Sunday, 9 October 2016

सर श्रावणाची

सर श्रावणाची


दुपारी रेडीओवर गाणी ऐकत असताना,  एक गाणं सुरु झालं...
" भुईवर आली सर..
        सर श्रावणाची...  "
सुंदर गीत...
मी गाणं ऐकता ऐकता जुन्या आठवणीत रमलो.
शहरात राहत असल्याने,  अनेक वर्ष गावाकडचा श्रावण पहायलाच मिळाला नाही.  इकडे शहरात श्रावण हा फक्त कॅलेंडरवरुन नाहीतर लोकांच्या तोंडून " माझा  श्रावण आहे " अशी वाक्य ऐकूनच संपतो.
परंतू गावी असताना हाच श्रावण भरगच्च हिरवळीने आणि सणासुदींनी भरलेला असायचा.
आषाढ महिन्यातले जोरदार पावसाचे दिवस संपले, शेतीची नांगरणी, लावणी वगैरे कामे आटपली की गावी श्रावण यायचा.

"हासरा नाचरा...
      जरासा लाजरा...
           सुंदर साजरा...
               श्रावण आला...  "

हे गाणं जरी नंतर ऐकलं असलं तरी हेच भाव त्यावेळी आमच्या मनात असायचे.
आमच्या गावची शाळा ओढ्याच्या पार होती.  लहान साकव होता.  पण आम्ही मुलं साकवाऐवजी पाण्यातूनच जायचो.  पाऊस जोरात नसल्याने ओढ्याच्या पाण्यातून जाण्याची एक वेगळीच मजा असायची. थंडगार पाण्याची शिरशिरी अंगातून जायची.  त्या पाण्यातून सोडलेल्या अनेक होड्या... काही तरंगलेल्या तर काही तिथेच बुडलेल्या.  तर काही दगडाला अडकून भरपूर वेळ तशाच राहिलेल्या. शाळेची घंटा वाजली की तो खेळ अर्धा सोडून जावे लागायचे.  मधली सुट्टी झाली की पुन्हा त्या अडकलेल्या होड्या दिसतील अशी भाबडी आशा घेऊन पुन्हा ओढ्यावर यायचो आम्ही..  पण नसायच्या होड्या.  दुसर्‍या दिवशी नविन होड्या.  हा खेळ ओढ्याचे पाणी आटेपर्यंत चालायचा.

