Tuesday, 20 December 2016

कटींग चहा

.... कटींग चहा ....


"हो...  तीच ती...
नक्कीच ती..  "
रस्त्याच्या पलीकडून डोळ्यांना चष्मा लावून हातात भाजीची कापडी पिशवी, ज्यात पांढराशुभ्र मुळा लांबूनही दिसत होता,  एकंदरीत गबाळ्या साडीत चालत जाणाऱ्या तिला बघितल्या बघितल्या त्याला शाळेतले शेवटचे दिवस आठवले. दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण होते.  पण स्टोरी कधी बनलीच नाही.  आता इतक्या वर्षांनी ती पुन्हा दिसतेय.

रस्ता ओलांडून तो तिच्या समोर जाऊन उभा राहीला.  तिने बाजूने रस्ता काढला तसा तो बोलला..

" सुगंधा...  तू सुगंधाच ना?  "

पुढे गेलेली ती क्षणभर चपापली.
तीने मान वळवून त्याच्याकडे पाहीलं.  चेहरा आठवेना...

"हो मी सुगंधाच,  पण मी आपल्याला ओळखलं नाही?  "

" हुश्श..  म्हणजे मी बरोबर होतो.  सुगंधा...  अग मी संजीव..  दहावी अ..  आर्यन.. ओळखलंस का आत्ता तरी..  " त्याने गालावर त्याचे सर्वांना आवडणारे हास्य आणलं.

" अय्या...  संजीव..  किती बदललास तू?  कसं रे ओळखणार?  सेंडऑफ नंतर आता दिसतो आहेस.  " तिचीही कळी खुलली.

" बघ की... पण मी तुला ओळखलं की नाही?  आपण चेहरे विसरत नाही लवकर.  आणि त्यातही आवडत्या लोकांचे तर नाहीच नाही. "
त्याच्या डोळ्यासमोर ती दहावीतली सोळा वर्षीय लाल रिबीनीत दोन शेंड्या बांधून गालाला हलकासा पावडरचा हात लावून, नेहमी नीटनेटकी राहणारी सुगंधा होती.

" काय म्हणतोस कसा आहेस? बाकी काय म्हणतोस? " क्षणभरापुर्वी तिचा खुललेला चेहरा अचानक हिरमुसला.  तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव एक सायक्रॅटीस्ट म्हणून त्याने पटकन ओळखले.

" मी मस्त आहे,  तू सुद्धा छानच दिसतेयस की.  जरा सुटली आहेस एवढीच, पण ते जनरल आहे.  लग्न झालं की गृहीणींमध्ये तो फरक होतोच. " त्याची नजर तिच्या मानेच्या बाजूला दिसणाऱ्या काळ्या मण्यांवर गेली.

" हो रे.  तू काय करतोस सध्या? " ती कोणत्यातरी अनामिक दडपणाखाली बोलत होती हे नक्की.

" मी डॉक्टर आहे.. सायक्रॅटीस्ट..  ते काय समोर माझे क्लिनीक आहे.  घाईत नसलीस तर एक एक कटींग घेऊया ?  "
त्याने तिच्या चष्म्यापलीकडे असणाऱ्या परंतू अत्यंत अस्वस्थ डोळ्यात पाहून विचारलं.

" नको...  बरं दिसत नाही ते.  तू माझा वर्गमित्र आहेस हे कोणाला कळले तर, लोक काय विचार करतील?
नको चहा वगैरे,  चल मी निघते भेटू पुन्हा कधीतरी. " ती द्विधा मनस्थितीत होती नक्की, कारण तोंडाने जरी ती बोलत असली तरी ती एकाच जागी स्तब्ध उभी होती.

" ते बघ,  नाक्यावरच चहाचे हॉटेल आहे दहा मिनीटे तर लागतील आणि पैसे मी देईन म्हणजे तर झालं " तो मोठ्याने हसला.
खरोखरच तिथे हॉटेल दिसत होते.

" अरे पण हे भाजी आणि हे सामान?  " तिने पिशव्या वर करुन दाखवल्या.

" आपल्याला कुठे फाईव्ह स्टारला जायचंय? " पुन्हा गालातल्या गालात हसत तो म्हणाला.

"ओके,  चल आता मला उशीर होतोय. " तीने पाय हॉटेलच्या दिशेने हलवले.

दुसऱ्या मिनीटाला ते हॉटेल मध्ये बसले होते.

" भाऊ..  दोन कटींग पटकन आणा मॅडम खुप घाईत आहेत " पुन्हा तसंच गोंडस हसला. पुढे बोलला...
" मी सांगितलं आता तू सांग काय चाललंय तुझे?  कोणासोबत लग्न केलंस? आणि हा असा अवतार का?  शाळेत तर एकदम नीटनेटकी रहायचीस तू?  "

" काय सांगू शाळा संपली आणि दुसर्‍याच वर्षी बाबांनी लग्न लावून दिले...  अनोळखी माणूस,  नवीन घर यांना समजून घेता घेता..  पदरात मुलं पडली सुद्धा.  दिवसभर घरातच काही नवीन करायला जायचं तर सतत नकार,  नवरा चांगला आहे पण जुन्या विचारांचा. परक्या कोणाशी बोललेले आवडत नाही.  वयात सुद्धा दहा वर्षाचा फरक,  संसार आहे म्हणून चाललंय सर्व " ती बोलताना सारखी चष्म्याला हात लावत होती,  सारखं त्याच्या डोक्यापलीकडून रस्त्यावरच्या लोकांकडे पाहत होती. तो तिला वाचत होता.
तेवढ्या संभाषणावरुन त्याला तिचा नेमका काय प्रॉब्लेम आहे ते समजून चुकलं.

" साब..  दो कटींग " असं बोलून चहावाला समोर वाफाळते काचेचे ग्लास ठेवून गेला सुद्धा.

" घे कटींग चहा..  आमच्या इथला स्पेशल.  पण त्यासोबत तुला माझी मैत्रीही स्विकारावी लागेल.  बोल आहे मंजूर?  " एका हातात चहा आणि दुसरा हात त्याने तिच्या समोर केला.

ती चपापली..  तिने पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात पाहीले..  ते अजूनही तसेच होते शाळेत असताना पाहीले होते तसेच..  मिश्किल आणि आव्हान देणारे.  ती क्षणभर मोहरली तिचे ओठ विलग झाले आणि बोलली..

" नाही अरे,  लग्न झालंय आता माझे,  मुलं सुद्धा मोठी झालीत की संसार आहे माझा, नवरा आहे,  प्रेमही करतो तो माझ्यावर.. " तिने चहाच्या ग्लासाकडे पाहत बोलणे सुरु केलेलं.

" अगं मी मैत्री म्हणतोय तुला.. " तो हसत हसत बोलला.

ती जणू त्याचे ऐकतंच नव्हती

" आणि हे असं बरोबर नाहीच. मी, माझे घर संसार हेच माझे आयुष्य,  अशा गोष्टींसाठी खरंच माझ्याकडे वेळही नाही आणि इच्छाही नाही. "

आता ती त्याच्या समोर असलेल्या ग्लासातून येणाऱ्या वाफेकडे बघत होती.

" अगं मी मैत्री म्हणतोय तुला.. " त्याच्या चेहऱ्यावरचे हसू अजूनच फुलत होते.

" अरे घरची कामं,  मुलांचा अभ्यास,  स्वयंपाक,  सासूची सेवा यातच दिवस कसा संपतो तेच कळत नाही आणि त्यातून हे सर्व करायचं म्हणजे...   लोकांच्या नजरेतून लपवायचं,  कोणी पाहीलं तर उगाच गावभर बोंबाबोंब, भांडणं,  लोक सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतात... "

आता ती त्याच्या शर्टाच्या दुसर्‍या बटणाकडे बघत होती.
" अगं... मी मैत्री म्हणतोय तुला.. " त्याने हात किंचीत पुढे सरकवला.  चेहरा हसरा ठेवूनच.

" मधल्या वर्षात ही भावना मेलीच होती रे माझी.  मी तुला लांबूनच ओळखले होते तीन दिवसांपुर्वी..  पण टाळलं.. म्हटलं नको उगाच तो मोह..  " तिने क्षणभरच त्याच्या डोळ्यात पाहीले आणि पुन्हा तिची नजर ग्लासावर स्थिरावली..

" अगं मी मैत्री म्हणतोय तुला.. " आता तो जरा जोरानेच हसला.

तिच्या डोळ्यातून एक थेंब खाली टेबलावर पडला.. श्वास गरम होऊ लागले..  कानशीलं तापू लागली..

" खरंच रे..  माझे नाही जमणार आता तुझ्यासोबत... पण एक सांगू...  हे असं फक्त मला तू विचारले होतेस..  वीस वर्षांपुर्वी..  आता पुन्हा तूच विचारतो आहेस. " तिच्या डोळ्यातून अश्रू टपटप खाली टेबलावर पडू लागले.

त्याने पुढे केलेला हात खिशात नेऊन, रुमाल काढला आणि तिच्या समोर धरला..  आणि म्हणाला..

" डोळ्यात बघ माझ्या..
याचसाठी
मी मैत्री म्हणतोय तुला..  कळतंय का??
फक्त मैत्री."

तिने डबडबल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहीले..  रुमाल तसाच होता त्याच्या हातात.    पदराने डोळे पुसले तसा त्याने रुमाल खिशात ठेवला आणि हात समोर केला.

आता ती त्याच्या हाताकडे पाहू लागली..  तोच हात...  जो तिने वीस वर्षांपुर्वी स्पर्श करता करता निव्वळ भितीमुळे अस्पर्शित ठेवला होता.
तिचा हात त्याच्या हातावर अलगद विसावला.  शरीरातून एक वीज गेल्यासारखी थरारली ती.

तो एकदम खुशीत बोलला...

" भाऊ...  दोन कटींग पुन्हा येऊद्या.  या जुन्या थंड झालेल्या घेऊन जा.  नविन आणा चांगल्या वाफाळत्या..."
- बिझ सं जय (२० डिसेंबर, २०१६ ) 

Friday, 16 December 2016

साखर

.... साखर ...


" तुम्हाला साखर किती? " तिने विचारलं...
"नाही मी अजूनही साखर नाही खात, नका टाकू..."
तो पटकन बोलून गेला.
" अजूनही? "
तिच्या कपाळावर सुक्ष्मशी आठी आली.
" नाही काही नाही.. मी बिनसाखरेचाच चहा पितो. साखर नका टाकू "
त्याने सारवासारव केली.
हातातल्या चहाच्या कपात बघत असताना तो भूतकाळात गेला.......
..........................
त्याला हळू हळू समजत होतं की तो तिच्यासाठी आणि ती त्याच्यासाठी नाही..
एकमेकांना प्रेमाची कबूली देऊन मोकळे झालेले ते दोघे. ..
कुठेतरी काहीतरी चुकतंय हे दोघांनाही कळून चुकलेलं.. पण मन मात्र तयार होत नव्हतं.
शेवटचं लाडीक बोलणे कॅफे मध्ये असताना झालेलं.. त्याला आठवत होते.
समोर दोन चहा चे कप होते.
कपाळावर रुळणाऱ्या बटांमधून बोटं फिरवीत ती म्हणाली..
" साखर किती? "
डोळ्यात चमक आणत तो म्हणाला..
" तुझे बोट बुडव आत.. साखरेची काय गरज मग? "
" अच्छा? मग घे... हे बुडवलं बोट आत.. आणि पी बघू आता हा गोड चहा... "
तिच्या गालावर दोन बारीक खळ्या पडायच्या, हनुवटीवर असलेला लहानसा तीळ.. याकडे बघूनच तर तो वेडा झाला होता.
त्या सुंदर हास्याकडे बघत
त्याने चहाचा कप तोंडाला लावला..
कडू चहा सुद्धा त्याक्षणी अमृतासारखा लागत होता.
" काय रे तू?
किती कडू असेल तो चहा?
तू पण ना दे बघू इकडे.. टाकते साखर त्यात. "
लटक्या रागाने बघत ती बोलली.
" सिरीयसली.. खरंच छान लागतोय.. तुझ्या प्रेमाचा गोडवा त्यात उतरलाय. मी जन्मभर अशीच चहा घेईन यापुढे.. " त्याने एकदम निर्धारपुर्वक सांगितलं.
" दे बघू प्रॉमिस.. " तीने मिश्किलपणे गालातल्या गालात हसून हात पुढे केला.
" प्रॉमिस म्हणजे प्रॉमिस.. जन्मभर तुटणार नाही हे.. " तिच्या हातावर हात ठेवत त्याने तिचा हात हळूवार दाबला.
" ओ रे माझ्या सोनूल्या" म्हणत तिने त्याचा एक गाल पकडला.
त्याला तिचे हे असे लाडीक बोलणे भरपूर आवडायचं..
पण एक असाही कोन त्यांच्या आयुष्यात होता की ती याच्या आयुष्यात येण्यापुर्वी दुसर्‍याच्या आयुष्यात होती.
दुसरा जरी काही बोलत नसला तरी कुठेतरी मनात तीच होती. नाही बोलूनही तिच्याबद्दल त्याला फिलींग्ज होत्याच.
नाही बोललास ना?
बघ तुझ्या डोळ्यासमोर दुसर्‍या बरोबर कशी आनंदात राहते ती.. या निर्धाराने ती याच्या आयुष्यात आली होती.
त्याला ही गोष्ट समजली तेव्हा त्याच्याही लक्षात यायला लागलं की आपण वापरले जातोय.
प्रेमाचा दिखावा म्हणून आपला वापर होतोय.
पण त्याने तिच्यावर प्रेम केलं होतं की...
मनापासून..
अनेक चहा झाल्या त्यानंतर बिनसाखरेच्याच.
एके दिवशी ती म्हणाली...
" सॉरी... मला विसरु जा. "
भर पावसात भिजत तो समुद्र किनाऱ्यावर गेला. तोंडात जाणारे खारट थेंब हे अश्रूंचे होते की समुद्राच्या पाण्याचे हे तो सुद्धा सांगू शकला नसता.
" साब.... चाय...? " सायकल वरच्या चहावाल्याने त्याला विचारले
" नहीं... " मावळणाऱ्या सुर्याकडे बघत त्याने उत्तर दिले.
" साब.. गरमागरम है.. लो ना.. कुछ धंधा नही हुवा है आज " त्याच्या डोळ्यात अगतिकता होती..
" दे फिर... " सुर्यावरची नजर न हटवता तो बोलला.
" शक्कर कितनी डालू?? " नेहमीचा प्रश्न त्याचा.
" नहीं.. शक्कर बिल्कुल नही...
तिने मोडलं म्हणून मी वचन मोडणार नाही.. "
हातात आलेला चहा पीत पीत रात्र कधी झाली ते त्याला कळाले नाही....
.........................
आज तो आईने सांगितलेल्या मुलीच्या घरी चहा प्यायला गेला होता..
खुप साम्य होते हिच्यात आणि तिच्यात...
" चहा घ्या की.. थंड होईल.. "
गालावर आलेल्या बटांशी ती खेळत होती.
" असा चहा कडू नाही का लागत तुम्हाला? "
" नाही.. कडू गोष्टींची सवय झालीय मला... " चहा चा कप संपवत समोरच्या टिपॉय वर ठेवला..
" निघतो मी.. आई फोन करेल तुम्हाला... " त्याने नजर चोरुन तिला सांगितलं...
त्याच्या आयुष्यातली साखर हरवली होती... कायमची...
- बिझ सं जय ( १६-१२-२०१६)

Friday, 9 December 2016

कुटूंब

..... कुटूंब.....


"हॅलो..  मला सहाशे तेवीस नंबर मधल्या शंतनू सोबत बोलायचंय... हो हो.. तोच.. त्याची आई बोलतेय.. हो थांबते "
दोन मिनीटांनी शंतनू समोर आला..
" हॅलो... हां आई बोल.. मोबाईल वर फोन का नाही केलास? "
" शंतनू तुम्ही दोघे लवकर या, बाबांना कसंतरी होतंय, आम्ही हॉस्पिटलला नेतोय, तुमचे दोघांचे फोन बंद आहेत म्हणून इथे केला."
आईने रडत रडत सांगितले.
" काय झालंय नक्की? त्यांना अॅसिडीटीचा त्रास आहे ते माहीत आहे.. उगाच घाबरु नको तू.. हॉस्पिटलला जा डॉक्टर काय सांगताहेत ते बघ त्यानूसार आम्हाला कळव. मी मोबाईल चालू करतो. चार्जिंगला लावलेला. " शंतनू समजावणीच्या सुरात बोलत होता..
" शंतनू... नाही रे...."आईचा आवाज कमी होत गेला... अरुण मामाने तिच्या हातून फोन घेतला...
" शंतनू.. मामा बोलतोय.. अरुण मामा.. लगेच बसा..
कंडीशन क्रिटिकल आहे नेहमीसारखं अॅसीडीटी चे नाही हे... बाकी चर्चा नको.. निघा तसेच... "
" अरे पण... " शंतनू जरा त्रासलाच.
" अरे बिरे.. काही नाही.. मी म्हटलं ना निघा म्हणजे निघा याक्षणी.. " अरुण मामाने फोन ठेवून दिला.
शंतनू धावतच खोलीत गेला..
देवेंद्र त्याच्या फोनवर गाणी ऐकत आडवा पडला होता..
" तू पुन्हा फोन एअरप्लेन मोड ला ठेवून गाणी ऐकतोयस?
चल उठ तयारी कर.. बाबांना हॉस्पिटलला नेलंय अरुण मामांनी आत्ताच्या आत्ता यायला सांगितलंय. " वैतागून चार्जिंगला लावलेला फोन उचलून त्याची पीन काढली.
मामाचे नाव ऐकून देवेंद्र सुद्धा ताडकन उठून बसला...
" खरंच काही सिरीयस आहे का? नाहीतर गेल्यावेळी सारखा उगाच हेलपाटा व्हायचा " देवेंद्रच्या डोक्यावर सुद्धा आठी आली..
" मामा बोलले म्हणजे नक्कीच काहीतरी सिरीयस असणार.. चल तू लवकर.. " शंतनू ने कपाटावरुन सॅक काढली. एक जोडी कपडे भरले, कपाटातून काही पैसे टाकले, तोवर देवेंद्रने सुद्धा त्याचे कपडे दिले.
घड्याळात बघत शंतनू म्हणाला " आता दहा ची गाडी आहे सकाळी चार पाच पर्यंत पोहचू.. "
दोघेही तयार होऊन दहा मिनिटातच रुम ची चावी हॉस्टेल च्या काउंटरवर देऊन निघाले.
गाडी लागलीच होती...
तिकीट काढून बसणार तोच देवेंद्रचा फोन वाजला..
" हॅलो मामा.. हां बोला.. हो निघालो.. गाडीतच बसलोय. हो नऊ वाजताच जेवलो... हो तो सुद्धा आहे... कुठल्या हॉस्पिटलला नेलंय?... का?? घरी का??
हो... चालेल. आम्ही घरी पोहचून फ्रेश होऊनच येतो.. हो... ठेवा " देवेंद्रने फोन कट केला..
" काय म्हणाले? आहेत ना बरे? " शंतनू ने विचारले.
" अरे त्यांच्याबद्दल बोललेच नाही मामा.. ते म्हणाले हॉस्पिटलला डायरेक्ट येऊ नका आधी घरी जा. असं का बोलले असतील? " देवेंद्र प्रश्नार्थक चेहऱ्याने शंतनूच्या उत्तराची वाट पाहत होता.
" काही नसेल रे.. तब्येत बरी असेल. उगाच सकाळी सकाळी हॉस्पिटलला गर्दी नको म्हणून बोलले असतील. झोप तू.. " शंतनूने डोळे बंद केले
................................

