Monday, 19 November 2018

गिल्ट

….. गिल्ट …..



“ आज मला थोडं महत्त्वाचे बोलायचंय.. “ ती  कसंबसं बोलली.

“ काय झालंय तुला? काल पासून मला जाणवतंय काहीतरी बिघडलंय तुझे. मला सांगितल्याशिवाय कळणार आहे का तुला? “ शेवटी त्याचा संयम तुटलाच. 

“ सांगू? “ तिने ओठ दाबत विचारलं.

“ हो… त्याशिवाय काही कळणार आहे का मला? “ त्याचा संयम तुटल्याने तो अस्वस्थ होता. 

“ आपण वेगळे होऊया? “ तिने धीर एकवटला आणि बोलून टाकलं. 

“ का? काय झालंय? माझं काही चुकलं का? आपल्या नात्यात काही घडलंय का? “ त्याने प्रश्न सुरू झाले. 

“ मला एक विचित्र प्रकारचा गिल्ट येतोय. हे सर्व चुकीचे वाटतं. आपण थांबुया इथेच. “ तिने डोळ्यातलं पाणी न पुसता वाहू दिलं.

“ अरे पण झाले तरी काय? उगाच? तूच म्हणायचीस ना? चोरी चोरी तेरी मेरी लव्ह स्टोरी चलने दे? हे बघ मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही हे तुलाही माहीत आहे. असं काही बोललीस तर मी स्वतःला संपवेन.. अँड आय मीन ईट.. “ तो काहीसा चिडूनच बोलत होता.

“ झालं पुन्हा तुझं सुरू? मला मरायची भाषा आवडत नाही. 
आठवतं? मी तुला विचारलेलं.. आपलं भविष्य काय आहे? “ तिने पुन्हा डोळे पुसले नाहीतच. 

“ हो आणि मी बोललेलो … भविष्य उज्ज्वल आहे आपलं.” तो स्थिर होता. 

“ किती दिवस आपण मनाची समजूत घालणार? होईल काहीतरी होईल काहीतरी बोलता बोलता वर्ष निघून जाताहेत. आपण मात्र आहोत तसेच. आपल्या नात्याला लोक नावे ठेवण्याआधीच आपण थांबुया. प्लिज ऐक माझे. “ यावेळी तिने डोळे पुसले. 

“ नको ना असं करू.. तुझ्याशिवाय माझे कोणीच नाही. माझं सर्वस्व आहेस तू. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. तू आणि मी एवढंच विश्व आहे माझे. बाकी मी विसरुन गेलोय कधीच. “ अगतिकपणे बोलला तो. 

“ तुझे विश्व मी आहे हा तुझा गैरसमज आहे. 
तुला तुझे कुटुंब आहे , मला माझे कुटुंब आहे. तुला तुझी बायको आहे . मला माझा नवरा आहे. 
मी आजपासून फक्त माझ्या नवऱ्यावर प्रेम करायचं ठरवलंय. तू पण विचार कर . तुझी बायको तुझ्या जवळ आहे .. तू तिच्यावर प्रेम कर. आपण खरंच थांबुया. “ आता तिचे डोळे कोरडे होते. 

“ अच्छा तर ही गोष्ट आहे? 
मी हिच्यापासून लांब राहतो आणि त्यामुळे मला त्रास होतोय असं तुला वाटतंय ना? 
मूर्खा तिच्या जवळ असण्याचा किंवा लांब असण्याचा आपल्याशी काय संबंध. आमची भांडणे ही अशीच मोठी मोठी चालतात. मी तुला बरं वाटावं म्हणून तिच्यापासून दूर राहतो असा विचार तू करत असशील तर, चुकतेस तू.. “ त्याची मनस्थिती बिघडत चालली होती. 

“ तसे नाही पण मला आता असे खरंच वाटतंय की आपण थांबलो पाहिजे. 
म्हणजे सगळे प्रश्न सुटतील आणि तसेही माझ्या मनात आलेला गिल्ट आपोआप कमी होणार नाहीच आहे “ मन घट्ट करत ती बोलली. 

“ ठिक आहे …
तुझ्या त्या गिल्ट ला कवटाळून बस तू...
मी मरतोच मग सोडवत बस तुझे प्रश्न. इट्स ऑल गोईंग स्मूथली.. छान चाललं होतं आपले. 
आता तू तुझ्या मनासारखं कर… आणि मी माझ्या मनासारखं. आणि हो मला विसरू नको. 
नाही .. हे मुद्दाम सांगतोय.. कारण मेलेल्या माणसाची आठवण त्याच्या घरातले सुध्दा वर्षभरच काढतात. नंतर आयुष्यभर त्याचा फोटो धूळ खात पडतो. मी उद्या नसेन.. “ आता त्याच्या बांध फुटला. 

“ मूर्खांसारखं काहीही बरळू नको. काय गरज आहे तुला हे सर्व बोलायची?
मरणाशिवाय इतर गोष्टी बोलताच येत नाही का तुला? आणि असेच बोलणार असशील तर मला याक्षणी तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही. “ तिने फोन बंद करून ठेवून दिला.

मनात प्रश्नांचे वादळ घेऊन ती घरातली कामं करायला लागली. 
तो नक्की फोन करायचा प्रयत्न करत असणार हे तिला माहीत होते. 

“ मला कळते रे तुझी घुसमट. आपली भेट होणार वर्षातून एक किंवा दोन. त्या एका भेटीसाठी तू स्वतःवर निर्बंध घालून घेणार. मला नाही पाहवत तुझी अवस्था. प्रेम आणि शरीर संबंध या वेगळ्या गोष्टी आहेत.
तू सरमिसळ करतोस त्यात. तुला हे समजण्यासाठी मला तुझ्यापासून लांब जावेच लागेल. मनाविरुद्ध का असेना पण मी हा निर्णय घेतलाय. आपण लांबच राहूया. आपापल्या आयुष्यात सुखी आणि समाधानी असण्याचे नाटक करूया. आपण भेटण्याआधीही तेच करत होतो ना? लेट्स डू ईट अगेन “ तिचे मनातल्या मनात बोलणे कोणालाच ऐकू जाणार नव्हते. 

अनेकदा प्रयत्न करूनही तिचा फोन बंद येत होता हे पाहून त्याने उद्विग्नतेने अखेरीस स्वतःचा फोन बाजूला ठेवला. 

“ तुला माझं प्रेम कळतंय. पण मी का कळत नाहीये? मी जर तुझ्यावर प्रेम करतोय तर इतर कोणाशी कसा काय रत होऊ शकतो? मला माझ्या प्रेमात वाटेकरी नको. तुला वाटतं की नेहमी हा मरणाचे बोलतो. बघ आज ते करतोच. मी तुझा नाही तर इतर कोणाचाही नाही. 
हेल विथ कुटुंब अँड जबाबदाऱ्या. माझ्या असण्याने कोणाला फरक नाही तर नसण्याने कोणाला पडणार आहे? “ मन घट्ट करत तो मनातल्या मनात बोलत होता. 
बोलता बोलता त्याने कपाटातला स्क्रू ड्रायव्हर घेतला आणि खिडकीवर चढून थोडा ढिला झालेला स्क्रू घट्ट करू लागला. 
.
.
.
.
फोन चालू झाला तेव्हा अपेक्षेप्रमाणे त्याचे सोळा मिसकॉल होतेच  शिवाय त्यांच्या कॉमन मैत्रीणीचे चार मिसकॉल. तिने तिला आधी कॉल केला.

“ हॅलो.. काय झाले? इतके कॉल का केलेस? माझी बॅटरी संपली होती म्हणून चार्जिंग ला लावलेला मी फोन. “ ती उगाच काहीतरी सांगत होती. 

“ ऐक… 
ही इज नो मोर… अपघात होता तो. 
खिडकीवर काहीतरी करायला चढला होता. हात निसटला आणि…… “
पुढचं ऐकायला तिच्या हातात फोन राहिलाच नाही.

मैत्रीण तिकडे हॅलो हॅलो करत होती.. तिला तिचे ओरडणे ऐकू आले… 
“ नाही तो अपघात नव्हता…. मी खून केला केला…. आधी आमच्या प्रेमाचा...आणि आता त्याचा…. “ 

Monday, 12 November 2018

नाद ध्वनी

..... नाद ध्वनी ......



संध्याकाळी नेहमीप्रमाणे मंदिरात बसून त्या पवित्र वातावरणात येणारी वेगवेगळी माणसे न्याहाळण्याचे काम मी नेहमीप्रमाणे करत होती. कापसाच्या वाती वळत हे काम माझे नित्यनियमाचे होतं.


वयाची साठी उलटून गेली होती. भरपूर निरोगी आयुष्य मिळालं होतं.

नवरा, दोन मुलं त्यांच्या बायका, त्यांची मुलं. यांच्यातच आयुष्य कधी उतरणीला लागलं ते समजलंच नाही. सगळ्या जबाबदाऱ्या पेलता पेलता आयुष्य जगता आलं नाही याची खंत मनाला राहिलीच.


या मंदिरात आले की खूप शांत वाटायचे.

शंकराचे मंदिर ते…….

मंदिरात येणारा जाणारा प्रत्येक जण घंटा वाजवायचा. तो नाद ध्वनी मला अगदीच सवयीचा झाला होता. त्या आवाजात एक जादू होती.


मी आणि तो …….


आम्ही दोघे गावच्या शंकराच्या देवळात भेटायचो तेव्हा आत येताना मी आधी घंटा वाजवायची.. मग त्याचा ध्वनी थांबण्याआधीच तो पुन्हा वाजवायचा. लागोपाठ येणारा तो आवाज कित्येक दिवसात ऐकला नव्हता. प्रत्येक घंटेचा आवाज वेगळा असतो. पण गावच्या शंकराच्या देवळातल्या त्या घंटेचा नाद ध्वनी आणि या मंदिराच्या घंटेचा नाद ध्वनी हा हुबेहूब असल्यानेच कदाचीत मला या मंदिराची ओढ लागली होती.

देवळात एकत्र दर्शन घेऊन झाले की मग मागच्या नदीच्या तीरावर पाण्यात पाय सोडून बसणे हे नेहमीचेच होते.


मला तो आवडायचा आणि त्यालाही मी आवडायची.

ही आवड मात्र अव्यक्तच राहिली. डोळ्यांची भाषा समजत होती. पण ओठ नेहमीच अव्यक्त राहिले..


त्याचेही आणि माझेही…..

मंदिरातली घंटा वाजली…..अगदी तशीच…  जशी मी वाजवायची…

तो ध्वनी थांबण्याआधीच पुन्हा घंटा वाजली… जसा तो वाजवायचा….

क्षणभर हृदयाचा ठोका थांबला

हातातली वात अलगद निसटली..

एक जोडपे होते… नवरा बायकोच होते.


“ किती वर्षांनी येतोय ना आपण या मंदिरात?” ती बोलली.


‘ तुला आठवतं ...आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्या आजी बसल्यात ना तिथे बसलो होतो “ माझ्याकडे बोट दाखवत तो बोलला. मला उगाचच असहजपणा आला.

त्याच्या हातात नारळ, फुलपुडी होती.