नागपंचमीला नागाला दुध घेऊन जायची भरपूर इच्छा असायची पण आमच्याकडे गायी नव्हत्या.  दोन बैल तेही आई-आजोबांचे. आई सुद्धा इकडून तिकडून दुध मागूनच न्यायची. तीन बाजूला डोंगर आणि चौथ्या डोंगरावर आमचे गाव.  समोरच्या डोंगरावर वडाचे एक झाड आहे. त्याच्या खाली वारुळे असायची.  तिथे हा नागपंचमीचा सण साजरा व्हायचा.  अगदीच काही चित्रपटात दाखवतात तसा नाही.  पण पानाच्या खोऱ्यात दुध ठेवायच्या,  वारुळाभोवती अगरबत्ती वगैरे लावायच्या, नागाला नमस्कार करायचा.. संपला सण.
लहान मुलांना कधी गुळ - कुरमुरे तरी कधी साखर - खोबरे मिळायचे. आजच्या हजारो रुपयाच्या मिठाईला ती चव कधीही येणार नाही.  नागपंचमीला नाग मात्र  कधीच दिसायचा नाही.  घरी मात्र तेव्हा गोडधोड व्हायचे.  नारळाच्या करंज्या,  पानमोडे, गुळासोबत घावने अशी मेजवानी असायची.  आम्ही लहान मुलं..  " नागाला दुध..  नागाला दुध " असं ओरडत फिरायचो.  नागपंचमीच्या निमित्ताने प्रत्येक घर सारवले जायचे. कणे काढले जायचे.  आता मात्र सर्व घरात लाद्या लागल्यात.  स्टिकरची रांगोळी पाहताना कसंनुसं वाटतं.
नंतर आमच्याकडे येणारा सण म्हणजे पंधरा ऑगस्ट म्हणजे झेंडावंदन..
 गुरुजी आदल्या दिवशीच सांगायचे,  की कपडे चांगले घालून या,  तेल फणी करुन या.  पाहुणे कोण येणार याच्यावर शाळेची साफ सफाई,  सारवण वगैरे गोष्टी अवलंबून असायच्या.
आदल्या दिवशीच याची तयारी सुरु व्हायची.  हा देशाचा सण आहे असे गुरुजी सांगायचे. १५ ऑगस्ट, १९४७  या दिवशी स्वातंत्र्य मिळाले,  या दिवसाची आठवण म्हणून झेंडावंदन करतात असे गुरुजी सांगायचे.  स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ तेव्हा समजायचाच नाही.  पाहुण्यांनी झेंडावंदन केले की ' जन गण मन.. ' बोलायचे आणि मग पाहुणे भाषण करायचे.  आम्हाला त्यातलं काही समजायचं नाही.  गुरुजींनी टाळ्या वाजवल्या की सर्वांनी टाळ्या वाजवायच्या हे आपोआपच समजलं होतं आम्हाला.  भाषण संपलं की सर्वांना चॉकलेट मिळायचे.  कधी कधी झेंडा सुद्धा मिळायचा.
भारतमाता की जय..
जय जवान, जय किसान..
जय हिंद..
अशा घोषणांनी शाळा दुमदूमून जायची. मिळालेले झेंडे फडकवत आम्ही घरी येऊन आईला सर्व गंमती सांगायचो.  इतर सणांसारखा हा सण घरी का करत नाही,  याची खंत मात्र वाटायची. लवकर घरी जायला मिळालेले असल्याने, बाकीचा दिवस आईची नजर चुकवून जंगलात, शेतांमध्ये भटकंती करायला वाव असायचा.  सगळीकडे कोवळ्या हिरव्या रंगाची उधळण असायची.  शेतात भात, नाचण्या, वरी तरारुन आलेली असायची. दाणे यायला अजून भरपूर वेळ असायचा पण त्या कोवळ्या गवतातून अनवाणी फिरायची मजा औरच होती.  तेव्हा आमच्या गावातली सर्वच माणसं अनवाणी फिरायची.  तालुक्याला जायचे असल्यासच चप्पल बाहेर निघायची. आम्हा मुलांना " सिलपर " मिळायच्या.  बाकी चप्पल आम्हाला माहीतच नसायच्या.  डांबराच्या रस्त्यांचा स्पर्श अजून आमच्या गावांना झालेला नव्हता. त्यामुळे पावसाने भिजलेली ती ओली वाट तुडवताना,  चिखलातून उड्या मारुन जाताना भरपूर धमाल असायची. रान हुंदडून आलो की गावाच्या ' बावी ' वर हात पाय धुवून पोटभर पाणी पिऊन जेवायला घरी.
त्यावेळी आमच्याकडे कोणी श्रावण वगैरे पाळायचे नाहीत.  तिखट लसणाची चटणी आणि भाजलेली बगी हे आमच्यासाठी त्याकाळी फास्ट फूड होते.  टोपलीतली फडक्यात बांधलेली भाकरी स्वतःहून घ्यायची.  तिला डब्यातली चटणी पुर्ण भाकरी भर लावायची आणि मधोमध घडी घालायची.  चार बग्या घेऊन त्या चुलीतल्या निखाऱ्यांवर टाकायच्या, खरपुस भाजल्या की तशाच बाहेर काढून थोड्या थंड होऊन द्यायच्या. मग त्या कुरकुरीत व्हायच्या. मग बोटाच्या पेराएवढे तुकडे पाडून ते अर्ध्या घडीवर व्यवस्थित सगळीकडे पसरवायचे.
अशी ' दुनून ' घेतलेली गरमागरम भाकरी हातात घेऊन पुन्हा गाव फिरायला. त्यातला एखादा तुकडा जमिनीवर पडला तरी,  त्याला आजकालच्या  "किटाणूंचा" स्पर्श सुद्धा व्हायचा नाही.  चड्डीला पुसून तो तुकडा पुन्हा पवित्र व्हायचा.   कधी कधी त्यात सुकट सुद्धा असायची कांद्यात परतवलेली.
