स्त्री म्हटली की तिची आकृती माझ्या डोळ्यासमोर यायची. ते उठावदार शरीर, श्वासांच्या लयीसोबत होणारी शरीराची हालचाल. नायकाजवळ गेली की तिचा श्वास माझ्या चेहऱ्याला स्पर्श करायचा.
काय होतंय ते कळायचं नाही, पण रक्त सळसळून यायचचं.
मी पुरुष होतो.. हे तिच्या मुळे मला जाणवलं. कोणीही न शिकवता, आपोआपच मला समजले की मी पुरुष आहे.
मग ती अभिसारीका जी टिव्हीच्या पडद्यावर दिसायची तिला मी आजूबाजूला शोधू लागलो.
मी नाही... माझ्यातला पुरुष.
वर्गात बाजूच्या बेंचवर बसलेल्या मुलीत ती अभिसारीका शोधायचा प्रयत्न केला. ती अगदीच तशी नव्हती पण शेवटी ती सुद्धा तिच्यासारखीच होती. भले लहानपणी ती माझ्या सोबत भरपूर खेळली असेल. हात धरुन मस्ती केली असेल पण आता ती मादी होत होती... हळूहळू.
अशी ती एकच नव्हती भरपूर होत्या वर्गात. प्रत्येकीत वेगळेपण होतं. ही तशी बनेल की ती याचा विचार माझ्यातला पुरुष सदैव विचार करायचा.
टिव्हीच्या पडद्यावर लपून पाहीलेला पुरुष - मादीचा प्रणयाचा खेळ डोळ्यासमोर आला की माझ्यातला पुरुष जागा व्हायचा आणि मग आजूबाजूच्या सर्व माद्यांशी मी मनातल्या मनात तो खेळ खेळायचो.
जसे जसे वय वाढू लागले तसे तसे या माद्यांमध्ये वयाचं अंतर होते ते संपले. टिव्हीवरच्या अभिसारीकेचे कपडे कमी कमी होत होते आणि माझ्यातला पुरुष मोठा होत होता.
माझ्या शिक्षिकेतही मला मादी दिसू लागली. फळ्यावर लिहिताना मला त्यांच्यात ती अभिसारीका दिसू लागली. बाजूच्या बेंचवरची मादी मोठी होत होती पण तीचे लक्ष माझ्याकडे नव्हते. इतर पुरुष माझ्या सोबत स्पर्धा करत होते.
या पुरुषांकडे कदाचित माझ्या पेक्षा जास्त ताकद होती. बुद्धीची आणि रुपाची... त्यामुळे मी हरत होतो.
या हारजीतीच्या लढाईत शाळा संपली..
त्याबरोबर सुरुवात झाली ती नव्या युगाची.
आजपर्यंत टिव्हीच्या पडद्यावर दिसणारी अभिसारीका फिकी पडावी अश्या सुंदर अप्सरा अवतीभवती बागडू लागल्या.
जगासाठी मी जरी विद्यार्थी होतो तरी मी मात्र स्वतः वाढत जाणारा पुरुष होतो.
बागडणाऱ्या प्रत्येक अप्सरेमध्ये एक मादी होती. कोवळी.. काही अप्सरा माझ्या वयाच्या तर काही मोठ्या.. मोठ्या माद्या पुर्ण वाढलेल्या होत्या त्यांच्या सोबत त्यांचे समवयीन पुरुष असायचे.
हा खेळ वेगळा होता..
मैत्री असं गोंडस नाव दिले होते त्यांनी त्याला. पण मला त्या खेळात जराही रस नव्हता. माझ्या लेखी तो खेळ हा नुसता पाणवठ्याच्या बाजूला जाऊन पाणी न पिता नुसतंच फिरणे होतं, ज्याला काही अर्थ नव्हता.
टिव्हीवरच्या पुर्वीच्या अभिसारीकेची जागा आता नव्या ताज्या दमाच्या, कमी कपड्यातल्या आणि पडद्यावरच्या पुरुषाच्या अंगात अंग घुसळणाऱ्या कोऱ्या करकरीत अभिसारीकेने घेतली होती. ही तिच्याएवढी सुंदर नव्हती पण हिचे शरीर जास्त दिसत होते. जे माझ्यातल्या पुरुषाला आव्हान देत असे.
तिच्याशी बरोबरी करणारी आणि तिच्याशी साधर्म्य सांगणारी एक आलीच शेवटी.
माझ्या बरोबरचे पुरुष तिच्यावरुन मला चिडवायला लागले. ती बघता बघता अभिसारीका होऊ लागली. हवीहवीशी वाटू लागली. मैत्रीचा खेळ रंगण्यापुर्वीच प्रेम नावाचा नवीन खेळ सुरु झाला.
हा पुर्ण नवीन अनुभव होता. नर मादी पेक्षा अजूनही काही असतं हे जाणवू लागलं.
