Wednesday, 26 October 2016

देवी माँ की किरपा..

... देवी माँ की किरपा...


डॉक्टर शुक्ला हात पुसत तपासायच्या खोलीमधून बाहेर आले.  त्यांच्या पाठोपाठ नर्सही आली. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर जरा जास्तच आनंद दिसत होता.
डॉक्टर खुर्चीत बसले आणि बोलू लागले...
" अच्छी प्रोग्रेस है..  देवी माँ की किरपा से बच्चा एकदम ठिक ठाक है.  वजन भी बराबर है. "

हे ऐकताच समोर बसलेल्या पंडितजीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.  त्याने शेजारी बसलेल्या त्याच्या आईकडे पाहीलं.  तिनेही तोंड मुरडलं.

पोटातलं मुल व्यवस्थीत आहे याचा कणमात्र आनंद या दोघांच्या तोंडावर नव्हता.  तपासायच्या खोलीतून राधा बाहेर आली.
ती बाहेर आल्याचे बघून डॉक्टर पुन्हा बोलू लागले..

" बिलकूल चिंता मत करना,  देवी माँ की किरपा तुम्हारे बच्चे पर है.  बच्चा एकदम तंदुरुस्त है..  क्यो न होगा भला?  देवी माँ की किरपा जो उसपर है. "

डॉक्टर मनोहर शुक्ला हे त्या भागातील अत्यंत नावाजलेले डॉक्टर होते.  वयाच्या साठीतही ते नियमितपणे हॉस्पिटलमध्ये येत असत.  गडगंज श्रीमंती,  दिमतीला दोन महागड्या गाड्या,  नर्स वॉर्डबॉय चा ताफा असे जबरदस्त चाललं होतं.  मुलगा सुद्धा डॉक्टरकी करत होता.  सरकारी हॉस्पिटल आणि स्वतःचे क्लिनिक सांभाळत होता.  पण त्याचे आणि यांचे पटत नव्हते.

राधाने प्रेमाने पंडीत कडे पाहीलं..
काल पर्यंत तिच्याकडे प्रेमाने बघणारा,  तिची प्रत्येक इच्छा पुर्ण करणारा पंडीत आता तिच्याकडे बघतही नव्हता.  तिने नजर सासू कडे वळवली...  तिच्या तोंडावरुन तर ती भयंकर चिडलेली वाटत होती.
खरंतर एवढी चांगली बातमी असताना अचानक यांना काय झालं हे राधाला समजेचना.
डॉक्टरांचे दोन हजार रुपये भरुन पंडीतने दोघींना पुढे व्हायला सांगितले.  पंडीत डॉक्टरांसोबत बोलत राहीला.  घर जवळच असल्याने चालत चालत जाताना राधाच्या मनात विचार थैमान घालू लागले...
नेमकं काय झालं असेल?
सर्व तपासणी वगैरे तर व्यवस्थीत झाली डॉक्टरांनी सुद्धा पिंडाची वाढ चांगली होतेय असे सांगितले तरी यांचे चेहरे असे का झाले?

शेवटी घरी पोहचताच तिने सासूला विचारलं

" काय झालं ओ आई? चेहरा का इतका पडलाय,  डॉक्टर तर सर्व काही चांगलं आहे असं बोलले,  काही गडबड आहे का?  "

" काही नाही..  तू जास्त विचार करु नको,  दिव्या मिश्राजींच्या घरी खेळत असेल तिला घेऊन ये..  मी तोवर भात चढवते.  "

सासू तिला सांगायला तयार नाही हे तिला पटकन समजले. पंडीत आला की मगच विचारु त्याला असं तिने ठरवलं. ती मिश्राजींच्या घरी गेली. मिश्राजींची नात काव्या आणि दिव्या एकाच शाळेत होत्या. मिश्राजींची सून शारदा एका संस्थेचे अकाउंट सांभाळून घर सुद्धा व्यवस्थित सांभाळायची.  एकंदरीत घरातले सर्व शिक्षित आणि चांगल्या विचारांचे होते. दोघी चांगल्या मैत्रिणी बनल्या होत्या.
राधाला घराकडे येताना बघून शारदाने दिव्या ला हाक मारली..
" दिव्या.. बघ मम्मी आली डॉक्टरकडून. चला पुरे झाला खेळ "
तेवढ्यात राधा घरात पोहचली सुद्धा.
तिचा चिंताग्रस्त चेहरा बघून शारदाने विचारलं..
" काय गं?  काय झालं?  सर्व ठिक तर आहे ना?  काय म्हणाले डॉक्टर?  "

" अगं डॉक्टर तर म्हणाले की पोटातले बाळ व्यवस्थीत आहे.  पण पंडीत आणि आई नाराज का झाल्या ते नाही कळालं..  विचारतेय तर सांगत ही नाहीत आई. पंडीत सुद्धा अजून घरी आले नाहीत. " राधा हिरमसून बोलत होती.

" मला सांग डॉक्टर काय म्हणाले ते..  तुम्ही पण डॉक्टर शुक्लांकडे जाता ना?  काय म्हणाले ते नेमके? " शारदाने कुतूहलाने विचारलं.

" अगं ते म्हणाले..  देवी माँ की किरपा से बच्चा अच्छा तंदरुस्त है. वाढ सुद्धा चांगली आहे.  " राधाने पटकन सांगून टाकले.

शारदाचे डोळे चमकले..
" एक मिनीट थांब हां.. मी आलेच "
ती आतल्या खोलीत जाऊन काहीतरी फाईलसारखं घेऊन आली.
राधाला खाली बसायला सांगून स्वतः फाईल घेऊनच खाली बसली.
दोन फाईल समोर ठेवून ती काहीतरी शोधू लागली. राधा ने न राहावून विचारलं...
" काय शोधतेस?  ह्या फाईल कसल्या?  "

" हे बघ..  हा असा घोळ आहे तर..  ही काव्याची फाईल आणि ही श्लोकची... शुक्ला मॅटरनिटी होम ची दोघांचा जन्म तिथेच झाला.  फाईल सेम आहेत.  डॉक्टरही तेच,  मग..
श्लोकच्या फाईल वर " श्री गणेशाय नमः " आणि काव्याच्या फाईलवर " जय माता दी " असं वेगवेगळे का? ,  राधा कळतंय का तुला काही या मागचे गौड बंगाल? "
" नाही गं...  काही नाही कळलं " राधा प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघत होती.

" अगं किती गं तू भोळी..  मुलगा असला की गणेशाय नमः, मुलगी असली की जय माता दी...  कळलं का तुला घरचे नाराज का झाले ते?  " शारदा पटकन बोलून गेली.

" म्हणजे माझ्या पोटात मुलगी आहे म्हणून पंडीतजी आणि आई नाराज झाल्या?  " राधाचा चेहरा एवढासा झाला.
" अगं हा नुसता अंदाज आहे आपण अजून माहीती काढू,  तुझ्या फाईल वर जाऊन बघ काय लिहिलंय ते,  जर तसं असेल तर माझ्यामते तिथे नक्कीच काहीतरी गडबड चालू असणार.  " शारदाच्या मनात काहीतरी चालू होतं.
" मी घरी जाऊन बघते आणि मग तुला सांगते.  " तिने दिव्याचा हात पकडला आणि घरी निघाली.
पंडीत घरी आलाच होता. राधाला बघून तो पटकन म्हणाला..
" मला डॉक्टरांनी थांबवून घेतलं..  तू मन घट्ट कर..  कारण त्यांनी जे सांगितलंय ते भयानक आहे.. "

राधा म्हणाली " सांगा मी मन घट्ट करुनच आहे "

" डॉक्टर म्हणाले की बाळाच्या पायात व्यंग्य आहे,  जसजशी वाढ होईल तसे व्यंग्य वाढत जाईल,  आपल्याला मुल पाडावे लागणार.. " डोळ्यात पाणी आणत पंडीत बोलला.
" पण डॉक्टर तर बोललेले की देवी माँ की किरपा से सब ठिक है,  म्हणून?  " राधा संयम राखून बोलत होती.

" मग काय ते डॉक्टर, तुझ्यासमोर सांगणार का, की पोटातलं बाळ पांगळं आहे म्हणून?  " आतून सासूबाईंचा आवाज आला.

राधा समजून चुकली की,  या दोघांचे बोलणे झालंय या विषयावर आणि मला गर्भपाताला तयार करण्यासाठी हे नविन पांगळेपणाचं सोंग काढलंय.

" आपण अजून आठ दिवस थांबू आणि बघू, नाहीतर आठ दिवसांनी पुन्हा बोलावलं आहेच डॉक्टरांनी,  जो काही त्रास होईल तो मलाच होईल.. " राधा मन घट्ट करत म्हणाली.
ती कबूल होतेय हे म्हटल्यावर दोघेही शांत झाले.
जेवण झाल्यावर सोफ्यावरची फाईल राधाने उघडून पाहीली....
अपेक्षेप्रमाणे तिथे " जय माता दी " लिहिलेले होतेच.
पंडीत कामावर गेला होता.  दिव्या झोपली होती.

" आई मी जरा मिश्राजींकडे जाऊन येते.  काव्याच्या मम्मीने बोलावलेय.  काहीतरी काम आहे म्हणून " एवढं सांगून पदराखाली फाईल लपवून ती घराबाहेर निघाली.
एका झेरॉक्सच्या दुकानात तिथे फाईलच्या दोन झेरॉक्स कॉपी काढल्या आणि शारदाच्या घरी गेली.
झालेली सगळी हकीकत सांगून राधा म्हणाली " तू म्हणतेस तसेच आहे " जय माता दी " लिहिलंय.  पंडीत सांगत होते की,  पोटातल्या बाळात व्यंग आहे.  तू सांगितल्याप्रमाणे झेरॉक्स आणलीय फाईलची,  फाईल पुन्हा घेऊन जाते मी.  मला आईंचा काही भरवसा वाटत नाही.  त्या पंडीतजींच्या मनात काही बाही भरवतील.  आठ दिवसांनी पुन्हा जायचं आहे शुक्ला मॅटरनिटी होम मध्ये तोवर तू काय करायचे ते कर.  "

" तू काळजी नको करु,  फक्त त्यांच्या हो ला हो म्हणत जा.  चार पाच दिवसात मी आमच्या  संस्थेच्या मदतीने काय करते ते नुसतं बघत रहा. " शारदा ठामपणे बोलत होती. " तू जा घरी,  सासूबाईंना संशय नको यायला अजिबात. "

राधा घरी गेल्यावर,  शारदाने लगेच संस्थेचे अध्यक्ष राणेंना फोन केला,  सर्व परिस्थिती समजावून सांगितली. राणेंनी त्या झेरॉक्स घेऊन यायला सांगितल्या,  शारदा स्वतःच्या दोन फाईल्स सुद्धा सोबत घेऊन गेली.
फाईल आणि झेरॉक्स बघून त्यांचीही खात्री पटली की शुक्ला मॅटरनिटी होम मध्ये बेकायदा  गर्भलिंगनिदान आणि गर्भपात केले जातात.  त्यांना यापुर्वी त्याबाबत तक्रारी आल्या होत्या.  पण आता पुरावा समोर होता,  त्यांनी पुढच्या दोन दिवसात जुन्या तक्रारी दिलेल्या लोकांची भेट घेतली. त्यांच्या फाईलच्या झेरॉक्स घेतल्या.
आणि मग एसीपी कदमांना जाऊन प्रत्यक्ष भेटले.
एसीपी कदम हे त्यांचे चांगले मित्र होते.  त्यांनी सर्व पुरावे पाहीले आणि म्हणाले की....
" आपण जर या शुक्लाला रंगेहाथ पकडले तर,  हा गोरखधंदा कायमचा बंद होईल.  तुम्ही या राधाला समजावून सांगा.  मी पत्रकार दुबेंना या प्रकरणाची माहीती देतो.  ते छुपा कॅमेऱ्याने सर्व रिकॉर्ड करतील.  एक मोठे रॅकेट उध्वस्त होईल तुमच्यामुळे. "

पुढील दोन दिवस पत्रकार दुबे वेगवेगळ्या लोकांना पाठवून रिकॉर्डिंग आणत होते.  कदम सुद्धा पाळत ठेवून होते.

