Wednesday, 31 August 2016

खरेदीचा ईश्वर.....भुलेश्वर

.....  भुलेश्वर   ....

सतत गजबजलेला आणि सर्वत्र मंदिराचा दक्षिण मुंबईतला अत्यंत लोकप्रिय विभाग म्हणजे भुलेश्वर..
हा भाग मुंबईकरांचा खरेदीसाठीचा लाडका आहे म्हटलं तरी चुकीचं नाही, कारण जीवनावश्यक असणाऱ्या सर्व वस्तू या भागात मिळतात.
मुंबादेवी मंदिर...  ज्यात असलेल्या मुंबादेवी वरुन मुंबईचे नामकरण झालं तिच्या अगदी बाजूला असलेल्या भुलेश्वरला जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत.  तसा हा भाग मध्यभागी असल्याने पश्चिम रेल्वेने चर्नीरोडला उतरुन, ठाकूरद्वार सिग्नल वरुन सरळ चालत आलात की थेट कुंभारतुकडा तिठ्यावर येता तुम्ही.  कुंभारतुकड्यापासूनच भुलेश्वर सुरु होतं आता.  सिपी टँक कडूनही एक रस्ता येतो तो सुध्दा कुंभारतुकड्यावरच मिळतो म्हणजे बस किंवा टॅक्सीने येणारे याच मार्गाने भुलेश्वरला येतात.
सेंट्रल रेल्वे वरुन आलात तर मशिद बंदर स्टेशनावरुन चालत मुंबादेवीच्या शेजारुन पायधुनी वरुन भुलेश्वरला घुसता येते....
घुसता येते???  हो....  कारण दिवसाचे दहा तास इथे कायम गर्दी असते.  गर्दी अशी की एकही धक्का न लागता तुम्ही जाऊच शकत नाहीत भुलेश्वरमधून.
तर आपण चर्नीरोडकडून सुरुवात करुया..  ( कारण मी तिकडेच राहतो)
चर्नीरोडला उतरलात की पुर्वेला चर्चगेट बाजूला आणि ग्रँट रोड बाजूला दोन्ही कडे शेअर टॅक्सीवाले असतात.  आठ नऊ रुपयात ते तुम्हाला कुंभारतुकड्यात नेऊन पोचवतात.  पण हा प्रवास इतका लहान आहे की मग आपल्याला उगाच वाटतं की पैसे वाया गेले.  कारण दहा वीस मिनीटांतच आपण चालत तिथे पोहचू शकतो. ठाकूरद्वार रोड ने चालत जाण्याचा एक आनंद वेगळा आहे. स्टेशनचा पुल उतरल्यावर पारश्यांची अग्यारी दिसते.  तिथेच जरा पुढे गेलात की चंदनाचा सुगंध येतो.  अस्सल चंदन तुम्हाला इथे मिळू शकेल.  असंच पुढे पुढे जात तुम्हाला ठाकूरद्वार सिग्नल दिसेल. चारही बाजूला गोलाकार बिल्डिंग आणि मध्ये सिग्नल असा हा सुंदर सिग्नल आहे.

  म्हणजे स्टेशनकडे पाठ असेल तर डाव्याबाजूला  समोर सरस्वती निवासाची गोल बिल्डिंग ( यात राजेश खन्ना राहायचा) हीच्या खाली लिली वाईन्स, सत्कार हॉटेल आणि उजव्या बाजूला समोर पाठारे प्रभू हॉल ची बिल्डिंग तिच्या खाली ज्वेलरीचे दुकान, उजव्या बाजूला गोलाकार सनशाईन बेकरी,  डाव्याबाजूला तशीच गोलाकार चंद्रमहाल बिल्डिंग तिच्या तळाला चंदू मिठाईवाला आहे.
असं एक युनिक कॉम्बिनेशन असलेला हा सिग्नल आहे.
तो ओलांडला की उजव्याबाजूला आयडीयल मिठाई ( इथे साबुदाणा वडा आणि पियूष खुप सुंदर मिळते, पण याची खरी ओळख तर माझ्यामते केशरी पेढे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फ्या हीच आहे...  गुलाब बर्फी तर अप्रतिम). बरोबर डाव्याबाजूला गोमांतक बिस्किट डेपो आणि त्याच्या मागे जुने विठ्ठल मंदिर. तसेच पुढे डाव्याबाजूला जगप्रसिद्ध मुगभाट येते.
आजूबाजूची दुकाने बघत बघत आपण जितेकर वाडीच्या समोर येऊन पोहचतो.

  डावीकडे जितेकर वाडी आणि त्याच्यासमोर पुणेरी मिसळ उत्तम प्रकारे देणारे विनय हेल्थ होम ( मिसळ ही खासियत तर आहेच पण कोथींबीर वडी, पियूष, बटाटावडा असे एकामागोमाग एक अस्सल मराठी पदार्थ खायला तुम्हाला इथे मिळणारच) .
फणसवाडीच्या नाक्यावरच हे तिखट, झणझणीत.. विनय आहे.  फणसवाडी ओलांडली की मग सुरु होतो कुंभारतुकडा.  अवघ्या दहा पंधरा मिनीटात आपण तिथे पोहचतो. कुंभारतुकड्याच्या नाक्यावरच बाटा, स्वस्तिक आणि अजून पाच सहा चप्पल बुटांची दुकानं आहेत. भुलेश्वरची खासियत ही की दुकानाच्या आतला दुकानदार जेवढे कमवतो त्यापेक्षा जास्त त्याच्याबाहेर बसणारा फेरीवाला कमवतो. दोन चार पावलं पुढे गेलात की एक तिठा येतो. त्याचे नाव " जय अंबे चौक ". नवरात्रीत तिथे अंबा मातेचा उत्सव जोरदार केला जातो. तिथूनच डावीकडे  " मुंबई पांजरापोळ " असा काळ्या पांढऱ्या रंगाचा बोर्ड तिथे तुम्हाला दिसेल.


 या मुंबई पांजरापोळात तुम्हाला देवासंबंधी जी काही खरेदी करायची असेल ती करता येते.  वेगवेगळ्या चुनऱ्या, मुकूट, पुजेचे साहीत्य,  साड्या, खण, देवाचे दागिने...  सर्व,  त्यात आतमध्ये गोशाळा सुद्धा आहे. मण्यापासून टिकली पर्यंत आणि जोडव्यापासून मंगळसुत्रापर्यंत सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळणारच.  सोबत जरा शोधलं तर सावंतवाडीची लाकडी खेळणी सुद्धा आहेत तिथे.  पांजरापोळच्या बाजूला जी गल्ली आहे त्या गल्लीत सर्व स्टीलच्या भांड्यांचे घाऊक तसेच किरकोळ विक्रेते आहेत.  घाऊक गिऱ्हाईक म्हणून तुम्ही गेलात तर तुम्हाला वजनावर भांडी दिली जातात आणि किरकोळ ग्राहक म्हणून गेलात तर नगावर.  बाळाला दुध पाजायच्या चमच्या पासून अगदी इंडक्शन शेगडी सुद्धा तसेच स्टीलच्या हंड्यापासून अगदी मोठ्या टाकीपर्यंत तुम्हाला इथे खरेदी करता येते.
या गल्लीत न जाता तुम्ही त्याच्या बाजुच्या रस्त्याने गेलात तर उजव्या बाजूला तुम्हाला चुनरी सेंटर दिसेल.  विविध आकाराच्या, रंगाच्या आणि कलाकुसरीच्या ओढण्या आणि चुनऱ्या तुम्हाला इथे मिळतील.  किंबहुना भुलेश्वरमध्ये घाऊक आणि किरकोळ हे दोन्ही व्यवहार चालत असल्याने तुम्ही खरेदी कशी करणार आहात यावर तुम्हाला भाव सांगितला जातो.
 तुमची घासाघीस करण्याची क्षमता भुलेश्वरला पणाला लागते.  कारण बाहेर  १०० रुपयाला मिळणारी वस्तू तुम्हाला इथे ७० रुपयाची सांगितली जाते,  आणि जर तुम्ही घासाघीस केलीत तर ती ४०-५० रुपयात सहज मिळुन जाते.
चुनरी सेंटर ओलांडले की मंदिरांची एक लाईनच सुरु होते..
जैन मंदिर त्या नंतर सामुद्रि मातेचे मंदिर आणि मग लालबावा हवेली बघत बघत आपल्याला आजूबाजूला रस्त्यावरचे स्टॉल दिसायला लागतात.
मागची दुकान तीच असली तरी रस्त्यावरचे स्टॉल मात्र वेळेनूसार बदलतात.  सकाळी ५ वाजता भुलेश्वर उठतं...
भाजीपाला, फळांच्या गाड्या येतात.  सहा साडेसहा पर्यंत भाजी खरेदीसाठी लोक यायला सुरु होतात.  रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे भाजीविक्रेते टोपल्यांमधून सर्व प्रकारची भाजी विकतात.


 आजकाल फॉरेनच्या भाज्या सुद्धा इथे मिळू लागल्यात.  या भागातल्या सर्व रहिवाश्यांची जेवणाची पुर्वतयारी या भुलेश्वरच्या सकाळच्या भाजी बाजारामधूनच होते.  संपूर्ण भुलेश्वर सकाळी ५ ते ११ भाजी मार्केट बनते.  बाकी व्यवहार सकाळी ११ वाजल्यानंतरच सुरु होतात.

तर...
सुरुवातीला छोटे छोटे पिना, टिकल्या, हेअरबँड, क्लिप्स असे झाल्यावर पुढे बांगड्यांचे स्टॉल्स दिसतात.  अत्यंत कमी किंमतीत हव्या त्या डिझाईनच्या बांगड्या, आपापल्या मापानुसार ते विक्रेते पटकन काढून देतात. अगदी दहा रुपयाच्या बांगडी पासून दोन अडीच हजाराचे बांगड्यांचे सेटसुद्धा ते बनवून देतात.  या स्टॉल च्या बरोबर मागे दोन तीन डिझायनर बांगड्यांची दुकानं आहेत.  आपली साडी घेऊन यावी त्याला मॅच होईल असा बांगड्यांचा सेट ते बनवून देतात.  कमीत कमी पाचशे पासून सुरु होणारे हे सेट जास्तीत जास्त कितीही किंमतीवर जाऊ शकतात.

कारण बाहेर  स्टॉलवर मिळणारी बांगडी थंडगार एसीची हवा खाल्यावर जरा जास्तच सुंदर आणि महाग होते...  ही वस्तूस्थिती आहे..  पण प्रत्येकाच्या कुवतीनुसार जो तो विचार करतो. छान मर्सिडीज गाडीतून उतरणारी बाई जर रस्त्यावरच्या स्टॉल वर खरेदी करताना दिसली तर कसे वाटेल?
सर्वांना सामावून घेणारे हे भुलेश्वर आहे.
या बांगड्यांच्या दुकानानंतर तुम्हाला समोर दिसेल तो कबूतरखाना.

कबूतरखान्याजवळ गेलात की तुम्हाला त्या ठिकाणी समोर दोन रस्ते दिसतील...  एक उजव्या हाताकडे जाणारा रस्ता जो रामवाडी कडे जातो आणि दुसरा समोर भोईवाड्यांकडे...
आपण आधी रामवाडीकडे फिरुन येऊ....
कबूतरखान्याच्या सर्कलला असणारी दुकान पाहीली की लक्षात येतं की रस्त्यावर काहीही मिळू शकत.  अगदी मेहंदीच्या कोनापासून,  इंपोर्टेड घड्याळापर्यंत आणि लहान मुलांच्या कपड्यापर्यंत सर्व या सर्कललाच मिळतील.  अगदी डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयोगी असलेले गव्हाचे तृण सुद्धा इथे विकत मिळते. याच सर्कलला तुम्हाला वर्षभर मातीची मडकी व इतर भांडी, शेणाच्या गोवऱ्या, दिवे तवे, चुली मिळतात.

हे सर्कल चहुबाजूंनी विक्रेत्यांनी घेरलेले आहे.  हे विक्रेते तिथेच रस्त्यावर राहणारे आहेत.  त्यांची लहान मुलं तिथेच असतात..  बायका मेहंदी वगैरे विकतात आणि पुरुष बाकी वस्तू.
तर..  रामवाडीकडे जायच्या रस्त्याने गेलो की डाव्या हाताला दोन क्रॉकरीची दुकानं दिसतात.  सुंदर सुंदर काचेची भांडी बघतानाच मन भरुन येते.  अगदी त्या दुकानासमोरच रस्त्यावर कप - बशी, मग अशा वस्तू घेऊन बसलेला एकजण दिसतो.  चांगल्या  असतात त्याच्याकडे वस्तू.  दुकानात सेट पद्धतीने घ्याव्या लागणाऱ्या कप बश्या इकडे हव्या तशा घेऊ शकतो.  अगदी बोन चायनाचे सेट सुद्धा याच्याकडे असतात.
फक्त घेताना तपासून घ्याव्या कारण रस्त्यावर असल्याने त्या थोड्याफार डॅमेज असायची शक्यता असते.  बरोबर उजवीकडे लहान मुलांचे कपडे विकणारे आणि लेस वाले आहेत.

पाच सेंटीमीटर ते अगदी दोन फुट जाडीची, वेगवेगळ्या रंगाच्या, डिझाईनच्या लेस तुम्हाला एकत्र पाहायला मिळतात.  इथेसुद्धा घाऊक आणि किरकोळ पद्धतीने व्यापार चालतो.  पुर्ण रोल घेतल्यास भाव वेगळा आणि एक मीटर  दोन मीटर घेतल्यास भाव वेगळा अगदी वीस रुपये मीटर पासून पाचशे रुपये मीटर पर्यंतच्या लेस सुद्धा मिळतील इथे.  या लेस साड्यांच्या बॉर्डर आणि इतर सुशोभिकरणाला वापरतात.  ही दुकान संपली की पुढे डिझायनर ड्रेसेस आणि साड्यांची दुकाने दिसू लागतात.  या दुकानांत अगदी पाचशे पासून पार लाखापर्यंतचे जरदोसी,  मिररवर्क, केलेले अत्यंत सुंदर असे ड्रेसेस आणि उत्तम कलाकुसरीच्या साड्यांची वाईड रेंज पाहायला मिळते. लग्न आणि पार्टीच्या खरेदीसाठी ही दुकाने सर्वोत्तम म्हटली पाहीजे.  या दुकानांच्या बाहेर रस्त्यावरही ड्रेस विकले जातात पाचशे पासून दोन अडीच हजारात चांगले ड्रेस मिळतात.  मटेरियल मध्ये फरक असतोच.  या दुकानांच्या समोर रस्त्यापलिकडे एक दोन लेडीज बॅग, पर्स वाले बसतात.  अगदी लेटेस्ट डिजाइन, स्टाइल आणि माफक दरात या पर्स आणि बॅगा मिळतात.  त्यांच्या जरा पुढे नेलपेंट,  लिपस्टिक,  हेअरबँड, क्लिप्स अशा वस्तूंचे दोन तीन स्टॉल दिसतात.  तिथे असणाऱ्या वस्तू बहुतेक कॉपी असतात.  मोठ्या ब्रँडची कॉपी असते.  परंतू तरीही त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते हे विशेष.  पुढे रस्त्यावरच चप्पलांची दुकाने दिसतात.  अगदी शंभर रुपयांपासून चप्पल तिथे मिळुन जाते.  चायनाच्या चपलांसोबत मुंबईत धारावी वगैरे बाजूला बनणाऱ्या चपला तिथे ढिगांनी ठेवलेल्या दिसतात. " लाडू बेटीजी का मंदिर " नावाच्या एका चकचकीत मंदिरासमोर चप्पल बघत असताना तुम्हाला अचानक वेगळाच सुगंध येईल..
भेळपुरी, डोसे, वेफर्स आणि मसाला पापड...

हो बरोबर..  भुलेश्वरची खाऊ गल्ली..  खरंतर हिचे नाव भास्कर गल्ली परंतू खवय्यांनी तिला खाऊ गल्ली करुन टाकलं. डोसे खाणारे अनेक लोक पाहीले की आपल्याही तोंडाला पाणी सुटतं. मग आपण आपोआपच खाऊ गल्लीत घुसतो.  नाक्यावरच उसाचा रस वाला त्याच्या बाजूला डोसे वाला, पुढे पाणीपुरी, भेळपुरी,  मसाला पापड,  दाबेली असे रांगेने दहा बारा स्टॉल.
मसाला पापड हा पदार्थ या भागात फार आवडीने खाल्ला जातो.

खिचियां पापड म्हणून ओळखला जातो हा पापड.  साधारण पापडापेक्षा थोडा जाडसर पण वेगळ्या चवीचा.  त्यावर कांदा,  टॉमेटो, तिखट गोड चटणी आणि वरतून नायलॉन शेव...  देतानाच तुकडे करुन दिल्याने तो खायला सुद्धा अगदी सोप्पा.  इतर पदार्थही छान असतात पण काही जागांची एक खासियत असते ती इथे हे मसाला पापड..

