Thursday, 19 January 2017

बेल

.... बेल ....




ऑफिसची बेल वाजली.
धनराज साहेबांच्या आठवणीत रमलो असताना ती बेल मला जरा जास्तच कर्णकर्कश्य वाटली.
साहेबांना जाऊन दोन महिने झाले होते. मला आठवतंय तिथपासून मी धनराज साहेबांसोबत होतो.  बाबांसोबत यायचो मी धनराज फार्मा मध्ये..
साहेबांचे बाबा दलीचंद शेठ तेव्हा खुर्चीवर बसायचे.  धनराज शेठ कॉलेजला असायचे.  मी जेमतेम चौथी पास झालेलो. दलीचंद शेठने सांगितलं की

" पंढरी ला ठेव इथेच "

चहा पाणी करायला, ऑफिसची साफसफाई वगैरे करायला. त्यांचे उपकार म्हणून मला लहान वयातच नोकरी मिळाली होती.  माझं आयुष्य पुर्ण याच ऑफिसमध्ये गेलंय.
कॉलेज संपल्यावर धनराज शेठ ऑफिसात येऊ लागले.

दलीचंद शेठ वारल्यानंतर संपुर्ण जबाबदारी धनराज शेठ वर आली.  त्यांचे लग्न, मुलं  कंपनीची भरभराट,  विदेशी झालेल्या शाखा.... मी सर्व या डोळ्यांनी पाहील्यात.

धनराज शेठ माणुसकी म्हणजे काय हे दाखवणारा जिवंत पुतळा होता..
माझ्या घराच्या वेळी केलेली संपुर्ण मदत, सुरेखाच्या लग्नाचा संपुर्ण खर्च,  रुक्मिणीच्या ऑपरेशनचा खर्च,  काय काय नाही दिलं मला त्या देव माणसानं?
मी सुद्धा माझ्या रक्ताचं पाणी केलंय या कंपनीसाठी.

 कंपनीवर मोर्चा आला होता,  तेव्हा धनराज शेठ वर मारलेला दगड मी अंगावर घेतला होता.  एवढे लोक कंपनीत होते तरी शेठने फक्त माझाच 'साठी' चा समारंभ आयोजला होता.
मी नक्कीच कंपनीसाठी महत्त्वाचा होतो..  निदान धनराज शेठने तसं बोलूनही दाखवलेलं त्या कार्यक्रमात.


पुन्हा बेल वाजली....

कर्णकर्कश्य...

मी तंद्रीतून बाहेर आलो..

ऑफिसचा दरवाजा उघडून आत गेलो. खुर्चीत बसलेल्या युवराज शेठ ना पाहून माझ्या कपाळावरची आठी वाढली.

" पंढरी...
दोन कॉफी सांग.. एक वेज ग्रिल्ड सँडवीच.
आणि जरा बिसलेरीच्या दोन बॉटल सुद्धा आण..  नंदिनी येतेय. बिल्डिंग खालीच आहे. ती आली की प्लिज..  कोणाला आत पाठवू नकोस."
डोळ्यावरचा चष्मा अलगद खाली ठेवत काहीश्या मुजोरपणे युवराजने मला ऑर्डर सोडली.

" हो शेठ..  " म्हणून मी बाहेर पडलो.  बाहेरच्या फोनवरुन हॉटेलला फोन केला आणि ऑर्डर दिली.
फोन ठेवतच होतो तेव्हा नेमकं टाक.. टाक.. टाक.. असे बुट वाजवत नंदिनी आली.
माझ्याकडे तुच्छतेने बघत एका फणकाऱ्याने दरवाजा उघडून आत गेली.

नंदिनी की युवराजची कॉलेज पासुनची मैत्रीण.  दोघांचं चांगलं जमलंही होतं. धनराज शेठला ते मंजूर नव्हतं. त्यांच्या मते नंदिनी युवराजसाठी योग्य मुलगी नव्हती.
तिचे कपडे,  राहणीमान,  खर्च हे सर्व घराण्याला शोभणारं नाही असं धनराज शेठ ना वाटत होतं.  या गोष्टीवरुन बाप बेट्यांमध्ये वाद ही झाले होते.
ज्या दिवशी धनराज शेठ वारले त्यादिवशी सुद्धा ऑफिसातच दोघांत याच नंदिनीवरुन भांडण झालेलं.
कदाचित त्याचाच धसका साहेबांनी घेतला होता..  ज्याचा परीणाम हृदयविकाराचा झटका येऊन शेठ वारले होते.

वेटर दोन कॉफी, सँडवीच, बिसलेरी घेऊन आला.

ऑफिसच्या कपामध्ये कॉफी समसमान करुन ट्रे मध्ये व्यवस्थित घेऊन,  दरवाजावर टक टक केलं.