इकडे राधाच्या घरी..
पंडीत सांगत होता " उद्या डॉक्टरांनी बोलावलंय,  तासाभरात सुट्टी देतील म्हणाले.  फार त्रासही नाही होणार. "
राधा शांतपणे ऐकत होती...
" जायचंय ना?  म्हणजे तशी तयारी करायला "

" जायचंय ना, म्हणजे काय ??  " सासूबाई आतून तिरमिरीत आली..  " जायचंय ना म्हणजे काय?  पांगळं पोर जन्माला घालणार की काय?
तिला असेल हौस पांगळी पोरं जन्माला घालायची,  पण आमच्या घराण्यात नको म्हणावं हे पांगळं पोर " तिचा अवतार बघून एक क्षण पंडीीतही घाबरला.
" मी कुठे नाही म्हणाली ओ?  बाळ पांगळं असेल तरच काढा, नाहीतर अजिबात नाही एवढंच म्हटलं.  नाहीतर उद्या दुसरी मुलगी नको म्हणून पोटातली मुलगी माराल तर मी नाही खपवून घ्यायची.  "
असं बोलल्या बरोबर दोघेही चपापले.
एक मिनिट शांततेत गेल्यावर.

" उद्या शारदा सुद्धा आपल्याबरोबर येणार आहे. काव्याचा डोस बाकी आहे तो द्यायला. " राधाने सांगितले.
पंडीत आणि सासूबाई एकमेकांकडे पाहू लागले.
" मग एक काम करा...  तुम्हीच जा..  मी काही यायची नाही.  मी पोरीला सांभाळीन घरी.  " सासूबाईंनी सर्व भार पंडीत वर टाकला.
" ती कशाला आता सोबत आणखी?  उगाच वेळ वाया जाईल तिचा.  आपल्याला जरा जास्तच वेळ लागेल.  " चेहरा त्रासिक करुन पंडीत बोलला.
" काही नाही होत उशीर वगैरे,  आणि आई तुम्हीसुद्धा चला.  एकाला दोन माणसं सोबत असली की बरे.  दिव्या राहील मिश्राजींच्या घरी.  " राधा समजूतीच्या सुरात बोलली, मग या दोघांचा नाईलाज झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी,  दहा वाजता शारदा काव्याला घेऊन आली,  राधा, पंडीत आणि सासूबाई तयारच होते.  पंधरा मिनीटातच ते हॉस्पिटलला पोहचले.
हॉस्पिटलमध्ये दोन चार पेशंट, काही बायका मुलांसोबत होत्या.  शारदाने नंबर घेतला. आणि वेटिंग रुम मध्ये काव्याला घेऊन बसली.  पंडीत आणि दोघींना थेट आतमध्ये बोलावून घेतले.
डॉक्टर शुक्लांनी पुन्हा सांगितले...
" देखो बेटी बच्चा ठिक नहीं है.  उसका एक पैर बराबर बढ़ नहीं रहा, आगे जाके कॉम्प्लीकेशन्स हो सकती है.  भलाई इसीमें है की अभी अबॉर्ट कर देते हैं.  "

" डॉक्टरसाब मै तैयार तो हो जाऊंगी लेकीन मुझे जरा बतायिए कौनसा पैर बराबर नहीं बढ़ रहा? "
राधा आवाज चढवून बोलली.
पंडीत आणि डॉक्टर तिच्याकडे बघतच राहीले.  ती असे काही बोलेल याचा जराही अंदाज नव्हता त्यांना.
डॉक्टर म्हणाले " देखो पंडीत भाई..  मैने उसदिन आपको दिखाया था,  अब फिरसे देखना चाहोगे तो मुझे कोई ऐतराज नहीं.  लेकिन इसका खर्चा लगेगा.  बेटी हम कोई कसाई तो नहीं..  बिनावजह किसी की जान लेंगे. "

" हिला डॉक्टरकीतलं जास्त कळतं,  व्यवस्थित काळजी घेता येत नाही आणि आता आवाज चढवते. "
सासूबाईंनी आवाज चढवला.

इतक्यात.....

दरवाजा धाडकन उघडला गेला.
दरवाजातून एसीपी कदम,  दोन कॉन्स्टेबल आणि स्वतः  राणे आले त्यांच्या मागोमाग शारदा सुद्धा आली.
" ये क्या हो रहा है इन्स्पेक्टर? यह ऐसे अंदर आने का मतलब क्या हुवा?  हम कोई चोर उच्चके है क्या?  "डॉक्टर चिडले होते.

कदम काही बोलण्याच्या आधीच राणे राधाकडे बोट दाखवत बोलले..
" क्या हुवा है इन्हें? "
" बच्चे में गडबड है,  वह जनम से अपाहीच होगा.  इसलिए अबॉर्शन करना है इन्हें "
डॉक्टर कपाळावरचा घाम पुसत बोलत होते.

" नाही साहेब..  हे डॉक्टर खोटं बोलताहेत.  माझ्या पोटात मुलीचा गर्भ आहे.  हे या डॉक्टरांनी आमच्या घरातल्या लोकांना सांगितले.  मुलगी नको म्हणून आता अपंग आहे असे खोटे सांगून मला गर्भपाताला तयार करत आहेत.  " सर्व धीर एकवटून राधा बोलत होती.

" पंडीत अपने बिबी को संभालो..  अनापशनाप बक रहीं हैं...  और आपके पास क्या सबूत हैं? " डॉक्टर शुक्ला चिडून बोलले.

फट्टाक...  कदमांनी डॉक्टर शुक्लांच्या एक कानाखाली खेचली.  शुक्लांच्या डोळ्यासमोर तारेच चमकले.  शारदाने तिच्याकडचे पेपर समोर दिले.
" जय माता दी...  श्री गणेशाय नमः... अच्छी टेक्निक है डॉक्टर,  मानना पडेगा तुझे.  बहोत खून किए हैं,  चलो अभी तुम्हे कानून का ऑपरेशन दिखाते हैं...  सर्व सील करा रे.  एकही वस्तू इथून बाहेर नाही गेली पाहीजे. सगळे सबूत याच्या नरड्यात घालतो कोर्टात.  "

पंडीत आणि सासूबाई कोपऱ्यात उभे राहून हा सर्व प्रकार बघतच राहीले.  कॉन्स्टेबलने पुढे होऊन सर्वांना बाहेर काढले.  हॉस्पिटलच्या दरवाजावर अगोदरच टिव्ही चॅनेल आणि पत्रकार जमा झाले होते..  राणेंनी ते सर्व जमवून आणलं होतं.

हॉस्पिटलला सील लावले गेले.  सर्व फाईल,  कॉम्प्युटर,  रजिस्टर ताब्यात घेतले गेले...


" शहरात गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरला अटक.. " अशी बातमी टिव्हीवर दिसू लागली.

गोरीपान,  तजेलदार,  आणि सुंदर अशा एका परीने पंडीत च्या घरी जन्म घेतला होता.  तिच्या डोळ्यात पाहताना पंडीत सुद्धा हरवून गेला.
आपण किती सुंदर जीवाला मारुन टाकायला निघालो होतो याची खंत त्याला वाटत होती.

राधाने मोठ्या मनाने दोघांनाही माफ केले होते.  दिव्या आणि काव्या छोट्या परीसोबत खेळत होत्या..  आणि परी...  आईच्या प्रयत्नामुळे या जगात जन्म घेऊ शकली होती

Sunday, 16 October 2016

झिंग

... झिंग ...


" अरे तुला काय माहीत तुझ्या बापाने तुझ्यासाठी काय काय कष्ट घेतलेत? आज मला विचारतोस तुम्ही माझ्यासाठी काय केलंस? पंधरा पंधरा तास काम करुन आताही तेवढीच काम करायची धमक आहे माझ्यात..
समजू नको तुझ्या बापाचं वय झालंय, फक्त अठ्ठावन्नचाच आहे मी. तू कमवतोस त्याच्या तिप्पट आजही कमवतो मी. "
दोन क्वॉर्टर पोटात गेल्या होते त्याच्या. ऑफिस सुटल्यावर नेहमीच्या जागेवर बसून त्याने दोन क्वॉर्टर पोटात टाकल्या आणि मग स्वतःच्या बाईक वर बसून तो बडबडत होता...
" दहा वर्ष कांग्रेस हाऊस मधून रांडाचा धंदा केला. अरे त्या रांडा सुद्धा बोलायच्या हा पोरगा नेहमी हवा आपल्याला. टॅक्सी समय पे लेके आता है और कभी कुछ बोलता भी नहीं. दरदिवशी चौघी पन्नास रुपये द्यायच्या. त्यांच्या सोबतचे भडवे सुद्धा बोलायचे.. साल्ला तू लकी है रे.. ये औरतें भी तुझे मानती है. बँकेतली नोकरी करुनच टॅक्सी चालवायचो मी, इतर टॅक्सीवाले जळायचे माझ्यावर.. विलास की टॅक्सी इतना कैसे कमाती है?? याचा हेवा होता त्यांना.
आणि तू आज बोलतो माझा बाप नालायक आहे. अरे साल्या अभ्यास करायच्या वेळी उनाडक्या करायला मी सांगितले होते का? नववीत तीन वर्ष काढल्यावर सुद्धा तुला एकदातरी हात लावलेला का? म्हणे मला चांगली नोकरी मिळवून नाही दिली. माझी पस्तीस हजाराची नोकरी तुला सोडली की? नाहीतर तुला बँकेत उभं तरी केलं असतं का? नववी नापासाला झाडू काढायची तरी नोकरी मिळतं का रे भाड्या? "
समोर कोणीही नव्हते तरी तो समोरच्या अंधाराशी बोलत होता.
" बायको आल्यापासूनच तुझी नाटकं सुरु झालीत. एकूलता एक तू.. पण तसा वागलास का कधी?
बँकेतून पगार आल्यानंतर कधी एक पैसा तरी हातावर टेकलास का?
आठ वर्ष पोरं झाली नाही म्हणून चार लाखाचा खर्च तुझ्या या बापानेच केला ना?
दिवसभर नोकरी आणि रात्री टॅक्सी चालवून घेतलेली खोली तुला लहान वाटायला लागली म्हणून मिळालेली सर्विस घेऊन शेजारची खोली घेतली तरी तूला मोठ्या घरात जायचं होतं. पंधरा हजार कमवणारा तू.. तुला रे काय जमणार?
सासऱ्याबरोबर परस्पर जाऊन तिकडे कामोठ्याला कुठल्याश्या बिल्डींग मध्ये खोली बघून आलास..
बापाला अंधारात ठेवून.
जेव्हा पैसे भरायचे आले तेव्हा माझ्या कमाईवर डोळा? खोली विका.. सांगायला लाजा नाही वाटल्या काय रे?
तेव्हा सासऱ्याला सुद्धा हाकलून लावले म्हणून कीती चिडलेलास? पण दुसरा काही पर्याय नाही म्हणून पुन्हा माझ्याच पायाशी आलास ना? अरे वाळकेश्वरची खोली सोडून तिकडे कामोठ्याला कसला रे जातोस तू?
बायको तरी कसली शोधून आणलीस तू. पोराच्या वाढदिवसाला केक कापायला प्लॅस्टिक सुरी सापडत नव्हती म्हणून कोणी मोठा सुरा देतो का? तेच मी बोललो. एवढ्या लहान मुलांत कोणाला लागलं वगैरे तर नको तो ताप व्हायचा.. तर ती गेली दोन वर्षे माझ्याशी बोलली नाही. तू तर बायकोचा बैल... तू कशाला विचारतोस तिला? "
समोरचा अंधार अजून गडद होत होता. येणारे जाणारे त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत जात होते. कोणी हसत होते तर कोणी खिल्ली उडवीत होते.
तो मात्र आपल्याच धुंदीत बोलत होता...
" आता तरी..
पोरांसाठी दुध आणायला मला पाठवलंस? सकाळी शंभरचे रात्री शंभर चे, पैसे देतोस का कधी?
आतातरी कोण्या मित्राला टिव्ही घ्यायचीय म्हणून मला फोन करुन सांगितलंस की बाबा तुम्ही जा दुध आणायला. तुमचा नोकर आहे का मी? मित्र मोठा की बाप एवढी समजायची अक्कल नाही तुम्हाला.. बापाला विका आता आणि खा वाटून मित्रांमध्ये.. "
दोन क्वॉर्टरचा असर आता दिसू लागला. डोळे लाल झाले, जीभ अडखळू लागली.
इतक्यात वरच्या खिशातला फोन वाजला....
" कोण आहे च्या आयला... "
फोन बाहेर काढून किलकिलत्या डोळ्याने नाव वाचलं...
विराज...
" हां बोल रे... "
" बाबा.. मिळालं का दुध? " पलीकडून
" नाही.. जातोय आता, उशीर झालाय ऑफिसमधून निघताना "
" बाबा तुम्हाला उशीर कशामुळे होतो हे माहीत आहे मला चांगलंच.. लवकर जा, दुध संपलं तर सकाळी पाच ला परत जावे लागेल मला.. मी नाही जाणार.. तुम्हालाच जायला लागेल.. समजलं? " पलीकडून चिडलेला आवाज.
" हो. हा निघालोच. मिळेल तू नको काळजी करुस " फोन कट करुन खिशात टाकला.
त्या फोनने त्याची झिंग पुर्ण उतरली होती.
गाडीवरुन उतरुन तो समोर दुध देणाऱ्या भैया कडे गेला.. तिथून दुध घेऊन पुन्हा गाडीकडे आला पिशवी हँडलला अडकवून गाडीला किक मारली.
झिंग.... हळूहळू उतरत होती..
- बिझ सं जय ( १६-१०-२०१६)

