Tuesday, 9 August 2016

वेडी

... वेडी ...

आज पुन्हा फाडायला पुर्ण पुस्तक दिले होते मामाजीनं.  मी त्यातल्या एकूण एक कागदाच्या चिंध्या चिंध्या केल्याशिवाय शांत बसणार नव्हते.  मी फुटपाथच्या कडेवर बसली..  पाय लांब सोडून.  परवा समोरच्या बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरच्या भाभीने टीशर्ट दिला होता त्याची खालची कड कापून माझ्या मापाचा केला होता मी.  स्कर्ट म्हणून जी लुंगी होती तीच होती.  त्याच लुंगीत ते पुस्तक ठेवलं आणि टर टर पान फाडायला लागली...

-प्रत्येक टर टर आवाजाबरोबर मला माझा फाटणारा ब्लाऊज आठवत होता. ..

तिकडून तो कुत्रा फिरवणारा माणूस आला.  त्याच्या कुत्र्याचा मला खुपच राग.  घराच्या समोरुन जाताना सुद्धा माझ्यावर भुंकायचा.  कुत्रेवाला तरी त्याला मुद्दाम माझ्या जवळ आणायचा.  मी शिव्या द्यायचे हे बघून त्याला आणखीनच चेव यायचा.  तो नुसता हसायचा.
मग मी त्याला शिव्या दिल्या की तो निघायचा तिथून....
मी मग पाने फाडायची...  टर्र ss टर्र ss..
मग विचार केला. ..  सर्व पुस्तक आताच फाडलं तर दुपारी काय फाडू?  जेवढी पानं फाडलेली तेवढी सर्व जमा केली आणि राहीलेलं पुस्तक नेहमीच्या जागी अडकवलं.  रस्त्याचे मधोमध नेऊन ती फाडलेली पानं ठेवली त्यावर दगड ठेवला....  आणि कुठली गाडी येतेय काय ते बघत राहीली.
गाडी आलीच नाही म्हणून त्यातले दहा बारा तुकडे उचलले आणि डोक्यावर ठेवले...

- डोक्यावर पदर होता माझ्या. लग्नाच्या शालूचा पदर.  तो आला..  त्याने खसकन तो ओढला...

पानं मागे पडली तशी मी हसली.  शाळेतल्या मुलांना सोडायला आलेल्या त्यांच्या मम्मी खुदकन हसल्या.
" अगं , ती वेडी आहे.  दिवसभर इथेच असते.  रात्री कुठेतरी गायब होते.
काय माहीत कुठे जाते ती. कोणीतरी हिचा फायदा घेत असणार "
एका दोघींचा चुकचुकण्याचा आवाज....
मी उलट फिरुन त्यांनाच शिव्या देते. सगळ्या मुलांना घेऊन पळतात. मी पडलेली पानं पुन्हा जमवते.  त्यांचे आणखी तुकडे तुकडे करते.  तिथे एक गाडी उभी असते तिच्या वर ठेवते..  त्यावर एक दगड..

वरुन ती जाडी ओरडते..
" ए..  पागल हटा वहां से ओ कागज.  सेठ अभी आ रहे हैं नीचे.  "
मी तिला शिव्या देते.  शेठ भला माणूस..  रोज दहा रुपये देतो.

- शंभरच्या दहा नोटा त्याने मामीच्या हातावर ठेवताना मी बघितलं होतं.  पण पुढे हे असं काही होईल हे माहीत नव्हतं.

शेठ समोरुन आला.  खिशातून दहा रुपये दिले.
" आज वडापाव नको खाऊ..  कांदेपोहे खा..  रोज वडापाव खाऊन तब्येत खराब होईल.  "
मी, हो..  हो..  म्हणत मान डोलावली.  दहा रुपये मुठीत दाबून धरले.  शेठ ने गाडीवरचा दगड बाजूला केला.
 " उद्या पुन्हा दगड ठेवलास तर १० रुपये देणार नाही "

मी धावत स्टॉल वर गेली.  पोऱ्याने वैतागून विचारलं
" काय देऊ? "
" पोहे दे..  दहा रुपयाचे " मी डिशकडे बघत बोलले.
त्याने पळी पोह्यांच्या टोपाला घासून एक दोन वेळा पळी टोपावर मारुन दोन पळ्या डिशमध्ये ओतल्या.
" अजून दे की, अर्धा पळी " मी हावरटासारखी बोलले.
"डिश भरली जागा नको काय.  दहा रुपयाचे एवढेच येतात "
मी डिश उचलली.  त्याला शिव्या द्यायच्या होत्या, पण मग उद्या त्याने पोहे, वडा दिला नसता.  पुन्हा फुटपाथवर नेहमीच्या जागेवर आले.  मुठभर पोहे उचलले...

- समोर ताटली होती,  तिच्यात त्याने भात टाकला.  त्या वर पिशवीतून आणलेली पिवळी डाळ ओतली.  ताटली माझ्याकडे सरकवून म्हणाला...
"खा,  नाटक करु नकोस..  दोन दिवस अजून मग तुला घरी नेईन "

पायाजवळ लाल मुंग्या होत्या सकाळी साखर टाकली, त्यालाच आल्या होत्या.  मी त्यांच्यावर पोहे टाकले.  तशा त्या इकडे तिकडे पळायला लागल्या.  मग सगळीकडे पोहे टाकले..  मुंग्या पळाल्या.
"वो देख..  पागल औरत है..  सब खाना इधर उधर फेंक दिया.. " कठड्यावर गॉगल लावून बसलेली पोरगी त्याच्या सोबत असलेल्या पोराला सांगू लागली.
त्याने माझ्याकडे पाहीलं.

-तो माझ्याकडे नाही तर माझ्या शरीराकडे बघत होता. मला अर्धवट शुद्ध होती.  भरपूर प्रयत्नाने मी डोळे उघडे ठेवले.  तो मला स्वतःच्या अंगावर खेचू लागला.

 मी त्या दोघांना शिव्या दिल्या तशी ती दोघंही तिथून पळाली.  समोरुन झाडूवाला येत होता.  त्याने विचारलं..
" काय आज पोहे होते का??  कधीतरी पुर्ण खा.. काल अख्खा वडा त्या डोंगळ्यावर दाबलास.  "
मी फक्त त्याच्याकडे बघून हसले.

" आणि हा कचरा कशाला पसरवून ठेवलास? दिवसातून किती कचरा करतेस तू?  परवा त्या २७ नंबर च्या तळमजल्यासमोर सगळी पानं फाडून ठेवलीस.  मलाच सगळी जमवायला लागली.  काय मिळतं तूला पानं फाडून? "
 तो चिडून बोलत होता.
मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.  तिथून उठले.
झाडूचा आवाज येत होता.

- सटासट तो मला त्या झाडूने मारत होता.  ओरडत होता...
" तुला काहीच माहीत नाही?  साली..अनाडी, पैसे फुकट गेले माझे."
प्रत्येक फटक्याबरोबर मी अधिकच खंबीर होत होते.  मी विकली गेलीय..  पुढे माझ्यावर काय काय प्रसंग येणार हे सुद्धा कळायला लागलेलं.

समोरुन ती संस्थेची बाई येताना दिसली.  मी तिला चुकवायचा प्रयत्न केला पण तिने मला गाठलंच.
" पळू नको,  हे घे काही कपडे आहेत.  आणि ते तसेच घाल.  फाडू वगैरे नको.  या पिशवीत काही बिस्किटपुडे आहेत.  मग येतेस ना तू आश्रमात?  तुला काही त्रास होणार नाही उलट डॉक्टर औषधे देऊन तूला बरं करतील.  किती दिवस अशी वेडीच राहणार तू? "
मी तिच्या हातातून पिशवी घेतली.  आत पुस्तक नव्हतं.
" कागद कुठाहेत " मी ओरडले..
ती घाबरलीच. ..  एक पाऊल मागेच सरकली.
" नाही आणला...  " ती घाबरुन बोलली. ." पण हे बघ, आश्रमात खुप कागद आहेत.  "
तिने दिलेली पिशवी तिच्या अंगावर फेकून तिला शिव्या दिल्या तशी ती पण निघाली.

 - अचानक शिव्या द्यायला सुरु केल्याने तो सुध्दा बिथरला.  माझ्यावर जबरदस्ती करायला लागला ब्लाऊज टर टर आवाज करुन फाटला.  पदर डोक्यावरुन कधीच पडला होता.  आता नाही तर कधीच नाही.  झटापटीत त्याचे मनगट तोंडासमोर आले.  तेच तोंडात धरले.  जितका जोर होता तेवढ्या जोराने चावा घेतला.  तो हात सोडवू लागला.  पण मी तोंड उघडलेच नाही.  माझ्या तोंडात त्याचे रक्त जमा व्हायला लागले.
त्याने दुसऱ्या हाताने पोटात फटका मारला..  माझी पकड सुटली..  रक्ताने माखलेलं तोंड बघून तो घाबरलाच.
" वेडी झालीस काय तू?? xxxx,   तुकडा पाडलास हाताचा.  "
मी त्याच्यावर पुन्हा चालून गेली.  त्याचा भेटेल तो भाग चावत गेली.  गाल, हात,  पोटरी,  मान सगळीकडे चावून ठेवलं.  रक्तबंबाळ अवस्थेत तो घराबाहेर पळाला..

समोरुन येणारा धोतरवाला म्हातारा माझ्या कपड्यांकडे पाहत होता.  त्याच्यातून काही दिसतंय का याचा प्रयत्न करीत होता.  मी बसून होती म्हणून अगदी बाजूने गेला.  पुढे काही पावलं गेल्यावर पुन्हा मागे आला.  माझ्या डोक्यावरुन आत पाहू लागला.  समोरच त्याचा पाय होता.  झडप घेतली आणि जोरदार चावा घेतला.
" पागल साली...  कोई इसको पागलखाने में डाल दो.  ऐसे बाहर घुमती रही तो सबको काटती रहेगी "
मी त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली..

- रक्ताळलेलं तोंड घेऊन मी झोपडी बाहेर पडली.  तो कुठेच दिसत नव्हता.  पिंपावर एक टीशर्ट दिसत होता तो अंगावर घातला.  खाली परकरच होता.  आता मला थांबवायला कोणी नव्हते.  विस्कटलेले केस, फाटका टीशर्ट,  आणि तोंडात शिव्या,  हत्यार म्हणून चावा..
मी " वेडी " झाले पण सुरक्षित होते.  पुरुषी श्वापदांना माझ्या त्या वेडेपणाची भिती वाटायची. फक्त कागद फाटण्याचा आवाज आला की मी माणसात यायची.  कारण त्याचा आवाजाने मला माझा ब्लाऊज फाटतानाच्या आवाजाची आठवण व्हायची ..  आणि माझं वेड पुन्हा सत्यात यायचं.

दिवस संपला की गाडीवाला शेठ घरी बोलवायचा.  रात्रीचं जेवण द्यायचा.  व्हरांड्यात झोपायला जागा द्यायचा.  त्याला माहीत होतं मी वेडी नाही ती.  पण तो देव माणूस..  कधीही वाकड्या नजरेने बघितलं नाही.  त्याची बायको उलट सुलट बोलायची त्याला,  पण तो शांत रहायचा.

श्वापदांच्या दुनियेत तोच एक माणूस होता.

रात्री झोपली की पुन्हा सर्व आठवायला लागायचे..
ते पैसे,  ती झाडू,  ती वेदना,  तो चावा, त्या शिव्या...
आणि ती वेडी नसून.... वेडी झालेली मी...
- बिझ सं जय 

1 comment:

  1. ही कथा खुप टचिंग वाटली.छान मांडली आहेस.कथा वाचताना लेखकाला अपेक्षित आहे तेच वाटायला लागते.ती वेडी नसुन ,स्वसंरक्षणासाठी वेड पांघरलेल्या मुलीची ही कथा चटका लावते मनाला.

    ReplyDelete