संध्याकाळचे आठ वाजले..
हळूहळू मयताला आलेले लोक परतायला लागले..
आई रडून रडून आता दमली होती. काकांनी काकूंना " नंतर ये.. " सांगून काढता पाय घेतला होता. मामी आईजवळ बसून होती आणि मामा वऱ्हांड्यातल्या लोकांना कार्याबद्दल माहीती देत होते.
मामा घरात आले तसा शंतनू उठला.. एक वेळ देवेंद्रकडे बघत मामांना बोलला..
" मामा.. आम्ही आता थांबून काय करु? लोक तर गेले सर्व.. माझा डे बुडेल.. देवेंद्रचा सुद्धा पगार कटेल.. मल्टीनेशनल कंपनीला याचे काही पडलेले नसते हे तुम्हाला माहीतच आहे. मी पैसे आणलेत ते कपाटात ठेवलेत."
काहीसा अडखळत होता तो.
ते ऐकून आईने रडून रडून लाल झालेले डोळे उघडले.. तिला तिच्या कानावर विश्वासच बसेना.
" अरे तुमच्या जिभेला काही हाड?? तुमचा बाप मरुन अजून चोवीस तास नाही झाले आणि तुम्ही परतायच्या गोष्टी करताय? कोणासाठी कमावताय रे? या.. या कुटूंबासाठीच ना? " अरुण मामा चिडला होता..
त्याच्या आवाजावर आवाज चढवत तिकडून देवेंद्र उठला..
" मामा आम्ही काम करतोय म्हणूनच हे घर चाललंय. नाही केलं ना तर तुमच्यासारखं गॅरेज खोलावं लागेल. आम्हाला काय माहीत नाही का? आई तुला पैसे देते ती... "
मामा त्याच्याकडे बघतच राहीला. अख्ख्या जन्मात दोन्ही भाचे त्याच्यासमोर या आवाजात कधीही बोलले नव्हते.
" ओ.. तुम्ही चला घरी.. " मामीने मामांचा हात धरुन ओढला..
" ताई.. बघ गं तू. मी जातो." मामा पायात चप्पल चढवत बोलला.
शेजारचे नाना बोलणार तोच त्यांना शंतनू बोलला..
" बाहेरच्यांनी आता अक्कल शिकवू नका.. आम्ही जातोय म्हणजे जातोय.. कार्याला एक दिवस येऊ.. "
आई कडे बघत शंतनू बोलला " आई कपाटात पैसे ठेवलेत.. जे काही सामान वगैरे आणायचंय ते आणून घे. मामा आहेच रिकामा. आम्ही स्टँडवरच जेवू.. "
आईच्या डोळ्यातले अश्रू कोरडे झाले होते...
एका दोघांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण मग त्यांच्या बोलण्याला ऐकून ते सुद्धा शांत बसले.
" आई येतो... आम्ही १७ तारखेला येऊ कार्याला. सकाळी येऊ आणि रात्री जाऊ... " चप्पल घालत शंतनू बोलला..
आई काही न बोलता भिंतीवरच्या चौघांच्या कुटूंबाच्या फोटोकडे एकटक बघत होती.
दरवाजा बंद झाल्याचा आवाज झाला.. आणि तो फोटो हळूहळू धुसर होऊ लागला.

Sunday, 4 December 2016

गोड मॉर्निंग... मुंबई

गोड मॉर्निंग.... मुंबई

या लिखाणाद्वारे मी मुंबईची एक सकाळ मांडणार आहे. माझी मुंबई फार मर्यादित आहे.. कुलाबा,नरीमन पॉइंट पासून मरीन ड्राइव आणि इकडे वरळी सी फेस पासून हाजीअली, ताडदेव, गिरगाव ठाकुरद्वार ते भुलेश्वर काळबादेवी.... ही माझी सकाळची मुंबई. 
सध्या मला सायकलिंग ची आवड अचानक उमाळून आल्याय. त्यातही जास्तीत जास्त किलोमीटर पुर्ण करायची हौस निर्माण झालीय. त्यामुळे सकाळी जितके लवकर निघता येईल तितके निघतो.
मरीन ड्राइव्ह वरुन जाताना मी नुसतेच सायकलिंग करत नाही सोबत " न्याहाळींग " सुद्धा करतो हे मी मागे एकदा लिहिले होते.. 
तर.....
आजूबाजूला अंधाराचे साम्राज्य असताना लवकर उठलो तरच दिवसाचे काम पुर्ण होईल असा विचार करुन अंधारातच पाण्याच्या टँकर मागचा नळ उघडून फक्त चड्डी घालून, आजूबाजूला असणाऱ्या अंधारातून मला कोण बघणार आहे अशा धुंदीत १८-१९ सेल्सियस तापमानात थेट डोक्यावर धार घेऊन, मिळेल त्या साबणाने अंग घासणारा एक मनुष्य...
टाकीतून ओवरफ्लो होतंय तोपर्यंत जवळ असलेले सर्व भांडी कुंडी, ड्रम भरुन घेण्यासाठी मुलांवर ओरडणारी एक कळकट साडी घातलेली जिच्या पदराचा काही ठिकाणा नाही.. तसेही या अंधारात "कोण बघतंय या म्हातारीला " या धुंदीत भराभरा पाण्याची भांडी नऊ दहा वर्षांच्या मुलांकडे सोपवणारी ती पांढऱ्या केसांची म्हातारी....
डोळ्यावरची झोप उडतेय न उडतेय तोच " स्टोव्ह निकाल " असा शेठ चा दरडावल्याचा आवाज ऐकून, घाईघाईने खोक्यावरचा स्टोव्ह काढून घाईघाईने पंप मारणारा.. पेटलेल्या जाळाकडे बघत .. आपले आयुष्य जाळत, गावाकडच्या घरच्या लोकांना दोन घास पोटात जाताहेत या सुखात, भविष्याची स्वप्न बघणारा चायवाला पोऱ्या....
रस्त्याच्या कडेला तोंडावर दिवसभर घामटलेला तरीही त्याचा अजिबात त्रास न होता.. उलट संपूर्ण तोंड चौकटीचा निळ्या रुमालाने झाकून, त्याची रोजीरोटी असलेल्या पाटीत थंडीने गारठून बाकी शरीराचे मुळकुटे करुन सुखनैव झोपलेला तो पाटीवाला....
जरा जरी उशीर झाला तर पैसे कट होतील म्हणून जोर काढत पँडल मारत रस्त्यावरचे खड्डे चुकवत, त्या झाडांच्या सावलीमुळे झालेल्या काळ्याकुट्ट अंधारातून मोबाईल वर.. कम से कम इतना कहा होता.. हे गाणं जोराने लावून, हँडल पासून पार कॅरीअर पर्यंत चहाचे छोटे ग्लास रस्त्यातल्या एक एक टपरीवर पोहचवत त्याच सायकलीच्या खडखडाटात रस्ता कापणारा तो सायकलवाला.....
टॅक्सीच्या बाजूला..खाकी पँटीत खोचलेली आणि भोके पडलेल्या बनीयन घालून तोंडात दातून ठेवून दुसर्‍या हाताने काल दुपारी चहाच्या टपरीवर भरलेली पाण्याच्या बाटलीने टॅक्सीच्या पुढच्या काचेवर हबके मारुन ती काच स्वच्छ पुसत सकाळच्या पहिल्या गिऱ्हाईकाची वाट बघायची तयारी करणारा टॅक्सी ड्रायव्हर.....
कानावर रस्त्यावरुन घेतलेले तरीही ओरीजीनल सारखे दिसणारे हेडफोन लावून हातात मोबाईल वरची गाणी सतत बदलत मला कोण कोण पाहतंय हे डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहणारी. नवीनच घेतलेले जॉगींग शुज आणि जॉगींग ट्रॅक सुट कम्फर्टेबल नसल्याने काहीशी अस्वस्थ झालेली, तरीही मी बारीक होऊन दाखवणारच असा मनाशी निग्रह करुन शरीराची कमीत कमी हालचाल होईल याची काळजी घेत हळू हळू धावणारी एक मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन गृहीणी...
वेळेची पक्की, ग्रुप करुन धावणारी, अर्ध्या किलोमीटरवरही जिच्या महागड्या सुगंधी परफ्युम चा सुगंध पोहचेल, वय जास्त असले तरी रोजच्या जॉगींग आणि वर्कआउट मुळे प्रमाणबद्ध शरीर, सोबत अतीश्रीमंतीचा माज चेहऱ्यावर स्पष्ट ठेवून आजूबाजूला चालणारे, धावणारे कीस झाड की पत्ती है या अभिर्भावात दुर्लक्ष करुन हाताला बांधलेल्या मोबाईलवर आणि मनगटावरच्या फिटनेस वॉच वर सेशन सुरु करणारी ती तोकड्या कपड्यातली पन्नाशीची महीला...
आज तरी कमोडीटी मार्केट चढेल का? सोन्यात जरा जास्त इन्वेस्टमेंट केली असते तर बरे झाले असते अशी चर्चा करत एका हाताने डोक्यावरची हॅट सारखी व्यवस्थित करत दुसऱ्या हातात असलेली शिसवी लाकडाची चमचमणारी काठी जमीनीवर टेकत शांत पणे एका वेगाने हळूवार पणे चालणारे दोन पांढऱ्या केसांचे वयस्कर आजोबा....
मागच्या महिन्यात ज्युस चे तीस हजार मिळाले, या महिन्यात आताच बावीस हजार झालेत म्हणजे मुलाच्या घराचा हफ्ता आरामात पुर्ण होईल शिवाय महिन्याच्या शेवटी यांच्यासाठी एक जोडी कपडे सुद्धा घेता येतील म्हणजे ते सुद्धा आनंदी राहतील.. आपली बायको रोज सकाळी पिशवी भरुन वेगवेगळे ज्युस बनवून विकते आणि घरी चांगलीच शिल्लक पाडते याचाही त्यांना अभिमान होईल अशा विचारात समोर उभ्या असलेल्या पंचेचाळीशीच्या गृहस्थाला गाजराच्या रसाचा ग्लास देऊन कमरेला बांधलेल्या पिशवीत त्याने दिलेली वीस रुपयाची नोट सारत हसतमुख ज्युसवाली मावशी....
ड्युटी संपायला अजून किती वेळ आहे हे वारंवार घड्याळात बघत, ज्यांच्या पाठीमागे तुकाराम ओंबळेंचा पुतळा त्यांना कर्तव्याची जाणीव करुन देतोय. प्रत्येक गाडीवर करडी नजर ठेवून नाकाबंदीवर हातात चहाचा प्लॅस्टीकचा ग्लास घेऊन नेहमी नमस्कार करणाऱ्या एका जॉगींग करणाऱ्या मध्यमवर्गीय पुरुषासोबत हस्तांदोलन करणारे पोलिस कॉन्स्टेबल...
निव्वळ बायकोने भूण भूण लावली म्हणून अॅक्टीवा घेऊन चौपाटीला येऊन थोडीशी जॉगींग करुन टिशर्ट घामाने भिजला की सिगरेटचे पाकीट काढून तिथेच पार्क केलेल्या एका दुसर्‍या अॅक्टीवावर बसून सिगरेटचा धूर सोडत, हातात असलेल्या आय फोन ४ मधून यावेळी जाग्या असलेल्या एका क्लोज मैत्रिणीसोबत चॅटींग करणारा तो जाड जूड माणूस....
आपल्या आजोबांचा हात धरुन, त्यांना... "लवकर लवकर चला ना आजोबा... " म्हणणारी, रात्रीचा नाईट ड्रेस तसाच अंगावर घेऊन बॉबकट केलेली, चेहऱ्यावर सुंदर हसू असलेली, दुडूूदूडू चालीने चालणारी.. एक पाच सहा वर्षाची चिमुरडी मुलगी......
पाठीवर कळकट पांढऱ्या रंगाची अनेक ठिकाणी शिवलेली गोणी मारुन, रस्त्याच्या कडेला पडलेल्या चुरडून टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या जमवत.. तोंडाने रेडीओवर ऐकलेले.. स्कुल चले हम... स्कुल चले हम गाणे जोराजोरात गात बाकी जगाची पर्वा न करता शोधक नजरेने बाटल्या शोधणारा तेरा चौदा वर्षाचा मुलगा .......
जॉगिंग तर नावापुरते, सोबत डोळ्याचा फुकट व्यायाम.. धावणाऱ्या स्त्रिया आणि तरुणींच्या शरीराची होणारी लयबद्ध हालचाल उघड्या डोळ्यांनी व्यवस्थित टिपून पार दृष्टिआड होईपर्यंत नजरेने त्यांची सोबत करणारा, मनातल्या मनात, प्रत्येकी स्त्री - तरुणी आपल्यासोबत " ही " असती तर किती मजा करता आली असती असा विचार करणारा.. तो चाळीशीतला हिरवा तरुण.......
थंडीमुळे कुडकूडून अंगाचं मुळकुटे करुन झोपलेले एक दिड वर्षाचं पोर.. त्याच्या उजवीकडे झोपलेला डोक्यापर्यंत चादर ओढून झोपलेला त्याचा बाप आणि पोराच्या डावीकडे झोपलेली त्याची आई जिचा डावा स्तन रात्री दुध पिता पिता झोपल्याने तसाच सताड उघडा.. तिच्या अंगावर अर्धवट चादर.. थंडी तर नेहमीचीच तिला काय घाबरायचे. तिच्या चेहऱ्यावर झोपेतही दिसणारे समाधान......
त्या उघड्या स्तनाकडे पाहून.. क्षणभर पावले मंदावून, रस्त्यावरुन फुटपाथ वरुन चढून अधिक जवळून बघायला जाणारा..पांढरा शुभ्र टि-शर्ट आणि तशीच शुभ्र कडक इस्त्रीची पँट घातलेला... 
मनातल्या मनात " वॉव.. सुपर हॉट.. व्हॉट अ ब्रेस्ट " बोलून, बलात्कारी नजरेने त्या झोपलेल्या आई कडे बघणारा तो पांढरपेशी सो कॉल्ड श्रीमंत " पुरुष "...
आणि हे सर्व बघत...यातल्या एकाही व्यक्तीच्या भावविश्वातही नसलेला परंतू माझ्या भावविश्वात या प्रत्येक आणि अशा शेकडो मुंबईतल्या माणसांना जागा ठेवून रमत गमत गिअर बदलत सायकल हाकणारा... तुमचाच 
- बिझ सं जय