“ मला एवढं लख्ख आठवत नाहीये. पण आपण मंदिरात आलेलो हे आठवतेय. “ तिने त्याचा हात धरला आणि गाभाऱ्याच्या बाहेर असलेल्या हनुमानाच्या मूर्तीकडे ओढले. दोघेही मूर्तीसमोर जाऊन उभे राहीले. भक्तिभावाने हात जोडले… अगदी आम्ही जोडायचो तसेच.


“ देवा ही साथ अशीच राहू दे… तूच एकत्र आणलंस.. तूच एकत्र ठेव आम्हाला…” तो मोठ्याने बोलला.

त्याच्या हातावर चापटी मारत ती बोलली..

“ देवाला मनातलं कळतं… त्यासाठी शब्दांची गरज नसते… “

“ हो बाई बरोबरच आहे… शब्दांची गरज तर तुझ्या-माझ्या सारख्या माणसांना लागते… तुला माझ्या मनातले कुठे ऐकू येतं? तू ही माझ्या प्रेमाची देवता आहेस. मग तुला का शब्दांची गरज लागते? “ तो गालातल्या गालात हसत हसत प्रश्न विचारत होता.


“ चल आता गाभाऱ्यात … तू आणि तुझे न संपणारे प्रश्न…! “ तिची नजर अचानक माझ्याकडे गेली. माझ्या गालावर असणारे मंद हसू तिच्या नजरेने टिपलं होतं.

ते दोघेही गाभाऱ्यात गेले.

गाभाऱ्यातून त्यांचे आवाज येत होते.

“ नारळ कुठे ठेऊ? आणि हा हार तू वाहतेस की मी वाहू? की आपण  दोघांनी एकत्र वाहायचा? “ त्याचे खट्याळ प्रश्न सुरूच होते

दर्शन घेऊन ते दोघे गाभाऱ्यातून बाहेर आले.

मला तिच्या ठिकाणी मीच दिसत होते.

तिची नजर पुन्हा माझ्याकडे गेलीच. तिने लगेच त्याला खुणावले. त्याने माझ्याकडे हसून पाहिले आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावर नजर खिळवली. मंदिराच्या आतच समोर असलेल्या कठड्यावर दोघे बसले.


त्यांना त्यांचे या मंदिरातले जुने दिवस आठवत होते.. आणि मला गावाच्या देवळातले आमचे दिवस….. ते दिवस आठवून माझ्या चेहऱ्यावर आपोआपच हसू फुलत होते. आणि माझा फुलणारा चेहरा बघून तिच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडत होता.

त्यांची बहुतेक जाण्याची वेळ झाली होती.

ती उठली..

“ चल आता.. झाले ना तुझे समाधान?

मला ही इथे एक वेगळे समाधान मिळालंय…

बाहेर जाऊन सांगते तुला….

चल ना आता…” त्याचा हात धरून तिने त्याला उठवलं.

ती त्याला माझ्याबद्दलच सांगणार हे मला कळलं.


त्याचा मात्र पाय तिथून निघत नव्हता. जसा नदीच्या पाय सोडून बसलेला तो  मी निघाले तरी तिथून उठत नसे.

मी थोडी लांब आल्यावर तो उठत असे. त्याला मागे वळून वळून बघताना रस्ता कधी संपून जायचा तेच कळायचं नाही…


घंटा वाजली….


मी पुन्हा भानावर आली. घंटेजवळ हे उभे..

“ राणीसरकार तुम्ही अजून इथेच? “ यांनी मंद मंद हसत विचारले.


“ अहो ते जोडपे बघा ना..  “ बोट दाखवले मात्र … पण ते दोघे नव्हते तिथे.

यांनी चंद्रेश्वराला नमस्कार केला आणि बोलले

“ चला… नातवाला शिकवणीवरून घरी न्यायचे आहे ना? “


मी उठले… गाभाऱ्याकडे हात जोडून नमस्कार केला आणि सवयीप्रमाणे घंटा वाजवली. तो नाद ध्वनी थांबण्याआधीच पुन्हा घंटा वाजली…

अगदी तशीच….

जशी काही वेळापूर्वी जोडप्यातल्या त्याने वाजवली होती…. आणि गावच्या देवळात तो वाजवायचा….

मी मागे वळून पाहिलं…हे होते… मंद मंद हसत…


“ चला आता….

उशीर होत होता ना? “

- बिझ सं जय *sm*  ( १२ नोव्हेंबर, २०१८ )

Sunday, 16 September 2018

गिफ्ट

..... गिफ्ट .....


..... गिफ्ट .....

जस्टीनच्या वाढदिवसाला त्याने मागितलेले गिफ्ट त्याला कसे देता येईल हा विचार करुन जेसीकाचे डोके दुखायला लागलं होतं.

“मॉम… आता वाढदिवस झाला की मी गाडी चालवू शकतो. मला माझ्या या वाढदिवसाला डॅडची गाडी हवीय…  आपल्या फोटो अल्बममध्ये डॅडनी मला त्या गाडीच्या बोनट वर बसवून फोटो काढला आहे बघ.
मला ती कार हवीय. ती हवी… तशी नको….दुसरं काही नको. “

जोनाथन रोझीयर इराकच्या युद्धात शहीद झाला तेव्हा जस्टीन फक्त वर्षाचा होता. जोनाथनला गाड्यांची खूप आवड होती. 99 Toyota Celica convertible ही स्पोर्ट कार त्याची ड्रीम कार होती. या गाडीला काढता येणारे छप्पर असल्याने वाऱ्याशी स्पर्धा करत गाडी चालवायला जोनाथनला खूपच आवडायचं.
ज्यादिवशी सरकारी कॉफीनमध्ये त्याचे कलेवर आले त्यादिवशी जेसीका जस्टीनला मिठीत घेऊन खुप रडली. जोनाथनच्या शब्दांची तिला आठवण होती..
“ जस्टीन जे मागेल ते त्याला द्यायचे... ही इज माय प्रिन्स.. अँड शूड लिव लाईक प्रिन्स. “

आजवर जेसीकाने त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडून दिली नव्हती.
परंतू त्याची आताची मागणी ही खूप कठीण होती. पंधरा वर्षांपूर्वी ज्या मध्यस्थातर्फे ती कार विकली त्याला मरुन चार वर्षे झाली होती. काय करता येईल या विचारात असताना तिला केलीची आठवण झाली.
केली तिची मैत्रीण. का कोणास ठाऊक जेसीकाला तिच्याकडून काहीतरी मदत होईल असे वाटलं.
फोनवर जस्टीनच्या अजब गिफ्टच्या मागणीचे ऐकून केलीलाही भरून आले.
“ जेस… इतक्या वर्षांनीही त्याला जोनाथनच्या त्या गाडीची आठवण आहे बघ. ही वॉन्टस हिज फादर बॅक… गाडीच्या रुपात. पंधरा वर्षांपूर्वीची गाडी मिळेल याची शक्यता खूपच कमी आहे. तरीही तू तुझ्याकडे असलेले त्या गाडीचे फोटो आणि जोनाथनचे  काही युनिफॉर्ममधले फोटो पाठव.
मला जे सुचलंय ते जर साध्य झाले तर तो चमत्कार म्हणावा लागेल. “

केलीने ईमेल वर आलेले फोटो सेव्ह केले.
आणि एक छोटा लेख लिहीला.

“ नमस्कार…
मी जेसीका रोझीयर, माझा पत्ता आणि संपर्क क्रमांक मी खाली लिहिला आहे.
मी लेफ्टनंट जोनाथन रोझीयर ची पत्नी आहे. जोनाथन २००३ साली इराक मध्ये देशासाठी शहीद झाले आहेत.
त्यांची आठवण म्हणजे माझा मुलगा जस्टीन. २००३ साली जस्टीन ११ महिन्याचा होता. जोनाथनचे शेवटचे शब्द होते. जस्टीन ला काही कमी पडू देऊ नकोस. मी पंधरा वर्ष त्याप्रमाणे वागले.
परंतु आता जस्टीनला त्याचे बाबा त्यांच्या गाडीच्या रुपात हवे आहेत. असं समजा की, ही कार जेव्हा आमच्या घरी पुन्हा येईल तेव्हा जणू जोनाथनच आमच्याकडे परत येईल.
ही गाडी २००४ साली आम्ही विकली आहे. परंतू मध्यस्थी असल्याने विकत घेणाऱ्याची काहीच माहीती आमच्याकडे नाही.
खाली जोडलेल्या फोटोत काळ्या रंगांची ‘ 1999 Toyota Celica convertible ’ आहे तिचा नंबर ही फोटोत आहे.
ही गाडी शोधण्यात मला सर्वांची मदत हवी.
या गाडीची कोणाला माहीती मिळाली तर कृपया माझ्या नंबर वर कळवा. “

इकडे जेसीकाचा फोन वाजला.
केलीच होती.
“ आय हॅव ईमेल्ड यु सम मॅटर विथ सम फोटोग्राफ.
जस्ट पुट इट ऑन युअर फेसबुक…
मी ऐकलंय की फेसबुकवर चमत्कार होतात..
लेट्स होप फॉर द बेस्ट…”

“ ओके.. डन.. मी लगेच करते हे काम. “ म्हणून जेसीकाने फोन ठेवून लॅपटॉप सुरु केला.

आलेला ईमेल एकदा वाचून. त्याप्रमाणे तिने तिच्या फेसबुकवर पोस्ट केली.
केलीचे शब्द तिच्या कानात घुमत होते.

“ फेसबुकवर चमत्कार होतात…. “

तिने मनोमन प्रार्थना केली…
“ हे जीजस… होऊ दे चमत्कार..
मिळू दे जोनाथनची कार..
एका मुलाला बापाला भेटायची इच्छा पूर्ण कर.. हे सर्वशक्तीशाली परमेश्वरा…”

तिची ती पोस्ट तिच्या नातेवाईकांनी, मित्र - मैत्रिणींनी वाचून लगेच शेअर केली. दोन तीन दिवसात त्या पोस्टचे शेकडो शेअर शहरात आणि प्रांतात झाले.
इंटरनेटला कोणतीही मर्यादा नसते.

नवव्या दिवशी जेसीकाचा फोन वाजला.

“ हॅलो.. इज दॅट मिसेस जेसीका रोझीयर?
मी मिस्टर कायले फॉक्स बोलतोय, प्लेझेंट ग्रुव्ह,उताहवरून मला तुमच्याशी गाडीसंबंधी बोलायचे आहे. “

जेसीकाचा त्या बोलण्यावर विश्वासच बसेना.
“ डिड यू ओन इट?
तुमच्याकडे आहे का ती? ……
प्लिज मला ती हवीय. जी काही किंमत असेल ती मी देईन. पण ती मला हवीय..”

