मी काही म्हणजे काहीही वाचतो. मला लेखक कोण आहे याच्याशी काही पडलेले नसते. मी फास्ट रिडर असल्याने एखादे पुस्तक वाचायला मला फार कमी वेळ लागतो. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शेजारीच राहत असल्याने पुस्तकांची कमी नाही.
सध्या वाचत असलेले " अर्धी मुंबई " हे पुस्तक मला खुप आवडलं. हे पुस्तक खरंतर एक लेखमालेचे संकलन आहे. साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकांतील लेखांचे एकत्रित स्वरुप आहे.
यातली मुख्य गोष्ट की या पुस्तकाला लेखकाचे नाव नाही. प्रथमदर्शनी जरी सुहास कुलकर्णी हे नाव दिसत असले तरी त्यावर " संपादक " असे स्पष्ट लिहिलेले दिसते.
" भाकरीचा चतकोर चंद्र
मिळवता मिळवता,
ज्यांना सुखाचे चार क्षण
उपभोगायला मिळाले नाहीत,
अशा मुंबईकरांना "
समर्पित केलेल्या या पुस्तकाला थोर साहित्यिक विजय तेंडुलकर यांची प्रस्तावना लाभली आहे. मी वाचताना जनरली प्रस्तावना आणि लेखकाचे मनोगत वाचत नाही. पण या पुस्तकाचे वाचले. हे संकलन का केले गेले यावर त्यात लिहिले आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत उसळलेली दंगल आणि मुंबई सुरक्षित आहे या भावनेला लागलेली ठेच यातून नेमकी ही मुंबई आहे कशी यासाठी मुंबईचा कोपरा कोपरा काही शोधक पत्रकारांच्या परिश्रमातून निघालेले हे पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे मुंबईचे चित्रण किंवा वर्णन आहे असे म्हणायला गेलो तर ते चुकीचं ठरेल कारण यात मुंबईच्या सुरुवातीपासूनच्या इतिहासापासून मुंबईतल्या गरीब, कष्टकरी, बदनाम वस्त्यांची माहीती आणि तिथले जीवन स्पष्ट दाखवले गेले आहे. मुंबई म्हटले की कधीही न थांबणारे शहर असे वर्णन केले जाते परंतू या प्रखर उजेडाखाली जो अंधार आहे तो काहीअंशी या पुस्तकाने दाखवला आहे.
भेंडीबाजार, धारावी, गिरणगाव, आग्रीपाडा, बहिष्कृत महानगर, मुंबईचे समुद्रपुत्र, बंबईया भैया आणि कामाठीपुरा अशा आठ भागात हे पुस्तक विभागलेले आहे.
मी स्वतः भुलेश्वर बद्दल लिहीत असतानाच हे पुस्तक माझ्या हातात आले. अर्थात तेव्हाच लक्षात आलं की शोधपत्रकार म्हणजे काय चिज असते ते. मुंबईबद्दल विचार करताना फोर्ट, गिरगाव, दादर या भागांबद्दल सहसा लिखाण होते. ही प्रत्यक्षात उच्चभ्रूवर्गाकडे जाणारी ठिकाणे असल्याने मुंबईची खरी माहीती लोकांसमोर येतच नाही.
असाच पहिला लेख आहे तो " भेंडीबाजार.. मिनी पाकिस्तानचा शोध ".
मुस्लिमबहूल असलेल्या याभागाचे वर्णन करताना तिथल्या वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या परंतू मुस्लिम धर्माच्याच लोकांचे जीवन, त्यांचे रोजचे व्यवहार त्यांचे आर्थिक स्तर उलगडून दाखवले आहेत. शोरबाजार चा झालेला चोरबाजार मदनपूरा, बोहरी मोहल्ला इतर भागांचे यथार्थ वर्णन केलेले आहे. तिथल्या लोकांचे प्रश्न, जगण्यासाठी केलेली धावपळ, धर्मासाठीची त्यांची आस्था, त्यांच्या बोलण्याच्या लकबी आणि दंगलीपुर्व आणि दंगलीनंतरची परिस्थिति याचेही चित्रण अप्रतिम मांडले आहे. अनेक गैरसमज आपण या भागाबद्दल बाळगून आहोत याची जाणीव आपल्याला आपसुकच होते.