खाऊ गल्लीमधून मनसोक्त हादडून झाले की पुन्हा आपण भुलेश्वर च्या बाकी सफरीला सुरुवात करतो रामवाडीकडे जाणाऱ्या या रस्त्यावर पुढे गृहोपयोगी अशी भांडी जसे की मग,  भांडी घासण्याच्या किश्या, वेगवेगळे ब्रश,  स्क्रबर,  फिनाइल, डांबराच्या गोळ्या,  अशी दुकाने पुढे सलग दिसतात.

मध्येच एखादे इमीटेशन दागिने घेऊन बसलेला फेरीवालासुद्धा दिसेल तर कुठे मध्येच एखादा फळविक्रेता सुद्धा दिसेल.  "आदर्श हॉटेल" दिसले की समजायचे इथे भुलेश्वरची ही बाजू संपली. मग पुन्हा मागे जात पुन्हा स्टॉल बघत कबूतरखान्याचा सर्कल गाठायचा.
आता भोईवाड्यांकडे जाणारा रस्ता पकडावा.  सर्कलवरच पोळपाटांचे दुकान दिसेल.  सर्व प्रकारची पोळपाट लाटणी तिथे मिळणारच..  पुर्वी त्या दुकानात फक्त पोळपाट, लाटणी, दांड्या ( नवरात्रीच्या)  याच वस्तु मिळायच्या..  परंतू आता अपग्रेड होऊन त्या दुकानात इतरही वस्तू जसे की जार, फ्लास्क, लहान मुलांचे डब्बे,  वॉटर बॉटल अशा वस्तूंची मोठी रेंज पहायला मिळते.  त्याच्या बरोबर समोर नाना सुपारीवाला नावाचे मसाले आणि सुपारीचे दुकान फार पुर्वीपासून आहे.  समोर इमीटेशन ज्वेलरीचे दागिने,  बँगल्स घेऊन विकणारे स्टॉल लागून आहेत.  कुठेतरी मध्येच लहान मुलांच्या टोप्या,  टोपरी,  स्कार्फ घेऊन बसलेला फेरीवाला दिसेल तर मध्येच एखादा दहा रुपये पॅकेट ने मुखवास विकणारा दिसेल.


दक्षिण मुंबईतले मिठाईचे एक अत्यंत प्रसिद्ध दुकान " मोहनलाल एस. मिठाईवाला " तुम्हाला दिसेल.  मोहनलालचा हलवा अप्रतिम असतो.  वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये मिळतो.  सोबतच नारळी पेढा सुद्धा जबरदस्त...  वरुन नारळी पाक आणि आत गुलकंद आणि ड्रायफ्रूट हे कॉम्बिनेशन तुम्हाला इतर कुठेही शोधून सापडणार नाही.
इथे आल्यावर तुमच्या लक्षात येईल की भुलेश्वर या नावात देवाचे नाव आहे तर भुलेश्वराचे देऊळ का नाही अजून आले.
खरंतर तिथून मागे वळून पाहीलंत तर लाल दगडातले राम मंदिर तुम्हाला कबूतरखान्याजवळ दिसेल. " श्रीराम मंदिर"  असे त्याच्या दर्शनी भागात कोरवलेले दिसते ... आता तुम्हाला दर दोन बिल्डिंगनंतर मंदिरे दिसायला सुरुवात होतील.  मुळातच हा मुंबादेवीकडे जाणारा रस्ता त्यामुळे या रस्त्यावर मंदिरे बांधली गेली आणि पुढे जाऊन त्या मंदिरांवरच बिल्डिंगी उभारल्या गेल्या.

मंदिर खाली तशीच राहीली,  वर चार पाच मजले चढले. तर काही मंदिर वर गेली आणि खाली दुकान आली. अंबा मातेचं मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, महादेव मंदिर,  पंचमुखी हनुमानाचे मंदिर, कृष्ण प्रणामी मंदिर, अशी लागोपाठ एक दोन बिल्डिंगनंतर एक अशी मंदिरे येतात.  ही सर्व मंदिरे आजही चांगल्या अवस्थेत आहेत.  पुजा -अर्चा व्यवस्थित होते.  दोन्ही बाजूची दुकाने न्याहाळत आपण पोहचतो ते जलाराम बाप्पा चौकात.  खरंतर इथेच भुलेश्वराचे म्हणजे शिवशंकराचे मंदिर आहे उजव्या बाजूला. आणि डाव्याबाजूला अगदी डावीकडे फुलगल्ली दिसते.  जुनी फुलगल्ली आणि नवी फुलगल्ली

पुर्वी इथून फुलांचा मोठा व्यवसाय व्हायचा.  गोंडा, गुलाब, सायली,  सोनचाफा अशी वेगवेगळी फुलं आणि त्यासोबत फुलांचे हार बनतात तिथे अगदी बुके सुद्धा मिळतात बनवून.  परंतू आता अनेक फुलवाले इथून दुकाने सोडून गेले.

  त्यांच्या जागी इमीटेशन ज्वेलरीची दुकाने आलीत.  फुलगल्लीमधून एक रस्ता पुन्हा मागे येऊन कबूतरखान्याजवळ येतो तर दुसरा रस्ता चांदिगल्ली मध्ये जातो.  फुलगल्लीमधून चक्कर मारुन पुन्हा जलाराम बाप्पा चौकात आल्यावर समोर दिसणाऱ्या गल्ली चे नाव आहे तिसरा भोईवाडा..
तिसरा भोईवाडा, दुसरा भोईवाडा आणि पहिला भोईवाडा.  मुंबादेवी मंदिरात जे पालखीचे भोई होते त्यांची वस्ती या भोईवाड्यांमध्ये होती.  त्यावरुनच या तिन्ही गल्ल्यांची नावे पडलीत.  आपल्याला हा क्रम उलटा वाटला तरी मुंबादेवी मंदिराकडून तो बरोबर आहे.
तिसऱ्या भोईवाडा हे सध्या मुंबईतलंच नव्हे तर संपूर्ण भारतातलं इमीटेशन ज्वेलरीचे सर्वात मोठे मार्केट बनले आहे.  संपूर्ण गल्लीत अगदी तिसऱ्या चौथ्या मजल्यापर्यंत इमीटेशन ज्वेलरीची दुकाने आहेत.  ही संपूर्णपणे घाऊक पद्धतीने काम करणारी दुकाने आहेत.  या दुकानात जाऊन खरेदी करायची असल्यास तुम्हाला किमान पाच दहा हजाराची खरेदी करावीच लागते.  कारण इथे बॉक्स टू बॉक्स विक्री होते.  नाही बोलायला लहान लहान बाकडे असलेली दुकाने प्रत्येक बिल्डिंग बाहेर आहेत.  तिथे सुद्धा पॅकेट वरच माल दिला जातो.  किमान दोन चार हजार तरी बिल बनतेच.  इमीटेशन ज्वेलरी म्हणजे अगदी बिंदी पासून बांगड्या, गळ्यातले सेट,  कानातले,  रिबीन्स वगैरे सर्व प्रकार.  या गल्लीच्या नाक्यावरच चौकाच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे बिड्स,  टिकल्या यांची दुकानं आहेत.  त्या नंतर पुढे डाव्याबाजूला चांदिगल्ली येते..
पुर्वी इथे सर्व चांदिची दुकाने असायची आता चार पाच सोडली तर बाकी सर्व इमीटेशन ज्वेलरीमय झालंय.  या चांदिगल्लीत " मोटा मंदिर " हे श्रीकृष्णाचे मंदिर आहे आत गोशाळा सुद्धा आहे.

 मंदिर परिसर भव्य आहे,  शंभर एक गाईंची गोशाळा म्हणजे पसारा केवढा असेल याचा अंदाज काढा. या गल्लीमधून पुढे गेल्यावर एक अंबा मातेचे मंदिर दिसते.  ते खाजगी मंदिर आहे.  पण सुंदर आहे.  पाच दहा पावलांवर एक " कल्हई " वाला दिसतो.  कल्हई लावणारे आज काल दिसत नाही कुठे पण हा इथे दुकान लावून बसलेला दिसतो कारण त्याच्या पलिकडे पांजरापोळ ची गल्ली येऊन मिळते..  भांड्याना कल्हई लावायला याच्याकडे भरपूर काम असते.
पुन्हा मागे वळून तिसऱ्या भोईवाड्यात आल्यावर  या मार्केटची व्याप्ती कळते..  एकावर एक चारपाच पार्सल नेणारे पाटीवाले किंवा हमाल दिसले तर मनुष्य एवढे वजन कसे उचलत असेल हा प्रश्न पडतो.  एक एका हातगाडीवर टेम्पो भरेल इतका माल नेणारे हातगाडीवाले या गर्दीतून वाट काढत कसे नेतात हे सुद्धा पाहण्यासारखे आहे.

  या दुकानांच्या समोर सुद्धा पानवाले, भेळपुरीवाले,  चणे शेंगदाणे विकणारे दिसतात. यातल्या प्रत्येक दुकानाची दिवसाची उलाढाल लाखाच्या वरच असते.  पुर्वी या व्यवसायात सिंधी आणि पंजाबी लोक मोठ्या प्रमाणात होते,  परंतू आता मारवाडी लोकांनी हा व्यवसाय काबीज केला आहे.  प्रत्येक बिल्डिंग मध्ये सत्तर ऐंशी दुकाने अशा साधारण वीस पंचवीस बिल्डिंग..
गल्ली संपताना पुन्हा एक मंदिर आहे.
समोर गुलालवाडी दिसते.  गुलालवाडी ही संपुर्ण मेटल व्यवसायाने भरलेली गल्ली आहे.  तिसऱ्या भोईवाड्यातून गुलालवाडीतून उजवीकडे वळलात की ही मेटलची दुकाने दिसतात.
दोन बिल्डिंग पार केल्यावर तुम्हाला दुसरा भोईवाडा दिसेल नाक्यावरच सरबत, ज्यूस,  वडापाव, भेळ सँडविच चे स्टॉल दिसतील गल्लीत आत घूसलात की दोन्ही बाजूला पुन्हा ज्वेलरीची दुकाने.  तिसऱ्या भोईवाड्यात किमान काही दुकाने किरकोळ विक्री करणारी दिसतात परंतू दुसऱ्या भोईवाडा मात्र संपुर्णतः घावूक विक्रीसाठीच आहे.  इथे लोकांपेक्षा हातगाड्यांची गर्दी जास्त.  याच भोईवाड्यात आंगडीयांची भरपूर दुकाने आहेत.  आंगडीया म्हणजे काय हे सोप्या शब्दात सांगायचे तर मनीआर्डरवाले...
करोंडोंचा व्यवहार एका छोट्या कागदावरुन होतो.  सर्व विश्वासाचा व्यवहार असतो.  आमचे दुकान सुद्धा याच गल्लीत आहे. या दुसऱ्या भोईवाड्याच्या शेवटी एक मंडई दिसते..." बृहन्मुंबई महानगरपालिका मंडई "


  खरंतर ही मंडई भाजीपाला आणि फळांची पण तिथेही इमीटेशन ज्वेलरीने शिरकाव केलाय.  अवाढव्य दुकाने आणि त्यांच्या शोकेस ला लावलेले दागिने बघत बघत आपण कधी गल्लीच्या बाहेर येतो ते कळतंच नाही.  बाहेर आल्यावर कळते की आपण एक चक्र पुर्ण केलंय कारण उजव्या हाताला पुन्हा फुलगल्ली दिसते.  समोरच " मोहनलाल एस मिठाईवाल्याचे दुसरे दुकान दिसते.  त्याच्या बाजूला " द्वारकादास बटाटावाला " यांचे चटई, पायपुसणे,  ब्रश, टॉवेल, इतर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दुकान दिसेल.  डावीकडे वळल्यावर समोरच " ज्वेल वर्ल्ड " नावाची भली मोठी बिल्डिंग दिसेल.  हे पुर्वीचे कॉटन एक्सचेंज..
परंतू त्यापूर्वी पुन्हा खाद्यपदार्थांचा सुवास यायला सुरुवात होते कारण पहिल्या भोईवाड्याच्या तोंडावर पुलाव, पावभाजी, डोसे, भेळपुरी पाणीपुरी यांचे ठेले दिसतात.

 पहिला भोईवाडा हा अजून रहिवासी लोकांकडेच आहे कारण एका बाजुला भांडी मार्केट ची मागची बाजू असल्याने तिथे दुकाने बनणे शक्य नाही आणि ती गल्ली सुद्धा खुप लहान आहे.
एक महत्वाची गोष्ट म्हणजे..  या तिन्ही भोईवाड्यांमध्ये तिसऱ्या चौथ्या मजल्यापर्यंत इमीटेशन पोहचले असले तरी वरच्या बहुतेक सर्व मजल्यांवर सोन्याच्या कारागिरीची कामे चालतात.
झवेरी बाजार रस्त्याच्या पलिकडेच असल्याने त्या दुकानाचे कारागिर या परिसरातच चौथ्या मजल्यावर पसरले आहेत.  धुराचे काम असल्याने ते सहसा वरच राहणे पसंत करतात.  भुलेश्वरच्या या टोकाला शेवटला असणारी गल्ली म्हणजे " फोपळवाडी " या गल्लीतसुद्धा अधिकाअधिक सोन्याच्या कामाचे कारखाने आहेत.
भुलेश्वरच्या या टोकावर " सुरती " नावाचे एक रेस्टोरेंट आहे, नेहमीच गजबजलेले..  कारण अत्यंत स्वस्त किंमतीत पोट भरण्यासाठी हे रेस्टोरेंट खरोखरच चांगले आहे...
पुरी भाजी हे इथले स्पेशल आहे.  बाकी पदार्थ सुद्धा सुरेख असतात.
कपडा मार्केट, झवेरी बाजार, भांडी मार्केट, स्टेशनरी मार्केट,  लोहारचाळीचे इलेक्ट्रिक मार्केट, क्रॉफर्ड मार्केट ही सर्व मार्केट याच्या आजूबाजूलाच असल्याने या भुलेश्वरला एक अनन्यसाधारण महत्व आहे. ...
त्यामुळेच इथल्या जागांची किंमत सुद्धा दिवसेंदिवस वाढत जाते आहे...  सध्या दोन पाय जवळ ठेवून जर तुम्ही उभे राहीलात तर...  " सव्वा लाखावर " उभे आहात असे समजावे.

तर इथे आपली भुलेश्वरची सफर पुर्ण होते.
लहानपणापासून हा परिसर फिरत असल्याने याच्या प्रत्येक कोपरा कोपरा माहीत आहे.  तरीही खुप काही सांगायचे राहीलंय...
पंचायत वाडीचे भाजीमार्केट,  भगतवाडीतले ड्रेसवाले, रविवारी भरणारे तिसऱ्या भोईवाड्यातले " धक्का मार्केट ".  हा विभाग आता गजबजाटीचा असला तरी रविवारी दुपारनंतर इथल्या वाड्यांमध्ये  शुकशुकाट असतो.  मोजकी राहीलेले रहिवाशी आणि रविवारची सुट्टी मिळालेले बंगाली कारीगर क्रिकेट खेळताना दिसतात.
पण एक आहे.  एवढ्या गर्दीत सुद्धा भुलेश्वरमध्ये एखाद्याला लागलं वगैरे तर मदतीला भरपूर माणसं येतात.

" भुलेश्वरच्या भूलभुलैयात..  माणूसकी अजूनही तिची खास जागा राखून आहे "

हा लेख प्रतिलिपी.कॉम वर उपलब्ध आहे
http://mr.pratilipi.com/biz-sanjay/bhuleshwar

- बिझ सं जय ( ३० ऑगस्ट,  २०१६)  

Saturday, 20 August 2016

स्पर्श-सुख

.... स्पर्श-सुख....


