Sunday, 7 August 2016

श्रावण... निसर्ग आणि क्लिक

...श्रावण.. निसर्ग आणि क्लिक...

सलग तीन दिवस सुट्टी असल्याने गावी जाणे झाले होते. मुलांना देखील पावसात भिजायचं होतं, म्हणून संपुर्ण सुट्टी धम्माल करायची हे ठरवूनच गावी गेलेलो. त्यामुळे सोबत कॅमेरासुद्धा नेला होता. तेव्हा बटण दाबलं की फोटो पडतो  एवढंच माहीती होते.
  श्रावण सुरु झाला होता. गाडीतून गावी जाताना कोकणातले ते हिरवं वैभव बघताना डोळे दिपूनच जातात.  यावेळी निसर्ग एक वेगळाच हिरवा रंग घेऊन असतो.

 रंगाचे नाव काहीही असेल..  मी मात्र त्याला कोवळा हिरवा रंग म्हणतो.  त्या रंगात नुसता टवटवीतपणा असतो. मध्येच येणार्‍या पावसाचे तुषार तोंडावर घेत घेत, जोरातच पाऊस असला तर थोडासा हात बाहेर काढून तो पुर्ण भिजवत आम्ही गावी पोहचलो.  मुलांनी गेल्या गेल्या ओढ्यावर न्यायला लावले.  त्यांचे तिथे फोटो काढले.  दोन तीन तास गार पाण्यात मनसोक डुंबून झाल्यावर त्यांना अक्षरशः ओढत घरी न्यावे लागले.
दमून आल्यामुळे मुलं पटकन जेऊन झोपली सुद्धा.  मग मी रिकामा झालो.
पाऊस रिमझिमच होता.  त्यावेळी मी घरुन निघालो..असाच फिरायला..  खिशात कॅमेरा सहजच टाकला.  गावासमोरचा डोंगर डांबरी रस्त्यानेच चढलो.  पण नंतर डांबरी रस्ता सोडला.  कारण डांबरी रस्त्यावर एक कृत्रिमपणा होता.
पायवाटेवरुन जाताना जाणवलं की आपली माती काय असते ते.  चप्पल हातात घेतल्या आणि पायवाटेवरच्या साठलेल्या पाण्यात पाय टाकत टाकत पुढे जाऊ लागलो.  श्रावणात पाने, फुले, वेली एक वेगळाच अवतार घेतात.  एक रानटी फुल दिसलं. रानटी भेंडीचेचं पिवळधम्मक,  सहज म्हणून त्यावर कॅमेरा रोखला.  क्लिक करु की नको असा करत असताना कॅमेरा ऑटो फोकस मोड वर सिलेक्ट असल्याने कॅमेराने स्वतः माइक्रो मोड घेतला.  फोटो " क्लिक " झाला.  फोटोचा व्हु ऑन असल्याने पाच सेकंद तो माझ्या डोळ्यासमोर राहीला.
मी लहानपणापासून फोटो काढत होतो.  बटण दाबलं..  खच्याक आवाज आला की पडला फोटो.  एवढंच साधं सोप्पं गणित आपलं.  आत्ता जे समोर दिसत होतं ते इतकं सुंदर होतं की...  फुलावरचा एकूण एक रंध्र दिसत होता.  पिवळधम्मक फुल आणि मध्यभागी मातकट रंग.
अहाहा......!
मोठ मोठे फोटोग्राफर हे असले फोटो कसे काढतात हा प्रश्न मला नेहमी पडलेला असायचा.  त्या एका " क्लिक " ने मला खजिना गवसला.  मी चहूबाजूला शोधू लागलो.  अजून काय..  अजून काय..
समोरच बांध होता, बांधावर काही रानटी वनस्पती उगवल्या होत्या. गेलो तिकडे..  कॅमेरा बांधावर ठेवला.. समोर क्षितिज दिसत होतं. अतिशय सुंदर दिसणारं तेरड्याचं छोटसं रोपटं तिथे वाऱ्याने मंद मंद डुलत होतं.

