Friday, 25 August 2017

कायमची अद्दल

..... कायमची अद्दल .....


..... कायमची अद्दल .....
तालुक्याच्या पोलीस स्टेशनच्या एका खुर्चीत कृष्णा पाटील डोक्याला हात लावून बसले होते. सोबत नेहमी सोबत असणारा हरकाम्या पांडू देखील होता.
इन्सपेक्टर सावंत त्यांच्या आधी आलेल्या मारामारीच्या प्रकरणाच्या पकडून आणलेल्या लोकांना समज देत होते. त्यांची नजर सुद्धा पाटलांकडे आणि पांडूकडे गेली होती.
" दोन मिनीटे बसा.. यांचे आटोपतो मग निवांत बोलू.. " असं सांगून त्यांनी पाटलांना बसायला सांगितले होते.
मारामारी करुन तोंड सुजलेल्या दोन तरुणांकडे बघून त्यांनी बोलायला सुरुवात केली.
" हे बघा.. कंप्लेंट रजिस्टर केलीत तर उगाच सर्वांना त्रास होईल. क्रॉस कंप्लेंट घेऊन मी हे प्रकरण सरळ कोर्टाकडे वर्ग करेन आणि मग तुमच्या कोर्टाच्या खेपा वाढतील. कोर्ट कुठे आहे माहीत आहे ना? डायरेक्ट जिल्ह्याला...
तीन तास.. साडे तीनशे रुपये एका बाजूचा प्रवास.. समजूतदारपणे आणि विचारपुर्वक निर्णय घ्या. वाद, भांडण तंटे गावात होतंच राहतील. पण या दोन तरुणांची नावे रिकॉर्डवर येतील. मग पुढे ते त्रासदायक होईल. नोकरी - धंद्यात किती अडचणी येतील याचा अंदाज तरी आहे का तुम्हा लोकांना... बोला काय करु? "
या शब्दांनी दोन्ही गटात कमालीची शांतता पसरली. दोन्ही गटातले जाणती मंडळी एकमेकांसोबत कुजबूजू लागली.
बाण वर्मावर लागलाय हे समजून सावंत गालातल्या गालात हसत होते.
" तुमचं बरोबर आहे साहेब.
आम्ही तक्रार मागे घेतो. " एकजण शांतपणे बोलला.
" बरोबर.. लहान सहान वाद गावातच मिटवायचे. उगाच एवढा खर्च करुन तालुक्याला येता आणि नुकसान करुन घेता.. चला आता जा. " दोन्ही गटांच्या माणसांना समज देऊन जायला सांगून त्यांनी पाटलांकडे पाहीलं.
पाटील अजूनही डोक्याला हात लावून बसले होते.
" या पाटील साहेब.. भरपूर चिंता दिसतेय तुम्हाला. काय झालं? " बसण्यासाठीची खुर्ची मागे सरकवत सावंत बोलले.
कृष्णा पाटलांचे प्रस्थ फार मोठे होते. तालुक्यात " धवलक्रांती " आणण्याचे मोठे काम कृष्णा पाटील यांच्यामुळे झाले होते. संपुर्ण तालुका दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला होता. पाटलांचे राजकीय वर्तुळातही चांगलेच वजन होते. सभापती, बिडीओ, तहसीलदार यांच्याशी सुद्धा चांगले संबंध होते. सावंतानी सर्व माहीती काढली होती. त्यामुळे अशा वजनदार माणसाला प्रत्यक्ष स्वतःला पोलीस स्टेशनला यावे लागतेय म्हणजे, मामला नक्कीच काहीतरी गंभीर असावा.
" सावंत साहेब.. नमस्कार.
मी कृष्णा पाटील..
आपण भेटलो होतो. आमदारांच्या दौऱ्याच्या वेळी. आठवतंय ना? " पाटलांनी ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला.
" हो.. पाटील साहेब.. आठवतंय की.. तुमच्या घरीच तर जेवलो आपण सर्व. अतिशय सुंदर जेवण केलेलं वहिनीसाहेबांनी. आजही ती पुरणपोळी आठवते मला. मऊशार काठांची.. गोड दुधात किती सुंदर लागली होती. चव पुन्हा जिभेवर आली पहा. "
सावंतानी ओळख पक्की असल्याचाच निर्वाळा दिला.
पाटील आता जरा सावरले आणि चाचरत बोलले
" साहेब.. चोरी होतेय... रोज... "
" रोज? कशाची? " सावंतानी प्रश्न केला.
" हे बघा.. आपल्या गोठ्यात ७० गाई, ४० म्हशी आहेत. भरपूर दुध दुभते आहे. एक एक गाय १५-१८ लिटर दुध देते म्हशी तर २० लिटर पार करतात..... "
" हो हे तुम्ही सांगितले होते, दौऱ्याच्या वेळी. तुमचं बघूनच, तुमच्या मदतीनेच तर तालुकाभर लोकांनी दुग्धव्यवसाय सुरु केला. आज तालूका तुम्हाला यागोष्टीसाठी धन्यवाद देतोच की. " सावंतांच्या डोळ्यात पाटलांविषयीचा आदर दिसत होता.
" हो.. पण साहेब गेले काही महीने.. गोठ्यातून दुध चोरी होतेय... " पाटलांच्या कपाळावरची चिंतेची आठी अधिक गडद झाली.
" दुधाची चोरी? म्हणजे दुध कोणी काढून नेतं की काय? " सावंतानी हसून विचारलं.
" हो सावंत साहेब... दिवसाला तीनदा दुध काढणी होते. काही गायींची थानं सकाळच्या वेळी रिकामी असतात. कोणीतरी गुपचूप येऊन दुध काढून घेऊन जातंय.
रोजचे १००-१५० लिटर कमी येतंय. " पाटलांनी डोक्याला हात लावला.
" अरे बापरे रोज चार पाच हजाराचे नुकसानच की थेट.. किती दिवस चाललंय हे? " टेबलावरचे पेन उचलत समोरची वही उघडून सावंतांनी प्रश्न केला.
" म्हणजे बघा लक्षात येऊन तीन महिने झाले. त्याआधी किती महीने चाललंय हे याचा अंदाज नाही. दुधाचा हिशोब आमची ही सांभाळते. तिला समजलं नाही पैसे कमी येताहेत ते.. तीन महिन्यापुर्वी सहज म्हणून विचारलं तेव्हा समजलं की काहीतरी गडबड आहे.
म्हणून एक दिवस मी स्वतःच दुध काढायला बसलो. तर दहा गाईंची थानं आधीच रिकामी. कोणीतरी काढून नेलेले दुध. खुप प्रयत्न केला.. रात्री माणसं पण लक्ष ठेवायच्या कामाला ठेवली पण चोरी व्हायची काही थांबेना. एकदा चोर सापडू दे.. अशी काही धुलाई करतो त्याची की कायमची अद्दल घडेल त्याला " पाटलांच्या रागाचा पारा चढला होता.
" तुम्ही सांगताय त्यावरुन चोर तुमच्या खात्रीतला आणि जवळचाच दिसतोय. " सावंतांचा इतक्या वर्षाचा पोलिसातला अनुभव बोलू लागला. त्यांची नजर बाजूला उभ्या असलेल्या पांडूकडे गेली. पांडू काहीसा गडबडला.. हे त्यांच्या चाणाक्ष नजरेने ओळखलं.
" नाही.. हो घरातला माणूस कसा चोरी करेल? सर्व घरातच असतात की.. गोठा लांब आहे घरापासून. आणि कमी असतं तर ठिक आहे १००-१५० लिटर म्हणजे काही कमी नाही. घरातला असता तर ते दुध दिसलंच असतं की कुठेना कुठे? " पाटलांनी नकारार्थी मान हलवली.
" तसं नाही..
जो कोणी चोर आहे. त्याला तुमच्या जवळचाच माहीती पुरवतो आणि चोर आपलं काम साधून जातो.
मला प्रश्न हा पडलाय की एवढं दुध ते नेत कसे असतील? " डोके खाजवतं सावंतांनी समोरच्या वहीत काहीतरी लिहीलं.
" हा तुमचा हरकाम्या ना? " पांडूकडे पेन दाखवून सावंतांनी विचारलं.
" नाव काय रे तुझं? " आवाजात जरब आणून सावंतानी विचारलं.
" जी सरकार.. पांडू नाव माझं. " घाबरत घाबरत पांडूने नाव सांगितले.
" जा जरा बाहेरच्या खुर्चीवर बस.. तुझी गरज लागली की बोलवतो तुला " सावंतांनी हुकूम सोडला.
" जी सरकार.. मी जातो बाहेर " बोलून लगेच पांडू आज्ञाधारकपणे बाहेर गेला.
सावंत काही बोलणार त्याअगोदरच....
" थकलो मी शोध घेऊन. आता तुम्हीच घ्या शोध.. चोर पकडून फक्त आमच्या हाती द्या. पुढे काय करायचं ते आम्ही बघू. " आवळलेल्या मुठ्या पाटलांनी टेबलावर आपटल्या.
" पाटील साहेब.. शांत व्हा.. आपण घेऊ शोध.. पण तुम्ही कायदा हाती घ्यायचा नाही. मला सांगा किती माणसं कामाला आहेत? कोणत्या वेळेला ते ही सांगा. " पेन सरसावून सावंतानी लिहायला घेतलं..
" हे बघा.. एकूण सहा माणसं कामाला आहेत गोठ्याच्या.
श्रीपती , गणपत, धनाजी, विठोबा, गुणा आणि बाळू. सगळी विश्वासातली आहेत. " पाटलांनी शांतपणे सांगितले.
" ओके.. मग सांगा..
या सहा पैकी गेल्या तीन महिन्यात कोणाचे राहणीमान बदललंय? नवीन कपडे, दागिने असं काही? " सावंतानी पुन्हा वहीत लिहिले.
" नाही... असं काहीच नाही. सर्व साधेच आहेत. साधी माणसे आहेत हो.. संशयाला जागाच नाही अजिबात.... या माणंसापैकी चोरी करणारे कोणीच नसेल.. चोर कोणीतरी बाहेरचाच आहे. " पाटलांनी निराशेने मान हलवली.
" मी तुम्हाला एक उपाय सांगतो... कराल?
पण ही गोष्ट अत्यंत सावधपणे करावी लागेल. ही गोष्ट फक्त तुमच्या आणि माझ्यातच.. घरी कोणालाही सांगू नका.. पांडूला नाही की अगदी वहिनीसाहेबांनाही नाही... समजलं? " सावंताच्या डोळ्यात खोडकरपणा दिसत होता.
" काय म्हणता? चोर पकडला जाईल? " पाटलांच्या चेहरा खुलला होता.
" नुसताच पकडला जाणार नाही.. कायमची अद्दलही घडेल.. " पेन वहीत ठेवून सावंतांनी वही बंद केली.
आणि पुढे बोलू लागले.
.........................
बरोबर चौथ्या दिवशी..
कृष्णा पाटील दोन जखमी तरुणासोबत अजून तीन चार माणसांना घेऊन पोलीस स्टेशनला येताना दिसले..
" नमस्कार पाटील साहेब.. सापडला का चोर?
पण मी तुम्हाला सांगितलेलं की कायदा हातात घेऊ नका. किती मारलंत यांना? सांगा बरं काय झालं ते? " जखमी तरुणांना न्याहाळत खुर्चीवर बसत सावंत बोलले.
" तुम्ही सांगितले तसंच केलं साहेब.. आणि बघा चोर सापडले.
हे दोघं चोर होते हा बाळूचा भाऊ सजन . आणि हा गुणाचा मेव्हणा सदा.. " पाटील हसत हसत सांगत होते.
" अरे व्वा.. मग? आता यांना शिक्षा मी देऊ की तुम्ही दिलीय ती पुरेसी आहे? " सावंतानी हसून विचारलं.
" अहो आम्ही यांना हातसुद्धा लावला नाही.
हे दोघं बाळू आणि गुणाकडून माहीती काढायचे आणि कोणी नसताना चोरी करायचे. चोरीसाठी सायकल वापरायचे त्यामुळे आवाजही व्हायचा नाही. सायकल सुद्धा लांब उभे करायचे त्यामुळे सायकलचे ठसे सुद्धा यायचे नाहीत गोठ्याजवळ. " पाटील सर्व माहीती सांगत सुटले.
" हो... हो... जरा हळू की.. बेतानं सांगा जरा पाटीलसाहेब..
मला सांगा कसं जमवलंत ते आधी? " सावंत संपुर्ण घटनाक्रम ऐकायला उत्सुक होते.
" म्हणजे हे बघा.. तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं.
आज जागरणाला कोणी नको असं मुद्दामच सांगितलं आणि मी तालुक्याला जातोय मुक्कामी असं सांगून वाड्याच्या मागच्या खोपीत लपून बसलो.
पहाटे साडेतीनच्या सुमारास हे दोघं सायकल घेऊन आले. दबक्या पावलाने आले आणि गाईंचे दुध काढू लागले.
मी गुपचूप त्यांना पाहत होतो. इतक्यात एकदम ओरडण्याचा आवाज आला. बघता बघता गोठ्यात गोंधळ सुरु झाला. या दोघांचा आरडा ओरडा आणि किंकाळ्या भरुन गेल्या.
शेवटी मीच बॅटरी सुरु केली आणि या दोघांना बाहेर काढलं.. पण तो पर्यंत यांना खुप मार लागला होता. " पाटील वेड्यासारखे हसत होते.
" वा.. वा.. पाटील.. हे तर पुर्ण प्लॅन प्रमाणेच झालं की.. यांना आधी हॉस्पिटलला न्यावे लागेल. दवापट्टी केल्यावर बघू काय करायचं ते... काय.. रे?
कायमची अद्दल घडली का रे?? " मान खाली घालून रडणाऱ्या आणि विव्हळणाऱ्या दोघांकडे पाहून सावंत हसले.
" आता तुम्ही यांना तुमचा पोलीसी खाक्या दाखवा.. तो वर मी जाऊन माझे राहीलेले अर्धवट काम करुन येतो.. " पाटील खुर्चीवरुन उठत बोलले.

" आता कुठे निघालात पाटीलसाहेब? जबाब वगैरे नोंदवून जा की. " सावंत त्यांना थांबवत बोलले.

" अहो. एवढ्या गाईंमध्ये त्या दहा बैलांनी काय धुमाकुळ घातला असेल याचा विचार करा की.. या दोघांनी " बैलाचं दुध " काढल्यावर यांची हाड खिळखीळी करुन ठेवलीत त्या बैलांनी. आता तिथे ते मोकाटच आहेत. त्यांना जरा त्यांच्या मालकांकडे देऊन येतो.. बरोबर ना? बाकी तुमच्या बुद्धिमत्तेला सलाम करतो.. असाच पोलीस अधिकारी पाहीजे तालुक्याला.. गुन्हेगारांना कायमची अद्दल घडवणारा.  " पाटलांनी पोलीस स्टेशन हादरवून टाकणारा हास्याचा गडगडाट केला.

Wednesday, 2 August 2017

अपघात

.... अपघात ....



कपड्यांची बॅग गाडीच्या डिकीत ठेवत कैवल्यने केतकी ला विचारलं...

" सर्व वस्तू घेतल्यास ना?  "

त्याच्याकडे लटक्या रागाने बघत...

" पॅकिंग मी एकटीनेच नाही केलंय..  तुम्हीही होतात सोबत समजलं ना? काही राहीलं असेल तर माझ्या इतकंच तुम्हीही जबाबदार ".

गालातल्या गालात हसत कैवल्यने डिकी बंद केली.

लग्न, पुजा, पाहुणेपण सर्व आवरल्यानंतर हे नवपरीणीत जोडपं वैवाहिक जीवनाची सुरुवात करायला गोव्याला निघाले होते.

गाडी सोसायटीच्या बाहेर निघाली.  केतकीने प्लेयरवर गाणी सुरु केली. रोमँटिक गाणी तिने अगोदरच सिलेक्ट करुन आणली होती.
प्रत्येक गाण्यावर ती मोहरत होती.  डोळ्याच्या कोनातून कैवल्यकडे पाहत ती मनातल्या मनात स्वतःला नशीबवान समजत होती.  जेवढी ती सुंदर होती तेवढाच तोही हँडसम होता.

कैवल्यचे लक्ष पुर्णपणे गाडी चालवण्यावर होतं.  गाडीने एव्हाना पनवेल सोडले होते.  रस्ताला ट्रॅफिक नको म्हणून ते दोघे लवकरच निघाले होते.
पिवळा प्रकाश फेकत गाडी सुस्साट वेगाने गोव्याच्या हायवेला लागली होती.
प्लेयर वर गाणं सुरु झालं..