दुसऱ्या भागात " धारावी.. अक्राळविक्राळ झोपडपट्टीचा रोजच्या जगण्याशी झगडा "
या प्रकरणात आशियातल्या या सर्वात मोठ्या झोपडपट्टीची सर्वंकष माहीती दिली आहे. डंपिंग ग्राउंड ची झालेली जमिन आणि तिथे वाढत गेलेली झोपडपट्टी तिथे होणारी मासेमारी आणि मग नंतर आलेली रासायनिक कारखान्यांमुळे बदललेले संपुर्ण चित्र याचे वर्णन वाचताना धारावी डोळ्यासमोर उभी राहते. कोळी लोक, त्यांची मासेमारी बुडाल्यामुळे दारुविक्रीकडे झालेली ओढ, नंतर पुढे झालेले धर्मांतरण. मूळ कोळीवाड्यापासून कचऱ्याच्या ढिगावर वसत गेलेली वस्ती, वाढत गेलेली लब्बाई मुस्लिम आणि त्यांच्यामुळे तिथे नव्याने सुरु झालेला चामड्याचा उद्योग याचे वर्णन, स्थलांतरीत मुस्लिम तसेच तामिळनाडूतले लोक, महाराष्ट्रातले ढोर, चांभार हे कामाच्या गरजेसाठी या वस्तीत कसे आले याची माहिती. चामड्यानंतर केला जाणारा गारमेंटचा व्यवसाय, मोठमोठ्या ब्रँडचे शर्ट इथे कवडीमोलात कसे बनवून दिले जातात याची माहीती. त्याचबरोबर आत्ताची परिस्थितिही वर्णन केली आहे.
तिसऱ्या भागात " गिरणगाव.. कष्टकऱ्यांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक खच्चीकरणाचे वास्तव "
मुंबईच्या गिरणगावातली संस्कृती गिरणी उद्योग त्याबरोबर आलेली या विभागातली रोजंदारी, त्यांच्या करमणूकीसाठीची सुरु झालेली तमाशा शाहीरी यांची सांस्कृतिक मंडळे आणि मग बंद झालेल्या गिरण्या त्यानंतर झालेले लोकांचे हाल, वाढलेली गुन्हेगारी तरीही कधीतरी आपल्याला न्याय मिळेल या आशेवर अजूनही जगणारा कामगार वर्ग अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटला आहे.
चौथ्या भागात " आग्रीपाडा.. भाईगिरी आणि राडेबाजीच्या विस्फोटाचा नमुना "
आग्रीपाडा आणि भायखळ्यातल्या भाईगिरीच्या फॅक्टरीबद्दल वर्णन आहे. दाऊद इब्राहिम , अरुण गवळी, रमा नाईक अशा गुन्हेगारी विश्वाची ओळख असलेल्या लोकांची सुरुवात इथून झाली आहे. मूळ कामगार वस्ती असलेल्या याभागाचे गिरणीसंपांनंतर झालेले गुन्हेगारीकरण आणि मग सुरु झालेले गँगवार आणि शेवटी पोलिसांनी केलेले एनकाउंटर असा प्रवास सुरेख मांडला आहे. दगडी चाळ, तिथल्या जीवनाचे आकर्षण, दंगलीनंतर या भागात झालेले बदल, हिंदू -मुस्लिम समाज एकत्र राहत असताना काही दिवसांतच बदललेले वातावरण, मदनपुरातला गारमेंटचा व्यवसाय, पोलिसांच्या धाडी, असे यथार्थ वर्णन केलेले आहे.
पाचवा विभाग " बहिष्कृत महानगर.. जगण्याच्या कडेलोटावर उभी दलितांची छावणी "
घाटकोपर च्या रमाबाई आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, कामराज नगर, महात्मा फुले नगर, गौतमनगर, भीमनगर अशा वस्त्यांची आणि त्यात वसणाऱ्या दलित समाजाची माहीती या भागात आहे. पावसाळ्यात पाण्यामुळे विस्थापित झालेले नवबौद्ध आणि मग ट्रांझिट कँप ते झोपडपट्टी अशी खाडीच्या भागावरच सुरु झालेले जीवन. शिक्षणाचा अभाव, वाढलेली व्यसनाधीनता, अस्वच्छता भयंकर प्रदुषण आणि त्यामुळे आलेली रोगराई असे अनेक प्रश्न, बाबासाहेबांच्या " खेडी सोडा शहरात चला " या संदेशावर मुंबई जवळ केलेल्या आणि ७२ च्या दुष्काळानंतर मुंबईत आसरा घेतलेल्या लोकांसमोर आलेले प्रश्न, संधी त्याचबरोबर परस्परविरोधी विचारधारा असुनही साजरे केले जाणारे हिंदू सण. त्याच बरोबर प्रत्येक तरुणाच्या तोंडात असणारे " मी समाजसेवक आहे " हे वाक्य. या वस्त्यांमध्ये मुंबईचा स्वच्छता कर्मचारी आहे हे सांगताना, खेड्यांमधले बहिष्कृत जीवन सोडून शहरांकडे सन्मानासाठी आलेल्या या समाजाचे आयुष्य या मुंबई शहराने सुद्धा गावाप्रमाणेच वेशी बाहेरच ठेवलंय हे वाचताना खुप वाईट वाटतं. रमाबाई आंबेडकर नगरामधली पुतळा विटंबनेनंतरची परिस्थिति, दंगल या गोष्टी टाळून तिथले रोजचे जगणे, स्त्रियांची परिस्थिती, तरुणांची होरपळ इत्यादिंवर प्रकाश टाकला आहे.