त्याला कॅमेराच्या मध्यभागी घेऊन..  हळूहळू क्लिकचं बटण दाबलं.  ऑटो मोड ने पुन्हा कमाल केली.  समोरचं ते तेरड्याचं झाडं स्पष्ट करुन मागचे आभाळ साधारण धुरकट केलं.  पुढचे पाच  सेकंद मी तो फोटो बघतच राहीलो.  मन नाही भरलं म्हणून पुन्हा प्ले करुन तो फोटो समोर आणला.  मला नव्याने फोटोग्राफी समजली होती.
काय टिपू आणि काय नको असं झालेल . समोरच घाणेरीचे झाड त्याच्या नारंगी लाल फुलांनी मला खुणावत होतं.  या फुलझाडाला निव्वळ त्याच्या फुलाच्या दुर्गंधावरुन घाणेरी म्हणणे हा खरंतर त्या झाडावरचा अन्याय आहे. इतकी सुंदर, लहान लहान मनमोहक फुलं हिरव्या रंगाच्या पार्श्वभुमीवर सुंदर दिसतात हे प्रत्यक्ष पाहणाऱ्यालाच समजू शकते.  मी कॅमेरा घेऊन तिच्याकडे सरसावलो.  जवळ गेल्यावर तिचा तो दुर्गंध आलाच पण माझ्यासाठी तो दुय्यम होता.  'आंधळा मागतो एक,  देव देतो दोन ' प्रमाणे  "घाणेरी" च्या फुलांवर लहान मधमाशी फिरत होती.
 मग मी कॅमेरा तळहातावर स्थिर करुन एक पाय पुढे आणि एक पाय मागे करुन क्लिकचं बटण पकडून ठेवलं.  मधमाशीला माझं अस्तित्व जाणवू न देता फोटो काढत सुटलो.  तिच्या पंखांचे स्थिर चित्र दिसेपर्यंत फोटो काढले.  २०-२२ फोटोंपैकी सर्वात चांगला फोटो ठरवून बाकीचे लागलीच काढून टाकले.
हे करत असताना माझे लक्ष पायाजवळ गेले.  तिथे अगदीच लहान लहान तीन मशरूम्स उगवले होते. जवळ जाऊन फोटो काढले परंतू मन भरेना.  या छत्र्यांच्या खाली कसं असतं हे एक कुतूहलसुद्धा शमवावं म्हणून जमिनीवर कॅमेरा ठेवला खालून फोटो काढला.
मागचं भरलेलं आकाश आणि मायक्रो सेटिंग मुळे तो फोटो मी काढलेल्या  फोटोंमधला अजून पर्यंत सर्वोत्तम झालाय.
असेच पुढे पुढे चालत एक लहान ओहळ दिसला. अचानक डोक्यात कल्पना सुचली..  सरळ त्या ओहळातच उतरलो पाणी भयंकर थंड होतं.  पाण्याला हाताचा स्पर्श होईल इतक्या जवळ नेऊन कॅमेरा हातावर धरला आणि क्लिक केलं.
 मनात जसा हवा होता तसा फोटो निघाला.  दोन्ही किनाऱ्यांना हिरवेगार गवत आणि समोरुन वाहत येणारे स्वच्छ पाणी.  तेवढ्यात समोरुन एक फुलपाखरु गेलं काळ्या रंगाचं..  तिथे सुद्धा घाणेरीची झाडं होती त्यावर बसलं.  मी अलगद त्याच्या जवळ गेलो.  हळूवारपणे कॅमेरा लावून धरला आणि पंख उघडायची वाट बघू लागलो.
अलगद पंख उघडले आणि मला माझा फुलपाखराचा पहिला फोटो मिळाला.  तिथेच बहुतेक आंबा किंवा काजूची कलमे लावण्यासाठी खड्डे खोदलेले होते.  खड्ड्यातल्या पाण्यात आभाळ दिसत होतं म्हणून ते टिपायचा प्रयत्न करत असताना मला खड्ड्यातून बाहेर काढलेल्या मातीत हालचाल जाणवली.  बारकाईने बघितलं तर अगदी करंगळीच्या नखाएवढा हिरव्या - सोनेरी रंगाचा त्या गवतात बेमालूम लपलेला बेडूक होता. त्याची सुंदरता निव्वळ पाहण्यासारखीच होती.
नुसत्या डोळ्यांनी कदाचित ती दिसली नसतीच.  परंतू जेव्हा तो बेडूक माझ्या कॅमेऱ्यातून पाहीला तेव्हा तो अतिशय मनमोहक दिसत होता.
समोरचा निसर्ग नुसता हिरव्या साडीतल्या  नववधूप्रमाणे सजला होता.  झाडांवर पक्षी होते. परंतू माझ्या कॅमेऱ्यातून दुरचे फोटो काढण्याची मर्यादा होती म्हणून त्यांच्या नादी लागलो नाही.  समोर तिळाचं शेत दिसत होतं.. पिवळ्या फुलांनी बहरलेलं पुर्ण शेत एका सुंदर पिवळ्या दुलई सारखं वाटत होते.  शेताच्या बांधावर रानटी रोपटी उगवली होती.  त्यांच्यावरही शुभ्र फुले बहरली होती.  त्या फुलांवर नेमकी गांधीलमाशी आली.
 पुर्वी गांधीलमाशी म्हटले की मी खुप घाबरायचो.  पण आता कॅमेऱ्यापलीकडून मला त्या गांधीलमाशीत सौंदर्य दिसत होतं.  हिरव्या गार पार्श्वभुमीवर तिचा काळा पिवळा रंग स्पष्ट उठून दिसत होता.  सारखी इकडून तिकडे ये जा करत होती त्यामुळे तिला कॅमेऱ्यात पकडणं कठिण झालेलं.  पण मग कॅमेऱ्यातल्या ' इमेज स्टेबलाईजर ' ची आठवण झाली.  केला क्लिक..  तिच्या उडण्याच्या गतीबरोबरच कॅमेरा फिरवत असल्याने मला अगदी हवा तसा फोटो मिळाला.
जरा अंधार जाणवला म्हणून मनगटातल्या घड्याळ्यात डोकावलं..  मी चक्क पावणेदोन तास भटकत होतो.  एव्हाना माझ्याकडे भरपूर फोटो जमा झाले होते. श्रावण आणि निसर्गाचा खजिना घेऊन मी परत घराकडे निघालो.  घराच्या गेटजवळच एक भला मोठा बेडूक दिसला.  त्याच्या अगदी जवळ जाऊन..  जवळ म्हणजे माझा कॅमेरा आणि त्याच्यात पाच सेंटीमीटरचेच अंतर असेल एवढं.
शेवटी त्याने वैतागूनच बहुतेक थेट माझ्या अंगावरच उडी मारली. कधी एकदा ते फोटो घरच्यांना दाखवतो असे झालेले.  घरासमोरच्या शोभेच्या झाडांच्या कुंडीत सदाफुली नेहमी प्रमाणे फुलली होती.  तिचा फोटो काढायला गेलो तर पानावर एक अगदी छोटा नाकतोडा दिसला.
हिरवागार होता.  निसर्गाची कमालच आहे.  हेच किटक उन्हाळ्यात मातकट रंगाचे असतात.  तर पावसाळ्यात त्यांचा रंग वातावरणासारखा असतो.  मी फोटो काढतोय म्हणून की काय तो वेगवेगळ्या पोझच जणू देऊ लागला.  त्यातला पानाचा आडून बघतानाचा फोटो मला स्वतःला खुप आवडला. बाजूच्या शोभेच्या झाडावर पानाखाली एक मच्छर लटकत  होता.