Wednesday, 30 November 2016

त्रिशंकू

त्रिशंकू
आज त्याला जाऊन तीन वर्ष झाली. पाच वर्षांचा संसार.. सुखाचा आणि समाधानाचा, संसार वेलीला लागलेलं एक फुल.. एकत्र कुटूंब दिर भावजय त्यांचा मुलगा, सासू सासरे कशाची कमी नाही...
आणि अचानक त्याचे असे निघून जाणे..
अनिकेत.. तू मला हवा होतास रे... पण आता काय उपयोग.. तू काही परत येऊ शकणार नाहीस.
मला आधार हवा होता रे... अनिकेत तू मला सोडून गेलास पण अनिल ने मला आधार दिला..
काय हरकत आहे? घरातले सगळे म्हणत होते की लग्न कर.. पण तो पुन्हा नविन डाव... संसार पुन्हा सुरु करणे सोप्पं नव्हते रे.. त्यात अक्षर ची जबाबदारी घ्यायला तयार तरी कोण होणार.
मी खुप विचार केला रे अनिकेत.. शरीराचीही गरज असते रे..
मला अनिलने जेव्हा पहिल्यांदा विचारले तेव्हा खरंच वाटेना...
असं कसं विचारु शकतो तो?
अरे तू अनिकेत चा सख्खा भाऊ ना?
पण मग विचार केला..
काय हरकत आहे. घरातच तर राहणार. अक्षरच्या पालनपोषणाचाही प्रश्न सुटेल. माझी नोकरी आहेच पण अनिलचा प्रस्ताव स्विकारला तर त्याचे आणि माझे भविष्यही सुरक्षित होईल. लोक काय म्हणतील हा प्रश्न गौण झाला मग माझ्यासाठी. हेच लोक माझ्या रिकाम्या गळ्याकडे पाहून चुकचूकत होती. संधी शोधत होते.. खोटी सहानुभूती दाखवत होते. आम्हा बायकांना सहावे इंद्रिय असते ना... लोकांच्या नजरा ओळखल्या रे मी.. सर्वांना मी हवी होती... फक्त मी.
मग अनिल च्या प्रस्तावाचा विचार केला. जे काही असेल ते इथेच.
सुख आणि सुरक्षित भविष्य..
अक्षर सुद्धा समजून घेईल हळू हळू.. बाबांच्या ठिकाणी काका..
अनघा काय बोलेल, अद्वैत काय बोलेल हे प्रश्न आले रे मनात.. पण शरीराच्या गरजेपुढे ते सर्व गौण ठरले. मी नाही रे आवरु शकले स्वतःला..
अनिल ने कबूल केलं मला आज आम्ही जातोय.. हे घर सोडून. तूला सुद्धा इथेच ठेवून...
तू माझा भूतकाळ होतास.. अनिल भविष्य आहे.. लग्न केलं तर लग्न.. नाही तर तसंच.. फक्त तूझे नाव घेऊन जातेय मी...
चंदनाचा हार घातलेल्या अनिकेतच्या फोटोला अक्षर ला नमस्कार करायला सांगून.. अर्चनाने बॅग भरायला सुरुवात केली...
...................................
तिची घुसमट मला समजत होती. सठ्ठावीसाव्या वर्षी वैधव्य येणे ही फार वाईट गोष्ट होती. अर्चना सुंदर आहे... यात काही संशय नाही. अनघा आणि माझा प्रेमविवाह, पण अनिकेतच्या अचानक जाण्याने आमच्या कुटूंबात भरपूर उलथा पालथ झाली. मी अनिकेतच्या सरणावर कबूल केलं की अर्चना आणि अक्षरला कधीही अंतर देणार नाही....
तेव्हा अजिबात वाटलं नाही की परिस्थिती अशी येईल.
एका क्षणी तिच्याबद्दल जी भावना उचंबळून आली ती मी रोखू शकलो नाही हीच माझी चुक. अक्षरची जबाबदारी मी घ्यायला तयार होतो, पण अर्चनाची संपूर्ण जबाबदारी कशी आणि कोणत्या नात्याने घेणार. लोक काय.. बोलणारे बोलतील. मला त्यांची चिंता कधीच नव्हती.
पण ज्या क्षणी अनघाने आम्हाला एकत्र पाहीलं तो क्षण नसता आला तरच बरे झाले असते. मी पर्याय ठेवला अनघा समोर पण तो तिने धुडकावला. अर्चनाला शरीरसुख हवे होते त्याचबरोबर मानसिक स्थैर्य आणि आधाराची गरज होती. इतर कोणात शोधला असता तर कुटूंबावर डाग लागला असता किंवा फसवणूक तरी झाली असती.
माझ्यामते मी दिलेला पर्याय अजिबात चुकीचा नव्हता. घरातली गोष्ट घरातच राहीली असती.
अनघाचा त्रागा समजण्यासारखा होता.. पण त्याला काही अर्थ नव्हता. तिने जरा विचार केला असता तर... हे जे होतंय ते झाले नसते. अद्वैत ला समजावणे जरा कठीणच होणार आहे. "बाबा काकीसोबत का गेले " या प्रश्नाचे उत्तर अनघालाच द्यायचे होते. अद्वैत काय आणि अक्षर काय दोन्ही आमच्या घराचे वारस...
जबाबदारी अजिबात नाकारत नाही मी..
ना अनघाची... ना अद्वैतची... मी फक्त साथ देतोय.. अर्चनाला... अक्षरला..
अनिकेत मी तुझा विश्वासघात नाही केलाय.. तू अर्धवट टाकलेली जबाबदारी उचलतोय..
खिडकीकडे तोंड करुन बसलेल्या अनघा कडे आणि रडत असलेल्या अद्वैत कडे एकवार बघून अनिल बॅग घ्यायला खाली वाकला.
...............................
काय होती माझी चुक??
सांग ना रे.. मला हे असे आयुष्य देऊन कसा सुखी राहशील तू.. अनिल?
तुझ्यावर विश्वास टाकून, घरातल्या लोकांचा विरोध पत्करुन मी तुझ्यासोबत लग्न करुन या घरात आले. अर्चना अनिकेतची होती.. माझ्यानंतर आली.. मी नसेन तिच्या इतकी सुंदर. पण ती तुझ्या दिवंगत भावाची बायको आहे हे सुद्धा विसरलास..
आणि मी कुठे कमी पडले रे तुला? सौंदर्य ही सहवासाची परिभाषा कधीही नव्हती तूझी. आपण दहा वर्ष एकत्र काढली रे.. कधीतरी मी नाही म्हटले का तुला.. भावना दाबल्या जातात.. इच्छा असली की सर्व शक्य होते रे.. निदान अद्वैतचा तरी विचार करायचा. त्याने तुम्हा दोघांना एकत्र बघीतल्यापासून त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता देता मी हरलेय रे...
आणि माझे तरी काय चुकले?
माझ्या समोर तुम्ही माझ्याच संसारावर वरवंटा फिरवणार?
घरातली मोठी सून म्हणून मला जे हक्क आहेत ते मी कधीही सोडणार नाही. आणि सोडावे तरी का? तू माझ्याशी प्रतारणा केलीस.. मी नाही.. मी सांभाळेन अद्वैतला, तेवढी मी नक्कीच सशक्त आहे.. तुझे बाबा माझ्यासोबत आहेत..
तू म्हणतोस एकत्र राहू.. दुहेरी संसार करु.. तिची जबाबदारी घ्यायला माझी ना नव्हतीच.. पण शारीरिक सुखासाठी जे तुमचं चाललंय ते मला कधीही मान्य नाही.
जा तुम्ही.. माझ्या नजरेसमोरच नको तुम्ही आणि तूमचे वासनेवर बेतलेले नाते.. निभावायला तूम्ही दुसरे घर बघा.
रडणाऱ्या अद्वैतचा हात अजून घट्ट पकडून.. खिडकीबाहेर बघत, अनघा दूर दूर जाणाऱ्या पदरवांना ऐकत राहीली.
- बिझ सं जय ( ३० नोव्हेंबर, २०१६)

Saturday, 26 November 2016

जन्टलमॅन

.... जन्टलमॅन....


मी नुकतीच कॉलेजला जायला सुरुवात केली होती.  एक तर मराठी शाळेतून, एकदम इंग्रजी वातावरणात गेल्याने आधीच सगळीकडे गोंधळ होतो.  त्यातही माझ्या सोबत माझ्या शाळेतला, क्लासेस मधला एकही विद्यार्थी, मित्र असा कोणी नव्हता.
हिंदूजा कॉलेज तसे महागडे म्हणून आमच्या बरोबरच्या मित्रांनी ते टाळलेच. मी दोनच कॉलेजचे फॉर्म आणल्याने आणि त्यातही दुसर्‍या कॉलेजच्या लिस्ट मध्ये नाव येईल अशी सुतराम शक्यता नाही हे जाणवले तेव्हा लगेच हिंदूजाला अॅडमिशन घेऊन टाकली.
साधारण महीना झाला असेल. मित्र - मैत्रीण जमण्याचे सोडा.  साधे बोलणे सुद्धा जमायचे नाही.  प्राध्यापकांनी प्रश्न विचारला की..  उत्तर न देता खाली बसणे अविरत सुरु होते.
त्यातही कोणी इंग्रजीत बोलायला आले की मी सरळ मराठीत बोलायला सुरु करायचो..  मग मांडवली होऊन हिंदीतून संभाषण व्हायचे.
हिंदूजा चर्नीरोड च्या त्या टोकाला आणि माझे घर या टोकाला.  त्यामुळे चालत जाणे किंवा मग सायकल चालवत नेणे हेच बेस्ट होतं.
अशाच एका दिवशी कॉलेज संपल्यावर, नेहमीप्रमाणे महर्षी कर्वे रोड वरुन घरी परतताना स्टेशननंतर एक मशीद आहे अगदी तिच्या समोर एकाने मला थांबवले.
" एक्सक्युज मी..  विल यू प्लीज हेल्प मी? "
अचानक असं कोणी थांबवल्यामुळे मी क्षणभर गांगरुन गेलो.
आधीच इंग्रजी सोबत वाकडं त्यात हा मनुष्य माझ्यासोबत फ्ल्युएंट इंग्रजीत बोलतोय म्हटल्यावर..
" यस,  या.. या... ओके, थँक्यू, सॉरी एवढंच काय ते इंग्रजी व्यवस्थित बोलू शकणारा मी गडबडलोच.
तो बोलत होता..  इंग्रजी बोलता येत नसलं तरी समजत होतं.  त्याचाच अनूवाद करुन सांगतो...  हो..  आताही नाही जमत तेवढे 😂
" नमस्कार,  मला तुमची थोडी मदत हवीय.  मी मंत्रालयात कामाला आलेलो.  पण तिथे कोणीतरी माझे पाकीट मारलं.  मी तिथून चालत इथपर्यंत पोहचलोय.  मला ओशिवराला जायचंच. तिथे माझी पत्नी हॉस्पिटलला आहे.  प्लीज माझी थोडी मदत करु शकाल का?  फक्त बसच्या तिकीटापुरते पैसे द्या.
माझे काम झाले की मी स्वतः येऊन तुमच्या घरी येऊन पैसे देईन."
मी त्याच्यावरुन नजर फिरवली.

चांगला साडेपाच सहा फुट उंच माणूस,  व्यवस्थित कडक इस्त्रीचा शर्ट इन केलेला, डोळ्याला गोल्डन फ्रेमचा चष्मा, अर्धवट पांढरी फ्रेंच कट दाढी,  हातात टाईम्स ऑफ इंडिया चा कोरा करकरीत पेपर,  पायात चमकणारे शुज.  खरोखरच तो एखादा सरकारी कर्मचारी वगैरे किंवा ऑफिसर वगैरे असावा असे वाटत होते.
त्यावेळी खिशात फारसे पैसे असायचे असेही नाही.  दर शनिवारी पॉकेटमनी म्हणून मिळणारे पन्नास रुपये साठवून साठवून फार फार तर शंभर - दिडशे रुपये खिशात असायचे.
त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर खरोखरच अगतिकता दिसत होती.
मी विचारले..
" किती लागतील? "
"बसच्या तिकीटापुरते..  पंधरा वीस रुपये चालतील. " तो शांतपणे बोलला.
मला अचानक स्वतः  देवदूत असल्याचा भास झाला.  एका गरजू व्यक्तीच्या मदतीला धावून जाणारा देवदूत.

खिशातून वीस रुपये काढले आणि त्याच्या हातात दिले..
" थँक्यू, सो मच..  या पेपरावर तुमचे नाव आणि पत्ता लिहा..  मी उद्या किंवा परवा तुमचे पैसे परत आणून देईन.  " त्याने कोरा करकरीत टाईम्स ऑफ इंडिया माझ्या समोर केला.
" त्याची काही गरज नाही.. असू दे..  असू दे.  " माझ्या डोक्यावर चमकणारी चक्र वाढत चालली होती.

" नाही..  असं कसं..  लिहा तुमचे नाव आणि पत्ता मी पैसे आणून देईन. " त्याने विनवणीच्या सुरात सांगितले.
" ठिक आहे..  " म्हणून मी त्याने पुढे केलेल्या पेपरावर माझे नाव.. आणि पत्ता लिहिला.
" खुप खुप उपकार झाले.. तुमचे.  " म्हणत त्याने माझ्यासमोर हात जोडले.
तो घाईघाईत बसस्टॉपकडे निघाला.
मी सुद्धा डोक्यावर फिरणारी अदृश्य  सोनेरी चमचमती चक्र घेऊन घरी गेलो.  घरी गेल्यावर आईला ही गोष्ट सांगितली.
आईने कौतूक केलं..  अशी चांगली कामे करत रहा, नेहमी असे सांगितले.
त्यानंतर दोन तीन दिवस गेले..
ती व्यक्ती घरी आली नाही.
वीस रुपये काही एवढी मोठी रक्कम नव्हती. मी विचार करु लागलो की, त्याची बायको आजारी होती..  हॉस्पिटलला होती..  कदाचित तिचे काही बरे वाईट झाले असेल..
काही दिवसांनी मी ही गोष्ट विसरुनही गेलो..
पुढे साधारण दोन वर्षांनी.. मी लालबागला काळाचौकीच्या एका कॉम्प्युटर इन्स्टीट्युट मध्ये कॉलेज सुटल्यावर  कोर्स करत होता.  हातात सायकल असल्याने नेहमी सायकल वरच जायचो तिकडे.
अशाच एका दिवशी मराठा मंदीर समोरुन जात असताना एका व्यक्तिने हात केला.  मी सायकल थांबवली.
" एक्सक्युज मी..  विल यू प्लीज हेल्प मी? "

अचानक " देजा वू " चा अनुभव आल्यासारखे जाणवू लागलं..
पुन्हा तेच.
हातात कोरा करकरीत पेपर,  कडक इस्त्रीचा शर्ट,  फ्रेंचकट दाढी..
हे कुठेतरी  पाहिल्यासारखं, अनुभवल्यासारखं आठवायला लागलं.
मी काही न बोलता..
पॅडल मारले...

पुढे जाऊन आठवू लागलो कुठे..  कुठे पाहिलंय याला?  तो आवाज कुठे ऐकलाय?

अचानक तो प्रसंग आठवला.
अरे हो..  हा तोच माणूस..  ज्याला मी वीस रुपये दिलेले.  ज्याची बायको आजारी होती..

मी इन्स्टीट्युटमध्ये पोहचलो तेव्हा तिथल्या आरशात माझ्या डोक्यावर दोन लांब कान आणि तोंड गाढवाप्रमाणे होत आहे असं दिसू लागलं. नंतर मग स्वतःचेच हसायला आलं..

घरी जाऊन ती गोष्ट आईला सांगितली..
ती सुद्धा हसली आणि म्हणाली..
" जाऊ दे..  तू मदत म्हणूनच पैसे दिलेस ना?  मग झालं तर.. "

त्यावेळी आमच्याकडे महाराष्ट्र टाइम्स यायचा.  त्यात वाचकांची पत्र हा भाग असायचा बहुतेक.  अशाच एका सकाळी त्यातल्या एका पत्रात लिहिले होते ते वाचून मला धक्काच बसला.

पत्रात लिहिलेला मजकूर साधारणपणे असा होता..

.. आमच्या शेजारी एक गृहस्थ राहतात. पुर्वी चांगले कामाला होते.  परंतू दारुच्या व्यसनामुळे त्यांची नोकरी गेली.  नंतर मग त्यांनी घरातच चोरी करायला सुरुवात केली.  मुलाच्या - सुनेच्या पाकीटातून, कपाटातून पैसे चोरायचे.  घरी हे लक्षात आल्यावर मुला-सुनांनी पैसे लपवून ठेवायचा सुरुवात केली.  मग ते गृहस्थ जास्त वेळ घराबाहेरच राहू लागले.  सकाळी व्यवस्थित ऑफिस ला जाताहेत असे कपडे घालून जात, मात्र संध्याकाळी येताना भरपूर दारु पिऊन येत आणि शांत झोपत. घरातले सर्व आश्चर्य करतच होते की एवढी दारु प्यायला यांच्याकडे पैसे कोठून येतात?
नेमके मला काल ते ग्राँट रोड एका बस स्टॉपजवळ मला ते दिसले.
एका व्यक्तीबरोबर ते बोलत होते.  मी जवळ जाऊन ते काय बोलताहेत ते ऐकलं.
ते दुसर्‍या व्यक्तीला मदतीची याचना करत होते.  बायको आजारी असून हॉस्पिटलला आहे,  माझे पाकीट मारले, मला बसच्या तिकीटापुरते पैसे द्या, मी तुमचे पैसे घरी येऊन परत करेन.  त्यांच्याकडे पाहून म्हणजे त्यांच्या व्यवस्थितपणा कडे पाहून आणि इंग्रजी बोलण्याच्या लकबीमुळे लगेच फसून पैसे देत होते.  मी तिथे जाऊन त्यांना खडसावले तर ते तिथून पळून गेले.
या परिसरातल्या लोकांना आवाहन आहे की असे कोणी गृहस्थ दिसले तर पैसे देऊ नका.  "

म्हणजे...
मी दिलेले पैसे दारुवर खर्च झाले होते...

मी तर त्याला जन्टलमॅन समजून पैसे दिले होते.
- बिझ सं जय ( २७ नोव्हेंबर, २०१६)  

Thursday, 24 November 2016

.... इन्कमटॅक्सवाला....