Saturday, 15 October 2016

महादेव मामा

... महादेव मामा....


पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीतले नारायण हे पात्र जरी काल्पनिक असले तरी तसे पात्र आपल्याला अनेक ठिकाणी दिसतेच दिसते. आमच्या घरी ते पात्र " महादेव मामा" म्हणून होते.

महादेव मामांना मी मला समजू लागल्या पासून बघितल्याचे आठवतंय. अवतार सुद्धा अनेक वर्ष तसाच..
काखेला भली मोठी पिशवी, दोन माप मोठा शर्ट, आठवडाभर एकच पँट, मानेभोवती लाल किंवा निळा रुमाल, केसात दात कोरायला अगरबत्तीची काडी, तोंडात संपुर्ण वेळ पान, एका हातात पाण्याची जुनी बाटली, खांद्यावर नॅपकीन, पायात स्लीपर. आम्हाला महादेव मामांना अशीच बघायची सवय होती.
आमचा व्यवसाय कानातले बनवायचा आहे, महादेव मामा त्यातलेच काही नेऊन रस्त्यावर नेऊन विकायचे. नेहमीच नविन नेतील असेही काही नाही तुटले बिटलेले सुद्धा त्यांना चालत. इकडून तिकडून जोडून जोडी बनली की ती विकायला मोकळी.

महादेव मामांचा एक एरिया होता ते तिकडेच जास्त बसत. आमचं दुकान भुलेश्वरला, पण तिथे जास्त गर्दी शिवाय पोलिसांचा सारखा त्रास म्हणून ते थोडावेळ भास्कर लेन, थोडावेळ रामवाडी तर थोडा वेळ पार तिकडे चिराबाजारच्या कोलभाट लेनमध्ये. जिथे जातील तिथे त्यांच्या ओळखी ठरलेल्या. माणूस इतका बडबड्या की दुर्लक्षीत राहूच शकत नाही. त्यांच्या बडबडीचा त्रास झालेली व्यक्ती मला तरी आठवत नाही. सतत कोणतेतरी किस्से आणि गोष्टी सांगून समोरच्या गिऱ्हाईकाला कसं पटवायचं हे मामांनाच जमावं...
यांची गिऱ्हाईक म्हणजे तरी कोण. अगदी जीना झाडणाऱ्या मुली पासून त्याच बिल्डींग मध्ये मोठ्या घरात राहणारी भाभी सुद्धा. ती मुलगी जर दोन रुपये खर्च करणार असेल तर तिला त्या प्रकारची वस्तू दाखवणार आणि भाभीला महागातली. त्यांच्या त्या पिशवीतून काय बाहेर येईल हे कधीच कोणाला कळायचे नाही.
मी एकदा त्यांना दुकान लावताना पाहीलेलं..
सर्वात पहिले खाली पेपर अंथरुन, त्यावर प्लास्टिक चा कागद आणि मग त्यावर एक एक खोके असे रचत की समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला एका नजरेत सर्व माल दिसे. कानातले डूल, झुमक्या, गळ्यातले हार, माळा, केसांचे बक्कल, लुजर अनेक प्रकारचे टिकल्या, सुया, बांगड्या सर्व वस्तू मिळत त्यांच्याकडे. सर्व दुकान लावून झाले की... " बोलण्याची मातीपण विकली जाते... " नुसार... आओ आओ, लॉट है..सेल है..., पाच पाच रुपया असे ओरडणे सुरु व्हायचे. खणखणीत आवाजामुळे गिऱ्हाईकं आपोआपच खेचली जायची त्यांच्याकडे.
बरं.. हे एवढंच नाही. एखाद्या भाभीला दुसरी एखादी वस्तू हवी असली तरी ते आणून द्यायचे..
" म्हादू भाय.. तुम पिछली बार जो कढाई लाये थे. बिल्कुल वैसी कढाई फिरसे चाहीये. ले के आना " असे म्हणत एखादी भाभी त्यांच्या हातात पैसे कोंबायची. मामा ती वस्तू घेऊन तिला घरपोचही करायचे. राहीलेले पैसे ती भाभी परत घ्यायची नाहीच, शिवाय वरुन त्यांना चहा पाजायची....

चहा ही मामांची सर्वात मोठी कमजोरी होती. दिवसातून कमीत कमी पंधरा वीस चहा तरी आरामात पीत होते ते. आमच्या दुकानातच दोन तीन चहा व्हायच्या त्यांच्या. चहा सुद्धा एकदम गरमागरमच हवी असायची त्याबाबतीत अजिबात लाड नाही. चहावाल्याला परत चहा घेऊन जायला सांगायचे जर चहा जरा जरी थंड असला तरी.

महादेव मामा हे लहानपणी अत्यंत व्रात्य म्हणता येईल असा मुलगा.. पक्का अवली. गावी असताना ते लहान असताना त्यांच्या आवडत्या बैलाला वाघाने मारले होते. पुढे त्या वाघाला शिकाऱ्यांनी मारलं तेव्हा त्या वाघावर नाचलेल्या महादेवला " वाघमाऱ्या महादेव " हेच नाव चिकटले.
तसे ते आमचे दुरचे नातेवाईक. आईचा मावसभाऊ, त्यामुळे मामा..
पण वडीलांच्या सोबतच जास्त म्हणून त्यांना मानणारे. खोड्या करायला दोघेही सोबत असायचे. वडिलांचे आणि त्यांचे नाते तेव्हा जास्तच फुलले जेव्हा मामांनी दारु सोडली. संपुर्ण तारुण्य दारुमध्ये घालवल्यानंतर वयाच्या एका टप्प्यावर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि मग ते हा धंदा करु लागलेले.
आमच्या आईला मात्र ते खूप मानायचे. आईसुद्धा त्यांना खुप मानायची. सुप, चाळणी, पाट, डब्बे एवढंच काय तर चांदिचे दागिने, पैंजण, जोडवी सुद्धा त्यांनाच आणायला सांगायची.
बाबा कधी बोलले तर..
" तुम्हाला जमणार आहे का दादासारख्या वस्तू आणायला?"
या प्रश्नावर सर्वच गप्प व्हायचे.
खरंच हा माणूस कुठून कुठून जाऊन एक एक वस्तू आणायचा हे त्यांनाच माहीत.
" ताई.. हा घे तुझा इस्टील चा डबा. " म्हणत त्यांच्या पिशवीतून आईला हवा तसाच डबा नेमका बाहेर निघत असे.

गावी गेले की मात्र राजासारखे राहत. गावी मामी आणि एक मुलगा आणि तीन मुली असं कुटूंब.
मामीच्या हातचे घावणे आजही आठवतात. मुलगा आमच्या बरोबरचाच. आमच्याच दुकानात होता. नंतर सोडून गेला, पण त्यामुळे मामा काही लांब गेले नाही.. ते आमच्यासोबतच राहीले.
दुपारी दोन वाजता दुकानात येऊन भंगारची पिशवी आणि जुन्या मालातले काही पॅकेट ते घेऊन जात. आदल्या दिवशी विकल्या गेलेल्या मालाचे पैसे न चुकता बाबांकडे देत असत. माणूस व्यवहाराला एकदम चोख. कुठेही फसवाफसवी नाही.
मोठ्या भावाच्या लग्नात सगळी खरेदी यांच्याच भरवशावर, बाशिंग, मुंडावळ्यांपासून, साखळ्या, जोडवी, हेरवी - फेरवीची खरेदी, शिवाय वऱ्हाड्यांच्या खांद्यावर टाकायला टॉवेल, नॅपकीन कुठे चांगले मिळतात ते यांच्याशिवाय कोण सांगणार?
भांजेसाब साठी त्याच्या पसंतीची लग्नाची पेटी आणायला नवरा सुद्धा हवा. " वस्तू त्याला वापरायचीय तर तो सुध्दा हवाच ना? " असं ठणकावून सांगणारे महादेव मामा.
माझ्या लग्नात सुद्धा सगळ्यात जास्त धावपळ करणारे तेच होते. लग्नाच्या दिवशीच त्यांच्या घरातल्या एकाचे लग्न होते म्हणून हळदीच्या रात्री पर्यंत थांबून ती कमी भरुन काढणारे मामाच होते.
आमच्या घरातल्या मोठ्या मुलीचे कान याच मामांनी टोचले होते. त्यातही ते एक्सपर्ट होते.
रस्त्यावरसुद्धा त्यांच्या धंद्यावर असताना अनेकजणींनी त्यांच्याकडून कान टोचून घेतले होते. बांगड्या चढवण्याचे कठीण काम सुद्धा अगदी सहज करत.