तिची ओढ, तिचे भेटणं, तिचे हसणं, तिचे बोलणं.. तिचे एकूणच असणं मला माझ्यातल्या पुरुषापासून दुर नेत होते.
ती सुद्धा माझ्याप्रमाणेच अस्पर्शीत होती. छुईमुई...
ही अभिसारीका मात्र प्रेमाची भावना वाढवत होती.
तिच्या कल्पना खुप वेगळ्या होत्या. चुल मुल सांभाळणारी ती नव्हती. तिचा पेहराव, सजणे, मुरडणे माझ्यातला पुरुषाला आव्हान द्यायचेच पण त्याबरोबर आजूबाजूला असलेल्या नरांनाही भुलवत होते.
जी स्पर्धा शाळेत असताना होती ती पुन्हा सुरु झाली.
मला पुन्हा हरायचे नव्हते.
पुन्हा पुन्हा हरणे माझ्यातल्या पुरुषाला मान्यच नव्हते.
प्रेम की शारिरीक सुख या द्वंदात मी अडकलो आणि...
या द्वंदातच एक दिवस माझ्यातल्या पुरुषाने तिची ती प्रेमाची कल्पना मोडायचा प्रयत्न केला आणि ती दुखावली...
तिला अपेक्षीत असलेले प्रेम मी नव्हतो..
मी फक्त पुरुष होतो..... एक श्वापद.. शरीराची भूक भागवणारा..
ती गेली.. कायमची.
जाताना मात्र माझ्यातल्या प्रियकराला मारुन गेली...
आणि मग पुन्हा जागा झाला " पुरुष "....
प्रत्येक स्त्री कडे मादी म्हणूनच बघणारा पुरुष..
" स्पर्शसुख " म्हणजे काय ते अचानक गर्दीत दुसर्या एका पुरुषाला एका स्त्रीला धक्का मारताना बघून कळालं.
त्या माझ्या आजूबाजूला सगळीकडेच होत्या. गठ्ठ्या गठ्ठ्यांनी येणाऱ्या, खरेदीसाठी मार्केट धुंडाळणाऱ्या, आजूबाजूला कोण आहे ते न पाहता, आपल्या कपड्यांची पर्वा न करणाऱ्या नवयौवनेपासून.. मांसल देहाच्या माद्या.
त्यांच्या त्या देहाचा स्पर्श त्यांना न कळता करण्यात सुख होतं ते स्पर्शसुख मी भोगू लागलं. गर्दी नेहमीचीच.. त्यामुळे या सुखाला मर्यादा नव्हती .
ना कोणी बघणारे नव्हते.. ना कोणी थांबवणारे.
निव्वळ स्पर्शाने पुरुष सुखावत होता.
त्याला वयाचे बंधन नव्हते. रुपाची आवड निवड नव्हती. समोर होता तो फक्त.. स्त्री देह..
पण कधी पर्यंत हे वांझोटे सुख घेणार होतो मी ??
मला खरे खुरे सुख हवे होते..
जे कसं मिळतं ते आता वाढत्या वयाबरोबर मला संपुर्ण माहीत झालं होतं.
लग्न ही कल्पना मला पटणारी नव्हती, कारण माझ्यामते मी वेगळा होतो. बंधनात अडकून घेणे मला पसंत नव्हते.
पण हक्काची मादी या कल्पनेत मिळते म्हणून मग शोध सुरु झाला.
अशातच ती समोर आली.
तिला बघताना तिच्यात मला एका स्त्री पेक्षा एक जोडीदार दिसला.
ती आली आणि मग इतर सगळ्या हळूहळू दिसेनाश्या झाल्या. पुरुष जागेवरच होता फक्त त्याचे स्वरुप बदलले होते. त्याच्यात स्थित्यंतरे घडत होती.
आता तो पुरुष त्याच्या स्त्री बरोबर होता. इतर पुरुषांच्या नजरा तिच्यावर पडताना पाहून तो अस्वस्थ होऊ लागला. बरोबर चालताना इतर पुरुषांचा स्पर्श तिला झाला तर चिडू लागला.. प्रसंगी आपली ताकद आजमावू लागला.
तिच्या डोळ्यातला त्याच्या बद्दलचा आदर पाहून पुरुष जास्तच सुखावू लागला.
स्त्री, मादी आणि जोडीदार अशा तिन्ही आघाड्यांवर ती समर्थ होती. अगदी त्याला हवी तशीच..
मग इतर कशाला कोण हवे?
नवीन जिवाची चाहुल लागली.
मी आणि ती सुखावलो...
जे कोणी येईल ते आपलेच असेल या कल्पनेने दोघेही भारावले होते.
" ती " आली...परी
नवीन स्त्री देह... इवलूसा. सुंदर.. अगदी तिच्यासारखाच..