“ मॅडम प्लिज ऐकून घ्या..
मी एक समाजसेवी संस्था चालवतो. ‘ फौलो द फ्लॅग ‘ नावाची संस्था आहे माझी. तुमची पोस्ट मी माझ्या एका मित्राच्या वॉलवर पाहिली आणि मला लक्षात आलं की फोटोतली कार ही मी अनेकदा पाहिली आहे.
माझ्या शहरात एका व्यक्तीकडे ती गाडी आहे. मी त्या व्यक्तीला जाऊन भेटलो. त्याला तुमचे आवाहन दाखवले. ते योग्य किंमत देऊन गाडी विकायला तयार ही आहेत.
परंतू… “

“ परंतू? काय परंतू? मला त्यांच्या सर्व अटी मान्य आहेत. जे पैसे सांगतील ते मी जमवेन. मला मला ती हवीय.. आय वॉन्ट माय जोनाथन बॅक.. आय वॉन्ट टू सी माय जस्टीन स्मायलिंग… “ तिची अधीरता डोळ्यातून वाहू लागली होती.

“ मॅम आम्ही जी संस्था चालवतो त्याच्या सभासदांना विचारुन आम्ही एक निर्णय घेतला तो तुम्हाला ऐकवतो.
आम्ही ठरवले की ही गाडी देशासाठी बलिदान दिलेल्या लेफ्टनंट रोझीयर यांची आठवण आहे. तुमच्या जस्टीनने देशासाठी आपला पिता दिला आहे.
मग देश म्हणून आम्ही त्याचे देणे लागतो.
आम्ही या गाडीसाठी डोनेशन जमा करणार आहोत. मला खात्री आहे पुढच्या दहा ते बारा दिवसात आवश्यक ती रक्कम गोळा होईल. जस्टीनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला चमचमणारी कार तुमच्या घरासमोर मी स्वतः घेऊन येईन. हा आमचा शब्द आहे तुम्हाला.
फक्त एक करा ही गोष्ट कोणालाही कळू देऊ नका.
नॉट टू इव्हन जस्टीन.. इट विल बी ग्रेट सरप्राईज फॉर हीम. “ मिस्टर कायले च्या आवाजात आश्वासकता होती. “

जेसीकाचा आनंद गगनात मावेना. निव्वळ १ टक्का शक्यता असलेली गोष्ट घडताना ती अनुभवणार होती.
तिने फोनवर मिस्टर कायले फॉक्स यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक घेतला.
खूप धन्यवाद देऊन लवकरच त्यांना तिथे जाऊन भेटायचे आश्वासन दिले.

फॉक्स यांचा फोन ठेवल्यावर तिने लगेच केलीचा नंबर फिरवला.
“ हॅलो केली…
गेस व्हॉट….
वुई गॉट द जोनाथनस् कार…
इट्स इन प्लेझेंट ग्रुव्ह… “

केलीला क्षणभर विश्वासच बसेना.
जेसीकाने भरभर फॉक्सच्या फोनबद्दल सांगितले.

खरंच चमत्कार झाला होता.

दोन दिवसांनी पुन्हा कायले फॉक्स यांचा फोन आला.
गाडीची मालकी फिरवून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष गाडी पाहण्यासाठी त्यांनी जेसीकाला बोलावून घेतले.

जस्टीन ला काही कळू न देता पिकनिकच्या निमित्ताने केली आणि ती एका सकाळी प्लेझेंट ग्रुव्हला गेल्या.
तिथे मिस्टर फॉक्सनी त्यांची भेट घेतली.
गाडी होती त्या घरात त्यांना घेऊन गेले.
गाडी चांगल्या स्थितीत होती. दुपारी संबंधीत कार्यालयात जाऊन त्यांनी गाडी आपल्या नावावर करून घेतली. एव्हाना मदतीची जमा रक्कमही खूप मोठी झाली होती. एक थोडी रक्कम जेसीका आणि केलीनेही दिली. गाडीकडे बघताना मिस्टर कायले यांच्या मनात अजून एक गोष्ट आली. अजून जस्टीनच्या वाढदिवसाला अवकाश होता तर मित्रांच्या मदतीने त्या गाडीला नव्याने रंग आणि जुने खराब झालेले भाग बदलून गाडी नव्यासारखी दिसेल असे करायचे ठरवले.

वाढदिवसाचा दिवस उजाडला.
सरप्राइज राखले जावे म्हणून जेसीकाने जस्टीनसाठी इतर गिफ्ट आणले होते.
जस्टीन ते पाहून हिरमुसला. पण काही बोलला नाही.
इकडे चार तासाचा प्रवास करुन मिस्टर कायले फॉक्स चमचमणारी 1999 Toyota Celica convertible घेऊन शहरात घुसले.
त्यांच्या फोनची वाट बघत जेसीका तयारी करत होती.

“ आम्ही पोहचलो तुमच्या घराजवळ “ हा मॅसेज बघून जमलेल्या सर्व मंडळींना जेसीकाने बाहेर लॉनवर गोळा व्हायला सांगितले.
जस्टीनच्या पाठीमागे उभी राहून तिने जस्टीनला रस्त्याच्या दिशेने बघायला सांगितले.
सगळे शांत होते…
रस्त्यावरून काळी सिलिका येत होती.
जेसीकाला जणू तिचा जोनाथन येत असल्याचा भास झाला. जस्टीनला आधी काहीच कळलं नाही.
जेव्हा ती गाडी जवळ आली आणि त्यांच्या यार्ड मध्ये घुसली तेव्हा तो क्षणभर तो गोंधळला.
“ जस्टीन… युअर डॅड…. “ जेसीकाच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली..
तो गाडीच्या जवळ गेला. मिस्टर कायले फॉक्सनी गाडीची चावी त्याच्या हातात दिली…
आणि ड्रायव्हिंग सीटचा दरवाजा उघडून दिला.
आणि विचारलं…
“ जस्टीन...कसे वाटतंय… डॅडना भेटून? “
जस्टीन च्या डोळ्यात पाणी होते.
त्याने बोलण्यासाठी तोंड उघडले, पण शब्द बाहेर येईनात.
त्याने एकवार जेसीकाकडे पाहिलं…
आणि बोलला…
“ थँक्स मॉम… इट्स बेस्ट गिफ्ट ऑफ माय लाईफ. “
उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.

चमत्कार होतो.. आणि तो झाला होता..

- बिझ सं जय ( १६ सप्टेंबर,२०१८ )

Friday, 7 September 2018

माया

.....माया.....



..... माया .....

हायवेवर झालेल्या डंपर आणि बाईक अपघातातली मुलगी शुध्दीवर आली हे कळताच देवदूत मानले गेलेले हॉस्पिटल मधले मोगरे तिला लगेच भेटायला गेले. सरकारी हॉस्पिटलला तिला आणलं तेव्हा तिच्या डोक्यावर भली मोठी खोक पडली होती. हायवे जवळच्या डॉक्टरने तात्पुरती मलमपट्टी करून तातडीने या सरकारी हॉस्पिटलला हलवायला सांगितले होते. हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा मोगरेंनी सवयीप्रमाणे तिचा हात हातात घेतला.. आणि बोलले

“ बाळा काही होणार नाही तुला. इथले डॉक्टर खुप चांगले आहेत. “

पाच - सहा वर्षाची चिमुरडी ती. पण त्यांचा प्रेमळ स्पर्श तिला खूप धीर देऊन गेला. त्यांच्या डोळ्यातली माया तिला खुप आश्वासक वाटली.
मोगरेंनी तिच्यासोबत असलेल्या दोन मध्यमवयीन पुरुषांना सोबत घेतले आणि लगेच रिसेप्शनला जाऊन नोंदणी करुन, लहान मुलांच्या वॉर्ड मध्ये एका बेडची व्यवस्था करुन दिली.
एम. आर. आय., सिटी स्कॅन, एक्स-रे सारख्या किचकट प्रक्रिया जलदगतीने व्हाव्या म्हणून स्वतः जातीने लक्ष दिले.
हॉस्पिटलला सात वाजता आणलेल्या त्या चिमुरडीचे आठ वाजता सर्व रिपोर्ट तयार होते. मोगरेंची घाई बघून हॉस्पिटलमधले कर्मचारी त्यांना विचारत होते…

“ मोगरे इतकी घाई काय आहे? हे तुमच्यासाठी नेहमीचे काम आहे. अशा शेकडो केस तुम्ही पाहिल्या आहात. “

त्यावर काही न बोलता मोगरे त्यांना लवकर रिपोर्ट देण्याची विनंती करत राहिले.
सगळे रिपोर्ट पाहून डॉक्टर देशमुखांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये न्यायला सांगितले.
ऑपरेशन म्हणजे फक्त तिच्या डोक्याला झालेल्या जखमेला टाके, पण तिचे वय लहान असल्याने पूर्ण बेशुद्ध करुन टाके घालण्याचा निर्णय देशमुखांनी घेतला होता.

ऑपेरेशन होईपर्यंत मोगरे बाहेरच थांबले होते. सोबत असलेले दोन नातलग हे तिचे काका आणि मामा होते. त्यांच्याकडून कळलं की त्या चिमुरडीची आई एक वर्षापूर्वी सर्पदंश होऊन वारली होती.

शुद्धीवर आल्यावर चिमुरडीने आजूबाजूला पाहिले. मोगरे बाजूलाच उभे होते.
ती बोलली…

“ काका आता नाही दुखत मला. माझे काका कुठे आहेत? मामा कुठे आहे? “
तिचा हात हातात घेत मोगरे बोलले.

“ बेटा ते झोपलेत जरा वेळ.. बाहेरच आहेत. मला तुझं नाव सांग बघू. “

“माझं नाव माया.. “ तिने हसत सांगितले.

“ व्वा मस्त नाव आहे तुझे.. अगदी तुला सूट होते.  आता तू झोप जरा वेळ . मी काकांना पाठवतो तुझ्याजवळ “. मोगरेंनी तिचा हात थोपटत तिला झोपायला सांगितले.
वऱ्हांड्यात झोपलेल्या तिच्या काकांना ती शुद्धीवर आलीय हे सांगून ते घरी गेले.

दुसऱ्या दिवशी सर्व कामे आटपून संध्याकाळी पाच वाजता मोगरे छान गुलाबाचे फूल आणि एक कॅडबरी घेऊन आले.
त्यांना बघताच गोंडस मायाची कळी खुलली. हातातली कॅडबरी बघून स्वारी अजूनच खुश.

“ अरे व्वा .. आज माया परी खूपच छान दिसतेय. मस्त झोप झालीय ना तिची? आता लगेच घरी गेली की जाईल बागेत फिरायला.. हो ना? “ मोगरेंनी कॅडबरी तिच्या हातात ठेवत विचारलं.

“ काका तुम्हाला काय माहीत, मला  बागेत खेळायला आवडतं ते? आणि मला हिच कॅडबरी आवडते हे तुम्हाला काकांनी सांगितले ना? “ तिने डोळे मोठे करत विचारलं.

मोगरे तिच्या काकांकडे बघत हसले आणि म्हणाले...

“ नाही मला सर्व माहीत आहे. तुला काय काय आवडतं ते. कसं ते एक सिक्रेट आहे “. डोळे मिचकावत मोगरे हसले…

“हां… मग नक्कीच बाबांनी सांगितले ना? मला माहीत आहे त्यांनीच सांगितले आहे. “ माया  कॅडबरी खात खात बोलत होती.

इतक्यात डॉक्टर देशमुख आले. बेडची फाईल आणि रिपोर्ट बघून बोलले.
“ आपण उद्या हिला डिस्चार्ज देऊ.  सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. टाके काढायला कधी यायचे ते मी उद्याच सांगेन. “

“ थँक यु डॉक्टर ” अनपेक्षितरित्या माया बोलली.
तिचे ऐकून डॉक्टर ही गालात हसले आणि पुढे गेले.