कालची ती मुलगी आठवली की असली झिणझीणी अंगात येत होती की विचारता सोय नाही. एकदम कोवळी पण गच्च भरलेली. लांबून येताना दिसली तसा रस्ता ओलांडला. ती तिच्या मोबाईलवर गुंग... हसत होती, खिदळत होती चालताना तिच्या शरीराची होणारी हालचाल पाहून आजूबाजूचे लोक बघत होते. लाल रंगाचा टाईट टि शर्ट तो सुध्दा लो नेक.. खाली निळ्या रंगाची जीन्स.. एकदम प्रमाणबद्ध शरीर. अगदी दोन हातावर आली ती. ...
मी उजवा हात थोडा बाहेर केला आणि डावीकडे बघत तिच्यावर आदळलो...
" सॉरी अंकल... एक्स्ट्रीमली सॉरी.. "
इतकं बोलूनच ती पुढे चालू.
मी " ओके बेटा " म्हणालो.
ती पुढे गेली...
मी मात्र तिचा स्पर्श आठवू लागलो. गरम आणि गुबगुबीत स्पर्श.... भरलेल्या शरीराचा उबदार स्पर्श....
बायको जाऊन नऊ वर्ष झाली होती. अचानक आजारपण आणि तिचा मृत्यु. मुलं मोठी होती. त्यामुळे पुनर्विवाहचा विचार केला नव्हता. मुलं हॉस्टेलला परत गेली..
पहिली दोन वर्षे.. तिच्या आठवणीत गेली, परंतू नंतर तिच्या स्मृती पुसल्या गेल्या.
तिचे शरीर आठवू लागले. शेजारी कुटूंब होते त्यांच्याकडे पाहायचो. त्यांच्या घरातल्या स्त्रिया पाहून कसनुसं व्हायचं. सर्व काका म्हणत पण मी एवढाही वयस्कर नव्हतो.
अशाच मनःस्थितीत एकदा भाजी आणायला मार्केटला गेलो असताना, एकीचा धक्का लागला. दोन वर्षांनी स्त्रीचा स्पर्श होता तो. अंगातून लहर उठली. तो स्पर्श अजून हवाहवासा वाटू लागला. ती बाई तिथून गेली होती. मग दुसरी दिसली. भाजी बघण्याच्या निमित्ताने तिलाही स्पर्श केला. तिला कळले ही नाही.
त्यादिवसापासून रोज दोन वेळा मार्केटला चक्कर.. हातात कापडी पिशवी आणि पायामध्ये चामडी चप्पल म्हणजे सभ्य असण्याची निशाणी. सकाळी भाजी खरेदीसाठी येणाऱ्या बायका आणि संध्याकाळी इतर वस्तू खरेदीसाठी येणाऱ्या बायका, मुली आणि तरुणी. हा नित्यक्रम झाला. वयामुळे आणि अवतारामुळे कोणाला संशय सुद्धा यायचा नाही.
प्रत्येक स्त्रीचा स्पर्श वेगळा..
तरुणी असेल तर तिचा तो अवखळ स्पर्श मनाला आणि शरीराला गुदगुल्या करायच्या.
पोक्त बाई असेल तर तिचा तो मॅच्युअर स्पर्श. त्यात शांतपणा असायचा.
लहान मुलींच्या स्पर्शाबद्दल एवढं काही वाटायचं नाही.
एक दोन वेळा विकतचं स्त्री सुख घ्यायला गेलो सुद्धा, पण तिथला तो गलिच्छपणा आणि हैदोस मनाला पटला नाही. शिवाय पैसे देऊन मिळणाऱ्या सुखात काही गंमत नव्हती. त्यापेक्षा हे फुकटात मिळणारे स्पर्श-सुख स्वर्गासमान होते.
आज सकाळी दोन - तीन झाल्यावर. संध्याकाळी ती मुलगी गाठायचा प्रयत्न करायचा ठरवले.
सिग्नल ओलांडताना अजून एक दुसरी तरुणी दिसली, तिचा ओझरता स्पर्श झाला. पण ती चिडली...
" दिखता नहीं क्या.. अंकल...
बुढ्ढा साला.. "
तिचे शब्द ऐकून न ऐकल्यासारखं करुन पुढे गेलो. मध्येच एका मुलाला घेऊन जाणारी बाईला समोरासमोर धडकलो. ती तिच्या विवंचनेत. लक्ष भलतीकडे.. मला संधी. डावीकडे बघत असण्याचा नेहमीचा अभिनय लागू पडला.
" सॉरी काका.. लक्ष नव्हते... "
मी गालातल्या गालात हसलो.
पुढे गेलो. समोरुन ती कालची मुलगी येत होती. आज डोळ्याला गॉगल, हिरव्या नारंगी रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची लेगिंग्ज. आज तिला समोरुनच स्पर्श करायचं ठरवलं.
आता... आता... आता..
डावीकडे पाहीलं... स्पर्श होणार तोच.....
डावा हात कोणीतरी मागून पकडला. मागे वळून बघणार तोच मानेवर जोरदार फटका लागला.
एकदम झालेल्या हल्ल्याने... घाबरलोच. तीस वर्षाचा तरुण असेल...
" काय काका? मज्जा येतेय? लोकांच्या आई बहिणी काय रस्त्यावर पडल्यात काय?
साले भिकारचोट लोक तुम्ही वय तरी बघा... "
सण्णदिशी मुस्कटात लावली त्याने.
तिरबिरलो... समोर अंधार पसरला क्षणभर.
" जास्त खाज आल्याय म्हाताऱ्याला. ओ ताई... गेले दोन दिवस हा म्हातारा तुम्हाला धक्का मारतोय हे तुम्हाला कळत नाही का? किती घुसाल त्या फोन मध्ये. "
ती घाबरलीच " अय्या.. हो की हो.. दोन दिवस यांचा धक्का लागला मला. मला काय माहीत मुद्दाम मारतात ते? "
आजूबाजूचे लोक जमू लागले. अद्वातद्वा बोलत होते. एकाने पुन्हा कानाखाली मारलं. तारे चमकले डोळ्यासमोर.
" मारो मत... मारो मत... ऐसे लोगोंको पुलिस के हवाले कर देना चाहिए " गर्दीतला एक आवाज.
" काही शरम वगैरे नाही पहा कसा बघतोय.. निर्लज्ज " बाईचा आवाज.
" या अशा लोकांना तुडवलंच पाहीजे... हेच पुढे जाऊन लहान लहान मुलींवर बलात्कार करतात. ... मारा भडव्याला ".
बखोट पकडलेल्या त्या तरुणाने मुलीला सांगितलं..
" दोन दिवसाचे दोन कानफडीत मारा याच्या.. पोलिसांच्या यायच्या अगोदर "
ती पुढे सरसावली. गॉगल काढला तो टीशर्ट च्या पुढच्या भागात छातीजवळ अडकवला.. छातीची हालचाल झाली.
तिला लक्षात आलं की मी तिच्या छातीकडे पाहतोय.
सट्टाक....
" अरे निर्लज्जा एवढा मार खाऊनही तू तिथेच बघतोयस?
हरामखोर रे तू.. घरात बाई नसणार म्हणून हा बाहेर शेण खात फिरतो बहुतेक... "
सट्टाक.... दुसरी कानफडीत...
तरुणाने हात खेचला...
" चला पोलिस स्टेशनला... तिथे तुझी धिंड काढतील हवालदार.. "
" जाऊ दे ना साहेब... चुक झाली... " मी कळवळून.
" चुक?? भाड्या सिग्नल पासून मी तुझ्या मागे होतो.. एका बाईला की मुलीला तू सोडलं नाहीस... कसले हे घाणेरडे छंद.. या वयात? " तो मला ओढत होता.
नेमका समोरुन हवालदार येत होता..
" काय झालं रे? "
साहेब.. हाच तो परवा बोललो नाही का धक्का वाला.. आज रंगे हाथ पकडला.. या ताई कंप्लेंट द्यायला तयार आहेत. मी सुद्धा येतो..
ही किड ठेचलीच पाहीजे. "
हवालदाराने एकवार पाहीलं..
साट्टकन एक ठेऊन दिली.. नाकातून रक्त यायला लागलं..
चल भाड्या तुला आज माझ्या हाताचा स्पर्श - सुख देतो..
संध्याकाळी शेजाऱ्याने सोडवलं तेव्हा घरी गेलो. चाळीत सर्व वेगळ्या नजरेने बघत होते. बायका तर रागानेच. पुरुष मंडळी हसत होती.
घरात गेलो... दरवाजा बंद केला.. अंगावर आलेल्या वळांना स्पर्श केला...
त्या स्पर्शात ते सुख नव्हते फक्त दुःख होते... कधीही न संपणारे
- बिझ सं जय ( २० ऑगस्ट, २०१६)

Friday, 19 August 2016

महेश

.... महेश ....
पेन्सिल, रब्बर, चॉकलेट, पेन, रिफील, फुलस्केप, पेनाची शाई भरायची असली तरी आम्ही महेश च्या दुकानात धाव घ्यायचो.
तीन फुट लांब, तीन फुट रुंद एवढंच त्याचे दुकान. या एवढ्याश्या दुकानात आपल्याला हवी असलेलीच वस्तू तो कसा ठेवत असेल याचं कुतूहल तेव्हा भयानक होतं.
कधी महेश नसला तरच आम्ही काका बोकाकडे जायचो, नाहीतर महेश कडे ती वस्तू सापडायचीच. त्याच्या दुकानातून मी हमखास एक वस्तू घ्यायचो...
चॉकलेट गोल्ड कॉईन.. बाकी कुठल्याही दुकानात ते मिळायचेच नाही. एका रुपयात एक कॉईन.
एवढ्या छोट्याशा दुकानात त्याने विंडो शॉपिंग करायला सुद्धा व्यवस्था केलेली होती. दुकानात आत जाणाऱ्या भागाला त्याने शोकेस बनवून घेतली होती. त्या शोकेस मध्ये.. खेळण्यातल्या लहान लहान गाड्या, व्हिडीओ गेम ( ९० -९२ साली या ब्लॅक न् व्हाइट गेम ची भयानक क्रेज आम्हा मुलांमध्ये होती), वेगवेगळे शो- पीस असायच्या.
शाळेत जाताना येताना त्याच्या दुकानातून काही ना काही घेणे व्हायचेच. मग ते १ रुपयाच्या ४ चिंच गोळ्या असो किंवा मग गंगा सुपारी. घरुन प्रत्येक शनिवारी १० रुपये खर्चाला मिळायचे.. पॉकेटमनी म्हणून. त्यातले ६ रुपये महेश च्या दुकानातच खर्च व्हायचे.
बरं कधी कधी तो एखादी गोळी जास्त सुद्धा द्यायचा, मग तिथून गुपचूप सटकायचो.. वाटायचं की चुकुन दिली असणार पण नंतर नंतर समजले की तो मुद्दाम प्रेमाने द्यायचा.
छान अर्ध टक्कल, चौकटींचा साधारण ढगळा शर्ट, जीन्स, नाकावर प्लॅस्टीक चा मोठा चष्मा. दुकानात आत बसायला जागा नसायची म्हणून तो बाहेरच टेबल टाकून बसायचा. त्याच्याच मागेच एक स्टोव्ह रिपेयर करणारा मुस्लिम चाचा. त्याचे आणि याचे नेहमी काही ना काही सुरु असायचं. दरवाजा इधर करो.. सामान अंदर लो. दुकानात गेलो की त्यांची बडबड ऐकायला मिळायची. महेश आपला म्हणून त्या स्टोव्ह वाल्याचा आपल्याला भरपूर राग. मराठी शाळेत असल्यामुळे प्रोजेक्ट वगैरे फारसे नसायचे त्यामुळे चित्र वगैरे कधी घ्यावी लागली नाही, पण तरीही ती नुसती बघायला मिळावी म्हणून उगाच त्याला काढायला लावायचो.
आम्ही सहावीला असताना WWF ची भयंकर लाट आली होती आम्हा मुलांमध्ये. २ नंबरचा अंडरटेकर सर्वांचा आवडता. त्याची चित्र मात्र विकत घ्यायचो त्याच्याकडून. घरी कपाटात मिळेल त्या जागी अंडरटेकर असायचा. अगदी फ्रिजवर सुद्धा अंडरटेकर चिकटलेला. संक्रांतीला तर १ रुपयाचे पतंग नेऊन नेऊन उडवायचो. बाबांकडून पतंगींसाठी पैसे मिळाल्यानंतर हाताला गुंडाळून दिलेला तो १० रुपयाचा मांजा न गुंतवता सोडायचा फार मोठं काम असायचे. संक्रांतीच्या आदल्या दिवशी मांजा भरुन घ्यायला त्याच्याकडे भरपूर गर्दी असायची. इतकी गर्दी की फुटपाथ पुर्ण भरुन जायचा. दोन कोडी रॉबर्ट, पाच तोळा मांजा घेतला की आमची संक्रांत संपायची.
दोन दुकानानंतर शाखा.. शाखेमधली सुद्धा माणसं तिथे असत.
हा माणूस इतका हसतमुख असायचा की कोणीही त्याचा राग करणारच नाही. दिवसातून चार फेऱ्या दुकानासमोरुन व्हायच्या. प्रत्येक फेरीला दोन मिनीटे थांबून त्या व्हिडीओ गेम मधले ऑटोमैटिक चालणारी चित्र बघणे हा छंदच आमचा. कधीतरी आईस हॉकी असे तर कधी ब्रीक गेम. मित्र कधी कधी घ्यायचे त्याच्याकडचे गेम. आम्हाला पैसे कमी पडायचे. मग विंडो शॉपिंग करत असताना कधीतरी तो गेम हातात द्यायचा खेळायला. तेव्हा मग हौस पुर्ण होत असे.
एक दिवस मात्र अचानक दंगे सुरु झाले. हिंदू मुस्लिम आपापसात मारामारी करु लागले. आमचा एरिया हिंदू बहुल त्यामुळे असणारे मुस्लिम एकदम गायब झाले, तो स्टोव्ह वाला चाचा सुद्धा यायचा बंद झाला.
एरियात कर्फ्यू लागलेला असला तरी लोकांना फिरुन द्यायचे. दंगेखोर किंवा गटागटाने आलं तरच पोलिसांचा गोळीबार व्हायचा. आमच्या बिल्डिंगच्या समोर असलेली गाडी तोडून फोडून जाळायचा प्रयत्न केलेला मी स्वतः बघितलेला. धोबीघाटात मुस्लिम भरपूर असल्याने तिथे भरपुर धुमश्चक्री चालायची....
अशाच एका सकाळी बाबा बातमी घेऊन आले की, महेशचं दुकान फोडलं.. सर्व सामान चोरुन नेलं लोकांनी. हिंदू -मुस्लिम काय असतं हे समजण्याचे वय नसताना निव्वळ महेश चे दुकान फोडलं म्हणून मुस्लिम लोकांना शिव्या दिल्या.
दुपारी मित्राकडे जातोय सांगून दुकान बघायला गेलो.. दुकानातल्या फळ्या रस्त्यावर जळत होत्या. काचांचा सडा फुटपाथवर पसरला होता. नेहमी खुणावणारे व्हिडीओ गेम गायब होते. चॉकलेट कॉईन तुडवलेले दिसत होते. फार राग आला, बाजूच्या चाचाचे दुकान सुद्धा फोडले होते. त्यावेळी असाच विचार की, महेश चे दुकान मुस्लिमांनी फोडलं म्हणून हिंदूंनी चाचाचे दुकान फोडलं.. बरं झालं.. मित्राकडे गेलो तेव्हा तिथेसुद्धा दंगलीचीच चर्चा सुरु होते.
मी विचारले महेशचे दुकान कोणी फोडलं ओ?
आलेल्या उत्तराने मी नखशिखांत हादरलो.
" हिंदूंनी फोडलं.
महेश कसला रे महम्मद तो. "
इतके दिवस महेश.. महेश करताना कधीही जाणवलं नव्हते की महेश मुस्लिम आहे आणि त्याचे खरे नाव महम्मद आहे...
८० हजाराचे नुकसान झाले असा अनधिकृत आकडा काकांकडून मिळाला होता.
दंगे शांत झाले. शाखा सुद्धा शांत झाली. काही दिवसांनी महेशच्या दुकानाचे काम सुरु झाले. फळ्या लागल्या, शो-केसमध्ये पुन्हा व्हिडीओ गेम दिसू लागले. सगळ्या वस्तू हळूहळू दुकानात यायला लागल्या.
नाही आला तो महेश..
त्याची बायको यायची. दुकान उघडायची... काकांना एक दिवस विचारलं की महेश का येत नाही??
" अरे तो आजारी आहे. झालेले नुकसान त्याला पेलले नाही. त्याच्यासोबत असलेल्या लोकांनीच त्याचे दुकान फोडले याचा धक्का त्याला सहन नाही झाला. "
त्याची बायको बघितल्यावर लक्षात आलं की तो मुस्लिम होता. महेश नव्हता तर तो महम्मद होता.
काही दिवसांनी दोन तीन दिवस दुकान उघडलेच नाही. चौथ्या दिवशी...
फळीला महेशचा फोटो टांगलेला होता.
महेश चा महम्मद होणे त्याच्या हृदयाने स्विकारले नाही.
ते बंदच पडले...
ज्या हृदयाने आम्हाला इतके प्रेम दिले त्याला आमच्याच माणसांनी बंद व्हायला भाग पाडले.
आज ही महेशचे दुकान हे महेशचे दुकान म्हणूनच ओळखलं जातंय. पण तिथे महम्मदही नाही आणि महेशही नाही.
त्याच्या फोटोतून तो आजही आम्हाला सांगतो की मी सुद्धा तुमचाच होतो... तुम्ही ओळखायला चुकलात.
- बिझ सं जय ( २० ऑगस्ट, २०१६ )