त्याला ही बंदिस्त केलं.  शेवटी ओटीवर झोपाळ्यावर जाऊन बसलो.  समोर गरमागरम चहा आला होता.  एवढे फोटो काढूनही मन अतृप्तच होतं.  म्हणून शोधक नजरेने अजून काही दिसतंय का ते पाहू लागलो.  झोपाळ्याच्या दोन्ही दांड्यांना धरुन एका कोळ्याने जाळं विणलेलं दिसलं.
हा फोटो घ्यायला खुप म्हणजे खुपच वेळ गेला.  कारण जाळ्याचे तंतू इतके बारीक असतात की त्यांच्या वर फोकस होतंच नव्हता.  मग शेवटचा पर्याय म्हणून हलकासा स्पर्श त्या जाळ्याच्या मध्यभागी केला.  तसा एका बाजूने सरसरत कोळी आला.  आणि तो बरोबर मध्यभागी जाऊन थांबला. आता कोळ्यासोबच जाळ्याचे तंतू सुद्धा स्पष्ट झाले.
मागे घराची पार्श्वभुमी आणि त्यासमोर तो जाळ्यातला कोळी..
दिवस संपत आला होता. ...

त्यादिवशी मला फोटो काढता येतात हे समजलं.  त्याचसोबत " फोटोग्राफरकडे नुसता महागातला कॅमेरा असून उपयोग नाही.  तर त्याला ती शोधक नजरही पाहीजे.  " हा मंत्र मी स्वतः शोधला.
आजही मला त्याच कॅमेऱ्यातून जवळचे फोटो काढायला आवडतात.

- बिझ सं जय

No comments:

Post a Comment