Monday, 1 August 2016

शुभमंगल सावधान

शुभमंगल सावधान ......


लग्न हा एक संस्कार मानला जातो. ज्यात अनेक उपदेश, माहीती आणि वचने नव्या जोडप्याला दिली जातात. तो सर्व संस्कृतीचा भाग झाला. परंतू एकूलत्या एक मुलीचा बाप म्हणून मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. ज्या मी माझ्या जावईबापूंना सांगितल्या होत्या.

- मुलगी ही तिचे घर सोडून तुमच्या घरात राहायला येणार असते, त्यामुळे लगेचच तिने आपल्या घराप्रमाणे वागावे हे कितपत बरोबर आहे? वयाची २५ वर्ष ( कमाल ) तिने एका दुसर्‍या वातावरणात घालवलेले असते ज्यात तीची जडणघडण झालेली असते. जन्माला आल्यावर तिने जे काही शिकलेले असते ते पहिल्या २५ वर्षातच शिकलेले असते. आई वडीलांचे संस्कार त्यांच्या शिकवणी ती आल्या आल्या विसरुन तुमच्या घराशी समरस होईल हा विचार कीती चुकीचा आहे.
आल्या आल्या तिला सांगितले जाते की आपल्या घराचे हे हे संस्कार आहेत, या या पद्धति आहेत. त्या सर्व पाळ.. परंतू विचार करा एका नविन वातावरणात, नविन माणसांसोबत त्यांचे स्वभाव आत्मसात करता करता ती हे सर्व कसे करु शकेल?

-इतकी वर्ष तिची ओळख असलेले तिचे नाव... तुम्ही ते बदलता, आपल्या नावाशी सुसंगत करण्याचा प्रयत्न करता, पण तिचा विचार करता का?
ती खरंतर मनावर दगड ठेऊनच परवानगी देत असते. ती आडनाव बदलतंच असते पण तुम्हाला नाव बदलायचे असते. आपण पाळीव प्राण्याला नाव ठेवतो, त्यालाही दुसर्‍या नावाने हाक मारली तर ते प्रतिसाद देत नाही. इथे तर भावभावना असलेली एक स्त्री असते. तिने त्या नावासोबत इतकी वर्ष आयुष्य जगलेले असते. तिची ओळख पुसुन खरंच ती सुखी राहील का? नाव बदलू नका तिचे.

- लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवसात ती अत्याधिक भावनिक असते तुमच्या सोबतच्या सहजीवनाला सुरुवात करता करता तिला तिच्या बालपणीच्या, लहानपणीच्या, आणि तरुणपणीच्या आठवणी हळूहळू मागे ठेवायच्या असतात. एक पुर्ण कुटूंब ज्याच्या सोबत आयुष्याचा सुवर्णकाळ तिने घालवला असतो, त्याला मागे ठेवायचे दुःख किती असेल याचा विचार तुम्ही तिच्याजागी राहून करा.

- मी एक हॉटेल व्यावसायिक आहे. हॉटेल मध्ये नविन कामगार आला की तो लगेच सर्व कामे परफेक्ट करेल आणि सर्व कामगारांसोबत लगेचच अॅडजस्ट होईल असे गृहीत धरणं चुकीचं आहे. तो काही दिवस गोंधळेल, उलट सुलट काम करेल, काही चुका हातून घडतीलच, तेव्हा मालक म्हणून मला त्याला सांभाळून घेण्यासोबतच इतर कामगारांनाही त्याला सांभाळून घ्या हे सांगितलेच पाहीजे. शिकेल तो लवकरच.

- आता मुलीचा बाप म्हणून तुम्हाला सांगतो. मुलीच्या आयुष्यात लहानपणापासुन एक हिरो असतो तो तिचा बाप, तुम्ही आज तिला साता समुद्रापलीकडे घेऊन जात आहात. पण जेव्हा इकडे याल तेव्हा काही दिवस तिला तिच्या "हिरो" सोबत घालवू द्या. असतात हो.. काही आठवणी ज्या भेटल्याशिवाय पुर्णच नाही होत.

( आज सकाळी दुकानात येताना नेहमीच्या विनय हेल्थ होम रेस्टोरेंट मध्ये मालक Anil Tembe यांच्या सोबत बोलताना त्यांनी काही विचार माझ्या समोर मांडले. हा माणूसही अत्यंत हळवा आहे हे मला आज कळलं..
विचार त्यांचे.. शब्द माझे)
धन्यवाद

No comments:

Post a Comment