Monday, 15 August 2016

गावंढळ

.... गावंढळ ....

चहापाण्याचा कार्यक्रम होता तेव्हा आलेल्या मुलाला बाबांनी नेहमीचा प्रश्न केला.
" मुंबईत खोली आहे का? "
 या प्रश्नावर येणारे उत्तरच माझा जोडीदार ठरवणार होते.

मुंबई... या शहराबद्दल माझं आकर्षण पहिल्यापासून. मुंबईतून येणारी मे महिन्याच्या सुट्टीत येणारी मुंबईची राहणारी मुलं बघितली की, त्यांचा काय हेवा वाटे मला. गावी असताना ती सर्व आमच्यासारखेच असत. पण मुंबईला गेल्यावर वर्षभरात ती पुर्ण बदलून जात. ऊनाने रापलेला त्यांचा रंग अगदी गोरा गोरा दिसे. ते सांगत त्यावरुन त्यांना नुसता आराम होता. पाणी भरायला विहीरीवर जायला नको की गुरांच्या पाठीमागे दिवसभर रानात फिरायला नको.
त्यांचे वागणे बोलणे बघून मलापण वाटायचं की आपणसुद्धा मुंबईला जायला पाहीजे, पण माझे आई-बाबा होते गरीब. शेतीची कामं संपली की बाबा मुंबईला जायचे नोकरीला. तिकडे गाववाल्यांची खोली होती, तिकडेच राहायचे. खोलीत ३० - ४० जण राहायचे. मे महिन्याच्या सुट्टीत बाबा आठ दहा दिवस मुंबईला न्यायचे तेव्हा मुंबई फिरवायचे. गेटवे ऑफ इंडिया, राणीचा बाग, चौपाटी, म्हातारीचा बुट दाखवायचे. तिकडे बाकीची लहान लहान मुले मुली दिसायची तेव्हा त्यांचा हेवा वाटायचा. किती गोरी गोरी असायची ती. कपडे पण वेगवेगळ्या रंगाचे, सुंदर डिझाईनचे नीटनेटके कडक इस्त्रीचे कपडे बघून तेव्हाच ठरवलेलं की आपण मुंबईलाच रहायला यायचं.
वय वाढलं तसं माझ्या लग्नाचा विचार घरी सुरु झाला.
मला बाबांनी विचारलं तेव्हाच त्यांना सांगितलं.
" मुंबईत घर असलेलाच नवरा हवा मला, बाकी कुणाशीही मी लग्न करणार नाही. "
आईने किती समजावलं पण मी नाही ऐकलं. मी मुंबईला घर असणाऱ्या मुलाशीच लग्न करणार ही काळ्या दगडावरची रेघ होती माझ्यासाठी.
आलेला मुलगा दिसायला चांगला होता. सोन्याचा कारीगर होता. महिना वीस पंचवीस कमवत होता. पण मुंबईत घर नव्हते.
बाबांनी तोंडावरच नकार कळवला.
सुमी एक दिवस बोललीच.
" काय गं नाटकं तुझी..
मुंबईच्या घराची. चांगली चांगली मुलं गेली तुझ्या नखऱ्याने. परवा तुला बघायला आलेला, त्याने बाबांकडे माझ्यासाठी मागणं घातलंय. मला तर तो चांगला वाटला. मी तर बाई होकार कळवणार आहे. "
तिच्यावर हसत मी मोठ्या तोऱ्याने बोलले.
" तू रहा इकडेच, विहिरीवरुन पाणी भरत, गाईचं शेण काढत आणि उन्हातून फिरत काळी होत.. मी बाबा मुंबईला जाईन. "

काही महिने गेले..
आणि तो आला. मुंबईला घर, गावी घर पण फक्त सुट्टीतच गावी येणारा. दिसायला एवढा चांगला नव्हता पण तो मुंबईवाला होता हेच माझ्यासाठी भरपुर होतं.
त्याला मी पसंत आली. मुंबईला घर आहे याची खातरजमा मामांनी करुन घेतली म्हणून मी सुद्धा होकार कळवला.
लग्न गावीच करुन दहा दिवसांनी मुंबईला गेलो सर्व. मुंबईचे घर खुपच लहान होते. सासू - सासरे एक दिर आणि आम्ही दोघं. वन रुम किचनच ते. किचनला पडदा लावून आमचा संसार सुरु झाला. पण एवढ्या छोट्याशा खोलीत नविन जोडप्याला काय डोंबलाचा एकांत मिळणार?
आमची होणारी घुसमट सासरेबुवांच्या लक्षात आली. त्यांनीच समोरुन यांच्यासोबत विषय काढला
" तुम्ही दोघं आपल्या विरार च्या खोलवर जा. तासभराचा प्रवास करावा लागेल तुला. "