त्यांचा एक डायलॉग फार प्रसिद्ध होता. अनेकदा इतरांनी केलेल्या चुकांमुळे यांना त्रास सहन करायला लागायचा.. मग चिडून ते बोलायचे " करुन गेला गाव, आनी म्हांदेव चा नाव.. "
त्यांच्या जास्त गोड आणि चहाच्या सवयीने त्यांना मधुमेह लवकरच झालेला. अशातच देवाच्या विषयावरुन गावाचे दोन वैचारिक भाग पडले. इतकी वर्ष आम्हाला साथ देणाऱ्या मामांनी घरच्यांच्या दबावाखाली दुसऱ्या बाजूला जायचा निर्णय घेतला. त्यांची अगतिकता आम्हाला कळत होती. आम्हाला तुम्ही आमच्या घरी येऊ नका असे सांगताना त्यांच्या डोळ्यातले न दिसणारे परंतू काठोकाठ भरलेले अश्रू आम्हाला दिसायचे. आमच्याकडे येणे बंद झाल्यापासून धंदा आपोआपच बंद झाला. मुलाच्या कमाईवर जगण्यासाठी गावी जाऊन राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सोबत मग पुन्हा दारु जवळ केली. रिकाम्या माणसाचे हाल कुत्राही खात नाही. हा माणूस कधीही घरी बसून नव्हता. घरी बसला आणि हा माणूस ढासळत गेला.
अशातच एका जखमेने आणि पत्थ्य न पाळता भयंकर पसरलेल्या मधूमेहाने ते अचानक भरपूर आजारी पडले.
शेवटी शेवटी ते बाबांना बोलले की
" शेठ... मी तुमची साथ सोडून फार मोठी चुक केली."
परंतू खुप उशीर झाला होता.
अशाच एका दिवशी गावावरुन काकांचा फोन आला..

" म्हादेव दा गेले. "

आई तर धाय मोकलून रडली. गावाचे दोन भाग असल्याने आणि अंतरही लांब असल्याने जायला मिळाले नाहीच. त्या कुटूंबासोबत असलेला दुवा निखळल्यावर पुन्हा तिकडे जाण्यात काही अर्थही नव्हता.

महादेव मामा तर गेले.. पण त्यांच्या असंख्य आठवणी आजही ताज्या आहेत. सख्खा मामा नसलेला मी.. पण सख्ख्याने दिले नसते तितके प्रेम या मामाने मला.. आम्हाला दिले.

मामा आमच्या बरोबर असतात.. तर आजही सोबत असतात

Monday, 10 October 2016

माणूसकी

.... माणूसकी  ....


हाताला लागलेले औषध धुवून, हात कोरडे करुन तिने बँडेज गुंडाळून ठेवले.
कपडे बदलले,  हलकासा मेकअप केला. आरशात स्वतःला निरखून म्हणाली..

" मी आलेच जाऊन. "


स्वतःच्या गाडीची चावी घेतली. तोंडाभोवती स्कार्फ गुंडाळला.  डोक्यात हेल्मेट घातले.  स्ट्रार्टर मारला.  नविन गाडी असल्यामुळे गाडी झटकन सुरु झाली.

त्या जागेवरुन ती गेली.  रेतीवरच्या खुणा अजूनही तशाच दिसत होत्या.  एक सुस्कारा सोडून त्या जागेवर पाहीलं.  क्षणभरच..  मग एस्कलरेटर पिरगटला आणि गाडी पळवली.  सिग्नलला यू टर्न घेतला आणि पुन्हा त्याच रस्त्याला आली.
लांबूनच तिने तो पानवाला, आईस्क्रीमवाला त्याच्या पुढ्यात नेहमी उभे असणारे आणि तिथेच टपोरीगिरी करत राहणारे ते दोन रिकामटेकडे तरुण, बाजूला नेहमी असणारा पेपरवाला, स्टॉलच्या आतून डोके बाहेर काढून येणाऱ्या जाणाऱ्या बायका पोरींना न्याहाळणारा लंगडा स्टॉलवाला यांच्यावर नजर टाकली.

त्या जागेच्या आसपास कोणीही नाही हे पाहून तिने एक्सलेटर दिला,  उजवा पाय बाहेर काढला आणि बरोबर त्याच जागेवर फक्त मागचा ब्रेक जोरात दाबला.

त्याने गाडी शिकवताना सांगितले होते,  दोन्ही ब्रेक एकदमच दाबायचे. तरच गाडी न डळमळता उभी राहते. त्याचे प्रात्यक्षिकही त्याने त्यावेळी करुन दाखवले होते.  तीस - चाळीस च्या स्पीड ची गाडी जराही न सरकता जागच्या जागी उभी करुन दाखवली होती.
" जर तू अचानक  कोणताही एक ब्रेक दाबलास तर तू हमखास पडणार " हे शब्द तिच्या कानात पक्के बसले होते.

धड्डाम...  आवाजाबरोबर ढोपर जमीनीवर आपटले.  हात रेतीवरुन घासत गेला.  डोके आपटले पण हेल्मेटमुळे मार नाही लागला.  व्यवस्थित नियंत्रितरित्या पडल्यामुळे खरचटण्या पलीकडे तिला काही लागणार नव्हते.
परंतू गाडी पडल्याच्या आवाजामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यात ती यशस्वी झाली.

ते दोघे तसेच धावत आले सर्वात पहिले.  दोघांनी हात देऊन तिला उठवले.  लगेचच पानवाला त्याची टपरी सोडून आला.  आईस्क्रीमवाला त्याची गिऱ्हाईकं तिथेच सोडून धावत आला. पेपरवाला सुद्धा तडक आला,  लंगडा स्टॉलवालासुद्धा बिसलेरीची बॉटल घेऊन हळूहळू येताना दिसत होता.

" मॅडम आर यु ओके?  " तोंडातला गुटखा चघळत दोघातल्या एकाने विचारले.

गुडघ्यावर हात ठेवत " आऊच " असा दुःखी स्वर तिने काढला.  दोघांच्या कपाळावरची चिंतेची आठी अजून गडद झाली.
दुसऱ्याने वाकून पाहीलं.
" ढोपराला लागलंय बहुतेक,  लेंगा फाटलाय.  "

पानवाला चुकचूकला...  " अरे मॅडमवाको तनीक कोई पानी पिलाओ.  गाडी भी खडी करो. "
पेपरवाला ओरडला.. " या रेतीमुळे कोण ना कोण पडतंयच,  मॅडम कुठे राहता तुम्ही?  "

स्टॉलवाला तिच्याकडे नेहमीप्रमाणे निरखत म्हणाला.. " हे घ्या पाणी,  जरा बाजूला बसवा.  घाबरल्या असतील मॅडम.  जास्त लागलंय का?  "

तोवर दुसऱ्याने गाडी उचलली होती.  गाडीला मजबूत गार्ड लावल्यामुळे  कुठेच काही नुकसान झालं नव्हते. त्याने गाडी स्टँडवर लावली आणि चावी काढून तिच्या पुढ्यात धरली.
गुटख्या खालेल्या तोंडाने हसला आणि म्हणाला " मॅडम,  ही घ्या चावी "
चावी घेताना हाताला थोडा स्पर्श झाला त्यानेही तो शहारला.  तिचे डोळे सर्व काही टिपत होते.

" अरे मॅडमवा..  उ हेल्मेटवा और  स्कार्फ जरा निकालीए.. सर पर चोट वोट तो नहीं ना आयी?    तनीक सास लिजिए..  डरीए मत हम आप को तोहार घर पर पहुँचा देंगे.. " पानवाला दात कोरत बोलला.

तिने हेल्मेट काढण्यासाठी हात वर केले.  सगळ्यांच्या नजरा तिच्या चेहऱ्यावर खिळल्या होत्या.  स्कार्फ बाजूला केल्यावर तर सगळे पाहतच राहीले..

ती सुंदर होतीच, शिवाय उठावदार होती. सगळ्यांची नजर  चेहऱ्यावरुन सुरु होऊन तिच्या अंगभर फिरतेय हे तिला जाणवत होतं.  तिने स्टॉलवाल्याने पुढे केलेली बिसलेरीची बाटली घेतली.  घटा घटा पाणी पिऊ लागली.  गालाच्या बाजूने सांडणारे पाणी तिच्या मानेवरुन खाली ओघळत जात होते.

" मॅडम जरा हळू..  ठसका लागेल." पहिल्याने तिला स्पर्श करुन सांगितलं.
पानवाला तिच्या ओल्या झालेल्या कपड्यातून काही दिसतंय का हे पाहत होता. स्टॉलवाला सुद्धा त्याच प्रयत्नात होता.

ती उठून उभी राहीली.
" धन्यवाद तुम्ही सर्वांना..
तुमच्यामुळे पडूनही मला धीर आला.  हे दोघे दादा धावत आले.  मला हात धरुन उठवलं.  या पानवाल्या दादांनी मला शाब्दिक धीर दिला. आईस्क्रीमवाले आणि   पेपरवाले काका मी पडल्यावर लगेच धावत आले.  हे स्टॉल वाले तर स्वतः असे असताना माझ्यासाठी पाणी घेऊन आले.
तुमचे आभार मानू तेवढे कमीच आहेत.  "

दादा, काका अशी नाती लावल्याने सगळेच एकदम हिरमुसले.

" असे पडलेल्या माणसाला मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे..  त्यात तुम्ही लेडीज म्हणजे तुम्हाला मदतीची गरज पडणारच.  माणूसकी नावाची ही काही गोष्ट असते ना ओ मॅडम?  " दुसरा हसत हसत बोलला.

" माणूसकी ???
कसली ओ माणूसकी  ??
मला मदत करायला आलात ते ही एक बाई म्हणून ना?
का??  मदत फक्त स्त्रियांनाच लागते?  परवा याच जागेवर एक माणूस पडला तेव्हा तुमची ही मदत कुठे होती हो? त्याला तर भरपूर लागलेलं.  ढोपर फुटून रक्त येत होतं.  हाताला फ्रॅक्चर आलं होतं तोंडावर मार लागला होता.
तेव्हा कोणीही मदतीला आला नाहीत ते?  कोणी येऊन हात नाही दिलात?  कोणी येऊन गाडी नाही उचललीत?  कोणी पाणी नाही पाजलंत? कोणी घरी नेऊन सोडण्याची भाषा नाही केलीत?
आज काय झालं?  त्याच्यावर भरपूर हसलात पडला म्हणून?
उलट उपदेशाचे डोसही पाजलेत.
आज स्त्री दिसली म्हणून तुमच्यातली माणूसकी जागी झालीय का?  " तीने एका दमात बोलून टाकले.

मदतीला गेलेले सर्वजण अवाक् होऊन तिच्याकडे बघतच राहीले..
सर्वांना परवाची गोष्ट क्षणात आठवली.
याच जागी तो तरुण पडला होता.  सर्व त्याच्या पडण्यावर हसले होते.  मदत तर सोडा..  " धीरे नहीं चला सकता क्या?  तुम जैसे स्टाईलबाजोंको ऐसा ही सबक मिलना चाहिए " अशी वाक्य ऐकवली होती त्याला.  शेवटी तोच महत्प्रयासाने उठला आणि फोन करुन एकाला बोलावले,  तो त्याला येऊन घेवून गेला.
सर्वांच्या नजरेत अपराधीपणाचा भाव आला होता.

" तो माझा नवरा होता. माणूसकी होती ना तुमच्याकडे?  निदान त्याला हात तरी द्यायचा.  फक्त स्त्रियांसाठीच माणूसकी का?  पुरुषांनी काय पापं केलीत?
मला फक्त एवढंच सांगायचे होतं. विचार करा यावर ".
असं म्हणुन ती गाडीवर बसली,  स्टार्टर मारला आणि हेल्मेट घालून निघून गेली....

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असतानाच....

मागून... धडाम्..  आवाज आला..

"च्यायला ही रेती झाडूनच टाकतो आज... " म्हणत पहिला धावत गेला. त्यामागे बाकी सर्व गेले.

माणूसकी दाखवायला

बाजू.. बाजू..


.... बाजू..  बाजू.....