Wednesday, 17 August 2016

ओपन रिलेशनशिप

... ओपन रिलेशनशिप ....
याची सुरुवात कधी झाली ते आता आठवतही नाही. तसे आम्ही शाळेपासूनचे मित्र - मैत्रीण. तो जरा जास्तच स्मार्ट. नववी दहावीत असल्यापासून मला तो आवडायला लागलेला. पण तो एका फुलावर बसणारा नव्हता.. भवरा होता.
जयेश माझा बेस्ट फ्रेंड होता तरीही त्याने माझ्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवलेल्या. कॉलेजला सुद्धा एकत्र होतो. तिथे तो एका मुलीच्या प्रेमात पडला. मला जेव्हा बाहेरुन हे समजलं तेव्हा चीड, राग, मत्सर अशा सर्व भावना एकत्र दाटून आल्या. ती इतकी सुंदरही नव्हती. जयेश च्या घरुन त्यांच्या लग्नाला विरोध झाला. जयेश चे कुटूंब कर्मठ.. त्याला वाटत होते की आपण घरच्यांना समजवू पण त्यात तो कमीच पडला.
एका दिवशी तिने लिहिलेलं पत्र जयेश च्या हातात कोणीतरी आणून दिलं. मी होती तेव्हा सोबत. तो वेड्यासारखा धावत तिच्या घरी गेला. मागून मी..
तिचा निष्प्राण देह पलंगावर शांत निजला होता.
मला मिठी मारुन तेव्हा तो भरपूर रडला. सर्व आटपून घरी गेला आणि त्याक्षणी त्याने ते घर सोडले. एकूलता एक मुलगा. स्वतःच्या हट्टीपणामुळे घरातून गेला याची हाय खाऊन लवकर त्याचे वडीलही गेले.
आर्टिस्ट असलेल्या जयेशने मग कलेप्रती संपुर्ण जीवन वाहायचं ठरवलं.
दरम्यान माझे लग्न झाले. मनासारखा नसला तरी संसार सुरु होता. नशिबात सुख नसलं की कुठेही सुख नाही मिळत हेच खरं. अचानक पोटात दुखायला लागलं म्हणून तपासणी केली तर गर्भाशयला गाठ..
पुर्ण गर्भाशय काढावे लागले. साहजिकच अगोदरच मनापासून संसारात न रमल्याने मीच घटस्फोटाचा पर्याय नवऱ्यासमोर ठेवला. त्यानेही सारासार विचार करुन तो निर्णय स्विकारला.
मी पुन्हा काम सुरु केलं. आर्ट्स शिकता शिकता मी मेकअप आणि हेअर स्टाइलिंग शिकून घेतलं होतं. लवकरच चांगली कामं भेटू लागली.
अशाच एका शुट मध्ये... कॅमेऱ्यामागे जयेश दिसला.
" आयला स्वाती.... तू?
कशी काय पकडलीस ही ट्रेन? मी सडाफटींग.. पण तुझा तर संसार...
बोलता बोलता त्याचे लक्ष गळ्याकडे गेले. मंगळसुत्र नाही हे बघून तो चमकलाच...
" काय झालं? "
" सांगते पॅकअप झाले की.. " सांगून त्याला थोपवले.
पॅकअप झाल्यावर कॉफी पिताना सर्व स्टोरी सांगितली.
" सो सॅड.. " म्हणून तो चुकचुकला.
" बरं मला सांग, तू काही विचार केलास की नाही? " मी सहजच विचारलं.
" माझं प्रेम.. गोळ्या खाऊन कधीच गेलंय... आता जगतोय तिच्या आठवणीत. पोटाला हवंय म्हणून काम करतोय. काम चांगलं होतंय.. म्हणून नाव होतंय "
तितक्यात एक एक्स्ट्रा म्हणून काम करणारी मुलगी बाजूने गेली याच्याकडे बघत. त्याची नजर झटक्यात बदलली.
मी समोर आहे हे त्याच्या लक्षात आलं म्हणून लगेच सावरला.
पुढे भेटीगाठी होत राहील्या. पुन्हा लग्न करण्यात त्याला काही इंटरेस्ट नव्हता हे मला त्याच्यासोबत बोलताना जाणवतंच होतं.
तो एकटा... मी सुद्धा एकटीच..
वरचे वर भेटू लागलो. हळूहळू जवळीक वाढली. मला तो आवडत होताच पुर्वीपासून. त्याच्या बाहुपाशात जाताना मला कसलाही संकोच नव्हता. पुढे मागे तो माझ्यासोबत वैवाहिक जीवन जगेल या आशेवर मी होते.
एकाच खोलीत राहत असल्याने हळूहळू त्याच्या बदललेल्या वृत्तीचा अनुभव यायला लागला.
..स्त्री म्हणजे निव्वळ शय्यासोबत करायला हवी असणारी वस्तू..
हीच त्याची धारणा होती. तो माझ्यासोबत रममाण होत असताना त्याच्या डोळ्यात मात्र मला ती दिसायची.
माझी शारीरिक गरज तो भागवत होता, परंतू मानसिक गरज अजिबात नाही. त्याला मुक्त रहायचे होते.
ओळखीचे लोक तोंडावर काहीच बोलत नव्हते परंतू मागे भरपूर बोलले जात होते. जयेशबद्दल मला सुद्धा बाहेरुन वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत. आज या बाई बरोबर होता. उद्या त्या एक्स्ट्रा सोबत लॉज वर गेलेला. भरपूर काही...
एके दिवशी सहज त्याचा मोबाईल हातात आला. त्याने इतर स्त्रियांसोबत केलेले डर्टी चॅट सुद्धा होते आत. तो आला तेव्हा त्याला प्रश्न केला...
" किती आहेत रे, अशा तुझ्या मैत्रीणी... "
आलेले उत्तर ऐकून मी सुन्न झाले...
" तुला धरुन... ८ "
" मला धरुन?????????
म्हणजे मी सुद्धा त्यातलीच एक का?
म्हणजे आपल्यात जे काही आहे ते काय आहे जयू?? " माझा आवाज चढला.
तो हसत बोलला " ए वेडे... तू काय प्रेमात वगैरे पडलीस की काय माझ्या?
तुला आणि मला एकमेकांची गरज आहे म्हणून आपण एकत्र आहोत. माझे प्रेम आणि आयुष्य २० वर्षांपुर्वीच तिच्या सोबत गेलंय.
मला माहीत आहे तुला मी आवडायचो. तू एकटी पडलीस म्हणून आपण एकत्र आलोय ते आपापल्या गरजा पुर्ण करायला. आपण लग्न नाही केलंय... करणारही नाही.
We are in an OPEN RELATIONSHIP..
कळतंय का? "
मी ते ऐकतंच राहीले...
म्हणजे जो वर गरज आहे तोवर मी याच्यासोबत.. गरज संपली की मी याच्या आयुष्यातून बाहेर..?
- बिझ सं जय (१७ -८-२०१६)

Monday, 15 August 2016

गावंढळ

.... गावंढळ ....

चहापाण्याचा कार्यक्रम होता तेव्हा आलेल्या मुलाला बाबांनी नेहमीचा प्रश्न केला.
" मुंबईत खोली आहे का? "
 या प्रश्नावर येणारे उत्तरच माझा जोडीदार ठरवणार होते.

मुंबई... या शहराबद्दल माझं आकर्षण पहिल्यापासून. मुंबईतून येणारी मे महिन्याच्या सुट्टीत येणारी मुंबईची राहणारी मुलं बघितली की, त्यांचा काय हेवा वाटे मला. गावी असताना ती सर्व आमच्यासारखेच असत. पण मुंबईला गेल्यावर वर्षभरात ती पुर्ण बदलून जात. ऊनाने रापलेला त्यांचा रंग अगदी गोरा गोरा दिसे. ते सांगत त्यावरुन त्यांना नुसता आराम होता. पाणी भरायला विहीरीवर जायला नको की गुरांच्या पाठीमागे दिवसभर रानात फिरायला नको.
त्यांचे वागणे बोलणे बघून मलापण वाटायचं की आपणसुद्धा मुंबईला जायला पाहीजे, पण माझे आई-बाबा होते गरीब. शेतीची कामं संपली की बाबा मुंबईला जायचे नोकरीला. तिकडे गाववाल्यांची खोली होती, तिकडेच राहायचे. खोलीत ३० - ४० जण राहायचे. मे महिन्याच्या सुट्टीत बाबा आठ दहा दिवस मुंबईला न्यायचे तेव्हा मुंबई फिरवायचे. गेटवे ऑफ इंडिया, राणीचा बाग, चौपाटी, म्हातारीचा बुट दाखवायचे. तिकडे बाकीची लहान लहान मुले मुली दिसायची तेव्हा त्यांचा हेवा वाटायचा. किती गोरी गोरी असायची ती. कपडे पण वेगवेगळ्या रंगाचे, सुंदर डिझाईनचे नीटनेटके कडक इस्त्रीचे कपडे बघून तेव्हाच ठरवलेलं की आपण मुंबईलाच रहायला यायचं.
वय वाढलं तसं माझ्या लग्नाचा विचार घरी सुरु झाला.
मला बाबांनी विचारलं तेव्हाच त्यांना सांगितलं.
" मुंबईत घर असलेलाच नवरा हवा मला, बाकी कुणाशीही मी लग्न करणार नाही. "
आईने किती समजावलं पण मी नाही ऐकलं. मी मुंबईला घर असणाऱ्या मुलाशीच लग्न करणार ही काळ्या दगडावरची रेघ होती माझ्यासाठी.
आलेला मुलगा दिसायला चांगला होता. सोन्याचा कारीगर होता. महिना वीस पंचवीस कमवत होता. पण मुंबईत घर नव्हते.
बाबांनी तोंडावरच नकार कळवला.
सुमी एक दिवस बोललीच.
" काय गं नाटकं तुझी..
मुंबईच्या घराची. चांगली चांगली मुलं गेली तुझ्या नखऱ्याने. परवा तुला बघायला आलेला, त्याने बाबांकडे माझ्यासाठी मागणं घातलंय. मला तर तो चांगला वाटला. मी तर बाई होकार कळवणार आहे. "
तिच्यावर हसत मी मोठ्या तोऱ्याने बोलले.
" तू रहा इकडेच, विहिरीवरुन पाणी भरत, गाईचं शेण काढत आणि उन्हातून फिरत काळी होत.. मी बाबा मुंबईला जाईन. "

काही महिने गेले..
आणि तो आला. मुंबईला घर, गावी घर पण फक्त सुट्टीतच गावी येणारा. दिसायला एवढा चांगला नव्हता पण तो मुंबईवाला होता हेच माझ्यासाठी भरपुर होतं.
त्याला मी पसंत आली. मुंबईला घर आहे याची खातरजमा मामांनी करुन घेतली म्हणून मी सुद्धा होकार कळवला.
लग्न गावीच करुन दहा दिवसांनी मुंबईला गेलो सर्व. मुंबईचे घर खुपच लहान होते. सासू - सासरे एक दिर आणि आम्ही दोघं. वन रुम किचनच ते. किचनला पडदा लावून आमचा संसार सुरु झाला. पण एवढ्या छोट्याशा खोलीत नविन जोडप्याला काय डोंबलाचा एकांत मिळणार?
आमची होणारी घुसमट सासरेबुवांच्या लक्षात आली. त्यांनीच समोरुन यांच्यासोबत विषय काढला
" तुम्ही दोघं आपल्या विरार च्या खोलवर जा. तासभराचा प्रवास करावा लागेल तुला. "

आम्ही लगेच तयार झालो. एका रविवारी जाऊन खोली बघून आलो. स्टेशनपासून लांब रिक्षाने जायला लागलं. दोन दिवसात सामान जमवाजमव करुन पुढल्या रविवारी राहायला गेलो.
तिथे गेल्या गेल्या कळलं, की पहिल्या घरासारखी पाण्याची लाईन वगैरे नाही या नविन घरात. डोंगरात एक आदिवासी पाडा होता. त्यांना पैसे देऊन पिण्याचे पाणी घ्यावे लागतं. बाकी आंघोळीला वगैरे टँकर मागावायचे सोसायटीवाले.
म्हणजे रोज पुन्हा ते पाणी भरणं सुरुच झालं. त्यात ही खोली चौथ्या मजल्यावर.
पाणी भरुन भरुनच अर्धा दिवस जायचा. पुन्हा तिथेही भांडण. पाड्यातल्या बायका अंगावर धावून यायच्या, कधीतरी मारामारी सुद्धा. उन्हातून पाणी भरताना गावातले दिवस आठवायचे.
नवरा जो सकाळी जायचा तो रात्रीच यायचा. दोन तीन तासांचाच सहवास मिळायचा.
शिमग्यात गावी गेलो तेव्हा सुमी दिसली. चांगली अंगाखांद्याने भरली होती. तिचा नवरा सोबत होता... मी नाकारलेला.
दोघंही भरपूर आनंदी दिसत होते.
सुमीने मला बाजूला घेऊन सांगितलं..
" आम्ही पण येतोय मुंबईला, ह्यांच्या शेठची एक खोली आहे. पगारातून पैसे कापून घेणार आणि मग खोली आमच्या नावावर होईल. "
मला तिच्याबद्दल असूयाच वाटायला लागली. मी नाकारलेल्या मुलासोबत ती सुखी होती. मुंबईला जाऊन राहणार होती, विरार - नालासोपाऱ्याला नाही.

पुन्हा मुंबईला आल्यावर मी यांना विचारलं
" आपल्याला नाही का घेता येणार मुंबईत खोली? सुमीच्या नवऱ्याला घेता येते मग तुम्हाला का नाही? "

तर ते म्हणाले..
" भरपूर पैसे लागतात त्यासाठी. त्यांना चांगला शेठ मिळाला म्हणून खोली दिली. मी कंपनीत कामाला मला कोण देईल अशी मुंबईत खोली. ही खोली पण बाबांनी पतपेढीतल्या कर्जावर घेतलेली माझ्या नावावर, जुनी खोली विकून बारक्याला पण नालासोपाऱ्याला खोली घेऊन देणार आणि मग गावी जाऊन आराम करणार ते "
मी समजून चुकले की आता आपली या वनवासातून सुटका नाही. माझी सर्व स्वप्न कधीच भंग पावली होती. मुंबईला जाऊन मुंबईकर होण्याऐवजी मी विरारकर झाले होते.
अशातच यांच्या कंपनीची कसलीशी पार्टी होती. सर्वांना सपत्नीक यायचं होतं म्हणून हे मलासुद्धा घेऊन गेले.
एका मोठ्या हॉटेलात पार्टी होती कंपनीचे मॅनेजर, बाकीचे ऑफीसर त्यांच्या बायकांसोबत येत होते. सर्वांना भेटत होते. यांनी माझी ओळख करुन दिली.
" चांगली आहे रे तुझी बायको " असे चांगले चांगले लोक माझ्याबद्दल बोलत होते.
जेवण सुरु झालं तेव्हा टेबलावर समोर काटे चमचे आले. मला त्यांची अजिबात सवय नव्हती.
मी हातानेच खायला सुरुवात केली. समोर बसलेली मॅनेजर ची बायको पटकन तिच्या शेजारच्या बाई ला म्हणालेलं मी ऐकलं...
" ती बघ गावंढळ.. हाताने खातेय... "
खरंच मी इतक्या वर्षात मुंबईकर होण्याच्या नादात स्वतःकडे बघायची राहीलीच होती.
गर्दीच्या ट्रेन मधून उतरुन घरी गेल्यावर सरळ आरशासमोर गेली.
स्वतःला बघीतले.. मी जास्तच सावळी दिसत होते. गावी असताना होती त्यापेक्षा जास्त. आरामाचा विचार करता करता.. मी जास्तच गावंढळ झाले होती. ....
सुमी मात्र गावात राहून हळूहळू मुंबईकर झाली होती.

Tuesday, 9 August 2016

वेडी

... वेडी ...

आज पुन्हा फाडायला पुर्ण पुस्तक दिले होते मामाजीनं.  मी त्यातल्या एकूण एक कागदाच्या चिंध्या चिंध्या केल्याशिवाय शांत बसणार नव्हते.  मी फुटपाथच्या कडेवर बसली..  पाय लांब सोडून.  परवा समोरच्या बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरच्या भाभीने टीशर्ट दिला होता त्याची खालची कड कापून माझ्या मापाचा केला होता मी.  स्कर्ट म्हणून जी लुंगी होती तीच होती.  त्याच लुंगीत ते पुस्तक ठेवलं आणि टर टर पान फाडायला लागली...

