Wednesday, 25 January 2017

क्षणिक

.... क्षणिक....



रुफ टॉपच्या ब्लोअर मधून थंडगार वारा मनाला सुखावत होता...
आमच्या अत्यंत महागड्या गाडीत बसून हातातल्या लेटेस्ट आय फोन मध्ये शॉपिंगचे पर्याय पाहत पाहत.. मनात विचार सुरु होते..

सिग्नल लागला म्हणून बहुतेक गाडी थांबली होती..
विरेंद्रने हॉर्न वाजवायला सुरुवात केली.
गाडीपुढे एका स्कुटरवर जोडपे होते..
स्कुटरवाल्याने जागा करुन दिली.
विरेंद्रने ओव्हरटेक करुन त्यांच्या बरोबरीने गाडी उभी केली.
सिग्नलवर ७९ सेकंद दिसत होते
जोडपे असल्याने सहजच दोघांवर नजर गेली.
छान होती जोडप्यातली बायको..  चेहऱ्यावर किंचीत लज्जेचा भाव होता. पण अत्यंत समाधानी चेहरा होता..
पुर्वी मी सुद्धा तशीच होती......

तिच्या नवऱ्याने हेल्मेट घातले होते.  समोरच्या काळ्या काचेमुळे त्याचा चेहरा दिसत नव्हते.... अचानक त्याने ती काच वर केली...

तेच डोळे...

अगदी हाताच्या अंतरावर होते ते दोघे  त्यामुळे मला जास्त वेळ नाही लागला त्याला ओळखायला.

काही वर्षांपुर्वी मी त्याच्या स्कुटरवर अशीच मागे बसायची..

कॉलेजला एकत्र होतो आम्ही. मी कॉलेजसुंदरी आणि तो एक सामान्य घरातला तरुण पण दिसायला अगदी स्मार्ट होता.  कॉलेजची मुलं माझ्या मागे... आणि माझी नजर याच्यावर...

महत्प्रयासाने तो मला भेटला. त्याच्या सहवासात धुंद धुंद व्हायचे मी..  तो मात्र एका शिस्तीने वागायचा. एवढी रुपसुंदरी समोर असताना माणूस थंड कसा राहू शकतो याची मला खरंच कमाल वाटायची...
पण तो तसाच होता शेवटपर्यंत...

सगळे लेक्चर अटेंड केल्यानंतरच तो कट्ट्यावर यायचा. मी त्याला ज्युनियर होते... आमचा ग्रुप कॉलेज बाहेरच असायचा जास्त वेळ.

त्याची शिस्त आणि माझा अवखळपणा यात एका प्रकारचे द्वंद्व चालू होते.

मी घातलेल्या हाकेला त्याने साद तर दिली होती, पण शरीराच्या हाकेला मात्र तो कधीही ओ..  देत नव्हता.

" हे सगळं फक्त लग्नानंतर..  मला नाही आवडत प्रेमाचं असं प्रदर्शन करायला.  प्रेम ही मनाची अवस्था आहे. त्याला मनातच ठेवायचं.  मी तुझ्यावर प्रेम करतो..  आणि तू माझ्यावर... ही भावना सगळ्यात मोठी आहे.  त्यासाठी शारीरिक होण्याची काय गरज आहे? "

" अरे पण, हे चालतं...  किस, स्पर्श.. यांनी प्रेमभावना वाढतेच.. आणि मी मुलगी असून तुला आव्हान देते तरी तू स्वीकारत नाहीस "

" हे बघ...
किस, स्पर्श ही शारीरिक जवळीक दर्शवतात..
प्रेमाला शारीरिक जवळीकीची गरज नसते.  माझ्या माहीतीत अशी लग्नाची जोडपी आहेत जी वर्षभरात फक्त तीन ते चार दिवसच भेटतात.  त्यांच्यात प्रेम आहेच..  वर्षानूवर्ष..
लग्नाआधी शारीरिक होणे हा  आततायीपणा आहे.... आणि मी तो कधीही करणार नाही.. "

त्याला बोलण्यात हरवणे मला कठिण होतं.  मी दरवेळी माघार घ्यायची.

पण मनात ठरवलेलं की...
कधीतरी याची तपस्या मोडणार मी...  माझ्या सौंदर्याने.

कॉलेजची पाच वर्ष झाल्यावर तो सरकारी नोकरीला लागला..
मी त्याला अनेक प्रायवेट कंपन्यांच्या ऑफर आणल्या.  मला सौंदर्याच्या जोरावर हवाईसुंदरी ची नोकरी मिळाली.  वेगवेगळ्या ऑफर यायच्या..  हो तसल्याच..  पण मी टाळत गेले.