सहाव्या भागात " मुंबईचे समुद्रपुत्र... किनाऱ्याच्या सांदिकोपऱ्यात फेकला गेला दर्याचा राजा "
मुंबईचा मुळ निवासी असलेल्या कोळी समाजाबद्दल आणि त्यांच्या वस्त्यांबद्दल लिहिलेले आहे. या समुद्रपुत्रांच्या गळ्याला नख लावून कसे मुंबई शहर उभे राहिले. मुंबई नाव येण्यापुर्वीचे सात बेटांचे राजे असणाऱ्या कोळी समाजाचे अस्तित्व आता केवळ कुलाबा, वरळी, खारदांडा, जुहूतारा, वर्सोवा, मढ या कोळीवाड्यांमध्येच राहीले आहे. पंचतारांकीत हॉटेलांच्या जोडीने हे कोळीवाडे आहेत. समुद्राच्या लाटेला बेधडकपणे सामोरी जाणारा शहरीकरणाच्या लाटेखाली पार दबून गेला आहे. त्यांचे अस्तित्व अगदी किनाऱ्यालगतच राहीले आले. सोनकोळी असलेला हा समाजात नंतर कसा धर्म बदल झाला याचेही वर्णन यात आहे. पुरुषांनी मासेमारी करावी आणि स्त्रियांनी विक्री हा रिवाज अनेक वर्ष तसाच सुरु आहे. व्यवसायातले नाखवा चे आणि पाटीलाचे गावगाड्यातले स्थान, नारळी पोर्णिमा आणि जातीतच सोडवले जाणारे सामाजिक प्रश्न, भांडणे असे विषय छान हाताळले आहेत. ट्रॉलर च्या यांत्रिक मासेमारीमुळे परंपरागत मासेमारीच्या धंद्यावर एकूणच झालेला परिणाम, राजकारणातली त्यांची उदासिनता यासोबत परंपराच्या जाळ्यात अडकलेल्या "या दर्याच्या राजाने दर्यावरची सत्ता तर घालवली आता मालकीच्या जागेवर तो शिल्लक राहील का " हे वाचताना खुप वाईट वाटतं.
सातवा भाग " बंबईया भैया.. यूपी से बंबई स्थलांतरितांचा सिलसिला "
हे प्रकरण भरपूर माहीती देते. भैया या माणसाबद्दल मराठी मुंबईकरांना जेवढे प्रेम आहे तेवढाच त्यांचा द्वेष करताना ते दिसतात. मुळात हे यूपी सोडून मुंबईत का आले त्याचेही कारण इथे सापडते. ब्रिटिशांनी कपडे धुण्यासाठी युपीवरुन यांना आणले असा ऐतिहासिक उल्लेख आहे, त्यानंतर १८५७ चा उठाव फसल्यावर हे उत्तरेकडील हिंदू मुस्लिम सैनिक दक्षिण भारताकडे सरकले. या भैयांनी मुंबईत मिळेल तिथे तंबू ठोकले. मुंबईत तबले आणायचे काम या लोकांनी केले. सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी हे तबले नंतर मुख्य मुंबईच्या बाहेर म्हणजे गोरेगाव, आरे कॉलनीच्या आजूबाजूला गेले. नंतर या जागांवर बिल्डर लॉबीची नजर गेल्यावर तिथून त्यांना हूसकावणे सुरु झालंय. परंतू काम करण्याची अमानवी शक्ती आणि कोणतेही काम करण्याची मनापासूनची तयारी मुळे या लोकांनी कधीही उपाशी ठेवलेले नाही. भेळ, चणे विकून दुकान मालक होण्याचा मेहनतीचा प्रवास यांच्याकडे असतो. साहित्य आणि यूपीचे जुने नाते ते मुंबईतही जपून राहीले, अनेक पत्रकार युपी कर आहेत. युपीत प्रकर्षाने दिसणारी जातीयता ते इथेही पाळतात. मुंबईच्या राजकारणातही त्यांचे मोठे योगदान आहे.
