिरगावात पतंग उडायचेच कमी झाले.  एकतर मराठी वस्ती कमी होत गेली त्यातही चाळी कमी होऊन उंच टॉवर होऊ लागले.  छपरांवरची लोकं गच्च्यांवर येऊन पतंगबाजी पेक्षा दारुकाम आणि बाकी सर्व करायला सुरुवात झाली.
त्यामुळे हळूहळू आकाशात पतंग कमी होऊ लागले.

चार पाच वर्षापुर्वी मी शेवटचा पतंग उडवला असेन.
रविवार वगैरे होता त्या दिवशी.  तास दोन तास उडवला पतंग.  फार कोणी नव्हते. पुर्वीची गंमतही नव्हती.  बोटही कापले नाही.

एव्हाना माझा चहा थंड झाला होता..
माझ्या जुन्या पतंगांच्या आठवणींसारखा.

आता.....  आकाशात दोन पतंग वाढले होते आणि ते दोन्ही वाऱ्यावर स्वारी करायला तयार होते.
मीच फक्त त्यापासून दुर होत गेलो होतो...
लहानपण सरल्याने.

1 comment:

  1. संजय,ही कथा मला जास्त आवडली. खुप सहज पुढे जाते उत्सुकता वाढते. एक निरागसता आहे यात.

    ReplyDelete