“ अरे व्वा हे बाळ शहाणेही आहे. उद्या तुला एकदम मोठी कॅडबरी आणेन हं “. एवढं बोलून ते तिथून निघाले.

दुसऱ्या दिवशी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच  मोगरे तिच्यासमोर भली मोठी कॅडबरी घेऊन हजर झाले.
घरी जायला मिळणार म्हणून स्वारी खूपच आनंदात होती. मोठी कॅडबरी बघून तो आनंद अजूनच वाढला.

मोगरेंचा हात हातात घेत ती म्हणाली.
“ मी आता घरी गेली ना की बाबांना तुमच्या बद्दल सांगेन. काकांकडे तुमचा फोन नंबर आहे. बाबांच्या फोनवरुन मी तुम्हाला फोन करेन. त्यांना तुमच्याशी बोलायला सांगेन. तुम्ही मला केवढी मोठी कॅडबरी आणलीत. ती मी बाबांना अर्धी देईन ...काकांना, मामाला ही देईन. “ ती भरभर सांगत होती.

“ तसं नको…
ही कॅडबरी मी तुझ्यासाठी आणलीय ना? तूच संपवायची ती.
बाबांना द्यायला मी नवीन आणून देईन. ही खा बघू माझ्यासमोरच. “ मोगरेंनी लगेच कॅडबरी उघडून दिलीही.

ती कॅडबरी खात असताना मोगरेंचे लक्ष तिच्या काकांकडे गेलं. ते डोळे पुसत होते.

“ आता निघा तुम्ही… उशीर होईल..
आणि काळजी घ्या तिची. “

पाठ फिरवून मोगरे तिथून निघाले. साश्रु नयनांनी….
त्यांनी हॉस्पिटलच्या गणपती मंदिरात जाऊन हात जोडले आणि प्रार्थना केली…

“ हे परमेश्वरा …. या चिमुरडीला वडिलांचा मृत्यू पचवायचे बळ दे…”
गणपतीच्या पावलांवर अश्रूंचा अभिषेक झाला.

- बिझ सं जय ( ९ सप्टेंबर, २०१८ ) 

Monday, 28 May 2018

सीट नंबर १३ ( भाग२ )

सीट नंबर १३ ( भाग २ )




“ एक्सक्युज मी…
कंडक्टर साहेब….

सीट नंबर १३ नेमकी कोणती ते सांगाल का मला? आय होप ती विंडो नसेल…”
नेव्ही ब्लु जीन्स आणि त्यावर सॉफ्ट रेड कलरचा टि शर्ट घातलेला मध्यमवयीन म्हणजे साधारण ३५-३७ वयाचा जय बस मध्ये चढल्या चढल्या वैतागून कंडक्टरला विचारत होता.
त्याची गाडी ऐनवेळेला बंद पडल्याने ऑफिस बॉय ला सांगून तातडीने या गाडीचे तिकीट काढायला सांगितले होते.
गेले पाच सहा वर्ष त्याने बसने प्रवास केलाच नव्हता.

“ साहेब १३ नंबर नेहमी विंडो सीटच असते. टू बाय टू मध्ये तसेच नंबर येतात. मुंबईतली लोकं विंडो सीट साठी तडफडत असतात आणि तुम्हाला ती नको झालीय? कमालच आहे..” जय च्या हातातले तिकीट पंच करून कंडक्टर पुढे सरकला.

“ मी काय म्हणतो.. मला दुसरी सीट मिळेल का? “ जयने चेहरा ओढून विचारलं.

“ हे बघा साहेब गाडी फुल आहे. तुम्हाला जे तिकीट मिळालंय ते कोट्याचे आहे. कोणी सिंगल आहे का पहा आणि करा एक्स्चेंज.. “ पुढच्या सीटवरचे तिकीट तपासत कंडक्टर बोलला.

“ माझ्या शेजारची सीट कोणाची आहे? त्यावर कोणी नाही आलंय अजून. “ सीटकडे बोट दाखवत जयने विचारपूस केली.

“ तिचे रिझर्वेशन सायन वरून आहे. तुम्ही तोवर बसू शकता त्या सीट वर. आल्यावर त्याला विनंती करा.
विंडो सीट सहसा कोणी सोडत नाही ” कंडक्टर पुढे सरकला.

“ नको मी बसतो माझ्या सीटवर .. आल्यावर बघू…”

अचानक जयला काहीतरी आठवले.
हे असं कधीतरी घडलंय का?
नाही ...नाही अरे हा तर “ déjà vu “ इफेक्ट आहे. आधी घडल्यासारखं वाटणे.
जाऊ दे..
हातातली छोटी बॅग वरच्या रॅकवर सरकवत तो सीट नंबर १३ वर बसला.

‘ एसटी आता पूर्वीसारखी राहिली नाही. पूर्वी तो जो खडखडाट होता आणि कंबर तोड सिट्स होत्या त्या जाऊन या आरामदायक पुशबॅक सिट्स आल्या आहेत. जोडीला वातानुकूलन ही आलंय.
प्रवास सुखकर होण्यासाठी चांगला प्रयत्न आहे हा. “
मनातल्या मनात जयचे विचार सुरू होते.

बस सेंट्रल वरून निघून दहा मिनिटे झाली होती.

सायन आले.

जय त्याच्या मोबाईलवर मेल चेक करत होता. इतक्यात आवाज आला..

“ एक्सक्युज मी…
मला वाटत १४ नंबर सीट विंडो आहे. आणि ती माझी आहे.” चेहऱ्यावर भलामोठा गॉगल लावलेली आणि दोन्ही हातात बॅगा सावरत एक त्याच्याच वयाची महिला उभी होती.
तिच्याकडे जास्त न पाहता तो उठला.
“ आयतीच विंडो सीट घेतेय तर का सोडा? “ हा विचार करून तो तसा मनातून खुश झाला होता.

त्याने तिला जागा करून दिली. तिने हातातली बॅग रॅकवर ठेवायचा निष्फळ प्रयत्न केला पण उंची कमी असल्याने तिने गॉगलच्या आडूनच जयकडे मदतीसाठी पाहिले.

“ येस… मी ठेवतो बॅग वर. बसा तुम्ही. या नवीन गाडीत रॅक जरा जास्तच उंच आहेत. “ जयने अशा थाटात सांगितले की जणू तो बारा महिने एसटीने प्रवास करत होता.

खिडकीतून हात हलवत बाहेरच्या व्यक्तीला ती बोलली.

“ रवी… मिळाली सिट .. जा तू आता. मुली घरी एकट्याच आहेत. काकींना फोन करेन मी जवळ गेल्यावर. काळजी घे मुलींची. “ ती ओरडून सांगत होती.

“ या खिडकीतून आवाज बाहेर जात नाही.. कितीही ओरडलात तरी काही ऐकू येणार नाही त्यांना. “ हसत हसत जय बोलला.

“ हो का? सॉरी मला माहित नव्हते.” तिने डोळ्यावरचा भला मोठा गॉगल काढला. त्याचवेळी जयची नजर बाहेरच्या व्यक्तीकडे गेली.

अरे हा तर….

रवी…

क्षणात तो पंधरा वर्ष मागे गेला.
.
.
.
____________________________________

माधुरी त्याचा हात हातात घेत म्हणाली.
“ जय ….
मला तुला हे सांगायचे होते. पण जर सांगितले तर तू कसा रिऍक्ट होशील याचा काहीच अंदाज नाहीये मला. “

“ मधू.. मला हे बाहेरून कळतंय याचा अर्थ कळतोय का तुला? “ जयने तिचा हात हातातून सोडवला.

“ अरे किती आणि काय काय सांगू तुला? ऐकून घेशील जरा? “ माधुरीच्या डोळ्यात पाणी होते.

“ मला एकच समजतंय मधू…
परवा मी तुझ्या घरी आलेलो तेव्हा तुझी आई जे बोलली ते ऐकून तर असे वाटतंय की जणू तुमचे लग्न परवावर आहे. विचार कर जरा… तू मला फसवते आहेस की स्वतःला? “ तिच्या डोळ्यातून येणारा अश्रू रुमालाने पुसत त्याने प्रश्न केला.

“ जय…
आपल्याला भेटायला उशीर झाला रे.. अरे तो समोरच्या दुकानातला…” ती बोलत असताना मध्येच थांबवत जय चिडला.

“तू आता जगभरच्या कहाण्या सांगशील आणि म्हणशील माझी काहीच चूक नाही. जे काही झाले ते आपोआपच झाले. रवी आणि तुझे लग्न ठरलंय असेच तुझी आई बोलली मला आणि हे तू लपवून ठेवलंस माझ्यापासून? मधू तू मला फसवलंस असे नाही वाटत तुला? “

“ मी काय सांगतेय ते तू ऐकूनच घेत नाहीयेस. रवीला हो बोलायची कारणे तुला सांगितली तरी पटणार नाहीत. मला वेळ दे जरा मी सर्व ठिक करेन. “ तिने त्याचा हात दाबत विश्वासपूर्वक सांगितले.

“ काय ठिक करणार आहेस माधुरी? ‘ हा आवाज रवीचा होता जो त्यांच्या मागून आला.

दोघांनीही चमकून मागे पाहिलं.

“ अरे ही मोठ्या बापाची औलाद आहे. भडव्यांना फिरवायला मुली हव्या असतात, चार प्रेमाचे शब्द बोलले, चार पैसे खर्च केले की तुम्ही मूर्ख मुली यांच्या जाळ्यात फसता. मी आज याचा खुनच पाडणार. “
लाल डोळ्यांनी चिडून बघणारा, दात ओठ चावून बोलणारा रवी बघून माधुरी खूपच घाबरली.
ती पटकन उठली आणि रवी समोर जाऊन उभी राहिली.
जय ही उठला.
“ जय तू जा इथून.. हा मारेल तुला. जय जा.” जय आणि रवीत जे अंतर होते ते ती कायम ठेवत होती. रवीच्या शक्तीपूढे ती कमीच पडत होती तरीही ती त्याला जयपर्यंत पोहचू देत नव्हती.

जय शांतपणे उभा होता. त्याला रवीची भीती नव्हती. भीती ही होती की हे सर्व समजल्यावर रवी माधुरीला शारीरिक इजा करेल.

“ जय तो मला काही करणार नाही .. तू जा.. लवकर” त्याच्या डोळ्यातली तिच्याबद्दलची काळजी तिला स्पष्ट दिसत होती.

“ जय जा……. “

__________________________________________

बेल वाजली तसा तो भानावर आला.

एव्हाना तिने गॉगल काढून हातातल्या पर्स मध्ये ठेवला. त्याच्याकडे एकवार पाहिले आणि हलकीशी स्माईल दिली. तिने अजून त्याला ओळखले नव्हते याची ती खूण होती. ओळखणार तरी कशी ती कॉलेजमध्ये असतानाचा जय आणि आताचा जय यात जमीन आस्मानाचा फरक होता. पोट सुटलेला, गोल्डन फ्रेमचा चष्मा, वेळेनुसार आणि वयामुळे आलेले पोक्तपण कोणीही त्याला इतक्या वर्षांनी ओळखणे शक्य नव्हतेच.
तिच्याकडे बघत तो सीटवर बसला.
“ आपण कुठे उतरणार? ” भले त्याला माहित होते की ती महाड ला उतरणार तरीही त्याने तिला विचारलेच.