तेव्हा माझी सकाळ ४ वाजता व्हायची.चायवाला राधेश्याम स्टोव्हला पंप मारायला लागला की त्या आवाजानेच जाग यायची. हातगाडीवरचे जीवन आमचे.  सकाळ हातगाडीच्या पलंगावर व्हायची,  दिवस हातगाडी ओढण्यात जायचा आणि रात्र सुद्धा तिच्याच कुशीत जायची.
गावाकडे संसार पार उत्तरप्रदेशात. बायको, चार मुलं, आई या सर्वांना पोसायची जबाबदारी माझ्यावर.
गावी जायचं म्हणजे तीन चार दिवसाचा प्रवास.  मेलं गेलं काही नाही.
बाप मेला हे सुद्धा तीन दिवसांनी कळलं. तेव्हा फोन वगैरे नव्हते. सावकाराचे न संपणारे कर्ज... त्यामूळे घरावर होणारे अत्याचार डोळे बंद करुन सहन करत होतो.  शेवटी किशन सोबत मुंबईची वाट पकडली.  मार्केट मधी हमालांची कमी आहे तिथे चांगला पैसा कमवायला संधी आहे या वाक्यावर,  घर मागे टाकून थेट मुंबई गाठली.
किशन हातगाडी ओढायचा मी हातगाडीला बाजूने धक्का द्यायला. भुलेश्वर मार्केट हे सदानकदा गजबजलेलं.  त्याच्या मधून रिकामी  हातगाडी न्यायची तरी कसरत असायची.  भरलेली असेल तर फारच कष्ट..
नेहमीच हातगाडीच काम नसायचं मग टेंपोंवर हमाली करायला जायचो.  एक गोणीचे सहा रुपये.  सुरुवातीला दोन गोण्या न्यायचो पण मग लक्षात आलं की आपला वेळ वाया जातोय.  मग चार गोण्या - पार्सल जसं मिळेल तसं
तिथेही नंबर असायचे.  त्याच्यातही मारामारी व्हायची.  पार्सल तरी.. तीस तीस किलो वजनाचे. दोन दोन मजले चढवायचे म्हणजे नाकी नऊ यायचे. मुकादमाच्या आवडत्या माणसाला तळाच्या दुकानांचे पार्सल मिळायचे. दिवसाची कमाई कशी बशी शंभर रुपये.
हातगाडी असली की मात्र दोनशे व्हायचे.  दिवसभर कमवलेले पैसे दुसर्‍या दिवशी सकाळी स्टेट बँकेत नेऊन भरायचे. तिथेही तासभर लाईन असायची,  सर्व माझ्यासारखेच लोक. तिथल्या लाईन मध्ये सुख दुःख वाटली जायची.

दुपारचे जेवण म्हणजे भोईवाड्याच्या नाक्यावरचा वडापाव आणि भजीपाव.  पंधरा रुपये तिथेच खर्च.  चहा, बिडी, तेल साबण वगैरेचा खर्च किशनच करायचा म्हणून त्याची दगदग नव्हती.  रात्रीचे जेवण मात्र जलाराम बाप्पा च्या मंदिराच्या बाहेर रांगा लावून. एका पत्रावळीत पातळ खिचडी.. हेच रात्रीचं जेवण. जेवण झालं की पुन्हा हातगाडी गाठायची आणि वरच्या वायरींच्या जंजाळातून आकाशातले तारे मोजता मोजता झोप यायची.
या वर्षी गावी गेलो तेव्हा सांगून आलो की दोन वर्षे आता येत नाही मी.  येण्याजाण्याचाच खर्च मोठा असायचा.  मोठा मुलगा गावी मजूरी करायला लागला होता.  त्यामूळे माझ्यावरचा भार जरा हलका झाला होता.  निदान त्याला तरी हे काम करायला लागू नये हा प्रयत्न माझा असणार होता..

पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं.
रात्रीच किशन बोलला की उद्या दुपारी जेपी ची गाडी भरायची आहे.  तू, मी आणि तिसऱ्या भोईवाड्यातला याकूब तिघांनी भरायची आहे.  दोन फेऱ्यांचा माल आहे. दोन तासाचे काम पण पेट्या मोठ्या मोठ्या करायच्या आहेत. एक्सपोर्टचा माल आहे एक पेटी साठ किलोची बनेल.  इमरान कडून पेट्या मागवल्यात, सकाळी पट्टी वगैरे मारुन ठेवू आणि दुपारी जरा कमी गर्दी झाली की घेऊन जाऊ.  टेंपो दाणाबाजारात उभा असणार आहे.

राधेश्यामचा पोऱ्या चहा घेऊन आला.  चहा पिता पिता त्याला विचारलं.
" तू क्यों इधर आया रे?  बाप किधर है तेरा?  वो काम नहीं करता क्या?  "
पोऱ्या तोंड खाली करुन बोलला..
" बाप जेल में है.  मां को मार डाला.  गावमें बुढ़िया और बहन है. उनके लिए काम करना पडता है.  अब तुम्हारे जैसा काम तो नहीं कर सकता इसलिए चायवाला ही सही है. "
त्याच्या परिस्थितीचा विचार करता करता याकूब कधी समोर येऊन उभा राहीला ते कळलंच नाही.
" सून तिवारी..
आज जैन मंदिर में भोग है.  लाडू देगा,  अच्छा वाला खाना भी देने वाला है.  मै जाऊंगा.  तू भी आजा.  पट्टी मारने के बाद थोडा समय रहेंगा तो हम जाके खाना खाके आयेंगे..  "
पंधरा रुपये वाचणार हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते.
किशन आला तेव्हा नऊ वाजले होते.  दहा वाजता इमरान पेट्या पोहचवणार.  अकरा ला जेपी उघडला की आमचे काम सुरु.  तासाभरात पेट्या भरुन, पट्टी लावून होणार होते.
आजचा दिवस चांगला जातोय.  चांगले जेवण.
कामानंतर अर्ध्या दिवसातच  चांगला पैसा.  पुन्हा टेंपो आहेतच.  आज चारशे रुपये कमवाईची संधी दिसत होती.

इमरानच्या हात गाड्या पेट्या घेऊन आल्या.  दोन हातगाड्या...

इमरानने आमच्या हातगाडीकडे बोट दाखवत म्हटलं.
" किशन शर्मा..  तेरी गाडीमे कुछ गडबड लग रही हे.  इतना वजन नहीं जाएगा इसपर.  बनवा के लेले "

किशन त्यावर हसून बोलला..
" अबे,  इतनी साल से गाडी चला रहा हूँ.  तू अभी बच्चा है.  पुरे टेंपो का आता है मेरी गाडी पे.  तू ठोकते रह पेटी..  "

इमरान ने त्याच्या नादी लागण्यापेक्षा पुढे जाणे पसंत केलं.
एका वेळी बारा ते चौदा पेट्या न्यायचो आम्ही..  टनाचा माल एकावेळी जायचा. सर्व पेट्यांना पट्ट्या मारेपर्यंत एक वाजला.
पेट्या मोजल्या तर त्या ३२ झालेल्या.
किशन कडून वडापावसाठीचे पैसे घेऊन याकूब आणि मी थेट जैन मंदिर गाठलं.  जेवण साडेबारा वाजता चालू होतं हे माहीत होतं पण ते संपते ही लवकर.  कारण जसे आम्ही, तसे मार्केट ला दोनशे अडीचशे हमाल,  हातगाडीवाले, पाटीवाले होते.  सर्वच एकदम यायचे.
त्यामूळे जेवण लवकर संपायचे. आम्ही गेलो तेव्हा संपल्यातच जमा होतं..
थोडं थोडं मिळालं म्हणून लाडू दोन दोन दिले ताटात.  तिथेच बाजूला फुटपायरीवर बसून फडशा पाडला.
दिवस चांगला असला की सर्वच चांगलं घडून येतं.  ताट धुवायला पाणी ठेवलेलं होतं.  महिन्यातून एकदा असं ताटातून मिळायचं.  बाकी दिवस ती पत्रावळीच आपली सोबती.
बिडी पित एका हातगाडीवर बसलो होतो तर याकूबच्या मोबाईलवर किशनचा फोन आला.
" अरे क्या पागल लोग हो तुम?
बोला था मैं के जल्दी भरेंगे तो गिर्दी कम होंगी..  आओ जल्दी "
बिडी अर्धी टाकतच धाव घेतली.
पटापट पेट्या बांधल्या. पेट्या जरा नेहमीपेक्षा जडच वाटल्या.  जेपी म्हणजे हेअर क्लीप वाला त्याच्या एवढ्या जड पेट्या नसायच्या.  मी मदत करण्यासाठी दुकानातल्या सेल्समन ला विचारल्यावर त्याने सांगितले सर्व कास्टिंग चा माल आहे. त्यामूळे जड असणारच.
याकूबने माझ्या चेहऱ्याकडे पाहीलं.
" क्या हुआ मियाँ.. डरता है क्या?
अरे अपून संभालेगा आगे बस तू बाहर वाली साईड संभालना.  किशनभाय तो नाम के लिए साथ रहेंगे..  है ना?  "
आम्ही दोघेही हसलो.  पेट्या करकचून बांधल्या. गाडीवर अठरा पेट्या होत्या.
मी किशन ला विचारलं की, अरे बत्तीस तर आहेत मग इतक्या जास्त कशाला भरतोय?
त्यावर तो बोलला की,  तीन पेट्या तुम्ही वडापाव खायला गेल्यावर वाढवल्या शेठ ने.  आता त्यासाठी तीसरी फेरी घालायची काय?

मान खाली घालून हातगाडी हलली दुकानासमोरुन.  भोईवाड्यातून उलटी न्यायची म्हणजे डोक्याला ताप.  समोरुन गाड्या आल्या की गाडी खाली टेकायला लागायची.  टेकल्यावर पुन्हा तेवढाच जोर काढून पुन्हा ढकलावी लागायची.  याकूब पुढे..
ए भाय...  बाजू बाजू ओरडत चालला होता, मी बाहेरच्या बाजूस धक्का देत होतो.  तिकडच्या बाजूने नेहमीप्रमाणे धक्का येत नव्हता हे जाणवत होतं.
आमची म्हणजे याकूब आणि माझी  हसी मजाक चाललेली त्यावरुन.
याकूब ओरडत होता..
" ए भाय..  बाजू बाजू..  किशनसेठ की गाडी आरेली है..  प्वांम प्वांम..  "
त्याच्या बोलण्यावर हसत हसत मी सुद्धा " बाजू बाजू " ओरडत होतो.  गल्लीच्या टोकावर पोहचलो मात्र....
अचानक कडाड् आवाज झाला आणि गाडी एकदम माझ्या कडे कलंडली.
पायावर एकदम दाब आला..  काडकन आवाज आला.  ते होतेय न होतेय तोच वरच्या पेट्या अंगावर आल्या.
हे सर्व इतकं झटपट घडले की समजले ही नाही.  चारी बाजूने आरडाओरडा सुरु झाला.
" अरे उसको बाहर निकालो पहले." ...  "अरे बापरे..  कितना खुन..  "
" लगता है पैर गया.. "
दहा बारा जणांनी पेट्या हलवल्या तेव्हा लक्षात आलं की अती वजनामुळे माझ्या जवळचे चाकच निखळून पडले होते.  खड्ड्यात हिसका बसल्याने मजबूत लाकूड तुटून पडले होते.
पण मी गाडीच्या जवळ असल्याने. माझा पाय त्या चाकाखाली आला होता.
आता माझे लक्ष माझ्या पायाकडे गेले.  तो अजूनही चाकाखालीच होता आणि मी...
हातगाडी पासून दुर होतो.