.... इन्कमटॅक्सवाला...
बरोबर साडे सहा वाजता दुकानातला फोन खणाणला..
संध्याकाळी साडे सहा ला फोन म्हणजे एकतर मार्केट मधून ऑर्डरसाठी किंवा फार फार घरुन " अहो.. येताना त्या म्हाताऱ्या भाजीवालीकडून एक किलो कोबी घेऊन या " असा गृहमंत्र्यांचा आदेश एवढंच शक्य.
रिसीव्हर उचलून कानाला लावला..
"हॅलो" बोलताच समोरुन जे ऐकलं ते ऐकून क्षणभर घामच फुटला.
समोरुन एक भारदस्त आवाजाचा धनी असलेली व्यक्ती बोलत होती..
" हॅलो, बिझ सं जय का ? मी इन्कमटॅक्स मधून बोलतोय "
सर्वसामान्य लोकांना, छोट्या व्यावसायिकांना इन्कमटॅक्स वाले म्हटलं की आपोआपच घाम फुटतो हे मी ऐकून होतो. आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो.
मनातल्या मनात भरतभाय ला ( आमचा सीए.. हो) शिव्या देत.. काय गोंधळ घालून ठेवला आता याने?
तरी सगळी परचेस, सेल्स बीलं, करंट सेविंग चे डिटेल्स वेजेस ची चलनं, मी याला बरोबर दिली होती तरीही फोन कसा आला?...
असा विचार करत शक्य तितका संयम ठेवत बोललो...
" नमस्कार बोला साहेब बिझ सं जयच बोलतोय " एवढं बोलताना सुद्धा खिशातून रुमाल काढून पाच नंबर च्या स्पीड ने पळणाऱ्या पंख्याखाली कपाळावरुन येणारा घाम पुसला.
" मी सावर्डेकर बोलतोय, इन्कमटॅक्स मधून तुमची फाईल माझ्या टेबलावर आहे. "
बापरे....या भरतभायच्या तर आता... काम करतो की हजामती.. क्षणभर वाटलं.. त्याची सीए ची पदवी बघायला हवी होती..
" हाँ.. साहेब, काही गडबड झाली का? " रुमाल कपाळावर आणि पंखा छतावर एकाच स्पीडने फिरत होते.
" नाही.. नाही सं जय साहेब गडबड काही नाही तुमच्याकडून टॅक्स जास्त भरला गेलाय, त्याच्या परताव्याची मागणी तुमच्याकडून आहे. माझ्या समोर तुमचा चेक पाकीटात तयार आहे. "
अचानक पंखा एअरकंडीशनर पेक्षा गार वारा फेकू लागला. कपाळावरचे शेवटचे घर्मबींदू ओल्याचिंब झालेल्या रुमालाने पुसत मी सुस्कारा सोडला.
इतक्यात समोरुन सावर्डेकर साहेब बोलले.. " पण सं जय साहेब अडचण अशी आहे की आज हे पाकीट मला पोस्ट करायचे होते, परंतू भुलचुकीने मी ते पोस्ट करायचे विसरलोय. आता त्यावरचा पत्ता वाचला तर लक्षात आलं की आपले ऑफिस माझ्या घरच्या मार्गातच आहे. तरी मी प्रत्यक्ष येऊन ते पाकीट तुम्हाला देऊन, ते मिळाल्याची सही घेऊ शकतो का? "
अरे व्वा.. विनंती..
" हो हो.. काही हरकत नाही साहेब. यू आर मोस्ट वेल्कम. " मी हसत हसत बोललो.
साहेबांनी फोन ठेवला.
मी आपल्या नेहमीच्या कामात गर्क झालो. घड्याळात बरोबर सव्वा सात वाजले तेव्हा एक धिप्पाड गृहस्थ दुकानाच्या दरवाजातून आत येताना दिसले.
मी लगेच अंदाज बांधला की हे सावर्डेकर साहेबच असणार.
त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे माझी हसतमुख स्माईल फेकत म्हणालो...
" या या सावर्डेकर साहेब.. या बसा. "
माझ्या या शब्दांनी त्यांचीही कळी खुलली.
" जनरली इन्कमटॅक्सवाल्यांना या.. या.. असे बोलणारे फार कमी लोक असतात. पण खरं सांगू या भागात आपल्या मराठी माणसाचे एवढे चांगले आणि त्यातही चांगली उलाढाल असलेले दुकान आहे हे पाहून बरं वाटलं. " सावर्डेकर खुशीत बोलत होते.
" बाकी गप्पा नंतर होतील हो.. बोला साहेब चहा कॉफी की कोल्ड्रिंक मागवू? " तसा आदरातिथ्यात मी कधीच कमी पडत नाही.
" खरं तर नकोच सांगणार होतो. पण मी सुद्धा आमच्या अधिकारी मित्रांना सांगेन की, एका मराठी व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन कोल्ड्रिंक पिऊन आलो.. खरंच सं जय साहेब या व्यवसायात मराठी माणसे नाहीतच. सगळे परप्रांतीय. " सावर्डेकरांच्या कपाळावर बारीकशी आठी होती.
मी दुकानातल्या माणसाला कोल्ड्रिंक आणायला पाठवले आणि त्यांना म्हणालो..
" खरं आहे. या कामात मेहनत खुप आणि कमाई नगण्य त्यामुळे मराठी लोक फारसे नाहीत.. परप्रांतीयांना जमतं, त्यांना कामाशी मतलब.. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात येतात.. " मी कामाची अवस्था मांडली.
सावर्डेकरांनी त्यांच्या बॅगेतून खाकी पाकीट काढलं. ते माझ्या हातात सोपवताना म्हणाले..
" हे बघा तुमचे पाकीट.. आत चेक आहे. या रिसीट वर सही करा.. आणि मी इतके तीन मजले चढून वाट वाकडी करुन आलो तर माझ्याकडे सुद्धा बघा जरा.. "

ओ... त्तेरी..
असं आहे तर...
तेज्यामायला सावर्डेकर थोडक्यात दिवाळी साठी आला होता..
क्षणभर राग आला..
पण नंतर विचार केला..
काय होतंय थोडे दिले तर.. पुढे मागे ओळख राहील.
म्हणून एका पाकीटात एक नोट सरकवून त्यांच्या हाती सोपवली.
आता ऑफिसर लेवलचा माणूस म्हणजे हिरवी नोट थोडी ना चालणार?
म्हणून पिवळी नोट दिली.
समोर असलेल्या कोल्ड्रिंकमध्ये स्ट्रॉ टाकून सावर्डेकरांनी ते दोन मिनीटांतच संपवले.
हातातले पाकीट खिशात टाकून..
" धन्यवाद साहेब..
येतो मी आता ७.५२ ची ट्रेन पकडायची घाई आहे. पुन्हा कधी या बाजूला आलो की नक्की तुमची भेट घ्यायला. "
असे म्हणून ते निघाले.
मी त्यांना दरवाजापर्यंत निरोप द्यायला गेलो.
पुन्हा येऊन इन्कमटॅक्स मधून प्रत्यक्ष अधिकाऱ्याने दिलेला परताव्याचा चेक कीती रकमेचा आहे ते बघायची मला घाई होती.
अलगद पाकीट फोडले.
आतल्या चेक वरची रक्कम बघून माझ्या डोळे विस्फारलेलेच राहीले.
लगेच फोन उचलला आणि भरतभायला फोन केला...
" भरतभाय आप ये इन्कमटॅक्स का रिफंड मंगाया मत करो.. कॅरी फॉरवर्ड होने दो...
मी चेकवरच्या हसणाऱ्या सुंदर अक्षरांकडे बघत बोललो..
चेक वर लिहिलेलं..
.
.
.
" Rupees Two Only "
😁😁😁😁😁
- टॅक्स पेयर : बिझ सं जय

Saturday, 19 November 2016

दहावा दिवस..

आज दहावा दिवस..

कॉलेज संपल्यावर काकांच्या वशिल्यावर एका बुकस्टोअर मध्ये दहा हजाराच्या नोकरीला लागून आज बरोबर दहा दिवस झाले.
कॉलेजचे शिक्षण पुर्ण झाले की एखादा पार्टटाइम जॉब करायचा आणि संध्याकाळी कॉम्पुटरचा इंजिनियरींगचा डिप्लोमा करायचा हे मी ठरवलंच होतं.
डिप्लोमाचा खर्च सुद्धा माझ्या पगारातूनच भागला जाईल अशी नोकरी मी शोधत असतानाच,  काकांनी मला फोन केला..
"  संतोष एक नोकरी आहे सकाळी ११ ते संध्याकाळी ६,  पगार नऊ दहा देतील. करशील का? बुक स्टोअर आहे..आलेल्या गिऱ्हाईकाला पुस्तकं दाखवायची,  थोडी पुस्तकाबद्दल माहीतीही सांगायची,  शिवाय इतर इनवर्डस् - आऊटवर्डस् बघायचे.  क्वचितच बिलींग करायचे.  "

आपण तर बुवा जाम खुश..
एक तर वाचनाची आवड आणि त्यात बुक स्टोअरमध्येच नोकरी म्हणजे सोन्याहुन पिवळं..
लगेच होकार कळवला.
आईने तर लगेच पेढे आणून चाळीभर वाटले.  सर्वांनीच कौतूक केले होते त्यादिवशी. एक छोटेखानी पार्टी सुद्धा झाली,  आम्हा चाळकरी मित्र मंडळाची.
सर्व मित्र होते.  सुर्या, अमोल, केदार सुधीर, चिन्मय सर्वांसोबत तो आनंद साजरा केला होता.
आणि पहिला दिवस उगवला..
स्टोअर मध्ये गेल्या गेल्या सरांनी दोन जोडी कपडे दिले..  आणि म्हणाले
" सो... संतोष..  तुझा बायोडेटा वाचला मी,  चांगले मार्क मिळवलेस की बीकॉमला,  मग पुढे का शिकत नाहीस? नोकरी करुन सुद्धा तुझ्याकडे पुरेसा वेळ आहे अभ्यास करायला.  तुझ्या काकांनी शब्द दिला म्हणून तूला नोकरी देतोय.  सर्व पगार अकाउंट मध्ये जमा होणार... आणि हो,
 कामावर असताना हेच कपडे घालायचे..  बाकी कामाचे स्वरुप तुला शरद समजावून सांगेल,  ते नीट समजून घे." असं म्हणून ते कॉम्प्युटरमध्ये पाहू लागले.
काकांनी शरद शी ओळख करुन दिली.  शरद माझ्यापेक्षा मोठा होता..  पाच सहा वर्ष..  पण अगदी हुशार.  पुस्तक कशी लावायची,  क्रम कसा ठेवायचा,  एखादे पुस्तक कोणत्या शेल्फवर आहे हे कॉम्पुटरमधून कसे शोधायचे हे फार सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं.  माझे शिक्षण जास्त असले तरी त्याचा अनुभव आणि हुशारी माझ्यापेक्षा निश्चितच जास्त होती.
तीन चार दिवसातच मी प्रत्यक्ष गिऱ्हाईकांच्या सामोरी गेलो.  पहिल्याच गिऱ्हाईकाने साडे तीन हजाराची पुस्तकं घेतली, हे माझ्यासाठी खुप मोठं होतं.  कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेयरमध्ये त्या बिलावर सेल्समन म्हणून स्वतःचे नाव बघण्याचा आनंद काही औरच होता.  गिऱ्हाईक नसेल तेव्हा हवं ते पुस्तक वाचायला परवानगी होतीच. शरद सुद्धा वाचायचा.
सहाव्या दिवशी स्टोअर चे शटर डाऊन केल्यावर थेट कॉम्प्युटर अकादमी गाठली.  डिप्लोमाची बॅच सुरु व्हायला अजून दोन महिने होते, परंतू फॉर्म भरणे, बॅच ठरवणे वगैरे आधी करणे गरजेचे होते.
फी चा चेक आठ दिवस आधी दिला तरी चालण्यासारखं होतं.

डिप्लोमा मिळाल्यावर मोठी नोकरी..  जास्त पगार..  खुप सारी स्वप्न होती..  पहिल्या पगारातून आई ला साडी..  बाबांसाठी घड्याळ घ्यायचे. अशातच तो दहावा दिवस उगवला...
सकाळी नेहमीप्रमाणे साडे दहाला दुकानाबाहेर उभा होतो तर समोरच्या फुटपाथवर अमोलचा मोठा भाऊ आनंददादा दिसला.
आनंददादा बीएमसीत कामाला.
त्याला हाक मारली तशी त्याने मला तिकडे बोलावून घेतलं. मी धावतच रस्ता क्रॉस केला.
" काय आनंददादा? काय करताय इकडे आज?  "
आनंददादाच्या सोबतीची माणसे फुटपाथवरच्या मोठ्या झाडावर चढायच्या तयारीत होते.
" अरे नेहमीचेच काम..  पावसाळा आला की झाडांची छाटणी करायचे.. आता आठ दहा दिवस हेच काम. ते सोड..  काय म्हणत्येय नोकरी?  त्या समोरच्या बुकस्टोअर मध्येच काम करतोस ना तू? "

" हो अरे..  छान आहे काम..  शिवाय भरपूर वेळ मिळतो बाकी अभ्यास वगैरे करायला " मी हसत हसत म्हणालो.
इतक्यात वर चढलेल्या सहकाऱ्याने आनंददादाला हाक मारली म्हणून मी तिथून काढता पाय घेतला.
सर आलेच होते.  त्यांच्याकडून चावी घेऊन शटर उघडले.
" संतोष..  तो तुझ्या ओळखीचा आहे का रे?  " मागून सरांचा आवाज आला.
" हो सर,  आमच्या चाळीतला आहे आनंददादा.. " मी आनंदाने सांगितले.
" जा जावून त्याला सांग की मी दोन मिनीटे बोलावलंय " सरांनी हुकूम सोडला.  कुलुप शरदच्या हातात देऊन मी तडक आनंददादाकडे गेलो.
" आनंददादा..  ऐक ना..
आमचे सर तुला बोलवताहेत.  काही तरी काम आहे बहुतेक " झाडावर चढलेल्या आनंददादाला खालून ओरडून सांगितले.

" आलो सांग त्यांना..  एकदा ही वरची फांदी तोडली की येतो. " वरुनच ओरडून त्याने सांगितले.
मी तसाच पुन्हा गेलो.
सरांना त्याचा निरोप कळवला.
दोन गिऱ्हाईके होती त्यांच्याकडे वेळ देत असताना दरवाजातून आनंददादा आला.
सर आणि त्यांचे बोलणे सुरु होते.  मी गिऱ्हाईक पटवून त्यांच्याजवळ येऊन उभा राहीलो.
सर बोलत होते.
" अरे याला सुद्धा घ्या की मदतीला. लोकांना अडवेल की तो. " आणि दोघेही हसले.

" चल रे संतोष...  तुमच्या बिल्डिंगसमोरच्या झाडावरची फांदी तोडायची आहे. .  तू फक्त लोकांना थांबव.  " आनंददादा बोलला.

" बास ना..  चल की मग. " मी सुद्धा हसलो.
दुकानासमोरचे झाड भरपूरच उंच वाढले होते.  त्याची एक फांदी आमच्या दुकानाच्या बिल्डिंग मध्येच घुसली होती जणू.
आनंददादाशी बोलत असताना समजले की मागच्या महिन्यात त्या फांदीवरुन चोरी करुन चोर पळाले होते आमच्या स्टोअर मधून.  म्हणून ती कापायची विनंती सरांनी त्याला केली होती..
मला फक्त लोकांना बाजू करायचे होते.  फुटपाथवर दोन्ही बाजूला दोरी बांधली आणि मी फुटपाथच्या अलीकडे उभा राहून लोकांना " काम चालू आहे.  बाजूने जा " अशा सुचना देऊ लागलो.
आनंददादा आणि त्याचा सहकारी झटपट झाडावर चढले.  फांदी मोठी होती म्हणून आधी तिची सर्व पाने छाटली.  आणि मग खोडापासून तोडायला सुरुवात केली.  मी खाली लोकांना अडवत होतो.  लोक सुद्धा असे,  उगाच चीरचीर करत होते.
" ही काम रात्री नाही का रे करता येत?  फुकटचा त्रास कशाला देता लोकांना?  "
मी शांतपणे..  काका मामा करत त्यांना बाजूने जायला सांगत होतो.
जरा वेळाने आनंददादाने वरुन हाक मारली..
" संतोष..  बघ आता कोणाला येऊन देऊ नको.  फांदी मोडायला आली.  उगाच नको तो ताप व्हायचा डोक्याला.  "

" हो दादा..  नाही कोणी येणारे दिसत.  "
मी दोन्ही बाजूला नजर टाकली..  तोच समोरच्या बाजूने एक शाळेतली मुलगी रस्ता ओलांडून फुटपाथच्या मार्गाने येताना दिसली..
तिला थांबवायला म्हणून दोरीच्या आत उडी मारली..
" ए..  थांब थांब..  पुढे नको येऊस.. "
इतक्यात फांदी तुटल्याचा काड् काड् आवाज आला.  वर बघितले तर ती फांदी पडत होती.
पण ती मध्येच अचानक थांबली.. क्षणभरच..  आणि मग झरझरत खाली आली.  पण अचानक माझ्या लक्षात आलं की फांदी थांबली ती एका वायरला अडकली होती आणि ती सुटली कारण वायर बिल्डिंगच्या गच्चीवरच्या कठड्यावर गुंडाळून ठेवलेली होती... जोर पडल्याने, जुना कठडा झटका मिळून...तुटून सरळ माझ्याच दिशेने येत होता...

" संतोष..  अरे बाजूला हो.. "
आनंददादाचा आवाज ऐकतच खाली कोसळलो.


बातमी होती...
गिरगावात बिल्डिंगचा एक भाग कोसळून एका युवकाचा मृत्यु..

- बिझ सं जय ( १९ नोव्हेंबर, २०१६)

Thursday, 10 November 2016

एकुलता एक

.... एकुलता एक  ....


" ए...  बाळा...  लागला का रे काही पत्ता दत्तूचा? " म्हाताऱ्या जनीबाई ने कसा बसा फोन कानाला लावत समोर मुंबईला असणाऱ्या बाळारामला विचारले.

" आत्त्ये,  नाही अजून तरी नाही, मी काढतोय माहीती. रविवारी दिसला होता तेवढाच, नंतर गायबच झालाय.  फोन सुद्धा बंद येतोय त्याचा.  मी कळवतो तुला.  आज पोलिसांनी बोलावलेय जेजे ला. लागला पत्ता तर सांगेन कुंदाकडे फोन करुन " एवढे बोलून त्याने फोन ठेवून दिला.

जनीबाईने फाटक्या पदराने डोळे पुसले आणि ती कुंदेच्या घरुन निघाली, तेवढ्यात मागून कुंदाने हाक मारली.
" आत्ये.  का एवढी काळजी करतेस.  इथून भांडून गेल्यावर एकदा तरी आलाय का दत्तू इकडे?  तुला टाकूनच दिलंय त्याने.  म्हातारी जिवंत आहे की मेलीय हे तरी माहीत आहे का त्याला?  " कुंदा जरा चिडूनच बोलत होती.

" हो गं कुंदे...  पण शेवटी तो माझा एकुलता एक मुलगा आहे गं..  तो विसरला तरी मी विसरणार आहे का?  " जनीबाई आढ्याकडे पाहत म्हणाली.

" आत्ये,  तू नाही सुधारणार, दत्तू  कंबरेत लाथ घालून गेला तेव्हाही तू अशीच होतीस. तुला सांगून काही फरक नाही,  जा तू आता घरी,  जेवण घेऊन येते मी  " कुंदा चरफडत होती.
जनीबाई हळू हळू काठी टेकत घराच्या पायऱ्या उतरुन स्वतःच्या घरी गेली.
घरी जाऊन तिने मोडका दरवाजा बंद केला आणि इतका वेळ दाबून ठेवलेले रडू फुटले. तिला 'तो' दिवस आठवायला लागला.

दत्तू त्यादिवशी भरपूर पिऊन आला होता. आल्या आल्या त्याने दरवाजावरच लाथ मारली,  घाणेरडी शिवी देत म्हणाला...
" आये...  तू अंगठा देणार की नाही?  मी लास्ट टाईम विचारतोय तुला,  तो दलाल मला म्हणाला की नसेल विकायची तर बयाना परत दे. " त्याच्या डोळ्यात अंगार होता.