" रात का नशा अभी...
आंख से गया नही "

मंद मंद हसत कैवल्यने केतकीकडे पाहीलं.
तिच्या गालावर लज्जेचा रक्तीमा पसरला.  एक दिवसापुर्वीचे ते क्षण दोघांच्याही मनात रुंजी घालू लागले.  उत्कट आवेगाने केतकीने मारलेल्या मिठीची आठवण कैवल्यला झाली. केतकी सुद्धा तिच्या ओठांवर झालेला कैवल्यच्या ओठांचा पहीला स्पर्श आठवून धुंद झाली होती.
कैवल्यने गाडीचा स्पीड कमी केला.
गाडीचा स्पीड कमी झालेला पाहून केतकी खुदकन हसली.

" काय झालं हसायला? कैवल्यने खट्याळ नजरेने तिच्याकडे बघत विचारले..
" कुठे काय? मला आलं हसायला काहीतरी आठवून..
पण गाडीचा स्पीड का कमी झाला? "

हसत हसत तिने गाण्याचा आवाज कमी केला.

" यु नॉटी...  करु मी??  "
त्याच्या डोळ्यातला खोडकरपणा तिला दिसला.

" नो वे...  गाडी चालू आहे..  अजिबात नाही..  जे काही करायचंय ते गाडी थांबवून करा ...  आय...  आय.. आय मिन तिकडे गेल्यावर करु..  " तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघून त्याने तिला स्वतःकडे ओढलं.

गाडी हळू हळू पुढे चालली होती.  रस्त्याला कोणीही नव्हते.

अचानक केतकीची नजर त्याच्या चेहऱ्यामागे गेली....

एक लाल- पिवळ्या रंगाची साडी घातलेली स्त्री रस्त्याच्या मधोमध उभी राहून गाडी थांबवण्यासाठी हातवारे करत होती.

" कैवल्य...  ब्रेक..  ती बाई बघा ..  कैवल्य sss.. " ती जोराने ओरडली.

" ओ शीट..  " कैवल्यने करकचून ब्रेक दाबला.. स्पीड नसला तरी झटका बसायचा तो बसलाच होता.
दोघांनीही आपले डोळे बंद केले होते.

" कैवल्य.. अपघात झाला?
ती बाई कुठे दिसत नाहीए.  " केतकीच्या चेहरा घामाने डबडबला होता.

" वेट मी बघतो..  आपला स्पीड कमी होता.  फार फार धक्का लागला असेल तिला.  " कैवल्य खात्रीपुर्वक बोलत होता.

इतक्यात कैवल्यच्या बाजूच्या काचेवर टकटक झाली...

तीच बाई होती...

ती गयावया करत होती

काच खाली केल्यावर तिचा आवाज यायला लागला..

" प्लिज भाऊ...  मला मदत करा..  आमच्या गाडीचा अपघात झालाय. माझी लहान मुलगी आतमध्ये अडकलीय.  सर्व काचा बंद आहेत.  तुमचे खुप उपकार होतील. " तीने हात जोडले होते.

" बापरे.. आलो आलो..  चल केतकी..  लवकर चल.  " गाडी बंद करत त्याने सिटबेल्ट काढला आणि तीने दाखवलेल्या दिशेकडे धावत सुटला.

मागून केतकी आणि ती बाई धावत येत होती.

झाडाला धडकलेली लाल गाडी रस्त्यावरुन दिसत नव्हती.  बहुधा कंट्रोल सुटल्याने ती रस्ता सोडून इकडे खाली आली आणि त्याच वेगात झाडाला धडकली होती. गाडीच्या पुढच्या भागातून धूर येत होता.

झाड होतं म्हणून ती गाडी थांबली होती. अन्यथा पुढे असलेल्या साठ सत्तर फुट खोल दरीत पडली असती. कैवल्यने दरवाजाला हात घातला मात्र..
गाडी एक इंच पुढे सरकली..

कैवल्य जागचा थबकला..

" मागच्या सीट वर आहे पहा..  " त्या बाईंनी ओरडून सांगितले.

" हो..  हो..  तुम्ही काळजी करु नका.  काढेल तो तिला..
कैवल्य सांभाळून जरा.  " बाईंना धीर देताना कैवल्यची काळजी केतकीच्या आवाजात स्पष्ट दिसत होती.

मागच्या डोअरच्या काचेवर बाष्प साचलं होतं.  कैवल्यने वरुन अलगद हात फिरवला..
आत अडीच तीन वर्षाची मुलगी रडताना दिसली.

" थँक गॉड...  केतू...  जा लवकर गाडीतला हॅमर आण तुझ्या सीट खाली आहे पहा.  गाडी सेंटर लॉक दिसतेय.  काच फोडण्याशिवाय पर्याय नाही. जा लवकर..  क्विक  "
हे शब्द ऐकताच केतकी धावतच गाडीकडे गेली.  सीटखाली हॅमर होता तो घेऊन काही सेकंदातच कैवल्यकडे आणून दिला.

" मागे हो...  होप तिला लागणार नाही काचा....  हळूहळू तोडतो. देवा काही गडबड नको होऊ दे "

एक लक्ष गाडीच्या चाकावर ठेवून...
केतकीला मागे सरकवून त्याने काचेवर घाव घातला..

काच फुटल्याच्या आवाजासोबत त्या लहान मुलीच्या रडण्याचाही आवाज येऊ लागला...

" मम्मा....  मम्मा...  मम्मा..  " ती धाय मोकलून रडत होती.  लॉक उघडल्याबरोबर त्याने दरवाजा उघडून तिला बाहेर काढलं..
ती गाडीकडे बोट दाखवून रडत होती...

त्याच्याने आवरेना म्हणून तिला केतकीकडे सोपवलं.
"अरे.... ती बाई कुठाय?  " विस्फारलेल्या डोळ्याने कैवल्य पाहत होता.

केतकीने बाजूला वळून पाहीलं..

ती तिथे नव्हती...

" मम्मा...  मम्मा...  मम्मा..  ती मुलगी गाडीकडे बोट दाखवून रडत होती..

कैवल्य धाडस करुन पुढच्या दरवाजाजवळ गेला.  काचेवरचे बाष्प पुसले आणि आतले दृश्य बघून सर्द झाला.

इतक्यात...

कडकड आवाज झाला..

केतकीने लगेच कैवल्यला मागे खेचले..

गाडी सरसरत पुढे गेली आणि मोठा आवाज करत थेट दरीत कोसळली..

मुलगी अजूनच जोराने रडू लागली..
" मम्मा...  मम्मा..  मम्मा.. "
" कैवल्य...  आपण वाचवलं हिला... अहो पण हिची आई कुठे गेली? कैवल्य...  कैवल्य "
 शुन्यात नजर लावून उभ्या कैवल्यला स्पर्श करताच तो भानावर आला...
खिन्न स्वरात कैवल्य बोलला....

" केतू..  आपण नाही वाचवलं हिला...  तिच्या आईनेच वाचवले..  गाडीत ड्राईव्हिंग सीटवर हीची आई होती..  "

Thursday, 27 July 2017

ब्रेकअप

..... ब्रेकअप ....


डोळे पुसत त्याने फोन ठेवला.... आता पुन्हा तो मोह नकोच.... पब्लिक बुथवाल्याचे दहा रुपये त्याच्या समोर ठेवून काही न बोलता तो त्याच्या आयुष्यात निघाला...


........................

ती : आज उशीर केलास फोन करायला?  मॅडम येतच असतील आता.  बोल लवकर लवकर..

तो : हम्म... थोडं काम होतं, त्यामुळे उशीर झाला.  काय करत होतीस?

ती : काय करणार? नेहमीचेच...  रुटीन वर्क.

तो : बरं..  बाकी काय म्हणतेस?

ती : तुला माझ्याशी बोलायचं नव्हतं तर फोन का केलास?
बाकी काय बाकी काय म्हणतात तेव्हा बोलायची इच्छा नसते..  तुच सांगितलेलेस..  आठवतं?

तो : असं काही नाही..  प्रत्येक वेळी शब्दात पकडू नको.  बोलायचं नसतं तर फोनच केला नसता ना?

ती : काहीतरी बिनसलंय तुझं..  काय प्रॉब्लेम आहे?
तो : नाही.... काही नाही बिनसलंय. सोड...
श्रद्धा काही बोलली का तुला?

ती : तिचा काय संबंध?  ती माझी मैत्रीण आहे. तू का फोन करतोस तिला?

तो : हे बघ...  फोन नाही...  प्रत्यक्ष भेटलेलो आम्ही.

ती : काय चाललंय नेमकं तुमचं?  तिला भेटल्यापासून मला तुझ्यात बदल जाणवतोय.

तो : गैरसमज आहे तो तुझा..  उलट तुच कन्फ्युज आहेस..
काय ठरवलंस तू?  त्याला कधी सांगणार आहेस?

ती : विषय बदलू नकोस..  त्याला कसं सांगायचं..  ते मी बघेन..  आणि तू म्हणतोस तेवढं सोप्पं नाही हे...  सर्वांना कळलंय.. माझ्या कुटुंबालाही आणि त्याच्या कुटूंबालाही.  आपल्याला भेटायला उशीर झाला..

तो : मला सांग..  तू माझ्यावर नक्की प्रेम करतेस ना?  मग त्याला कळवायला काय अडचण आहे? तू एका दगडावर पाय ठेव..  नाहीतर खुप अडचण होईल.

ती : तुला काय रे बोलायला?  तीन वर्ष झालीत.. मी माझ्यापरीने प्रयत्न करतेच आहे ना?  त्याचा राग तुला माहीत नाही..  जितका प्रेम तो माझ्यावर करतोय तितका राग झाला तर कल्पनाही करवत नाही.

तो : हम्म..  श्रद्धा सांगत होती त्याचा राग..

ती : वेट..  तुझ्या तोंडी सारखं तिचेच नाव येतंय. तू डबल गेम करतोयस का?

तो : का?? तू नाही करत आहेस आणि एक गोष्ट नक्की..  शी इज मोअर ब्युटिफूल अॅन्ड हॉट दॅन यू..  हे तू ही मान्य करशील.

ती : आलं ना खरं तोंडून? मला कळतंय आता सर्व.. म्हणूनच मी घाई करत नव्हते.  तुझा भरवसा नाहीच मला.

तो : हो का?  लवकर कळालं तुला..
एक काम कर..  तू त्याच्याबरोबर जा..

ती : ते तू नको सांगू मला.. मी जाईन कुठेही.  पण वेळेवर तुझं सत्य समजलं..
मी घाई केली नाही तेच चांगलं...

तो : नकोच करु घाई तू..  तू त्याच्यासोबतच रहा. लायकी तीच आहे तुझी

ती : शट अप..  मला नाही बोलायचं यापुढे तुझ्याजवळ.. आणि श्रद्धा माझी मैत्रीण आहे..  तिलाही फोन करायचा नाहीस तू.

तो : गो टू हेल..

समोरुन फोन ठेवल्याचा आवाज आला...

त्याने पुन्हा नंबर दाबले...

तो : हॅलो..  श्रद्धा..
झालं बोलणं इट्स ब्रेकअप नाऊ..

श्रद्धा : तू ग्रेट आहेस..  असं ठरवून ब्रेकअप करणारा मी पहिल्यांदाच पाहतेय.

तो : श्रद्धा..  ती सुखी रहावी इतकीच इच्छा आहे.  प्रेम काय तिला त्याच्याकडूनही मिळेल.  माझ्या प्रेमामुळे तिची द्विधा मनस्थिति होत होती.  आता माझा राग तिला माझे प्रेम विसरायला लावेल.

श्रद्धा : मग तू?

तो : मी काय? प्रत्येक दुःखावर एकच मलम आहे...
.
वेळ..

श्रद्धा : ती खरंच नशीबवान आहे रे.   तिला तुझ्यासारखा प्रेम करणारा भेटला.  काश.. मलाही...

तो : गप्प बस..  चल..  आता यानंतर आपलाही संपर्क नाही होणार.  तिच्या संपर्कातले सर्व दुर करायचंय मला..  आणि तिला तू हे अजिबात सांगणार नाहीस.. शपथ आहे तुला.. बाय..

डोळे पुसत त्याने फोन ठेवला...

Saturday, 22 July 2017

स्मशानातली रात्र

 ......स्मशानातली रात्र......



" चॅलेंज स्विकारलंय तर आज मी जाणारच .. "
सुदर्शन मनातल्या मनात बोलत होता.

परवा एका ग्रुपवर भयकथेच्या पोस्टवर भुतांची खिल्ली उडवल्यावर लेखकाने स्मशानात जाऊन अमावस्येची एक रात्र घालवायचे चॅलेंज दिले.  सोबत प्रत्येक तासाने फोटो पाठवायचे चॅलेंज सुद्धा..
त्याने ते स्विकारलं आणि आज ती रात्र आली होती.
सुदर्शनला सकाळी त्या लेखकाचा डायरेक्ट फोनच आला..

" सो डेअर डेविल...  रेडी का?  चॅलेंज स्विकारलंय आपण,  आता मागे हटू नका.  माझा नंबर आलाय त्यावरच दर तासाने फोटो पाठवायचे आहेत तुम्हाला.  आपलं हे चॅलेंज रात्री अकरा ते सकाळी पाच पर्यंत चालणार आहे.
मी जागाच आहे...  तुम्ही फक्त झोपू नका...  प्रत्येक तासाच्या पहिल्या पाच मिनीटांत तुमचा फोटो येईल अशी अपेक्षा करतो.  ओके ना? " लेखक महाशय हसत होते.  काहीसे विचित्र स्वर होता त्यांचा.

" हो नक्की सर..  चॅलेंज घेतलंय तर पुर्ण करणारच मी,  बरोबर अकरा पाच ला पहीला फोटो तुमच्याकडे येईल.  " सुदर्शन आत्मविश्वासपुर्वक बोलला.

" यंग बॉय...  दॅट्स नॉट सो सिंपल..  टेक केअर..  बाय.. " फोन कट झाला.

आलेला नंबर सेव्ह केल्यावर त्याने सहज डीपी चेक केला
डीपीला एक भयंकर चित्र होते स्टेटसला लिहिलं होतं

".. स्मशानातली रात्र..
कमिंग सून "
लेखकाने आपल्याला घाबरवायला हे सर्व मुद्दाम केलंय हे लक्षात न येण्याएवढा तो दुधखुळा नक्कीच नव्हता.

आज घरी कोणी नव्हते म्हणून कामावर दांडी मारुन दिवस झोपूनच काढला.  सुदर्शनने रात्री बरोबर दहा वाजता गावाबाहेरच्या स्मशानाजवळ बाईक उभी केली.
गावाकडे यावेळेला याबाजूला कोणीच येत नाही हे त्यालाही माहीत होते.

पाठीवरची सॅक सांभाळत त्याने स्मशानात प्रवेश केला.

पहिलं पाऊल स्मशानात पडल्या पडल्या गावाकडच्या बाजूने एक कुत्रा जोराने विव्हळला.  त्याच्या हृदयात क्षणभर का होईना पण चर्र झालंच...
हातातली टॉर्च त्याने स्मशानातल्या आतल्या भागात फिरवली.

अर्थात तिथे कोणी नव्हते..
रातकिड्यांच्या आवाजात तो अंधार अधिकच गडद होत होता..
फार वर्षांपुर्वी तो स्मशानात आला होता.  बाबांना स्वतःच्या हाताने अग्नी देताना हमसून हमसून रडला होता.  त्यानंतर आज...
गावात सर्व जातीधर्माचे लोक असल्याने स्मशानाचे  तीन भाग पडले होते पहिल्या भागात ख्रिश्चन लोकांची थगडी, नंतर पुढे मुस्लिमांच्या कबरी आणि मग टोकाला हिंदूंसाठी चिता रचायचे दोन प्लॅटफॉर्म..  तिन्ही भाग एकाच दृष्टिक्षेपात दिसतं होते.
बॅटरीच्या उजेडात पिंपळाखालचा पार त्याला स्पष्ट दिसला..
रात्र घालवायला हा पारच मदत करेल हे सुदर्शनने ताडले.

पाठीवरची सॅक त्याने पारावर ठेवली मात्र...

पिंपळावरुन कोणीतरी फडफडत गेले...  त्याचा आवाज लांब लांब जात गायब झाला.
बहुतेक घुबड किंवा वटवाघुळ असणार.  त्या आवाजाकडे दुर्लक्ष करुन त्याने पारावर चढून पिंपळाला टेकून बसकण मांडली.

घड्याळात अकरा वाजल्या बरोबर त्याने खिशातून फोन काढला..
लेखक महाशयांना सेल्फी काढून पाठवला..  आणि त्यांच्या रिप्लायची वाट बघू लागला..

दोन मिनीटांतच त्यांचा रिप्लाय आला.