“ जय… अजून किती वेळ तू मला न ओळखण्याचे नाटक करशील? “ ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघून बोलली.

त्याला अजिबात अपेक्षा नसलेली गोष्ट झाली होती.
म्हणजे तिने आपल्याला बघताच क्षणी ओळखले होते.. आपणच तिला ओळखू शकलो नाही.

“मधू…. ओळखलंस मला? माझ्यात इतका बदल झालाय तरीही ओळखलंस? “ त्याने तिच्या डोळ्यात पाहून विचारले.

“ हो… अरे तू कितीही बदलास तरी तुझे डोळे बदलणार आहेत का?
आपण शेवटचे भेटलो त्याला १५ वर्ष झालीत.. “ तिची नजर एकटक त्याच्याकडे होती.

“ पण तू मला ओळखलं नव्हतेस हे मान्य कर.. रवी दिसला म्हणून तुला माझी ओळख पटली. नाहीतर तू मला ओळखलं नसतं हे नक्की.“ मंद मंद हसत माधुरी त्याचा अंदाज घेत होती.

“मला शोधायचा कधी प्रयत्न केला होतास? नसशील म्हणा.. मी वाईट वागून दूर गेलेलो तुझ्यापासून.. “ चेहरा पाडत जय बोलला.

“ घेतला होता. इन्फॅक्ट तू मला दोनदा समोरासमोर दिसला ही होतास.
मी तुला ओळखलेही होते. तू तुझ्या धुंदीत होतास. तू त्याच जागी राहत असशील की नाही याची मला खात्रीही नव्हती. आणि येऊन तरी काय करणार होते? आपला शेवटचा फोन आठवतोय ना? तुझ्याबद्दलचा तो राग मला तुझ्यापासून दूर नेण्यास कारणीभूत ठरला. तू तर एकदम आनंदी आणि नेहमी खुश राहणारा होतास.. आताही तसाच दिसतो आहेस. मला एकदा रवीने चिडवण्यासाठी म्हणून तुझा आणि तुझ्या बायकोचा फेसबूक वरचा फोटो दाखवला होता. बहुतेक मुलगा होता दोघांसोबत. कोण कोण आहे आता घरी?” खूप प्रश्न विचारायचे होते तिला.

“दोन मुलं आहेत मोठा मुलगा आणि लहान मुलगी. तुला? “ कोरडेपणाने त्याने सांगून टाकले आणि प्रश्नही केला.

“ पाच आहेत. “ माधुरी पटकन बोलली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळू लागली.

“ पाच? वेडे आहात का तुम्ही? एकवेळ रवीबद्दल समजू शकतो.. पण तुला तर डोकं आहे ना? “ कप्पाळाला हात लावत त्याने मान हलवली.

“ कप्पाळावरचा हात काढ…मला आवडत नाही कप्पाळावर हात मारलेला हे तुला माहीत आहे ना?  तुला मस्करी अजूनही समजत नाहीये, कमाल आहे. मोठा झालास रे आता. दोन मुली आहेत मला. “ तिने काहीशा रागाने सांगितले.

“ मला आपल्यातली एकूण एक गोष्ट आठवतेय. नुसती आठवतच नाहीये.. तपशीलवार आठवतेय. त्यावेळी तिथे काय होते, आपण कोणते कपडे घातलेले , काय काय बोललेलो… अगदी स्पष्टपणे आठवतंय मला. “ तिच्या डोळ्यात बघत जय सांगत होता.

“ तू एखाद्या कवी किंवा लेखकासारखा बोलायला लागला आहेस. तपशीलवार म्हणे.. हा हा हा.. “ तिच्या गालावर खळी पडली.

“मी ब्लॉग लिहितो . छोट्या मोठ्या गोष्टी असतात, बिझनेस आहेच पण सोबतीला छंद म्हणून लिखाण. आणि तुला सांगितलं तर विश्वास बसणार नाही... अर्ध्याहून जास्त गोष्टी या आपल्याच दोघांच्या आहेत. “ गालातल्या गालात हसत जय ने सांगून टाकले.

“असेल बुवा.. पण गोष्टी लिहिण्याऐवढी आपण एकत्र होतो तरी का? “ निराश होऊन माधुरीने प्रश्न विचारला.

“ नसू जास्त वेळ.. पण जितका वेळ एकत्र होतो त्यातला क्षण आणि क्षण मला आठवतोय आणि तो मी माझ्या कथांमध्ये जसाच्या तसा उतरवत गेलोय. “ लगेच मोबाईल काढून त्याने ब्लॉग सुरू करून त्याची सर्वाधिक पसंत केलेली कथा ‘ पावसात भिजताना ‘ तिला वाचायला दिली.

ती वाचत असताना तो तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होता.
ती तशीच होती… फारसा बदल नव्हता तिच्यात.

“ जय ….तुला सर्व लक्षात आहे रे… मी हे विसरले नसले तरी इतके ठळकही आठवत नाहीये. तुला त्यादिवशीचा प्रत्येक क्षण नी क्षण आठवतोय आणि वाचताना तो आता माझ्या समोर उभा राहिला रे.. “तिच्या डोळ्यातले भाव त्याला खूप काही सांगून गेले.

“ मला तुझ्या सर्व कथा वाचायला मिळतील? काहीतरी लिंक असेल ना? मी माझा नंबर सेव करतेय तुझ्या फोन मध्ये. मला पाठव बघू आताच. “
नंबर सेव करण्याासाठी डायलर सुरू केला तर पासवर्ड विचारला गेला.

“व्वा … पासवर्ड? सांगतोस की टाकून देतोस? “ भुवई उंचावत तिने विचारले…

“पासवर्ड तुझ्याशी संबंधीतच आहे. शोध बघू.. “ गालातल्या गालात हसत त्याने चॅलेंज दिले.

“ माझा वाढदिवस?
जय…. तू अजूनही…...? “ माधुरीने त्याच्या डोळ्यात खोल पाहिलं. स्वतःला सावरत तिने वाढदिवसाची तारीख टाकली आणि लॉक उघडला.

एका हाताने डोळ्याची ओलावलेली कड रुमालाने कोरडी करत तिने तिचा नंबर सेव्ह करून लगेच स्वतःच्या फोन वर कॉल केला.
आता दोघांकडे एकमेकांचे नंबर होते.

गाडी पेण स्थानकात जात असताना कंडक्टर ने सांगितले
“ गाडी १५ मिनिटे थांबेल. “

“आठवतंय का काही? “ मिश्किल हसत जय ने माधुरीला प्रश्न केला.

“ हो… चांगलंच. हरवण्याऐवढी लहान आता मी नाही हे लक्षात ठेव. मी गेल्यावेळीसारखे कांदाभजी आणते आणि तू कोथिंबीर वडी. इकडे तिकडे शोधत बसू नको मी येतेय गाडीत.

कोथिंबीरवडी आणि कांदाभजीच्या सुवासात त्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला.

“ एक विचारू? “ जयने अचानक विचारले.

“ मी गेस करू, तू काय विचारणार आहेस ते? “ माधुरीने पटकन विचारले.

“ आता सांगच… बघुया तू तशीच आहेस की बदलली आहेस या प्रदीर्घ कालावधीत. “ चॅलेंज दिल्याचा भाव जयच्या तोंडावर होता.

“ तू खुश आहेस, रवीशी लग्न करून ? हेच विचारायचे होते ना? “ तिने त्याच्या डोळ्यात खोल पाहिलं.

“ मधू… तू कसं जाणलंस हे? अगदी हेच विचारणार होतो. “ त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.

“ ओ लेखक महाशय.. प्रदीर्घ कालावधीनंतर बदलायला मी म्हणजे कोणी तुझी दुसरी मैत्रीण नाही.  कळलं ना?” तिने प्रदीर्घ कालावधीवर मुद्दाम जोर दिला होता. त्याच्या पुस्तकी बोलण्याचे तिला हसू येत होते.

“ उत्तर दे आता.. “ तोंड थोडेसे वाकडे करत जयने तिला सांगितलं.

“ तशी काही अडचण नाही. पण काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे तो नकोसा वाटतो. तो खूप स्वार्थी आहे. शिवाय काही व्यसन आहेत जी मला नाही आवडत. सर्व काही स्वतःसाठी .. माझ्या मनाचा विचार फार कमी केला त्याने. सांगेन तुला हळूहळू. आता आपण एकमेकांच्या संपर्कात आलोय तर खूप बोलणे होईल आपलं. तू सांग ...तू तर खूप आनंदी दिसतो आहेस. “ आता वेळ जयची होती.

“ तुला विश्वास बसणार नाही… तुझे लग्न कधी झाले, तुम्ही लग्नानंतर कुठे गेलात हे मला माहित होते. माझ्या एका मित्राला माहीत होते सर्व, तो सांगायचा. तुझे लग्न झाल्यानंतर ती माझ्या समोर आली. तिच्यात काही गोष्टी तुझ्यासारख्या होत्या. मी तिच्यात तुला शोधायला लागलो आणि तिच्यातल्या तुझ्या प्रेमात पडलो. पुन्हा… आपण एकत्र येण्याचा मार्ग मी स्वतःहून बंद केल्यानंतर मी तो पर्याय निवडला.. आणि निभावला देखील. “ तो सांगताना हरवला होता.

“ बापरे… काय हे ? तिच्यातल्या माझ्यात म्हणजे रे काय? “ माधुरीला हसू फुटायचं बाकी राहिलं होतं.

“ तू नॉर्मल बोलू शकत नाहीस का? आधी तू इतका पुस्तकी नाही बोलायचास. आणि तसाही फार कमी बोलायचास. तुझे डोळे खूप बोलायचे. मला तुझ्या प्रेमात पाडणारे तुझे डोळेच होते. मला तुझे सुसंस्कृत बोलणे आवडायचे. तू किती शांतपणे बोलायचास. तुझ्या बोलण्यातच तुझा मोठेपणा समजायचा. रवी आणि तुझ्यात फरक असेल तर तो हाच होता. तू समोरच्या माणसाचा विचार करायचास आणि त्यानुसार कृतीही करायचास. फक्त आपल्या बाबतीतच गडबड केलीस तू. आणि त्याचे परिणाम मी आज भोगतेय.. तुझ्यापासून दूर राहून मी हरलेय रे जय.. मी त्याच्यात आणि तुझ्यात कधीच तुलना केली नाही कारण तुझे पारडे नेहमीच जड होते … आहे आणि राहणारच. मी एक विचारू?” आश्वासकपणे माधुरीने जयला विचारले.

“ विचार ना.. हक्क आहे तो तुझा..” तिच्या प्रश्नाची आतुरता त्यालाही लागून राहिली होती.