" ए बाळा..  तू राग नको करु रे..
सर्व जमिनी विकल्या तर उद्या खायचं काय रे?  आधीच त्या जमिनी कशा बशा सोडवल्या होत्या तुझ्या बाबांनी सावकारांकडून. ते गेले आणि तू एक एक करुन या दारुच्या नादात विकायला लागलास,  ही शेवटची आहे..  कुंदाला अर्धेलीवर दिलीय म्हणून घरात अन्न तरी येतंय,  तू तर काही कमवत नाहीस,  मजूरी करतोयस ती सुद्धा दारुवरच संपवतोस तू.  मी नाही देणार अंगठा वगैरे " जनीबाई निर्वाणीच्या सुरात बोलली.

तिचा तो सूर ऐकून याची दारु आणखीनच चढली.  दलालाला पन्नास हजार कुठून द्यायचे याची चिंता त्याच्यातला जनावर बाहेर काढत होते.
काय करु..  काय करु...  असा विचार करुन काही न सुचल्याने  त्याने समोर असलेल्या मडक्याला लाथ मारली.  मातीच मडकं फुटलं.  घरभर पाणी झालं.

" ए बाळा काय करतो रे. का म्हणून नुकसान करतो? वेडा झालास का?   " घाबरलेली जनीबाई पटकन बोलली.

" म्हातारे...  मला वेडा म्हणतेस?  तिच्या आयला..  जमीन विक सांगतो तर अंगठा देत नाही.  वर माझ्यावरच आवाज.  मी जातो आता सोडून गाव.  तू बस त्या जमीनीवर अंडी उबवत.  "
एवढं बोलून त्याने पिशवी भरायला सुरुवात केली.

" बाळा नको रे असं करु..  कुठं जातोस आता?  तु गेल्यावर या म्हातारीने करायचं तरी काय?  अरे तू एकुलता एक मुलगा आहेस माझा. " रडत रडत जनीबाई त्याला समजावत होती.

आवाज ऐकून समोरच्याच घरातली कुंदा तिच्या दरवाज्यातून पाहू लागली.

पिशवी भरुन दत्तू निघाला तसा जनीबाईचा धीर सुटला.
तिने त्याला अडवायला त्याचे पाय धरले. परंतू डोक्यात दारुची नशा भिनलेल्या दत्तूने पटकन तिला सणसणीत लाथ घातली.
" जा मर तिकडे..  मी चाललो मुंबईला.  तिकडे काय पण करेन,  पुन्हा इकडे येणार नाही.  आज पासून तू मला मेलीस आणि मी तुला.  घेऊन बस ती जमीन उरावर ".
मागे न पाहता तो तसाच चालू पडला एसटी स्टँडच्या दिशेने.
इकडे कोलमडून पडलेल्या जनीबाईला सावरायला लगेच कुंदा धावत आली.

तो दिवस आणि आजचा दिवस....  इतक्या दिवसात गावातल्या लोकांकडूनच दत्तूची खबरबात कळत होती.
कोणी म्हणे दुकानात कामाला लागलाय,  तर कोणी म्हणे कपडा मार्केटला मजूरी करतोय,  कसा का होईना तो लांब असुनही तिची नजर त्याच्यावर लक्ष ठेवून होती.
शेवटची माहीती मिळाली तेव्हा दारुमुळे त्याला कोणीही काम देत नव्हते म्हणून त्याने पाटी वाल्याचे काम सुरु केलेलं. दहा वीस रुपयात लोकांचे सामान इकडून तिकडे नेण्याचे काम तो करत होता.  कुंदाचा नवरा बाळारामला तो अधून मधून दिसायचा मुंबादेवी मंदिर परिसरात.
तिथेच असलेल्या वडापावच्या गाडीवरचे वडापाव खाऊन,  दारु पिऊन फुटपाथच्या कडेला झोपत असे.

परंतू तीन दिवसांपुर्वी त्या घटनेनंतर त्याचा कुठेच पत्ता नव्हता.  बाळाराम त्याला शोधण्याचा पुर्ण प्रयत्न करत होता पण त्याला ही तो सापडत नव्हता.  त्याचा फोनही बंद येत होता.  आता फक्त वाट पाहणंच तिच्या नशिबात होते.

" आत्ते..  ह्यांचा फोन आलाय,  तुला बोलावलंय फोनवर.  ये लवकर.  " कुंदा लगबग करुन सांगून गेली.
ती नेहमीप्रमाणे बोलली नाही.  नजरेला नजर न मिळवता गेली सुद्धा झटदिशी.

काठी टेकत ती कुंदाच्या घरात पोहचली.  कानाला कसा बसा रिसीव्हर लावला...
समोरुन येणारे शब्द ती नुसतेच ऐकत होती.
बाळाराम समोरुन बोलायचा थांबला तसा तिने फोन ठेवला.
कुंदाने तोंडाला पदर लावला होता.
तिच्याकडे न पाहता तीने कपाटाला टेकलेली काठी घेतली आणि दरवाज्यातून बाहेर गेली.
कुंदा तिच्याकडे बघतच राहीली.  जनीबाईच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता.


आठ दिवसांनी तहसीलदार ऑफिसची गाडी जनीबाईंच्या घरासमोर उभी होती.  सोबत एक पोलिस व्हॅन,  आणि काही पत्रकार मंडळी.

एका न्युज चॅनेलचा पत्रकार कॅमेरासमोर उभा राहून बोलत होता.....

" मुंबादेवी मंदिरासमोरच्या बॉम्बस्फोटानंतर  तिसऱ्या दिवशी  मंदिरासमोरच्या इमारतीच्या गच्चीवर सापडलेला मृतदेह हा याच घरातल्या दत्ताराम पवार यांचा असून,  त्यांच्या घरी केवळ त्यांची म्हातारी आई श्रीमती जनीबाई पवार आहे.  तहसीलदार श्रीयुत पाटील यांनी लवकरात लवकर शासनाने बॉम्बस्फोटात मृत झालेल्या लोकांना सरकारने जाहीर केलेली रक्कम रुपये दहा लाख श्रीमती जनीबाई पवारांना देण्यात येईल असे सांगितले आहे. कॅमेरामन सुधांशू सोबत वार्ताहर संदीप..ग्रामीण महाराष्ट्र न्युज "

Sunday, 6 November 2016

वडापाव

.... वडापाव ....
" ए... झुरक्या...ये हिकडं.. ये... "
आवाज ऐकून मागे फिरलो. वडापाव - चहाच्या टपरीतून संत्या हाक मारत होता.
आता त्याने हाक मारली म्हणजे एक वडापाव आणि एक कटिंग चहा नक्की झाली माझी.
मी लगेच तिकडे गेलो. संत्याबरोबर खालच्या कोंडावरचा सुन्या आणि झिल्या सुद्धा होता. दोघेही हातात वडापाव घेऊन चहा फुरफुरत होते.
" काय मंग, आज काय काम हाय काय? " संत्याने विचारले.
" आंजून तरी नाय भेटला काम, तुज्याकडं हाय काय कोनता? " मी आशाळभूत नजरेने विचारले.
" होता... पन हे दोगा भेटली आता. पन तू मदतीला येतोस काय? अख्खी मंजरी नाय देनार पन पचास रुपये आनी दोन टाईम वडापाव मिलेल. शिवाय सांच्याला एक कारटर. बोल कबूल हाय? " संत्या तोंडातून बिडीचा धुर काढत बोलला.
" आरं पन काम काय हाय? " मी साशंकपणे विचारले, कारण पन्नास रुपये दोन टाईम वडापाव आणि वर क्वॉर्टर म्हणजे जरा जास्तच होतं.
" अरं काय नाही. पार्टीची सभा हाय. आमदार येनार हाय. तवा मंडप उभारायचा हाय. ही दोगा वर चडतील तू फकत् खालून बांबू वर दियाचे. फार फार तीन तासाचा काम हाय. बीगी बीगी हात चालवलाव तर अकराच्या आधी संपल सगला काम. " संत्याने चहा चा कप खाली ठेवला आणि खिशातून पैसे काढले.
" दुपारपर्यंत पैसे घेणार, नंतर वडापाव आनी चाय सर्वांना फ्री द्यायची हाय. अध्यक्षांनी स्पॉन्सर केलाय. सर्वांना वडापाव आनी चाय. मिटिंग ला येनाऱ्या सर्वांना ही व्यवस्था हाय. " चहावाल्या तुकारामने ही नविन बातमी पुरवली. हे म्हणजे सोने पे सुहागा वाली बात झाली.
" व्वा रं गड्या.. बोल कुठं करायचाय मंडाप? मी तयार एकदम " माझ्या आनंदाचा पारावारच नव्हता.
डोळ्यासमोर आजचा दिवस जबरदस्तच जाणार असंच दिसत होतं. पोटभर वडापाव.. पन्नास रुपये, वर क्वॉर्टर.. झाला की दिवस साजरा.
अचानक कशी का जाणे..
सुंद्री ची आठवण आली. काल सुद्धा तीने दिवसभर फक्त एकच वडापाव खाल्ला होता. तीचं एक बरं होतं, पोटात काही नसलं तरी एक मोटली घशात ओतली की ती शांतपणे झोपायची.
काल तर तिला दोन मोटल्या दिल्या होत्या. मस्त पिऊन झोपली होती. काल माझी दीडशे रुपये मजूरी आणि त्यावर तीन मोटल्या दारु, वर वडापाव असा भरगच्च ऐवज होता. पण नंदू सुताराची थकबाकी त्याने वसूल केली आणि हातात केवळ वीस रुपये राहीले.
तिने दोन वडापाव खाल्ले आणि पिऊन झोपली होती.
तिची आठवण यायला आणि ती यायला एकच वेळ. तिला पटकन जाऊन फुकटच्या वडापावची बातमी सांगितली. ती खुशच झाली.
" मी हिथेच बसून ऱ्हाते. वडापाव सुरु झाला की मना बोलवा. " असं बोलून ती तिथे ठेवलेल्या बाकड्यावर जाऊन बसली.
एरवी त्या बाकड्यावर आम्हाला बसू दिलं नसतं पण आज कामच तिथे सुरु होते मग नाही म्हणायला होतंच कोण?
काम नव्हतंच तसं फार. बारा पर्यंत मंडप पुर्ण झाला. फुकटची चाय आणि दोन वडापाव... एक सुंद्रीला दिला. आता सभा संपली की, मंडप मोडला की मजूरी आणि क्वॉर्टर मिळणार. तोवर संत्याने झिल्याच्या मेहेरबानीने मिळालेली एक मोटली दोघांनी अर्धी अर्धी घेतली.
सभा सुरु झाली. आमदार, अध्यक्ष, नगराध्यक्ष, सर्व कार्यकर्ते कडक इस्त्रीचे कपडे घालून आले होते. एकेकांनी लंबी चौडी भाषणे केली. " आमच्या पक्षाला पुन्हा निवडून दिले तर जिल्ह्यात एकही गरीब राहणार नाही. सर्वांना कामे मिळतील. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा आमचा पक्ष आहे.. "
मोठ्या मोठ्या बाता ऐकत, कार्यकर्त्यांनी टाळ्या मारल्या की टाळ्या ठोकत संध्याकाळचे पाच वाजले.
सुंद्री बायकांमध्येच पण एका बाजूला बसली होती.
नाकात हळू हळू वडापावचा वास येऊ लागला. सभा संपायच्या मार्गावरच होती. वाटपासाठी वडापाव तयार होत होते.
अध्यक्षांनी सभा संपल्यावर सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था केली आहे असे सांगताच तुकारामच्या टपरी समोर झुंबड उडाली. माझ्या हातात कसा बसा एक वडापाव लागला. सुंद्री गर्दीत कुठे दिसतेय का ते पाहू लागलो.
आता ती त्या बाकड्यावरच बसली होती. तिच्या हातात वडापाव होता. दहा मिनीटातच गर्दी पांगली. अजून एक दोन वडापाव मिळतात का हे पाहू लागलो. त्यासाठी तुकारामच्या टपरीत घुसलो.
" हाय काय रं? एकाददुसरा " मी विचारलं.
" नाय रं... शंबर वडापाव सांगितलं व्हतं.. ऱ्हातात व्हय? चाय पायजे तर घे, ती लय बाकी हाय " तुकारामने अध्यक्षांनी दिलेले पैसे मोजत सांगितले.
" नाय नको.. यक भेटलाय तो पुरल मना. तो संत्या कुठं गेला रं? मांजी मंजरी बाकी हाय त्याच्याकडं. " मी निराशेने बोललो.
" अरं हो.. तुला द्यायला सांगितलेलं. पन्नास रुपये आणि एक क्वॉर्टर . तो गेला तालुक्याला, पन मंडप मोडल्यावरच.. जा लवकर काम कर आनी मंग पैसे घेऊन जा. "
सुन्या आणि झिल्या तिकडे मंडपावर चढले पण होते. पंधरा मिनीटात मंडप मोडून झाला. माझं काम झालं तसं मी क्वॉर्टर मजूरी घेऊन निघालो. सुंद्रीसुद्धा सोबत निघाली.
" पन्नास रुपये हात न्हवं? मंग आंजून दोन मोटल्या येतील त्यात.
तूमी कारटर पिवा, मना मोटल्या द्या. " सुंद्री हातातल्या पैशांकडे बघत बोलली.
" बरा तू म्हनतास तर तसाच करु " मी खुश..., अख्खी क्वॉर्टर मला मिळणार होती.
लगेच जाऊन दोन मोटल्या आणून सुंद्रीच्या हवाली केल्या.
एव्हाना अंधार पडला होता. दोघांवरही दारुचा अंमल पुर्ण चढू लागला. मोरीजवळ आलो सुंद्री म्हणाली
" बस इथे... मला नाय चालवत आता. बसूनशान कड आलाय. मी झोपते हितंच " असं म्हणून ती मोरीवरच फतकल मांडून बसली.
मला सुद्धा चालवत नव्हते. मी पण दमलोच होतो....
बसलो तिथेच तिच्यासोबत...
हळू हळू दारु मेंदूवर आणि कडाक्याची थंडी शरीरावर परीणाम करत होती.
डोळे आपोआपच जड झाले.. आणि..


तोंडावर कडक ऊन झोंबू लागले.
" च्यायला यांच्या.. झेपत नाहीत तर पितात कशाला? सकाळ सकाळ नको ते बघायला "
कोणीतरी बाजूने शिव्या देत गेले.
मी उठून उभा राहीलो..
सुंद्री अजून मोरीवरच झोपून होती. तिला जाऊन हलवले.
" सुंद्रे.. उठ.. आगं लोक इयाला लागली रस्त्याला. "
पण तीने काहीच प्रतिसाद दिला नाही, म्हणून सवयीप्रमाणे तिला एक लाथ मारली. इतकी वर्ष माझ्या एका लाथेने जागेवर येणारी सुंद्री आज अजिबात हलली सुद्धा नाही.
मी तिच्या अंगावरुन तिच्या चेहऱ्याकडे पाहीलं......
एक माशी तिच्या नाकात आत बाहेर करत होती.
सुंद्री पुर्ण थंड पडली होती...
- बिझ सं जय ( ६ नोव्हेंबर , २०१६)

Wednesday, 2 November 2016

मदत

.... मदत ...