" वेल डन मिस्टर डेअर डेविल.  यु आर रिअली अ ब्रेव्ह मॅन..  बट हॅव यू नोटिस?  देअर इज समथिंग स्ट्रेंज इन युवर सेल्फी..  फोटोत त्या मागच्या झाडाखाली पहा. "
खरंच फोटोत त्या झाडाखाली एक आकृती दिसत होती..  त्याने अलगद मान फिरवून त्या झाडाकडे पाहीलं...
तिथे कोणी नव्हते.

सुदर्शन मोबाईल मध्ये टाईप करु लागला.
" तिथे कोणीही नाही.  अंधारामुळे आकृती दिसतेय.  तुमच्या पोस्टवर सुद्धा हेच म्हटलेलं मी..
भुत म्हणजे कमकुवत मनाने केलेले मनाचे खेळ..  "
" ओके..  यू कॅरी ऑन...  सी यु ऍट ट्वेल ओ क्लॉक..  " लेखक महाशय ऑफलाईन झाले.

पाच मिनीटेच झाली असतील..  अचानक वारा वाहू लागला..  हळू हळू वाढत तो जोरात वाहू लागला..

वाऱ्याने तिथला पाला पाचोळा उडून सुदर्शनच्या अंगावर येऊ लागला. अचानक आलेले हे वादळ विश्वास ठेवण्यापलिकडचे होते..
डोळ्यात धुळ जाऊ नये म्हणून वारा वाहत होता त्याच्या विरुद्ध दिशेला पिंपळाच्या खोडाजवळ जागा बदलून तो बसला..
अचानक कोणी तरी कानात पुटपुटल्यासारखं त्याला जाणवलं..

" अहं..  हा आवाज वाऱ्याचाच होता..  भास असेच होतात..  " त्याने मनाला धीर दिला.

पण आता तो आवाज स्पष्ट आला...

" कशाला मरायला आला आहेस इथे? " आवाज ओळखीचा वाटत होता...  सुदर्शनने खुप आठवले....
मग एकदम आठवलं..

बाबा...

" पण हे कसं शक्य आहे... ?
त्यांना जाऊन तर पंधरा वर्षे झालीत.. "

तोच पुन्हा आवाज आला...

" तू आत्ताच्या आत्ता इथून जा...  एकदा पलिकडचे उठले..  की मग तू इथेच अडकून राहशील..  मला जास्त वेळ तुझ्याशी संपर्क नाही करता येणार..  " त्याच्या कानात तो आवाज स्पष्ट येत होता.

" बाबा..  तुम्ही आहात हे?  कुठे आहात.. ?  तुम्ही तर पंधरा वर्षांपुर्वीच..  मग आता मला तुमचा आवाज कुठून येतोय..  आणि पलिकडचे म्हणजे कोण?  तुम्ही आधी समोर या... " तो संभ्रमीत अवस्थेत बोलत होता.

" तू....  जा....  इ थू न....  " आवाज लांब लांब होत बंद झाला..  त्याबरोबर ते वादळही..

हा नक्की भासच....
सुदर्शन मनाशी बोलला..  तो पुन्हा त्याच्या पहिल्या जागेवर गेला..
मघाच्या घाईगडबडीत हातातली बॅटरी आणि पाठीवरची सॅक तो तिथेच ठेवून आला होता...

लालसर प्रकाशात त्याने त्या जागेकडे पाहीलं..
तिथे सॅक आणि बॅटरी नव्हती..  वादळामुळे पाराखाली पडल्या असाव्यात म्हणून त्याने पाराभोवती चक्कर मारुन पाहीली.  तिथे पाल्यापाचोळ्याखेरीज काही नव्हते...

अचानक...

त्याच्या लक्षात आलं..

लालसर प्रकाश???
हा कुठून आला?

समोर जे त्याने पाहीलं ते बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली...

अर्धवट जळालेली चिता पुन्हा भडभडून पेटू लागली होती...

" सुदर्शन..  घाबरु नकोस...  वादळामुळे पुन्हा पेटलीय ती...  उलट विचार कर..  अमावस्येच्या अंधारापेक्षा आता चितेचा का होईना तुला प्रकाश मिळतोय..  "


त्या प्रकाशातच त्याने सॅक आणि बॅटरीचा शोध सुरु केला.  पण दोन्ही वस्तू तिथे नव्हत्याच जणू अशा गायब झाल्या होत्या..

त्याने तो नाद सोडून दिला..
पारावर जाऊन बसला..
घड्याळात पाहीले तर बाराला दोन मिनीटे कमी होती..
त्याने खिशातून फोन काढला आणि चिता दिसेल असा सेल्फी फोटो काढून लेखक महाशयांना पाठवून दिला.
ते ऑनलाईन येईपर्यंत बसल्या बसल्या दर तासांनी वाजणारा अलार्म सेट केला.
पाच मिनीटांनी ते ऑनलाईन आले

" दॅट्स ग्रेट गोईंग..
चिता कशी पेटली पुन्हा?  काही वेगळा अनुभव आलाय का...  मिस्टर डेअर डेविल?  " त्यांचा मॅसेज झळकला..

" नाही फार म्हणावा असा काही नाही थोडा वारा सुटला होता त्याने चिता पेटली...  बाकी काहीच नाही.. " त्याने झालेल्या गोष्टी लपवल्या..

" गुड.. आय थिंक यू आर लकी...  पण खरी जाग आता सुरु होईल बारा नंतर..  बेस्ट लक.. एक वाजता.. फोटोची वाट बघतोय..  " ते ऑफलाईन गेले.

फोन खिशात ठेवून त्याने चितेतल्या अग्नीत लक्ष दिले. कितीतरी वेळ तो त्या ज्वाळांकडे पाहत बसला होता.   त्या ज्वाळा वेगवेगळे आकार तयार करत होत्या.  सुरुवातीला काही प्राणी दिसले,  एखादा माणूस दिसायचा.. मग मध्येच काहीतरी वेगळेच दिसायचं..
अचानक एक चेहरा दिसला..
ओळखीचा..

बाबा...??

त्यांचाच चेहरा..  कोणाशी तरी झगडत होता तो चेहरा..  कोणीतरी त्या चेहऱ्याला ओढत होते...  जणू तो चेहरा आपल्याला काहीतरी सांगतोय आणि कोणीतरी त्याला अडवतंय..

" सुदर्शन काय झालंय तुला? हे सर्व भास आहेत.  चेहरा दिसणे हे सुद्धा तुझ्या मनाचे खेळ आहेत...  सारासार विचार कर..  " स्वतःच्या मनाला धीर देत त्याने नजर हटवली..

नजर एका जागीच खिळून राहीली..  एका थडग्याजवळ जमीन हलत होती..

अंधूक प्रकाशातही हालचाल स्पष्ट दिसत होती.

एक सडलेला हात..  मातीतून बाहेर येत होता..
भितीची एक जाणीव त्याचे रक्त गोठवून गेली.

आजवरच्या त्याच्या सर्व विचारांना छेद देणारा हा प्रकार होता.  तो लगेच पारावरुन उठला आणि खोडामागे जाऊन त्या अघटीताकडे पाहू लागला..

अचानक थंड वाऱ्याची लहर आली..  खुप थंड..

तो सुकलेला,  जागोजागी फाटलेला, फाटलेल्या जागेतून सडकं मांस लोंबकळत असलेला देह आता थडग्यातून पुर्ण बाहेर आला होता. .

सुदर्शन डोळे विस्फारुन त्याच्याकडे बघतच राहीला.  हे असं काही दिसेल याची त्याला अजिबात कल्पनाच नव्हती.  कपड्यांची लक्तरे व्हावीत तशी शरीराची लक्तरे झालेला तो हिडीस देह आता पाराच्या दिशेने सरकू लागला होता..
चितेच्या लालसर प्रकाशात ते कलेवर अजूनच भयानक दिसत होतं
सुदर्शनचे लक्ष त्याच्या डोळ्याकडे गेले...
डोळे कसले...  नुसत्याच खोबणी..
उजवा डोळा गालावर लोंबकळत होता आणि  डावा डोळा नव्हताच.
प्रसंगावधान राखून सुदर्शन लगेच पिंपळाच्या झाडावर चढला.
वरुन दिसणारे दृश्य तर त्याहून भयानक होते.  प्रत्येक थडग्यातून एक एक देह बाहेर येत होता.  स्त्री - पुरुष, तरुण - वृद्ध सर्व प्रकारचे देह पाराकडे येत होते.

आजपर्यंत सिनेमात पाहीलेले दृश्य प्रत्यक्षात पाहील्यावर त्याच्या अंगाला घाम फुटला.

इतक्यात खिशातला फोन वायब्रेट होऊ लागला.
एक वाजल्यामुळे फोनने रिमांईंडर दिले होते.
फोन काढून अजिबात आवाज न करता त्याने पाराकडे येणाऱ्या विचित्र देहांचा फोटो काढला आणि लेखकाला पाठवला..  नंतर लगेचच सेल्फी काढूनही तो सेंड केला..
उत्तराची वाट न बघता तो खालचे दृश्य बघू लागला.

सगळे एव्हाना पाराखाली जमले होते.
त्याच्या अस्तित्वाची जाणीव बहुतेक त्यांना झाली होती.

पुन्हा एकदा अत्यंत थंड वारा सुटला..
फांदिवर बसलेल्या सुदर्शनला त्याच्या पाठीमागे काहीतरी हालचाल जाणवली.

थंडगार स्पर्श...  होता त्या हाताचा...

त्याने चेहरा वळवला मात्र..  त्या नखं वाढलेल्या पंजाची थंडगार पकड त्याच्या मानेभोवती बसली..


" ही...  ही...   ही...  ही... "  असं छद्मी हास्य आसमंतात घुमलं.

एका क्षणात ती त्याची मानेवरची पकड न सोडता त्याच्या समोर येऊन ठाकली ..  बघूनच उलटी येईल असे तिचे रुप होते..  मळक्या काळ्या रंगाच्या कपड्यात हडकुळी देहयष्टी असलेली,  भले मोठ्ठं नाक..  लाल डोळे,  चेहऱ्यावर ओघळणारे मांस, आणि अत्यंत तीव्र दुर्गंध..
चेटकीण, जखीण की मग अजून कोण?  या विचारात असताना..  पुढच्या क्षणाला त्याला तिने पिंपळावरुन खाली फेकलं.

" माझ्या जागेत यायचं नाही...  ही ही ही ही ही ही
चल जा इथून..

दुखणारे अंग सावरत तो उठून बसला तेव्हा त्याला समजलं की चारही बाजूला ते समंध आहेत.

तो उठून उभा राहीला..
सगळीकडे भयंकर दुर्गंधी सुटली होती.
पाराला संपुर्णपणे त्यांनी घेरलं होतं. ते साधारण साठ सत्तर तरी होते.  सगळ्यांचे हात त्याला स्पर्श करायला पुढे येत होते.
पुन्हा झाडावर चढलो तरी वरुन ती पुन्हा धक्का मारणार.
एकच मार्ग यांच्यातुनच मार्ग काढायचा..

एका जागी त्यांची साखळी सुटल्यासारखी होती.
" हाच तो क्षण..
सुदर्शन..  याक्षणी इथून निघाला नाहीस तर तुझा मृत्यु निश्चितच.  जोराने पळ "
मनाशी ठिय्या करुन तो उसळला.
त्याच्या त्या हालचालीची कल्पना नसलेली ती घाणेरडी शरीर एकदम थबकली. त्यांच्या कड्यातून बाहेर निघताना त्यांचा स्पर्श झालाच त्याला.
थंडगार, लिबलिबीत शरीर,  दुर्गंधीचे भपकारे येणारे..
सुदर्शन थेट चितेकडे पळाला..
त्या उजेडाचा अचानक त्याला सहारा वाटू लागला.
चितेच्या जितका जवळ जाता येईल तितके तो गेला आणि मागे वळून पाहीलं. ते देह त्याच्या दिशेनेच येत होते.  पण एका परीघाच्या पुढे त्यांना येता येत नव्हते
जणू त्यांना कोणीतरी जखडून ठेवले होते.

खिशातला मोबाईल वाजला म्हणून त्याने त्यापरिस्थितीतही फोन बाहेर काढला.
लेखकाचे मॅसेज होते.

" काय झालं? फोटो कसला पाठवलाय दुसरा?  नुसताच काळोख दिसतोय? "

" हॅलो यंग मॅन आर यू ओके? इज एनिथींग राँग? "

त्याने लगेच टाईप केलं " नथींग.. " त्याला तिथे घडणाऱ्या गोष्टी लेखकाला कळून द्यायच्या नव्हत्या.

फोन खिशात ठेवून.  तो बाहेर निघण्याचा रस्ता शोधू लागला.
मागची भिंत खुपच उंच होती.  एकच रस्ता होता जो त्या हिडीस देहांच्या मधून जात होता.  आता त्यांची संख्या वाढली होती.
संपुर्ण स्मशान जागृत झालं होतं. सगळी थडगी आणि सगळ्या कबरी उघडल्या गेल्या होत्या.

सुदर्शनला त्याच्या डोक्यावरुन काहीतरी गेल्याचे जाणवले.... पांढुरकं...  आजू बाजूला नजर फिरल्यावर त्याला ते स्पष्ट दिसू लागले.
पांढरे मनुष्याकृती असलेल्या आकृत्या होत्या त्या. ...

अतृप्त आत्म्यांनी त्याला वेढले होते.

आता एक एक त्याच्या भोवती फिरु लागले होते.

" सुदर्शन..  तुझा अंत आता नक्की.  इकडे आड तर तिकडे विहिर..  कुठे जाणार तू?  " सुदर्शन स्वतःशीच बडबडत होता.
इतक्यात एका आत्म्याने त्याच्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न केला.  दोन फुट तो उंच उचलला गेला.. त्या आत्म्याला यश आलं नाही..  म्हणून दुसरा आला.
प्रत्येक प्रयत्नासोबत तो परीघाकडे सरकत होता.
जणू काही हे आत्मे त्याला त्यांच्याकडे सोपवत होते.

काही वेळातच तो पुन्हा त्यांच्या हातात जाणार होता.

देव...

आपण इतकी वर्ष भुत ही संकल्पना खोटी मानली,  पण ती समोरच दिसतेय..
म्हणजे देव ही संकल्पना सुद्धा असणार...

अचानक त्याच्या तोंडी आलं
" भीमरुपी महारुद्रा.. वज्र हनुमान मारुती.. "
लहानपणी बाबा त्याच्याकडून म्हणून घेत होते.

आत्मे अचानक लांब पळू लागले.
पण परिघाबाहेरचे मात्र तिथेच होते. त्यांचे हात त्याच्या दिशेने झेपावत होते.

अर्धा पाऊण तास तो तिथे झगडत राहीला.  शेवटी त्याची बोलण्याची ताकद संपली.

खिशातल्या मोबाईलचे वायब्रेशन जाणवलं.... तीन वाजले होते. त्याने चितेच्या दिशेने फोटो काढला आणि लेखकाला पाठवून दिला.

हे करत असताना तो एक गोष्ट विसरला.....

तो स्त्रोत्र बोलायचा थांबला होता....

पुढच्या क्षणी तो हवेत एका धक्क्याने उडवला गेला. परीघापलीकडे जाताना त्याला समजलं की त्याचा अंत आता जवळ आलाय.

स्मशान आपली भुक भागवत होतं...  सुदर्शनच्या किंकाळ्या ऐकणारे जवळपास कोणीही नव्हते.

लेखकाने चार वाजून दहा मिनीटांनी आपला लॅपटॉप सुरु केला आणि हसत हसत टाईप केलं...

".....स्मशानातली रात्र.....

" चॅलेंज स्विकारलंय तर आज मी जाणारच .. "
सुदर्शन मनातल्या मनात बोलत होता. "






Thursday, 29 June 2017

वळणावरची चांगी

..... वळणावरची चांगी .....