-प्रत्येक टर टर आवाजाबरोबर मला माझा फाटणारा ब्लाऊज आठवत होता. ..

तिकडून तो कुत्रा फिरवणारा माणूस आला.  त्याच्या कुत्र्याचा मला खुपच राग.  घराच्या समोरुन जाताना सुद्धा माझ्यावर भुंकायचा.  कुत्रेवाला तरी त्याला मुद्दाम माझ्या जवळ आणायचा.  मी शिव्या द्यायचे हे बघून त्याला आणखीनच चेव यायचा.  तो नुसता हसायचा.
मग मी त्याला शिव्या दिल्या की तो निघायचा तिथून....
मी मग पाने फाडायची...  टर्र ss टर्र ss..
मग विचार केला. ..  सर्व पुस्तक आताच फाडलं तर दुपारी काय फाडू?  जेवढी पानं फाडलेली तेवढी सर्व जमा केली आणि राहीलेलं पुस्तक नेहमीच्या जागी अडकवलं.  रस्त्याचे मधोमध नेऊन ती फाडलेली पानं ठेवली त्यावर दगड ठेवला....  आणि कुठली गाडी येतेय काय ते बघत राहीली.
गाडी आलीच नाही म्हणून त्यातले दहा बारा तुकडे उचलले आणि डोक्यावर ठेवले...

- डोक्यावर पदर होता माझ्या. लग्नाच्या शालूचा पदर.  तो आला..  त्याने खसकन तो ओढला...

पानं मागे पडली तशी मी हसली.  शाळेतल्या मुलांना सोडायला आलेल्या त्यांच्या मम्मी खुदकन हसल्या.
" अगं , ती वेडी आहे.  दिवसभर इथेच असते.  रात्री कुठेतरी गायब होते.
काय माहीत कुठे जाते ती. कोणीतरी हिचा फायदा घेत असणार "
एका दोघींचा चुकचुकण्याचा आवाज....
मी उलट फिरुन त्यांनाच शिव्या देते. सगळ्या मुलांना घेऊन पळतात. मी पडलेली पानं पुन्हा जमवते.  त्यांचे आणखी तुकडे तुकडे करते.  तिथे एक गाडी उभी असते तिच्या वर ठेवते..  त्यावर एक दगड..

वरुन ती जाडी ओरडते..
" ए..  पागल हटा वहां से ओ कागज.  सेठ अभी आ रहे हैं नीचे.  "
मी तिला शिव्या देते.  शेठ भला माणूस..  रोज दहा रुपये देतो.

- शंभरच्या दहा नोटा त्याने मामीच्या हातावर ठेवताना मी बघितलं होतं.  पण पुढे हे असं काही होईल हे माहीत नव्हतं.

शेठ समोरुन आला.  खिशातून दहा रुपये दिले.
" आज वडापाव नको खाऊ..  कांदेपोहे खा..  रोज वडापाव खाऊन तब्येत खराब होईल.  "
मी, हो..  हो..  म्हणत मान डोलावली.  दहा रुपये मुठीत दाबून धरले.  शेठ ने गाडीवरचा दगड बाजूला केला.
 " उद्या पुन्हा दगड ठेवलास तर १० रुपये देणार नाही "

मी धावत स्टॉल वर गेली.  पोऱ्याने वैतागून विचारलं
" काय देऊ? "
" पोहे दे..  दहा रुपयाचे " मी डिशकडे बघत बोलले.
त्याने पळी पोह्यांच्या टोपाला घासून एक दोन वेळा पळी टोपावर मारुन दोन पळ्या डिशमध्ये ओतल्या.
" अजून दे की, अर्धा पळी " मी हावरटासारखी बोलले.
"डिश भरली जागा नको काय.  दहा रुपयाचे एवढेच येतात "
मी डिश उचलली.  त्याला शिव्या द्यायच्या होत्या, पण मग उद्या त्याने पोहे, वडा दिला नसता.  पुन्हा फुटपाथवर नेहमीच्या जागेवर आले.  मुठभर पोहे उचलले...

- समोर ताटली होती,  तिच्यात त्याने भात टाकला.  त्या वर पिशवीतून आणलेली पिवळी डाळ ओतली.  ताटली माझ्याकडे सरकवून म्हणाला...
"खा,  नाटक करु नकोस..  दोन दिवस अजून मग तुला घरी नेईन "

पायाजवळ लाल मुंग्या होत्या सकाळी साखर टाकली, त्यालाच आल्या होत्या.  मी त्यांच्यावर पोहे टाकले.  तशा त्या इकडे तिकडे पळायला लागल्या.  मग सगळीकडे पोहे टाकले..  मुंग्या पळाल्या.
"वो देख..  पागल औरत है..  सब खाना इधर उधर फेंक दिया.. " कठड्यावर गॉगल लावून बसलेली पोरगी त्याच्या सोबत असलेल्या पोराला सांगू लागली.
त्याने माझ्याकडे पाहीलं.

-तो माझ्याकडे नाही तर माझ्या शरीराकडे बघत होता. मला अर्धवट शुद्ध होती.  भरपूर प्रयत्नाने मी डोळे उघडे ठेवले.  तो मला स्वतःच्या अंगावर खेचू लागला.

 मी त्या दोघांना शिव्या दिल्या तशी ती दोघंही तिथून पळाली.  समोरुन झाडूवाला येत होता.  त्याने विचारलं..
" काय आज पोहे होते का??  कधीतरी पुर्ण खा.. काल अख्खा वडा त्या डोंगळ्यावर दाबलास.  "
मी फक्त त्याच्याकडे बघून हसले.

" आणि हा कचरा कशाला पसरवून ठेवलास? दिवसातून किती कचरा करतेस तू?  परवा त्या २७ नंबर च्या तळमजल्यासमोर सगळी पानं फाडून ठेवलीस.  मलाच सगळी जमवायला लागली.  काय मिळतं तूला पानं फाडून? "
 तो चिडून बोलत होता.
मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.  तिथून उठले.
झाडूचा आवाज येत होता.

- सटासट तो मला त्या झाडूने मारत होता.  ओरडत होता...
" तुला काहीच माहीत नाही?  साली..अनाडी, पैसे फुकट गेले माझे."
प्रत्येक फटक्याबरोबर मी अधिकच खंबीर होत होते.  मी विकली गेलीय..  पुढे माझ्यावर काय काय प्रसंग येणार हे सुद्धा कळायला लागलेलं.

समोरुन ती संस्थेची बाई येताना दिसली.  मी तिला चुकवायचा प्रयत्न केला पण तिने मला गाठलंच.
" पळू नको,  हे घे काही कपडे आहेत.  आणि ते तसेच घाल.  फाडू वगैरे नको.  या पिशवीत काही बिस्किटपुडे आहेत.  मग येतेस ना तू आश्रमात?  तुला काही त्रास होणार नाही उलट डॉक्टर औषधे देऊन तूला बरं करतील.  किती दिवस अशी वेडीच राहणार तू? "
मी तिच्या हातातून पिशवी घेतली.  आत पुस्तक नव्हतं.
" कागद कुठाहेत " मी ओरडले..
ती घाबरलीच. ..  एक पाऊल मागेच सरकली.
" नाही आणला...  " ती घाबरुन बोलली. ." पण हे बघ, आश्रमात खुप कागद आहेत.  "
तिने दिलेली पिशवी तिच्या अंगावर फेकून तिला शिव्या दिल्या तशी ती पण निघाली.

 - अचानक शिव्या द्यायला सुरु केल्याने तो सुध्दा बिथरला.  माझ्यावर जबरदस्ती करायला लागला ब्लाऊज टर टर आवाज करुन फाटला.  पदर डोक्यावरुन कधीच पडला होता.  आता नाही तर कधीच नाही.  झटापटीत त्याचे मनगट तोंडासमोर आले.  तेच तोंडात धरले.  जितका जोर होता तेवढ्या जोराने चावा घेतला.  तो हात सोडवू लागला.  पण मी तोंड उघडलेच नाही.  माझ्या तोंडात त्याचे रक्त जमा व्हायला लागले.
त्याने दुसऱ्या हाताने पोटात फटका मारला..  माझी पकड सुटली..  रक्ताने माखलेलं तोंड बघून तो घाबरलाच.
" वेडी झालीस काय तू?? xxxx,   तुकडा पाडलास हाताचा.  "
मी त्याच्यावर पुन्हा चालून गेली.  त्याचा भेटेल तो भाग चावत गेली.  गाल, हात,  पोटरी,  मान सगळीकडे चावून ठेवलं.  रक्तबंबाळ अवस्थेत तो घराबाहेर पळाला..

समोरुन येणारा धोतरवाला म्हातारा माझ्या कपड्यांकडे पाहत होता.  त्याच्यातून काही दिसतंय का याचा प्रयत्न करीत होता.  मी बसून होती म्हणून अगदी बाजूने गेला.  पुढे काही पावलं गेल्यावर पुन्हा मागे आला.  माझ्या डोक्यावरुन आत पाहू लागला.  समोरच त्याचा पाय होता.  झडप घेतली आणि जोरदार चावा घेतला.
" पागल साली...  कोई इसको पागलखाने में डाल दो.  ऐसे बाहर घुमती रही तो सबको काटती रहेगी "
मी त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली..

- रक्ताळलेलं तोंड घेऊन मी झोपडी बाहेर पडली.  तो कुठेच दिसत नव्हता.  पिंपावर एक टीशर्ट दिसत होता तो अंगावर घातला.  खाली परकरच होता.  आता मला थांबवायला कोणी नव्हते.  विस्कटलेले केस, फाटका टीशर्ट,  आणि तोंडात शिव्या,  हत्यार म्हणून चावा..
मी " वेडी " झाले पण सुरक्षित होते.  पुरुषी श्वापदांना माझ्या त्या वेडेपणाची भिती वाटायची. फक्त कागद फाटण्याचा आवाज आला की मी माणसात यायची.  कारण त्याचा आवाजाने मला माझा ब्लाऊज फाटतानाच्या आवाजाची आठवण व्हायची ..  आणि माझं वेड पुन्हा सत्यात यायचं.

दिवस संपला की गाडीवाला शेठ घरी बोलवायचा.  रात्रीचं जेवण द्यायचा.  व्हरांड्यात झोपायला जागा द्यायचा.  त्याला माहीत होतं मी वेडी नाही ती.  पण तो देव माणूस..  कधीही वाकड्या नजरेने बघितलं नाही.  त्याची बायको उलट सुलट बोलायची त्याला,  पण तो शांत रहायचा.

श्वापदांच्या दुनियेत तोच एक माणूस होता.

रात्री झोपली की पुन्हा सर्व आठवायला लागायचे..
ते पैसे,  ती झाडू,  ती वेदना,  तो चावा, त्या शिव्या...
आणि ती वेडी नसून.... वेडी झालेली मी...
- बिझ सं जय 

Sunday, 7 August 2016

म्हातारी

... म्हातारी ...
सिग्नल हिरवा झाला.
मी उजवीकडे जाण्यासाठी टर्न घेतला, तोच समोर ती आली....
म्हातारी..
" ए भाई... जरा आगेतक छोड दो ".
मी नेहमीच अशा मदतीसाठी तयार असतो. स्कूटर बाजूला आणली आणि तिला बसायला सांगितलं.
" तुम्हारा बडा उपकार हो गया, भाई... नहीं तो आज कल कौन किसके लिए रुकता है? "
" हां.. हां.. माँ जी, कोई बात नहीं, कहाँ जाना है आपको?" मी नम्रपणे विचारलं.
" हां, भाई मुझे वो, कबुतरखाने के पासवाले, लाल बावा मंदिर में जाना है " म्हातारी शांतपणे बोलत होती.
" जरा अच्छे से बैठना, रस्ते में गढ्ढे बहोत है. मैं वहाँ से ही आगे जाऊंगा. आपको छोड दुंगा " मी तिला आश्वासन दिलं.
" आजकल हम जैसे लोगों के लिए कौन रुकता है भाई?
आपने दया दिखाई. नहीं तो इतना चलना पडता. मैं रोज मंदिर जाती हूँ, दिन मैं दो बार. क्या करें भाई भगवान भी ऐसे ऐसे खेल खेलता है " तिचा स्वर करुणतेकडे वळत होता.
" क्या हुआ माँ जी? "मी काहीतरी नविन ऐकायला मिळणार म्हणून ऐकू लागलो..
" हम जैसे बुढों को अभी भी जिंदा रखा है.. मौत चाहीये लेकीन आती नहीं और जिसे जिंदगी की जरुरत थी उसे ले गया.
मेरी बहु... चार महीने हो गये.. एकदम से बिमार हो गयी और दो दिन मैं परलोक सिधार गयी. यह भी कोई मरने की उम्र है? दो पोते है. एक १२ साल का और एक ५ साल का... " तिचा आवाज कातर होत होता.
" अरे बापरे.. कैसे हुआ? " मी सुद्धा आता खिन्न झालो.
" डेंगू लग गया.. पहिले घर पर ही दवाई चालू थी. बेटा घर पें नहीं था, जामनगर गया था. आने तक देर हो गयी हॉस्पिटल ले गए लेकिन नहीं बचा पाए ". बहुतेक तिने डोळे पुसले असावेत.
" दोनों बच्चों का मै ही करती हूं.. खाना बनाने के साथ उनके इस्कुल की तय्यारी और बस तक छोडना सब मुझे ही करना पडता है.. दुसरी शादि के लिए लडका ना बोलता है. मेरे अभी कितने दिन बाकी हैं क्या पता? आगे मेरे पोतों का क्या होगा वो, राम ही जाने. "
मला त्यावर काय बोलावे हेच सुचत नव्हतं..
ती बोलतच होती तिच्या क्षीण आवाजात.. कदाचित कोणी तरी तिचं ऐकून घेतंय हेच तिच्यासाठी महत्त्वाचे असावं.
" शायद मेरी वजह से ही लडका दुसरी शादी को ना बोल रहा है.., अभी इस उमर मैं दुसरी बहु के साथ फिरसे शुरुआत करना मुझे मुश्किल जाएगा ऐसा उसको लगता होगा. इसलिए मैं भी मंदिर जाती हूँ...
भगवान को प्रार्थना करती हुं के मुझे भी जल्दी ले जाए.. तो कम से कम मेरे पोतों के लिए उनको सही मे संभाल सके ऐसी माँ आ जावे.. "
" बस भाई , आ गया मंदिर..
बडी मेहरबानी तुम्हारी. तुम तो मुझे जल्दी ले कर आए.. नहीं तो मेरे लिए कोई रुकता ही नहीं. वक्त भी नहीं. "
ती गाडीवरुन उतरली. मला हात जोडला. मी सुद्धा तिचा हात हातात घेतला.
" संभालके जाना.. " एवढंच बोलणं मला शक्य होतं..
तिने रस्ता ओलांडला आणि मंदिरात गेली. मी काही क्षण तिच्या पाठमोऱ्या कृश आकृतीकडे पाहत राहीलो.
आपले मरण मागण्यासाठी ती रोज दिवसातून दोन वेळा मंदिरात जात होती. ..
म्हातारी.. 'स्व'त्वाच्या पलीकडे गेलेली होती.
- बिझ सं जय ( ७ ऑगस्ट, २०१६)

श्रावण... निसर्ग आणि क्लिक

...श्रावण.. निसर्ग आणि क्लिक...

सलग तीन दिवस सुट्टी असल्याने गावी जाणे झाले होते. मुलांना देखील पावसात भिजायचं होतं, म्हणून संपुर्ण सुट्टी धम्माल करायची हे ठरवूनच गावी गेलेलो. त्यामुळे सोबत कॅमेरासुद्धा नेला होता. तेव्हा बटण दाबलं की फोटो पडतो  एवढंच माहीती होते.
  श्रावण सुरु झाला होता. गाडीतून गावी जाताना कोकणातले ते हिरवं वैभव बघताना डोळे दिपूनच जातात.  यावेळी निसर्ग एक वेगळाच हिरवा रंग घेऊन असतो.