एकीकडे विनायकने दिलेली बातमी आणि दुसरीकडे पैसे नसल्याची खंत.. दोन्ही भावनांची सरमिसळ होत होती. नेमके काय करावे तेच कळत नव्हते. पंधरा लाख ही काही थोडी थोडकी रक्कम नव्हती.
नाही म्हणायला सर्व शेयर विकून वीस पंचवीस लाख आरामात उभे राहिले असते. पण ती रक्कम अकाउंट मध्ये दिसायला अजून चार पाच दिवस लागणार. काही कळत नव्हते की काय करावे. विनायकचे नशीब इतकं चांगलं की डॉक्टरकीच्या एका परीक्षेसाठी त्याने इंग्लंडमधल्या एका युनिव्हर्सिटीत स्कॉलरशीपसाठी निवेदन दिले होते. ते मंजूर करण्यात आले होते. विनायक खुप हुशार. या एका संधीने त्याचे आयुष्याचा मार्ग ठरणार होता. ही संधी जर त्याने मिळवली तर नक्कीच तो मोठा सर्जन होऊ शकणार होता.
पण विजासाठी एक रक्कम अकाउंट मध्ये दिसणे गरजेचे होते. पंधरा लाख.. पंधरा लाख...
काय करावे काही सुचतच नव्हते. एवढे पैसे एकदम देणार तरी कोण? घरातल्या माणसांकडूनही एवढे पैसे येतील अशी सुतराम शक्यता नव्हती.
शेवटी घरी सांगून टाकले...
" ही संधी आपण नाही गाठू शकत. शेयरचे पैसे ट्रान्सफर व्हायला दोन तीन दिवस लागतील. उद्या विजासाठीचा इंटरव्यूह.. नाहीच होणार शक्य. तरीही आपण प्रयत्न करुन पाहू.. विजा ऑफिसरला समजावून सांगू.. "
" बाबा.. विजा ऑफीसर आपला ओळखीचा आहे का?
त्यांना अकाउंटमध्ये पैसे दिसणे महत्त्वाचे आहे. जाऊ दे आता.. माझ्या नशिबातच नाही. हा विषय बंद करा आता. " विनायक निराश होऊन बोलला.
मला पहिल्यांदा मी किती नाकर्ता आहे याची जाणीव झाली. पैसे आहेत पण हातात नाही... काय उपयोग अशा संपत्तीचा?
यावेळी सिद्धीविनायक सुद्धा पावणार नाही.. दुपारी दर्शन घेऊन आलो सर्व जाऊन. उद्याचा दिवसच आहे हातात.
घराचे वातावरण सुतकी झालं. जेवण कधी झाले, मावशी काम करुन कधी गेल्या तेही समजले नाही.
झोपायची तयारी सुरु झाली....
तोच...
......................................
" हॅलो.. अहो ऐका ना..
पलीकडून अनूचा फोन होता.
" हां.. बोल की.. " मी नेहमीप्रमाणे बोललो.
" अहो.. मघाशी मावशी आलेल्या, त्या म्हणत होत्या की त्या समोरच्या गोखलेंच्या घरात काहीतरी वाईट घडलंय, सर्व तोंड पाडून बसलेत. म्हणून मी चौकशीसाठी फोन केला, तेव्हा आरती म्हणाली की त्यांना दोन दिवसांसाठी पंधरा लाखांची गरज आहे. विनायकला स्कॉलरशीपसाठी गरज आहे. त्यांच्याकडे पैसे आहेत पण शेयरमध्ये ते ट्रान्सफर व्हायला दोन दिवस लागतील, आणि उद्या इंटरव्यूह. बघा ना काही करता येईल का? पोराचं भविष्य बनेल ओ. " अनू तिकडून काकूळतीने सांगत होती.
" तू म्हणतेस ना? मग प्रयत्न तर करतो. माझ्याकडे आता तीन एक असतील. इकडे तिकडे विचारुन पाहतो. मिळाले तर फोन करतो तुला. " मी फोन कट केला.
डोळ्यासमोर त्या विनायकचा चेहरा आला.
माझी मुलगी आणि विनायक एकाच शाळेत. एकाच सोसायटीत असण्याखेरीज ही दुसरी ओळख होती आमची गोखले कुटूंबियांसोबत. मुलगा हुशार होताच. काही संशय नाही.
काय करावे.. काय करावे...
समोरच्या फोनचा रिसीव्हर उचलला. आणि बाजूची टेलिफोनची डायरी उघडली.
एक एक नाव वाचू लागलो.
वेदक.. शेठ वेदक.. सोन्याचे व्यापारी.
फोनवरची बटणे आपोआपच दाबली गेली.
" हॅलो. बोला. अनिलशेठ. आज कशी आमची आठवण झाली? "
कॉलरआयडी वरचा नंबर बघितला होता बहूतेक त्यांनी.
" नमस्कार वेदक.. एक काम होते. जरा वेगळे आहे. " असं म्हणून त्यांना गोखलेंची परिस्थिती समजावून सांगितली.
सर्व ऐकून घेत वेदक शेवटी बोलले
" अनिल तुम्ही शब्द टाकला आणि मी कधी नाही बोललो असं कधीतरी झालंय का? आणि हे तर पुण्य मिळवण्याचे काम दिसतंय मला. माझ्याकडे याक्षणी तीन लाख असतील. दोन दिवस असेच पडून राहणार तिजोरीत. त्यांनाही जरा पुण्य लाभू दे की. ..
आलोच अर्ध्या तासात तुमच्या ऑफिसला " असे म्हणून त्यांनी फोन ठेवला.
तीन आणि तीन सहा..
अजून नऊ हवेत.
टेलिफोन डायरी पुन्हा चाळली.
नरोत्तम शेठ.. डायमंड व्यापारी. रोज सकाळी हॉटेलला येऊन नाश्ता करुन, न चुकता नमस्कार करुन जाणारा आणि तितकाच खुशमस्कऱ्या माणूस..
हा नक्कीच मदत करु शकेल..
फोनच्या डायल वरुन बोटे फिरली.
" हॅलो.. कौन? " समोर नरोत्तमशेठच होते.
" नरोत्तम भाई, अनिल बात कर रहा हूं.. हॉटेल वाला. " मी हसत हसत बोललो.
" क्या बात है.. अनिल भाई.. तमे सामे थी फोन करी रह्यों छो? आज मारा बड्डे तो नथीं? " नरोत्तम भाई नेहमीप्रमाणे गडगडाटी हसले.
" नाही हो नरोत्तमभाई... एक महत्वाचे काम आहे. ... "
पुढे त्यांना गोखलेंची गोष्ट सांगितली.
" अनिलभाई... तुमचा दोस्त तो आपला दोस्त. पाच मेरी तिजोरीत असेलच. पण तीन दिवसांनी परत पायजे. गुजरातला पेमेंट पाटवायचे हाय.. हितेश ला पाठवतो घेऊन.. तरतच.. "
थँक्यू बोलायची संधी न देता नरोत्तमभाईंनी फोन कट केला.
सहा आणि पाच अकरा..
अजून चार बाकी..
सुहास...
त्याच्याकडे असतील.. नक्कीच असतील.
त्याचा नंबर तर तोंड पाठ.. दिवसातून अनेक फोन जे होतात.
" हॅलो.. सुहास....
अरे ऐक ना?
चार ची गरज आहे. ...
अरे तो विनायक आहे ना... हां तोच.. अरे त्याला इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीत स्कॉलरशीप मिळालीय. पण पंधरा हवेत ना अकाउंटमध्ये.. "
त्याला पुर्ण गरज समजावून सांगितली..
" अरे अनिल.. माझ्याकडे दोन आहेत. अजून दोन कमी पडतील. " सुहास चुकचुकत बोलला.
" आता पाठवशील? आहे का कोणी की मी पाठवू कोणाला. "
" पाठवतो रे.. शुभम निघेल पाच दहा मिनीटातच, त्याच्या सोबतच पाठवतो. " सुहास हसत बोलला.
" थँक्स् रे... " मी बोलून गेलो.
" गप रे... आलाय मोठा शहाणा.. पाठवतो.. " सुहास ने फोन कट केला.
पुढच्या पंधरा मिनीटात माझ्या टेबलावर तेरा लाख रुपये होते.
दोन लाख कमी..
मी घरी फोन केला...
" अनू.. तेरा लाख जमा झाले.. दोन कमी पडताहेत. घरी बघ आहेत का? "
"काय???
तेरा लाख जमले?? इतक्या कमी वेळात? कोणी दिले? " ती तिकडे जबरदस्त आश्चर्यचकीत झाली असणार..
" हो खरंच... तुझा नवरा कसा कमाल आहे ते माहीत आहे ना तूला? " मी हसत हसत बोललो.
" ओ कमाल... थांबा बघते... फोन चालू ठेवा... आहेत तीन एक असतील.. " तिच्या या शब्दांनी माझी काळजी मिटली.
" आलो घरी.. मी आल्यावरच गोखलेंना फोन करु. "
सर्व पैसे पिशवीत भरुन. गाडीच्या साईड डीकीत टाकले.
घरी अनू वाटच बघत होती..
" करु फोन? तुम्हीच बोला...
..
..
..
हां.. हा घ्या रिंग येतेय.. "
..........................

" आता कोणी फोन केला असेल?
विनायक बघ रे जरा... " मी वैतागूनच बोललो.
" हॅलो.. हां.. हां.. हो आहेत जागे ते.. त्यांनाच देतो. " विनायक माझ्याकडे फिरुन बोलला..
" बाबा.. अनिल काका.. समोरच्या खोलीतले.. काहीतरी काम आहे म्हणताहेत. " रिसीव्हर माझ्या हातात देत.. विनायक गादी लावू लागला.
" हां अनिलशेठ. नमस्कार बोला..
काय म्हणताय?
..
हो.. पण..
काय?? काय??
अनिलशेठ मस्करी नका करु..
पंधरा लाख कोणी असे देईल का?
..
..
...
हो पण... तरीही.. जर खरं असेल तर हा मी येतो आत्ताच तुमच्या घरी..
त्याचे जे काही व्याज होईल ते मी भरायला तयार आहे..
..
..
हो, हा आलोच." फोन ठेवला आणि विनायककडे फिरलो..
" विनू.. झाली व्यवस्था पंधरा लाखांची.. त्या अनिलकाकांनी केली.. चल लवकर... त्यांनी घरी बोलावलेय. " एका दमात बोलून गेलो. आश्चर्य आणि आनंदाची संमिश्र प्रतिक्रिया विनायक कडून आली.
" काय बाबा? पंधरा लाख झाले? "
हो तू चल आधी त्यांच्याकडे.
आरती तर तोंडाकडे बघतच राहीली.. डोळ्यातून अश्रू गाळत.
" आलो आम्ही.. तू थांब. " म्हणून आम्ही दोघे गेलो अनिलशेठ कडे.
त्यांचा दरवाजा उघडाच होता.
घराचा उंबरठा ओलांडताना डोळ्यात पाणी भरले. आणि...
क्षणार्धात मला वाटलं की सिद्धीविनायक मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो आहे.
समोर " सिद्धीविनायक " आमच्यासाठी पिशवी भर
" विनायक चे भविष्य " घेऊन सोफ्यावर बसलेला दिसत होता.
- बिझ सं जय ( १ नोव्हेंबर २०१६)

Wednesday, 26 October 2016

देवी माँ की किरपा..

... देवी माँ की किरपा...


डॉक्टर शुक्ला हात पुसत तपासायच्या खोलीमधून बाहेर आले.  त्यांच्या पाठोपाठ नर्सही आली. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर जरा जास्तच आनंद दिसत होता.
डॉक्टर खुर्चीत बसले आणि बोलू लागले...
" अच्छी प्रोग्रेस है..  देवी माँ की किरपा से बच्चा एकदम ठिक ठाक है.  वजन भी बराबर है. "

हे ऐकताच समोर बसलेल्या पंडितजीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.  त्याने शेजारी बसलेल्या त्याच्या आईकडे पाहीलं.  तिनेही तोंड मुरडलं.

पोटातलं मुल व्यवस्थीत आहे याचा कणमात्र आनंद या दोघांच्या तोंडावर नव्हता.  तपासायच्या खोलीतून राधा बाहेर आली.
ती बाहेर आल्याचे बघून डॉक्टर पुन्हा बोलू लागले..

" बिलकूल चिंता मत करना,  देवी माँ की किरपा तुम्हारे बच्चे पर है.  बच्चा एकदम तंदुरुस्त है..  क्यो न होगा भला?  देवी माँ की किरपा जो उसपर है. "

डॉक्टर मनोहर शुक्ला हे त्या भागातील अत्यंत नावाजलेले डॉक्टर होते.  वयाच्या साठीतही ते नियमितपणे हॉस्पिटलमध्ये येत असत.  गडगंज श्रीमंती,  दिमतीला दोन महागड्या गाड्या,  नर्स वॉर्डबॉय चा ताफा असे जबरदस्त चाललं होतं.  मुलगा सुद्धा डॉक्टरकी करत होता.  सरकारी हॉस्पिटल आणि स्वतःचे क्लिनिक सांभाळत होता.  पण त्याचे आणि यांचे पटत नव्हते.

राधाने प्रेमाने पंडीत कडे पाहीलं..
काल पर्यंत तिच्याकडे प्रेमाने बघणारा,  तिची प्रत्येक इच्छा पुर्ण करणारा पंडीत आता तिच्याकडे बघतही नव्हता.  तिने नजर सासू कडे वळवली...  तिच्या तोंडावरुन तर ती भयंकर चिडलेली वाटत होती.
खरंतर एवढी चांगली बातमी असताना अचानक यांना काय झालं हे राधाला समजेचना.
डॉक्टरांचे दोन हजार रुपये भरुन पंडीतने दोघींना पुढे व्हायला सांगितले.  पंडीत डॉक्टरांसोबत बोलत राहीला.  घर जवळच असल्याने चालत चालत जाताना राधाच्या मनात विचार थैमान घालू लागले...
नेमकं काय झालं असेल?
सर्व तपासणी वगैरे तर व्यवस्थीत झाली डॉक्टरांनी सुद्धा पिंडाची वाढ चांगली होतेय असे सांगितले तरी यांचे चेहरे असे का झाले?

शेवटी घरी पोहचताच तिने सासूला विचारलं

" काय झालं ओ आई? चेहरा का इतका पडलाय,  डॉक्टर तर सर्व काही चांगलं आहे असं बोलले,  काही गडबड आहे का?  "

" काही नाही..  तू जास्त विचार करु नको,  दिव्या मिश्राजींच्या घरी खेळत असेल तिला घेऊन ये..  मी तोवर भात चढवते.  "

सासू तिला सांगायला तयार नाही हे तिला पटकन समजले. पंडीत आला की मगच विचारु त्याला असं तिने ठरवलं. ती मिश्राजींच्या घरी गेली. मिश्राजींची नात काव्या आणि दिव्या एकाच शाळेत होत्या. मिश्राजींची सून शारदा एका संस्थेचे अकाउंट सांभाळून घर सुद्धा व्यवस्थित सांभाळायची.  एकंदरीत घरातले सर्व शिक्षित आणि चांगल्या विचारांचे होते. दोघी चांगल्या मैत्रिणी बनल्या होत्या.
राधाला घराकडे येताना बघून शारदाने दिव्या ला हाक मारली..
" दिव्या.. बघ मम्मी आली डॉक्टरकडून. चला पुरे झाला खेळ "
तेवढ्यात राधा घरात पोहचली सुद्धा.
तिचा चिंताग्रस्त चेहरा बघून शारदाने विचारलं..
" काय गं?  काय झालं?  सर्व ठिक तर आहे ना?  काय म्हणाले डॉक्टर?  "

" अगं डॉक्टर तर म्हणाले की पोटातले बाळ व्यवस्थीत आहे.  पण पंडीत आणि आई नाराज का झाल्या ते नाही कळालं..  विचारतेय तर सांगत ही नाहीत आई. पंडीत सुद्धा अजून घरी आले नाहीत. " राधा हिरमसून बोलत होती.

" मला सांग डॉक्टर काय म्हणाले ते..  तुम्ही पण डॉक्टर शुक्लांकडे जाता ना?  काय म्हणाले ते नेमके? " शारदाने कुतूहलाने विचारलं.

" अगं ते म्हणाले..  देवी माँ की किरपा से बच्चा अच्छा तंदरुस्त है. वाढ सुद्धा चांगली आहे.  " राधाने पटकन सांगून टाकले.

शारदाचे डोळे चमकले..
" एक मिनीट थांब हां.. मी आलेच "
ती आतल्या खोलीत जाऊन काहीतरी फाईलसारखं घेऊन आली.
राधाला खाली बसायला सांगून स्वतः फाईल घेऊनच खाली बसली.
दोन फाईल समोर ठेवून ती काहीतरी शोधू लागली. राधा ने न राहावून विचारलं...
" काय शोधतेस?  ह्या फाईल कसल्या?  "

" हे बघ..  हा असा घोळ आहे तर..  ही काव्याची फाईल आणि ही श्लोकची... शुक्ला मॅटरनिटी होम ची दोघांचा जन्म तिथेच झाला.  फाईल सेम आहेत.  डॉक्टरही तेच,  मग..
श्लोकच्या फाईल वर " श्री गणेशाय नमः " आणि काव्याच्या फाईलवर " जय माता दी " असं वेगवेगळे का? ,  राधा कळतंय का तुला काही या मागचे गौड बंगाल? "
" नाही गं...  काही नाही कळलं " राधा प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघत होती.

" अगं किती गं तू भोळी..  मुलगा असला की गणेशाय नमः, मुलगी असली की जय माता दी...  कळलं का तुला घरचे नाराज का झाले ते?  " शारदा पटकन बोलून गेली.

" म्हणजे माझ्या पोटात मुलगी आहे म्हणून पंडीतजी आणि आई नाराज झाल्या?  " राधाचा चेहरा एवढासा झाला.
" अगं हा नुसता अंदाज आहे आपण अजून माहीती काढू,  तुझ्या फाईल वर जाऊन बघ काय लिहिलंय ते,  जर तसं असेल तर माझ्यामते तिथे नक्कीच काहीतरी गडबड चालू असणार.  " शारदाच्या मनात काहीतरी चालू होतं.
" मी घरी जाऊन बघते आणि मग तुला सांगते.  " तिने दिव्याचा हात पकडला आणि घरी निघाली.
पंडीत घरी आलाच होता. राधाला बघून तो पटकन म्हणाला..
" मला डॉक्टरांनी थांबवून घेतलं..  तू मन घट्ट कर..  कारण त्यांनी जे सांगितलंय ते भयानक आहे.. "

राधा म्हणाली " सांगा मी मन घट्ट करुनच आहे "

" डॉक्टर म्हणाले की बाळाच्या पायात व्यंग्य आहे,  जसजशी वाढ होईल तसे व्यंग्य वाढत जाईल,  आपल्याला मुल पाडावे लागणार.. " डोळ्यात पाणी आणत पंडीत बोलला.
" पण डॉक्टर तर बोललेले की देवी माँ की किरपा से सब ठिक है,  म्हणून?  " राधा संयम राखून बोलत होती.

" मग काय ते डॉक्टर, तुझ्यासमोर सांगणार का, की पोटातलं बाळ पांगळं आहे म्हणून?  " आतून सासूबाईंचा आवाज आला.

राधा समजून चुकली की,  या दोघांचे बोलणे झालंय या विषयावर आणि मला गर्भपाताला तयार करण्यासाठी हे नविन पांगळेपणाचं सोंग काढलंय.

" आपण अजून आठ दिवस थांबू आणि बघू, नाहीतर आठ दिवसांनी पुन्हा बोलावलं आहेच डॉक्टरांनी,  जो काही त्रास होईल तो मलाच होईल.. " राधा मन घट्ट करत म्हणाली.
ती कबूल होतेय हे म्हटल्यावर दोघेही शांत झाले.
जेवण झाल्यावर सोफ्यावरची फाईल राधाने उघडून पाहीली....
अपेक्षेप्रमाणे तिथे " जय माता दी " लिहिलेले होतेच.
पंडीत कामावर गेला होता.  दिव्या झोपली होती.