याकूब ला सुद्धा मुका मार लागला होता बहुतेक.  तरीही तो धावत आला.  त्याने लगेच मला मिठी मारली.
"  कुछ नहीं होगा..  तुझे..  चल हम अस्पताल जायेंगे..  "

मला उचलल्याबरोबर पायातून एक कळ गेली... थेट मेंदूत..
गुरासारखा ओरडलो.

आणि मग थेट हॉस्पिटलमध्येच जाग आली.  पायातून जबरदस्त कळा येत होत्या.  याकूब शेजारीच होता.  त्याच्याबाजूला चहावाला पोऱ्या होता.  दोघांचे चेहरे अत्यंत चिंताग्रस्त दिसत होते.
मी जागा झालोय हे पोऱ्यानेच पहिलं पाहीलं.  तो लगेच जवळ आला..
" कुछ नहीं हुवा आपको.  जल्दी ठिक होंगे आप.  "
.
कुछ नहीं हुवा??
.
अरे ज्यांच्या जोरावर ऐंशी नव्वद किलो वजन तीन चार माळे चढवायचो त्यातला एक गेलाय रे..

कमाईचा एकमेव आधार होता ते माझे वजन उचलण्याचे कौशल्य..
एका पायाने कसा उचलणार मी?

याकूब जवळ आला त्याच्या डोळ्यात अश्रू होते.  मी काही बोलणार त्या आधीच तो बोलला..

" किशन नहीं रहा..

उपरवाली पेटी सीधे उसके सर पर गीर गयी.  गरदन मुडने के कारण वहीं उसकी मौत हो गयी..  "

सुन्न..  सुन्न..

किशन च्या मरणाला रडू की माझ्या या नविन अपंगत्वाला?
डोळ्यात पाणी तरारुन आलं...
अश्रू बाहेर सांडण्यापुर्वी पोऱ्याकडे लक्ष गेलं..
मला माझा मुलगा त्या ठिकाणी दिसत होता..

कानात शब्द घुमत होते...
" बाजू..  ए भाय..  बाजू..  बाजू... "

Sunday, 9 October 2016

सर श्रावणाची

सर श्रावणाची


दुपारी रेडीओवर गाणी ऐकत असताना,  एक गाणं सुरु झालं...
" भुईवर आली सर..
        सर श्रावणाची...  "
सुंदर गीत...
मी गाणं ऐकता ऐकता जुन्या आठवणीत रमलो.
शहरात राहत असल्याने,  अनेक वर्ष गावाकडचा श्रावण पहायलाच मिळाला नाही.  इकडे शहरात श्रावण हा फक्त कॅलेंडरवरुन नाहीतर लोकांच्या तोंडून " माझा  श्रावण आहे " अशी वाक्य ऐकूनच संपतो.
परंतू गावी असताना हाच श्रावण भरगच्च हिरवळीने आणि सणासुदींनी भरलेला असायचा.
आषाढ महिन्यातले जोरदार पावसाचे दिवस संपले, शेतीची नांगरणी, लावणी वगैरे कामे आटपली की गावी श्रावण यायचा.

"हासरा नाचरा...
      जरासा लाजरा...
           सुंदर साजरा...
               श्रावण आला...  "

हे गाणं जरी नंतर ऐकलं असलं तरी हेच भाव त्यावेळी आमच्या मनात असायचे.
आमच्या गावची शाळा ओढ्याच्या पार होती.  लहान साकव होता.  पण आम्ही मुलं साकवाऐवजी पाण्यातूनच जायचो.  पाऊस जोरात नसल्याने ओढ्याच्या पाण्यातून जाण्याची एक वेगळीच मजा असायची. थंडगार पाण्याची शिरशिरी अंगातून जायची.  त्या पाण्यातून सोडलेल्या अनेक होड्या... काही तरंगलेल्या तर काही तिथेच बुडलेल्या.  तर काही दगडाला अडकून भरपूर वेळ तशाच राहिलेल्या. शाळेची घंटा वाजली की तो खेळ अर्धा सोडून जावे लागायचे.  मधली सुट्टी झाली की पुन्हा त्या अडकलेल्या होड्या दिसतील अशी भाबडी आशा घेऊन पुन्हा ओढ्यावर यायचो आम्ही..  पण नसायच्या होड्या.  दुसर्‍या दिवशी नविन होड्या.  हा खेळ ओढ्याचे पाणी आटेपर्यंत चालायचा.

नागपंचमीला नागाला दुध घेऊन जायची भरपूर इच्छा असायची पण आमच्याकडे गायी नव्हत्या.  दोन बैल तेही आई-आजोबांचे. आई सुद्धा इकडून तिकडून दुध मागूनच न्यायची. तीन बाजूला डोंगर आणि चौथ्या डोंगरावर आमचे गाव.  समोरच्या डोंगरावर वडाचे एक झाड आहे. त्याच्या खाली वारुळे असायची.  तिथे हा नागपंचमीचा सण साजरा व्हायचा.  अगदीच काही चित्रपटात दाखवतात तसा नाही.  पण पानाच्या खोऱ्यात दुध ठेवायच्या,  वारुळाभोवती अगरबत्ती वगैरे लावायच्या, नागाला नमस्कार करायचा.. संपला सण.
लहान मुलांना कधी गुळ - कुरमुरे तरी कधी साखर - खोबरे मिळायचे. आजच्या हजारो रुपयाच्या मिठाईला ती चव कधीही येणार नाही.  नागपंचमीला नाग मात्र  कधीच दिसायचा नाही.  घरी मात्र तेव्हा गोडधोड व्हायचे.  नारळाच्या करंज्या,  पानमोडे, गुळासोबत घावने अशी मेजवानी असायची.  आम्ही लहान मुलं..  " नागाला दुध..  नागाला दुध " असं ओरडत फिरायचो.  नागपंचमीच्या निमित्ताने प्रत्येक घर सारवले जायचे. कणे काढले जायचे.  आता मात्र सर्व घरात लाद्या लागल्यात.  स्टिकरची रांगोळी पाहताना कसंनुसं वाटतं.
नंतर आमच्याकडे येणारा सण म्हणजे पंधरा ऑगस्ट म्हणजे झेंडावंदन..
 गुरुजी आदल्या दिवशीच सांगायचे,  की कपडे चांगले घालून या,  तेल फणी करुन या.  पाहुणे कोण येणार याच्यावर शाळेची साफ सफाई,  सारवण वगैरे गोष्टी अवलंबून असायच्या.
आदल्या दिवशीच याची तयारी सुरु व्हायची.  हा देशाचा सण आहे असे गुरुजी सांगायचे. १५ ऑगस्ट, १९४७  या दिवशी स्वातंत्र्य मिळाले,  या दिवसाची आठवण म्हणून झेंडावंदन करतात असे गुरुजी सांगायचे.  स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ तेव्हा समजायचाच नाही.  पाहुण्यांनी झेंडावंदन केले की ' जन गण मन.. ' बोलायचे आणि मग पाहुणे भाषण करायचे.  आम्हाला त्यातलं काही समजायचं नाही.  गुरुजींनी टाळ्या वाजवल्या की सर्वांनी टाळ्या वाजवायच्या हे आपोआपच समजलं होतं आम्हाला.  भाषण संपलं की सर्वांना चॉकलेट मिळायचे.  कधी कधी झेंडा सुद्धा मिळायचा.
भारतमाता की जय..
जय जवान, जय किसान..
जय हिंद..
अशा घोषणांनी शाळा दुमदूमून जायची. मिळालेले झेंडे फडकवत आम्ही घरी येऊन आईला सर्व गंमती सांगायचो.  इतर सणांसारखा हा सण घरी का करत नाही,  याची खंत मात्र वाटायची. लवकर घरी जायला मिळालेले असल्याने, बाकीचा दिवस आईची नजर चुकवून जंगलात, शेतांमध्ये भटकंती करायला वाव असायचा.  सगळीकडे कोवळ्या हिरव्या रंगाची उधळण असायची.  शेतात भात, नाचण्या, वरी तरारुन आलेली असायची. दाणे यायला अजून भरपूर वेळ असायचा पण त्या कोवळ्या गवतातून अनवाणी फिरायची मजा औरच होती.  तेव्हा आमच्या गावातली सर्वच माणसं अनवाणी फिरायची.  तालुक्याला जायचे असल्यासच चप्पल बाहेर निघायची. आम्हा मुलांना " सिलपर " मिळायच्या.  बाकी चप्पल आम्हाला माहीतच नसायच्या.  डांबराच्या रस्त्यांचा स्पर्श अजून आमच्या गावांना झालेला नव्हता. त्यामुळे पावसाने भिजलेली ती ओली वाट तुडवताना,  चिखलातून उड्या मारुन जाताना भरपूर धमाल असायची. रान हुंदडून आलो की गावाच्या ' बावी ' वर हात पाय धुवून पोटभर पाणी पिऊन जेवायला घरी.
त्यावेळी आमच्याकडे कोणी श्रावण वगैरे पाळायचे नाहीत.  तिखट लसणाची चटणी आणि भाजलेली बगी हे आमच्यासाठी त्याकाळी फास्ट फूड होते.  टोपलीतली फडक्यात बांधलेली भाकरी स्वतःहून घ्यायची.  तिला डब्यातली चटणी पुर्ण भाकरी भर लावायची आणि मधोमध घडी घालायची.  चार बग्या घेऊन त्या चुलीतल्या निखाऱ्यांवर टाकायच्या, खरपुस भाजल्या की तशाच बाहेर काढून थोड्या थंड होऊन द्यायच्या. मग त्या कुरकुरीत व्हायच्या. मग बोटाच्या पेराएवढे तुकडे पाडून ते अर्ध्या घडीवर व्यवस्थित सगळीकडे पसरवायचे.
अशी ' दुनून ' घेतलेली गरमागरम भाकरी हातात घेऊन पुन्हा गाव फिरायला. त्यातला एखादा तुकडा जमिनीवर पडला तरी,  त्याला आजकालच्या  "किटाणूंचा" स्पर्श सुद्धा व्हायचा नाही.  चड्डीला पुसून तो तुकडा पुन्हा पवित्र व्हायचा.   कधी कधी त्यात सुकट सुद्धा असायची कांद्यात परतवलेली.
" आज नारली पोर्निमा हाय " असं कोणी बोललं की समजायचे की नारळी पोर्णिमा आली.  आम्हाला समुद्र जवळ नसल्याने या सणाला इतके महत्व नसायचे.  तरी पुस्तकातली चित्र बघून वाटायचं की आपल्याकडेही हा सण हवा होता.  होड्या पाण्यात सोडायला आपल्यालाही मिळायला हवं होतं.  मग आम्ही लहान मुलंच हा सण करायचो.  कोणीतरी नारळ आणायचा कागदी होड्या ओढ्यावर सोडल्या जायच्या.  नारळ सुद्धा सोडला जायचा पण तो पुन्हा पकडला जायचा.  मग तो फोडला जायचा.  खोबरं सर्वांना वाटले जायचे. दुसर्‍या दिवशीची राखी पोर्णिमा मात्र धुमधडाक्यात साजरी व्हायची.  मुंबईवरुन बाबांनी पाठवलेल्या गोंड्याच्या रंगीबेरंगी राख्यांचा रंग आमची बहिण अगोदरच ठरवून ठेवायची.  आदल्या रात्री कुंपणावरची मेंदीची पानं जमवायचो.  आई मग त्यात चुना, कात टाकून वाटायची.  अगरबत्तीच्या काडीने त्या मेंदीची मेंदी बहीणीच्या हातावर काढायची. कधी मेंदी नसली तर सकाळी बावीवर जाऊन कातळावर लाल दगड घासून मुली त्या लाल दगडाच्या रंगाच्या मेंदी काढायच्या. दुपारी रक्षाबंधन व्हायचे. बहिणीने राखी बांधली ओवाळले की आईने खिशात ठेवलेले दोन रुपये ओवाळणी म्हणून दिले की मग एकामेकांच्या राख्या दाखवायला मुलं जमत असत.  ज्याचा हातावर जास्त राख्या त्याचा आपोआपच भाव वधारे. पुरणपोळ्या,  गुळपोळी असे गोडधोड असे त्या दिवशी.रक्षाबंधन संपले की वेध लागायचे ते गोकुळाष्टमीचे.
आमच्या गावात या सणाला फारच महत्व.  मुंबईकर सुट्टी काढून दोन दिवसांसाठी येत.  कधी कधी बाबा सुद्धा यायचे. ते आले की मग घराचे गोकूळ व्हायचे.  आदल्या दिवशी उपास करुन,  दिवस कोरा पत्तीचा  काळा चहा पिऊन जात असे गावात चार हंड्या असत.  दुपारी दहीभात खाऊन संध्याकाळी ' गोयंदा '  निघे..  प्रत्येक घरात पाणी घ्यायला जात असू.  त्यादिवशी गोविंदासाठी पाणी खास जास्तच भरुन ठेवलेले असायचे.  काही घरात गरम पाणी सुद्धा ओतले जाई.  एक साखळी बनवून खांद्यावर हात गुंफून..  " गोविंदा रे गोपाळा"  गायलो की ओटीवरुन पाणी ओतले जायचे,  काहींच्या घरात चांदावडीच्या किंवा भेंडीच्या पानावर चिवडा,  लाडू असा नाश्ता असे.  पारंपारिक ढोल, टिमकी, सनईच्या सुरांवर चार थराची हंडी फोडली जायची.  दह्याने भरलेली हंडी फोडली की त्यातले दही खायला झुंबड उडायची. एखादे दह्याचे बोट मिळे. पण तेवढ्यावरच समाधान होई.
नंतर येणारा बैलपोळा.. बैलांची पुजा,  त्यांना पुरणपोळ्या खाऊ घालणे त्यांचे लाड करणे.  हे दिवस सुरेखच होते.  आमच्या स्वतःची भातशेती नव्हती परंतू आईच्या घरचे बैल आमचेच बैल. बैलांची नावे तरी काय.  चेंडू आणि मचिंदर ( मच्छिंद्र ) चेंडू शांत आणि मचिंदर नुसता मारकुटा.  त्या दिवशी आजी गोठा साफ चकाचक करायची, छान सारवायची, कणे काढायची.
पोळा साजरा झाला की जमीनीतले काडू ( गांडूळ ) जमवायला सर्व मुलं जमायचो.  हे काडू तारेत ओवून ती तार काठीला बांधून ' किरवी ' ( नदितले खेकडे) पकडायला जायची मजा काही औरच.  बिळामध्ये काठी टाकली की त्या काडूला खायला बिळातले खेकडे आपोआपच बाहेर यायचे.  मग त्यांना पकडून नदिवरच त्यांचे कालवण करुन खायचो.  प्रत्येकजण घरुन मसाला, मीठ, चटणी, लसूण कांदा घेऊन यायचा.  वेगवेगळ्या घरातले मसाले,  चमचाभर तेल आणि तीन दगडावर मांडलेल्या चुलीवर ते रटरटणारे कालवण आठवले की आजही पाणी सुटतं तोंडाला.  नुसती भुकीचा मसाला  आणि चटणी,  घरुन आणलेली भाकरी.....  आजूबाजूला कोवळा श्रावण मध्येच पावसाची सर आली की झाडाखाली जाऊन बसणे आणि त्यातच बेलीत ( नारळाची करवंटी) रस्सा घेऊन त्यात भिजकी भाकरी बुडवून खाणे..  अहाहा...
घरच्या चुलीवर ही चव कधीही मिळणारच नाही.
श्रावणात रानभाज्यासुद्धा सुंदर सुंदर असतात.  भार्गी,  डिंडा,  टाकळा,  घोळ, शेवगा, अळू, अळंबी, कुर्डू, थरबरा, बाभळी, शेऊळ अशा फक्त पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्या त्यांच्या अफलातून असणाऱ्या चवी आणि बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती.