 रंगाचे नाव काहीही असेल..  मी मात्र त्याला कोवळा हिरवा रंग म्हणतो.  त्या रंगात नुसता टवटवीतपणा असतो. मध्येच येणार्‍या पावसाचे तुषार तोंडावर घेत घेत, जोरातच पाऊस असला तर थोडासा हात बाहेर काढून तो पुर्ण भिजवत आम्ही गावी पोहचलो.  मुलांनी गेल्या गेल्या ओढ्यावर न्यायला लावले.  त्यांचे तिथे फोटो काढले.  दोन तीन तास गार पाण्यात मनसोक डुंबून झाल्यावर त्यांना अक्षरशः ओढत घरी न्यावे लागले.
दमून आल्यामुळे मुलं पटकन जेऊन झोपली सुद्धा.  मग मी रिकामा झालो.
पाऊस रिमझिमच होता.  त्यावेळी मी घरुन निघालो..असाच फिरायला..  खिशात कॅमेरा सहजच टाकला.  गावासमोरचा डोंगर डांबरी रस्त्यानेच चढलो.  पण नंतर डांबरी रस्ता सोडला.  कारण डांबरी रस्त्यावर एक कृत्रिमपणा होता.
पायवाटेवरुन जाताना जाणवलं की आपली माती काय असते ते.  चप्पल हातात घेतल्या आणि पायवाटेवरच्या साठलेल्या पाण्यात पाय टाकत टाकत पुढे जाऊ लागलो.  श्रावणात पाने, फुले, वेली एक वेगळाच अवतार घेतात.  एक रानटी फुल दिसलं. रानटी भेंडीचेचं पिवळधम्मक,  सहज म्हणून त्यावर कॅमेरा रोखला.  क्लिक करु की नको असा करत असताना कॅमेरा ऑटो फोकस मोड वर सिलेक्ट असल्याने कॅमेराने स्वतः माइक्रो मोड घेतला.  फोटो " क्लिक " झाला.  फोटोचा व्हु ऑन असल्याने पाच सेकंद तो माझ्या डोळ्यासमोर राहीला.
मी लहानपणापासून फोटो काढत होतो.  बटण दाबलं..  खच्याक आवाज आला की पडला फोटो.  एवढंच साधं सोप्पं गणित आपलं.  आत्ता जे समोर दिसत होतं ते इतकं सुंदर होतं की...  फुलावरचा एकूण एक रंध्र दिसत होता.  पिवळधम्मक फुल आणि मध्यभागी मातकट रंग.
अहाहा......!
मोठ मोठे फोटोग्राफर हे असले फोटो कसे काढतात हा प्रश्न मला नेहमी पडलेला असायचा.  त्या एका " क्लिक " ने मला खजिना गवसला.  मी चहूबाजूला शोधू लागलो.  अजून काय..  अजून काय..
समोरच बांध होता, बांधावर काही रानटी वनस्पती उगवल्या होत्या. गेलो तिकडे..  कॅमेरा बांधावर ठेवला.. समोर क्षितिज दिसत होतं. अतिशय सुंदर दिसणारं तेरड्याचं छोटसं रोपटं तिथे वाऱ्याने मंद मंद डुलत होतं.

त्याला कॅमेराच्या मध्यभागी घेऊन..  हळूहळू क्लिकचं बटण दाबलं.  ऑटो मोड ने पुन्हा कमाल केली.  समोरचं ते तेरड्याचं झाडं स्पष्ट करुन मागचे आभाळ साधारण धुरकट केलं.  पुढचे पाच  सेकंद मी तो फोटो बघतच राहीलो.  मन नाही भरलं म्हणून पुन्हा प्ले करुन तो फोटो समोर आणला.  मला नव्याने फोटोग्राफी समजली होती.
काय टिपू आणि काय नको असं झालेल . समोरच घाणेरीचे झाड त्याच्या नारंगी लाल फुलांनी मला खुणावत होतं.  या फुलझाडाला निव्वळ त्याच्या फुलाच्या दुर्गंधावरुन घाणेरी म्हणणे हा खरंतर त्या झाडावरचा अन्याय आहे. इतकी सुंदर, लहान लहान मनमोहक फुलं हिरव्या रंगाच्या पार्श्वभुमीवर सुंदर दिसतात हे प्रत्यक्ष पाहणाऱ्यालाच समजू शकते.  मी कॅमेरा घेऊन तिच्याकडे सरसावलो.  जवळ गेल्यावर तिचा तो दुर्गंध आलाच पण माझ्यासाठी तो दुय्यम होता.  'आंधळा मागतो एक,  देव देतो दोन ' प्रमाणे  "घाणेरी" च्या फुलांवर लहान मधमाशी फिरत होती.
 मग मी कॅमेरा तळहातावर स्थिर करुन एक पाय पुढे आणि एक पाय मागे करुन क्लिकचं बटण पकडून ठेवलं.  मधमाशीला माझं अस्तित्व जाणवू न देता फोटो काढत सुटलो.  तिच्या पंखांचे स्थिर चित्र दिसेपर्यंत फोटो काढले.  २०-२२ फोटोंपैकी सर्वात चांगला फोटो ठरवून बाकीचे लागलीच काढून टाकले.
हे करत असताना माझे लक्ष पायाजवळ गेले.  तिथे अगदीच लहान लहान तीन मशरूम्स उगवले होते. जवळ जाऊन फोटो काढले परंतू मन भरेना.  या छत्र्यांच्या खाली कसं असतं हे एक कुतूहलसुद्धा शमवावं म्हणून जमिनीवर कॅमेरा ठेवला खालून फोटो काढला.
मागचं भरलेलं आकाश आणि मायक्रो सेटिंग मुळे तो फोटो मी काढलेल्या  फोटोंमधला अजून पर्यंत सर्वोत्तम झालाय.
असेच पुढे पुढे चालत एक लहान ओहळ दिसला. अचानक डोक्यात कल्पना सुचली..  सरळ त्या ओहळातच उतरलो पाणी भयंकर थंड होतं.  पाण्याला हाताचा स्पर्श होईल इतक्या जवळ नेऊन कॅमेरा हातावर धरला आणि क्लिक केलं.
 मनात जसा हवा होता तसा फोटो निघाला.  दोन्ही किनाऱ्यांना हिरवेगार गवत आणि समोरुन वाहत येणारे स्वच्छ पाणी.  तेवढ्यात समोरुन एक फुलपाखरु गेलं काळ्या रंगाचं..  तिथे सुद्धा घाणेरीची झाडं होती त्यावर बसलं.  मी अलगद त्याच्या जवळ गेलो.  हळूवारपणे कॅमेरा लावून धरला आणि पंख उघडायची वाट बघू लागलो.
अलगद पंख उघडले आणि मला माझा फुलपाखराचा पहिला फोटो मिळाला.  तिथेच बहुतेक आंबा किंवा काजूची कलमे लावण्यासाठी खड्डे खोदलेले होते.  खड्ड्यातल्या पाण्यात आभाळ दिसत होतं म्हणून ते टिपायचा प्रयत्न करत असताना मला खड्ड्यातून बाहेर काढलेल्या मातीत हालचाल जाणवली.  बारकाईने बघितलं तर अगदी करंगळीच्या नखाएवढा हिरव्या - सोनेरी रंगाचा त्या गवतात बेमालूम लपलेला बेडूक होता. त्याची सुंदरता निव्वळ पाहण्यासारखीच होती.
नुसत्या डोळ्यांनी कदाचित ती दिसली नसतीच.  परंतू जेव्हा तो बेडूक माझ्या कॅमेऱ्यातून पाहीला तेव्हा तो अतिशय मनमोहक दिसत होता.
समोरचा निसर्ग नुसता हिरव्या साडीतल्या  नववधूप्रमाणे सजला होता.  झाडांवर पक्षी होते. परंतू माझ्या कॅमेऱ्यातून दुरचे फोटो काढण्याची मर्यादा होती म्हणून त्यांच्या नादी लागलो नाही.  समोर तिळाचं शेत दिसत होतं.. पिवळ्या फुलांनी बहरलेलं पुर्ण शेत एका सुंदर पिवळ्या दुलई सारखं वाटत होते.  शेताच्या बांधावर रानटी रोपटी उगवली होती.  त्यांच्यावरही शुभ्र फुले बहरली होती.  त्या फुलांवर नेमकी गांधीलमाशी आली.
 पुर्वी गांधीलमाशी म्हटले की मी खुप घाबरायचो.  पण आता कॅमेऱ्यापलीकडून मला त्या गांधीलमाशीत सौंदर्य दिसत होतं.  हिरव्या गार पार्श्वभुमीवर तिचा काळा पिवळा रंग स्पष्ट उठून दिसत होता.  सारखी इकडून तिकडे ये जा करत होती त्यामुळे तिला कॅमेऱ्यात पकडणं कठिण झालेलं.  पण मग कॅमेऱ्यातल्या ' इमेज स्टेबलाईजर ' ची आठवण झाली.  केला क्लिक..  तिच्या उडण्याच्या गतीबरोबरच कॅमेरा फिरवत असल्याने मला अगदी हवा तसा फोटो मिळाला.
जरा अंधार जाणवला म्हणून मनगटातल्या घड्याळ्यात डोकावलं..  मी चक्क पावणेदोन तास भटकत होतो.  एव्हाना माझ्याकडे भरपूर फोटो जमा झाले होते. श्रावण आणि निसर्गाचा खजिना घेऊन मी परत घराकडे निघालो.  घराच्या गेटजवळच एक भला मोठा बेडूक दिसला.  त्याच्या अगदी जवळ जाऊन..  जवळ म्हणजे माझा कॅमेरा आणि त्याच्यात पाच सेंटीमीटरचेच अंतर असेल एवढं.
शेवटी त्याने वैतागूनच बहुतेक थेट माझ्या अंगावरच उडी मारली. कधी एकदा ते फोटो घरच्यांना दाखवतो असे झालेले.  घरासमोरच्या शोभेच्या झाडांच्या कुंडीत सदाफुली नेहमी प्रमाणे फुलली होती.  तिचा फोटो काढायला गेलो तर पानावर एक अगदी छोटा नाकतोडा दिसला.
हिरवागार होता.  निसर्गाची कमालच आहे.  हेच किटक उन्हाळ्यात मातकट रंगाचे असतात.  तर पावसाळ्यात त्यांचा रंग वातावरणासारखा असतो.  मी फोटो काढतोय म्हणून की काय तो वेगवेगळ्या पोझच जणू देऊ लागला.  त्यातला पानाचा आडून बघतानाचा फोटो मला स्वतःला खुप आवडला. बाजूच्या शोभेच्या झाडावर पानाखाली एक मच्छर लटकत  होता.

त्याला ही बंदिस्त केलं.  शेवटी ओटीवर झोपाळ्यावर जाऊन बसलो.  समोर गरमागरम चहा आला होता.  एवढे फोटो काढूनही मन अतृप्तच होतं.  म्हणून शोधक नजरेने अजून काही दिसतंय का ते पाहू लागलो.  झोपाळ्याच्या दोन्ही दांड्यांना धरुन एका कोळ्याने जाळं विणलेलं दिसलं.
हा फोटो घ्यायला खुप म्हणजे खुपच वेळ गेला.  कारण जाळ्याचे तंतू इतके बारीक असतात की त्यांच्या वर फोकस होतंच नव्हता.  मग शेवटचा पर्याय म्हणून हलकासा स्पर्श त्या जाळ्याच्या मध्यभागी केला.  तसा एका बाजूने सरसरत कोळी आला.  आणि तो बरोबर मध्यभागी जाऊन थांबला. आता कोळ्यासोबच जाळ्याचे तंतू सुद्धा स्पष्ट झाले.
मागे घराची पार्श्वभुमी आणि त्यासमोर तो जाळ्यातला कोळी..
दिवस संपत आला होता. ...

त्यादिवशी मला फोटो काढता येतात हे समजलं.  त्याचसोबत " फोटोग्राफरकडे नुसता महागातला कॅमेरा असून उपयोग नाही.  तर त्याला ती शोधक नजरही पाहीजे.  " हा मंत्र मी स्वतः शोधला.
आजही मला त्याच कॅमेऱ्यातून जवळचे फोटो काढायला आवडतात.

- बिझ सं जय

Tuesday, 2 August 2016

शोले... बिहाईंड द सीन्स व्हाया मृत्युलोक

शोले बिहांईंड द सीन्स व्हाया मृत्युलोक

परवा पत्निश्री तक्रार करत होती की,  पुर्वी तुम्ही खुप कॉमेडी, गंमतीशीर लिहायचात..  आजकाल अचानक मन गलबलून येईल,  रडावंस वाटेल असं लिहू लागला आहात.  मला ही कळत नव्हते की नेमकं काय होतंय माझ्यासोबत...?
विचार करत करत झोपी गेलो..

सकाळी जाग आली ते थेट यमाच्या रेड्यावर. आधी कळेचना ना की रेड्यावर मी कसा आलो.  नंतर लक्षात आलं की गळ्याभोवती फास सुद्धा आहे..  म्हणजे मला यम भाऊंनी " उचलले " होते तर...
आपला अवतार खतम् झाला होता. जागा झालोय हे समजलं तर उगाच चालायला लावतील म्हणून डोळे किलकीले करुन आजूबाजूला पाहू लागलो.  मृत्युलोकाच्या हमरस्त्यावरुन जाताना आधी स्वर्गलोक लागतो हे ऐकून होतो.  आणि खरोखरच तसंच होतं.  पण आमचा रेडा स्वर्गासमोर काही थांबला नाही.  केलेली पुण्य विसरुन पापं आठवू लागलो.  नरकाची कल्पना करुनच घाम फुटला.  तसा रेडा बोलला...
" ए...  उठ अंगावर घाण नको करु ते बघ तिकडे ' सुलभ ' शौचालय आहे.  "
तेज्यामायला इकडे पण सुलभ नेच शौचालये बांधली?
मी उठून बसलो आणि बोललो
" घाम आलाय हो, रेडेश्वर महाराज..  "
" येणारंच समोर बघ नरकाची भट्टी आली " रेडेश्वर महाराज बोलले.

मी भट्टीकडे न पाहता प्रश्न केला..
" मला कुठे नेताय?  चित्रगुप्त हिशोब वगैरे करायची सिस्टम आहे ना तुमची?? "
रेडेश्वर महाराज हसले...
" हो तिकडेच नेतोय तुला,  हे काय आलेच चिपापूहि सदन "

" चिपापूहि?? म्हणजे " मी कोड्यात.
" अरे चित्रगुप्त पाप पुण्य हिशोब सदन " माझ्या डोक्यात प्रकाश पडला..
" उतर आता..  समोर असलेल्या खुर्चीत बस..  पुढचे इंस्ट्रक्शन तुला तिथेच मिळतील.  "
मी शांतपणे खुर्चीत बसलो.  खुर्चीत बसल्या बसल्या वरुन कसलंस मशीन आलं आणि थेट डोक्यावर घट्ट बसलं.  डोकं जराही हलवता येत नव्हते.  अचानक मशीनमधला सायरन वाजू लागला.  तीन चार यमदूत धावत आले.  त्यांनी त्यांच्या वहीत तपासलं.  त्यांचे चेहरे चिंतामग्न दिसत होते.  लांब असल्याने ते काय बोलत होते ते समजत नव्हते पण माझ्याकडे बोट दाखवत बोलत असल्याने माझ्या बाबतीतच काही तरी असणार हे नक्की कळतं होतं मला. ...
" काय झालं रे??
पुन्हा गोंधळ घातला वाटतं "
घुमत घुमत आलेला आवाज ऐकू आला..
" आणा त्याला इकडे "
एकाने डोक्यावरचं मशीन सोडवलं बाकी दोघांनी हात धरुन मोठ्या सन्मानाने एका खोलीत मोठ्या  खुर्चीत बसवलं.  समोर पडदा होता त्यावर एक माणूस होता..
" नमस्कार, मी चित्रगुप्त..
आमच्याकडून एक चुक झालीय तुम्ही चुकून आलात वरती.  यमदुतांवर ओव्हरलोड होतोय कामाचा.  त्यांना दुसऱ्याला आणायला पाठवलेले, तुम्हाला घेऊन आले.  तुमचे मरण दोन दिवसांनी होते.  पण ही नविन पोरं चुकीची लिस्ट घेऊन गेली. "
मी गपगार...
काही विचारणार तोच..
" आलंय लक्षात दोन दिवसांनी तुमचे मरण आहेच,  त्यामुळे एवढा काही फरक पडत नाही.  पण चुक आमची असल्याने आम्ही तुम्हाला आमच्या मृत्युलोकाच्या अम्युजमेंट पार्कची एक दिवसाची सफर कॉम्लीमेंटरी देत आहोत.  दुसरा दिवस स्वर्गाची सफर असेल..  मग तर खुष?? " चित्रगुप्त डोळे मिचकावत बोलला.