" अरे काय झालं अचानक? दोन दिवसात चार अॅक्सीडंट आणि सर्वच्या सर्व मृत्युमुखी? तेही एकाच जागेवर? "
इन्सपेक्टर थोरात टेबलावरची टोपी उचलत बोलले..
" चला हवालदार साळूंखे जीप काढा. आता पुन्हा तेच काम.. " जीपकडे जात थोरातांनी ऑर्डर सोडली.
हवालदार साळूंखेंनी एक वेळ साहेबांकडे पाहीलं आणि गाडी कडे गेले.
गेल्या दोन दिवसातली ही चौथी खेप होती त्यांची.
गाडी सुरु झाल्यावर साळूंखे बोलते झाले..
" साहेब.. मी काल माहीती काढली थोडीफार. त्या वळणावर रस्ताचे काम चालू असताना एका मजूर बाईला डंपरने उडवले होते. ती थेट खाली दरीत जाऊन पडली होती. बाजूच्या गावातली लोकं म्हणताहेत तिचेच भूत झालंय. आणि रात्री एक नंतर येणाऱ्या गाड्यांना दरीत ढकलतंय "
" साळूंखे?? या असल्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे? अहो.. समजा जर ते भुत असेल तर ते ढकलेल कसं? � जरा तरी विचार करा की. काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम दिसतोय मला. एकाच जागी लागोपाठ अपघात होताहेत म्हणजे काहीतरी टेक्नीकल दिसतंय मला." थोरात साळूंखेंच्या चेहऱ्याकडे बघत हसत म्हणाले.
" नाही साहेब, आज संध्याकाळी गावातल्या लोकांनी मांत्रिक आणला होता. त्यानेही तेच सांगितलंय. " साळूंखे गिअर टाकत म्हणाले.
" साळूंखे.. सोडा हे अंधश्रद्धेचे चाळे. इथे माणूस मंगळावर निघालाय आणि तुमची झाडावरची भूतं सुटेनात. नाव काय त्या मांत्रिकाचे? " चिडून थोरातांनी साळूंखेंना प्रश्न केला.
" अद्भूतनाथ.. साहेब.. अद्भूतनाथ .. लयी जालीम आहे साहेब. "साळूंखेंच्या डोळ्यात त्याची भिती स्पष्ट दिसत होती.
" एकदा हे वळणावरचे अॅक्सीडेंट चे प्रकरण सॉल्व होऊ दे.. मग तुमच्या त्या अद्भूतनाथाचे भूत उतरवतो.
गाडीचा वेग अचानक मंदावला...
" या वळणावर नाही साळूंखे.. पुढच्या वळणावर, विसरलात की काय अद्भूतनाथाच्या भितीने? " इन्सपेक्टर थोरात साळूंखेंना चिडवत म्हणाले.
" साहेब अजून उजाडले नाही गाडीचा वेग कमीच असलेला बरा. " हवालदार साळूंखे रस्त्यावरची नजर अजिबात न हटवता बोलत होते.
" बरं.. बरं.. मी दरवाजा उघडा ठेवू का? म्हणजे त्या भुताने धक्का मारला की लगेच बाहेर पडायला बरं "
थोरात मिश्कील हसत होते.

गाडी वळणावर आली. तिथे गावातली १५-२० लोकं होती आणि चौकीतले दोन हवालदार होते.
साहेबांना पाहून दोघांनी सलाम ठोकला आणि परिस्थिति समजवून सांगायला सुरुवात केली.
" अगदी कालच्यासारखाच अपघात आहे साहेब. गाडी MH -01 स्विफ्ट आहे. गाडीवरचा ताबा सुटला आणि सरळ जावून गाडी दरीत पडलीय. गाडीत तीन माणसं होती. एक पुरुष साधारण ४०-४२ वर्ष एक स्त्री साधारण ३५-३७ वर्ष आणि एक मुलगा १२ वर्षाचा. ऑन द स्पॉट डेथ झाली साहेब. "हवालदार कदमांनी माहीती दिली.
" बरं.. अॅम्ब्युलन्स मागवा. डेडबॉडी काढायला कालच्या त्या दोघांना बोलवा. पंचनामा करुन घ्या. नावं कळाली की संबंधित पोलिसस्टेशनला कळवा. MH 01 आहे म्हणजे मुंबई वालेच कुटूंब दिसतंय. जरा बॅटरी द्या इकडे.. " म्हणत त्यांनी कदमांसमोर हात केला.
" साळूंखे.. इकडे या जरा. काय वाकून बघताय तिकडे? धक्का मारेल कोणीतरी " मिश्किल हसत थोरातांनी साळूंखेंना हाक मारली.
ओशाळलेल्या चेहऱ्याने साळूंखे धावत थोरात साहेब उभे होते तिथे गेले.
बॅटरीने एक जागा दाखवत म्हणाले
" हे पहा... टायरची खुण पहा.. गाडी सरळ गेली अजिबात लेफ्ट राईट न करता. काही प्रयत्न दिसत नाही स्टेअरींग फिरवल्याचा. कोणी धक्का मारला असता तर फरफटल्याच्या खुणा दिसल्या असत्या. हे वळण जरा शार्प आहे. मी सा बां विभागाला तेव्हाही कळवलं होतं की लवकरच कठडा बांधा म्हणून, दिस इज ओन्ली बिकॉज ऑफ दिज सा बां पिपल.. " हवालदार साळूंखेंनी मान हलवली.
" साहेब.. साहेब... या इकडे एक डेडबॉडी वर घेतली. " कदमांचा आवाज ऐकून थोरात तिकडे निघाले.
कदमांनी दोरीला बांधलेली ती डेडबॉडी सोडवली होती.
" साहेब श्रीधर काळे नाव आहे याचे. मुंबईचाच आहे... " कदम सांगत असताना हवालदार साळूंखेंचे लक्ष त्याच्या डोळ्याकडे गेले.
कालच्या अपघातातील विष्णु गुरवांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर हेच भाव होते. आत्यंतिक भितीने ते डोळे थिजले होते.
साळूंखेंच्या मनात विचार आला की साहेबांना ही गोष्ट सांगावी परंतू पुन्हा साहेब हसतील म्हणून ते शांत राहीलेदोन गावकरी बोलत होते त्यांच्याकडे थोरातांनी कान वळवले
" बघितलाव? अद्भुत्या बोलला तसाच होताय ना? ही बया आता येक येकट्या गाड्यांना धक्कं मारुन खाली पाडनार आनी जीव घेनार. चांगी पक्का बदला घेनार असा दिसताय. या वाकना पासून लांबच रायला हवा नायतर कायतरी बंदोबस करायला हवा. " पहिला गावकरी जस जसे बोलत होता तस तसे दुसरा थरथरत होता.

" ही लोकं काही केल्या सुधारणार नाहीत. साध्या अपघातात कसले भुतं खेतं आणताहेत? " इन्सपेक्टर थोरात मनातल्या मनात बोलत होते.
तिकडे राहीलेल्या दोन्ही बॉडीज वर आणल्या होत्या. ती दोघं झोपेतच गेले असावेत. मुलाचा देह पार चेचला गेला होता.
थोडंफार उजाडायला लागलेलं एव्हाना...
डेडबॉडीज हॉस्पिटलला पोस्टमार्टमसाठी पाठवल्या गेल्या होत्या. क्रेन लावून गाडी काढण्यात आली होती. जागा साफसुफ करण्यात आली...
इन्सपेक्टर थोरांताची ड्युटी संपली होती.
खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
" नेमकं काय होत असेल? एकाच जागी एकाच प्रकारे अपघात होणे ही साधी बाब नक्कीच नाही....
की मग खरोखरच भुताटकी वगैरे आहे...
छे.. छे.. मी सुद्धा विचित्र विचार करायला लागलो...
अधिकाऱ्याला सांगून आज रेतीने भरलेले पिंप तर ठेवून घेतले पण त्याने गाडी थांबेल पण अपघात टळणार नाही. किमान मृत्यू तरी नाही होणार. या गावकऱ्यांना एकदा जाऊन भेटले पाहीजे. त्यांच्या मनातली ती अद्भुतनाथाची भिती आणि भुताची अंधश्रद्धा संपवली पाहीजे. त्यासाठी आधी या अद्भूतनाथाची कुंडली काढली पाहीजे.. " विचार करत करत त्यांना झोप लागली.
दुपारी अधिकाऱ्यांना फोन करुन पिंपांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे इन्सपेक्टर थोरात थोडे आनंदात होते
संध्याकाळी ड्युटीवर आल्यावर मनातल्या मनात एकच विचार सुरु होता की आज तरी नवीन अपघात नको होऊ दे.
नेहमीची कामे सुरु असताना रात्री साडे अकरा वाजता फोन खणाणला...
" हॅलो... पोलिस स्टेशन.. अपघात झालाय.. " हवालदार साळूंखेंची झोप उडाली. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून थोरात काय ते समजून गेले.
वळणावर पोहचल्यावर लक्षात आलं की.. तो ट्रक होता पिंपांसकट खाली गेला होता. ड्रायव्हर मेला होता. क्लिनर जिवंत होता, पण खुप जखमी झाला होता.
हॉस्पिटलमध्ये शुद्ध आली तेव्हा कळले की तो झोपलेला होता. म्हणजे आता ही निराशाच हाती लागली होती.
मग शेवटी इन्सपेक्टर थोरातांनी ठरवले की अद्भूतनाथाची भेट घ्यायला हवी.
बघूया काय माहीती मिळते चांगीबद्दल.
साळूंखेंच्या मदतीने त्याची भेट स्वतःच्या घरी ठरवली.
सकाळी ११ वाजता भगव्या कफनीत अद्भूतनाथ आला.
" अल्लख निरंजन... बोला साहेब आमची आठवण का काढली? " हातातला चिमटा वाजवत अद्भूतनाथाने प्रश्न केला.
" नाटकं बंद कर आणि मला हे सांग...
चांगीबद्दल तुला काय माहीत आहे? आणि जे आहे ते सांग.. उगाच स्टोऱ्या बनवून सांगू नको." त्यांच्या आवाजातली जरब पाहूनच अद्भूतनाथ थंड पडला.
" साहेब... चांगी ही तिथे रस्त्याचे काम करणाऱ्या लोकांपैकी होती. एका संध्याकाळी एका गाडीने तिला त्या वळणावर उडवले. तिचे चिंधड्या झालेले शरीर दुसऱ्या दिवशी दरीत मिळाले होते तेव्हापासून दर अमावस्येला ती त्या वळणावर दिसते. लोक म्हणतात की तिचं भूत झालंय. " एवढं बोलून त्याने दम घेतला.
" हे मलाही माहीत आहे.. आतली गोष्ट सांग... खरंच असं आहे का? मी भुत वगैरे मानत नाही म्हणून मला दिसत नाहीत भुतं. तू मानतोस ना? मग सांग लवकर काय भानगड आहे? " थोरातांचा आवाज वाढला होता.
" साहेब.. माझं ऐकाल तर यात तुम्ही पडू नका. गावकरी तिचा बंदोबस्त करायला तयार झालेत. एक रात्रीची पुजा आणि यज्ञ केला की तिला मुक्ती देईन मी.. मग ती त्रास देणार नाही कोणाला. मात्र तुम्ही आत घुसलात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो... म्हणजे माझ्याकडून नाही.. चांगीकडून... "

तो उठला...
अचानक मागे फिरुन म्हणाला..
" साहेब आज काही झाले तरी तुम्ही वळणावर जाऊ नका.. तुम्हाला धोका आहे. मला जे काही कळतं त्यावरुन सांगतोय.. तुम्ही आज तिकडे जाऊच नका.. गावकऱ्यांनी आज तिला मुक्त करण्याची सुपारी दिलीय मला.. अल्लख निरंजन.. " म्हणून तो निघून गेला.
संध्याकाळी अंधार पडल्यावर इन्सपेक्टर थोरात चौकीतच फेऱ्या मारत होते. अचानक थांबले आणि साळूंखेंजवळ गेले.
" साळूंखे... चला आज मी तुमचा ड्रायव्हर होतो. एक महत्वाचे काम आहे ते करुन येऊया.. बघा ही वळणावरच्या अपघाताची केस आज स्वॉल्व होते की नाही. " ते म्हणाले आणि इकडे साळूंखेंना घाम फुटला.
" साहेब नको.. ना.. का विषाची परिक्षा घेताय? तुम्हाला काय सांगितलंय अद्भूतनाथाने विसरलात? " साळूंखेंनी हात जोडले होते.
" अरेव्वा.. तुम्हाला सांगितले तर अद्भूतनाथाने? तर मग चलाच.. बघा कसा शब्द खोटा ठरतो तुमच्या अद्भूतनाथाचा आणि चांगी वांगी कोणी नाही हे सिद्ध करुन दाखवतो मी.. " चाव्या ताब्यात घेत थोरातांनी ऑर्डर सोडली.
जीप बाहेर निघाली तशी साळूंखे बोलले..
" साहेब इकडून कुठे? खुप मोठा फेरा पडेल. सरळ चला की "
" साळूंखे.. आपलं हेच चुकत होतं.. आता कळेल नेमकं काय होतंय ते. आपण त्या रस्त्यावरुन प्रवास केल्याशिवाय कसे समजेल की अपघात का होताहेत? आपण नेहमी उलट बाजूने येत होतो. दरीत पडणारी गाडी समोरच्या बाजूने येत होती. आपण तपासणी फक्त त्या अपघाताच्या जागेची करायचो. त्या आधी काय होत असेल याचा कधी विचार केलाच नाही. चला लक्ष ठेवा.. आणि तो सिट बेल्ट लावा पहिला.."
पंधरा मिनीटांनी वळसा घालून ते त्या वळणाजवळ पोहचले. थोरांतानी अप्पर लाईट केली आणि श्वास रोखून गाडी चालवू लागले.
वळण अर्धे झाले... आणि अचानक...
दोन हात वर करुन संपुर्ण पांढरा रंग असलेली एक आकृती चमकली. एक क्षण.. थोरातही घाबरले.
थोरातांनी करकचून ब्रेक दाबले. गाडी जागच्या जागी थांबली...
" बघा साळूंखे... ही तुमची चांगी. लोक या गोष्टीला घाबरत होते आणि गाडीवरचा कंट्रोल सोडून दरीत जाऊन पडत होते. आपण आता कॉन्शस होतो म्हणून गाडी थांबवली, बाकीच्यांना संधीच मिळाली नसणार. अचानक अंधारात हे असलं काही दिसलं की कोणीही घाबरणारच. त्यात हा रस्ता निर्मनुष्य मग मनात खेळ सुरु होतात.
येतंय का लक्षात? अहो हा साबां विभागाने लावलेला सिमेंटचा बोर्ड आहे साधा पण कारागिरी केल्यामुळे माणसाचा आकार असल्याचा भासतोय. त्यात वर रिफ्लेक्ट होणारा पांढरा रंग मारलाय वेड्या कॉन्ट्रॅक्टरने. उगाच सात जीव गेले... साळूंखे... काही बोलत का नाहीत? "
साळूंखे बोलण्याच्या पलिकडे गेले होते. चांगीचे भूत जाता जाता... साळूंखे हवालदारांना घेऊन गेलं होतं..