" आई मी जरा मिश्राजींकडे जाऊन येते.  काव्याच्या मम्मीने बोलावलेय.  काहीतरी काम आहे म्हणून " एवढं सांगून पदराखाली फाईल लपवून ती घराबाहेर निघाली.
एका झेरॉक्सच्या दुकानात तिथे फाईलच्या दोन झेरॉक्स कॉपी काढल्या आणि शारदाच्या घरी गेली.
झालेली सगळी हकीकत सांगून राधा म्हणाली " तू म्हणतेस तसेच आहे " जय माता दी " लिहिलंय.  पंडीत सांगत होते की,  पोटातल्या बाळात व्यंग आहे.  तू सांगितल्याप्रमाणे झेरॉक्स आणलीय फाईलची,  फाईल पुन्हा घेऊन जाते मी.  मला आईंचा काही भरवसा वाटत नाही.  त्या पंडीतजींच्या मनात काही बाही भरवतील.  आठ दिवसांनी पुन्हा जायचं आहे शुक्ला मॅटरनिटी होम मध्ये तोवर तू काय करायचे ते कर.  "

" तू काळजी नको करु,  फक्त त्यांच्या हो ला हो म्हणत जा.  चार पाच दिवसात मी आमच्या  संस्थेच्या मदतीने काय करते ते नुसतं बघत रहा. " शारदा ठामपणे बोलत होती. " तू जा घरी,  सासूबाईंना संशय नको यायला अजिबात. "

राधा घरी गेल्यावर,  शारदाने लगेच संस्थेचे अध्यक्ष राणेंना फोन केला,  सर्व परिस्थिती समजावून सांगितली. राणेंनी त्या झेरॉक्स घेऊन यायला सांगितल्या,  शारदा स्वतःच्या दोन फाईल्स सुद्धा सोबत घेऊन गेली.
फाईल आणि झेरॉक्स बघून त्यांचीही खात्री पटली की शुक्ला मॅटरनिटी होम मध्ये बेकायदा  गर्भलिंगनिदान आणि गर्भपात केले जातात.  त्यांना यापुर्वी त्याबाबत तक्रारी आल्या होत्या.  पण आता पुरावा समोर होता,  त्यांनी पुढच्या दोन दिवसात जुन्या तक्रारी दिलेल्या लोकांची भेट घेतली. त्यांच्या फाईलच्या झेरॉक्स घेतल्या.
आणि मग एसीपी कदमांना जाऊन प्रत्यक्ष भेटले.
एसीपी कदम हे त्यांचे चांगले मित्र होते.  त्यांनी सर्व पुरावे पाहीले आणि म्हणाले की....
" आपण जर या शुक्लाला रंगेहाथ पकडले तर,  हा गोरखधंदा कायमचा बंद होईल.  तुम्ही या राधाला समजावून सांगा.  मी पत्रकार दुबेंना या प्रकरणाची माहीती देतो.  ते छुपा कॅमेऱ्याने सर्व रिकॉर्ड करतील.  एक मोठे रॅकेट उध्वस्त होईल तुमच्यामुळे. "

पुढील दोन दिवस पत्रकार दुबे वेगवेगळ्या लोकांना पाठवून रिकॉर्डिंग आणत होते.  कदम सुद्धा पाळत ठेवून होते.

इकडे राधाच्या घरी..
पंडीत सांगत होता " उद्या डॉक्टरांनी बोलावलंय,  तासाभरात सुट्टी देतील म्हणाले.  फार त्रासही नाही होणार. "
राधा शांतपणे ऐकत होती...
" जायचंय ना?  म्हणजे तशी तयारी करायला "

" जायचंय ना, म्हणजे काय ??  " सासूबाई आतून तिरमिरीत आली..  " जायचंय ना म्हणजे काय?  पांगळं पोर जन्माला घालणार की काय?
तिला असेल हौस पांगळी पोरं जन्माला घालायची,  पण आमच्या घराण्यात नको म्हणावं हे पांगळं पोर " तिचा अवतार बघून एक क्षण पंडीीतही घाबरला.
" मी कुठे नाही म्हणाली ओ?  बाळ पांगळं असेल तरच काढा, नाहीतर अजिबात नाही एवढंच म्हटलं.  नाहीतर उद्या दुसरी मुलगी नको म्हणून पोटातली मुलगी माराल तर मी नाही खपवून घ्यायची.  "
असं बोलल्या बरोबर दोघेही चपापले.
एक मिनिट शांततेत गेल्यावर.

" उद्या शारदा सुद्धा आपल्याबरोबर येणार आहे. काव्याचा डोस बाकी आहे तो द्यायला. " राधाने सांगितले.
पंडीत आणि सासूबाई एकमेकांकडे पाहू लागले.
" मग एक काम करा...  तुम्हीच जा..  मी काही यायची नाही.  मी पोरीला सांभाळीन घरी.  " सासूबाईंनी सर्व भार पंडीत वर टाकला.
" ती कशाला आता सोबत आणखी?  उगाच वेळ वाया जाईल तिचा.  आपल्याला जरा जास्तच वेळ लागेल.  " चेहरा त्रासिक करुन पंडीत बोलला.
" काही नाही होत उशीर वगैरे,  आणि आई तुम्हीसुद्धा चला.  एकाला दोन माणसं सोबत असली की बरे.  दिव्या राहील मिश्राजींच्या घरी.  " राधा समजूतीच्या सुरात बोलली, मग या दोघांचा नाईलाज झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी,  दहा वाजता शारदा काव्याला घेऊन आली,  राधा, पंडीत आणि सासूबाई तयारच होते.  पंधरा मिनीटातच ते हॉस्पिटलला पोहचले.
हॉस्पिटलमध्ये दोन चार पेशंट, काही बायका मुलांसोबत होत्या.  शारदाने नंबर घेतला. आणि वेटिंग रुम मध्ये काव्याला घेऊन बसली.  पंडीत आणि दोघींना थेट आतमध्ये बोलावून घेतले.
डॉक्टर शुक्लांनी पुन्हा सांगितले...
" देखो बेटी बच्चा ठिक नहीं है.  उसका एक पैर बराबर बढ़ नहीं रहा, आगे जाके कॉम्प्लीकेशन्स हो सकती है.  भलाई इसीमें है की अभी अबॉर्ट कर देते हैं.  "

" डॉक्टरसाब मै तैयार तो हो जाऊंगी लेकीन मुझे जरा बतायिए कौनसा पैर बराबर नहीं बढ़ रहा? "
राधा आवाज चढवून बोलली.
पंडीत आणि डॉक्टर तिच्याकडे बघतच राहीले.  ती असे काही बोलेल याचा जराही अंदाज नव्हता त्यांना.
डॉक्टर म्हणाले " देखो पंडीत भाई..  मैने उसदिन आपको दिखाया था,  अब फिरसे देखना चाहोगे तो मुझे कोई ऐतराज नहीं.  लेकिन इसका खर्चा लगेगा.  बेटी हम कोई कसाई तो नहीं..  बिनावजह किसी की जान लेंगे. "

" हिला डॉक्टरकीतलं जास्त कळतं,  व्यवस्थित काळजी घेता येत नाही आणि आता आवाज चढवते. "
सासूबाईंनी आवाज चढवला.

इतक्यात.....

दरवाजा धाडकन उघडला गेला.
दरवाजातून एसीपी कदम,  दोन कॉन्स्टेबल आणि स्वतः  राणे आले त्यांच्या मागोमाग शारदा सुद्धा आली.
" ये क्या हो रहा है इन्स्पेक्टर? यह ऐसे अंदर आने का मतलब क्या हुवा?  हम कोई चोर उच्चके है क्या?  "डॉक्टर चिडले होते.

कदम काही बोलण्याच्या आधीच राणे राधाकडे बोट दाखवत बोलले..
" क्या हुवा है इन्हें? "
" बच्चे में गडबड है,  वह जनम से अपाहीच होगा.  इसलिए अबॉर्शन करना है इन्हें "
डॉक्टर कपाळावरचा घाम पुसत बोलत होते.

" नाही साहेब..  हे डॉक्टर खोटं बोलताहेत.  माझ्या पोटात मुलीचा गर्भ आहे.  हे या डॉक्टरांनी आमच्या घरातल्या लोकांना सांगितले.  मुलगी नको म्हणून आता अपंग आहे असे खोटे सांगून मला गर्भपाताला तयार करत आहेत.  " सर्व धीर एकवटून राधा बोलत होती.

" पंडीत अपने बिबी को संभालो..  अनापशनाप बक रहीं हैं...  और आपके पास क्या सबूत हैं? " डॉक्टर शुक्ला चिडून बोलले.

फट्टाक...  कदमांनी डॉक्टर शुक्लांच्या एक कानाखाली खेचली.  शुक्लांच्या डोळ्यासमोर तारेच चमकले.  शारदाने तिच्याकडचे पेपर समोर दिले.
" जय माता दी...  श्री गणेशाय नमः... अच्छी टेक्निक है डॉक्टर,  मानना पडेगा तुझे.  बहोत खून किए हैं,  चलो अभी तुम्हे कानून का ऑपरेशन दिखाते हैं...  सर्व सील करा रे.  एकही वस्तू इथून बाहेर नाही गेली पाहीजे. सगळे सबूत याच्या नरड्यात घालतो कोर्टात.  "

पंडीत आणि सासूबाई कोपऱ्यात उभे राहून हा सर्व प्रकार बघतच राहीले.  कॉन्स्टेबलने पुढे होऊन सर्वांना बाहेर काढले.  हॉस्पिटलच्या दरवाजावर अगोदरच टिव्ही चॅनेल आणि पत्रकार जमा झाले होते..  राणेंनी ते सर्व जमवून आणलं होतं.

हॉस्पिटलला सील लावले गेले.  सर्व फाईल,  कॉम्प्युटर,  रजिस्टर ताब्यात घेतले गेले...


" शहरात गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरला अटक.. " अशी बातमी टिव्हीवर दिसू लागली.

गोरीपान,  तजेलदार,  आणि सुंदर अशा एका परीने पंडीत च्या घरी जन्म घेतला होता.  तिच्या डोळ्यात पाहताना पंडीत सुद्धा हरवून गेला.
आपण किती सुंदर जीवाला मारुन टाकायला निघालो होतो याची खंत त्याला वाटत होती.

राधाने मोठ्या मनाने दोघांनाही माफ केले होते.  दिव्या आणि काव्या छोट्या परीसोबत खेळत होत्या..  आणि परी...  आईच्या प्रयत्नामुळे या जगात जन्म घेऊ शकली होती

Sunday, 16 October 2016

झिंग

... झिंग ...


" अरे तुला काय माहीत तुझ्या बापाने तुझ्यासाठी काय काय कष्ट घेतलेत? आज मला विचारतोस तुम्ही माझ्यासाठी काय केलंस? पंधरा पंधरा तास काम करुन आताही तेवढीच काम करायची धमक आहे माझ्यात..
समजू नको तुझ्या बापाचं वय झालंय, फक्त अठ्ठावन्नचाच आहे मी. तू कमवतोस त्याच्या तिप्पट आजही कमवतो मी. "
दोन क्वॉर्टर पोटात गेल्या होते त्याच्या. ऑफिस सुटल्यावर नेहमीच्या जागेवर बसून त्याने दोन क्वॉर्टर पोटात टाकल्या आणि मग स्वतःच्या बाईक वर बसून तो बडबडत होता...
" दहा वर्ष कांग्रेस हाऊस मधून रांडाचा धंदा केला. अरे त्या रांडा सुद्धा बोलायच्या हा पोरगा नेहमी हवा आपल्याला. टॅक्सी समय पे लेके आता है और कभी कुछ बोलता भी नहीं. दरदिवशी चौघी पन्नास रुपये द्यायच्या. त्यांच्या सोबतचे भडवे सुद्धा बोलायचे.. साल्ला तू लकी है रे.. ये औरतें भी तुझे मानती है. बँकेतली नोकरी करुनच टॅक्सी चालवायचो मी, इतर टॅक्सीवाले जळायचे माझ्यावर.. विलास की टॅक्सी इतना कैसे कमाती है?? याचा हेवा होता त्यांना.
आणि तू आज बोलतो माझा बाप नालायक आहे. अरे साल्या अभ्यास करायच्या वेळी उनाडक्या करायला मी सांगितले होते का? नववीत तीन वर्ष काढल्यावर सुद्धा तुला एकदातरी हात लावलेला का? म्हणे मला चांगली नोकरी मिळवून नाही दिली. माझी पस्तीस हजाराची नोकरी तुला सोडली की? नाहीतर तुला बँकेत उभं तरी केलं असतं का? नववी नापासाला झाडू काढायची तरी नोकरी मिळतं का रे भाड्या? "
समोर कोणीही नव्हते तरी तो समोरच्या अंधाराशी बोलत होता.
" बायको आल्यापासूनच तुझी नाटकं सुरु झालीत. एकूलता एक तू.. पण तसा वागलास का कधी?
बँकेतून पगार आल्यानंतर कधी एक पैसा तरी हातावर टेकलास का?
आठ वर्ष पोरं झाली नाही म्हणून चार लाखाचा खर्च तुझ्या या बापानेच केला ना?
दिवसभर नोकरी आणि रात्री टॅक्सी चालवून घेतलेली खोली तुला लहान वाटायला लागली म्हणून मिळालेली सर्विस घेऊन शेजारची खोली घेतली तरी तूला मोठ्या घरात जायचं होतं. पंधरा हजार कमवणारा तू.. तुला रे काय जमणार?
सासऱ्याबरोबर परस्पर जाऊन तिकडे कामोठ्याला कुठल्याश्या बिल्डींग मध्ये खोली बघून आलास..
बापाला अंधारात ठेवून.
जेव्हा पैसे भरायचे आले तेव्हा माझ्या कमाईवर डोळा? खोली विका.. सांगायला लाजा नाही वाटल्या काय रे?
तेव्हा सासऱ्याला सुद्धा हाकलून लावले म्हणून कीती चिडलेलास? पण दुसरा काही पर्याय नाही म्हणून पुन्हा माझ्याच पायाशी आलास ना? अरे वाळकेश्वरची खोली सोडून तिकडे कामोठ्याला कसला रे जातोस तू?
बायको तरी कसली शोधून आणलीस तू. पोराच्या वाढदिवसाला केक कापायला प्लॅस्टिक सुरी सापडत नव्हती म्हणून कोणी मोठा सुरा देतो का? तेच मी बोललो. एवढ्या लहान मुलांत कोणाला लागलं वगैरे तर नको तो ताप व्हायचा.. तर ती गेली दोन वर्षे माझ्याशी बोलली नाही. तू तर बायकोचा बैल... तू कशाला विचारतोस तिला? "
समोरचा अंधार अजून गडद होत होता. येणारे जाणारे त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत जात होते. कोणी हसत होते तर कोणी खिल्ली उडवीत होते.
तो मात्र आपल्याच धुंदीत बोलत होता...
" आता तरी..
पोरांसाठी दुध आणायला मला पाठवलंस? सकाळी शंभरचे रात्री शंभर चे, पैसे देतोस का कधी?
आतातरी कोण्या मित्राला टिव्ही घ्यायचीय म्हणून मला फोन करुन सांगितलंस की बाबा तुम्ही जा दुध आणायला. तुमचा नोकर आहे का मी? मित्र मोठा की बाप एवढी समजायची अक्कल नाही तुम्हाला.. बापाला विका आता आणि खा वाटून मित्रांमध्ये.. "
दोन क्वॉर्टरचा असर आता दिसू लागला. डोळे लाल झाले, जीभ अडखळू लागली.
इतक्यात वरच्या खिशातला फोन वाजला....
" कोण आहे च्या आयला... "
फोन बाहेर काढून किलकिलत्या डोळ्याने नाव वाचलं...
विराज...
" हां बोल रे... "
" बाबा.. मिळालं का दुध? " पलीकडून
" नाही.. जातोय आता, उशीर झालाय ऑफिसमधून निघताना "
" बाबा तुम्हाला उशीर कशामुळे होतो हे माहीत आहे मला चांगलंच.. लवकर जा, दुध संपलं तर सकाळी पाच ला परत जावे लागेल मला.. मी नाही जाणार.. तुम्हालाच जायला लागेल.. समजलं? " पलीकडून चिडलेला आवाज.
" हो. हा निघालोच. मिळेल तू नको काळजी करुस " फोन कट करुन खिशात टाकला.
त्या फोनने त्याची झिंग पुर्ण उतरली होती.
गाडीवरुन उतरुन तो समोर दुध देणाऱ्या भैया कडे गेला.. तिथून दुध घेऊन पुन्हा गाडीकडे आला पिशवी हँडलला अडकवून गाडीला किक मारली.
झिंग.... हळूहळू उतरत होती..
- बिझ सं जय ( १६-१०-२०१६)

Saturday, 15 October 2016

महादेव मामा

... महादेव मामा....


पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीतले नारायण हे पात्र जरी काल्पनिक असले तरी तसे पात्र आपल्याला अनेक ठिकाणी दिसतेच दिसते. आमच्या घरी ते पात्र " महादेव मामा" म्हणून होते.

महादेव मामांना मी मला समजू लागल्या पासून बघितल्याचे आठवतंय. अवतार सुद्धा अनेक वर्ष तसाच..
काखेला भली मोठी पिशवी, दोन माप मोठा शर्ट, आठवडाभर एकच पँट, मानेभोवती लाल किंवा निळा रुमाल, केसात दात कोरायला अगरबत्तीची काडी, तोंडात संपुर्ण वेळ पान, एका हातात पाण्याची जुनी बाटली, खांद्यावर नॅपकीन, पायात स्लीपर. आम्हाला महादेव मामांना अशीच बघायची सवय होती.
आमचा व्यवसाय कानातले बनवायचा आहे, महादेव मामा त्यातलेच काही नेऊन रस्त्यावर नेऊन विकायचे. नेहमीच नविन नेतील असेही काही नाही तुटले बिटलेले सुद्धा त्यांना चालत. इकडून तिकडून जोडून जोडी बनली की ती विकायला मोकळी.