“ मी कुठे आहे, काय करतेय हे माहीत असूनही मला एकदाही  भेटायला किंवा निदान समोरही का आला नाहीस? मला तर हे ही माहीत नव्हते की तू आहेस की नाहीस. मी ही तुझा खूप शोध घेतला. पण तू कुठेच दिसला नाहीस. माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात तुला नेहमी ठेवत आलीय मी. फक्त कोणाला ती जागा दाखवता आली नाही.” तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरारले.

“ मला सांग मी तुला भेटून किंवा तुझ्याशी बोलून काय झाले असते?
ज्या परिस्थितीत आपण एकमेकांपासून लांब गेलो ती इतकी विचित्र होती की तुला माझा राग राहणार होता. कदाचित त्यावेळी मी तुला भेटलो असतो किंवा दिसलो असतो तर तुझी माझ्याबद्दल एकच भावना असती… रागाची. बरोबर ना?’ हिरमुसलेला चेहरा करून जयने त्याची नजर तिच्या चलबिचल करणाऱ्या बोटांवर खिळवली.

“ वेडा आहेस तू. माझा राग क्षणीक होता रे.. जीवनाच्या प्रत्येक लहान मोठ्या वळणावर तू माझ्या आठवणीत होतास. नियतीने आपल्याला दूर केलं पण आज तिनेच पुन्हा या सीट नंबर १३ मुळे एकत्र आणून ठेवलंय.”
तिच्या बोटांची चलबिचल थांबली होती.

“ आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो का रे? आपल्यात मैत्री तर राहू शकते ना? मला तुला खूप काही सांगायचे आहे. जे मी कोणालाच सांगू शकले नाही. अगदी रवीला ही. “ तिने त्याच्या समोर हात केला.

त्या हातावर हात ठेवताच एक वीज दोघांच्याही अंगातून गेली.
“ माझ्या या स्पर्शाने तुला काय वाटले? मला खात्री आहे  जे मला वाटले आणि आपल्या पहिल्या भेटीत तुझ्या डोळ्यांनी जे मला सांगितले होते तेच तुलाही वाटले असणार.  ते बघ समोर महाड आले. “ तिची नजर पटकन बाहेर गेली. तिचा प्रवास संपत आल्याचे तिच्या लक्षात आले.

“ कळतंय का मी काय बोललो ते?
त्यावेळी तुझ्या डोळ्यांनी मला सांगितलेलं…
आपल्यात एकच गोष्ट होऊ शकते….
.
प्रेम..
.
बरोबर ना? “ तिचा हात घट्ट पकडत जय साश्रु नयनाने बोलला.

“अरे पण लोक? ते काय म्हणतील? तिच्या मनात खळबळ माजली.

“कोणते लोक, मधू? ते ज्यांना आपल्या दोघात प्रेम होते हे देखील माहीत नव्हते ते की ज्यांना आपण अजूनही एकमेकांच्या प्रेमात आहोत हे माहीत नाही ते? आपल्याला कुठे सर्वांना सांगत सुटायचे आहे. जे प्रेम आता व्यक्त केले ते तसेच मनात जपायचे आहे आपल्यात जे अंतर आहे ते कायम ठेवायचे. आपले प्रेम हे शारीरिक कधीही नव्हते आणि नसणार. एकमेकांच्या चार प्रेमळ शब्दांनी आपण आपल्या जीवनात हरवलेला तो प्रेमाचा सर्वोच्च बिंदू गाठू याची मला खात्री आहे. “ त्याच्या डोळ्यातला विश्वास बघून माधुरीला वाटत होते आताच त्याला घट्ट मिठी मारावी. पण तिने स्वतःला आवर घातला.

गाडी फलाटाला लागत होती.

“ मी निघते..” त्याच्या हातातला हात सोडवत ती उभी राहिली.

“ उत्तर? “ त्याने आतुरतेने विचारले.

“ मिळेल.. नंबर आहे माझ्याकडे… मी लिहून पाठवेन तुला. “ त्याच्याकडे पाठ फिरवून ती जड पावलांनी बॅग सांभाळत गाडीतून खाली उतरली.

ती मागे वळून बघेल अशी आशा त्याला होती पण ती फोल ठरली.

गाडी सुटली.
जय सीट नंबर १४ वरच बसून होता. नवीन चढलेल्या लोकांपैकी एक समवयीन महिला त्याच्या दिशेने येत होती.

इतक्यात…
त्याच्या हातातल्या फोनवर मॅसेज झळकला.

“ सीट नंबर १३ ही नेहमी तुझीच होती...आणि तुझीच राहील. आपल्यात एकच गोष्ट आहे आणि ती मान्य आहे.  “

“एक्सक्युज मी… मी बसू का आत? मला विंडो सीट आवडते. “ त्या महिलेने मधाळ स्वरात आणि लाडीकपणे विचारले.

“ एक्सट्रीमली सॉरी.. सीट नंबर १३ ही नेहमी माझीच होती आणि राहणार आहे.” सीट नंबर १४ वरून उठत तो झटदिशी सीट नंबर १३ वर बसला.
नाक मुरडत ती महिला पुढे गेली.
१३ नंबर च्या सीट ची जाणवणारी ऊब त्याला हवीहवीशी वाटू लागली होती.

त्याने लगेच गुगल डॉक मध्ये स्टोरी टाईप करायला घेतली…

…..सीट नंबर १३……

#सीट_नंबर_१३ भाग २

Monday, 21 May 2018

सीट नंबर १३ ( भाग १ )