Monday, 26 June 2017

हॅलो

... ट्रींग.. ट्रींग....  ☎


नक्की तोच फोन असणार....
मी फोन उचलला...
मी काही बोलण्यापुर्वीच समोरुन आवाज आला..
" हॅलो... अनिल आहे का? "
तोच अत्यंत मोहक आवाज... ज्याच्या मी पहिल्या दिवशी फोन आला तेव्हाच प्रेमात पडलो होतो.
" हा हा हा.. कोण बोलतंय? "
ती समोरुन काय बोलणार हे माहीत असणार हे माहीत असल्याने मला आधी हसूच आलं..
" मी मधू बोलतेय.. अनिलची माधूरी.. हा हा हा... " किती ते मधाळ हास्य. नुसत्या आवाजावर ती कशी दिसत असेल याचे आराखडे मनातल्या मनात मी बांधू लागलो होतो.
" हॅलो... हॅलो... " ती पुन्हा हसत हसत बोलली. हसणं कसलं... प्राजक्ताचा सडाच जणू...
" हां.. अहो... हा राँग नंबर आहे.. काल सांगितले की.. " मी गालातल्या गालात हसत सांगितले
" असं का करतोय तू अनिल.. मी तुझा आवाज ओळखत नाही का.. अरे मी माधूरी.. तुझी माधूरी... अनिलची माधूरी.. विसरलास का? " ती पुन्हा हसली.. या वेळी मागून अजून एका मुलीचा हसण्याचा आवाज आला.
" नाही अहो.. मी अनिल नाही.. नेमका कोणता नंबर हवाय तुम्हाला? " मी हसतच...
" हॅलो.. असं काय करतोस रे.. अरे मी तुझी माधूरी.. विसरलास का? आपण.. एकत्र होतो.. " पुन्हा तेच मधाळ हास्य...
" एकत्र होतो? हा हा हा हा.. कुठे होतो? कधी होतो? " मी अजूनही हसतच
" हॅलो.. असं काय करतोस.. परींदा मध्ये होतो की? ' तुमसे मिल कर ऐसा लगा ' गात होतो की? ... हा हा हा हा " किती गोड हसावं माणसाने?
त्या हसण्याबरोबर फोन कट झाला.
मागच्या आठ दिवसापासून तिचे फोन येत होते.
कोण होती?
का फोन करत होती?
काहीच कल्पना नव्हती..
पण तिचा फोन आला की तिने तो ठेवूच नये असं वाटायचं.... तिने नुसतं बोलतच रहावे... आणि मी नुसतं ऐकतच रहावे...
ती कोण असेल?
या प्रश्नाने माझी झोप उडाली होती, कारण जी कोणी होती ती मला ओळखत होती आणि रोज बघत सुद्धा होती.
दर दोन दिवसांनी तिचा फोन येतंच होता. त्यावेळी कॉलर आयडी हा प्रकार अस्तित्वातच नव्हता बहुतेक, नाहीतर लगेच नंबर सापडला असता.
मी ठरवलं...
ही नक्की कोण आहे ते शोधून काढणारच.
एमटीएनएलच्या हेल्पलाईनवर फोन केला. आलेले नंबर मिळू शकतील का याची चौकशी केली.
अर्थात अर्ज करा मग देऊ असं उत्तर आलं. काही चान्स दिसेना...
काही दिवस फोन आला नाही..
बारावीचे वर्ष असल्याने मी सुद्धा अभ्यासाला लागलो.
एकदिवस पुन्हा.. फोन वाजला... काय माहीत कसं.. मला जाणवलं की तिचाच फोन असावा. मी उचलण्याअगोदर लहान बहिणीने फोन घेतला..
" हॅलो.. हॅलो... कोण आहे? हॅलो... कोणच बोलत नाही.. " म्हणून तिने फोन ठेवून दिला.
मी फोनजवळच बसून राहीलो...
पुन्हा फोन येणार याची खात्री होतीच. पाचच मिनिटांनी पुन्हा फोन आला..
" हॅलो.. कोण बोलतंय? " मी कानात प्राण आणून विचारलं.
" हा हा हा... अनिल आहे का? मी त्याची माधुरी बोलतेय.. हा हा हा " माझा अंदाज चुकणारच नव्हता.
" बोला... मीच बोलतोय.. बोला.. " मी सुद्धा हसलो.
" अनिल.. का सोडून गेलास मला? तेरा करु दिन गिन के इंतजार आजा पिया आयी बहार... हा हा हा हा.. " या हसण्यावरच मी फिदा होता. हृदयात कसंनुसं होत होतं.
" अच्छा आज तेजाब वाली माधूरी का?... छान आहे.. सांगा की कोण तुम्ही? " मी पुन्हा विचारलं.
इतक्यात एक गोष्ट कानावर पडली ट्रेन चा हॉर्न वाजला मागे कुठेतरी. हा एक क्ल्यु होता...
" हो सांगेन... सांगेन.. एवढी कसली घाई... राहवत नाही का? मी तुला रोज बघते अनिल..क्लासला जाताना... ती लंबू मैत्रीण तुला जास्तच खेटून चालते की. तुम्ही पाचजण एकत्र जाता ना?" तिने हसत हसत धक्काच दिला.
बापरे.. ही खरोखरच पाहतेय मला. ती लंबू गुज्जू जरा जास्तच जवळीक करायची. मी तिच्यापासुन लांबच पळायचो, पण एकत्र असल्याने टाळू शकत नव्हतो.
" हॅलो... हा हा हा हा.. मैत्रिणीच्या आठवणीत गुंतलास की काय? " ती चिडवण्याच्या सुरात बोलली.
" नाही.. नाही... सांगा ना कोण तुम्ही? " मला राहवेना..
" सांगेन.. सांगेन.. एवढी कसली घाई.. बाय... " हसत हसत तिने फोन कट केला.
ट्रेनच्या हॉर्नचा आवाज अगदी जवळ असल्यासारखा होता. ट्रेनच्या इतक्या जवळ राहणारे माझ्या कोणीही ओळखीचं नव्हते.
खुप विचार केला.. मग एकदम डोक्यात वीज चमकली.. क्लासला जाताना एका ठिकाणी मी ट्रेनच्या वरुन जाणाऱ्या ब्रीजवरुन जात असे...
येस... ही तिथेच मला पाहत असावी....
दुसऱ्या दिवशी क्लास होताच.. ब्रीज जवळ पोहचलो आणि वर नजर फिरवली सगळ्या खिडक्या बंद होत्या.. फक्त तिसऱ्या मजल्यावरची खिडकी उघडी होती.. पडदा खिडकीबाहेर हव्याने उडत होता..
मित्रांबरोबर बोलत बोलत एक नजर त्या खिडकीवर होतीच... कोणीतरी होतं तिथे नक्की.. कारण वाऱ्याने उडणारा पडदा अचानक कोणीतरी धरुन ठेवल्याने उडायचा बंद झाला होता.
मी वर पाहतोय हे बहुतेक लक्षात आलं होतं तिथल्या व्यक्तीला. पण मी पाहीलंच नाही या आविर्भावात पुढे गेलो...
रिटर्न येताना गप्पांच्या ओघात लक्ष राहीलं नाही...
अचानक...
" अनिल.... " असा आवाज त्याच जागेवर आला..
तोच आवाज. खिडकीत कोणी नव्हते.. पण पडदा धरलेला होता.
सोबतच्या मित्र मैत्रिणींना समजू न देता गालातल्या गालात हसलो..
घरी पोहचल्यावर पाचच मिनीटांत फोन आला...
" हॅलो... अनिल... खुप हुशार हं तू. छान नजर फिरते तुझी. हा हा हा हा " म्हणजे माझा अंदाज चुकीचा नव्हता. जागा कळली होती.. आता व्यक्ति शोधणे कठीण नव्हते.
" हॅलो.. हॅलो.. तुला काय वाटतं? मी तुला सापडेन? " तिने प्रश्न केला.
" पिक्चरच्या शेवटी माधूरी. अनिलला भेटतेच.. हो ना? बघ आता हा अनिल कसा शोधतो तुला.. माय डीयर माधुरी.. " मी सुद्धा हसत उत्तर दिले.
" हो क्का??? बघू बघू " फोन कट झाला.
माझा तपास सुरु झाला, त्या जागी कोण राहत असेल याचा शोध लावू लागलो जवळपास राहणारे काही शाळेतल्या मित्रांकडे चौकशी केली तेव्हा त्या जागेवर डॉक्टरांचा दवाखाना आहे आणि दोन मुली त्यांच्या आईसोबत राहतात, ज्या पुर्वी आमच्या शाळेत होत्या...
लहान बहीण तर बहिणाबाईंसोबत होती.
बहिणीच्या अनेक मैत्रिणी घरी यायच्या पण त्यात ही नक्की नव्हती.
नाव तर कळले होते.
या मैत्रिणींपैकी एकीजवळ तो नंबर होता आणि त्या दोघींचे नावही..
ते मी मिळवले..
आणि मग पब्लिक फोनवरुन फोन लावला...
ट्रिंग... ट्रिंग....
" हॅलो.. कोण बोलतंय? " तोच गोड आवाज..
" मधू... मी तुझा अनिल.. हा हा हा हा... ओळखलंस का? " मी तिच्या आवाजाची वाट बघू लागलो ..
काही क्षण शांततेत गेले..
मी सुद्धा तिला सावरायला वेळ दिला.
" अरे.. कसा मिळाला नंबर? सॉलिड आहेस तू.. पण मी तुला भेटायला येणार नाही हं.. " तिने स्वतःला सावरले होते..
" मी कुठे काय म्हणालो.. भेटायचंय वगैरे.. चोराच्या मनात चांदणं.. हा हा हा हा.. खरं ना? फोनवर बोलायला काय हरकत आहे ? " मी तिला प्रतिप्रश्न केला..
" हां... पण याच वेळेला, मॅडम नसतात या वेळेला.. बाय.. तू खरंच हुशार आहेस.. " हसत हसत तिने फोन ठेवला....
अजून एका लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती..

Monday, 12 June 2017

काळोख


....त्याच्या डोळ्यात एकटक पाहत तिने विचारलं...

" तू अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम करतोस का? "

तो जरा कावराबावरा झाला...
पण सावरुन लगेच हसला...
आणि बोलला

" ए...  वेडाबाई..  हा कसला प्रश्न?  अजूनही म्हणजे काय?
मी तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करतो...  मग ते पुर्वी असो..  आता असो..  वा नंतर असो...  "

तिच्या डोळ्यात अश्रू तरारले...

" त्या " प्रसंगानंतर तिला वाटलं की आयुष्यच संपवावे.  पण त्याने आधार दिला.. आणि पुढचे जगणे सुसह्य बनले..

" आपल्या बाळाचे नाव काय ठेवायचं आपण?  "तिने त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला .

" अगं किती वेळा तोच प्रश्न विचारणार?
आपलं ठरलंय ना?
मुलगी झाली तर ' सारीका ' आणि मुलगा झाला तर  ' अभिनव ' ठेवायचं म्हणून? " त्याने हसत तिच्याकडे पाहीलं.

" जा तू...  तुला प्रेमाने बोलताच येत नाही,  माझ्या भावनांना समजूनच घेत नाही तू..  लग्नाआधी किती छान छान बोलायचास?  " तिने त्याचा हात झिडकारला.

" अरे..  असं काय??
आधीही मी असाच बोलायचो की?  बी प्रॅक्टीकल..  काय नुसतं ते गोड गोड बोलत रहायचं?  स्वप्नरंजन करत? "
त्याच्या तोंडावर खट्याळ भाव होते.

" मला नाही जमत तुझं ते प्रॅक्टीकल वगैरे..  बघ जरा कधी स्वप्नांच्या दुनियेत येऊन,  किती सुंदर असतं हे जग. " ती हरवली.
" स्वप्न सत्य झाल्यावर स्वप्नांचे काही वाटत नाही..  " खट्याळ भाव तसाच.

" म्हणजे?  नेमकं काय बोलायचंय तुला?  कधी कधी तू कोड्यात बोलतोस ना तेव्हा मला काही कळत नाही.. " ती भानावर येऊन बोलत होती.

" अगं म्हणजे तुझ्या सारख्या सुंदर मुलीशी ओळख, प्रेम, लग्न आणि आता संसार ही स्वप्नपुर्तीच नाही का? "
तो गालातल्या गालात हसत होता.

" काय रे??  तू ना..  खरंच वेडा आहेस..  पण खरंच ना किती सुंदर दिवस होते ते?  आपली अचानक पावसात झालेली भेट,  एकाच रिक्षाचा प्रवास, भरलेलं पाणी, ते तुझं मला काळजीने घरापर्यंत नेऊन सोडणं,  पुन्हा दिसल्यावर ओळखीच्या हास्याने भेटणं,  मग रोजचंच भेटणं, प्रेम आणि मग लग्न...  सगळं स्वप्नवतच जणू. " हातात हात गुंफून, ती त्याच्या डोळ्यात खोलवर पाहू लागली.
त्याच्या डोळ्यात अचानक भाव बदलले...  तीने ते क्षणात टिपले.

" काय झालं रे?  " तिने विचारलं.

" नाही..  काही नाही.. " त्याने नजर फिरवली.

" नाही..  मला माहीत आहे.. तुला " ती " गोष्ट कधीच विसरता येणार नाही " ती हिरमुसली.

तो शांतच राहीला...

काही क्षण शांततेत गेले...

दोघेही शांत बसले...

" विसर ते सगळं...  एकच लक्षात ठेव..  मी तुझ्यावर प्रेम करतोय..  आणि हे बाळ आपलं आहे...  सर्वस्वी आपलं..  " त्याने तिच्याकडे विश्वासाने पाहीलं.  हातातला हात अजून घट्ट पकडला.

बाकासमोरुन एक नवविवाहित जोडपं चालत गेलं.

त्यातल्या बाईने तिच्याकडे पाहीलं...

" बघ ती कशी बघतेय माझ्याकडे...  तिला सुद्धा माहीत असणार... त्याशिवाय का ती अशी विचित्र नजरेने बघणार माझ्याकडे?  " ती पुन्हा चिडू लागली होती.

" तू आधी शांत हो..  कोणी तुझ्याकडे बघत नाहीए आणि तिला काय माहीत असणार आपल्या गोष्टी?  तिची ओळख तरी आहे का?  "
तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता.


"असो... चल आता अंधार पडायला सुरुवात होईल.  घरी जाऊया आपल्या..  " तो उठू लागला.

" नाही.... नाही...  मला इथेच बसून रहायचंय...  त्या गल्लीतून पुन्हा जायचं नाही मला." तिच्या अंगावर शहारे आले...  त्या आठवणीने

तिने समोर पाहीलं....  तो तिथे नव्हता...

" तू सुद्धा नको जाऊ पुन्हा त्या गल्लीत..  आठवतंय ना..
कसं मारलेलं त्यांनी तुला?  नको रे जाऊस...  तिकडे " ती उठली...

हातातले बोचके पाठीवर मारलं आणि धावत निघाली वेड्या सारखी...


बाजूने ओरडत चाललेल्या त्या वेडीकडे बघून....
चालत जाणार्‍या नवविवाहितेने तिच्या नवऱ्याला विचारलं....

" हिला नेमकं काय झालं?
वेडी कशाने झाली ही? "

" लोक म्हणतात,  हिच्या वर तिच्या नवऱ्यासमोर सामुहिक अत्याचार झाला.  नवऱ्याचा खून झाला.  ही तेव्हा गर्भवती होती.  ते बाळ सुद्धा दगावलं.
कोणी केलं..? ,  का केलं...?  काही तपास लागला नाही.
 हिला वेड लागल्याने पुढे तपासही थांबला..  खरं खोटं देवाला ठावूक..

चल तू....  तिची काळजी नको करु... " तिचा हात पकडून तो तिला नेऊ लागला...

त्याच अंधाऱ्या गल्लीकडे....

Saturday, 3 June 2017

चॅटिंग ०.१



Priyu19 : हाय रुप्स 👋🏻
10.03 PM
KRupa : हाय 😍
10.03 PM
Priyu19 : मला तू दुपारी सांगितलंस ते सिरीयसली खरं आहे?  😕
10.03 PM
KRupa : हो.. तुझा विश्वास नाही का बसत?  😳
10.04 PM
Priyu19 is Typing
..
..
Priyu19 : विश्वास न बसायला काय झालंय? आणि मला काय पडलंय या सर्व प्रकरणाशी?  😏
10.04 PM
KRupa : मग कशाला विषय काढतेस?  😠
10.05 PM
Priyu19 is Typing
...
..
.
Priyu19 : ## ऑफ.. तुमच्यात जे काही चाललंय त्याच्याशी मला काही पडलेलं नाही. पण तूला म्हणून सांगते...
तो आज रात्री ११ वाजता माझ्याकडे येणार आहे..☺
इट्स फॉर एंजॉयमेंट ओन्ली 😉
आज घरी कोणीच नाहीए माझ्या.. फक्त तो आणि मी 😁
10.06 PM
KRupa is Typing..
KRupa : यू बीच..
नो वे.. ही लव्ज मी अ लॉट.
तुझ्यासारख्या पोरीसाठी तो अजिबात मला फसवणार नाही. जरा आरशात जाऊन बघ स्वतःला.. काय आहे तुझ्यात?  😆
10.07 PM
Priyu19 : 😡😡 शट अप रुप्स.. तुला खोटं वाटतंय तर ये बरोबर ११ वाजता आणि बघ काय करतोय आम्ही ते. दरवाजा उघडा ठेवेन मी घराचा आणि बेडरुमचा सुद्धा
10.07 PM
Priyu19 : हां पण एक गोष्ट...
आतापासून तू सॅमला कॉन्टॅक्ट करु नको. नाहीतर तो सावध होईल. बी नॉर्मल..
केला मॅसेज तर रिप्लाय वगैरे दे नॉर्मली..
10.08 PM
KRupa : जर तुझं खोटं निघालं तर बघ मी कसा जीव घेते तुझा. मी येणारच आहे. बघू तर दे सॅम कसा डबल गेम खेळतोय माझ्यासोबत
10.09 PM
Priyu19 : बाय.. त्याचा मॅसेज आलाय 😍
10.09
KRupa : 😣😣😠😡😠
प्रिया इकडे माझ्याशी बोल.
मी तुझ्या घरी तो यायच्या आधीच येऊन बसेन. आय वॉन्ट टू हिअर व्हॉट ही इज थिंकिंग अबाऊट मी 😠
10.10 PM
Priyu19 is Typing...
..
....
.....
Priyu19 : यू आर मोस्ट वेलकम डियर.. पण तुला कुठेतरी लपवेन मी चालेल ना?  😁🤣
10.11 PM