तेज्यामायला अम्युजमेंट पार्क इकडे पण?  मला धक्काच बसला.
" चालेल..  दोन दिवसांनी मरायचंयच तर दोन दिवस इकडे जगून घेऊ..  हाय काय नी नाय काय ".
" ओके.  या क्षणापासून तुमची अम्युजमेंट पार्क ची सफर सुरु होतेय.  क्षणार्धात डोळ्यावर मोठा चष्मा आला.
समोर दिसू लागले ते वेगळंच होते.
" WELCOME TO AMUSEMENT PARK,  MRUTYULOK "
अशा मोठ्या अक्षराचा बोर्ड होता.
"Touch Here To Proceed Further "
मी टच केला समोर तीन स्क्रीन ओपन झाल्या.
Select Your Preferred Language ,  Go Back,  End Tour
तेज्यामायला इकडे पण इंटरेक्टिव..
मी भाषा सिलेक्ट वर टच केलं.
मराठी, हिंदी, इंग्लिश ( बहुतेक मला चांगल्या येत असणाऱ्या भाषाच दिसत असाव्यात)
मी मराठी सिलेक्ट केलं.
" कृपया थीम सिलेक्ट करा "
समोर भरपुर पर्याय होते.
बॉलीवुड, जंगल, ऐतिहासिक असे खुप पर्याय होते.  मला बॉलीवुडची भयानक आवड म्हणून बाकी पर्याय न बघताच बॉलीवुड सिलेक्ट केलं.
" चित्रपट निवडा..
१). शोले.
हे नाव बघताच पुढे जाईल तो माझ्यामते वेडाच.  मी झटकन ते सिलेक्ट केलं.  मी पुढची माहीती न वाचताच " पुढे...  पुढे " ची बटण दाबत गेलो.  शेवटी टुर सुरु करा असा पर्याय आला आणि मी टच केलं तसा अचानक मी रामगढ़ मध्ये पोहचलो.
माझ्या समोर फास्ट फॉरवर्ड आणि रिवाइंड हे ऑप्शन दिसत होते.  शोले तोंडपाठ असल्याने तो याची देही याची डोळा अनुभवण्याची सुवर्णसंधी मला मिळाली होती.
इथे मला एक ऑप्शन आलं..
" चित्रपटातील दृश्य "
" चित्रपटातील दृश्यांव्यतिरीक्त दृश्य "
मी विचार केला चित्रपट तर आपण पुर्ण पाहीलाय मग का नाही आपण Behind the scenes बघूया?
लगेच दुसरा पर्याय निवडला.
डायरेक्ट जेल मध्येच उभा होतो.
जय आणि विरु एकमेकांना टाळ्या देत होते.
" कसला पांडू बनवला जेलर ला...  म्हणे इंग्रजांच्या जमान्याचा जेलर... "
तेज्यामायला मराठीत??
म्हणजे सर्वच मराठीत ऐकू.. दिसू लागणार तर..
विरु बोलत होता " डाव्या हातानेच उचलली सळी,,  जाम वांदे होणार जेलर चे सकाळी.  जरा जासूस ला पण एक चटका द्यायला पायजे होता.  "
" देऊ की..  त्याचे बसायचे वांदे करु " जय शांतपणे बोलला.
" पण आधी त्या सुरम्याकडून पैसे घ्यायला जायचे आहेत, भरपूर टेपाड्या हाय तो. "

मी लागलीच फॉरवर्डचं बटण दाबलं.

 मी चक्क रामगढ़ मध्ये ठाकुर समोरच उभा होतो.  पोलिस वेशातला ठाकुर दिसत होता.बलदेव सिंह ठाकुर नावाची पाटी त्याच्या खिशाला लटकलेली होती. ठाकुर बलदेव सिंह दिसू लागला.
घरी दमून भागून आलेला..
" अयं...  जरा पाणी आण की..! "

सौ. ठाकुर पदर सावरत आतून आल्या.
" रामभाऊ पाणी आणा की लवकर.  साहेब आलेत.  काय मग पकडलं काय गब्बरला? "

"सोडतो की काय,  असा विळखा घातला हाताचा आणि म्हणालो...
ए गबऱ्या हा हात नाही फास आहे.  मरेपर्यंत सुटणार नाय. डायरेक्ट जेल मध्ये टाकलं नेऊन..
च्यायला तो रामलाल गेला कुठं??
पाणी आणतोय का विहीर खोदतोय? "
" आलो आलो सरकार...
घोड्याची धुत होतो.... पाठ.  लई माती लावून आलेलात की तुम्ही " हातात पाण्याचा ग्लास घेऊन रामलाल धावत आला.

" अरे हो.. भरपूर मारामारी झाली,  मातीत लोळालोळ झाली,  तेव्हा कुठे गब्बरसिंग सापडला ".

" पण मालक रोज रोज तुम्ही पराक्रम करणार, डाकू पकडणार, घोड्यांना माती लावून आणणार.  आणि मी काय नुस्ते घोड्याचीच धुत बसू काय??  पाठ..
बाकी पण काम आहेत.  ती टाकी बांधून ठेवलीय उंचावर, तिच्यात पाणी भरावं लागतंय.  रोज शंभर लोक मजूरीला असतात.  त्यांची गावकी करावी लागते.  प्रतिष्ठित म्हणून किती दिवस फुकट काम करुन घेणार अजून त्यांच्यांकडून? ".  रामलाल जरा चिडलेलाच वाटला
" अरे तू तुझ्या कामाकडे लक्ष ठेव..  जे काय काम करताहेत ते त्यांच्याच भल्यासाठी करताहेत.  प्रत्येकाने घरात शॉवर लावून घेतलेत..  त्यांना फोर्स नको पाण्याला?
म्हणून ज्यांना ज्यांना शॉवरच पाणी पाहीजे त्यांना त्यांना झक मारुन पाणी भरावं लागतंय..  समजलं का अकलेच्या घोड्या?  "

" अच्छा असं हाय तर..  तरीच परवा बसंती आलेली नविन शॉवर बद्दल विचारायला.  शहरातून येताना अहमद आणेन आणेन म्हणतो पण आणतंच नाही.  पैसे मागतो.  ठाकुर साहेब पटकन आणतील म्हणत होती.  "
हे ऐकून सौ.  ठाकुर तिरमिरत पाय आपटत आतल्या खोलीत निघून गेली.
" भाड्या... तिच्यासमोर कशाला बोललास? आता फुकट एक सोन्याचा हार द्यायला लागेल तिला, थांब तू नंतर असं कामाला लावतो तूला की तू दिवसभर धुतच राहशील...  घोड्याची पाठ "

मी फॉरवर्ड चं बटण दाबलं..

ठाकुर शाल पांघरुन उभा होता.  रामलाल जुन्या घरातून बाहेर आला.  त्याच्या तोंडावर बारा वाजले होते.
" रामलाल..  दाखवली का खोली त्यांना?  काय बोलत होते आपापसात "

" काय बोलणार??  चोर आहेत लेकाचे.  तिजोरी फोडायच्या वार्ता करत होते.  सहा जणांना पाठवलंय परिक्षा घ्यायला.  बघूया काय गुण उधळतात ते. आणि एक सांगतो..  तोडफोड झालेली मी ठिक ठाक करणार नाही..  गावातून सुताराला बोलावलंय त्याला पैसे द्यावे लागतील "
" देतो रे..  बघ कशी फायटींग करतात ती.  मी बघितलीय की ट्रेन मधली फायटींग पोरं हुशार आहेत.  ".
तेवढ्यात दरवाजा तोडून जय विरु बाहेर आले.
मी फॉरवर्डचं बटण दाबलं.
थेट गावात पोचलो.  काशीरामच्या घरात.
 काशीरामची बायको त्याला सांगत होती.
" पोरीचं लग्न घेतलसा.  दोन गोनी माल्यावर टाकून ठीवा.  उंद्या गब्बर आला म्हंजी त्यासुदीक घेऊन जाईल मंग चिवडत बसा ठाकूरचे पाय ".
मला हिंदीतला.. " पाव " शब्द आठवला.
 " हो माझे आयशे.  जरा दम धरशील की न्हाई? आताच तर पानी भरुन आलोय टाकीवरती.  तुलाच शॉवर नी अंघूळ कराची हौस भारी तुच का जात न्हाईस पानी भरायला? " काशीराम कावला होता.
" हे बघा मी कितींदा सांगितलं त्यो म्हातारा पाणी भरताना नेमका तिथं येतो आणि आमची भिजलेली झंपर बघत बसतो.  म्या अज्याबात जानार नाय तिकडं " पदर सावरत काशीरामची बायको बोलली.
" अगं ए यडे..  रहीमचाचा व्हय??  तो म्हातारा आंधला हाय.  " काशीराम हसला
" नाय ओ...  एरवी तिकडे बसून असतो.  आम्ही पानी भरायला गेलो की उठतो आणि विचारतो..  इतका आवाज का करताय गो बायांनू?  पानी भरताय तर या म्हाताऱ्याला थोडं पानी पाजा की तुमच्या हांड्यातलं..  लईच चावट बोलतूया.  ती बसंती असली की तिच्या खांद्यावरुन हात काय फिरवील आणि काय काय बोलंल.  ती गेली की मग बडबड करेल.  पाहीलं काय गं बायांनो..  बसंतीने तिच्या कलशीतलं पानी पाजलं, आनि तुम्ही शरमसांड्या थेंबभर पानी पण देत नाही.  "
तेवढ्यात बाहेर गोळ्यांचा आवाज.
लक्षात आलं की कालिया साथिदारांना घेऊन गाव लुटायला आलाय.
फॉरवर्ड बटन पण क्षणभरच..
कालियासह तिन्ही डाकू उताणी पडून तडफडत आहेत आणि डाकू गब्बरसिंग बोलला ...
" ए सांब्या..  फोकलीच्या.  मळ की तंबाकू.  च्यायला ह्यांच्या... जेवायचे वांदे करुन ठेवले रांडेच्यांनी.  होलीत गाव तर लुटायचाच,  पन पुरनाच्या पोल्या पन पलवायच्या. कुरमुरे कीती शिल्लक रं?? "

" सरदार,  दोन पोती हाईत..  " सांबा वरुन ओरडला.
" बनव मग सुका भेल.  आज भेलेवरच प्वाट भरु उद्या बघू काय भेटतं दुसऱ्या गावात ते "
गब्बरसिंगची ती वाईट परिस्थिति बघून
फॉरवर्ड बटण दाबलं..
बहुतेक होळी आटपली होती.  खोली मध्ये रामलाल चिडला होता.  " तुम्ही कशापायी उघड केलं की तुम्हास्नी हात नाही ते.  तो विरु तर गालात हसत होता माझ्याकडे बघून. त्याला लईच खाज,  तुम्ही आत आलात तसा मला म्हनतो..  जेवताना हात नीट धू रे राम्या..
तो जय तरी हाव हाव हाव करुन हसला माज्यावर. त्यानला वाटलं की मी हातानं... की काय?
तुम्ही त्यासनी सांगा की आपल्याकडं डबल पावरचा हातातला शॉवर आहे म्हनून "
ठाकुर पण हसत होता.
अचानक..
" रामलाल..  बघ रे गालावर कोणतरी चावतंय..  ये लवकर.. "
"
थांबा तसेच मालक..
सट्टाक...
" हम्म.. मेला मच्छर..  "
" भाड्या,  माझं मुस्काट फोडलंस.....
 पण आता त्या गब्बर ला या मच्छरासारखं चिरडायचंय मला.
जा सुनबाय ला बोलव.. तिला त्या जय च्या पाठीमागे लावतो म्हणजे तो पण जरा जोशात येईल. ही दोघं लय टाईमपास करुन राहिलेत  "
रामलाल तिथून हसत हसत गेला.

मी फॉरवर्डचं बटण दाबलं..

जय बसंतीच्या मावशीला भेटून बाहेर येत होता.  त्याच्या गालावर छद्मी हास्य होतं.
बडबडत चालला होता...
" च्यायची... मस्त बुच मारलं विरु चं..  आता मावशी काही केल्या त्याला बसंतीच्या जवळ फिरकू देणार नाही.  मला सेकंडचा माल आणि स्वतःला कोरा करकरीत  व्वा...  बेटा.. चढ आता टाकीवर नवटाक मारुन.. "
तिकडे टाकीकडे  काहीतरी गलका ऐकू आला म्हणून धावत गेलो तर सगळा तमाशा संपला होता.  विरु टाकीवरुन खाली उतरला होता. बसंतीच्या खांद्यावर हात टाकून विरु येत होता..
" मला सांग कोणी किडे केले ते?  सगळी लफडी मावशीला कोणी सांगितली?  साल्ला जयच असेल तोच जळतो आपल्यावर..
म्हणतो " ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे " आणि माझ्या आयटमवर नजर ठेवतो.  मी त्याला सोडणार नाही.  मी ना त्याच ते कॉईनच बदलून टाकतो.  गण्या लोहाराकडून दोन्ही बाजूला " छापा " असलेले कॉईन बनवून घेतलंय.  रात्री गुपचूप बदलतो.  लय कॉईन उडवायचा शौक ना त्याला असलं कॉईन घालतो...  खिशात की गेमच खलास करुन टाकतो.  "
रागाने की दारु ने डोळे लाल झालेले ते काही समजेना मला.
बसंती बोलली " मंग तर  राजा,  तो लपुन छपुन माझ्याकडे बघत असतो.  हवेलीत असला की त्या सुनबाय कडे आणि बाहेर असला की माझ्याकडे.  लय चालू आहे तो.  परवा धन्नोची पण छेड काढली त्याने.  तिला विचारत होता तुला ठाकूरचा घोडा आवडतो की गब्बरचा. ..  सोडू नको त्याला..
चल तू जा घरी मी जरा नदीवर जाऊन येते.  अहमद येणार होता शहरातून तो तिथे भेटणार नंतर गावात येईल.  आमचं शिक्रेट आहे..  "बसंतीच्या चेहरा खुलला होता.
मी तिच्या मागोमाग गेलो तोच समोरुन रहीम चाचा...
" कोण बसंती?"   किती करते तू माझ्यासाठी म्हणत तिच्या खांद्यावरुन हात फिरवू लागले.
तेज्यामायला या म्हाताऱ्याच्या.... काशीरामची बायको खोटं सांगत नव्हती तर.  बसंतीचा वास आला की काय याला? बरोबर टायमाला हजर.
तोच समोरुन घोड्यावर आडवा झोपलेला अहमद आला.
लोकांची गर्दी झाली.
मी गर्दीत कोण काय बोलतोय ते ऐकू लागलो.
काशीराम; ढोलिया आणि शंकरला सांगत होता..
" एक नंबर फुकनीचा..  दिवसाला चार पाकीटा संपवायचा शिग्रेटीची.  गावात असतू तेव्हा लय सालसूद या बसंती समोर..  तिकडं शहरात गेला की गुण उधळायचा पेत्ताड.. शहरातल्या पावन्यानं सांगितलान की दोन दिसापुर्वी गरद घेऊन पडून राहीलेला गटारीच्या बाजूला.  "
तिकडे तो " इतना सन्नाटा क्युं है भाय " चा सीन होऊन गेलेला बहुतेक.
फॉरवर्डचं बटण दाबलं...
तिकडे अतीव दुःखाने बसंती नदी कडे धावत जाताना दिसली..
म्हटलं आता तो धन्नोच्या बहादुरीचा सिन असणार.  पण मी तिथे पोहचेपर्यंत टांगा पलटी झाला होता.  दोन डाकू बसंतीला घेऊन निघाले होते तर दोघांनी धन्नोला पकडलं होतं.
" अरे..  काय सॉलीड घोडी हाय ना?
आपल्या शेरुला जोडी लावून देऊ. बसंतीचा काय करायचा तो करु दे गब्बरसिंग ला आपण हिला पाळू.  बघितलं ना कशी धावत होती?
कोणत्या चक्कीचं कोंडा घालत असतील रं हे रामगडवाले?  "
दुसरा बोलला..
" अरे एकच तर हाय चक्की गावात.  ती पण ठाकूरच्या मेवन्याची.  सरदारांनी ठाकूरचे हात कापले आणि मेवन्याचे पाय. त्याला आता कोनी पांढऱ्या पायाचा पन बोलत नाय "
त्यांच्या सोबत सोबत अड्ड्यावर गेलो.  तिकडे बाटल्या बिटल्या फोडून झालेल्या.  विरु ला दोरीने बांधून ठेवलेलं आणि गब्बर बसंतीला नाचायला सांगत होता.
नाच गाणं चालू असताना मी सांबा च्या बाजूला जाऊन बसलो..  सांबा नेहमी वर का बसलेला असायचा हे मला तेव्हा कळलं.  तिथून डान्स एकदम बाल्कनीत बसल्यासारखा दिसत होता.
काहीतरी पुटपुटत होता म्हणून जरा जवळ जाऊन ऐकू लागलो..
" हे बघ यडं रं यडं..  घाल गोळ्या त्या विरु ला आणि ठार कर की.  उगीच तो लंबाड्या आला तर आपली वाट लागलं..  विचारतोय मोठा कोणत्या चक्कीचा आटा खाववतात पोरींना.  गेले महिनाभर कुरमुरे खाऊन दिवस काढतोय ते दिसत नाही याला?  पन्नास हजार मीच कमवू काय? ..
हे यडं स्वतः फसेल आणि आम्हाला पण फसवंल.. "
तोच तिकडून जय ने गोळीबार सुरु केला.
एखादी गोळी चुकून लागायची बिगायची म्हणून मी थेट त्या पुलाकडे धाव घेतली.
शोले पाठ की आपला आता येतील की तीघं तिकडे,  नी त्यांच्या मागून डाकू..
हे काय आलेच..
गोळीबार सुरु..  एक डाकू बहुतेक मगाचाच धन्नो पकडणारा तो फुसका बॉम्ब आणून टाकतो.  आडवा तिडवा झोपून कैऱ्या पाडणारा जय ला आता मात्र त्या बॉम्बचा नेम येत नाही..
खरोखरच याचा काही नेम नाही..  हे विरुने बरोबर ओळखलं होतं.
शेवटी जवळून जाऊन त्याने तो बॉम्ब फोडला.  सोबत स्वतःही फुटला.