..... सीट नंबर १३ .....
भाग १



जय ने खिशातून तिकीट काढून आपली सीट नेमकी कुठे आहे ते पाहिलं.
सीट क्रमांक १३……
“ओह… शीट … विंडो सीट… “
त्याला विंडो सीटची आवड कधीच नव्हती.
एरवी नेहमी बाईकने फिरणाऱ्या जयला एक कामासाठी त्याच्या पप्पांनी अचानक हातात एस टी चे तिकीट देऊन गावाला जायला सांगितले होते.
पाठीवरची सॅक वरच्या रॅकवर ठेवत त्याने सीट वर बसकण मांडली.
अजून १० मिनिटे होती बस सुटायला.
कंडक्टर बस मध्ये आला होता. त्याने आल्या आल्या घोषणा केली.
“बस फुल आहे. ज्यांना उभ्याने प्रवास करायचा असेल त्याने बस मध्ये थांबावे. १२.३० ची एक्स्ट्रा लागेल तिच्यात जागा मिळेल. “
जय ने त्याच्याकडे फारसे लक्ष दिलं नाही. त्याने त्याचा मोबाईल काढला आणि त्यात गुंतला. कधी एकदा ही गाडी सुरू होतेय असे त्याला झाले होते. बाजूची सीट अजूनही रिकामीच होती.
जो कोणी असेल त्याला विंडो सीट द्यायची आणि आपण त्या सीट वर बसायचं हे त्याने मनोमन ठरवलं होतं.
कंडक्टर ने बेल वाजवली.
खर्र खर्रर्र आवाज करत गाडी सुरू झाली.
बाजूच्या रिकाम्या सीट कडे नजर जाताच त्याने कंडक्टरला आवाज दिला.
“ ओ काका… या सीटवरचे कोणी आले नाही तर मी इथे बसू का? मला विंडो सीटचा त्रास होतो. “
“ ते तिकीट सायन वरून आहे. तुला हवे तर त्या व्यक्तीला विनंती करून या सीटवर बसू शकतोस. “ कंडक्टर त्याचे तिकीट तपासत म्हणाला.
“ ठिक आहे. “ पंच केलेले तिकीट पाकिटात ठेऊन पुन्हा त्याने मोबाईलमध्ये डोकं खुपसले.
सायनला गाडी उभी राहीली.
दरवाजातून एक मुलगी येताना दिसली. पाठीवर सॅक आणि हातात एक लहान बॅग.
जयची नजर तिच्याकडेच होती.
“ ओह गॉड…. सीट नंबर १४ हिचाच असू दे… “
हातातली बॅग सावरत ती त्याच्या सीटच्या पुढे गेली.
“ बॅड लक जय… “ स्वतःच्या मनाशी बोलत त्याने सीट वर हात आपटला.
“ एक्सक्यूज मी… १४ नंबर विंडो आहे ना? “ त्या गोड आवाजाने त्याची मान वळली.
“ बघताय काय? १४ नंबर सीट माझी आहे. उठा मला बसू द्या. “
गालातल्या गालात हसत जय त्या सीटवरून उठला.
तिने हातातली बॅग वर रॅक वर टाकली आणि पाठीवरची सॅक पायाजवळ ठेवली.
तेवढ्यात खिडकीबाहेरून आवाज आला.
“माधुरी.. मिळाली का सीट?”
लगेच तिने खिडकीतून बाहेर बघत सांगितले.
“ हो काका .. आता जा तुम्ही. काकीला फोन करून सांगा की ६ वाजता स्टँड वर यायला. “
गाडी हलली.
इतकावेळ बोअरिंग वाटणारी ती एस टी अचानक जयला आरामदायक वाटू लागली. आता त्याची नजर केवळ मोबाईल मध्ये होती. लक्ष मात्र सीट क्रमांक १३ आणि त्यावर बसलेल्या माधुरीकडे होते.
पाठीवरची सॅक पायासमोर ठेवल्याने माधुरीला पाय ठेवायला अडचण होत होती.
“ द्या ती सॅक इकडे ..वर रॅक वर जागा आहे खूप. मी ठेवतो.” जयने सॅककडे बोट दाखवत तिच्याशी बोलण्याची सुरुवात केली.
“ रिअली थँक्स.. ठेवा ना प्लिज.. “ तिने मधाळ हसत सीटवरून न उठता सॅक त्याच्या हातात दिली.
त्याने लगेच ती वरच्या रॅक वर ठेवली आणि लगेच सीटवर बसला.
“ सो मधू… कुठे जाताय तुम्ही?
उप्स.. माधुरी.. मी ते मघाशी ऐकलं नाव. “ थोडाफार मिश्किल हसत आणि काहीसा गोंधळत त्याने तिला प्रश्न विचारला.
“ व्वा.. बरंच चांगलं लक्ष आहे तुमचे. मी महाडला उतरणार आहे. तुम्हाला विंडो सीट त्यानंतरच मिळेल. तोवर नो चान्स… ओके? “ डोळे मोठे करत माधुरी त्याचा अंदाज घेत होती.
“ नाही.. तसं नाही.. मला विंडो सीट वगैरे नको. जस्ट क्युरियोसिटी म्हणून विचारलं. “ तो आणखीनच गोंधळत बोलला.
“ ठिक आहे हो.. बरं तुम्ही कुठे उतरताय? नाही म्हणजे आरामात पसरून मला झोपायला मिळेल ” तिला जणू पिडायला एक गिऱ्हाईकच मिळाले होते.
गालातल्या गालात हसत त्याने सांगितले
“ मग तर तुम्ही ते विसराच.. मी लास्ट स्टॉपला उतरणार आहे. “
तिचा खोटा खोटा हिरमुसलेला चेहरा बघून त्याच्या हृदयात कसंनुसं झालं.
“ मला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय… पाहिलंय किंवा तुमचा आवाज ऐकलाय. “ उगाच काहीतरी बोलायचं म्हणून जय बोलला.
“ हो का? असेल बुवा…
खुपजण असेच म्हणतात. कदाचित मी सामान्य मध्यमवर्गीय मुलगी आहे म्हणून सर्वांना असेच वाटत असेल का? “ तिने प्रश्नार्थक चेहरा करून त्याच्याकडे पाहिलं.
“ असं नाही.. मला सांगा तुम्ही चर्चगेटला कॉलेजला जाता का? “ जय हळूहळू तिची माहिती काढत होता.
“ नाही… “ माधुरी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली.
“ मग? “ जय ने प्रश्न केला.
“ मग काय? “ दोन्ही खांदे वर करत माधुरीने त्याला प्रतिप्रश्न केला.
“ आय मिन.. कुठल्या कॉलेज ला आहात मग? “ जयचा प्रश्न.
“तुम्हाला मी घरचा पत्ता देऊ का? “ माधुरीने बॉम्बच टाकला.
“ जाऊ दे… तुम्हाला माझ्याशी बोलायची इच्छा दिसत नाही.. मी गप्पच बसतो मग..” जयने मोबाईलची स्क्रीन सुरू केली.
“ व्वाव… हा कॅमेऱ्यावाला आहे ना? “ जयच्या हातातला फोन बघून ती एकदम खुश झाली.
“ हो .. तुमच्याकडे ही आहे? ” जय थोडाफार सुखावला.
“ माझ्याकडे नाही. आमच्या भवन्स कॉलेजचा ज्युनियरचा ग्रुप आहे ना त्यात रवी नावाचा मित्र आहे त्याने चारच दिवसांपूर्वी घेतला आहे. त्यात फोटो खूप सुंदर येतात….बरोबर ना? “ माधुरीने भरभर सांगितले.
“ अच्छा… तुमचा भवन्स कॉलेजचा ज्युनियरचा ग्रुप…. व्हेरी गुड…” गालातल्या गालात हसत जय ने फोनमधली गॅलरी ओपन केली.
आपण घाई घाईत आपल्या कॉलेजचे नाव सांगून बसलोय हे माधुरीच्या लक्षात आले म्हणून तिने दाताखाली जीभ चावली.
जयच्या नजरेने ते टिपलंच…
“ हे पहा...मी काढलेले आमच्या ग्रुप चे फोटो. डावीकडचे
बटण दाबून पुढचा फोटो बघा ..“ मोबाईल तिच्या हातात देत असताना तिच्या बोटांचा निसटता स्पर्श झाला.
कॉलेजमध्ये मैत्रिणींच्या घराड्यात असताना एकाही मैत्रिणीच्या स्पर्शाने जी संवेदना जागली नव्हती ती या आताच भेटलेल्या अनोळखी मुलीच्या निव्वळ बोटाच्या स्पर्शाने जागृत झाली होती.
फोटो बघत असताना माधुरी चे लक्ष पूर्णपणे फोनमध्ये होते आणि जयचे लक्ष तिच्या चेहऱ्याकडे.
ती खूप सुंदर होती असेही नव्हते. पण तरीही तिचा चेहरा आकर्षक होता. वरच्या ओठाच्या महिरपीवर असलेला नाजूक तीळ तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होता. काळेभोर घनदाट मोकळे केस तिच्या सौंदर्याला चार चांद लावत होते.
“ जय तू प्रेमात पडतो आहेस हिच्या… “ जय पुटपुटला…
“ हं… काही म्हणालात? “फोन वरचे लक्ष काढून माधुरीने त्याच्या कडे पाहिले.
“ नाही काही नाही… असेच काहीतरी.. पाहिले फोटो? मस्त आहेत ना? “ जयने स्वतः ला सावरले.
“ मैत्रीणी खुप मॉर्डर्न दिसताहेत तुमच्या. खूप फोटो आहेत मैत्रिणींचे. “ तोंड काहीसे वाकडे करून माधुरीने त्याचा फोन परत दिला.
“ कॉलेजच तसं आहे…..आणि आमचा ग्रुप ही मोठा आहे. बावीस जणांचा ग्रुप आहे. दहा मुली आणि बारा मुले आहोत आम्ही. “ जय जरा जपूनच सांगत होता.
“ गर्लफ्रेंड असेलच.. ना? “ माधुरीच्या चेहऱ्यावर चिंतात्मक प्रश्न पडला होता.
“ नाही... अजिबात नाही… मला हवी तशी आणि आवडेल अशी मुलगी आजपर्यंत तरी सापडली नव्हती… “ जयच्या चेहऱ्यावरची लाली लपली नाही.
“ आजपर्यंत म्हणजे? आज सापडली की काय? “ मिश्किलता माधुरीच्या शब्दा शब्दात भरली होती.
“ म्हणजे… अ… तसं नाही.. म्हणजे तसं म्हणायला गेले तर हो.. पण नाही ..अजून कसा सांगू? “ जय गडबडला.
“ अहो … अहो… गोंधळू नका.. शी बाबा… इतका वेळ झाला मी तुमचे नावही विचारले नाही. कसली वेंधळी मी. “ तिने विषय बदलून त्याला सावरण्याची संधी दिली.
“ माझं नाव जय.. गिरगावात राहतो. “ जयने पट्दिशी सांगून टाकले.
“ नावच विचारले होते मी. घरचा पत्ता नाही. “ यावेळी ती हसली तेव्हा तिच्या गालावर खळी पडली.
“ अरे यार … मधू… आय मिन माधुरी.. मी जस्ट सांगायचे म्हणून सांगितलं. बाकी काही कारण नव्हते. “ जयने डोक्याला हात लावला.
“ ठिक आहे ना… सांगितलं ना आता? डोक्याला कशाला हात लावता? मला नाही आवडत असे डोक्याला हात मारून घेणे. असे म्हणतात की नशीब तिथे लिहिलेले असते “ लटक्या रागाने माधुरीने त्याच्याकडे पाहिले.
तो थोडाफार जाड म्हणावा असा होता. पण तरीही त्याच्या शरीराला व्यायामाची जोड असावी असे त्याच्या मनगटावरून आणि हाताच्या पंजावरून दिसत होते.
चेहरा काहीसा मोठा पण तरीही त्याच्या शरीराला शोभणारा.
घरुन निघण्यापूर्वी दाढी केल्यामुळे त्याचा चेहरा चकाचक होता.
त्याच्यात तिला आवडलेली गोष्ट म्हणजे त्याचे हास्य..
खूप निरागस होते ते..
आणि त्याची बोलण्याची पद्धत… त्याची परिस्थिती काय आहे ते त्याच्या बोलण्यावरूनच समजत होते.
“ हॅलो… कुठे हरवलात?  पेण आलंय. तुम्हाला काही खायला वगैरे आणू का? मी जातोय खाली तर घेऊन येतो. “ जयने तिच्या डोळ्यासमोर टिचकी वाजवत तिला विचारलं.
“ नको .. मी येतेय खाली. एक काम कराल. ती पाठीवरची सॅक द्या ना त्यात पर्स आहे माझी. “ माधुरी हक्काने त्याला सांगत होती.
जयने लगोलग सॅक काढून दिली. माधुरीने त्यातली पर्स काढली आणि नजरेनेच सॅक वर ठेवायला सांगितली.
जयच्या मागोमाग माधुरी उतरली. जय काय खायला घेऊ या विचारात होता. एस टी च्या कॅन्टीन मध्ये काय चांगले मिळणार? जवळ पास हॉटेल ही दिसत नव्हते.
इतक्यात मागून आवाज आला…
“ इथे कॅन्टीन मध्ये कोथिंबीर वडी आणि त्या समोरच्या गाडीवर कांदाभजी खूप छान मिळते. मी नेहमी खाते. तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय की तुम्ही गोंधळला आहात ते. “ खुदकन हसत माधुरी मागून बोलत होती.
“ धन्यवाद हां… मला खरंच माहीत नव्हते. मी काहीतरी पॅकेज फूड घेणार होतो. मी दोन प्लेट कोथिंबीर वडी आणतो तुम्ही नका येऊ त्या गर्दीत. “
धावत धावत जयने कॅन्टीन गाठले आणि दोन मिनिटांतच दोन प्लेट कोथिंबीर वडी आणि पाण्याची बाटली घेऊन आला.
त्याची अपेक्षा होती की माधुरी त्याची वाट बघत तिथे उभी असेल. पण ती तिथे नव्हती.
त्याने गाडीच्या दिशेने पाहिले.
तिथेही ती नव्हती.
कदाचित आता जाऊन बसली असेल म्हणून पाण्याची बाटली सावरत गाडीच्या आत जाऊन पाहिले. ती तिथेही नव्हती.
कोथिंबीर वडयांची पिशवी आणि पाण्याची बाटली सीट वर ठेऊन पुन्हा धावत कॅन्टीन गाठले. कदाचित त्याला शोधत शोधत ती तिथे आली असेल म्हणून.
त्याची नजर सर्वत्र फिरत होती..पण त्या गर्दीत ती नव्हती. बाहेर आला तर कंडक्टर ची शिटी ऐकू आली. धावत जाऊन त्याने एस टी पकडली. कंडक्टरला सांगायला लागला
“ ओ काका माझ्या शेजारी बसलेली मुलगी अजून आली नाही. खाली उतरली होती. पण आता कुठे दिसत नाहीये. “
कंडक्टर हसला…
“ ती सुद्धा तेच म्हणत होती. बघ तिकडे.. “ कंडक्टर ने दाखवलेल्या दिशेने त्याने पाहिले तर..
माधुरी त्याच्याकडे बघत हसत सीट वर बसलेली दिसली.
“ वेडी झाली आहेस का तू मधू ? हसतेस काय?
मी किती घाबरलो होतो? कुठे गेलेलीस? “ त्याने रागाने तिच्याकडे बघत विचारले.
“ मी की तू? मी तुझ्यासाठी कांदाभजी घ्यायला गेली होती. आत येऊन पाहिलं तर तू गायब. बरं…. ही पिशवी, पाण्याची बाटली इथे टाकून ठेवलेली आणि माझ्यावरच ओरडतो आहेस.” तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता.
त्याला अचानक स्वतःच्या धांदरटपणावर हसूच आले. तो हसला ही इतका गोड की माधुरीला ही हसू फुटलं.
“ काय मग सोडायची का गाडी? “ कंडक्टर काकांनी बेल वाजवायच्या अगोदर त्यांना विचारले.
“ हो.. हो… हरवलेली माणसे आली गाडीत. जाऊ द्या गाडी “ जय सीटवर बसत बोलला.
“ तुला एक लक्षात आले. रागामुळे का होईना आपण उगाचच ते अहो जाहो करत होतो ते बंद झालं. आता बोलायला छान वाटेल ना? “ माधुरीच्या गालावरची खळी अधिकच खोल झाली होती.
“ कांदाभजीचा सुवास खरंच मस्त आहे.. उघड ना ती. “ कोथिंबीर वड्यांची पुडी उघडत जय बोलला.
कांदाभजी आणि कोथिंबीर वडी एकत्र खाताना दोघेही एका वेगळ्या विश्वात गेले होते.
गाडी आता पळत होती.
“ एक विचारु? “ जय ने माधुरीकडे पाहत विचारले.
“ विचार ना.. “ माधुरी गोड हसत बोलली, जणू तिला तो काय विचारणार आहे हे आधीच माहीत होते.
“ आता महाड आल्यावर तू निघून जाशील..
मला तुला पुन्हा भेटायचे असल्यास कसे भेटू? “ काहीसे चाचरत त्याने विचारलं.
“ का भेटायचं आहे? “ माधुरीने खोडकरपणे विचारलं
“ मैत्री करायला… “ जय ने पटकन सांगून टाकले…
“ सुट्टीनंतर मी कॉलेजला जाणारच आहे. आता तर तुला माझे कॉलेजही माहीत झालंय. शोध घेतला तर देव ही मिळतो, मी तर एक सर्वसामान्य मुलगी आहे. “जयच्या डोळ्यात डोळे जुळवून तिने त्याला जणू आव्हान दिले होते.
“ चला महाड आले. गाडी ५ मिनिटे थांबेल “ कंडक्टर ने आवाज दिला.
“आता मला उतरायला लागेल. “ खिन्न स्वरात माधुरीने उठायची तयारी सुरू केली.
काही न बोलता रॅक वरची सॅक आणि बॅग जयने काढली.
तो ती दरवाजाकडे नेऊ लागला तसे माधुरीने त्याला थांबवले.
“नको..मी नेईन. काकी आहे खाली ती पहा. तू आता तुझ्या सीट वर बसू शकतोस . “ काहीसे हसत ती बोलली.
“ म्हणजे तुला माहीत होतं, की सीट नंबर १३ ही विंडो सीट आहे ते? “ बुचकळ्यात पडलेल्या जयचा चेहरा बघण्या सारखा झाला होता.
“ मी नेहमी एस टी ने प्रवास करते रे… चल बाय भेटू पुन्हा…
आणि एक….
आपल्यात मैत्री अशक्य आहे..” त्याच्या हातातली तिची सॅक पाठीला लावत ती त्याच्याकडे न बघता एस टी तुन खाली उतरली.
हिरमुसलेला जय शांतपणे सीट नंबर १३ वर बसला. त्याच विंडो सीट वर जी त्याला कधी आवडत नव्हती.
खिडकीतून माधुरी तिच्या काकीसोबत जाताना पाठमोरी दिसत होती.
एकक्षण त्याने हताश होऊन डोके समोरच्या सीट ला टेकले..
आणि तिचे मघाचे शब्द आठवू लागला…
“आपल्यात मैत्री अशक्य आहे…”
का?
ओह शीट…..
त्याने पटकन खिडकीतून बाहेर पाहिलं…
माधुरी वळून बघत होती…
आणि तिच्या चेहऱ्यावरचे खळीयुक्त हसू सांगत होते….
“अरे वेड्या… आपल्यात मैत्री अशक्य आहे…
कारण आपल्यात एकच गोष्ट होऊ शकते…..
प्रेम….”