पुर्वी त्याची गरज नसायची. दलीचंद, धनराज असताना कधीही टक टक करुन जायची गरज लागली नव्हती.
पण युवराज आल्यापासून त्याने मला हा नियम सुरु केला.
एकदा चुकून दार न वाजवता आत गेलो तर नंदिनी त्याच्या मांडीवर बसून होती.
दोघेही खूप चिडले होते.  खुप उलट सुलट बोललेले. चुक कोणाची होती यापेक्षा कामाच्या ठिकाणी काम करणे अपेक्षित असतं, पण जे चाललेलं ते काम नव्हतं.

मी खालमानेने सर्व ऐकून घेतलं आणि बाहेर गेलो. बाहेर खुर्चीत बसलो आणि खुप रडलो.  नंदिनी जाताना माझ्याकडे तुच्छतेने बघून गेली.

आता हे नेहमीचेच झालेलं. नंदिनी आली की तासभर दरवाजा बंद व्हायचा.  त्यामुळे मग भरपुर कामं रेंगाळायची. मिनीटामिनीटाला ऑर्डर असल्या की उशीर झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सुद्धा झालं होतं. असं अकाउंटच्या शुक्लाने मला सांगितले होतं.

शुक्ला मला म्हणाला होता की,  कशाला करत बसतो आता नोकरी वगैरे?  रिटायरमेंट घे आणि बस की घरी.  शेठ देईन पाच सहा लाख.  नाही दिले तर आहे की आपली युनियन, भाऊंना सांगून मोर्चा आणतो की नाही बघ.
मला ही या सर्व गोष्टींचा तिटकारा यायला लागलेला.
युवराज शेठ समोर मी प्रस्ताव तोंडी मांडला होता..  एकेदिवशी..

मला म्हणाला..
" पंढरी..  काय करणार तू घरी बसून?  आणि कशाबद्दल एवढे पैसे देऊ तुला मी?  बाबांनी काय काय केलंय तुझ्यासाठी हे पाहीलंय मी. तुला जायचं असेल तर जा..  पण जास्त अपेक्षा ठेवू नकोस.  मी देईन तेवढे शांतपणे घे.  "

मी शुक्ला सोबत चर्चा केली.  त्याने सांगितलं की युनियन ऑफिस मध्ये एक लेटर लिहून आपली तक्रार दिली आणि अकरा हजार भरले की पुढे त्यांची जबाबदारी.  शेठ आपोआपच पायाजवळ येतात आपल्या.
परवा संध्याकाळी तो आणि मी मिळून तक्रार लिहिणार होतो.

पुन्हा बेल वाजली..

दरवाजा उघडून आत गेलो.

" पंढरी..  कप घेऊन जा..  आणि आता नंदिनी असे पर्यंत कोणीही आत येता कामा नये..  समजलं?  "

" हो शेठ "
दोघांच्याही नजरेला नजर न मिळवता मी प्लेट घेऊन बाहेर गेलो.
कप, प्लेट धुवून ठेवून पुन्हा खुर्चीत येऊन बसणार तोच काहीतरी ऐकू आलं..

दरवाजा पुर्ण बंद झाला नव्हता..

नंदिनीचा आवाज येत होता..

" युवी... कशाला या म्हाताऱ्याला ठेवलंय कामाला?  बिनकामाचा नुसता..
काढून टाक आणि नवीन कोणीतरी ठेव की... "

म्हणजे हीच युवराजला माझ्याबद्दल भडकवते...

आता युवराज काय बोलतोय हे मी लक्षपुर्वक ऐकू लागलो.

" हे बघ नंदू..
पंढरी हा आमच्यासाठी नुसता नोकर नाही.  तुला वाटत असेल की काय या दिडदमडीच्या माणसात आहे? या पंढरीने मला अंगाखांद्यावर खेळवलंय.  बाबा मला वेळ देऊ शकत नव्हते तेव्हा माझ्यासोबत हा पंढरीच खेळायला असायचा..  आजोबांपासून पंढरीने आम्हाला सेवा दिलीय.  चार दिवसापुर्वी त्याने रिटायरमेंट मागितली...  मी नाकारली.
कारण मला या ऑफिसला तो हवाय..  बाबांनंतर या ऑफिसची माहीती असलेला तोच आहे.  मला सुद्धा सापडणार नाहीत अशा फाईली तो काही सेकंदात आणून देतोय.
पंढरी..  नुसताच नोकर नाही..  तो कणा आहे धनराज फार्माचा...
जो पर्यंत तो धडधाकट आहे तोवर तो इथेच राहणार.  "

माझ्या डोळ्यातून पाणी सुरु झालं...
बाजूला असलेला फोनचा रिसीव्हर उचलला... अकाउंट चा नंबर दाबला.
" हॅलो शुक्ला...
मला कोणतीही तक्रार करायची नाही... हा पंढरी धनराज शेठ सोबत होता...  आणि आता त्यांच्या रक्तासोबत...  म्हणजे युवराज सोबतही असणार आहे... "

" अहो पण..  ऐका... " बोलत असताना मी फोन कट केला.

पुन्हा बेल वाजली...

यावेळी ती कर्णकर्कश्य नव्हती...

1 comment: