Monday, 1 August 2016

तडा

नाही...

मी नाही म्हटलंय..
सोडा..
जा जाऊन तिकडे झोपा..
ती मान फिरवून रागाने कुस बदलून भिंतीकडे बघत राहीली.
तो तिच्या पाठी कडे पाहतच राहीला..
नाही म्हणण्याची एवढी हिंमत तिच्यात कुठून आली? एरवी उठ म्हटलो की उठ आणि बस म्हटलो की बसणारी ती आज मोठ्या आवाजात माझ्यासमोर बोलत होती याचा त्याला विश्वासच बसत नव्हता.
तरीही त्याने संयमाने विचारले..
" काय झालंय?  तू अशी का बोलतेस?"
मानही न फिरवता ती बोलली, " मग अजून कसं बोलू? "
शब्दाने शब्द वाढेल म्हणून तोही शांत जाऊन झोपला.
ती मात्र तशीच भिंतीकडे बघत होती.  भिंतीवर दोघांचा फोटो होता लग्नातला.  पिवळ्या साडीत ती आणि पांढऱ्या झब्ब्यात तो.  फोटो बघत बघतच तिच्या मनात विचारांनी गर्दी केली... तो सकाळी आंघोळीला गेला असताना मोबाईल वाजला म्हणून नुसता पाहीला तर सुनेत्रा नावाच्या स्त्रीने "गुड मॉर्निंग" चा मॅसेज केला होता.
वर खाली स्क्रोल केल्यावर अजून काही स्त्रियांसोबत मारलेल्या गप्पा तिला दिसल्या होत्या.  रात्रभर चॅट केलेल्या त्या गप्पा होत्या.
पुरुष मित्रांनी पाठवलेले अश्लील फोटो, विडीयो सुद्धा दिसत होते.
मोबाईल चाळता चाळता एका ठिकाणी ती थांबली..
कारण तिथे तिच्या मैत्रिणीचा फोटो दिसला.  ती मैत्रिण कशासाठी प्रसिद्ध होती हे तिला चांगलंच ठाऊक होतं.  म्हणून तिने तो चॅट ओपन केला.  गुड मॉर्निंग गुड नाइट सारख्या अनेक मॅसेज मधून call me चे मॅसेज डोकावत होते.  अनेक मॅसेज डिलीट केल्यासारखे जाणवत होते.
शॉवर बंद झाला म्हणून तिने फोन जागच्या जागी ठेवला. आणि आपल्या कामाला लागली.  परंतू मनातून call me चा अर्थ तिला समजत होता.  तो झटपट तयार झाला.  आणि नाश्ता करुन गेला ऑफिसला.
लग्नाला तीन वर्ष झाली होती.
तीन वर्षात तो इतका बदलेल असे अजिबात वाटले नव्हते तिला.
मागच्या आठ महिन्यापासूनच हा फरक त्याच्याच दिसू लागला होता.  घरी आला तरी ते मोबाईललाच चिकटून राहाणे तिला पटत नव्हते.  पुर्वी तो त्याच्या ग्रुपवरच्या गंमती जमती सांगायचा,  कधीतरी पोस्ट सुद्धा वाचायला द्यायचा परंतू आता मात्र फोन हातातच ठेवत असे.