जय मरत होता.. तिकडे पुलावर आग लागली होती बॉम्बने.
दगडामागेच इतका वेळ लपलेला विरु धावत आला.
' तेरा गम मेरा गम..
तेरी जान मेरी जान.. ' गाणं वाजत होतं.  जय ने मान टाकली आणि विरुने त्याच्या हातातलं कॉईन घेतलं...
" व्वा गण्या.. काय पक्कं काम केलंस..  दोन्हीकडं व्हिक्टोरीया...  जय चा नंबर कटाप..
आता बसंती पण मेरी आणि सुनबाय पण मेरी...  गब्बर...  कुत्र्या... मी तुला सोडणार नाही..  नाहीतर मला मारुन तू बसंतीला पळवशील बिळवशील."
मिळेल तो घोडा घेऊन विरु थेट अड्ड्यावर गेला.  तिकडे सांबा काचेचे तुकडे जमा करत शिव्या देत होता.
" काय गरज होती बाटल्या फोडायची? भंगारवाल्याला दिली असती तर दोन चार रुपये आले तरी असते.  आता झाडू सुद्धा मलाच काढायला सांगा.. मोठा नाचगाणा बघायचा होता तुम्हाला..  ती फॉरेनवाली मेहबूबा मेहबूबा करत होती तेव्हा गप्पा मारत होतात आणि आता हीच्या समोर काळे पिवळे पडलेले दात विचकत होतात? "
तोच तिकडून
" कुत्र्या,  हलकटा... मी तुझं रक्त पिऊन टाकेन.. "
असं ओरडत विरु गब्बरच्या अंगावरच आला.
दे मार मारामारी..  गब्बर अर्धमेला झाला तसा तिकडून घोड्यावर बसून ठाकुर आला.  रामलाल ने त्याला खाली उतरवलं.  पायात खिळेवाले दुसरे बुट घातले आणि मग शेवटची फायटींग सुरु..
" तुझ्या साठी माझे पायच पुरेसे आहेत गब्बर..  "

फायटींग करताना सदऱ्याच्या आतून खरोखरच ठाकुरचे हात दिसत होते.
अर्धमेला झालेला गब्बर पोलिसांच्या तावडीत देऊन ते सर्व हवेलीकडे गेले.  तिकडे जय च्या मयतीची तयारी केलेली होती.
सुनबाय तिकडे गॅलरीत दिवे लावत होती.
आणि
" The End... "
चा बोर्ड आला.
माझ्या डोळ्यासमोर Exit असा ऑप्शन आला.  मी तिथे टच केल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोरचा चष्मा हटला..
मी पुन्हा मृत्युलोकाच्या खुर्चीत बसलेलो होतो.
"चला उठा आता  "
आवाज रेडेश्वर महाराजांसारखा येत होता..  म्हणून डोळे किलकीले करुन बघितलं तर समोर साक्षात्...
पत्निश्री उभी होती.
मी गुंगीतच बोललो.
" महाराज ती स्वर्गाची टुर राहीली "
" करवते मी,  स्वर्ग का नरकाची पण करवते,  उठा आता दिवसा झोपताय ते?? "

मी उठून बसलो..
तसा खुषच होतो.
"स्वर्गाची टूर " जी बाकी राहीली होती
- बिझ सं जय 

डब्बा

.....डब्बा.....
सकाळी बरोबर पाच वाजता तो त्याची टॅक्सी बाहेर काढत असे. मुलं तर झोपलेलीच बघितली त्याने इतके दिवस. रात्री घरी यायला ११ - १२ वाजत तोवर मुलं झोपून जायची. दुपारी कधी घरी जेवायला आलाच तर मुलं शाळेत गेलेली असायची. जेव्हा टॅक्सी घेतली तेव्हा दोन्ही मुलं ५-६ वर्षाची असतील. कंपनी बंद झाल्यावर मिळालेल्या पैशांमध्ये असलेली बचत टाकून टॅक्सी घेण्याचा विचार दोघांनी घेतला होता. नविन गाडी घेण्याची ऐपत नव्हतीच परंतू नाक्यावरच्या अब्दूलमियाँ कडे एक पारशी बाबा ची पद्मिनी विकायची आहे हे ऐकून होता. पारश्याची गाडी म्हणजे एकदम व्यवस्थित असते हे तो ऐकून होता. त्याने अब्दूलमियाँकडे शब्द टाकला.
" तेरे को चाहीये ना? तो ले जा.. पैसे की कोई जल्दी नहीं. लेकिन पुरा देना. मैं एक रुपये का गाला नहीं रख रहां हूँ.. लेकिन कुछ भी काम आये तो मेरे पासही आने का ". या शब्दांवर खुष होत त्याने सौदा नक्की केला. दोन दिवसाने पद्मिनी गॅरेज समोर दिसली. सफेद रंगाची चमचमणारी गाडी बघून तो हरखूनच गेला होता . पण पुढच्याच क्षणी त्याला जाणीव झाली की, हा रंग आता पुढचे दोन तीन दिवसच, नंतर काळा पिवळा एकदा चिकटला की नंतर पुन्हा सुटका नाही तिची या रंगातून.
" दूल्हारी " असे नाव त्याच्या मुलांनी ठेवले होते. बायकोला सुद्धा ते आवडले होते. काचेवर नाव टाकून घेताना दोन्ही मुलं सोबत होती.
आमीर म्हणत होता..
"अब्बा.. नीले और हरे कलर में लिखेंगे.. दूल्हारी "
तर शब्बीर हिरव्या आणि लाल रंगावर अडून होता.
शेवटी तिन्ही रंग वापरुन दूल्हारी सजली.
जास्तीत जास्त गाडी चालेल याचा तो नेहमीच प्रयत्न करत होता. जवळची भाडी, दुरची भाडी असा फरक त्याने कधीच केला नाही. कोणी हात केला तर लागलीच तो थांबायचाच. उगाच बडबड करायचा नाही. जर सवारी बडबड करत असेल तर मात्र त्याच्या गप्पांत सामिल व्हायचा. घरुन निघताना रोज १०० रुपये सुट्टे घेऊनच निघायचा, नाक्यावरच्या इराणी हॉटेलवाला त्याला रात्री सुट्टे द्यायचा. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरुन कधीही अडचण त्याला आली नव्हती. कंपनीमधल्या पगारापेक्षा जास्त कमाई होत होती. पण मेहनत दुप्पट करावी लागत होती. गृहसौख्य त्यागलंच होतं जणू. मुलं मोठी होत होती त्यांच्या गरजा वाढत होत्या. शिक्षणाचा खर्च मोठा होता त्यांच्या पण दूल्हारी पुरुन उरत होती.
कधी कधी कुरबुर करायची मग अब्दूलमियाँकडे एकदा जाऊन आली ही पुन्हा त्याच्या भाषेत " मस्का " व्हायची.
नवनवीन गाड्या येऊ लागल्या होत्या, परिवहन विभागाने नविन गाड्यांनाही टॅक्सी परवाने दिले होते. सुळकन पुढे जाणाऱ्या इतर टॅक्स्या बघून त्याला वाईट वाटे की दूल्हारी आता पुर्वी सारखी पळत नाही.
तरीही काही वेळा सवारी म्हणे...
"यह गाडी में जो बैठने का मजा है वह नयी गाडियों में नहीं. पिछे तीन आदमी आराम से नहीं बैठ सकते उनमें. "
तेव्हा त्याला स्वतःचाच हेवा वाटे.
दर रविवारी गाडी धुताना तो तिच्याशी बोले, सवारींबद्दल गप्पा मारे. बायको त्याला बोलताना पाहून हसे.
वर्ष जात होती. परिस्थिति सुधरत होती. मुलं आता मोठी होत होती. आमिर मल्टिनॅशनल कंपनीत कामाला लागला होता. चांगला पगार येत होता घरी. त्याने अनेकदा सांगितलं.. अब्बाजान आता घरी बसा, मी कमवतोय ना?
पण त्याने कधीच ऐकलं नाही.
" जब तक जिंदा हुं तब तक काम करुंगा, किसीपर बोझ नहीं बनूंगा मै "
आज त्याला सकाळी सकाळीच बोरीवलीचं भाडं मिळालं होतं.
जेजे पुलाखालीच तिघे उभे होते
आई, वडील आणि त्यांना २०-२२ वर्षांचा मुलगा. वडीलांनी हात केला होता टॅक्सी बघून. मुलगा मात्र ही नको दुसरी बघू नविन येईल की, असं बोलत होता. परंतू सकाळी सकाळी लवकर टॅक्सी बाहेर काढणारे भरपुर कमी असतात हे वडीलांना माहीत होतं. त्यांनी पुढचा दरवाजा उघडला आणि आत बसले. नाईलाजाने मुलालाही बसावे लागले.
गाडीत बसल्या बसल्या तो बोलला
" जरा जल्दी जल्दी चलाना चाचा. बहन को हॉस्पिटलमें लेके जाना है. वह बोरीवली में है दत्तपाडा में. "
" हां बेटा.. सी लिंक से लेता हूँ चलेगा ना जल्दी जा पायेंगे थोडा खर्चा ज्यादा होगा टोल का लेकीन जल्दी जा पायेंगे. "
वडील बोलले.. " आप जहांसे लेके जाना चाहें वहां से चलो टोल हम देंगे "
मुलगा आई ला धीर देत होता,
" तू डर मत ४० -४५ मीनीट में हम पहुँच जायेंगे.. कुछ नहीं होगा जिजाजी है ना वहाँ पे? "
त्यांच्या बोलण्यावरुन त्याच्या लक्षात आले की मुलगी पहिलटकरीण आहे आणि सासरीच आहे. जागेच्या अडचणीमुळे माहेरी आणता आले नव्हते तिला. गाडी पेडर रोड वरुन हाजी अली दर्ग्यासमोरुन जाऊ लागली. वडीलांनी अल्लाह कडे दुवा मागितली मुली साठी. आई सुद्धा डोळे पुसत काहीतरी तोंडातल्या तोंडात बोलत होती. मुलगा मात्र...
" चाचा जरा भगाव ना.. पुरा रस्ता खाली है. नयी वाली होती तो अब तर सी लिंक पार कर लिया होता. "
त्याचंही काही चुकीचं नव्हतं, बाजूने नविन टॅक्सी भरकन जात होत्या. मॉल समोरचा सिग्नल कोण जाणे चालू होता. सकाळी ७ वाजता सिग्नल चालू होता. पुढे कोणीतरी नवशिक्या गाडीवाला होता. त्यामुळे यांना देखील थांबावे लागले. सिग्नल हिरवा झाला. आणि क्लच सोडताना पहिल्यांदा दूल्हारी बंद पडली त्याची. लायसन्स मिळाल्यानंतर गेल्या २०-२२ वर्षात गाडी पहिल्यांदाच बंद पडली. नेहमी पहिल्याच चावीत सुरु होणारी दुल्हारी चालूच होईना. मुलाच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या. दहा बारा वेळा प्रयत्न केल्यावर ती सुरु झाली.
परंतू याच्या मनात मात्र काहूर माजले होतं. दुल्हारी अशी कधीही बंद पडली नव्हती. नेमकं काय झालं असेल. वरळी सीफेस च्या बाजूने जाताना सुद्धा त्याला घाम फुटला होता.
सी लिंक वर गाडी वळली, आता मात्र त्याने चांगली गाडी पळवली. गाडीने चांगला मौसम पकडला होता. सी लिंक चा पिंजरा आला आणि अचानक मान टाकल्यागत दुल्हारी बंद झाली.. ७० च्या स्पीड वरच ती बंद पडली.
" क्या हुआ, भाई? " वडीलांनी विचारलं.
" देखता हूँ साहब. " म्हणून तो खाली उतरला. बोनेट उघडले पण सर्व काही ठीकठाक होते.
काही कळेना...
त्याचे डोकेच काम करेगा.. पुन्हा चावी फिरवून पाहीली, पण काहीच उपयोग नाही. आता मात्र मुलगा भरपूर चिडला..
" अब्बा आपको बोला था मैने के डब्बा छोड दो, नयी टॅक्सी मिलती. अब इस सी लिंक पर हमें कहाँ मिलेगी दुसरी टॅक्सी पुरा देड किलोमीटर चलना पडेगा अभी.. इस डब्बे के वजह से हमको बहुत लेट होने वाला है... "
तो शांतपणे ऐकत होता...
मनातल्या मनात म्हणत होता
" दुल्हारी आज दगा मत दे. आज तेरी इन लोगोंको जरुरत है, अभी नहीं चली तो इनको बहुत तकलीफ होने वाली है. जल्दी सुरु हो जा. "
इकडे प्रयत्न चालू होते पण यश काही येत नव्हते. आई तर रडू लागली होती.
" या अल्लाह.. क्या हो रहा है यह हमारे साथ? "
दुल्हारी थांबून आता दहा मिनीटं झाली होती. तो बोनेट उघडून पाहत होता परंतू नेमकं काय झालंय ते त्याला अजूनही कळाले नव्हते. आता त्याला दुल्हारी पेक्षा या लोकांना दुसरी टॅक्सी मिळवून देण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायचा होता. त्याला अचानक अन्वरची आठवण झाली त्याची गाडी वरळी पेट्रोलपंप असते तो पटकन येऊ शकेल.
लगेच त्याला फोन केला. अन्वर गाडी घेऊन दहा मिनीटात पोहचला.
" इनसे भाडा मत लेना.. तेरा जो होगा वो मै दुंगा लेकीन इनको जल्दी पहुंचा " बाजूला नेऊन त्याला सांगितले.
वडीलांनी पैसे देऊ केले पण याने ते घेतले नाही.
" मेरी दुल्हारी के वजह से आपको तकलीफ हुई है.. आप जल्दी जाओ ये जल्दी पहुंचा देगा आपको".
मुलगा चरफडत त्या नविन टॅक्सीत बसला. नविन टॅक्सी सुरु झाली.
मुलाने डोके बाहेर काढले आणि ओरडला...
" हो सके तो यह ' डब्बा ' यहीं धकेल दो पानी में "
डब्बा... डब्बा... डब्बा...
हा शब्द त्याच्या कानात घुमत राहीला. नाईलाजाने त्याने दुल्हारी कडे मोर्चा वळवला. पुन्हा एकदा चावी फिरवून पाहीली. काही वेगळं घडलं नाही. त्याने नाईलाजाने अब्दूलमियाँला फोन केला. ...
घरी आल्यावर त्याने बायकोला समोर बसवले..
"सुन.. दुल्हारी बेचनी है. नयी लेनी पडेगी.. आज दगा दिया उसने... "
तिच्या कानावर विश्वासच बसेना..
" ऐसा क्युं बोल रहे हो आप? आमिर जब बेचने के बारे में बोला था तब उसे कितना बोले थे आप"
तो काहीच बोलला नाही. तसाच बाहेर निघाला... अब्दूलमियाँच्या गॅरेजवर गेला. तिथे दुल्हारीचं इंजिन बाहेर काढून ठेवलेलं. अब्दूलमियाँने त्याला बोलावले...
" देखो मियाँ.. गाडी को गाडी की तरह चलाने का.. उसपे प्यार नहीं करने का.अभी इस गाडी के पार्ट भी नहीं मिलेंगे. अब इस डब्बे को भंगार में बेच दो "
डब्बा... डब्बा... डब्बा...
पुन्हा तोच शब्द...
" हां बेच दो... अब्दूलमियाँ... मै भी थक गया हूँ अभी... जो भी आएगा वो भिजवादो घर पें... "
डोळ्यातले अश्रू लपवत तो निघाला... एकवार दुल्हारीवर हात फिरवून घेतला आणि तिला निरोप दिला. आतल्या वस्तू काढून घेतल्या.
घरी गेला तेव्हा आमिर घरी आला होता.
" अब्बा आपने अच्छा फैसला लिया यह.. अब आराम करो घरपे.. "
काही न बोलता तो खिडकीत बसला. तिथून त्याला गॅरेज दिसत होते...
आणि..दुल्हारीवर पडणारे घाव त्याला ऐकू येत होते.
घण्ण... घण्ण.. घण्ण..
- सं जय