आम्ही लगेच तयार झालो. एका रविवारी जाऊन खोली बघून आलो. स्टेशनपासून लांब रिक्षाने जायला लागलं. दोन दिवसात सामान जमवाजमव करुन पुढल्या रविवारी राहायला गेलो.
तिथे गेल्या गेल्या कळलं, की पहिल्या घरासारखी पाण्याची लाईन वगैरे नाही या नविन घरात. डोंगरात एक आदिवासी पाडा होता. त्यांना पैसे देऊन पिण्याचे पाणी घ्यावे लागतं. बाकी आंघोळीला वगैरे टँकर मागावायचे सोसायटीवाले.
म्हणजे रोज पुन्हा ते पाणी भरणं सुरुच झालं. त्यात ही खोली चौथ्या मजल्यावर.
पाणी भरुन भरुनच अर्धा दिवस जायचा. पुन्हा तिथेही भांडण. पाड्यातल्या बायका अंगावर धावून यायच्या, कधीतरी मारामारी सुद्धा. उन्हातून पाणी भरताना गावातले दिवस आठवायचे.
नवरा जो सकाळी जायचा तो रात्रीच यायचा. दोन तीन तासांचाच सहवास मिळायचा.
शिमग्यात गावी गेलो तेव्हा सुमी दिसली. चांगली अंगाखांद्याने भरली होती. तिचा नवरा सोबत होता... मी नाकारलेला.
दोघंही भरपूर आनंदी दिसत होते.
सुमीने मला बाजूला घेऊन सांगितलं..
" आम्ही पण येतोय मुंबईला, ह्यांच्या शेठची एक खोली आहे. पगारातून पैसे कापून घेणार आणि मग खोली आमच्या नावावर होईल. "
मला तिच्याबद्दल असूयाच वाटायला लागली. मी नाकारलेल्या मुलासोबत ती सुखी होती. मुंबईला जाऊन राहणार होती, विरार - नालासोपाऱ्याला नाही.

पुन्हा मुंबईला आल्यावर मी यांना विचारलं
" आपल्याला नाही का घेता येणार मुंबईत खोली? सुमीच्या नवऱ्याला घेता येते मग तुम्हाला का नाही? "

तर ते म्हणाले..
" भरपूर पैसे लागतात त्यासाठी. त्यांना चांगला शेठ मिळाला म्हणून खोली दिली. मी कंपनीत कामाला मला कोण देईल अशी मुंबईत खोली. ही खोली पण बाबांनी पतपेढीतल्या कर्जावर घेतलेली माझ्या नावावर, जुनी खोली विकून बारक्याला पण नालासोपाऱ्याला खोली घेऊन देणार आणि मग गावी जाऊन आराम करणार ते "
मी समजून चुकले की आता आपली या वनवासातून सुटका नाही. माझी सर्व स्वप्न कधीच भंग पावली होती. मुंबईला जाऊन मुंबईकर होण्याऐवजी मी विरारकर झाले होते.
अशातच यांच्या कंपनीची कसलीशी पार्टी होती. सर्वांना सपत्नीक यायचं होतं म्हणून हे मलासुद्धा घेऊन गेले.
एका मोठ्या हॉटेलात पार्टी होती कंपनीचे मॅनेजर, बाकीचे ऑफीसर त्यांच्या बायकांसोबत येत होते. सर्वांना भेटत होते. यांनी माझी ओळख करुन दिली.
" चांगली आहे रे तुझी बायको " असे चांगले चांगले लोक माझ्याबद्दल बोलत होते.
जेवण सुरु झालं तेव्हा टेबलावर समोर काटे चमचे आले. मला त्यांची अजिबात सवय नव्हती.
मी हातानेच खायला सुरुवात केली. समोर बसलेली मॅनेजर ची बायको पटकन तिच्या शेजारच्या बाई ला म्हणालेलं मी ऐकलं...
" ती बघ गावंढळ.. हाताने खातेय... "
खरंच मी इतक्या वर्षात मुंबईकर होण्याच्या नादात स्वतःकडे बघायची राहीलीच होती.
गर्दीच्या ट्रेन मधून उतरुन घरी गेल्यावर सरळ आरशासमोर गेली.
स्वतःला बघीतले.. मी जास्तच सावळी दिसत होते. गावी असताना होती त्यापेक्षा जास्त. आरामाचा विचार करता करता.. मी जास्तच गावंढळ झाले होती. ....
सुमी मात्र गावात राहून हळूहळू मुंबईकर झाली होती.

No comments:

Post a Comment