KRupa :
डू व्हॉट एवर यू वॉन्ट.. मला सर्व ऐकायचंय. सगळं झालं की मी बाहेर येईन आणि मग बघेन त्याचा चेहरा 😠
10.11 PM
Priyu19 : चालतंय की ☺
मलाही त्याला खोटं पाडायचंय..  😡
10.11 PM
KRupa : का? त्याने काय केलंय तुला? डोंट फरगेट ही वॉज युवर बीएफ.. वॉज.. पास्ट आहेस तू त्याचा..
10.12 PM
Priyu19 : सो व्हॉट?
तासाभरात तो माझे तळवे चाटत असेल. ☺
यू नो?? आय ऍम स्टिल कंफर्टेबल विथ हीम इन बेड.
सो ही वॉज.. तू तर नुसती शोभेची बाहूली 😆
10.13 PM
KRupa : शट अप यू बीच.. 😠
लाज पण कशी वाटत नाही गं तुला?
10.14 PM
Priyu19 : लाज??
मी का लाजू.. गेले दोन अडीच वर्ष आम्ही हेच करतोय. तू मध्ये आली आहेस. मोठी सती सावित्री..
हम्म्.. मला सांगितलं त्याने
दॅट यू डोंट इवन अलॉव हिम टच..
म्हणून तो माझ्याकडे येतो 😍
10.15 PM
KRupa : मला माहीत आहे हे सर्व खोटं आहे.. तू आमच्यात भांडणं लावते आहेस. तरीही मी तुझ्याकडे येणार..
जर तो नाही आला तर मात्र तुझी ही शेवटची रात्र समज 😡
10.15 PM
Priyu19 Offline
KRupa : कुठे कडमडलीस आता? मी निघतेय आता घरुन
रिप्लाय मी फास्ट..  🙄
10.15 PM
........
...........
.............
KRupa : मला थोडा डाऊट येतोय. आपला प्लॅन सक्सेस होईल ना नक्की?
10.48 PM
Priyu19 : हो गं नक्कीच होईल..
तू फक्त ऑनलाइन रहा. मी ऐनवेळेला बाथरुमला जायचंय असं सांगून आत येईन तेव्हा तू आवाज न करता बाहेर ये फक्त. मी अंधार केलेला असेन त्यामुळे त्याला पटकन समजणार नाही
10.49 PM
KRupa is Typing
..
.....
.........
KRupa : यार.. 😬 तुमच्याकडे बाथरुम मध्ये ३ जी मिळत नाहीए. किती हळू मॅसेज येताहेत.
10.49 PM
Priyu19 : तू खिडकीजवळ रहा म्हणजे तिथे रेंज चांगली येईल.
10.49 PM
Priyu19 Offline
KRupa : ए.. तू ऑफलाइन का गेलीस?
10.49 PM
KRupa : हॅलो... प्रिया...
10.49 PM
Priyu19 Online
..
Priyu19 is Typing
...
..
Priyu19 : अगं गडबड झालीय... 😬
10.50 PM
KRupa : आता काय नवीन? 😧
10.50 PM
Priyu19 is Typing...
....
..
.
Priyu19 :इथे लिविंग रुम मध्ये कोणीतरी आहे 😨.
10.50 PM
KRupa : WTF कोणीतरी म्हणजे?  😣
10.50 PM
Priyu19 : कोणीतरी म्हणजे कोणीतरीच त्याची हालचाल जाणवतेय.  😧
10.51 PM
KRupa is Typing..
..
..
KRupa : मला घाबरवायचा प्रयत्न करतेस?
मी नाही घाबरत या गोष्टीला.
मी आले बाहेर.
10.51 PM
Priyu19 : मुर्ख मुली...😠 खरंच इथे कोणीतरी आहे. तू आहेस तिथेच रहा. त्याचा आवाज सुद्धा येतोय ही इज कॉलींग मी. माझं नाव घेतोय. ओढलेला आवाज आहे 😲.
10.52 PM
KRupa is Typing..
...
..
Priyu19 Offline.
KRupa : तुम्ही दोघांनी मला फसवायचा प्लॅन केलाय का? इट्स नॉट फनी ऍट ऑल. अंडरस्टूड?  😡
10.53 PM
KRupa : तू ऑफलाइन का गेलीस?  😳
प्रिया 😳
10.53 PM
Priyu19 Online
Priyu19 is Typing
..
...
Priyu19 : धीस इज हॉरीबल 😱
त्याला डोकेच नाहीए. नुसतंच धड. मी सुद्धा आतमध्ये येतेय रुप्स.. विथ नाईफ... प्लीज ओपन द डोअर विदाऊट मेकिंग एनी साऊंड.
😥
10.54 PM
KRupa : ओके....👍🏼 मी अलगद उघडतेय, लाईट बंदच ठेवलीय. वेट
10.54 PM

Saturday, 27 May 2017

चॅटिंग

... चॅटिंग ... 


Priyu19 : हाय 👋🏻..  झोपला नाहीस अजून?  
1.00 AM

Sam96 : नाही यार अजून जेवण बाकी आहे.  😕 
1.00 AM 

Priyu19 : का? अजून का जेवला नाहीस ? 
1.00 AM 

Sam96 : मॉम डॅड पार्टीला गेलेत..  मी संध्याकाळी जाम हादडलेलं,  अजून भूक हवी तशी लागली नाही.  
1.01 AM 
Priyu19 : असा काय तू ही का वेळ झाली का जेवायची 😳?  
1.01 AM 

Sam96 : मग ही काय वेळ झाली का विचारायची?? 
J1 झालं का? 😆😀🤣 
1.01 AM

Priyu19 : डोंट बी ओव्हरस्मार्ट हं.. 😏
ऐक ना रुप्सने मला काहीतरी सांगितलं ☺ 
1.01 AM 


Sam96 : अच्छा?? 😁 काय सांगितलं?  ☺  
1.02 AM 

Priyu19 : शहाणपणा नको दाखवू,  तुला माहीत आहे मी कशाबद्दल बोलतेय 🙄    
1.03 AM 

Sam96 : खरंच नाही माहीत,  तुमच्या मुलींमध्ये काय चालतं ते आम्हा मुलांना कसे समजणार बुवा?  😁 
1.03 AM 

Sam96 : ए..  तुझे नेटवर्क बरोबर नाही का?  डिलीवर व्हायला किती वेळ लागतोय 😣       
1.03 AM 

Priyu19 : हो यार..  दोन दिवसांपासून गडबड चाललीय,  माझ्या रुममध्येच रेंज नाही व्यवस्थीत.  वेट मी गॅलरीत जाते.  ☺        
1.04 AM

Sam96 : फुकटचं नेटवर्क वापर अजून..  खाओ पिओ ऐश करो 🤣😆       
1.04 AM 


Priyu19 is Typing.... 

Priyu19 : बास हां... 😏 बोल आता,  सांग तू पटकन 😍          
1.05 AM 


Sam96 is Typing....

Sam96 : अरे खरंच माहीत नाही...  मला काय माहीत रुप्सने तुला काय सांगितलं ते? 😬             
1.05 AM

Priyu19 is Typing 
...
....
.....

Sam96 : निबंध लिहितेस की काय?  😁        
1.06 AM 
..

Priyu19 is Typing... 
..
..

Priyu19 :अरे इथे कंपाउंड मध्ये कोणीतरी आहे...
ब्लॅक जॅकेट घातलंय त्याने..
मला पाठमोरा आहे आणि ढोपरांवर बसून जमिनीत काही तरी शोधतोय..  😧      
1.06 AM 


Sam96 : 😆😆 बरी आहेस ना?  इतक्या रात्री कोण कशाला येईल तुमच्या गार्डन मध्ये?  तुला झोप आलीय का?  की विषय बदलतेस?? 
जाऊ दे नको सांगू रुप्स ने काय सांगितलंय ते 😆  
1.07 AM

Priyu19 is Typing... 
..
...

...

Priyu19 : हे वेट...  सॅम तो तूच आहेस 😠 
काय करतोयस तिथे तू?    
1.08 AM 

Sam96 : व्हॉट 🤣🤣
मी??  
जा झोप तू,  तूला भास होताहेत कसले कसले.  😆 
1.08 AM 

Priyu19 : खोटं बोलू नकोस...  😠
आपल्या जीटूजी च्यावेळचे जॅकेट घातलेले आहेस तू.  
त्यावरचे नावही दिसतंय 
"Sameer..  हवां का झोंका " 
1.09 AM

Sam96 : ए उगाच काहीतरी बडबडू नको..  मी घरी बेडवर आहे आणि तू म्हणतेस थे जॅकेटसुद्धा कपाटाच्या कोपऱ्यात कुठे तरी पडले असेल.  😣 
1.10 AM 

Priyu19 is Typing.. 
..
..
..

Priyu19 : अरे खरं सांग ना..  तो तूच आहेस ना? उगाच घाबरवू नकोस.  😕
1.10 AM 

Sam96 is Typing.. 
..

Sam96 : काय फालतूगीरी आहे राव?  😟
मी कशाला येईन तिकडे रात्री एक वाजता कडमडायला?  😠
1.11 AM 

Priyu19 : बापरे..  😟
1.11AM 

Sam96 : आता काय झालं?  😠 
1.11 AM 

Priyu19 : तो काहीतरी खोदतोय 😳 ... तेही हातानेच..  
कोणतंही हत्यार न वापरता 
जमीनीवर मोठा खड्डा केलाय त्याने.. 😳
1.12 AM 

Sam96 is Typing.. 
...
...

Sam96 : खोदतोय? 😳 ते ही हाताने?? आर यू शुअर? 
1.12 AM 

Priyu19 is Typing... 

...
..
..
.

Priyu19 : सॅम त्याने माझ्याकडे वळून पाहीलं...  तो तूच आहेस 😧
नक्की तूच..  का घाबरवतोय मला तू?  😟
1.13 AM 

Sam96 : अरे यार...  मी नाहीए तो..  मी घरीच आहे 
वेट मी तुला सेल्फी पाठवतो... 
1.13 AM

Priyu19 is Typing.. 
......
.....
...
..

Priyu19 : सॅम तो घराकडे येतोय... 😧 
मला भिती वाटतेय..  प्लीज ओ गॉड सेव मी..  
त्याच्या हातात काहीतरी चमकलं...  सुरा आहे बहुतेक 😳
1.14 AM 

Sam96 is Typing 
..
..

Sam96 : आर यू किडींग ऑर व्हॉट?  😠
आता तर त्याच्याकडे काही नव्हते हत्यार वगैरे...  
1.14 AM 

Sam96 : ( IMG )  
1.14 AM 

Priyu19 is Typing.. 
..
.

Sam96 : चेक द सेल्फी..  मी घरीच आहे बेडवर 😠
1.14 AM 

Priyu19 : ओ..  गॉड..  सॅम तो मला मारायला येतोय..  हातातला सुरा उंचावून मला त्याने दाखवला..  ही गॉना किल मी..  प्लीज डू समथींग सॅम 😣
1.14 AM

Sam96 is Typing..
..
..

Sam96 : ओह इट्स लुक्स हॉरीबल..  मी निघतोय घरुन.  यायला दहा मिनीटे लागतील.. तोवर तू कुठेतरी लपून रहा कपाटात वगैरे आणि ऐक..
फोन सायलेंट करुन ठेव..  आणि ऑनलाईनच रहा म्हणजे लक्षात येईल मला की तू कुठे आहेस वगैरे.  जवळपास काही हत्यार वगैरे असेल तर घेऊन ठेव.  डोंट वरी..  आय विल बी देअर इन टेन मिनीट्स.. 👍🏻
1.16 AM

Priyu19 : सॅम त्याने दरवाजा तोडला..  जोरजोरात घाव घालून..  😦

ओके.  मी माझ्या रुममधल्याच कपाटात लपतेय. तू लवकर ये प्लीज.
1.16 AM

Sam96 Offline...

Priyu19 : सॅम लाईट गेले..  त्यानेच घालवले असणार..
😲
1.19 AM

Priyu19 : सॅम..  लुक्स लाईक ही इज अॅट माय बेडरुम डोअर..  लवकर ये तू..  प्लीज
1.22 AM

Priyu19 : तो बेडरुमचा दरवाजा तोडतोय सॅम..  मला भरपूर भिती वाटतेय..  कुठे आहेस तू सॅम..
प्लीज
ऑनलाइन ये...  सॅम..
1.25 AM

Priyu19 : सॅम ही इज इन बेडरुम..
मला त्याची हालचाल जाणवतेय. तो शोधतोय मला.  माझ्या हातात बॅट आहे...  जर त्याने कपाटाचा दरवाजा उघडला तर मी त्याला मारणार..  त्याने मला मारण्याआधी..  😧
1.29 AM

Sam96 Online

Sam96 is Typing..

Sam96 : व्हॉट द हेल इज दॅट??  तूझा दरवाजा तर ठिक ठाक आहे.. आर यू मेकिंग फन ऑफ मी प्रियू??  😠
1.30 AM


Priyu19 Offline

..

Priyu19 Online

Priyu19 is Typing...
..
..

Priyu19 : नो वे..  वर ये बेडरुममध्ये..  तो बेडरुम मध्येच आहे..  शोधतोय मला बेडरुमचा दरवाजा नक्कीच तोडलाय त्याने..
1.32 AM


Sam96 : प्रियू मी घरातच आहे तुझ्या..  इथे कुठेही तोडफोडीचे नामोनिशाण नाहीए..
आलो बेडरुममध्ये..  वेट 👍🏻
1.32 AM

Priyu19 : सॅम आय थिंक ही फाऊंड मी.. तो हातातल्या सुऱ्याने कपाटाचा दरवाजा उघडतोय 😬
प्लीज सेव मी...
1.32 AM

Sam96 is Typing..
.....
...
..

Sam96 : प्रियू तू कुठे आहेस? मी बेडरुम मध्येच आहे तुझ्या..  इथे तर कोणीच नाहीए.. कपाट तर सताड उघडं आहे..  आणि तू ऑनलाईन सुद्धा आहेस..  काय चाललंय हे??
1.33 AM

Priyu19 Offline...

Priyu19 Online
..

Priyu19 is Typing
...
..
.

Priyu19 : मी बाथरुम मध्ये टाकीच्या मागे लपलीय तो सुध्दा बाथरुम मध्येच आहे. प्लीज सेव मी सॅम त्याच्या हातातला चाकू रक्ताने भरलाय..
1.35 AM


Sam96 : WTF...  ही कोणीची डेडबॉडी आहे?  प्रियू कुठे आहेस तू?  😠
तुझ्या घरी खून झालाय कोणाचा तरी.. 😳
1.40 AM

Sam96 : हे प्रियू व्हेअर आर यू??
ही तर रुप्स आहे..
आय अॅम कॉलिंग पुलीस नाऊ..
1.45 AM

Priyu19 Offline

.....
........

"हॅलो पोलिस स्टेशन..  मी प्रिया पाटील बोलतेय..  आमच्या घरात खून झालेत..

हो..

दोन खून..

नाही माहीत...

मी आता बाहेरुन आले तर दरवाजा उघडा होता. बाथरुम मध्ये दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेत...

हो

ओळखते...

एक माझी मैत्रीण आहे रुपाली कुलकर्णी आणि दुसरा माझा मित्र आहे....  समीर तांबे..

हो...

नाही हात लावत कशालाही..

पण तुम्ही लवकर या..

घ्या लिहून पत्ता..  "

...




Friday, 31 March 2017

सुखासाठी

..... सुखासाठी .....


.....
हे बघ...
मला माहीत नाही तू तिच्या जीवनात पुन्हा का आला आहेस?  पण मला इतकंच कळतंय की तू तिच्या जीवनात नको आहेस.  माझ्या.... आमच्या संसारात नको आहेस.  शांतपणे सांगतोय समजून घे.
मी तिला सोडणार नाही काहीही झाले तरी.
आणि मला हे कळलंय हे तिला समजू देऊ नकोस...   अर्थात, जर तू तिच्यावर प्रेम करत असशील तर..  "

फोन खाडकन बंद झाला.

कपाळावर आलेला घाम पुसत मी मोबाईल खिशात ठेवला.
आणि आजूबाजूला बघू लागलो. ती नव्हती...  म्हणून व्यवस्थित बोलू तरी शकलो होतो.
नाहीतर काय सांगितले असते,  की तुझ्या नवऱ्याचा फोन आहे म्हणून?  त्याला सर्व कळलंय म्हणून?

खरंच.. का वागत होतो आम्ही तसं?  दोघांचेही संसार होते. चांगला जोडीदार होता..  दोघांनाही शाळेत जाणारी मुलं होती.... शरीरसुखासाठी?
नाही..  नाही...
हे तिलाही मान्य नाही होणार आणि मलाही..  आम्ही शरीरसुखासाठी भेटतंच नव्हतो.  गेल्या दोन महिन्यात फक्त दोनदाच तर ते क्षण आलेले.  ते सुद्धा अचानक.

आमचे भेटणे..  मानसिक सुखासाठी होतं.  त्याला शारीरिक आकर्षण हे ओघाने आलेले असले तरी ते मुख्य नव्हते.

दोन महिन्यांपुर्वी जेव्हा मॉल मध्ये ती मैत्रीणीसोबत अचानक दिसली तेव्हाच खरंतर मी बाजूला झालो असतं तर फार बरं झालं असतं.  कॉलेजला असताना एकत्र घालवलेले क्षण आठवून मी खरंतर भुतकाळात गेलो होतो आणि ती माझ्या समोर येऊन उभी राहीली..

