Monday, 10 October 2016

बाजू.. बाजू..


.... बाजू..  बाजू.....


तेव्हा माझी सकाळ ४ वाजता व्हायची.चायवाला राधेश्याम स्टोव्हला पंप मारायला लागला की त्या आवाजानेच जाग यायची. हातगाडीवरचे जीवन आमचे.  सकाळ हातगाडीच्या पलंगावर व्हायची,  दिवस हातगाडी ओढण्यात जायचा आणि रात्र सुद्धा तिच्याच कुशीत जायची.
गावाकडे संसार पार उत्तरप्रदेशात. बायको, चार मुलं, आई या सर्वांना पोसायची जबाबदारी माझ्यावर.
गावी जायचं म्हणजे तीन चार दिवसाचा प्रवास.  मेलं गेलं काही नाही.
बाप मेला हे सुद्धा तीन दिवसांनी कळलं. तेव्हा फोन वगैरे नव्हते. सावकाराचे न संपणारे कर्ज... त्यामूळे घरावर होणारे अत्याचार डोळे बंद करुन सहन करत होतो.  शेवटी किशन सोबत मुंबईची वाट पकडली.  मार्केट मधी हमालांची कमी आहे तिथे चांगला पैसा कमवायला संधी आहे या वाक्यावर,  घर मागे टाकून थेट मुंबई गाठली.
किशन हातगाडी ओढायचा मी हातगाडीला बाजूने धक्का द्यायला. भुलेश्वर मार्केट हे सदानकदा गजबजलेलं.  त्याच्या मधून रिकामी  हातगाडी न्यायची तरी कसरत असायची.  भरलेली असेल तर फारच कष्ट..
नेहमीच हातगाडीच काम नसायचं मग टेंपोंवर हमाली करायला जायचो.  एक गोणीचे सहा रुपये.  सुरुवातीला दोन गोण्या न्यायचो पण मग लक्षात आलं की आपला वेळ वाया जातोय.  मग चार गोण्या - पार्सल जसं मिळेल तसं
तिथेही नंबर असायचे.  त्याच्यातही मारामारी व्हायची.  पार्सल तरी.. तीस तीस किलो वजनाचे. दोन दोन मजले चढवायचे म्हणजे नाकी नऊ यायचे. मुकादमाच्या आवडत्या माणसाला तळाच्या दुकानांचे पार्सल मिळायचे. दिवसाची कमाई कशी बशी शंभर रुपये.
हातगाडी असली की मात्र दोनशे व्हायचे.  दिवसभर कमवलेले पैसे दुसर्‍या दिवशी सकाळी स्टेट बँकेत नेऊन भरायचे. तिथेही तासभर लाईन असायची,  सर्व माझ्यासारखेच लोक. तिथल्या लाईन मध्ये सुख दुःख वाटली जायची.

दुपारचे जेवण म्हणजे भोईवाड्याच्या नाक्यावरचा वडापाव आणि भजीपाव.  पंधरा रुपये तिथेच खर्च.  चहा, बिडी, तेल साबण वगैरेचा खर्च किशनच करायचा म्हणून त्याची दगदग नव्हती.  रात्रीचे जेवण मात्र जलाराम बाप्पा च्या मंदिराच्या बाहेर रांगा लावून. एका पत्रावळीत पातळ खिचडी.. हेच रात्रीचं जेवण. जेवण झालं की पुन्हा हातगाडी गाठायची आणि वरच्या वायरींच्या जंजाळातून आकाशातले तारे मोजता मोजता झोप यायची.
या वर्षी गावी गेलो तेव्हा सांगून आलो की दोन वर्षे आता येत नाही मी.  येण्याजाण्याचाच खर्च मोठा असायचा.  मोठा मुलगा गावी मजूरी करायला लागला होता.  त्यामूळे माझ्यावरचा भार जरा हलका झाला होता.  निदान त्याला तरी हे काम करायला लागू नये हा प्रयत्न माझा असणार होता..

पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं.
रात्रीच किशन बोलला की उद्या दुपारी जेपी ची गाडी भरायची आहे.  तू, मी आणि तिसऱ्या भोईवाड्यातला याकूब तिघांनी भरायची आहे.  दोन फेऱ्यांचा माल आहे. दोन तासाचे काम पण पेट्या मोठ्या मोठ्या करायच्या आहेत. एक्सपोर्टचा माल आहे एक पेटी साठ किलोची बनेल.  इमरान कडून पेट्या मागवल्यात, सकाळी पट्टी वगैरे मारुन ठेवू आणि दुपारी जरा कमी गर्दी झाली की घेऊन जाऊ.  टेंपो दाणाबाजारात उभा असणार आहे.