महादेव मामांचा एक एरिया होता ते तिकडेच जास्त बसत. आमचं दुकान भुलेश्वरला, पण तिथे जास्त गर्दी शिवाय पोलिसांचा सारखा त्रास म्हणून ते थोडावेळ भास्कर लेन, थोडावेळ रामवाडी तर थोडा वेळ पार तिकडे चिराबाजारच्या कोलभाट लेनमध्ये. जिथे जातील तिथे त्यांच्या ओळखी ठरलेल्या. माणूस इतका बडबड्या की दुर्लक्षीत राहूच शकत नाही. त्यांच्या बडबडीचा त्रास झालेली व्यक्ती मला तरी आठवत नाही. सतत कोणतेतरी किस्से आणि गोष्टी सांगून समोरच्या गिऱ्हाईकाला कसं पटवायचं हे मामांनाच जमावं...
यांची गिऱ्हाईक म्हणजे तरी कोण. अगदी जीना झाडणाऱ्या मुली पासून त्याच बिल्डींग मध्ये मोठ्या घरात राहणारी भाभी सुद्धा. ती मुलगी जर दोन रुपये खर्च करणार असेल तर तिला त्या प्रकारची वस्तू दाखवणार आणि भाभीला महागातली. त्यांच्या त्या पिशवीतून काय बाहेर येईल हे कधीच कोणाला कळायचे नाही.
मी एकदा त्यांना दुकान लावताना पाहीलेलं..
सर्वात पहिले खाली पेपर अंथरुन, त्यावर प्लास्टिक चा कागद आणि मग त्यावर एक एक खोके असे रचत की समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला एका नजरेत सर्व माल दिसे. कानातले डूल, झुमक्या, गळ्यातले हार, माळा, केसांचे बक्कल, लुजर अनेक प्रकारचे टिकल्या, सुया, बांगड्या सर्व वस्तू मिळत त्यांच्याकडे. सर्व दुकान लावून झाले की... " बोलण्याची मातीपण विकली जाते... " नुसार... आओ आओ, लॉट है..सेल है..., पाच पाच रुपया असे ओरडणे सुरु व्हायचे. खणखणीत आवाजामुळे गिऱ्हाईकं आपोआपच खेचली जायची त्यांच्याकडे.
बरं.. हे एवढंच नाही. एखाद्या भाभीला दुसरी एखादी वस्तू हवी असली तरी ते आणून द्यायचे..
" म्हादू भाय.. तुम पिछली बार जो कढाई लाये थे. बिल्कुल वैसी कढाई फिरसे चाहीये. ले के आना " असे म्हणत एखादी भाभी त्यांच्या हातात पैसे कोंबायची. मामा ती वस्तू घेऊन तिला घरपोचही करायचे. राहीलेले पैसे ती भाभी परत घ्यायची नाहीच, शिवाय वरुन त्यांना चहा पाजायची....

चहा ही मामांची सर्वात मोठी कमजोरी होती. दिवसातून कमीत कमी पंधरा वीस चहा तरी आरामात पीत होते ते. आमच्या दुकानातच दोन तीन चहा व्हायच्या त्यांच्या. चहा सुद्धा एकदम गरमागरमच हवी असायची त्याबाबतीत अजिबात लाड नाही. चहावाल्याला परत चहा घेऊन जायला सांगायचे जर चहा जरा जरी थंड असला तरी.

महादेव मामा हे लहानपणी अत्यंत व्रात्य म्हणता येईल असा मुलगा.. पक्का अवली. गावी असताना ते लहान असताना त्यांच्या आवडत्या बैलाला वाघाने मारले होते. पुढे त्या वाघाला शिकाऱ्यांनी मारलं तेव्हा त्या वाघावर नाचलेल्या महादेवला " वाघमाऱ्या महादेव " हेच नाव चिकटले.
तसे ते आमचे दुरचे नातेवाईक. आईचा मावसभाऊ, त्यामुळे मामा..
पण वडीलांच्या सोबतच जास्त म्हणून त्यांना मानणारे. खोड्या करायला दोघेही सोबत असायचे. वडिलांचे आणि त्यांचे नाते तेव्हा जास्तच फुलले जेव्हा मामांनी दारु सोडली. संपुर्ण तारुण्य दारुमध्ये घालवल्यानंतर वयाच्या एका टप्प्यावर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि मग ते हा धंदा करु लागलेले.
आमच्या आईला मात्र ते खूप मानायचे. आईसुद्धा त्यांना खुप मानायची. सुप, चाळणी, पाट, डब्बे एवढंच काय तर चांदिचे दागिने, पैंजण, जोडवी सुद्धा त्यांनाच आणायला सांगायची.
बाबा कधी बोलले तर..
" तुम्हाला जमणार आहे का दादासारख्या वस्तू आणायला?"
या प्रश्नावर सर्वच गप्प व्हायचे.
खरंच हा माणूस कुठून कुठून जाऊन एक एक वस्तू आणायचा हे त्यांनाच माहीत.
" ताई.. हा घे तुझा इस्टील चा डबा. " म्हणत त्यांच्या पिशवीतून आईला हवा तसाच डबा नेमका बाहेर निघत असे.

गावी गेले की मात्र राजासारखे राहत. गावी मामी आणि एक मुलगा आणि तीन मुली असं कुटूंब.
मामीच्या हातचे घावणे आजही आठवतात. मुलगा आमच्या बरोबरचाच. आमच्याच दुकानात होता. नंतर सोडून गेला, पण त्यामुळे मामा काही लांब गेले नाही.. ते आमच्यासोबतच राहीले.
दुपारी दोन वाजता दुकानात येऊन भंगारची पिशवी आणि जुन्या मालातले काही पॅकेट ते घेऊन जात. आदल्या दिवशी विकल्या गेलेल्या मालाचे पैसे न चुकता बाबांकडे देत असत. माणूस व्यवहाराला एकदम चोख. कुठेही फसवाफसवी नाही.
मोठ्या भावाच्या लग्नात सगळी खरेदी यांच्याच भरवशावर, बाशिंग, मुंडावळ्यांपासून, साखळ्या, जोडवी, हेरवी - फेरवीची खरेदी, शिवाय वऱ्हाड्यांच्या खांद्यावर टाकायला टॉवेल, नॅपकीन कुठे चांगले मिळतात ते यांच्याशिवाय कोण सांगणार?
भांजेसाब साठी त्याच्या पसंतीची लग्नाची पेटी आणायला नवरा सुद्धा हवा. " वस्तू त्याला वापरायचीय तर तो सुध्दा हवाच ना? " असं ठणकावून सांगणारे महादेव मामा.
माझ्या लग्नात सुद्धा सगळ्यात जास्त धावपळ करणारे तेच होते. लग्नाच्या दिवशीच त्यांच्या घरातल्या एकाचे लग्न होते म्हणून हळदीच्या रात्री पर्यंत थांबून ती कमी भरुन काढणारे मामाच होते.
आमच्या घरातल्या मोठ्या मुलीचे कान याच मामांनी टोचले होते. त्यातही ते एक्सपर्ट होते.
रस्त्यावरसुद्धा त्यांच्या धंद्यावर असताना अनेकजणींनी त्यांच्याकडून कान टोचून घेतले होते. बांगड्या चढवण्याचे कठीण काम सुद्धा अगदी सहज करत.

त्यांचा एक डायलॉग फार प्रसिद्ध होता. अनेकदा इतरांनी केलेल्या चुकांमुळे यांना त्रास सहन करायला लागायचा.. मग चिडून ते बोलायचे " करुन गेला गाव, आनी म्हांदेव चा नाव.. "
त्यांच्या जास्त गोड आणि चहाच्या सवयीने त्यांना मधुमेह लवकरच झालेला. अशातच देवाच्या विषयावरुन गावाचे दोन वैचारिक भाग पडले. इतकी वर्ष आम्हाला साथ देणाऱ्या मामांनी घरच्यांच्या दबावाखाली दुसऱ्या बाजूला जायचा निर्णय घेतला. त्यांची अगतिकता आम्हाला कळत होती. आम्हाला तुम्ही आमच्या घरी येऊ नका असे सांगताना त्यांच्या डोळ्यातले न दिसणारे परंतू काठोकाठ भरलेले अश्रू आम्हाला दिसायचे. आमच्याकडे येणे बंद झाल्यापासून धंदा आपोआपच बंद झाला. मुलाच्या कमाईवर जगण्यासाठी गावी जाऊन राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सोबत मग पुन्हा दारु जवळ केली. रिकाम्या माणसाचे हाल कुत्राही खात नाही. हा माणूस कधीही घरी बसून नव्हता. घरी बसला आणि हा माणूस ढासळत गेला.
अशातच एका जखमेने आणि पत्थ्य न पाळता भयंकर पसरलेल्या मधूमेहाने ते अचानक भरपूर आजारी पडले.
शेवटी शेवटी ते बाबांना बोलले की
" शेठ... मी तुमची साथ सोडून फार मोठी चुक केली."
परंतू खुप उशीर झाला होता.
अशाच एका दिवशी गावावरुन काकांचा फोन आला..

" म्हादेव दा गेले. "

आई तर धाय मोकलून रडली. गावाचे दोन भाग असल्याने आणि अंतरही लांब असल्याने जायला मिळाले नाहीच. त्या कुटूंबासोबत असलेला दुवा निखळल्यावर पुन्हा तिकडे जाण्यात काही अर्थही नव्हता.

महादेव मामा तर गेले.. पण त्यांच्या असंख्य आठवणी आजही ताज्या आहेत. सख्खा मामा नसलेला मी.. पण सख्ख्याने दिले नसते तितके प्रेम या मामाने मला.. आम्हाला दिले.

मामा आमच्या बरोबर असतात.. तर आजही सोबत असतात

Monday, 10 October 2016

माणूसकी

.... माणूसकी  ....


हाताला लागलेले औषध धुवून, हात कोरडे करुन तिने बँडेज गुंडाळून ठेवले.
कपडे बदलले,  हलकासा मेकअप केला. आरशात स्वतःला निरखून म्हणाली..

" मी आलेच जाऊन. "


स्वतःच्या गाडीची चावी घेतली. तोंडाभोवती स्कार्फ गुंडाळला.  डोक्यात हेल्मेट घातले.  स्ट्रार्टर मारला.  नविन गाडी असल्यामुळे गाडी झटकन सुरु झाली.

त्या जागेवरुन ती गेली.  रेतीवरच्या खुणा अजूनही तशाच दिसत होत्या.  एक सुस्कारा सोडून त्या जागेवर पाहीलं.  क्षणभरच..  मग एस्कलरेटर पिरगटला आणि गाडी पळवली.  सिग्नलला यू टर्न घेतला आणि पुन्हा त्याच रस्त्याला आली.
लांबूनच तिने तो पानवाला, आईस्क्रीमवाला त्याच्या पुढ्यात नेहमी उभे असणारे आणि तिथेच टपोरीगिरी करत राहणारे ते दोन रिकामटेकडे तरुण, बाजूला नेहमी असणारा पेपरवाला, स्टॉलच्या आतून डोके बाहेर काढून येणाऱ्या जाणाऱ्या बायका पोरींना न्याहाळणारा लंगडा स्टॉलवाला यांच्यावर नजर टाकली.

त्या जागेच्या आसपास कोणीही नाही हे पाहून तिने एक्सलेटर दिला,  उजवा पाय बाहेर काढला आणि बरोबर त्याच जागेवर फक्त मागचा ब्रेक जोरात दाबला.

त्याने गाडी शिकवताना सांगितले होते,  दोन्ही ब्रेक एकदमच दाबायचे. तरच गाडी न डळमळता उभी राहते. त्याचे प्रात्यक्षिकही त्याने त्यावेळी करुन दाखवले होते.  तीस - चाळीस च्या स्पीड ची गाडी जराही न सरकता जागच्या जागी उभी करुन दाखवली होती.
" जर तू अचानक  कोणताही एक ब्रेक दाबलास तर तू हमखास पडणार " हे शब्द तिच्या कानात पक्के बसले होते.

धड्डाम...  आवाजाबरोबर ढोपर जमीनीवर आपटले.  हात रेतीवरुन घासत गेला.  डोके आपटले पण हेल्मेटमुळे मार नाही लागला.  व्यवस्थित नियंत्रितरित्या पडल्यामुळे खरचटण्या पलीकडे तिला काही लागणार नव्हते.
परंतू गाडी पडल्याच्या आवाजामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यात ती यशस्वी झाली.

ते दोघे तसेच धावत आले सर्वात पहिले.  दोघांनी हात देऊन तिला उठवले.  लगेचच पानवाला त्याची टपरी सोडून आला.  आईस्क्रीमवाला त्याची गिऱ्हाईकं तिथेच सोडून धावत आला. पेपरवाला सुद्धा तडक आला,  लंगडा स्टॉलवालासुद्धा बिसलेरीची बॉटल घेऊन हळूहळू येताना दिसत होता.

" मॅडम आर यु ओके?  " तोंडातला गुटखा चघळत दोघातल्या एकाने विचारले.

गुडघ्यावर हात ठेवत " आऊच " असा दुःखी स्वर तिने काढला.  दोघांच्या कपाळावरची चिंतेची आठी अजून गडद झाली.
दुसऱ्याने वाकून पाहीलं.
" ढोपराला लागलंय बहुतेक,  लेंगा फाटलाय.  "

पानवाला चुकचूकला...  " अरे मॅडमवाको तनीक कोई पानी पिलाओ.  गाडी भी खडी करो. "
पेपरवाला ओरडला.. " या रेतीमुळे कोण ना कोण पडतंयच,  मॅडम कुठे राहता तुम्ही?  "

स्टॉलवाला तिच्याकडे नेहमीप्रमाणे निरखत म्हणाला.. " हे घ्या पाणी,  जरा बाजूला बसवा.  घाबरल्या असतील मॅडम.  जास्त लागलंय का?  "

तोवर दुसऱ्याने गाडी उचलली होती.  गाडीला मजबूत गार्ड लावल्यामुळे  कुठेच काही नुकसान झालं नव्हते. त्याने गाडी स्टँडवर लावली आणि चावी काढून तिच्या पुढ्यात धरली.
गुटख्या खालेल्या तोंडाने हसला आणि म्हणाला " मॅडम,  ही घ्या चावी "
चावी घेताना हाताला थोडा स्पर्श झाला त्यानेही तो शहारला.  तिचे डोळे सर्व काही टिपत होते.

" अरे मॅडमवा..  उ हेल्मेटवा और  स्कार्फ जरा निकालीए.. सर पर चोट वोट तो नहीं ना आयी?    तनीक सास लिजिए..  डरीए मत हम आप को तोहार घर पर पहुँचा देंगे.. " पानवाला दात कोरत बोलला.

तिने हेल्मेट काढण्यासाठी हात वर केले.  सगळ्यांच्या नजरा तिच्या चेहऱ्यावर खिळल्या होत्या.  स्कार्फ बाजूला केल्यावर तर सगळे पाहतच राहीले..

ती सुंदर होतीच, शिवाय उठावदार होती. सगळ्यांची नजर  चेहऱ्यावरुन सुरु होऊन तिच्या अंगभर फिरतेय हे तिला जाणवत होतं.  तिने स्टॉलवाल्याने पुढे केलेली बिसलेरीची बाटली घेतली.  घटा घटा पाणी पिऊ लागली.  गालाच्या बाजूने सांडणारे पाणी तिच्या मानेवरुन खाली ओघळत जात होते.

" मॅडम जरा हळू..  ठसका लागेल." पहिल्याने तिला स्पर्श करुन सांगितलं.
पानवाला तिच्या ओल्या झालेल्या कपड्यातून काही दिसतंय का हे पाहत होता. स्टॉलवाला सुद्धा त्याच प्रयत्नात होता.

ती उठून उभी राहीली.
" धन्यवाद तुम्ही सर्वांना..
तुमच्यामुळे पडूनही मला धीर आला.  हे दोघे दादा धावत आले.  मला हात धरुन उठवलं.  या पानवाल्या दादांनी मला शाब्दिक धीर दिला. आईस्क्रीमवाले आणि   पेपरवाले काका मी पडल्यावर लगेच धावत आले.  हे स्टॉल वाले तर स्वतः असे असताना माझ्यासाठी पाणी घेऊन आले.
तुमचे आभार मानू तेवढे कमीच आहेत.  "

दादा, काका अशी नाती लावल्याने सगळेच एकदम हिरमुसले.

" असे पडलेल्या माणसाला मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे..  त्यात तुम्ही लेडीज म्हणजे तुम्हाला मदतीची गरज पडणारच.  माणूसकी नावाची ही काही गोष्ट असते ना ओ मॅडम?  " दुसरा हसत हसत बोलला.

" माणूसकी ???
कसली ओ माणूसकी  ??
मला मदत करायला आलात ते ही एक बाई म्हणून ना?
का??  मदत फक्त स्त्रियांनाच लागते?  परवा याच जागेवर एक माणूस पडला तेव्हा तुमची ही मदत कुठे होती हो? त्याला तर भरपूर लागलेलं.  ढोपर फुटून रक्त येत होतं.  हाताला फ्रॅक्चर आलं होतं तोंडावर मार लागला होता.
तेव्हा कोणीही मदतीला आला नाहीत ते?  कोणी येऊन हात नाही दिलात?  कोणी येऊन गाडी नाही उचललीत?  कोणी पाणी नाही पाजलंत? कोणी घरी नेऊन सोडण्याची भाषा नाही केलीत?
आज काय झालं?  त्याच्यावर भरपूर हसलात पडला म्हणून?
उलट उपदेशाचे डोसही पाजलेत.
आज स्त्री दिसली म्हणून तुमच्यातली माणूसकी जागी झालीय का?  " तीने एका दमात बोलून टाकले.

मदतीला गेलेले सर्वजण अवाक् होऊन तिच्याकडे बघतच राहीले..
सर्वांना परवाची गोष्ट क्षणात आठवली.
याच जागी तो तरुण पडला होता.  सर्व त्याच्या पडण्यावर हसले होते.  मदत तर सोडा..  " धीरे नहीं चला सकता क्या?  तुम जैसे स्टाईलबाजोंको ऐसा ही सबक मिलना चाहिए " अशी वाक्य ऐकवली होती त्याला.  शेवटी तोच महत्प्रयासाने उठला आणि फोन करुन एकाला बोलावले,  तो त्याला येऊन घेवून गेला.
सर्वांच्या नजरेत अपराधीपणाचा भाव आला होता.

" तो माझा नवरा होता. माणूसकी होती ना तुमच्याकडे?  निदान त्याला हात तरी द्यायचा.  फक्त स्त्रियांसाठीच माणूसकी का?  पुरुषांनी काय पापं केलीत?
मला फक्त एवढंच सांगायचे होतं. विचार करा यावर ".
असं म्हणुन ती गाडीवर बसली,  स्टार्टर मारला आणि हेल्मेट घालून निघून गेली....

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असतानाच....

मागून... धडाम्..  आवाज आला..

"च्यायला ही रेती झाडूनच टाकतो आज... " म्हणत पहिला धावत गेला. त्यामागे बाकी सर्व गेले.

माणूसकी दाखवायला