" किती वर्षाने भेटतोय ना आपण? कसा आहेस तू?  किती बदललास?  कुठे आहेस आता? ... " एका मागोमाग येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी...
कॉफी गरजेची होती.
वीस मिनीटांच्या कॉफीत दोन वर्षांचे कॉलेजचे दिवस पुन्हा जागे झाले.
ती बदलली नव्हती.. पुर्वी जशी होती तशीच.  फक्त गळ्यात मंगळसूत्र आणि एका हातात दोन हिरव्या बांगड्या.  हाच काय तो बदल.  एकमेकांच्या घरची माहीती सांगितल्यावर नंबर दिले गेले आणि मग निरोप.

घरी आल्यावर वायफाय कनेक्ट झाल्यावर मेसेंजर ला तिचा " हाय " आलेला होता.

हाय बाय चं प्रकरण इतक्या लवकर इतकं पुढे पोहचेल असं दोघांनाही वाटलं नव्हतं.
असं म्हणतात.... या वयात मानसिक आधाराची गरज असते.  शारीरिक गरज तर घरुन पुर्ण होत असते पण घरच्या कामामुळे,  मुलांच्या अभ्यासामुळे इतर वेगवेगळ्या कारणांमुळे एक वेगळाच तोच तोच पणा येत राहतो आणि मग येते ते अलिप्तपण..  कदाचित आम्ही दोघंही त्याच परिस्थितीत होतो.  म्हणून दोघांनी एकमेकांचा आधार घेतला आणि हे घडलं.

" ए.. हॅलो..  काय झालं रे??
कुठे गुंग झालास?  आपल्या परवाच्या आठवणीत का?  " समोर कोक चा ग्लास धरुन ती विचारत होती.

" तुला सांगेन म्हणत होतो पण.. टाळत होतो,  तिला समजलंय.  आपण भेटतो ते,  आपलं जे काही चाललंय ते सर्व.  कोणी सांगितलं ते माहीत नाही पण तिला कळलंय. आपण हे इथेच थांबवूया? " मी मान खाली घालून तिच्याशी बोलत होतो.

" मुर्ख आहेस तू..  इतकी काळजी नाही घेता येत तुला?  मला काही माहीत नाही.  मला तू हवा आहेस. इतका घाबरतोस तिला?  सांग की तिला माझी फक्त मैत्रिणच आहे बाकी काही नाही आमच्यात. " ती डोळे मोठे करुन बोलत होती.

" मला नाही जमणार हे..  खरंच नाही जमणार.  मी हा विषय अजून वाढवू इच्छित नाही.  आपण थांबवूया हे सर्व..  माझ्या सहनशीलते पलीकडे आहे हे.  " मी तिच्याकडे काकूळतीने पाहीलं.

" मला वाटलं तू बदलला असशील. पण नाही..  तू तेव्हा होतास तसाच आहेस.  पळपुटा.  अंग काढून घेतोस नेहमी, हिंमतच नाही तुझ्यात.  मी एवढं सर्व सांभाळुन तुझ्या कडे आलीच ना?
बाबा बोलले होते तेच खरं होतं.
तुझी लायकीच नव्हती. निव्वळ बोलतच रहा तू.  " तिने हातातला ग्लास डस्टबीन मध्ये फेकून दिला आणि माझ्या शेजारी असलेली तिची पर्स खांद्याला लावली. ..

" आजपासून आपला संबंध कायमचा संपला.  तुझ्या मोबाईल मधला माझा नंबर डिलीट करुन टाक आणि पुन्हा कधी दिसू ही नकोस मला.  समजलं ना?? गो टू हेल..  "

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी साश्रू नयनाने पाहत राहीलो.

_________________________________

" तुला काय वाटलं?  मला त्रास नाही झाला का रे?  मी वाचलं सर्व..  तुझा चेहराच वाचता येतो मला पुर्वीपासून.  चुक तुझ्याकडून नाही माझ्याकडूनच झाली.  नक्कीच त्याचा फोन आला असणार.  सकाळी माझ्या फोनमधून तुझा नंबर घेताना मी पाहीलं होतं त्याला.
मला माहीत आहे तू मला आणि मी तूला विसरु शकत नाही पण आता तसंच सोंग करावे लागेल,  आपल्या दोघांच्या भल्यासाठी. सर्वांच्या सुखासाठी..  "

भिंतीला डोकं टेकून ती स्वतःशीच रडत होती. मन मोडून...

Thursday, 23 March 2017

गर्दी

..... गर्दी .....


" ... च्यायला कोण कडमलंय काय माहीत, दहा मिनीटे गाडी हललीच नाही. सात अडतीस चुकली तर उभ्याने जावं लागेल बोरीवली पर्यंत.
क्या हुवा है रे?? .. "
शेअर टॅक्सीत बसलेला एक अस्वस्थ नोकरदार, पण चांगला पगार असल्यामुळे भुलेश्वर ते चर्नीरोड हे चालता येईल असे अंतर दहा रुपयाची नोट देऊन रोज दोनदा प्रवास करणारा माणूस...

" ही एक गाडी जरा पुढे सरकली तर माझी सायकल अलगद बाजूने काढता येईल... आणि मग नक्की समजेल, काय झालंय ते.. "
असा कुतूहलाचा चेहरा घेऊन पार्कींग केलेल्या गाडी आणि गर्दी मुळे थांबलेल्या गाडीच्या गॅपमध्ये अडकून, पण न राहावून त्याच गाडीच्या टपावरुन मान उंचावून काही दिसतंय का, हे बघणारा वाणसामानाची डिलीव्हरी करणारा, घामट अंगाचा सायकलवाला...

" अगं आई गं... काय हाल झालेत जीवाचे. जराही मांस नाही अंगावर. घरच्यांना तरी काहीच वाटत नसेल याच्या ? "
असे चुकचूकणारे प्रश्न स्वतःलाच विचारत, एका हातात अर्धा डझन अंड्याची कागदी पिशवी सांभाळत आणि दुसऱ्या हातात मुलांना सकाळी डब्याला भाजीसाठी कापडी पिशवीत भाजीपाला नेणारी मध्यमवयीन गृहिणी...

" हां रमणीक भाय, मीच फोन केला, दुपारपासून इथेच बसलेला.. आता जाईल नंतर जाईल.. म्हणून वाट बघत होतो पण गेलाच नाही. आता धंदा वाढवायला गेलो तेव्हा समजला की हा तर मेलाय.. "
मी होतो म्हणून समजले नाहीतर रात्री कुत्र्यांनी खाल्लं असते, असं मनात ठेवून फुशारक्या मारणारा परंतू दुपार पासून त्याला एक ग्लास पाणी ही न देणारा, पोट कसंबसं पँटीत कोंबून चारही बाजूने ओसंडणारा.. जाडा दुकानमालक....

" आयला आता ही म्युनिसिपालीटीची कामं सुद्धा आम्हीच करायची का? नवीन साहेबांना तरी काय गरज होती स्वतः यायची? ते नसते तर दोन गर्दूल्ले पकडून बॉडी चादरीत टाकून गाडीत टाकली नसती..? उगाच हे स्ट्रेचर, हँडग्लोव्हज वगैरेची भानगड " असे प्रश्न कपाळावरच्या आठीत स्पष्ट वाचता येतील असा पावणे सहा - सहा फुट उंच, उंचीला साजेशी शरीरयष्टी असलेला डोक्यावर टोपी नसलेला इन्स्पेक्टर....

" शी किती घाण वास येतोय. आठ दिवस सडल्यासारखा.. हे साहेब लोक ऑर्डर सोडणार आणि आम्ही ही घाण कामं करायची? ड्युटी संपता संपता हे नरकाचं काम.. आता इथून घरी जाई पर्यंत हा वास डोक्यात राहील.. "
तोंडाला मास्क लावूनही ज्याच्या मनात काय चाललंय हे स्पष्ट वाचता येणारा, एका हाताने स्ट्रेचर आणि दुसऱ्या हाताने दुर्गंध दुर सारण्याच्या प्रयत्नात असलेला, यूनिफॉर्ममध्ये नसलेला परंतू खाकी पँट आणि पोलिसी बुटांमुळे क्षणात ओळखू येणारा त्रस्त हवालदार...

"......... "
काहीही हालचाल नसलेला, जगाच्या सर्व व्यापातून दुर गेलेला, जीवंत असेस्तोवर कुत्र्यापेक्षा वाईट हाल भोगून, प्रसंगी दुर्लक्षीत राहून रोज सेकंदा सेकंदाला एक एक श्वास कमी होत, आज पुर्णपणे थांबलेला, जीवंत असताना माणूस म्हणून कोणी लक्ष दिले नसताना.. निश्चेष्ट " बॉडी " म्हणून एवढी शंभर-दिडशे माणसांची गर्दी आणि गाड्यांची रांग गोळा करणारा तो मयत इसम...

" यावर आपल्याला '.... गर्दी..... ' नावाची कथा लिहिता येईल का? "
यासाठी आजूबाजूला असलेल्या गर्दीतले चेहरे वाचून त्यांचे भाव मनात साठवून, गर्दीतच.... गर्दीचा भाग असूनही प्रसंगाचा विचार न करता निव्वळ माणसं.. आणि स्ट्रेचर वरच्या पांढऱ्या चादरीतून बाहेर लटकणाऱ्या अचेतन, कृश हाताकडे बघून सुन्न झालेला ...
बिझ सं जय

Thursday, 9 March 2017

एखादा दिवस

..... एखादा दिवस .....

रात्रीच्या प्रचंड थकव्यानंतर खरंतर उठायला कंटाळाच आला होता. पण पोटापाण्यासाठी उठणे गरजेचेच होते.  सलोनी अजूनही झोपूनच होती.  तिला फारसं कामही नव्हते तरीही ती झोपली होती.
ताईची लाडकी होती ती.

सगळं आवरुन जेवणाची तयारी करणार तोच मोबाईलवर फोन आला.
समोर विलास होता.

" हॅलो..
झालीस का तयार?  नऊ पर्यंत येईल तो.  सगळं लक्षात आहे ना?  मला विसरु नको..
मी येतोच दहा मिनीटांत "

माझं " हो..  नाही..  " न ऐकताच फोन बंद झाला.  खरंतर मी विसरुनच गेले होते. साडेआठ वाजले होते.
पंधरा मिनीटात मी आरामात तयार होणार होती. विलासच्या सांगण्यानुसार मेकअप करायचा नव्हता,  मग तर अजूनच सोप्पं झालं.
फिक्कट गुलाबी रंगाचा बांधणीचा ड्रेस, वर हिरव्या रंगाची ओढणी घेऊन भेट म्हणून मिळालेलं अत्तर फवारुन आरशात बघत असताना मागून सलोनी बोलली
" व्वा गं..  आज बाहेर ना?
मज्जा आहे तुझी.  किती वाजता परत येणार? "

मी तिच्याकडे आरशातूनच बघून बोलले..
" नजर नको लावू..  रात्री जेवायला येईन थेट..  आणि यात " व्वा  " काही नसतं..  बाहेर जायला लागलीस की समजेल तुलाही किती त्रास असतो ते.  "

ती नुसतीच हसली.
इतक्यात विलास आला.
" लवकर लवकर..  " म्हणून तो ताईच्या खोलीत गेला.
मी लगेच ओढणी ठिकठाक केली एक वार आरशात बघून घेतले पर्स खांद्याला लावली तोच विलास पाकीट खिशात टाकत आला.

" चल की आता..
आता उचलून नेऊ की काय.. ? "
सलोनी खुदकन हसली.  तिच्याकडे दुर्लक्ष करत मी सँडल घालून त्याच्यामागे पळतच गेले.
बिल्डींग खालच्या पानटपरीवरच्या रेडीओवर गाणं चालू होतं.

" तुझे देखा तो ये जाना सनम..... "
उगाचच मनात कसंतरी झालं.
विलासने त्याची बाईक सुरु केली होती.  मध्ये पर्स टाकून बसली नेहमीप्रमाणे.

" पुढच्या सिग्नलला तो थांबलाय.  जास्त काही सांगत नाही तुला माहीत आहे सर्व..
नऊ पर्यंत परत येईल असं ताईला सांगितलंय, त्यामुळे लेट करु नको.  " तो उगाचच सुचना देत होता असं वाटलं.  मी थोडीच नवीन होती?

" हो रे बाबा..  सगळं माहीत आहे मला.  " मी वैतागून बोलले.

" असेल माहीती पण माझी जबाबदारी आहे आणि सांगणे माझे कर्तव्य आहे..  समजले ना?......  तो बघ सॅन्ट्रोच्या बाजूला उभा आहे तो.  "

विलासच्या खांद्यावरुन मान उंचावून त्याच्याकडे पाहीलं.  तिशीचा असावा.
नेव्ही ब्ल्यू कलरचा टीशर्ट, खाली जीन्स,  पायात स्पोर्ट्स शुज, डोळ्याला गॉगल.  शरीरयष्टी बरी होती.
बघता बघता विलासने गाडी त्याच्याजवळ उभी केली.

त्याला सलाम करत म्हणाला
" हां साहेब..
ही...  "

" मला नावाशी काही देणं घेणं नाही..  हे घे...  आणि जा तू.. " पाकीटातून पैसे काढून विलासच्या हातात कोंबले.

वाटलं सॅन्ट्रो त्याची असेल पण त्याने टॅक्सीला हात केला.
ड्रायव्हर सोबत काहीतरी बोलणे झाले.  हो नाही हो नाही होऊन शेवटी तो तयार झाला.

" या मॅडम..  बसा... "

इतक्या वर्षात मला मॅडम म्हणून हाक मारणारा हा पहिला माणूस मी पाहीला..
पण मग लगेच भानावर आले...
शेवटी तोही त्यातलाच
त्याच्या चेहऱ्याकडे पाहत आत जाऊन बसले.  बाजूला येऊन बसला.

टॅक्सी सुरु झाली...

" कुठे घेऊ साहेब?  " आरशातून माझ्याकडे बघत ड्रायव्हरने त्याला विचारले.

" दादर.. शिवाजी पार्क "

मी नेहमीप्रमाणे सीट ला पाठ टेकवून बसले.

त्याचे लक्ष पुर्णपणे हातातल्या मोबाईल वर..
मध्येच थोडा हसत होता.  मग मी सुद्धा बाहेर बघू लागले...  बंद काचेच्या बाहेर...

टॅक्सी सिग्नल ला थांबली..

त्याच्या बाजूने खिडकीवर टक टक झाली..

" साब..  लो ना..  सिर्फ वीस रुपयेे का है..  मोगरे का है..  मॅडम के लिए  लो ना?  "

फ्रॉक घातलेली दहा - बारा वर्षाची काहीशी कळकट दिसणारी पण चुणचुणीत मुलीने हातातले गजरे वर केले होते.

मोगऱ्याचे गजरे पाहीले नी माझ्या आठवणी जाग्या झाल्या... डोळ्यात चमक आली..

तीच बहुतेक त्याने पाहीली.

शंभरची नोट पुढे करुन पाच गजरे घेतले. त्या मुलीला बहुतेक अनपेक्षित असावं ते...  माझ्याप्रमाणेच.

तीन गजरे माझ्या समोर केले आणि दोन ड्रायव्हरला दिले..

" भाऊ लटकवा समोर..  छान सुगंध येत राहील..
तुम्ही माळा की..  मला हा सुगंध खुप आवडतो. "
गजरा केसात माळताना होणाऱ्या हालचालीकडे तो पाहीलंच. या विचाराने डोळ्याच्या एका कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहत गजरा माळला. त्याने पाहीलं नाही... पण समोरच्या आरशातून ड्रायव्हर मात्र पाहत होता. अधाशीपणे.
सिग्नल सुटला.  वाऱ्यासरशी सुगंध भरला...
तो मोहरला..  मला सवयच होती.

" खरंतर विचारणार नव्हतो..  पण तुमचं नाव काय?  " त्याचे माझ्याप्रती असलेले मौन तुटले
" मला स्विटी म्हणतात..  " मी थोडंसं सावरुन बसत उत्तर दिलं.

" स्विटी...?
हे खरं नाव नसेलच...  मला माहीत आहे तुम्ही नाव सांगत नाही..  आज दिवसभर आपण सोबत आहोत तर एकमेकांशी बोलायला नाव पाहीजे.
मी आजपुरतं तुम्हाला नाव देतो...  सुगंधा.. चालेल?  "

नाही बोलणं मला परवडणारे नव्हते.  प्रत्येकाची वेगवेगळी आवड..

" भाऊ छानसी गाणी वगैरे नाहीत का?  " त्याने टॅक्सीवाल्याला विचारलं.

" आहेत की... " म्हणून त्याने गाणी चालू केली.

" सोलह बरस की बाली उमर को सलाम..  प्यार तेरी पहली नजर को सलाम.. "
प्रत्येक गाण्यात आठवणी होत्या माझ्याकडे..