शनिवार..  रविवार आमची भेट व्हायची..

एखाद्या रेस्टोरेंटमध्ये..  नंतर मग त्याच्या स्कुटरवरुन तो मला माझ्या घरी सोडायचा.  स्कुटरवर सुद्धा खांद्यावर हात ठेवण्याची परवानगी होती.

 त्याची तपस्या भंग करण्याची मला संधी हवी होती..
ती मिळाली माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने..

मित्रमैत्रिणींसोबत संध्याकाळी पार्टी करुन,  संध्याकाळी उशीरा आम्ही दोघे माझ्या घरी गेलो. आई बाबा नेमके बाहेर गेले होते दोन दिवसाकरीता...   घरात आम्ही दोघेच.

घेतलेल्या ड्रिंक्सचा असर हळूहळू दोघांवर होत होता.
मी चेंज करुन येते म्हणाले आणि मुद्दाम दरवाजा बंद न करता कपडे बदलू लागले.

तपस्या...  भंग झाली नशेत..

सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तो डोके धरुन खुर्चीत बसला होता...

मी उठल्याचे जाणवल्यावर माझ्याकडे न बघताच म्हणाला...

" तू कोल्ड्रिंक मध्ये काय टाकलं होतंस?
मला फसवलंस तू..  तुला प्रेमाची नाही..  तर शरीराची गरज आहे.  जे मी इतकी वर्ष टाळलं ते तू फसवून घेतलंस..."

" अरे असा काय तू... आपण इतकी वर्ष सोबत आहोत..  मी इतकी सुंदर आहे लोक माझ्याजवळ बोलण्यासाठी,  माझ्या सोबत जरा वेळ व्यतीत करण्यासाठी प्रयत्नशील असतात..  आणि तू मात्र षंढासारखा तुझी शिस्त, संस्कार पाळत बसलास...
शरीराचीही काही गरज असते मना प्रमाणे..  कधी समजणार तूला..  रात्रीचा एकएक क्षण आठव..  "

" मला नाही आठवायचंय काही..  तू मला ओळखू शकली नाहीस हीच एक खंत...  तूला दूसरा कोणीही मिळेल... तुझ्या सौंदर्याच्या जोरावर.
एक नक्की...  तू माझ्यासाठी नाहीस..
विसर मला. "

असं म्हणुन तो निघून गेला.

मला कळलंच नाही की माझ्या या एवढ्याश्या चुकीची शिक्षा एवढी मोठी का?

बहुतेक त्याची तपस्या तोडताना मी त्याचा विश्वास ही तोडला होता.

त्या नंतर तो मला टाळू लागला.  मी खुप प्रयत्न केले पण तो भेटलाच नाही...

शेवटी त्याला धडा शिकवण्यासाठी..  बाबांनी आणलेल्या विरेंद्रच्या प्रस्तावाला होकार दिला.

विरेंद्र करोडपती बाबांचा एकूलता एक मुलगा. याच्या बरोबर वेगळा...
पैसा म्हणजे सर्व काही..  भाव भावना..  प्रेम... मन या सर्वांना त्याच्या जागी शुन्य..

मला काही कमी पडून देत नव्हता.  पण जे मला कमी होतं ते त्याच्यात नव्हते...

संसार चालला होता..  सर्व सुख पायाशी लोळण घेत होती..
पण काहीतरी अपुर्णता होती.....

आमच्या गाडीच्या काळ्या काचेतून मी त्याला दिसत नसले तरी तो मला दिसत होता...

त्याच्या बायकोने त्याच्या कंबरेत हात घातला....

मला वाटलं...  तो झिडकारेल....

पण नाही...  त्याने मागे पाहीलं...  आणि गोड हसला...  पुर्वी हसायचा तसाच..

तो बदलला होता...?  की...  लग्नानंतर येणारी सहजता त्याच्यात आली होती...

सिग्नल सुटला...
तो क्षणात आमच्या पुढे निघूनही गेला...
बायकोने त्याला मागून घट्ट पकडले होते...

त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद माझा होता...
जो मी " क्षणिक"  सुखासाठी कायमचा हरवला होता...


3 comments:

  1. धन्यवाद विनू

    ReplyDelete
  2. छान वाटली ही कथा. एक विचार, एक विषय या दृष्टीने ही कथा छान आहे. पण वाचताना शेवट काय असेल याचा अंदाज येतो, तो अंदाज वाचकाला न येऊ देता लिहा, छान वाटेल.

    ReplyDelete