Thursday, 23 March 2017

गर्दी

..... गर्दी .....


" ... च्यायला कोण कडमलंय काय माहीत, दहा मिनीटे गाडी हललीच नाही. सात अडतीस चुकली तर उभ्याने जावं लागेल बोरीवली पर्यंत.
क्या हुवा है रे?? .. "
शेअर टॅक्सीत बसलेला एक अस्वस्थ नोकरदार, पण चांगला पगार असल्यामुळे भुलेश्वर ते चर्नीरोड हे चालता येईल असे अंतर दहा रुपयाची नोट देऊन रोज दोनदा प्रवास करणारा माणूस...

" ही एक गाडी जरा पुढे सरकली तर माझी सायकल अलगद बाजूने काढता येईल... आणि मग नक्की समजेल, काय झालंय ते.. "
असा कुतूहलाचा चेहरा घेऊन पार्कींग केलेल्या गाडी आणि गर्दी मुळे थांबलेल्या गाडीच्या गॅपमध्ये अडकून, पण न राहावून त्याच गाडीच्या टपावरुन मान उंचावून काही दिसतंय का, हे बघणारा वाणसामानाची डिलीव्हरी करणारा, घामट अंगाचा सायकलवाला...

" अगं आई गं... काय हाल झालेत जीवाचे. जराही मांस नाही अंगावर. घरच्यांना तरी काहीच वाटत नसेल याच्या ? "
असे चुकचूकणारे प्रश्न स्वतःलाच विचारत, एका हातात अर्धा डझन अंड्याची कागदी पिशवी सांभाळत आणि दुसऱ्या हातात मुलांना सकाळी डब्याला भाजीसाठी कापडी पिशवीत भाजीपाला नेणारी मध्यमवयीन गृहिणी...

" हां रमणीक भाय, मीच फोन केला, दुपारपासून इथेच बसलेला.. आता जाईल नंतर जाईल.. म्हणून वाट बघत होतो पण गेलाच नाही. आता धंदा वाढवायला गेलो तेव्हा समजला की हा तर मेलाय.. "
मी होतो म्हणून समजले नाहीतर रात्री कुत्र्यांनी खाल्लं असते, असं मनात ठेवून फुशारक्या मारणारा परंतू दुपार पासून त्याला एक ग्लास पाणी ही न देणारा, पोट कसंबसं पँटीत कोंबून चारही बाजूने ओसंडणारा.. जाडा दुकानमालक....

" आयला आता ही म्युनिसिपालीटीची कामं सुद्धा आम्हीच करायची का? नवीन साहेबांना तरी काय गरज होती स्वतः यायची? ते नसते तर दोन गर्दूल्ले पकडून बॉडी चादरीत टाकून गाडीत टाकली नसती..? उगाच हे स्ट्रेचर, हँडग्लोव्हज वगैरेची भानगड " असे प्रश्न कपाळावरच्या आठीत स्पष्ट वाचता येतील असा पावणे सहा - सहा फुट उंच, उंचीला साजेशी शरीरयष्टी असलेला डोक्यावर टोपी नसलेला इन्स्पेक्टर....

" शी किती घाण वास येतोय. आठ दिवस सडल्यासारखा.. हे साहेब लोक ऑर्डर सोडणार आणि आम्ही ही घाण कामं करायची? ड्युटी संपता संपता हे नरकाचं काम.. आता इथून घरी जाई पर्यंत हा वास डोक्यात राहील.. "
तोंडाला मास्क लावूनही ज्याच्या मनात काय चाललंय हे स्पष्ट वाचता येणारा, एका हाताने स्ट्रेचर आणि दुसऱ्या हाताने दुर्गंध दुर सारण्याच्या प्रयत्नात असलेला, यूनिफॉर्ममध्ये नसलेला परंतू खाकी पँट आणि पोलिसी बुटांमुळे क्षणात ओळखू येणारा त्रस्त हवालदार...

"......... "
काहीही हालचाल नसलेला, जगाच्या सर्व व्यापातून दुर गेलेला, जीवंत असेस्तोवर कुत्र्यापेक्षा वाईट हाल भोगून, प्रसंगी दुर्लक्षीत राहून रोज सेकंदा सेकंदाला एक एक श्वास कमी होत, आज पुर्णपणे थांबलेला, जीवंत असताना माणूस म्हणून कोणी लक्ष दिले नसताना.. निश्चेष्ट " बॉडी " म्हणून एवढी शंभर-दिडशे माणसांची गर्दी आणि गाड्यांची रांग गोळा करणारा तो मयत इसम...

" यावर आपल्याला '.... गर्दी..... ' नावाची कथा लिहिता येईल का? "
यासाठी आजूबाजूला असलेल्या गर्दीतले चेहरे वाचून त्यांचे भाव मनात साठवून, गर्दीतच.... गर्दीचा भाग असूनही प्रसंगाचा विचार न करता निव्वळ माणसं.. आणि स्ट्रेचर वरच्या पांढऱ्या चादरीतून बाहेर लटकणाऱ्या अचेतन, कृश हाताकडे बघून सुन्न झालेला ...
बिझ सं जय

No comments:

Post a Comment