मध्येच ऊन, मध्येच पाऊस असा खेळ चालू असताना श्रावण उतरणीकडे लागतो... तो उतरणीकडे लागण्याचे ओळखायचे सर्वात सोप्पं म्हणजे रस्त्याच्या बाजूला उगवलेल्या गवताचा रंग.  या वेळी निसर्ग तरुणावस्थेत असतो..  खाली गडद हिरवा रंगाची साडी आणि वर पोपटी रंगाचा ब्लाऊज घातलेल्या तरुणी प्रमाणे....  वेगवेगळ्या पक्षांच्या आवाजात मंजूळ गाणी गाणारा  आणि अशाच सुंदर वातावरणात गणपती आणि भाद्रपदाचे वेध लागतात...

Sunday, 2 October 2016

एक पुस्तक परीक्षण - अर्धी मुंबई


मी काही म्हणजे काहीही वाचतो.  मला लेखक कोण आहे याच्याशी काही पडलेले नसते.  मी फास्ट रिडर असल्याने एखादे पुस्तक वाचायला मला फार कमी वेळ लागतो. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शेजारीच राहत असल्याने पुस्तकांची कमी नाही.

सध्या वाचत असलेले " अर्धी मुंबई " हे पुस्तक मला खुप आवडलं.  हे पुस्तक खरंतर एक लेखमालेचे संकलन आहे.  साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकांतील लेखांचे एकत्रित स्वरुप आहे.
यातली मुख्य गोष्ट की या पुस्तकाला लेखकाचे नाव नाही.  प्रथमदर्शनी जरी सुहास कुलकर्णी हे नाव दिसत असले तरी त्यावर " संपादक " असे स्पष्ट लिहिलेले  दिसते.

" भाकरीचा चतकोर चंद्र
   मिळवता मिळवता,
   ज्यांना सुखाचे चार क्षण
   उपभोगायला मिळाले नाहीत,
   अशा मुंबईकरांना "

समर्पित केलेल्या या पुस्तकाला थोर साहित्यिक विजय तेंडुलकर यांची प्रस्तावना लाभली आहे. मी वाचताना जनरली प्रस्तावना आणि लेखकाचे मनोगत वाचत नाही.  पण या पुस्तकाचे वाचले. हे संकलन का केले गेले यावर त्यात लिहिले आहे.  बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत उसळलेली दंगल आणि मुंबई सुरक्षित आहे या भावनेला लागलेली ठेच यातून नेमकी ही मुंबई आहे कशी यासाठी मुंबईचा कोपरा कोपरा काही शोधक पत्रकारांच्या परिश्रमातून निघालेले हे पुस्तक आहे.  हे पुस्तक म्हणजे मुंबईचे चित्रण किंवा वर्णन आहे असे म्हणायला गेलो तर ते चुकीचं ठरेल कारण यात मुंबईच्या सुरुवातीपासूनच्या इतिहासापासून मुंबईतल्या गरीब,  कष्टकरी,  बदनाम वस्त्यांची माहीती आणि तिथले जीवन स्पष्ट दाखवले गेले आहे.  मुंबई म्हटले की कधीही न थांबणारे शहर असे वर्णन केले जाते परंतू या प्रखर उजेडाखाली जो अंधार आहे तो काहीअंशी या पुस्तकाने दाखवला आहे.
भेंडीबाजार,  धारावी,  गिरणगाव, आग्रीपाडा, बहिष्कृत महानगर,  मुंबईचे समुद्रपुत्र,  बंबईया भैया आणि कामाठीपुरा अशा आठ भागात हे पुस्तक विभागलेले आहे.
मी स्वतः भुलेश्वर बद्दल लिहीत असतानाच हे पुस्तक माझ्या हातात आले. अर्थात तेव्हाच लक्षात आलं की शोधपत्रकार म्हणजे काय चिज असते ते. मुंबईबद्दल विचार करताना फोर्ट, गिरगाव, दादर या भागांबद्दल सहसा लिखाण होते. ही  प्रत्यक्षात उच्चभ्रूवर्गाकडे जाणारी ठिकाणे असल्याने मुंबईची खरी माहीती लोकांसमोर येतच नाही.

असाच पहिला लेख आहे तो " भेंडीबाजार.. मिनी पाकिस्तानचा शोध ".

मुस्लिमबहूल असलेल्या याभागाचे वर्णन करताना तिथल्या वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या परंतू मुस्लिम धर्माच्याच लोकांचे जीवन,  त्यांचे रोजचे व्यवहार त्यांचे आर्थिक स्तर उलगडून दाखवले आहेत.  शोरबाजार चा झालेला चोरबाजार मदनपूरा,  बोहरी मोहल्ला इतर भागांचे यथार्थ वर्णन केलेले आहे.  तिथल्या लोकांचे प्रश्न,  जगण्यासाठी केलेली धावपळ,  धर्मासाठीची त्यांची आस्था, त्यांच्या बोलण्याच्या लकबी आणि दंगलीपुर्व आणि दंगलीनंतरची परिस्थिति याचेही चित्रण अप्रतिम मांडले आहे.  अनेक गैरसमज आपण या भागाबद्दल बाळगून आहोत याची जाणीव आपल्याला आपसुकच होते.

दुसऱ्या भागात " धारावी..  अक्राळविक्राळ झोपडपट्टीचा रोजच्या जगण्याशी झगडा "

या प्रकरणात आशियातल्या या सर्वात मोठ्या झोपडपट्टीची सर्वंकष माहीती दिली आहे.  डंपिंग ग्राउंड ची झालेली जमिन आणि तिथे वाढत गेलेली झोपडपट्टी तिथे होणारी मासेमारी आणि मग नंतर आलेली रासायनिक कारखान्यांमुळे बदललेले संपुर्ण चित्र याचे वर्णन वाचताना धारावी डोळ्यासमोर उभी राहते. कोळी लोक, त्यांची मासेमारी बुडाल्यामुळे दारुविक्रीकडे झालेली ओढ, नंतर पुढे झालेले धर्मांतरण.  मूळ कोळीवाड्यापासून कचऱ्याच्या ढिगावर वसत गेलेली वस्ती, वाढत गेलेली लब्बाई मुस्लिम आणि त्यांच्यामुळे तिथे नव्याने सुरु झालेला चामड्याचा उद्योग याचे वर्णन,  स्थलांतरीत मुस्लिम तसेच तामिळनाडूतले लोक,  महाराष्ट्रातले ढोर, चांभार हे कामाच्या गरजेसाठी या वस्तीत कसे आले याची माहिती.  चामड्यानंतर  केला जाणारा गारमेंटचा व्यवसाय, मोठमोठ्या ब्रँडचे शर्ट इथे कवडीमोलात कसे बनवून दिले जातात याची माहीती. त्याचबरोबर आत्ताची परिस्थितिही वर्णन केली आहे.

तिसऱ्या भागात " गिरणगाव..  कष्टकऱ्यांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक खच्चीकरणाचे वास्तव "

मुंबईच्या गिरणगावातली संस्कृती गिरणी उद्योग त्याबरोबर आलेली या विभागातली रोजंदारी,  त्यांच्या करमणूकीसाठीची सुरु झालेली तमाशा शाहीरी यांची सांस्कृतिक मंडळे आणि मग बंद झालेल्या गिरण्या त्यानंतर झालेले लोकांचे हाल, वाढलेली गुन्हेगारी तरीही कधीतरी आपल्याला न्याय मिळेल या आशेवर अजूनही जगणारा कामगार वर्ग अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटला आहे.