तो घरुन तर निघाला पण त्याचे लक्ष खिशातल्या मोबाईलकडेच जास्त लागले होते.  गाडीवर असताना मोबाईल वापरता येत नाही म्हणून नाईलाजाने त्याने तो खिशात ठेवला होता.
कालच एका ग्रुपवरच्या तरुणीशी फ्रेंडशिप झाली होती..  मस्त फोटो होता तिचा.  बघताच क्षणी आवडली होती ती त्याला.  नेमकी तिनेच समोरुन रिक्वेस्ट पाठवली होती म्हणून तो जास्त खुष होता.  काय म्हणता..  काय करता...  या प्रश्नांना बगल देत तिने थेट विचारलं होतं " लग्न झालंय का तुमचं? "
"नाही " उत्तर देताना क्षणभर बायकोचा चेहरा समोर आला होता त्याच्या पण नाविन्याकडे जास्त ओढा असल्याने तिचा विचार त्याने झटकला होता.  आता त्याच्या मनावर संपुर्णपणे या नवीन सौंदर्यवतीने ताबा घेतला होता.  ती सुद्धा अविवाहित होती.  २०-२५ फोटो होते तिच्या अकाउंटवर,  पण सगळे ग्रुप मधलेच होते.  फक्त प्रोफाईलला लावलेला फोटो सिंगल होता एडीट वगैरे केल्याप्रमाणे होता.
तिच्याशी कधी जाऊन बोलतोय असे त्याला झाले होते. ऑफिसचे जिने चढता चढता त्याने चॅट सुरु केलं तिचा मॅसेज होताच.
" एक काम आहे,  प्लिज नाही म्हणू नका "
बोला ना..  टाईप करुन त्याने सेंड केलं.  क्षणार्धात टाइपिंग सुरु झालं समोरुन..  भरपूर वेळ चाललं.
नंतर स्क्रिनवर मॅसेज झळकला..
"मला काही पैशांची गरज आहे. वडील आजारी आहेत.  आई आमच्यासोबत नाही.  होते ते पैसे हळूहळू संपले.  आता वडिलांना जगवायचं तर पैसे हवेत.  मी घरबसल्या पॅकिंगची कामं करते, पण त्याने घरखर्च भागतो कसा बसा.  वडील आजारपणामुळे नोकरी गमावून बसलेत.  सोनोग्राफी करायला सांगितली डॉक्टरांनी,  ५ हजार तरी लागतील.  मी माझ्या कडे आले की तुम्हाला लगेच परत देईन...  प्लीज प्लीज नाही म्हणू नका.  माझ्या वडिलांचा अकाउंट नंबर देतेय त्यावर ट्रांसफर करा.
मी खोटी नाही, हवं तर प्रत्यक्ष भेटायला सुद्धा मी तयार आहे.  कराल ना मदत मला? "

वाचताना याच्या डोक्यात असंख्य प्रश्न सुरु झाले.  मी फसणार तर नाही ना?
प्रत्यक्ष भेटायचं म्हणते तर खोटी कशी असेल ती?
खरोखरच गरजू असली तरी आपल्याकडे अकाउंट मध्ये ८ हजार शिल्लक त्यातले ५ दिले तर राहीलेल्या पैशांवर महिना कसा निघणार?
शेवटी त्याने लिहायला सुरुवात केली...
 " एवढे पैसे नाहीत माझ्याकडे.  फार फार तर मी २ हजार देऊ शकेन "
" चालेल.... पण मी तुम्हाला भेटू कुठे?  एक काम करुया जोगेश्वरीच्या पुलाखाली भेटूया? "

ती भेटणार याच कल्पनेने तो हवेत गेला.  इतकी भेटायला बोलवतेय म्हणजे तिच्याही मनात आपल्या बद्दल काहीतरी असेलंच ना?
रविवारी रात्री  ८ वाजता भेटायचं ठरलं.  ऑनलाईनच बोलू फोनवर नको अशी तिनेच गळ घातली.
घरी हवेतच आला तो.

ती त्याच्या या नविन रुपाकडे पाहतच राहीली.  लग्न ठरवायच्या वेळी तो जसा वागत होता तसाच आता वागत होता, गाणी काय गात होता,शीळ काय घालत होता.
आंघोळीला गेला की मोबाईल बघायला मिळेल त्यावरुन कळेल.
तो आंघोळीला गेला तसा तिने लगेच फोन उचलला...
त्याचे तिचे चॅट वाचताना हिच्या डोळ्यातून पाणी सुरु झालं.  माझा नवरा स्वतःला अविवाहित सांगतो आणि इतर मुलींना भेटायचा प्लॅन वगैरे बनवतो ही गोष्ट ती सहनच करु शकणार नव्हती.
आज पाणी डोक्यावरुन गेलं होतं.
शॉवर बंद झाल्याचा आवाज ऐकून ती डोळे पुसुन त्याची वाट बघू लागली.  तो आला तसा तिने प्रश्न विचारला...
" काय हो रविवारी कुठे जाणार आहात रात्री ८ वाजता? "
हा धक्का त्याच्यासाठी अनपेक्षित होता.  त्याला कळून चुकलं की आता सर्व खेळ संपला.  परंतू उसने अवसान आणून चिडून त्याने विचारले...
" का घेतलास तू माझा फोन??
मी काय हवे ते करेन.  तूला त्यात पडायची काही गरज नाही,  मी तुला कुठे कमी पडतोय का?
मग मी बाहेर काय करतोय याचा तू विचार करु नको.  "

" मी तरी कुठे तुम्हाला कमी पडतेय?  तरीही तुम्ही बाहेर शेण खाताय ते?
कोण कुठली ती मुलगी तिला का म्हणून पैसे देणार तुम्ही?
काय गरज म्हणते मी?  काय संबंध आहेत तुमचे तिच्याशी? "

" हे बघ, तोंड आवर.. नको ते आरोप टाकू नको माझ्यावर.  मी माणूसकीच्या नात्याने तिला मदत करतोय. तू वाचलंस ना सर्व?  तरीही?? "

" हो तर सर्व वाचलंय किती बायकांसोबत गप्पा मारता,  काय काय घाणेरडं बोलता त्यांच्यासोबत, सर्व वाचलंय..  कधीतरी फसाल मग माझी आठवण येईल.  "

त्याने मग शांत रहायचे ठरवले. ...
त्याने मोबाईल ऑन केला आणि पोस्ट वाचत सुटला
अबोला सुरु झाला होताच.
रविवार उजाडला...  संध्याकाळी ७ वाजता तो तयार होऊन निघाला तेव्हा तिने पुन्हा एकदा सांगितले...
" नका जाऊ ना..  मला भिती वाटतेय की तिथे काहीतरी वाईट घडणार आहे "

" हे बघ तू संशय घेतलाच आहेस ना?  मग तो खरा करायलाच जातोय असं समज, मी बाहेरुनच जेवून येईन. "
ती रडत राहीली,  तो निघाला..  चार स्टेशन नंतरच जोगेश्वरी..  तिथे पोहचल्यावर त्याने तिला मॅसेज केला.. " आलोय मी..  "
" कोणत्या रंगाचे कपडे घातलेत तुम्ही " तिचा रिप्लाय आला.
"ब्लू कलर चा चौकटीचा शर्ट आहे. "
इकडे ती रडून रडून डोळे सुजवून बसली होती..  पुढे काय होणार माझ्या संसाराचे..  तीन वर्षाचा संसार असा मोडीत निघाला तर कसे होणार आता?
इतक्यात...
लॅन्डलाईन ची रिंग वाजली...  तिने घड्याळात पाहीलं साडे नऊ वाजले होते..
रिसीव्हर उचलला..
समोरचे बोलणे ऐकून तिने डोक्याला हातच लावला...
रिसीव्हर ठेवून तीने तसाच भावाला फोन केला. ...
" बंधू लवकर घरी ये आपल्याला हॉस्पिटलला जायचंय..  "
पाचच मिनिटात भाऊ घरी आला.  तिने घडलेला प्रसंग सांगितला..
हॉस्पिटलला जाऊन त्याच्या समोर उभी राहीली.  त्याच्या डोक्यावर भलं मोठ्ठं बँडेज होतं..  हातावर चाकूचा वार झालेला होता.  शर्ट पुर्ण रक्ताने माखलं होतं.  गळ्यातली चैन, दोन अंगठ्या,  हातातलं चांदीच कडं..  सर्व गायब होते..  नेहमी हातात असणारा त्याचा लाडका फोन ही दिसत नव्हता.
" झाला का शांत जीव?? करुन झाली समाजसेवा?  लफडी करायची होती ना..  घ्या फळ आता..  "
भाऊने मध्ये पडून थांबवले.  "भावोजी काय झालं,  कोणी मारलं? "
त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता...
तेवढ्यात हवालदार आले
"ही सातवी केस आहे.  सेम मोडस ऑपरेंडी.  फेसबुकवर चॅट करुन प्रेमात पाडायचं,  मग कधीतरी एकांतात बोलवायचं.  आणि मग लुटमार.  परवाच्या केस मधला माणूस कोमात गेलाय..  तुमचं नशीब की तुम्ही शुद्धीवर आहात.
सांगा किती लोक होते? "

"मला नाही आठवत,  मागून कोणीतरी डोक्यात मारलं.  खाली पडलो तसा चैन वगैरे खेचायला लागला म्हणून विरोध केला तर चाकूचा वार केला,  म्हणून विरोध न करता सर्व नेऊन दिलं, मला वाटतं तिघं जण तरी असतील.  "
हवालदार.. " चेहरा बघितला काय?"
" नाही खुप अंधार होता."
ती दुरुनच सर्व ऐकत होती..
तिच्या मनात प्रश्न पडलेले...
की..
आपल्याला झिडकारुन गेलेल्याला पुन्हा त्याचे स्थान द्यायचे का?
आता त्याला आपली गरज आहे की नाही?
धडा तर शिकला पण आता तो विश्वासाला पात्र राहीलाय का?
डोक्याची जखम एकवेळ भरुन निघेल पण..
संसाराला गेलेला तडा कधी भरेल का?

No comments:

Post a Comment