मी त्याच्याकडे पाहू लागले.  त्याने गॉगल काढला.
टीशर्ट च्या मध्यभागी अडकवला आणि माझ्याकडे एकवार पाहीले.

" मी हात हातात घेऊ तुमचा?  " त्याने विचारलं.

झाला सुरु...  कितीवेळ तू राहणार रे??  पुरुषच शेवटी तू?

" हातच का? आज मी संपुर्ण तुमची आहे...  टॅक्सीत...बसून  "
" नाही फक्त हात...  " त्याने मला मध्येच थांबवत स्वतःचा  हात पुढे केला.

त्याच्या हातात गेला.
त्याचा हात थंड होता.. अजूनपर्यंत थंड हाताचा अनेक वर्ष स्पर्श झालाच नव्हता.  सर्व गरम...  वखवखलेले..

पुढे काहीच नाही..  तो नुसता हाताकडे पाहत होता.  क्षणभर हात सैल झाला..  आणि त्याने बोटात बोटं गुंफली.

आता हा सुरु होणार..

पण त्याची नजर शुन्यात गेली..  काहीतरी आठवत असावा..

" साहेब..  शिवाजी पार्क आलं..मी इथे पार्क करतो.  पुन्हा इथेच या.. मी टॅक्सी सोडणार नाही.  " ड्रायव्हरच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली.
" हो...  चला तुम्ही सुगंधा... "
खाली उतरुन माझ्या खाली उतरण्याची वाट बघत उभा राहीला.
बहुतेक इथे कुठेतरी लॉज असावा.

मला न विचारता हात पकडला आणि समोरच्या कट्ट्याकडे नेऊ लागला.
" नुसतंच फिरु नका..  जरा माणसांकडेही बघा.  बघा ते बसलेले जोडपे.  ते काठी टेकत चालणारे आजोबा पहा.  ती आज्जीचा हात पकडून बागडणारी छोटी मुलगी पहा.  " त्याच्या डोळ्यात चमक होती.  मी आपोआपच त्याची आज्ञा पाळू लागले.  न पाळूनही काय करणार?
आज मी त्याची होती..  रात्री नऊ पर्यंत.

" पाहताय ना? " त्याने विचारलं.

" हो..  छान आहे..  " मी बोलून टाकलं.  भरपूर चालल्या सारखं वाटलं.  कट्ट्यावर दिसणारी माणसं मी सुद्धा पाहू लागली.
मला ती दिसायचा संबंधच नव्हता.. खोलीतल्या पाच मुली, बिल्डींगमधल्या इतरजणी आणि रोज रात्री येणारे भुकेले चेहरे.  हेच नशिबी..

" मंदिरात जाऊ या?  " त्याने विचारलं.
समोर गणपतीचे मंदिर होते.

वर्षातून एकदा ताई सर्वांना साईबाबांच्या दर्शनाला न्यायची बाकी जे काही देव ते भिंतीवर टांगलेले.  बाकी प्रत्यक्ष मंदिरात जाणे व्हायचेच नाही.
अगरबत्तीचा सुगंध...  प्रसन्न वातावरणात घंटेचा ध्वनी आणि त्यात प्रदक्षिणा घालणारे पवित्र स्त्री-पुरुष...
मला माझ्या अपावित्र्याची लाज वाटू लागली.
क्षणभर पाय थबकले.
त्याने डोळ्यानेच विचारले..

" काय झालं? "

मी मानेनेच नको म्हटले...

" का?  का नको?  लोक इथे केलेल्या चुकांची माफी मागायलाच येतात,  आपली पापं देवाकडे सोपवून उजळ माथ्याने बाहेर पडतात.  चला या "
हात धरुनच आत नेलं..

गणपतीसमोर हात जोडून स्वतःकरीता काही मागणं सुचलंच नाही.

गावी असलेल्या आई बहिणींची आठवण आली त्यांना सुखी ठेव...  एवढंच मनात आलं..
डोळे उघडले तेव्हा तो माझ्याकडे बघत होता.  हसत होता..

" यायचं नव्हते...  ना?
या जगात अपवित्र असं काही नसतं...  अपवित्र असतात त्या माणसाच्या भावना.
चला काहीतरी खाऊन घेऊ..  "

खरंच हा माणूस मला समजणे कठीण झाला होता.  आतापर्यंत याने कोणतीही अशी हालचाल केली नव्हती ज्यासाठी त्याने मला आणलं होतं.  काहीतर टॅक्सीतच सुरु होतात.

बाजूलाच वडापावची गाडी लागली होती.
डीशमध्ये तीन वडापाव घेऊन तो जवळ आला.

मी लगेच एक उचलला.
भुक लागलीच होती.

" माहीत आहे तुम्हाला भुक लागलीय म्हणूनच दोन वडापाव घेतलेत तुमच्यासाठी..  वन सेक..  डीश पकडा मी बिसलेरी घेऊन येतो "
म्हणून माझ्या हातात डिश सोपवून बिसलेरी घेऊन आला.
वडापाव संपले.
" चला आता वर्तुळ पुर्ण करुया...  म्हणजे.... टॅक्सीकडे जाऊया.. " तो हात पुसत म्हणाला

" ते नाही?  मला वाटलं...  " मी न रहावून विचारले

मला अर्धवट तोडत म्हणाला.  " ही समोर दादर चौपाटी आहे..  पण आपण तिथे नको जाऊया.  दुसरी छान जागा आहे तिथे जाऊ.  "

माझा हात पकडून तो निघाला सुद्धा.
टॅक्सीत ड्रायव्हर पेपर वाचत बसला होता.  तो सावरुन बसला.
उघडलेल्या दरवाजाकडे हात दाखवत म्हणाला
" या बसा..  आरामात,  काही घाई नाही "
ड्रायव्हरकडे बघत म्हणाला

" भाऊ..  सी लिंक वरुन घ्या.  जुहू चौपाटी.  "

ड्रायव्हरने आठ्या आणल्या
" उन्हात जुहू चौपाटी?  त्रास होईल..  एक लॉज आहे ओळखीचा तिथे नेऊ का?  जरा आराम वगैरे करा आणि मग जा चौपाटीवर "
माझ्याकडे सुचक बघत ड्रायव्हर बोलत होता.

" हे बघा मी सांगतोय तेच करा आणि यांच्याकडे बघणे जरा बंद करा.. "
आवाज वाढला होता त्याचा.

आपली चोरी पकडली गेली हे समजल्यावर तो ओशाळला....

टॅक्सी सुरु झाली.
पुन्हा हात हातात गुंफले गेले.

गाणं सुरु होतं...
" लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो...  "

बघता बघता सि लिंक चा पुल आला.
वरळी दुध केंद्र, वरळी सी फेस,  टॅक्सीतूनच दाखवले.
मी काय आहे ते विसरुन आजूबाजूच्या गोष्टी नजरेत साठवून घेऊ लागले.
सि लिंक ची भव्यता मनात भरली.  प्रत्येक जागेची तो माहीती देत होता.  टॅक्सीवालाही अधून मधून अधिकची माहीती सांगत होता..
इतकी वर्ष मुंबईत राहून कधीही न पाहीलेल्या जागा आणि ठिकाणं दिसतं होती.

जुहु चौपाटी आली.
टॅक्सीतून उतरताना माझ्या शरीराचा पुसटसा स्पर्श त्याला झाला...
मी शहारले..  तो मात्र निर्विकार होता.
समोर दिसत होता भला मोठा समुद्र..  फुगेवाले,  आकाशपाळणे, खाद्यपदार्थ विकणारे..  उन्हामुळे गर्दी कमी होती.  काही जोडपी हातात हात घालून फिरत होती.  कोणी आईस्क्रीम खात होतं तर कोणी कापूसगोळा, कोणी पाण्यात डुंबत होतं तर कोणी समुद्राकडे नजर लावून शांत बसलं होतं.

लहानपणी बाबांसोबत गेलेल्या जत्रेची आठवण आली.  डोळ्यात पाणी येतच होतं तर..
तो बोलला...
" कुल्फी खाऊया?

हो नाही चं उत्तर न बघताच तो दोन कुल्फ्या घेऊनही आला.

" ही ओढणी डोक्यावरुन घ्या.  म्हणजे  उन्हाचा त्रास जाणवणार नाही.
मी ओढणी बांधेपर्यंत त्यानेही एका हाताने गॉगल डोळ्यावर चढवला.

" कुल्फी छान आहे " हे मी न सांगताच त्याला कळालं.  हातात हात घालून या टोकापासून त्या टोकापर्यंत नुसते चाललो.  मला प्रत्येक गोष्ट दाखवत दाखवत पुन्हा माघारी फिरला.
 आकाशपाळणे वाला कोणी नव्हते म्हणून तिथेच बसला होता. दोघांना बघून लगेच पुढे आला.
" साब पचास रुपया..  आप जैसे बोलोगे वैसे घुमाऊंगा.  "

माझ्या डोळ्यातली इच्छा त्याला दिसली होती.

" दोनो बैठेंगे..  "
हात देऊन पाळण्यात बसवले आणि मग स्वतः बसला.
चक्र सुरु झाले...
जसजशी गती वाढू लागली तशी भिती वाटू लागली.  नुसत्या हाताचा आधार कमी पडू लागला.
एक क्षण असा आला की मिठी पडलीच माझी त्याच्या भोवती.  भरपूर वेळ झाला असावा.

" उठा..  पाळणा थांबलाय.. " त्याच्या आवाजाने डोळे उघडले..  पटकन मिठी सुटली.  गालावर लाली आली....

तो मात्र निर्विकार...

मी त्याच्या प्रेमात पडतेय की काय असं वाटू लागलं.
अजून मला त्याचं नावही माहीत नव्हतं.

" मी पाण्यात चालू जरा वेळ?  " मी हळुवार येणाऱ्या लाटांकडे पाहत विचारलं.

" हो...  चला की मी सुद्धा येतो सोबत.  "

हातात हात घालून आम्ही दोघेही कितीतरी वेळ पाण्यातून चाललो. चप्पल बुट दोघांच्याही हातात.

मला त्याला बिलगावसं वाटत होते..  इतकी पुरुषी शरीरं पाहीली होती...  नकोशी..  पण त्याच शरीर हवहवंस वाटत होतं..  त्याच्या अंगाला येणारा मंद मस्क चा सुवास मला मोहीत करीत होता.

" भुक लागलीय ना?  चला जेवून घेऊ?  रस्त्याच्या पलीकडे एक हॉटेल आहे.  छान जेवण असते तिथे. " त्याने एकदम विचारले.

मी घड्याळात पाहीलं दोन वाजत होते.  म्हणजे पाच तास होऊन गेले होते.  अजून सहेतूक एकदाही स्पर्श केला नव्हता त्याने.  उलट मीच त्याच्या सहवासाला आतूर झाली होती.

हॉटेल मध्ये गेल्यावर फार काही न मागवता थाळीच मागवली.  समोरासमोर बसून जेवताना मी त्याच्याकडे पाहत होती आणि तो माझ्याकडे.
माझ्या नजरेने कित्येक घायाळ व्हायचे.. तो मात्र शांत..  त्याच्या डोळ्यातले भाव बदलतच नव्हते..

जेवत असताना बाजूच्या टेबलवर बसलेला माणूस माझ्याकडे सतत पाहत होता.
त्याच्या बघण्यावरुन समजलं की याला मी काय आहे ते समजलंय.

हात धुताना दोघेही बेसिनजवळ एकत्रच गेलो.  मी हात धुताना तो माझ्याकडे पाहत होता..  चेहऱ्याकडे..  काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करीत असावा जणू.

" आता?? " त्याने विचारलं..

" तुम्ही सांगा..  का आणलंय मला बाहेर?  सवय नाही मला या सर्वाची.  आपुलकी, सहानुभूती दाखवणार असाल तर प्लीज...  मला त्याची गरज नाही. मन मेलेले असतं आमचं. आम्हाला फक्त हिशेब येतो.  इस हात ले उस हात दे..  सौदा शरीराचा होता...  मनाचा नाही.  आज शरीर तुमचे आहे..  काय करायचे ते करा..  पण हे असं नको.  खरंच सवय नाही मला याची.  " मी त्याचा धरलेला हात दाबत रागारागाने बोलली.

तो मंद स्मित करत होता..  जणू मी जे बोलले त्याचा काहीच परीणाम नाही झाला.
" मी तेच तर करतोय. सोबत शरीर घेऊनच फिरलो की तूमचे.  काय करायचंय आणि नाही करायचं हे माझ्या मनावर आहे... नाही का?
तसाच सौदा ठरला होता बहुतेक.
का?  कशाला?  या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला शेवटच्या तासात देईनच.  तोवर मिळालेले क्षण जगून घ्या...  मुक्तपणे..  "

बोलता बोलता टॅक्सीजवळ पोहचलो.

" या साहेब..  झालं जेवण?  कुठे जायचं आता?  " ड्रायव्हरने माझ्याकडे बघणे टाळलं.

" थेट गिरगाव चौपाटी.  " क्षणाचाही विलंब न लावता तो बोलला.

आणि दरवाजा उघडला.  त्याच्याकडे बघत मी आत जाऊन बसले.  तो बाजूला येऊन बसला आणि टॅक्सी सुरु झाली.

भरपूर वाट बघूनही त्याचा हात हातात येईना म्हणून मीच हात पुढे केला.  तसा तो हसला.  हसल्यावर एक बारीकशी खळी त्याच्या गालावर पडत होती. मी जरा त्याच्याजवळ सरकली.

त्याने मोबाईल काढला आणि त्यात बघून सकाळसारखा हरवला.
मला झोप येऊ लागली.  बहुतेक त्याच्या खांद्यावरच झोपली असावी.  कारण जेव्हा त्याने उठवलं तेव्हा मी त्याच्या खांद्यावरच होते.  सहा वाजले होते.

" सुगंधा मॅडम...  ही चौपाटी.. जायचंय ना बघायला.  " त्याने विचारलं..  त्याच हसऱ्या चेहऱ्याने.

" नाही..  आपण असेच फिरुया..  टॅक्सीत? " मी केलेला प्रश्न ऐकून तो हसला..  सोबत ड्रायव्हरपण हसला..

" ओके..  भाऊ दोन राऊंड होतील ना..  आरामात? आपल्याला साडे आठला जिथून सुरुवात केली तिथे जायचंय.  त्या हिशेबाने फिरवा गाडी.  " त्याने हुकूम सोडला.

बाहेरचा उजेड जसजसा कमी होत होता तसा टॅक्सीमधला अंधार वाढत होता.

गाणं चालू होतं...

"पहली पहली बार बलिए...
दिल गया हार बलीए...
रब्बा मैंनू क्या हो गया.... हाए...
 दिल का करार खो गया...  हाए...  "

गाण्याच्या धुंदीत मला राहवले नाही आणि एकदम मी त्याला स्वतःकडे ओढले.  ओठाला ओठ टेकवणार तोच तो बोलला....

" स्टॉप..  इट...

अजूनही नाही कळलं का की मी हे सर्व करायला नाही आणलंय तुम्हाला.
ऐका..  खरंतर मी हे नेहमी शेवटी सांगतो..  पण तुम्हाला नाही रहावलं म्हणून सांगतो.

याच दिवशी मी माझं प्रेम..  माझी पत्नी गमावून बसलो.  ती तुमच्या वस्तीत यायची..  समाजसेवीका म्हणून.  फार वय नव्हते तिचं. जाण्याच्या दिवशी तिने माझ्या हातात हात घेऊन..  अगदी मी तुमचा घेतला होता तसा, घेऊन म्हणाली..
मला एक वचन द्या.  या मुलींना " एखादा दिवस " माझ्यासारखा जगू द्या.  मुक्तपणे..  स्वच्छंदीपणे बागडू द्या त्यांना.  त्या नरकातून सुटका करणे आपल्याला जमेल असं वाटत नाही पण सुखाचा एखादा दिवस तुम्हाला देणे नक्कीच शक्य आहे.... "

माझ्या हातावर अश्रू पडला...
गरम..  त्याचा..

त्याचे डोळे झरत होते.
भरपूर वेळ शांतता राहीली.
गाणं वाजत होते....

" छोडेंगे ना हम तेरा साथ...
ओ साथी मरते दम तर.. "

 टॅक्सी पळत होती..

" साहेब..  इथेच थांबू की गल्लीत घेऊ? "ड्रायव्हरच्या आवाजाने दोघांची तंद्री तुटली.

घड्याळात पाहीलं.. साडेआठ वाजले होते.

तो खाली उतरला. ..
मला उतरण्याची जागा करुन द्यायला..

विलास अगोदरच तिथे होता. त्याच्या मागे बसले..  गल्लीच्या कोपऱ्यात तो दिसनासा होईपर्यंत त्याच्याकडे बघत राहीले...  कृतज्ञतेने....

( तन्वीर सिद्दीकी यांच्या " जमलं तर " या वर आधारीत)