Monday, 26 March 2018

चॉकलेट


तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.
ट्रेन निघायला आता फक्त दहा मिनिटेच उरली होती.
तो अजून आला नव्हता…

तिने स्वतःला हजारो वेळा विचारलेला प्रश्न अजून एकदा विचारला.

“ मी चूक तर करत नाही ना ?”

या प्रश्नाचे उत्तर दरवेळी तिला दुःख भोगून झाल्यावर “ हो “ असेच मिळाले होते.

आणि याच्यावर तर विश्वास ठेवावा की न ठेवावा? याच प्रश्नात ती गेले दहा वर्ष अडकली होती. तिचे मन आणि मेंदू परस्पर विरोधी निकाल देत होते.
कुटुंब … दोघांनाही होती. दोघांचेही जोडीदार आता या जगात नव्हते. होती ती फक्त जबाबदारी.. ती ही मुलांप्रती.... जी मुलं आता स्वतःच्या पायावर उभी होती.

काल जे ठरले त्याप्रमाणे कोणतीही आठवण, कोणतीही वस्तू अगदी मोबाईल सुध्दा सोबत न घेता यायचे होते. त्यामुळे संपर्क करायला काहीच वाव नव्हता. तो येईलच असे तिचे मन तिला आतून सांगत होते. पण शेवटी त्याची परिस्थिती बघता तो सर्व सोडून कसा येईल हा मोठा प्रश्न तिला पडला होता. मोठा बंगला, नोकर चाकर, एवढी संपत्ती, त्याच्यावर प्रेम करणारी त्याची माणसे या सर्वांना सोडून तो येईल या बद्दल तिचे मन साशंक होतेच ..अगदी पूर्वीपासूनच.

आपण एकत्र संसार करु शकलो नाही, एकत्र जगू शकलो नाही… पण मरताना तरी एकत्र मरायचे … हे त्याचे शब्द तिला त्याच्या अजूनच प्रेमात पाडत होते.

पहिल्यांदा जेव्हा तो तिला भेटला तेव्हा तिचे लग्न ठरले होते. खूप वाटत होते तिला, की जगाला ओरडून सांगावे की मला याच्याशी लग्न करायचंय, याच्या सोबत संसार करायचाय, हाच माझ्यासाठी योग्य आहे.
पण लोक काय म्हणतील? घरचे तयार होतील का? होणारा नवरा काय करेल ? या आणि अशा असंख्य प्रश्नांनी तिला जखडून ठेवले आणि मग तिची अडचण त्यानेच घालवली. स्वतः दूर होऊन.

तो दूर होताना इतका वाईट झाला की तिला त्याचा विसरच पडला. तो मात्र तिच्या आठवणी जगत राहिला.
तिचा संसार… नवऱ्याचा स्वभाव, मुलं, सांसारिक अडचणी यातून स्थिर होता होता पंधरा वीस वर्ष गेली.

सर्व काही जवळ असताना काहीतरी बाकी राहिलंय ही भावना तिला सतत जाणवत होती. आयुष्य सुरेख होते पण अपूर्ण होते. ज्या अपेक्षा नवऱ्याकडून होत्या त्या त्याच्या विक्षिप्त स्वभावाने भंग पावल्या होत्या. ती जी कमी होती मानसिक आधाराची ती मात्र नेहमीच तिला जाणवत होती.

अशावेळी तो नेमका पुन्हा आला. खळखळणाऱ्या झऱ्यासारखा, पूर्वी होता त्यापेक्षा अगदी वेगळा. त्यावेळी तो काहीसा अबोल आणि स्वतःच्या विश्वात राहणारा होता. आता मात्र तो अधिक मोकळा. सर्वांशी भरभरून बोलणारा होता. फरक होतो माणसात पण एवढा?
अर्थात त्यामुळे ती साशंक झाली.
प्रेम तिचेही होते आणि त्याचेही. फक्त ते सुप्तावस्थेत गेले होते. पुनर्भेटीने तेच प्रेम अधिक प्रकर्षाने जागृत झाले आणि व्यक्त ही झाले.
ती भेटल्यावर मात्र तो स्वतःला बदलू लागला. त्याने इतकी वर्षे चढवलेला हसरा मुखवटा आपोआप गळून पडला. अश्रूंच्या पावसात दोघेही न्हाऊन निघाले.
दोघेही समजूतदार होते. दोघांची कुटुंब होती, जबाबदाऱ्या होत्या.
त्या पूर्ण करूनच एकत्र यायचे हे त्याचे म्हणणे तिलाही मान्य झाले.

त्यांचे एकत्र येणे हे समाज, कुटूंब कधीच स्विकारणार नाही हे दोघांनाही माहीत होते. मग एकत्र येण्यासाठी हा समाज आणि हे कुटुंबच सोडून दूर कुठेतरी जाऊ आणि नवीन आयुष्य जगू असं दोघांनी मिळून ठरवलं…

त्या आयुष्याची सुरुवात करतानाचा आज पहिला दिवस.
ती अगदी वेळेत पोहचली होती.
त्याचा पत्ता नव्हता.
ट्रेनमध्ये तुरळक माणसे होती.
हळूहळू पैसे साठवून दोघांनी लांबवर एक घर, थोडी जमीन घेतली होती.  तिथेच जाण्यासाठी ती त्याची वाट बघत होती.

तिने मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. गाडी सुटायला फक्त तीन मिनिटेच राहिली होती.

“ मी पुन्हा चूक केली… हा नाही येणार बहुतेक. माझ्या मनाचे ऐकलं तेच चुकीचं. माझा मेंदू नेहमीच सांगत होता की याचे काही खरं नाही. पहिल्यावेळी याने कच खाल्ली. दुसऱ्यावेळी आता नाही... नंतर असे बोलून ही वीस वर्ष वाया घालवली. आता काय करायचंय सोबत जगून? नुसत मरायला ? अरे मला तुझ्यासोबत जगायचे होते. त्यासाठी मी जगले. तू मात्र नुसत्या आशेवर ठेवलंस मला. तुझ्यावरच्या प्रेमासाठी मनात दुःख ठेऊन सुखाचा संसार गाडा हाकला. एकच आशा की कधी ना कधी तू माझा होशील. देव गाठी वर स्वर्गात बांधत असतो. आपली गाठ नव्हतीच म्हणून सारखी सुटत राहीली.. गाठ ही आणि तुझी साथ ही….
आता मी कुठे जाणार हे कोणालाच माहीत नाही. ते शोधाशोध करतील. कोणत्या तोंडाने घरी जाऊ पुन्हा?
तू फसवलंस मला….
नाही करत मी तुझ्यावर प्रेम अजिबात.. आय हेट यू… “
.
.
.
.
.
.
तिची विचारांची तंद्री अचानक तुटली ..
तिच्या खांद्यावर हात पडला….
.
.
“बट... आय लव्ह यू… डार्लिंग…”

तो उभा होता हातात एक भले मोठे चॉकलेट घेऊन…त्याच्या गोड हास्यासोबत .

“ अरे… काय तू? किती उशीर? मला वाटलं यावेळीही तू येत नाहीस..” त्याच्याकडे रागाने बघत ती बोलली.

“ राणी.. अरे. अगदी प्लॅटफॉर्मवर आलो आणि लक्षात आले की चॉकलेट घेतलेच नाही आपल्यासाठी. तुला आणि मला चॉकलेट भरपूर आवडतात. आता नवीन आयुष्याची सुरुवात करायची म्हणजे तोंड गोड करायलाच हवे ना? “ त्याने हातातली छोटी बॅग सीटखाली सरकवली.

“ अरे पण चॉकलेट साठी कशाला धावपळ केलीस? गाडी सुटली असती म्हणजे? “ ती चिडून बोलली.

“गाडी एकदा सुटते… दोनदा सुटते.. नेहमी नाही… आता आलोय ना? रागावू नको ना.. हस की आता “ तिच्या रागाने फुगलेल्या नाकावर अलगद टिचकी मारत तो तिच्या बाजूला बसला…..

इतका वेळ तिच्या मनात चाललेले द्वंद्व एका क्षणात संपले होते.

“ चल पळूया… आता… नव्या आयुष्याकडे.. जिथे तुला आणि मला कोणीच दूर करु शकणार नाही. “ मिश्किलपणे हसत त्याने चॉकलेट उघडले.
तिने त्याचा हात हातात घेऊन बोटं गुंफली आणि म्हणाली …

“चल… आता हा हात माझ्या हातातून कधीच सुटणार नाही…”

एक हलकासा झटका लागला……

आणि गाडी सुटली….