राधेश्यामचा पोऱ्या चहा घेऊन आला.  चहा पिता पिता त्याला विचारलं.
" तू क्यों इधर आया रे?  बाप किधर है तेरा?  वो काम नहीं करता क्या?  "
पोऱ्या तोंड खाली करुन बोलला..
" बाप जेल में है.  मां को मार डाला.  गावमें बुढ़िया और बहन है. उनके लिए काम करना पडता है.  अब तुम्हारे जैसा काम तो नहीं कर सकता इसलिए चायवाला ही सही है. "
त्याच्या परिस्थितीचा विचार करता करता याकूब कधी समोर येऊन उभा राहीला ते कळलंच नाही.
" सून तिवारी..
आज जैन मंदिर में भोग है.  लाडू देगा,  अच्छा वाला खाना भी देने वाला है.  मै जाऊंगा.  तू भी आजा.  पट्टी मारने के बाद थोडा समय रहेंगा तो हम जाके खाना खाके आयेंगे..  "
पंधरा रुपये वाचणार हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते.
किशन आला तेव्हा नऊ वाजले होते.  दहा वाजता इमरान पेट्या पोहचवणार.  अकरा ला जेपी उघडला की आमचे काम सुरु.  तासाभरात पेट्या भरुन, पट्टी लावून होणार होते.
आजचा दिवस चांगला जातोय.  चांगले जेवण.
कामानंतर अर्ध्या दिवसातच  चांगला पैसा.  पुन्हा टेंपो आहेतच.  आज चारशे रुपये कमवाईची संधी दिसत होती.

इमरानच्या हात गाड्या पेट्या घेऊन आल्या.  दोन हातगाड्या...

इमरानने आमच्या हातगाडीकडे बोट दाखवत म्हटलं.
" किशन शर्मा..  तेरी गाडीमे कुछ गडबड लग रही हे.  इतना वजन नहीं जाएगा इसपर.  बनवा के लेले "

किशन त्यावर हसून बोलला..
" अबे,  इतनी साल से गाडी चला रहा हूँ.  तू अभी बच्चा है.  पुरे टेंपो का आता है मेरी गाडी पे.  तू ठोकते रह पेटी..  "

इमरान ने त्याच्या नादी लागण्यापेक्षा पुढे जाणे पसंत केलं.
एका वेळी बारा ते चौदा पेट्या न्यायचो आम्ही..  टनाचा माल एकावेळी जायचा. सर्व पेट्यांना पट्ट्या मारेपर्यंत एक वाजला.
पेट्या मोजल्या तर त्या ३२ झालेल्या.
किशन कडून वडापावसाठीचे पैसे घेऊन याकूब आणि मी थेट जैन मंदिर गाठलं.  जेवण साडेबारा वाजता चालू होतं हे माहीत होतं पण ते संपते ही लवकर.  कारण जसे आम्ही, तसे मार्केट ला दोनशे अडीचशे हमाल,  हातगाडीवाले, पाटीवाले होते.  सर्वच एकदम यायचे.
त्यामूळे जेवण लवकर संपायचे. आम्ही गेलो तेव्हा संपल्यातच जमा होतं..
थोडं थोडं मिळालं म्हणून लाडू दोन दोन दिले ताटात.  तिथेच बाजूला फुटपायरीवर बसून फडशा पाडला.
दिवस चांगला असला की सर्वच चांगलं घडून येतं.  ताट धुवायला पाणी ठेवलेलं होतं.  महिन्यातून एकदा असं ताटातून मिळायचं.  बाकी दिवस ती पत्रावळीच आपली सोबती.
बिडी पित एका हातगाडीवर बसलो होतो तर याकूबच्या मोबाईलवर किशनचा फोन आला.
" अरे क्या पागल लोग हो तुम?
बोला था मैं के जल्दी भरेंगे तो गिर्दी कम होंगी..  आओ जल्दी "
बिडी अर्धी टाकतच धाव घेतली.
पटापट पेट्या बांधल्या. पेट्या जरा नेहमीपेक्षा जडच वाटल्या.  जेपी म्हणजे हेअर क्लीप वाला त्याच्या एवढ्या जड पेट्या नसायच्या.  मी मदत करण्यासाठी दुकानातल्या सेल्समन ला विचारल्यावर त्याने सांगितले सर्व कास्टिंग चा माल आहे. त्यामूळे जड असणारच.
याकूबने माझ्या चेहऱ्याकडे पाहीलं.
" क्या हुआ मियाँ.. डरता है क्या?
अरे अपून संभालेगा आगे बस तू बाहर वाली साईड संभालना.  किशनभाय तो नाम के लिए साथ रहेंगे..  है ना?  "
आम्ही दोघेही हसलो.  पेट्या करकचून बांधल्या. गाडीवर अठरा पेट्या होत्या.
मी किशन ला विचारलं की, अरे बत्तीस तर आहेत मग इतक्या जास्त कशाला भरतोय?
त्यावर तो बोलला की,  तीन पेट्या तुम्ही वडापाव खायला गेल्यावर वाढवल्या शेठ ने.  आता त्यासाठी तीसरी फेरी घालायची काय?