महिना ३०० करोड ( २००० साली) युपीत पाठविले जातात यावरुन यांच्या अर्थकारणाचा अंदाज येतो. प्रत्येक दहा माणसांमागे तीन उत्तरप्रदेशीय भैये आहेत आहेत त्याचे कारणही मोठे राज्य आणि भरपूर लोकसंख्या, पूर, धूप आणि क्षारयुक्त जमीन यामुळे हे हिंदू - मुस्लिम भैये मुंबईचा रस्ता पकडतात.
अशी परिपूर्ण माहीती या भागात आहे. त्यात मुंबईकर भैयांची एकुण परिस्थिती, कामाचे स्वरुप, साहित्य, राजकारण या सर्व पैलूंना स्पर्श करणारा हा भाग आहे.
आठवा आणि अखेर चा भाग " कामाठीपुरा.. शोषणाचे क्रुरचक्र रोज फिरवणारे मैथूनयंत्र "
मुंबईची अधिकृत वेश्यावस्ती, शरीराची भुक भागवणारे ठिकाण अशी ओळख असणाऱ्या या परिसराचा धुंडोळा या भागात मांडला आहे. रोजची अंदाजे एक कोटीहुन जास्त उलाढाल असलेल्या या बहिष्कृत भागाचे वर्णन करताना त्यातील अंधाऱ्या गल्लीबोळात फिरताना फार वाईट वाटतं. सतत काम करणाऱ्या तेलगू लोकांमुळे कामाठीपुरा नाव पडलेल्या या परिसरात वेश्याव्यवसायाची सुरुवातही त्याच लोकांपासून झाली. त्यांनीच फोरास रोड, फॉकलंड रोड या भागात ही वस्ती वाढवली.
कामाठीपुऱ्यात बाकीचे व्यवहार होतात हे अनेकजणांना माहीतही नाही. इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट चा मोठा बाजार इथे चालतो. वेश्याव्यवसाय चालणाऱ्या इतरही जवळच्या भागांचे वर्णन तिथे आहे. कामाठीपुरा आणि फॉकलंड मधला मोठा फरकही त्यात दर्शवला आहे.
अगदी तपशील फार देणे इथे उचित नाही पण पन्नास रुपयापासून शरीराची भुक भागवायला येणारा मजूरवर्ग ते वीस वीस हजार रुपये मोजून कोवळ्या मुलीची मागणी करणारा धनिक वर्ग इथे येतो यातच यांचे जीवन कीती भयानक आहे त्याची कल्पना येते. नाही म्हणायची मुभा फारच कमी. संध्याकाळी सुरु होणारी मैथूनाची मेहफील पहाटे तीन चार पर्यंत चालते. एक मुलगी एका रात्रीत दहा बारा पुरुषांसोबत संबंध होऊन दोनशे तीनशे कमवते. पोलिसांनी कितीही मारलं तरी न रडणारी या मुली इतक्या पराकोटीच्या निबर बनलेल्या असतात यावरुन या व्यवसायात येण्यापुर्वी त्यांच्यावर किती अत्याचार झालेले असतात याची कल्पना येते. पुढे जाऊन नाईट लाईफ वरही हा लेख प्रकाश टाकतो. डांस बार, स्ट्रिप्टिज बार, कॉलगर्ल ही मुंबईची काळी बाजूही मांडली आहे. एडस् च्या भारतातील शिरकाव्यानंतर या वस्त्यांकडे संशयाने पाहीले गेले. त्यानंतर अक्षरशः या मुलींची उपासमार झाली. परंतू नंतर पुन्हा सुरक्षित साधने वापरुन पुन्हा हा व्यवसाय पसरला. तरीही पुर्वी जी संख्या होती ती विलक्षण कमी झाली आहे.
या वेश्याप्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही हे मात्र प्रकर्षाने लिहिलेले आहे सरकार, संस्था, पोलिस, आरोग्य खाते हे आहे त्याच जागी राहून खिंड लढवत आहे, परंतू पुढे सरकायला कोणीही तयार नाही.
"एकूणच स्त्री - पुरुषाच्या मैथुनाच्या गरजेतून निर्माण झालेलं विश्व भंजाळून टाकणारे आहे. "
या नोटवर हे पुस्तक संपते..
पण अर्ध्या मुंबईची सफर करताना अनेक माहीत नसलेल्या गोष्टी त्यांच्या सुरवातीपासून माहीती करुन देते हे पुस्तक.
मॅजेस्टिक प्रकाशनने छापलेलं हे पुस्तक मुंबईची एक वेगळी बाजू दाखवते हे मात्र नक्की..
Nice review...rea really liked it👍🏼
ReplyDelete