" आज नारली पोर्निमा हाय " असं कोणी बोललं की समजायचे की नारळी पोर्णिमा आली.  आम्हाला समुद्र जवळ नसल्याने या सणाला इतके महत्व नसायचे.  तरी पुस्तकातली चित्र बघून वाटायचं की आपल्याकडेही हा सण हवा होता.  होड्या पाण्यात सोडायला आपल्यालाही मिळायला हवं होतं.  मग आम्ही लहान मुलंच हा सण करायचो.  कोणीतरी नारळ आणायचा कागदी होड्या ओढ्यावर सोडल्या जायच्या.  नारळ सुद्धा सोडला जायचा पण तो पुन्हा पकडला जायचा.  मग तो फोडला जायचा.  खोबरं सर्वांना वाटले जायचे. दुसर्‍या दिवशीची राखी पोर्णिमा मात्र धुमधडाक्यात साजरी व्हायची.  मुंबईवरुन बाबांनी पाठवलेल्या गोंड्याच्या रंगीबेरंगी राख्यांचा रंग आमची बहिण अगोदरच ठरवून ठेवायची.  आदल्या रात्री कुंपणावरची मेंदीची पानं जमवायचो.  आई मग त्यात चुना, कात टाकून वाटायची.  अगरबत्तीच्या काडीने त्या मेंदीची मेंदी बहीणीच्या हातावर काढायची. कधी मेंदी नसली तर सकाळी बावीवर जाऊन कातळावर लाल दगड घासून मुली त्या लाल दगडाच्या रंगाच्या मेंदी काढायच्या. दुपारी रक्षाबंधन व्हायचे. बहिणीने राखी बांधली ओवाळले की आईने खिशात ठेवलेले दोन रुपये ओवाळणी म्हणून दिले की मग एकामेकांच्या राख्या दाखवायला मुलं जमत असत.  ज्याचा हातावर जास्त राख्या त्याचा आपोआपच भाव वधारे. पुरणपोळ्या,  गुळपोळी असे गोडधोड असे त्या दिवशी.रक्षाबंधन संपले की वेध लागायचे ते गोकुळाष्टमीचे.
आमच्या गावात या सणाला फारच महत्व.  मुंबईकर सुट्टी काढून दोन दिवसांसाठी येत.  कधी कधी बाबा सुद्धा यायचे. ते आले की मग घराचे गोकूळ व्हायचे.  आदल्या दिवशी उपास करुन,  दिवस कोरा पत्तीचा  काळा चहा पिऊन जात असे गावात चार हंड्या असत.  दुपारी दहीभात खाऊन संध्याकाळी ' गोयंदा '  निघे..  प्रत्येक घरात पाणी घ्यायला जात असू.  त्यादिवशी गोविंदासाठी पाणी खास जास्तच भरुन ठेवलेले असायचे.  काही घरात गरम पाणी सुद्धा ओतले जाई.  एक साखळी बनवून खांद्यावर हात गुंफून..  " गोविंदा रे गोपाळा"  गायलो की ओटीवरुन पाणी ओतले जायचे,  काहींच्या घरात चांदावडीच्या किंवा भेंडीच्या पानावर चिवडा,  लाडू असा नाश्ता असे.  पारंपारिक ढोल, टिमकी, सनईच्या सुरांवर चार थराची हंडी फोडली जायची.  दह्याने भरलेली हंडी फोडली की त्यातले दही खायला झुंबड उडायची. एखादे दह्याचे बोट मिळे. पण तेवढ्यावरच समाधान होई.
नंतर येणारा बैलपोळा.. बैलांची पुजा,  त्यांना पुरणपोळ्या खाऊ घालणे त्यांचे लाड करणे.  हे दिवस सुरेखच होते.  आमच्या स्वतःची भातशेती नव्हती परंतू आईच्या घरचे बैल आमचेच बैल. बैलांची नावे तरी काय.  चेंडू आणि मचिंदर ( मच्छिंद्र ) चेंडू शांत आणि मचिंदर नुसता मारकुटा.  त्या दिवशी आजी गोठा साफ चकाचक करायची, छान सारवायची, कणे काढायची.
पोळा साजरा झाला की जमीनीतले काडू ( गांडूळ ) जमवायला सर्व मुलं जमायचो.  हे काडू तारेत ओवून ती तार काठीला बांधून ' किरवी ' ( नदितले खेकडे) पकडायला जायची मजा काही औरच.  बिळामध्ये काठी टाकली की त्या काडूला खायला बिळातले खेकडे आपोआपच बाहेर यायचे.  मग त्यांना पकडून नदिवरच त्यांचे कालवण करुन खायचो.  प्रत्येकजण घरुन मसाला, मीठ, चटणी, लसूण कांदा घेऊन यायचा.  वेगवेगळ्या घरातले मसाले,  चमचाभर तेल आणि तीन दगडावर मांडलेल्या चुलीवर ते रटरटणारे कालवण आठवले की आजही पाणी सुटतं तोंडाला.  नुसती भुकीचा मसाला  आणि चटणी,  घरुन आणलेली भाकरी.....  आजूबाजूला कोवळा श्रावण मध्येच पावसाची सर आली की झाडाखाली जाऊन बसणे आणि त्यातच बेलीत ( नारळाची करवंटी) रस्सा घेऊन त्यात भिजकी भाकरी बुडवून खाणे..  अहाहा...
घरच्या चुलीवर ही चव कधीही मिळणारच नाही.
श्रावणात रानभाज्यासुद्धा सुंदर सुंदर असतात.  भार्गी,  डिंडा,  टाकळा,  घोळ, शेवगा, अळू, अळंबी, कुर्डू, थरबरा, बाभळी, शेऊळ अशा फक्त पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्या त्यांच्या अफलातून असणाऱ्या चवी आणि बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती.

मध्येच ऊन, मध्येच पाऊस असा खेळ चालू असताना श्रावण उतरणीकडे लागतो... तो उतरणीकडे लागण्याचे ओळखायचे सर्वात सोप्पं म्हणजे रस्त्याच्या बाजूला उगवलेल्या गवताचा रंग.  या वेळी निसर्ग तरुणावस्थेत असतो..  खाली गडद हिरवा रंगाची साडी आणि वर पोपटी रंगाचा ब्लाऊज घातलेल्या तरुणी प्रमाणे....  वेगवेगळ्या पक्षांच्या आवाजात मंजूळ गाणी गाणारा  आणि अशाच सुंदर वातावरणात गणपती आणि भाद्रपदाचे वेध लागतात...

No comments:

Post a Comment