त्याच्यातला पुरुष... बाप झाला होता.
पुरुषत्वाचे नवीन रुप मी अनुभवत होतो. नवीन जबाबदारी आली होती.
माझ्यातला पुरुष जबाबदारी खाली त्याचे स्वरुप बदलत होता.
लैंगिकते कडून जबाबदारीच्या जाणीवेने तो अधिकाधिक प्रगल्भ होत होता. नर मादीच्या खेळातला त्याचा रस कमी होत होता.
आता मी पालकाच्या रुपात होतो. त्या इवलूशा परीच्या संगोपनात वेळ जात होता. तिच्यावर संस्कार करताना कधी प्रेमाचे तर कधी खोट्या खोट्या रागाचे क्षण येऊ लागले. प्रेमाने तिला बिलगताना त्याच्यातला बाप मोहरुन जायचा.
तरीही तिच्या भविष्याची चिंता मला अस्वस्थ करत होती.
मोठी होऊन ती काय करेल?
मला सोडून जाईल.. तिच्या आवडत्या पुरुषासोबत...
या चिंतेने माझ्या मनात कालवाकालव होऊ लागली.
बघता बघता वर्ष सरली.
जीवनाच्या अनेक संकटांना तोंड देत, सर्व जबाबदाऱ्या नेटाने पेलत, प्रसंगी मान खाली घालून, अपमान सहन करत स्वतःतल्या पुरुषाला आवर घालत कुटूंबप्रमुख म्हणून तो जिंकत राहीला.
अशातच...
परी मोठी झाली..
एक दिवस ती तिच्या वयाच्या पुरुषाच्या हातात हात घालून दिसली.
पुरुष पुन्हा जागा झाला. यावेळी तो वेगळा होता. त्याच्या परीच्या काळजीपोटी आकांडतांडव करणारा पुरुष. ती सुरक्षित रहावी म्हणून तिच्यावर हात उचलणारा पुरुष.. आणि फुलासारख्या जपलेल्या तिच्यावर हात उचलल्याने एकांतात अश्रू गाळणारा " बाप ".
पुढच्या काही वर्षातच परी गेली. माझ्या पसंतीने.. तिच्या आवडीने.
पुन्हा एकदा दोघांचा संसार सुरु झाला.
टिव्हीवरच्या अभिसारीकेचे रुप खुपच बदलले होते. जे त्याच्यातल्या पुरुषाला बघणेही नकोसे झालं होतं.
सोबत असलेली जोडीदार आता माझा आधार होता...
तिच्या डोळ्यातले प्रेम इतकी वर्ष तसूभर कमी झाले नव्हते.
वाढत्या वयाबरोबर ते अजूनच वाढत होते.जीवनात आलेल्या अनेक खाचखळग्यात तिच्या साथीमुळे माझ्यातला पुरुष तरुन गेला होता. पुरुषत्वाच्या संकल्पना आता बदलत होत्या.
एक एक बंधन सैल होत होते...
आयुष्याची संध्याकाळ जवळ येत होती. प्रौढत्वाबरोबर शहाणपणही येत होते.
जोडीने फिरताना आधारासाठी हात तिच्या हातात जाऊ लागला.
आणि एक दिवस ती शांत झाली.
तिच्या थंड देहाकडे पाहताना माझ्यातल्या पुरुषाने मला थांबवलं... अश्रू डोळ्यात येऊ नाही दिले.
पुरुष आता थकला होता.
परी सुद्धा तिच्या संसारात गुंग होती. करण्यासारखे काही नव्हते.
एक दिवस आराम खुर्चीत बसून संपुर्ण जीवनपट डोळ्यासमोरुन जात असताना अचानक डोळ्यासमोर अंधार आला....
पुरुष थंड झाला....
जीवनपट ..
ReplyDeleteछान,पुरूषाच्या जिवनाल्या तीन अवस्थांचे संक्रमण छान वाटले.पण संजय,पुरूषाचे हे आणि हेच रूप तुझ्या कथेतुन जास्त डोकावते.ह्या व्यतिरिक्त फक्त मुलीचा बाप,फक्त मुलाचा बाप,फक्त कुटुंबप्रमुख, बायकोचा प्रियकर,किंवा एखादवेळेस स्त्रीची भुमिका-मानसिकता,हे किंवा अशाप्रकारचे विषय विचार करून बघ.
ReplyDeleteतुझ्याकडे तरल कल्पनाशक्ती आहे.वेगवेगळे विषय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या वयाच्या,वेगवेगळ्या परिस्थितीतुन जाणारी माणसांचा अभ्यास,निरिक्षण कर.आणि ते तु नक्की करणारच
very NICE REALASTIC LIFE PROCESSS
ReplyDeleteग्रेट संजय
ReplyDelete