चौथ्या भागात " आग्रीपाडा..  भाईगिरी आणि राडेबाजीच्या विस्फोटाचा नमुना "

आग्रीपाडा आणि भायखळ्यातल्या भाईगिरीच्या फॅक्टरीबद्दल वर्णन आहे.  दाऊद इब्राहिम , अरुण गवळी, रमा नाईक अशा गुन्हेगारी विश्वाची ओळख असलेल्या लोकांची सुरुवात इथून झाली आहे.  मूळ कामगार वस्ती असलेल्या याभागाचे गिरणीसंपांनंतर झालेले गुन्हेगारीकरण आणि मग सुरु झालेले गँगवार आणि शेवटी पोलिसांनी केलेले एनकाउंटर असा प्रवास सुरेख मांडला आहे.  दगडी चाळ,  तिथल्या जीवनाचे आकर्षण,  दंगलीनंतर या भागात झालेले बदल,  हिंदू -मुस्लिम समाज एकत्र राहत असताना काही दिवसांतच बदललेले वातावरण,  मदनपुरातला गारमेंटचा व्यवसाय,  पोलिसांच्या धाडी,  असे यथार्थ वर्णन केलेले आहे.

पाचवा विभाग " बहिष्कृत महानगर..  जगण्याच्या कडेलोटावर उभी दलितांची छावणी "

घाटकोपर च्या रमाबाई आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, कामराज नगर, महात्मा फुले नगर, गौतमनगर, भीमनगर अशा वस्त्यांची आणि त्यात वसणाऱ्या दलित समाजाची माहीती या भागात आहे. पावसाळ्यात पाण्यामुळे विस्थापित झालेले नवबौद्ध आणि मग ट्रांझिट कँप ते झोपडपट्टी अशी खाडीच्या भागावरच सुरु झालेले जीवन. शिक्षणाचा अभाव,  वाढलेली व्यसनाधीनता,  अस्वच्छता भयंकर प्रदुषण  आणि त्यामुळे आलेली रोगराई असे अनेक प्रश्न,  बाबासाहेबांच्या " खेडी सोडा शहरात चला " या संदेशावर मुंबई जवळ केलेल्या आणि ७२ च्या दुष्काळानंतर मुंबईत आसरा घेतलेल्या लोकांसमोर आलेले प्रश्न, संधी त्याचबरोबर  परस्परविरोधी विचारधारा असुनही साजरे केले जाणारे हिंदू सण. त्याच बरोबर प्रत्येक तरुणाच्या तोंडात असणारे " मी समाजसेवक आहे " हे वाक्य.  या वस्त्यांमध्ये मुंबईचा स्वच्छता कर्मचारी आहे हे सांगताना,  खेड्यांमधले बहिष्कृत जीवन सोडून शहरांकडे सन्मानासाठी आलेल्या या समाजाचे आयुष्य या मुंबई शहराने सुद्धा गावाप्रमाणेच वेशी बाहेरच ठेवलंय हे वाचताना खुप वाईट वाटतं.  रमाबाई आंबेडकर नगरामधली पुतळा विटंबनेनंतरची परिस्थिति, दंगल या गोष्टी टाळून तिथले रोजचे जगणे, स्त्रियांची परिस्थिती,  तरुणांची होरपळ इत्यादिंवर प्रकाश टाकला आहे.

सहाव्या भागात " मुंबईचे समुद्रपुत्र...  किनाऱ्याच्या सांदिकोपऱ्यात फेकला गेला दर्याचा राजा "

मुंबईचा मुळ निवासी असलेल्या कोळी समाजाबद्दल आणि त्यांच्या वस्त्यांबद्दल लिहिलेले आहे.  या समुद्रपुत्रांच्या गळ्याला नख लावून कसे मुंबई शहर उभे राहिले.  मुंबई नाव येण्यापुर्वीचे सात बेटांचे राजे असणाऱ्या कोळी समाजाचे अस्तित्व आता केवळ कुलाबा, वरळी, खारदांडा, जुहूतारा, वर्सोवा, मढ या कोळीवाड्यांमध्येच राहीले  आहे.  पंचतारांकीत हॉटेलांच्या जोडीने हे कोळीवाडे आहेत. समुद्राच्या लाटेला बेधडकपणे सामोरी जाणारा  शहरीकरणाच्या लाटेखाली पार दबून गेला आहे.  त्यांचे अस्तित्व अगदी किनाऱ्यालगतच राहीले आले.  सोनकोळी असलेला हा समाजात नंतर कसा धर्म बदल झाला याचेही वर्णन यात आहे.  पुरुषांनी मासेमारी करावी आणि स्त्रियांनी विक्री हा रिवाज अनेक वर्ष तसाच सुरु आहे. व्यवसायातले नाखवा चे आणि  पाटीलाचे गावगाड्यातले स्थान,  नारळी पोर्णिमा आणि जातीतच सोडवले जाणारे सामाजिक प्रश्न, भांडणे असे विषय छान हाताळले आहेत. ट्रॉलर च्या यांत्रिक मासेमारीमुळे परंपरागत मासेमारीच्या धंद्यावर एकूणच झालेला परिणाम,  राजकारणातली त्यांची उदासिनता यासोबत परंपराच्या जाळ्यात अडकलेल्या "या दर्याच्या राजाने दर्यावरची सत्ता तर घालवली आता मालकीच्या जागेवर तो शिल्लक राहील का " हे वाचताना खुप वाईट वाटतं.

सातवा भाग " बंबईया भैया.. यूपी से बंबई स्थलांतरितांचा सिलसिला "

हे प्रकरण भरपूर माहीती देते.  भैया या माणसाबद्दल मराठी मुंबईकरांना जेवढे प्रेम आहे तेवढाच त्यांचा द्वेष करताना ते दिसतात.  मुळात हे यूपी सोडून मुंबईत का आले त्याचेही कारण इथे सापडते.  ब्रिटिशांनी कपडे धुण्यासाठी युपीवरुन यांना आणले असा ऐतिहासिक उल्लेख आहे,  त्यानंतर १८५७ चा उठाव फसल्यावर हे उत्तरेकडील हिंदू मुस्लिम सैनिक दक्षिण भारताकडे सरकले.  या भैयांनी मुंबईत मिळेल तिथे तंबू ठोकले.  मुंबईत तबले आणायचे काम या लोकांनी केले.  सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी हे तबले नंतर मुख्य मुंबईच्या बाहेर म्हणजे गोरेगाव,  आरे कॉलनीच्या आजूबाजूला गेले.  नंतर या जागांवर बिल्डर लॉबीची नजर गेल्यावर तिथून त्यांना हूसकावणे सुरु झालंय.  परंतू काम करण्याची अमानवी शक्ती आणि कोणतेही काम करण्याची मनापासूनची तयारी मुळे या लोकांनी कधीही उपाशी ठेवलेले नाही. भेळ, चणे विकून दुकान मालक होण्याचा मेहनतीचा प्रवास यांच्याकडे असतो.  साहित्य आणि यूपीचे जुने नाते ते मुंबईतही जपून राहीले,  अनेक पत्रकार युपी कर आहेत. युपीत प्रकर्षाने दिसणारी जातीयता ते इथेही पाळतात. मुंबईच्या राजकारणातही  त्यांचे मोठे योगदान आहे.
महिना ३०० करोड ( २००० साली)  युपीत पाठविले जातात यावरुन यांच्या अर्थकारणाचा अंदाज येतो.  प्रत्येक दहा माणसांमागे तीन उत्तरप्रदेशीय भैये आहेत आहेत त्याचे कारणही मोठे राज्य आणि भरपूर लोकसंख्या, पूर, धूप आणि क्षारयुक्त जमीन यामुळे हे हिंदू - मुस्लिम भैये मुंबईचा रस्ता पकडतात.
अशी परिपूर्ण माहीती या भागात आहे.  त्यात मुंबईकर भैयांची एकुण परिस्थिती,  कामाचे स्वरुप,  साहित्य,  राजकारण या सर्व पैलूंना स्पर्श करणारा हा भाग आहे.

आठवा आणि अखेर चा भाग " कामाठीपुरा..  शोषणाचे क्रुरचक्र रोज फिरवणारे मैथूनयंत्र "

मुंबईची अधिकृत वेश्यावस्ती,  शरीराची भुक भागवणारे ठिकाण अशी ओळख असणाऱ्या या परिसराचा धुंडोळा या भागात मांडला आहे.  रोजची अंदाजे एक कोटीहुन जास्त उलाढाल असलेल्या या बहिष्कृत भागाचे वर्णन करताना त्यातील अंधाऱ्या गल्लीबोळात फिरताना फार वाईट वाटतं.  सतत काम करणाऱ्या तेलगू लोकांमुळे कामाठीपुरा नाव पडलेल्या या परिसरात वेश्याव्यवसायाची सुरुवातही त्याच लोकांपासून झाली.  त्यांनीच फोरास रोड, फॉकलंड रोड या भागात ही वस्ती वाढवली.
कामाठीपुऱ्यात बाकीचे व्यवहार होतात हे अनेकजणांना माहीतही नाही.  इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट चा मोठा बाजार इथे चालतो.  वेश्याव्यवसाय चालणाऱ्या इतरही जवळच्या भागांचे वर्णन तिथे आहे.  कामाठीपुरा आणि फॉकलंड मधला मोठा फरकही त्यात दर्शवला आहे.
अगदी तपशील फार देणे इथे उचित नाही पण पन्नास रुपयापासून शरीराची भुक भागवायला येणारा मजूरवर्ग ते  वीस वीस हजार रुपये मोजून कोवळ्या मुलीची मागणी करणारा धनिक वर्ग इथे येतो यातच यांचे जीवन कीती भयानक आहे त्याची कल्पना येते.  नाही म्हणायची मुभा फारच कमी.  संध्याकाळी सुरु होणारी मैथूनाची मेहफील पहाटे तीन चार पर्यंत चालते.  एक मुलगी एका रात्रीत दहा बारा पुरुषांसोबत संबंध होऊन दोनशे तीनशे कमवते.  पोलिसांनी कितीही मारलं तरी न रडणारी या मुली इतक्या पराकोटीच्या निबर बनलेल्या असतात यावरुन या व्यवसायात येण्यापुर्वी त्यांच्यावर किती अत्याचार झालेले असतात याची कल्पना येते.  पुढे जाऊन नाईट लाईफ वरही हा लेख प्रकाश टाकतो.  डांस बार, स्ट्रिप्टिज बार,  कॉलगर्ल ही मुंबईची काळी बाजूही मांडली आहे.  एडस् च्या भारतातील शिरकाव्यानंतर या वस्त्यांकडे संशयाने पाहीले गेले.  त्यानंतर अक्षरशः या मुलींची उपासमार झाली.  परंतू नंतर पुन्हा सुरक्षित साधने वापरुन पुन्हा हा व्यवसाय पसरला.  तरीही पुर्वी जी संख्या होती ती विलक्षण कमी झाली आहे.
या वेश्याप्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही हे मात्र प्रकर्षाने लिहिलेले आहे सरकार,  संस्था,  पोलिस, आरोग्य खाते हे आहे त्याच जागी राहून खिंड लढवत आहे,  परंतू पुढे सरकायला कोणीही तयार नाही.
"एकूणच स्त्री - पुरुषाच्या मैथुनाच्या गरजेतून निर्माण झालेलं विश्व भंजाळून टाकणारे आहे. "

या नोटवर हे पुस्तक संपते..

पण अर्ध्या मुंबईची सफर करताना अनेक माहीत नसलेल्या गोष्टी त्यांच्या सुरवातीपासून माहीती करुन देते हे पुस्तक.
मॅजेस्टिक प्रकाशनने छापलेलं हे पुस्तक मुंबईची एक वेगळी बाजू दाखवते हे मात्र नक्की..