मान खाली घालून हातगाडी हलली दुकानासमोरुन.  भोईवाड्यातून उलटी न्यायची म्हणजे डोक्याला ताप.  समोरुन गाड्या आल्या की गाडी खाली टेकायला लागायची.  टेकल्यावर पुन्हा तेवढाच जोर काढून पुन्हा ढकलावी लागायची.  याकूब पुढे..
ए भाय...  बाजू बाजू ओरडत चालला होता, मी बाहेरच्या बाजूस धक्का देत होतो.  तिकडच्या बाजूने नेहमीप्रमाणे धक्का येत नव्हता हे जाणवत होतं.
आमची म्हणजे याकूब आणि माझी  हसी मजाक चाललेली त्यावरुन.
याकूब ओरडत होता..
" ए भाय..  बाजू बाजू..  किशनसेठ की गाडी आरेली है..  प्वांम प्वांम..  "
त्याच्या बोलण्यावर हसत हसत मी सुद्धा " बाजू बाजू " ओरडत होतो.  गल्लीच्या टोकावर पोहचलो मात्र....
अचानक कडाड् आवाज झाला आणि गाडी एकदम माझ्या कडे कलंडली.
पायावर एकदम दाब आला..  काडकन आवाज आला.  ते होतेय न होतेय तोच वरच्या पेट्या अंगावर आल्या.
हे सर्व इतकं झटपट घडले की समजले ही नाही.  चारी बाजूने आरडाओरडा सुरु झाला.
" अरे उसको बाहर निकालो पहले." ...  "अरे बापरे..  कितना खुन..  "
" लगता है पैर गया.. "
दहा बारा जणांनी पेट्या हलवल्या तेव्हा लक्षात आलं की अती वजनामुळे माझ्या जवळचे चाकच निखळून पडले होते.  खड्ड्यात हिसका बसल्याने मजबूत लाकूड तुटून पडले होते.
पण मी गाडीच्या जवळ असल्याने. माझा पाय त्या चाकाखाली आला होता.
आता माझे लक्ष माझ्या पायाकडे गेले.  तो अजूनही चाकाखालीच होता आणि मी...
हातगाडी पासून दुर होतो.

याकूब ला सुद्धा मुका मार लागला होता बहुतेक.  तरीही तो धावत आला.  त्याने लगेच मला मिठी मारली.
"  कुछ नहीं होगा..  तुझे..  चल हम अस्पताल जायेंगे..  "

मला उचलल्याबरोबर पायातून एक कळ गेली... थेट मेंदूत..
गुरासारखा ओरडलो.

आणि मग थेट हॉस्पिटलमध्येच जाग आली.  पायातून जबरदस्त कळा येत होत्या.  याकूब शेजारीच होता.  त्याच्याबाजूला चहावाला पोऱ्या होता.  दोघांचे चेहरे अत्यंत चिंताग्रस्त दिसत होते.
मी जागा झालोय हे पोऱ्यानेच पहिलं पाहीलं.  तो लगेच जवळ आला..
" कुछ नहीं हुवा आपको.  जल्दी ठिक होंगे आप.  "
.
कुछ नहीं हुवा??
.
अरे ज्यांच्या जोरावर ऐंशी नव्वद किलो वजन तीन चार माळे चढवायचो त्यातला एक गेलाय रे..

कमाईचा एकमेव आधार होता ते माझे वजन उचलण्याचे कौशल्य..
एका पायाने कसा उचलणार मी?

याकूब जवळ आला त्याच्या डोळ्यात अश्रू होते.  मी काही बोलणार त्या आधीच तो बोलला..

" किशन नहीं रहा..

उपरवाली पेटी सीधे उसके सर पर गीर गयी.  गरदन मुडने के कारण वहीं उसकी मौत हो गयी..  "

सुन्न..  सुन्न..

किशन च्या मरणाला रडू की माझ्या या नविन अपंगत्वाला?
डोळ्यात पाणी तरारुन आलं...
अश्रू बाहेर सांडण्यापुर्वी पोऱ्याकडे लक्ष गेलं..
मला माझा मुलगा त्या ठिकाणी दिसत होता..

कानात शब्द घुमत होते...
" बाजू..  ए भाय..  बाजू..  बाजू... "

No comments:

Post a Comment